Thursday, December 4, 2008
मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यातील शहिदांना राष्ट्रीय एकता समितीचे अभिवादन
या सर्व शहीद व बळींना राष्ट्रीय एकता समितीचे भावपूर्ण अभिवादन!
क्रौर्याचे तांडव संपले. पण पुढे होणार नाही कशावरुन? ही आशंका भेडसावतच आहे. संतापाने अंतःकरण धगधगते आहे. हे तांडव करणारे कोण होते, कोठून आले, त्यांचा उद्देश काय होता, ते एवढी शस्त्रे घेऊन मुंबईत शिरलेच कसे इ. अनेक प्रश्न आपल्या मनात घुमत आहेत. त्याची स्पष्ट उत्तरे अजून मिळालेली नाहीत. चौकशी पूर्ण झाल्यावर हे तपशील मिळतील. त्यास अजून वेळ लागणार आहे. तथापि, काही आडाखे आपण नक्की बांधू शकतो.
एकतर, हा हल्ला केवळ देशांतर्गत हिंदू-मुस्लिम तणाव, काश्मीर प्रश्न यांच्यामुळे झालेला दिसत नाही. याचा अर्थ त्याचा अजिबात संबंध नाही, असे नाही. त्यातील विद्वेष, दुखावलेपण याचे संदर्भ आहेतच. पण त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय संदर्भ त्यास आहेत. इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात अमेरिकेने कायम लावून धरलेली इस्रायलची बाजू, या अमेरिकेशी भारताची वाढत चाललेली दोस्ती, शांतताप्रिय जागतिक जनतेकडून ज्या ओबामांच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाचे स्वागत केले गेले त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना आळा घालायचा दिलेला इशारा, पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारींनी भारताशी सहकार्य करण्यासाठी घेतलेला पुढाकार या सर्वांना इशारा देण्यासाठी हा हल्ला झाला. एकप्रकारे, हा हल्ला आंतरराष्ट्रीय आहे. मुंबई हे जागतिक भांडवली व्यवहाराचे एक महत्वाचे केंद्र आहे. हॉटेल ताज, ओबेरॉयमध्ये उतरणारे लोक हे आंतरराष्ट्रीय बडे लोक असतात, नरिमन भवन हे ज्यू धर्मगुरुंचे वसतीस्थान आहे. या वास्तूंवर हल्ला म्हणूनच केला गेला.
काही देशांतर्गत घटना लक्षात घ्यायला हव्यात. देशात अनेक मतभेदांसहित विकासाची वाटचाल सुरु होती. फुटीरवादी दहशतीच्या भयानक छायेखाली असलेल्या काश्मीरमधील जनतेने प्राणांचे भय न बाळगता निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करुन भारतीय लोकशाहीवर विश्वास दाखवला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम धर्मांध अतिरेक्यांनी स्फोट घडविण्याचे प्रकार चालू होतेच. त्यात हिंदुत्वाचा पुकार करणा-या धर्मांधांनी मालेगाव स्फोटासारख्या घटनांनी आम्हीही कमी नाही, हे दाखवण्याचा प्रकार सुरु केला. तथापि, काही जातीयवादी संघटना वगळता त्यांना जनतेतून व्यापक पाठिंबा नाही. ‘देवबंद’ सारख्या मुस्लिम पीठांनी हैद्राबाद तसेच इतरही अनेक ठिकाणी हजारो मुस्लिमांचे मेळावे घेऊन इस्लाम दहशतवादाला विरोध करतो, असे ठणकावून सांगत मुस्लिम अतिरेक्यांचा समाजातील पाया कमजोर करायला सुरुवात केली होती. देशातील हिंदू-मुस्लिम समाजातील सौहार्द बळकट होण्याच्या क्रमाला रोखणे हा उद्देशही या हल्ल्यामागे असावा. हिंदू व मुस्लिम दोहोंकडच्या धर्मांधांचा हा समान उद्देश आहे. भारतीय जनतेने तो सफल होऊ देता कामा नये.
दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे मालेगावच्या स्फोटाचे धागेदोरे खणण्यात यशस्वी होऊ लागल्यावर त्यांना हिंदू अतिरेक्यांकडून खूनाच्या धमक्या आल्या. प्रत्यक्षात ते मुस्लिम अतिरेक्यांचा बंदोबस्त करताना शहीद झाले. अतिरेक्याला धर्म नसतो, असे ते नेहमी म्हणायचे. तसेच आपल्या दहशतखोरविरोधी पथकाचे नाव त्यांनी हदशतवादविरोधी पथक असे केले होते. कारण दहशतखोर व्यक्तीशी आपला झगडा नसून तो दहशतवाद या प्रवृत्तीशी आहे, असे ते आपल्या पथकातील सहका-यांना सांगत असत. करकरेंसारख्या शहिदांचे बलिदान व्यर्थ जायचे नसेल तर हा सामाजिक सद्भाव वाढवण्याची आपण प्रतिज्ञा घ्यायला हवी.
पाकिस्तानशी युद्ध पुकारावे, अशा अतिरेकी सूचनाही या काळात पुढे येतील. त्यांपासून सावध राहावे लागेल. जे झरदारी आज पाकिस्तानचे अध्यक्ष आहेत, त्यांची पत्नी माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो या निवडणुकीच्या प्रचारात असताना पाकिस्तानातील मुस्लिम अतिरेक्यांकडूनच मारल्या गेल्या. पाकिस्तानातील मुस्लिम धर्मांधांच्या कारवाया, लष्कराचा राजकारणातला हस्तक्षेप यांनी पाकिस्तानच्या आजच्या राज्यकर्त्यांना घेरलेले आहे. त्यांच्यावर बेछूट टीका करुन अथवा आक्रमण करुन या धर्मांधांच्या व लष्कराच्या घे-यात त्यांना अधिक अडकवायचे की त्यांना ताकद देऊन तेथे खरी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मदत करायची हे डावपेच म्हणूनही आपल्याला ठरवणे आवश्यक आहे.
आपल्या सुरक्षा यंत्रणेतल्या कमजो-या, भ्रष्टाचार, राज्यकर्त्यांचा हलगर्जीपणा तसेच सत्तालाभासाठी संकुचित अस्मितांचा वापर करणा-या बेजबाबदार राजकारण्यांना ठिकाणावर आणण्यासाठी मतदानातली जागरुकता आणि राजकारणाला योग्य वळण लागण्यासाठी त्यात सक्रीय सहभाग तसेच अन्य उपक्रम जनतेने करणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या संविधानाने आपल्याला देशातील सामाजिक सद्भाव, एकता अखंड राखण्यासाठी तसेच जागतिक शांततेसाठी प्रयत्नरत राहण्याचा संकल्प दिला त्या ‘घटना दिना’ दिवशीच २६ नोव्हेंबरला हा अतिरेकी हल्ला झाला. संविधानाने दिलेल्या संकल्पाच्या मूळावर आघात करणा-या या हल्ल्याला खरे प्रत्युत्तर हे संविधानाने दिलेला हा संकल्प अधिक बळकट करणे हे आणि हेच होऊ शकते. तेच या हल्ल्यातील शहिदांना आणि बळींना खरेखुरे अभिवादन आहे.
३०.११.२००८
संपर्कः सुरेश सावंत - नीला लिमये, श्रमिक, ९३२-९३३, से. ७, कोपरखैरणे, नवी मुंबई- ४००७०९. फोनः २७५४४२१९, २७५४८२१२
Sunday, November 16, 2008
रेशन प्रश्न व डावपेच
रेशनचा प्रश्न खूप महत्वाचा व गंभीर आहे, हे खरे. पण तो आता सर्वांचा राहिलेला नाही, हेही खरे. आणि तो सर्वांचा राहिलेला नसला तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही, हेही खरे.
वरील तीन विधाने रेशनच्या प्रश्नाच्या स्वरुपासंबंधी आहेत. एखादा प्रश्न सोडवताना त्याच्या स्वरुपाची वस्तुनिष्ठ नोंद घेणे आवश्यक असते. अन्यथा डावपेचांची आखणी फसण्याची शक्यता असते. रेशनच्या प्रश्नाची स्वरुप निश्चिती व तो सोडवण्याचे डावपेच यासंबंधीचे काही मुद्दे नमुन्यादाखल मी येथे मांडणार आहे. रेशन चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून आलेल्या अनुभवांच्या आधारे ते मांडणार आहे. अभ्यासकांनी, विचक्षक वाचकांनी त्यात भर घालावी, दुरुस्ती सुचवावी ही अपेक्षा आहेच.
रेशनचा प्रश्न नेमका कोणाचा?
रेशनची सुरुवात झाली तो काळ अन्नधान्याच्या टंचाईचा होता. खाजगी व्यापाऱयांची साठेबाजी, नफेखोरी भरास आलेली होती. आर्थिक कुवत असलेला वर्ग अत्यल्प होता. याचा अर्थ, जवळपास सर्वांनाच व्यापाऱयांच्या नफेखोरीपासून संरक्षण म्हणून रेशनची गरज होती. 72-73 च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तर मुंबईसारख्या शहरात राहणाऱया अनेकांना खुल्या बाजारात धान्य, तेल विक्रीला बंदी घातल्याचे आठवत असेल. फक्त रेशनवरच या गोष्टी मिळत असत. आमच्याकडे स्वतची मोटार होती (म्हणजे आम्ही ऐपतवाले होतो), तरी आम्हाला रेशनच्या रांगेत उभे राहावे लागत होते, कारण खुल्या बाजारात धान्य, तेल मिळतच नव्हते, असा अनुभव अनेकजण आजही सांगतात. हरितक्रांतीची प्रक्रिया याच काळात सुरु होती. त्याची फळे मिळायला पुढच्या काळात सुरुवात झाली. खुल्या बाजारात धान्याची उपलब्धता वाढू लागली. ज्याची ऐपत होती, ते खुल्या बाजारात खरेदी करु लागले. याच काळात संघटित कामगारांचे वेतनमान वाढू लागले. क्रयशक्ती दुबळी असलेला मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्गाचा आर्थिक स्थिरतेकडे व पुढे सुस्थिरतेकडे प्रवास सुरु झाला. या प्रवासाबरोबरच रेशनच्या रांगेतून तो क्रमश नाहीसा झाला. रॉकेलसाठी म्हणून येणारेही गॅस सहज मिळू लागल्यानंतर रेशन दुकानाकडे फिरकेनासे झाले. आज चाळीशीच्या पुढे असणाऱया मध्यमवर्गीयांना आपण लहानपणी रेशनच्या रांगेत कसे उभे राहायचो, हे आठवते. पण त्यांच्या मुलांचा आणि रेशनचा काहीही संबंध आज नाही. हा मध्यमवर्ग आज 30 टक्क्यांच्या आसपास, म्हणजे 35 कोटी लोकसंख्येच्या दरम्यान आज देशात आहे. त्याला तर निश्चितपणे रेशनची आज गरज नाही. उरलेल्या 70 टक्क्यांचीच असू शकते. अर्थात, 30ः70 हे गुणोत्तर सगळीकडे सारखे आहे, असे नाही. या 70 टक्क्यांमध्येही अनेक स्तर आहेत. गरीब, अतिगरीब, निराधार, भणंग, बेघर इ.. हे सर्वजण असंघटित कामगार, अस्थिर जीवन जगणाऱया समुदायात मोडतात. कोणी नाका कामगार असतो, कोणी बांधकाम कामगार असतो, कोणी सफाई कामगार असतो, कोणी कंत्राटावर कंपनीत अल्पवेतनात काम करत असतो, कोणी मोलकरणी असतात, तर कोणी कचरा वेचक. काही ट्रफिक सिग्नलवर-लोकल ट्रेन्समध्ये मुलांना पाठीवर बांधून विक्री करत असतात, मिळेल ते काम करत असतात. संघटित कामगारांप्रमाणे यांना महागाई भत्ता लागू नसल्याने महागाईच्या तीव्रतेप्रमाणे यांची आवक वाढत नाही. सध्याच्या वाढत्या महागाईचा खरोखर ’फटका“ बसणारा हा वर्ग आहे. त्याला रेशनच्या संरक्षणाची नितांत गरज आहे. पण हे संरक्षण त्याला परिणामकाररित्या मिळत नाही. यातल्या अनेकांची तर रेशनव्यवस्थेने दखलच घेतलेली नाही. त्यांना रेशनकार्डच नाही.
प्रश्न गंभीर; मग दखल का नाही?
या विभागाच्या रेशनच्या प्रश्नांना अनेक आयाम आहेत. पण दुर्दैवाने त्यांची तशी चर्चाच होत नाही. हा विभाग पूर्वी रेशनवर असलेल्या मध्यमवर्गाप्रमाणे बोलका नाही, बाजारात उपलब्धता असल्याने थोडे अधिक कष्ट करुन अधिक कमवून तो वस्तू खरेदी करतो (अर्थव्यवस्थेत अधिक कमाईसाठी अधिक मेहनतीचा आजतरी त्याला अवकाश आहे.), काही वेळा उपभोग कमी करतो, पण त्याचे जीवन पूर्णतअडले असे होत नाही. त्याचे ’जगणे“ होत नसले, तरी ’तगणे“ होत असते. त्यामुळे आक्रोश करत रस्त्यावर उतरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याइतके त्याचे उपद्रव मूल्य आज नाही. तसे त्याचे जाणतेपणही नाही. असे उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले जात नाही. स्वतहून तो प्रश्न समजून घेऊन मांडण्याइतकी उसंत त्यांना नसते. मतांवर प्रभाव पाडण्याइतके उपद्रव मूल्य नसल्याने (यातले काही तर मतदारच नसतात.) राजकीय पक्षांनाही त्या प्रश्नाचे मोल नसते. याला दक्षिणेकडील काही राज्यांचा अपवाद आहे. तसेच काही डाव्या पक्षांचाही अपवाद आहे. पण यातही हा प्रश्न सातत्याने व समग्रपणे लावून धरणारे अपवादानेच आहेत. अभ्यासकांच्या पातळीवर हा प्रश्न अनेकदा उपलब्ध आकडेवारीच्या मर्यादेतच राहतो. एखाद-दुसरा अपवाद वगळता चळवळीतल्या लोकांसोबत राहून हा अभ्यास होताना दिसत नाही. शिवाय हे अभ्यास अहवाल बहुधा इंग्रजीतच असतात, स्थानिक भाषेत नसतात. त्यामुळे त्याचे उपयोजन किंवा त्यातून सामान्य कार्यकर्त्यांना दिशादिग्दर्शन होते आहे, असे घडत नाही. स्वयंप्रेरित, ध्येयवादी शिक्षित कार्यकर्त्यांची प्रगतीशील चळवळींतील भरती एकूणच रोडावल्याने याही चळवळीत तसे कोणी येत नाहीत. जे कोणी प्रगतीशील कार्यकर्ते विविध चळवळींत आज आहेत, त्यांतले बरेचसे आपापल्या चळवळींच्या चाकोरीतच अडकलेले आढळतात. व्यापक परिवर्तनासाठी परस्परांना संवादी राहण्याचे अवधान त्यांच्याकडून राखले जातेच, असे नाही. इतर अनेक चळवळींप्रमाणे रेशनच्या चळवळीतही या पोकळीत आज आढळतात ते प्रामुख्याने एनजीओचे लोक. ते लोकांना खूप मदत करत असतात, आंदोलनांत सहभागी होत असतात, लोकांना संघटित करत असतात. वस्तीतील त्यांची उपलब्धताही चांगली असते. तथापि, स्वयंपेरित, ध्येयवादी कार्यकर्त्यांचा सामाजिक-राजकीय जाणतेपणाचा सहभाग नसणे ही उणीव त्याने भरुन निघत नाही. शिवाय एनजीओंद्वारा होणारी साधनांची सहज उपलब्धतता समुदायांच्या तन-मन-धनाच्या आधारे चळवळीने स्वावलंबी बनण्यात अनेकदा अडथळा ठरते. या सर्वाच्या परिणामी, रेशन हा एक मोठा प्रश्न असला तरी, नेमकेपणाने, सुस्पष्टपणे, सर्वांगांनी समोर येत नाही.
यानंतर या प्रश्नाचे काही आयाम व त्यासंबंधीचे संभाव्य उपाय व डावपेच समजून घेऊया.
रेशन प्रश्नाचे विभिन्न आयाम, उपाय व डावपेच
1997 साली सरकारने रेशन व्यवस्था लक्ष्याधारित केली. त्याआधी ती सार्वत्रिक होती. प्रत्येकाला एकाच रंगाचे कार्ड, एकाच दराचे व एकाच प्रमाणात धान्य. ज्यांना गरज नाही, त्यांना रेशनव्यवस्थेतून वगळणे आणि गरजवंतांना अधिक स्वस्तात, अधिक प्रमाणात शिधावस्तू देणे व त्यायोगे सरकारचा अस्थानी खर्च कमी करणे, हे सूत्र या धोरणामागे होते. सूत्र योग्यच होते. पण या सूत्राप्रमाणे व्यवहार घडला नाही. धोरणकर्त्यांमधील तळातील वेध घेण्याच्या दृष्टीचा अभाव, राजकारणी, नोकरशहा व व्यापारी-दलाल यांचा भ्रष्टाचार व लोकांप्रतीची अनास्था यांमुळे हे सूत्र भोवंडून गेले. उदाहरणार्थ,
1. केंद्र सरकारने लाभार्थींचा कोटा ठरवून दिलेला असल्याने सर्व पात्र लाभार्थींचा समावेश होत नाही.
2. पात्र असूनही प्रचलित बीपीएल लिस्टमध्ये नाव नसल्याने लाभ मिळत नाही.
3. मुंबईसारख्या शहरांमध्ये ग्रामीण भागाप्रमाणे सर्व कुटुंबांची नोंद करणारी बीपीएल लिस्ट नाही. महागनगरपालिकेच्या सुवर्ण जयंती रोजगार योजनेसाठीची बीपीएल लिस्ट निवडक कुटुंबांची व वस्त्यांची असल्याने असंख्य पात्र लाभार्थींची नोंद तिथे असेलच याची खात्री नसते.
4. महाराष्ट्रात आज 3 प्रकारच्या बीपीएल लिस्ट आहेत. डीआरडीएची वार्षिक 20,000 रु., सुवर्ण जयंती रोजगार योजनेची वार्षिक 35,475 रु. व रेशनसाठी 15000 रु.. अशाप्रकारे एकाच राज्यात गरीब मोजण्याचे 3 मापदंड असण्यात काहीच तर्क नाही. शिवाय त्यामुळे गोंधळच होतो.
5. रेशनसाठीची वार्षिक 15,000 रु. उत्पन्नमर्यादा शहरासाठी व 4000 रु. ग्रामीण भागासाठी लक्ष्याधारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या सुरुवातीला म्हणजे 1997 साली महाराष्ट्रात ठरवण्यात आली. मधल्या काळात ग्रामीणची वाढवण्यात येऊन तीही 15,000 रु. वार्षिक करण्यात आली. आज 10 वर्षे उलटून गेल्यावरही ती तेवढीच राहावी, यातही काही तर्क नाही. दरम्यानच्या काळात वाढलेल्या महागाई निर्देशांकाप्रमाणे संघटित कामगारांचे पगार कितीतरी पटीने वाढले. मात्र या पगारवाढीचा न्याय रेशनसाठीचे गरीब ठरविण्यासाठी वापरण्यात आला नाही, ही त्या गरिबांची क्रूर चेष्टा आहे.
6. आर्थिक उत्पन्न मर्यादा गरीब ठरवताना अपुरी आहे. मुंबईत अनेक कचरा वेचक कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित उत्पन्न वार्षिक 15,000 रु. च्या वर जाते. पण त्यांचे अतिशय घाणीत काम करणे, बकाल वस्त्यांत वास्तव्य करणे, त्यामुळे होणाऱया आजारांसाठी होणारा खर्च इ. लक्षात घेता त्यांचे जीवन अत्यंत निकृष्ट असते. पण तरीही ते अधिकृतपणे बीपीएलमध्ये गणले जात नाहीत. हीच स्थिती असंघटित कामगार व अस्थिर जीवन जगणाऱया सर्व समुदायांची आहे. आज मुंबईसारख्या शहरात गरिबातला गरीबही 15,000 रु. वार्षिक उत्पन्नमर्यादेत जगूच शकत नाही. वास्तविक ज्यांना बीपीएलची रेशनकार्डे देण्यात आली आहेत, त्यातल्या एकाही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वरील मर्यादेत असण्याची अजिबात शक्यता नाही.
7. शिवाय रेशनकार्ड देताना आवश्यक ती वास्तव्याची व मूळ ठिकाणचे रेशनकार्ड रद्द केल्याची कागदपत्रे अशी दुबळी कुटुंबे सादर करु शकत नसल्याने त्यांना रेशनकार्ड मिळत नाही.
8. कागदपत्रांची अट शिथील करणारे काही जी.आर. शासनाने काढले आहेत. तथापि, केंद्रीय गृहखात्याकडून रेशनकार्ड देताना विशेष दक्षता घेण्यासंबंधी तसेच चारित्र्य व कागदपत्रांची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश येत गेल्याने या शासननिर्णयांची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. रेशनकार्ड हे रेशनसाठीच असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात रेशनकार्ड हे वास्तव्य व नागरिकत्व सिद्ध करण्याचे एक साधन झाल्याने हे होत आहे. परिणामी, आजही असंख्य गरजवंत कुटुंबे रेशनच्या कक्षेच्या बाहेरच आहेत.
यावर तसेच एकूण रेशनव्यवस्था सुधारण्यासाठीचे काही उपाय असे आहेत ः
1. सर्वप्रथम रेशनकार्ड हे वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरले जाणे पूर्णत बंद करणे. त्यासाठी केवळ आदेश काढून चालणार नाही (असे अनेक आदेश महाराष्ट्र शासनाने काढले आहेत. रेशनकार्डावर छापील सूचनाही करण्यात आली आहे. तरीही व्यवहारात पासपोर्ट, न्यायालय, नोकरी, शाळा, हॉस्पिटल, पोलीस इ. अनेक ठिकाणी रेशनकार्डाचा वास्तव्याचा पुरावा म्हणून वापर होतोच.) यासाठी ’कुटुंबओळखपत्रा“चा पर्याय दिला पाहिजे. मतदार ओळखपत्र हे एका व्यक्तीचे असल्याने त्याचा उपयोग होत नाही. रेशनकार्डावर कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील, वय, नाते इ. असतो. असा तपशील असणारे ’कुटुंब ओळखपत्र“ सर्व नागरिकांना द्यायला हवे. (हे ओळखपत्र देण्यासाठी प्रारंभी रेशन यंत्रणेचाही वापर करता येईल.) त्यानंतर ज्यांना रेशनसाठी रेशनकार्डाची गरज नसेल, अशा कुटुंबांना रेशन कार्डे परत करण्याचे (सरन्डर) करण्याचे आवाहन करावे. आज दिसणारी बिगर रेशनसाठी रेशनकार्ड काढण्यासाठी येणाऱयांची गर्दी मग नाहीशी होईल. ते सर्व कुटुंब ओळखपत्रासाठी रांगा लावतील. आता रेशन कार्यालयात रेशनकार्ड काढण्यासाठी येणारा माणूस हा रेशनसाठीच रेशनकार्ड काढणारा असेल. त्याच्या अर्जातील व्यक्ती व राहण्याची जागा यांची प्रत्यक्ष पाहणी करुन रेशन इन्स्पेक्टर तात्पुरते अथवा कायमस्वरुपी रेशनकार्ड देण्याची शिफारस आपल्या वरिष्ठांना करु शकेल. रेशनकार्डाचे महत्वच कमी झाल्याने कागदपत्रांच्या जंजाळात या माणसांना अडकविण्याचे आता कारणच उरणार नाही. श्रीमंत, उच्च व मध्यमवर्गीय लोकांना कुटुंब ओळखपत्रातच रस असल्याने त्यांनी रेशनकार्ड काढण्याची शक्यता मंदावते. म्हणजेच कनिष्ठ मध्यवर्गीय, गरीब व अतिगरीब विभागच रेशन कार्ड काढतील. समाजातील वरचा 30 टक्क्यांहून अधिक विभाग अशारीतीने व्यवस्थात्मक (सिस्टिमिक) बदलामुळे बाहेर पडेल व गरजवंतच रेशनव्यवस्थेत राहतील. एका वेगळ्या व चांगल्या अर्थाने रेशनव्यवस्था लक्ष्याधारित होईल. आताच्या व्यवस्थेतील राँग एक्सक्लुजन व राँग इन्क्लुजन हे दोन्ही दोष टाळता येतील. बोगस कार्डाच्या व सबसिडी वाया जाण्याच्या समस्या बऱयाच प्रमाणात कमी होतील.
2. हे झाल्यावर जे रेशनव्यवस्थेत राहतील त्या सर्वांना बीपीएल मध्ये घेता येईल. केंद्र सरकारने आवश्यक तर इष्टांक वाढवून द्यायला हवा. नाहीतर राज्य सरकारने तो भार उचलावा. (तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ ही राज्ये असा भार उचलत आहेत.) स्वतची अशी काहीही स्वतंत्र पद्धत न अवलंबता केंदाने ठरवून दिलेल्या इष्टांकाप्रमाणे व स्वतची काहीच अधिक रक्कम न घालता राज्य सरकार रेशनच्या योजना राबवत आहे. (अलिकडेच दिल्ली सरकारने 1 लाख रुपयांपर्यंतच्या रेशनकार्डधारकांना 35 किलो धान्याची गॅरंटी दिली आहे. महाराष्ट्रात, खास करुन मुंबईत प्रत्येक एपीएल कुटुंबाला प्रति महिना फक्त 1 ग्रॅम धान्य वाट्याला येते, असा वृत्तांत हिंदुस्तान टाईम्स या दैनिकाने 16 जून 2008 रोजी प्रसिद्ध केला आहे.)
3. हे होईपर्यंत अंतरिम पाऊल म्हणून बीपीएलसाठीचा आर्थिक निकष रद्द करुन व्यवसाय व राहण्याची जागा यांच्या आधारे बीपीएल रेशनकार्ड देण्यात यावे. उदा. नाका कामगार, बांधकाम कामगार, वीटभट्टी किंवा ऊसतोडणी कामगार, मोलकरणी किंवा घरगडी, झोपडपट्टीत राहणारे इ. ना बीपीएल रेशनकार्ड द्यावे. कचरा वेचक, हातगाडी ओढणारे, सायकल रिक्शा चालवणारे, आदिम जमाती इ. ना सरसकट ’अंत्योदय“ योजनेत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (बीपीएलच्या यादीत त्यांचे नाव असण्याची गरज नाही.) त्याच धर्तीवर, नाल्याच्या शेजारी राहणारे, डोंगर उतारावर राहणारे, डंपिंग ग्राऊंडवर किंवा त्याच्या जवळ राहणारे, फुटपाथवर राहणारे, विस्थापित इ. ना अंत्योदय मध्ये घेण्यात यावे.
4. वरील पद्धतीतून एक बाब उघड होते, ती म्हणजे, प्रचलित बीपीएल यादीचा व रेशनकार्डाचा संबंध तोडावा. बीपीएल यादी ही 5 वर्षांसाठी असते. (ती खुली-ओपनएंडेड नसते.) त्या यादीत चुकीच्या सर्वेक्षणामुळे न आलेले अथवा दरम्यानच्या काळात परिस्थिती ढासळलेले लोक सवलतीच्या रेशनला वंचित राहतात. वाढत्या महागाईच्या काळात अन्नअसुरक्षितता ही प्रवाही स्थिती असते. (जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी अलिकडेच सांगितले की, वाढती महागाई व जागतिक अन्नअरिष्टामुळे अजून 10 कोटी लोक गरीब होतील.)
5. शहरात वस्ती सभा, चाळ सभा, त्या विशिष्ट वस्तीतील बचतगट अथवा महिला मंडळांच्या सर्व सदस्यांची सभा (महिला ग्रामसभेच्या धर्तीवर) आयोजित करुन त्यांच्यापुढे बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थींची संभाव्य यादी मांडावी व मंजूर करुन घ्यावी. काही ठिकाणी त्यांनाच ती पीआरए (पार्टिसिपेटरी रॅपिड अप्रायजल) तंत्राचा वापर करुन तयार करण्यास सांगावी. पारदर्शकतेसाठी ही प्रभावी पद्धती आहे. पीआरएचे प्रशिक्षण करणे मात्र आवश्यक आहे.
6. ग्रामीण भागात ग्रामसभेच्या ऐवजी वाडीसभा तसेच महिला सभेचा वापर यासाठी करावा.
7. दरवर्षी लाभार्थ्यांचे पुनर्विलोकन करावे. पात्र असलेल्यांचा समावेश करावा, अपात्रांना बाहेर काढावे. या सर्व कामात स्वयंसेवी संस्थांचे सहाय्य घेता येईल.
8. राँग इन्क्लुजनऐवजी राँग एक्स्माक्लुजन हा अधिक चिंतेचा विषय असायला हवा. शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकही निरपराध सापडू नये, असे सूत्र न्यायालयीन खटल्यात वापरले जाते. अन्नसुरक्षेचा प्रश्न हा जीवन जगण्याशीच असल्याने त्यात तर हे तत्त्व असलेच पाहिजे. राज्यकर्त्यांचे उद्दिष्ट सबसिडी वाचवणे हे नव्हे, तर माणसाला उपासमारीपासून वाचवणे हे असले पाहिजे. याचा अर्थ, चुकीचा समावेश टाळण्याकडे दुर्लक्ष करणे, असा नव्हे. ती दक्षता तर घ्यायचीच.
9. छत्तीसगढ राज्याने आपल्या राज्याची अशी स्वतंत्र ऑर्डर तयार केली आहे. तशी महाराष्ट्र सरकारने करण्याची गरज आहे. अशा ऑर्डरच्या स्वरुपात सर्व शासन निर्णय एकत्रितपणे अंमलबजावणी करणाऱया अधिकाऱयांना व जनतेला उपलब्ध झाल्यास त्यात दोहोंचीही सोय होते. अंमलबजावणीत गोंधळ वा गैरसमजुती राहत नाहीत.
10. रेशनव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाने यातील खूप प्रश्न सुटू शकतील. रेशनव्यवस्थेचे विकेंद्रीकरण याचा अर्थ केंद्राकडून धान्य न घेता राज्याने त्याच्या वाट्याची सबसिडी प्रत्यक्ष घ्यायची. या सबसिडीच्या रकमेतून आपल्या राज्याची विभागवार तसेच वर्षभरातील विविध हंगामांतील गरज, खाण्याच्या सवयी लक्षात घेऊन शक्यतो स्थानिक भरड धान्याची खरेदी करणे (सामान्य शेतकऱयाचा हितसंबंधही त्यातून रेशनव्यवस्थेशी जोडला जाईल), स्थानिक उपलब्धता नसेल तर जेथून स्वस्तात मिळेल तेथून खरेदी करणे व जिल्हापातळीवर वाटपाचे नियोजन करणे. गावात बचतगटांद्वारे रेशनचे वितरण करणे. गावातील गरजवंतांची प्राधान्यक्रमाची यादी गावात महिला ग्रामसभा तसेच वाडीसभांद्वारे ठरवणे. यातील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी लाभार्थींची दक्षता समिती तयार करणे. या समित्या दुकाननिहाय असाव्यात.
11. महाराष्ट्रातील 86 टक्के रेशन दुकानांचे अधिकृत उत्पन्न बीपीएलपेक्षा कमी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या कमिशनरांच्या अहवालात नोंदवलेले आहे. तरीही रेशन दुकाने मिळविण्यासाठी आटापिटा, लाच देणे हे का चालते? उत्तर सरळ आहे, भ्रष्टाचार करण्यासाठी. यावर उपाय म्हणून बचतगटांना रेशन दुकाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने 3 जानेवारी 2006 ला घेतला. पण रेशन दुकानदार व सर्वपक्षीय आमदारांच्या दबावाखातर तो निर्णय माघारी घेऊन नोव्हेंबर 2007 ला सुधारित निर्णय जाहीर केला. त्याप्रमाणे आता फक्त नवीन व बंद पडलेली रेशन दुकाने बचत गटांना द्यावयाची आहेत. प्रश्न आहे, ही दुकाने चालणार कशी? छत्तीसगढ सरकारने यावर केलेली उपाययोजना पथदर्शक आहे. 75 हजार रुपये 20 वर्षांच्या मुदतीचे बिनव्याजी कर्ज, द्वार वितरण योजनेद्वारा सरकार दुकानापर्यंत माल पोहोचवणार इ. प्रकारचे सहाय्य त्यांनी बचतगटांना केले आहे. त्यामुळे ती दुकाने चालू शकतात. महाराष्ट्रात जुन्या जी.आर.मध्ये वितरण भवन, द्वार वितरण योजना इ. विशेष सवलती बचतगटांच्या दुकानांना देण्याचे नमूद केलेले होते. नव्या आदेशात हे सगळे गायब आहे. अशा स्थितीत ही दुकाने चालणे अशक्य होणार आहे. सरकारच्या मते बचतगटांना रेशन दुकाने देणे हा क्रांतिकारी निर्णय आहे. तो तसा व्हायचा तर या दुकानांना सरकारने विशेष बाब मानले पाहिजे व कमिशन वाढवून तसेच अन्य सुविधा देऊन ती चालतील ही जबाबदारी स्वतची समजली पाहिजे. यासाठी एक मॉनिटरिंग कमिटी सरकारने नियुक्त केली पाहिजे. ही समिती राज्यातील बचतगटांना दिलेल्या काही निवडक दुकानांचा अभ्यास करेल व आवश्यक त्या सुधारणांसाठी सरकारला सूचना देईल आणि या सूचनांची अंमलबजावणी झाली का तेही पाहील.
12. रोख सबसिडी देऊन खुल्या बाजारात धान्य खरेदी करण्याचा (फूड स्टँप किंवा स्मार्ट कार्ड) पायलट प्रोजेक्ट शहरातील एखाद्या भागात करावा. या कल्पनेच्या बाजूच्या तसेच विरोधी असलेल्या तज्ञांची समिती नेमून त्याचा बारकाईने अभ्यास करावा. या अभ्यासाच्या निष्कर्षांवर तिचा पुढील विस्तार करावयाचा की ही कल्पनाच रद्द करावी, याचा निर्णय घ्यावा. रोख सबसिडीची रक्कम संघटित कामगारांच्या पगाराप्रमाणे महागाई निर्देशांकावर ठरावी. ही रक्कम केडिट कार्ड पद्धतीने (स्मार्ट कार्ड) वापरता येण्याची व्यवस्था करावी. सध्याच्या वाढत्या महागाईचा फटका तळच्या विभागांना अधिक बसणार आहे. अमर्त्य सेन म्हणतात त्याप्रमाणे, वस्तूंची उपलब्धता नसणे हे उपासमारीचे कारण 1943 च्या बंगालच्या दुष्काळातही नव्हते. मुख्य कारण दुकानाच्या फळीवरील वस्तू खरेदी करण्याची क्षमता (क्रयशक्ती) नसणे, हे होते. आजही तेच आहे. अशावेळी दुर्बलांना क्रयशक्ती बाहेरुन देण्याचा प्रयोग करणे व त्याची परिणामकारकता तपासणे योग्य ठरेल. ज्यावेळी वस्तूंची उपलब्धताच धोक्यात येईल, त्यावेळी वस्तूंचेच रेशनिंग करावे लागेल. या लेखाच्या प्रारंभी नोंदवल्याप्रमाणे 70 च्या दशकात मुंबईसारख्या शहरात हे पाऊल उचलले गेले होते. (आजच्या जागतिक अन्नअरिष्टाच्या काळात अमेरिकेतल्या वॉलमार्टमध्ये एकावेळी तांदळाच्या 4 पेक्षा अधिक पिशव्या दिल्या जात नाहीत. अशारीतीचे रेशनिंग वेळ आल्यास आपल्याकडेही करावे लागेल.)
डावपेचांविषयी आणखी थोडेसे...
’महागाई वाढली आहे-रेशनव्यवस्था मजबूत करा“, एवढेच बोलून चालणार नाही. ती मजबूत कशी करायची, याचे वरीलप्रमाणे तपशील कार्यकर्त्यांना मांडावे लागतील. प्रत्यक्ष अंमलबजावणीत सहभागी व्हावे लागेल. लवचिकता व व्यावहारिकता दाखवावी लागेल. उदा. रेशनव्यवस्था सार्वत्रिक झालीच पाहिजे, ही काहींची घोषणा आहे. ’सरकारने रेशनव्यवस्था मोडीत काढण्यासाठी म्हणून लक्ष्याधारित केली. यामागे जागतिक बँकेचा दबाव आहे. या दबावापोटी शासन कल्याणकारी भूमिकेपासून ढळत आहे. त्याचा एक भाग म्हणून रेशनव्यवस्था लक्ष्याधारित करण्यात आली.“ ही या मागची धारणा. ही धारणा योग्य आहे, असे मानले, तरी रेशनव्यवस्था सार्वत्रिक असतानाच्या काळातही समाजातील वरचा थर रेशनवर येत नव्हता, त्याला बाजारात अधिक चांगल्या प्रतीचे धान्य उपलब्ध होते व ते खरेदी करण्याची त्याची क्षमता होती, ही वस्तुस्थिती आजही तीच आहे. समजा रेशनव्यवस्था सार्वत्रिक केली, तरी हा वर्ग रेशनवर येण्याची दूरान्वयानेही शक्यता नाही. बरे, ज्याची बाजारातून खरेदी करण्याची क्षमता आहे, त्याला काय म्हणून सवलतीचे धान्य रेशनद्वारे द्यायचे?
फूड स्टँपसारख्या प्रयोगांनाही याच मनोभूमिकेतून विरोध होतो. या भूमिकेनुसार, फूड स्टँप शब्द जरी उच्चारला, तरी तो उच्चारणारा जागतिक बँकेचा बगलबच्चा, जनविरोधी ठरतो. वस्तूंचे रेशनिंग व क्रयशक्तीचे रेशनिंग यात फरक आहे. आज रेशनवर सवलतीत धान्य मिळते, याचा अर्थ, खुल्या बाजारातील धान्याचा भाव व रेशनवरील धान्याचा भाव यातील फरकाची रक्कमच सरकार रेशनकार्डधारकाला देते. मग ती दुकानदाराकरवी का द्यावी? महागाई निर्देशांकाची जोड देऊन सरळ का देऊ नये? भारतीय अन्न महामंडळाचे, शेतकऱयांचे मग काय होईल, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यालाही उत्तरे आहेत. पण इथे त्याच्या तपशिलात जाणे योग्य ठरणार नाही. पण रॉकेलमध्ये सरळ अनुदानाची पद्धत स्वीकारण्यात तर शेतकरी किंवा भारतीय अन्न महामंडळाचा हितसंबंध आड येत नाही. बाजारभावाने रॉकेल विकणारी फ्री सेलची दुकाने जागोजाग काढायची. सगळ्यांना एकच भाव. ज्या गरिबांना किंवा सामान्यांना सवलतीत रॉकेल द्यायचे आहे, त्यांना फरकाची रक्कम आगाऊ द्यायची. याचा अर्थ 10 रु. लीटर हा रेशनचा भाव व बाजारातील विनाअनुदानित रॉकेलचा भाव समजा 40 रु. असला, तर 30 रु. ही फरकाची रक्कम द्यायची. रॉकेलमधला काळाबाजार, त्यातले माफिया ही प्रचंड धोंड गरिबांच्या मार्गात सध्या आहे. ती दूर करण्यासाठीचे झगडे करत असतानाच प्रत्यक्ष सबसिडी देण्याचे व्यवस्थात्मक बदलाचे मार्ग का वापरु नयेत? ’ न रहेगा बांस, न रहेगी बासुरी“ अशा पद्धतीचे मार्ग का शोधू नयेत?
रेशनमध्ये 1 रु. पोहोचवायला 4 रु. खर्च हा नियोजन आयोगाचाच निष्कर्ष असताना सबसिडी वाया जाण्याचे मार्ग रोखणे, ही चळवळीचीही जबाबदारी आहे की नाही? सध्या आपल्याला 335 रु.ला मिळणाऱया गॅस सिलेंडरची खरी किंमत आहे, 653 रु.. म्हणजे सरकार स्वतचे 318 रु. एका सिलेंडरमागे आपल्याला देते. ही 318 रु. ची सबसिडी सगळ्यांना का? ज्या 35 कोटींच्या मध्यमवर्गाचा प्रारंभी उल्लेख केला आहे, त्याला या सबसिडीची काहीही आवश्यकता नाही. चळवळ करणाऱयांचे सरकार आले तर, त्यांचा प्राधान्यक्रम काय राहील, याचा विचार करुन आजच्या आपल्या मागण्या ठरवण्याचा जबाबदारपणा आपण दाखवायला नको का?
मुद्दा हा की, जुने अभिनिवेश़, कर्मठ धारणा सोडून व्यवहार्य मागण्या ठरवाव्या लागतील. त्यावर लोकमत संघटित, क्रियाशील करावे लागेल. व्यापक एकजूट साधण्यासाठी किमान सहमतीचे तत्त्व काटेकोर पाळण्याची लवचिकता दाखवावी लागेल.
रेशनव्यवस्था आजन्म ठेवावी, ही ही आपली अपेक्षा असता कामा नये. बाजारात वस्तूंची उपलब्धता आणि तिथे सन्मानाने खरेदी करण्याची क्षमता निर्माण करणे, ही आपली दिशा असली पाहिजे. आज विकसित होणाऱया अर्थव्यवस्थेत ज्यांच्याकडे क्रयशक्ती नाही, त्यांना न्याय्य मोबदला देणारा रोजगार मिळण्यासाठीचा लढा लढत असतानाच अधिक मोबदला देणाऱया रोजगारासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांच्यात वृद्धिंगत करुन त्यांना सिद्ध करणे गरजेचे आहे.
दैनंदिन जीवनात रेशनची गरज संपणे, ती व्यवस्था केवळ आपत्तीकाळासाठीच ठेवणे, हेच आजच्या रेशनचळवळीचे लक्ष्य असले पाहिजे.
- सुरेश सावंत
संपर्क ः रेशनिंग कृती समिती, 52, गिल्डर लेन महानगरपालिका शाळा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या समोर, मुंबई - 400008
परित्यक्ता, निराधार स्त्रिया, विडी कामगार, कोल्हाटी व पारधी यांना उरले तर रेशन देऊ म्हणणार्या शासन निर्णयांना विरोध करा
अलिकडेच शासनाने रेशनसंबंधी काही निर्णय जाहीर केले आहेत, यातील बहुतेक शासननिर्णय अथवा आदेश ही केवळ रंगसफेदी आहे. खरे म्हणजे ती चेष्टाच आहे. रेशनव्यवस्था परिणामकारक करण्यासाठी त्यांचा उपयोग नाही. विशेषत परित्यक्ता, निराधार, विडी कामगार, पारधी, कोल्हाटी यांना बीपीएल कार्ड देण्याचे शासननिर्णय तर सामाजिक न्यायाचा अवमान करणारे आहेत. या दोन निर्णयांचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे:
१) विडी कामगार, पारधी व कोल्हाटी यांना तात्पुरते बीपीएल कार्ड (शासन निर्णय दि. ९ व १२ सप्टेंबर २००८) : या ३ घटकांना तात्पुरत्या स्वरुपात पिवळी कार्डे देऊन त्यांना बीपीएलचा लाभ देण्यात येणार आहे. यात २ चलाख्या आहेत. एक, सध्या बीपीएलच्या धान्याचा पूर्ण उठाव नाही. (त्याचे कारण लोक घेत नाहीत, हे नसून सरकारच्या यंत्रणेचे ते अपयश आहे.) म्हणून शिल्लक राहिलेल्या धान्यातून या मंडळींना हा लाभ देण्यात येणार आहे. मूळच्या लोकांनी त्यांचा पूर्ण कोटा उचलल्यास तसेच वरुन कोटा कमी आल्यास या मंडळींना हा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ इतरांचे जेवण होऊन शिल्लक राहिले तर, त्यांचे खरकटे उरले तर अथवा एखादा जेवायलाच आला नाही म्हणून उरले तर या मंडळींना धान्य मिळणार. म्हणजे पूर्ण ३५ किलो मिळेलच असे नाही तसेच अजिबात मिळणारही नाही. राज्य सरकार स्वतची एक दमडीही खर्च करणार नाही. केंदाच्या मेहरबानीवरच हे चालणार. म्हणजे आयजीच्या जिवावर बायजी उदार ! छत्तीसगढ सरकार राज्यातील ७० टक्के जनतेला अंत्योदयच्या दराने म्हणजे ३ रु. किलो भावाने ३५ किलो तांदूळ देते. त्यासाठीचा ८३७ कोटींचा खर्च राज्य स्वत करणार आहे. आंध्र प्रदेशात २ रु. किलो दराने तर तामिळनाडूत १ रु. किलो दराने तांदूळ जवळपास सार्वत्रिकपणे मिळतो आहे. त्यासाठीचा खर्च या राज्यांनी स्वत उचलला आहे. कर्नाटकातही सरकारने खर्च उचलून रेशनचे लाभ अधिक परिणामकारक केले आहेत. फुले-आंबेडकरांचे नाव घेणारे महाराष्ट्र सरकार मात्र असा खर्च स्वत करायला तयार नाही. म्हणूनच हा जीआर काढून उपेक्षित समाजघटकांशी सामाजिक न्याय करण्याची ही राज्य सरकारची तऱहा निर्लज्जपणाची आहे. दुसरी चलाखी म्हणजे, या मंडळींना पिवळी कार्डे दिल्यानंतर त्यांनी कायमस्वरुपी धान्याची मागणी करु नये म्हणून त्यांच्या कार्डावरच 'तात्पुरते लाभार्थी' असा शिक्का मारला जाणार आहे. शिवाय त्यांच्याकडून हा लाभ तात्पुरता आहे, शिल्लक राहिल्यास मिळेल, याची मला पूर्ण जाणीव आहे...अशा आशयाचे सहमतीपत्र लिहून घेतले जाणार आहे. म्हणजे लोकांनी आवाज उठवू नये, आपला अधिकार मागू नये याचा चोख बंदोबस्त सरकारने केला आहे. वाह रे सामाजिक न्याय!
१) परित्यक्ता व निराधार स्त्रियांना तात्पुरते बीपीएल कार्ड (शासन निर्णय दि. २९ सप्टेंबर २००८) : हा निर्णय वरील प्रमाणेच आहे. उरले तर धान्य मिळणार. यांच्याकडूनही सहमतीपत्र लिहून घेणार...वगैरे निर्लज्जपणा, फसवणे तसेच. शिवाय एक मोठी गैरसमजूत अशी की, परित्यक्ता व निराधार स्त्रिया यांना घटस्फोटिता समजण्यात आले असून त्यांच्या धर्म/जातीतील चालीरीतींतील विविधता लक्षात घेऊन त्यांच्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. परित्यक्ता म्हणजेच घटस्फोटिता असा चुकीचा अर्थ सरकारने इथे घेतला आहे. परित्यक्ता म्हणजे नवऱयापासून वेगळी राहणारी बाई. पण कायदेशीरदृष्ट्या तिला पती असतो. कायदेशीरदृष्ट्या तिचा घटस्फोट होतो तेव्हा ती घटस्फोटिता होते. निराधार स्त्री ही परित्यक्ता, घटस्फोटिता, विधवा किंवा अविवाहितही असू शकते. जिला कोणाचा आधार नाही, ती निराधार. पण निराधार म्हणजे घटस्फोटिता, असाच अर्थ इथे सरकारने घेतला आहे. या गैरसमजामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीत गोंधळच होणार आहे.
अन्न अधिकार अभियानाशी संबंधित विविध संघटनांनी आझाद मैदानात जागतिक अन्न दिनी म्हणजे १६ ऑक्टोबर २००८ रोजी हे शासन निर्णय पारधी व परित्यक्ता असलेल्या व्यक्तींच्या हस्ते फाडून जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदही घेण्यात आली. अन्न अधिकार अभियानाने राज्यातील अनेक संघटनांना या शासन निर्णयांना विरोध करुन तो दुरुस्त करण्यासाठी सरकारवर दबाव आणावा, असे आवाहनही केले. प्रमुख वर्तमानपत्रांत तसेच काही दूरदर्शन वाहिन्यांवरही याबाबतच्या बातम्या आल्या. तथापि, अजूनही या निर्णयांत सुधारणा करत असल्याचे शासनाने जाहीर केलेले नाही. याचाच अर्थ, चळवळीचा पुरेसा दबाव अजून पडलेला नाही. तो वाढवणे आवश्यक आहे.
यासाठी या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून सामाजिक न्यायाची सरकार चेष्टा करते आहे, ही जाणीव त्यांच्यात निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारला त्वेषाने याचा जाब विचारायला त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले पाहिजे. त्यांना प्रसारमाध्यमांसमोर निवेदने करायला भाग पाडले पाहिजे. दरम्यान, एकही विडी कामगार किंवा एकही पारधी वा कोल्हाटी समाजाचे कुटुंब सुटता कामा नये, त्या प्रत्येकाला पिवळे कार्ड मिळाले पाहिजे, याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. या विभागांत काम करणाऱया संघटनांच्या हा निर्णय लक्षात आणून दिला पाहिजे. हे कार्ड मिळवून देऊन या समाजविभागांच्या सभा घेऊन त्यांच्या मनात वरील चेष्टेविरोधात संताप निर्माण केला पाहिजे. रेशन दुकानावर धान्याची वसूली (पिकेटिंग), अधिकाऱयांना घेराव, लोकप्रतिनिधींसमोर धरणे, प्रसारमाध्यमांना निवेदने याचे सत्र सुरु केले पाहिजे. निवडणुका जवळ आल्याने आपल्याला 'गंडवणे' सुरु झाले आहे, याची चीड लोकांच्यात निर्माण होईल, यासाठी आवश्यक त्या सर्व कृती तातडीने केल्या पाहिजेत.
आपण आपापल्या भागातील परित्यक्ता व निराधार स्त्रियांचे अर्ज भरुन पिवळ्या कार्डाची मागणी करण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. त्याची जी काय छाननी अधिकार्यांना करायची, ती तातडीने करा, असा आग्रह धरायला हवा. परित्यक्ता म्हणजे घटस्फोटिता असा अर्थ धरुन ते अडवणूक करायला लागले की त्यांच्याकडून लेखी उत्तर मागावे. हे उत्तर जोडून जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन त्यांचेही लेखी उत्तर मागावे. ही सर्व हकीगत प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करावी. महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांचे, वकिलांचेही याकडे लक्ष वेधावे. शक्य तिथे चौकात, तहसील कार्यालयांवर आंदोलने करावी.
हे शासन निर्णय माघारी घेऊन सुधारित स्वरुपात ते पुन्हा काढावेत, याचा अर्थ परित्यक्ता, निराधार स्त्रिया, विडी कामगार, कोल्हाटी व पारधी या समाजविभागांना कायमस्वरुपी व नियमितपणे अर्ध्या दरातील रेशनचा लाभ देणारे रेशनचे पिवळे कार्ड मिळावे. त्यांच्याकडून कोणतेही सहमतीपत्र भरुन घेऊ नये, असा आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
Thursday, November 13, 2008
राज ठाकरेंचा 'मराठी माणूस' हा मुद्दा जरा मुद्दा म्हणून बघूया
बाळासाहेबांच्या राजकीय वारसा हक्कातील भांडणातून राज ठाकरे शिवसेनेपासून विभक्त झाले, विभक्त झाल्यानंतर आपले वेगळेपण दिसावे म्हणून शिवसेनेने तोंडी लावण्यापुरती ठेवलेली महाराष्ट्राची अस्मिता दर्शवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष राज ठाकरेंनी काढला. भगव्या, निळ्या व हिरव्या रंगांचा जाणीवपूर्वक समन्वय साधणारा ध्वज फडकावत पक्ष स्थापनेच्या भाषणावेळी केलेल्या व्यापक मुद्द्यांनी आपले ’खास“ वेगळेपण ठसत नाही, व्यापक आधारही तयार होत नाही, हे लवकरच त्यांच्या लक्षात आले. मग रेल्वेत भर्ती व्हायला आलेल्या बिहारी तरुणांवर हल्ला, टॅक्सीड्रायव्हर, हातगाडीवाले भय्ये यांना मारहाण, नंतर मराठी पाट्या दुकानांवर लावण्यावरुन हंगामा असा कार्यक्रम घेत परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे 'मराठी माणसा'ची पिछेहाट झाल्याचा मुद्दा त्यांनी पकडला आणि आता ते त्यावर स्थिर झालेत. निवडणुकीचे गणित जमविण्यासाठी उत्तर भारतीयांना जवळ करणा-या शिवसेनेची त्यामुळे अडचण झाली व आता त्यांनीही राज ठाकरेंनी उच्चारलेले मुद्दे हे मुळात आमचेच आहेत, असा मालकी हक्क दर्शविणारे उपक्रम सुरु केले आहेत. राज ठाकरेंना केवळ 'मराठी माणूसच' आता हवा आहे, उद्धव ठाकरेंचे तसे नाही. त्यांना राज्याची सत्ता घेण्यासाठी सर्वाधिक आमदार देणारी मुंबई जिंकायची तर 30 टक्क्यांहूनही कमी असलेल्या मराठी माणसावर केवळ विसंबून चालणार नाही, हे कळते. शिवाय भाजपच्या संगतीने हिंदुत्वाचा मुद्दा आधीच पत्करलेला असल्याने फक्त मराठी हिंदूंचे प्रतिनिधीत्व कसे करणार? राज ठाकरेंना सध्या तरी पूर्वीच्या शिवसेनेत असतानाच्या हिदुत्वाशी देणेघेणे नाही. त्यांचा मुद्दा सरळ आहे - मराठी माणूस. त्यामुळे राज ठाकरेंच्या मुद्द्याची धार उद्धव ठाकरेंना आणू म्हटली तरी आणता येणे कठीण आहे. त्यामुळे शिवसेनेची बरीचशी 'गोची' झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे परभारे शिवसेनेची मते कमी होण्यात, पर्यायाने सत्तेकडचे शिवसेनेचे प्रयाण रोखण्यात हित असल्याने राज ठाकरे ही त्यांची आताची डोकेदुखी नसून उलट मदतच आहे. साहजिकच राजलीलांना वेसण घालण्यात ते आस्ते कदमच राहणार.
मग लोक राज ठाकरेंना प्रतिसाद का देतात? त्यांना या आतल्या गोष्टी कळत नाहीत? की लोक भावनिक आवाहनांना फसतात? आपले भले करणारे एक तरुण नेतृत्व, नवीन पर्याय पुढे आला आहे म्हणून?
यातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हो दिले, तरी 'मराठी माणूस' हा मुद्दाच नाही, राज ठाकरेंनी केवळ एक बागुलबुवा उभा केला आहे, असे म्हणता येणार नाही. ज्याचा उपयोग करायचा असतो, ज्याला ख-या-खोट्या कारणांची झूल पांघरायची असते, असे काहीतरी खाली असावे लागते. हिटलरच्या फॅसिझमलाही दोस्त राष्ट्रांनी जर्मनीचे लचके तोडून अवमानित केलेली जर्मन मने हा मोठा आधार होता. यादृष्टीने पाहता 'मराठी माणूस' ही कल्पना नाही. तो जरुर एक 'मुद्दा' आहे. आजवर इतरांनी त्याची नीट दखल घेतली नाही, सोडवणूक केली नाही; तर काहींनी वापर केला आणि टाकून दिला. आता राज ठाकरेंनी तो त्यांच्या राडा पद्धतीने (मराठी लोकांच्या दृष्टिकोनातून दमदारपणे) उचलला. लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. याचा अर्थ, राज ठाकरे ह्या मुद्द्याचा मूळातून निरास करणार आहेत, असे नाही. शिवसेनेला अपशकुन करणे, तिची ताकद कमी करणे हे ऐतिहासिक कर्तव्य पार पडल्यानंतर कदाचित राज ठाकरे हा मुद्दा शिवसेनेप्रमाणे वाऱयावरही सोडतील. पण म्हणून तो मुद्दा संपत नाही. तो नाही सोडवला, तर आणखी किचकट होईल. पुढे आणखी कोणी 'राज'त्याचा वापर करेल. कदाचित अराजकही होईल.
काय आहे हा मुद्दा?
'मराठी माणूस' ही एक अस्वस्थता आहे. असुरक्षिततेची भावना आहे. ती भौतिक आणि मानसिक अशी दोन्ही प्रकारची आहे. भौतिक याचा अर्थ, आमच्या रोजगारावर, नोकऱयांवर परप्रांतीयांनी आक्रमण केले आहे; मुंबई महाराष्ट्राची असताना इथल्या रोजगारांवर आमचा प्राधान्याने अधिकार का असू नये, हा प्रश्न. तसेच मुंबईत रोजच्या रोज येणा-या लोंढ्यांमुळे झालेली गर्दी, वाढलेला भणंगपणा, मुख्य शहर सोडून उपनगर आणि त्याच्याही पलीकडे जावे लागणे इत्यादी. मानसिक याचा अर्थ, आमच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या मराठी भाषेबद्दल परप्रांतीयांकडून दाखवला जाणारा दुस्वास (उदा.जया बच्चन यांचे अलिकडचे विधान, मराठी पाट्या लावण्याबद्दलचे आढेवेढे वगैरे).
हे प्रश्न आहेतच; त्याची कारणे काही का असेनात. जिथे औद्योगिकीकरण झाले आहे, तिथे रोजगाराच्या शक्यता वाढलेल्या असतात. साहजिकच ज्या भागात हा रोजगार किंवा हवा तसा रोजगार उपलब्ध होत नाही, त्या भागातून रोजगाराच्या शक्यता अधिक असलेल्या भागाकडे लोकांचे स्थलांतर होत असते. मुंबई तर देशाची औद्योगिक राजधानी. तिचे नेहमी सांगितले जाणारे एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबईत कोणी उपाशी राहत नाही. पोट भरण्याइतका रोजगार इथे नक्की मिळतो, हा त्याचा अर्थ. देशात प्रादेशिक समतोल साधणारा विकास होईल तेव्हाच मुंबईसारख्या शहरांकडे येणारे लोंढे थांबणार, हे बरोबर असले तरी असा समतोल विकास होईपर्यंत हे लोंढे असेच येऊ द्यायचे का? मुंबई जेवढी व्हायची तेवढी लांब झाली. समुद्रात भर टाकून तिला रुंद करण्याचीही चरमसीमा पार पडली. आणखी उभी आडवी ताणली तर ती फुटेल. म्हणजेच अराजक माजेल. येणारे लोंढे गरिबांचे असतात, तसेच वरच्या स्तराचेही असतात. वरचा स्तर पैसे असल्याने सांडपाण्याच्या निचऱयाची व्यवस्था असलेल्या इमारतीत राहतो. तो 'सिव्हिल सोसायटी'चा भाग बनतो. हे भाग्य गरिबांच्या वाट्याला येत नाही. गरीब खाडीत, डोंगरावर, रेल्वेच्या शेजारी, डंपिंग ग्राऊंडवर, फुटपाथवर नाहीतर पुलाखाली राहतो. हा परप्रांतीय गरीब मराठी मजुरापेक्षा स्वस्तात मिळतो, शिवाय कसाही दामटून घेता येतो म्हणून इथल्या (अमराठी व मराठी दोन्ही) मालकांना तो हवा असतो. हे दामटणे कितीही कष्टप्रद असले, तरी त्याच्या बिहारमधल्या दारिद्र्य आणि वंचनेच्या चटक्यांच्या तुलनेत ते त्याला सुसह्यच वाटते. त्यामुळे त्याची इथे टिकून राहण्याच्या चिकटपणाची जिद्दही कमालीची असते. वास्तविक यातली कित्येक कामे तर मराठी माणूस कितीही गरीब असला तरी त्याला नको असतात. डोक्यावर पाटी घेऊन भेळ विकणे, उद्यानात मुलांना घोड्यावर बसवून घोड्याबरोबर धावणे, पाटीवाले हमाल ही दमछाक करणारी कामे मराठी माणूस करत नाही. घरोघर फिरुन मासे विकण्याचे कामही आता कोळणींनी सोडले आहे. त्यात मुख्यत बंगाली अथवा बांग्लादेशी मुसलमान असतात. इस्त्रीवाले, सकाळी पाव-बटर विकणारे (अगदी कोकणातल्या दुर्गम खेड्यातही) भय्ये असतात. म्हणजे ही कामे अमराठी लोक करत असल्यामुळे मराठी माणसांचा रोजगार बुडाला असे होत नाही. सरकारी व संघटित नोक-यांमध्ये हा प्रश्न असू शकतो. राज्य सरकारी नोकऱयांत तर मराठीच मुख्यत आहेत. केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील उपक्रमांमध्ये हा प्रश्न जरुर आहे. निवडक रोजगाराची अपेक्षा ठेवणा-या मराठी माणसाचा रोजगार मोठ्या प्रमाणात अमराठी लोक हिरावून घेतात, ही खरी तीव्रता नाहीच. मला योग्य रोजगार मिळत नाही, माझ्या विकासाच्या वाटा अडखळतात याचे वैषम्य अधिक गडद होते ते अन्य काही गोष्टींमुळे.
मध्य आणि दक्षिण मुंबईतील मराठी टक्का कमी वेगाने कमी होतो आहे, याची सल मोठी आहे. या भागातल्या चाळी पाडून खाजगी विकासक तेथे टॉवर उभे करत आहेत. मूळ घरमालकाला किंवा भाडोत्र्याला दामदुप्पट रक्कम मिळते. शिवाय/ किंवा अधिक मोठे, आधुनिक सोयींचे-रचनेचे घर मिळते. हे घर विकले तर येणाऱया पैश्यात उपनगरात किंवा नवी मुंबईत अथवा अंबरनाथमध्ये तेवढेच घर घेऊन बऱयापैकी रक्कम हाती राहते. त्यात मुलामुलींचे शिक्षण, व्यवसाय यांसाठीची बेगमी करता येते. साहजिकच दक्षिण व मध्य मुंबईतील घरे विकून बाहेर जाणाऱया मराठी माणसांचे प्रमाण मोठे आहे. त्यांची ही घरे विकत घेणारे लोक हे मुख्यत अमराठी आहेत. ते आपल्या कार्यालयासाठी, व्यवसायासाठी अथवा राहण्यासाठी ही घरे घेतात. विकासाच्या या पद्धतीत मराठी माणूस स्वतहून मुख्य मुंबईतून बाहेर पडतो आहे. यात आर्थिक प्रगती आहे. पण आपला ’गाव“ सोडल्याची खंत आहे. पण मुख्य म्हणजे अशा 'गावां'चा मालक अमराठी झाला आहे, याची चीड अधिक आहे.
मूळ मुंबई कोळी, पाचकळशींची. पण मुंबई आकाराला, नावारुपाला आली त्यात पारशी, गुजराती इ. अमराठींचा प्रचंड सहभाग आहे. हे सगळे त्या अर्थाने मुंबईकर. जवळपास हे सर्व अमराठी लोक आपल्या भाषेबरोबरच मराठी बोलत असत. या मराठी-अमराठींच्या संयोगाने मुंबईचे एक सांस्कृतिक जीवन तयार झाले होते. 30-35 वर्षांपूर्वी आलेले उत्तरभारतीयही इथे मिसळून गेले होते. ते उत्तम मराठी बोलतात, हे सहज दिसते. शिवसेनेच्या बाल्यावस्थेतील 'हटाव लूंगी'चा फेरा सोडल्यास नंतरच्या काळात या 'मुंबईकर अमराठीं'बद्दल काही किरकोळ कुरबुरी असल्या तरी तसा मोठा प्रश्न उभा राहिला नव्हता. त्यांनी मराठी माणसाच्या 'अस्मितेच्या अवकाशा'वर आतासारखे आक्रमण केले नव्हते. तसेच त्याचा दुस्वास अथवा त्याविषयी बेफिकीरी दाखविली नव्हती.
नव्याने आलेल्या अमराठींकडून नेमके हे होते आहे. आणि काही जुने अमराठी त्याला साथ देत आहेत. मुंबईत आता येणाऱया गरीब अथवा वरच्या स्तरातल्या लोंढ्यांना मुंबई हे कमावण्याचे किंवा जगण्याचे केवळ 'साधन' वाटते. मुंबईत राहूनही तो मुंबईचा नसतो. मुंबईची स्वच्छता, मुंबईची कायदा व सुव्यवस्था, मुंबईचे सौंदर्य, इथले सांस्कृतिक संचित याची त्याला पर्वा नसते. तो मराठी बोलायचा प्रयत्न सोडाच; पण मला मराठी बोलता येत नाही, याची खंत तोंडदेखलीही तो व्यक्त करत नाही. मराठी बोलण्याची जरुरच काय, अशी एक आढ्यता त्याच्यात असते. जया बच्चन तशा मुंबईत जुन्या. महाराष्ट्रात नागपूरला त्यांचे शालेय शिक्षण झाले. अमिताभ बच्चन सांगतात त्याप्रमाणे त्यांना मराठी येते. त्या आपल्या नोकराचाकरांशी किंवा इतर संबंधित मराठी लोकांशी मराठीत बोलतात. पण त्यांनी नव्या अमराठी आढ्यतेची दीक्षा घेतल्याने टी.व्ही. वर जाणूनबुजून ’मी उत्तर भारतीय आहे. मी हिंदीत बोलणार आहे. मराठी लोकांनी मला क्षमा करावी“, अशा अर्थाचे बोलल्या. त्यांच्या या बोलण्यात मराठी लोकांची क्षमा मागण्याचा भाव नव्हता तर उपमर्द होता. जया बच्चनविषयीची सामान्य मराठी माणसाची तक्रार त्या मराठीत बोलल्या नाहीत, ही नाही. तक्रार आहे ती त्यांनी केलेल्या उपमर्दाबाबतची. तोच प्रकार पोलीस सहआयुक्त के. एल. प्रसाद यांच्याविषयीची. त्यांनी ’मुंबई किसीके बापकी नहीं“ हे ज्या आविर्भावात उद्गार काढले, त्यात सामान्य मराठी माणसाला ’मुंबई आमच्या (प्रसादांसारख्या उच्चभ्रू अमराठींच्या) बापाची“ असेच ऐकू आले. राज ठाकरेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया म्हणून इंग्रजी वृत्तपत्रांत जी अमराठी लोकांची पत्रे येतात, त्यांत हा दर्प अगदी उघड असतो. ''आता आम्हाला मराठी शिकवायला राज ठाकरेंनी बेकार मराठी तरुणांना पाठवून द्यावे'' अशा वळणाची ही दर्पपत्रे असतात. एकेकाळची 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' ही प्रासंगिक प्रतिक्रिया आताचा स्थायीभाव होऊ पाहते आहे. उद्योग, व्यापार, सिनेमा, प्रसारमाध्यमे सेवा या क्षेत्रातल्या अनेक अमराठी उच्चभ्रूंना मुंबईला महाराष्ट्राचा आणि पर्यायाने मराठी माणसाचा काही विशेष संदर्भ आहे, हे मनातून पटतच नाही. त्यातले काही उघडपणे बोलतात. काही बोलत नाहीत. पण त्यांच्या देहबोलीतून ते व्यक्त होत असते. आणि 'मराठी माणसा'ला ते प्रत्यही जाणवत असते, अस्वस्थ करत असते.
बंगाली, तामीळ इ. प्रमाणे मराठी माणूस स्वत: मराठी भाषेविषयी भाषा म्हणून दक्ष आहे, असे अजिबात नाही. बदलत्या परिस्थितीची अपरिहार्यता (?) म्हणून मराठी ऐवजी इंग्रजी माध्यमात तो आपल्या मुलांना घालतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा तमाम 'मराठी माणूस' वाल्यांची मुले इंग्रजी माध्यमातच शिकतात. शालेय शिक्षणाचे माध्यम परिसर भाषा या अर्थाने आजही मराठीच असले पाहिजे, माध्यमिक स्तरावर सेमी इंग्लिश किंवा इंग्रजीचे विशेष वर्ग घेऊन मुलांचे इंग्रजी उत्तम करण्याचा पर्याय आहे, असे कितीही शास्त्रशुद्धरित्या पटवले तरी ते त्यांना पटत नाही, हे ही खरे. पण तेवढेच नाही. इंग्रजी माध्यमात शिक्षण देत असताना मराठी जोपासण्याची दक्षता तर सोडाच, पण चारचौघात आणि घरातही आपल्या मुलाने इंग्रजी वळणाचे काहीतरी बोलावे, असाच त्यांचा प्रयत्न असतो. ते 'अॅपल' खा, असे जाणीवपूर्वक आई किंवा बाबा (सॉरी, मम्मी ऑर पप्पा) बोलतात. 'अॅपल' मधली माधुरी ’सफरचंद“ म्हटले की जणू निघून जाते! विकासाच्या वावटळीत आपली पुढची पिढी इंग्रजीशिवाय टिकणार नाही, या भयाने संतुलन गमावून बसलेला मराठी माणूस आपली मूळे जपण्याऐवजी ती स्वतच्या हातानेच उपटू लागला आहे. त्यातून न्यूनगंड आणि असुरक्षितता कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. आणि मग, आपल्या मुलाला वाचता आल्या नाहीत, तरी चालतील; पण अमराठींच्या दुकानाच्या पाट्या 'मराठी'त असल्या पाहिजेत, या आंदोलनाला तो जोरात साथ करतो. खरे म्हणजे या पाट्या 'सलून'ऐवजी 'केशकर्तनालय किंवा केस कापण्याचे दुकान' अशा मराठी भाषेत त्याला नको आहेत, फक्त मराठी ज्या लिपीत लिहिली जाते, त्या देवनागरी लिपीत हव्या आहेत. म्हणजे भाषा इंग्रजीच. फक्त लिपी बदलायची - रोमन ऐवजी देवनागरी. एवढे केले की झाला 'मराठी माणूस' अस्मितेचा विजय!
पण एवढे करायलाही या दुकानदारांचा विरोध झाला. महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे अशा पाट्या त्यांनी आधीच लावायला हव्या होत्या. त्यासाठी राज ठाकरेंना दांडगाई करावी लागली. आणि मग हे गेले न्यायालयात; लोकशाही मार्गाचे संरक्षण करण्यासाठी. पाट्या या फक्त देवनागरीत लावायच्या आहेत, असे नाही. इतर लिप्यांबरोबरच देवनागरी हवी, तीही इतर लिप्यांच्या तुलनेत आकाराने लहान नको, एवढीच मराठीत पाट्यांच्या आंदोलनाची मागणी आहे. पण हे करणेही जड का जावे? याचे कारण ’मुंबई कोणाची“ याबाबत या व्यापारी अमराठींच्या मनात पक्षपाती संदेह असणे, हे आहे. शुद्ध मराठीत 'मुंबई मराठी माणसाच्या बापाची नाही, ती आता आमच्या बापाची झाली आहे' या अहंगंडातून न्यायालयाला लोकशाहीच्या संरक्षणाचे साकडे घातले जाते. आणि न्यायाधीशही मग बहुधा याच गंडातून अतिरेक्यांशी राज ठाकरेंच्या गुंडगिरीची तुलना करतात. न्यायालयीन प्रक्रियेत तर्काच्या लढाईने ’न्याय“ होईलही. पण लोकांची मने या 'न्याया'ने निवणार नाहीत. उलट अधिकच प्रक्षोभित होतील.
समूहाच्या काळजात, मनात रुतलेला हा अस्मितेचा, अवमानाचा काटा न्यायालयाच्या 'न्याया'ने निघणार नाही. ते काम समाजातील विवेकी, जाणत्या कार्यकर्त्यांचे, चळवळींचे, विचारवंतांचे आहे. दुर्दैवाने आज ते एकतर निष्क्रिय आहेत आणि क्रियाशील असलेच तर 'लोकशाही संरक्षणा' च्या तार्किक लढाईत गुंतले आहेत किंवा संभ्रमात आहेत.
देश हा एक घटक असल्याने त्यातील संचार, वास्तव्याचे मुक्त स्वातंत्र्य कोणाही भारतीयाला आहे, मग फक्त मुंबईत प्रतिबंध किंवा नियंत्रणे कशी लागू करायची, हे ही त्यांच्या संभ्रमाचे कारण आहे. हा प्रश्न केवळ 'मराठी माणसांचा' नाही; तो 'स्थानिक किंवा भूमिपुत्रांचा' आहे, अशारीतीने समजून घेतल्यास आपल्या 'विवेका'वरचे ओझे थोडे हलके होईल. कारण भूमिपुत्र बंगालमध्ये असू शकतो, आसाममध्ये असू शकतो, देशाच्या कोणत्याही राज्यात असू शकतो. त्याअर्थाने हा प्रश्न राष्ट्रीय आहे. शिवाय हा भूमिपुत्रांचा प्रश्न आताच जन्माला आलेला नाही. तो जुन्या काळापासून आहे. 30 ऑगस्टच्या लोकसत्तेत डॉ. शैलेश देवळाणकर यांनी याविषयी लिहिलेल्या लेखात स्वातंत्र्यपूर्वकाळातील तसेच घटना समितीतील चर्चा व कायदेशीर बाबी हे संदर्भ दिले आहेत. ते त्यांच्याच शब्दांत समजून घेणे, अधिक उपयुक्त ठरेल. त्यांच्या लेखातील ही काही अवतरणे:
'भूमिपुत्रांच्या अधिकारांच्या संरक्षणाची मागणी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून होत आली आहे. 'बंगाल प्रांत बंगाल्यांसाठी', 'मद्रास प्रांत मद्राश्यांसाठी' या घोषणा स्वातंत्र्यपूर्वकाळातही प्रसिद्ध होत्या. भूमिपुत्रांच्या, स्थानिक नोक-यांमध्ये प्राधान्यक्रम दिला जाण्याच्या मागणीला दुर्लक्षित करणे शहाणपणाचे ठरणार नाही, असा सूर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणा-या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी लावला होता. राजेंद्र प्रसादांसारख्या आघाडीच्या नेत्याने अनेकदा हा प्रश्न उचलून धरला. विशेष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भूमिपुत्रांच्या विशेषाधिकारांच्या मागणीला ’नैसर्गिक मागणी“ म्हणून दुजोरा दिला होता. भूमिपुत्रांच्या अधिकारांच्या प्रश्नासंदर्भात राजेंद्र प्रसादांच्या नेतृत्वाखाली एक विशेष अहवालही तयार करण्यात आला होता.'
'स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या घटनासमितीमध्ये भूमिपुत्रांच्या अधिकारांच्या प्रश्नावर गंभीर चर्चा झाली ती प्रामुख्याने तीन दृष्टिकोनांतून- अ) समान नागरिकत्वाचा दृष्टिकोन ब) स्वयंशासनाचा दृष्टिकोन आणि क) प्रांतांमधल्या असमान सत्ता विभागणीच्या दृष्टिकोनातून. भूमिपुत्रांच्या अधिकारांचे तत्त्व हे समान नागरिकत्वाच्या तत्त्वाविरोधी जात असल्यामुळे या अधिकारासंबंधी कोणतीही तरतूद घटनेत केली जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका संयुक्त प्रांताच्या जसपत रॉय कपूर यांनी घेतली. समान नागरिकत्वाच्या तत्त्वामध्ये भारतामध्ये कोठेही नोकरी करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला असल्यामुळे जन्मठिकाण किंवा निवासाच्या आधारावर कोणत्याही भाषिक अथवा वांशिक समूहाला प्राधान्यक्रम दिला जाऊ नये, असे कपूर यांचे मत होते. कपूर यांनी घेतलेली भूमिका ही घटना सामितीतील बहुसंख्य सदस्यांच्या मतांचे प्रतिनिधीत्व करणारी असली तरीदेखील भविष्यात भूमिपुत्रांच्या अधिकारांचा प्रश्न गंभीर रुप धारण करु शकतो आणि त्यामुळे याविषयी कायदा करण्याचा विशेषाधिकार संसदेला असावा, ही मागणी काही सदस्यांकडून पुढे आली. आंबेडकरांनी घटना समितीतील आपल्या एका भाषणात स्थलांतर करणाऱया पक्ष्यांप्रमाणे एका प्रदेशातून दुसऱया प्रदेशात जाणाऱया, तेथील आर्थिक आणि शैक्षणिक संधींचा फायदा घेणाऱया निर्वासितांच्या लोंढ्यांसंबंधी गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशा ’रुटलेस“ निर्वासितांकडून स्थानिक लोकांना होणाऱया त्रासाविषयी विचार करणे महत्वाचे असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते.'
'केवळ समान नागरिकत्वाची आणि समतेची तरतूद करुन (घटनाकर्ते) थांबले नाहीत, तर त्यांनी भूमिपुत्रांच्या अधिकारासंबंधी एक अतिशय महत्वाची तरतूद राज्यघटनेत केली आणि ही तरतूद म्हणजे घटनेतील कलम 16(3). या कलमानुसार असे स्पष्ट करण्यात आले की, घटनेतील कोणतीही तरतूद संसदेला विशिष्ट राज्यामध्ये, विशिष्ट समूहाला नोकऱयांमध्ये प्राधान्यक्रम मिळावा यासाठी ’निवासाची अट“ ठेवणारा कायदा करण्यापासून परावृत्त करु शकणार नाही. ही विशेष तरतूद घटनेतील कलमांमधील विरोधाभास उघड करणारी असली तरी त्यातून भूमिपुत्रांच्या अधिकारांविषयी घटनाकर्त्यांची संवेदनशीलता स्पष्ट होते.'
'स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारने बहुसंख्याक मराठी भाषिक समूहाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष हस्तक्षेप करुन त्यांना नोकऱयांमध्ये किंवा शैक्षणिक संधींमध्ये प्राधान्यक्रम देण्याविषयी धोरणे आखलेली नाहीत. ओरिसा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदि राज्यांमधून स्थानिक भाषिक समूहांच्या नोकरी आणि शैक्षणिक संधींविषयी अधिकारांचे रक्षण करण्यासाठी राज्य शासनांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करुन अनेक निर्णय घेतलेले आहेत. यापैकी काही निर्णयांना उच्च न्यायालयाचा पाठिंबादेखील मिळाला आहे. या विषयावर कायदा करणे महाराष्ट्र शासनाला शक्य नाही. कारण भारतीय घटना तशी परवानगी देत नाही. घटनेतील कलम 16(3) प्रमाणे अशा स्वरुपाचा कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच आहे. पण राज्य शासनाला निश्चितच कार्यकारी आदेशाद्वारे अशा प्रकरणांमधून हस्तक्षेप करता येऊ शकतो....पण याविषयी कोणतीही स्पष्ट भूमिका शासनाने स्वीकारलेली नाही. आज भूमिपुत्रांच्या अधिकारांचा जो प्रश्न नव्याने उफाळून आला आहे, त्यामागे राज्य शासनाची अस्पष्ट भूमिका हे महत्वाचे कारण आहे.'
या प्रश्नाचा ऐतिहासिक व कायदेशीर पट लक्षात यावा, म्हणून वरील अवतरणे मुद्दाम विस्ताराने दिली. ती स्वयंस्पष्ट असल्याने त्यांवर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. लेखकाने उल्लेख केलेल्या कलम 16(3) प्रमाणे केंद्राने अजून कायदा का केला नाही, हे तज्ञांकडून समजून घ्यावे लागेल. तथापि, कार्यकारी आदेश काढणे इतर राज्यांना जमते तर महाराष्ट्र राज्याला का नाही,याचा जाब त्यांना विचारावाच लागेल. हा जाब विचारणे म्हणजे आपण संकुचित विचार करतो, असे मुळीच नाही. देशाची व्यापक एकता टिकविण्यासाठी भूमिपुत्रांच्या अधिकारांची दक्षता खुद्द घटनेने व देश स्वतंत्र करणाऱया मंडळींनीच घेतली आहे, हे आपल्याला वरील अवतरणांतून लक्षात आलेच आहे.
मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून संरक्षणासाठी-अधिकारासाठी कायदेशीर अथवा प्रशासनिक उपाययोजनांचा आग्रह धरत असतानाच मराठी माणसाला 'मराठी माणूस' म्हणून सक्षम करावा लागेल. धंदा-व्यवसायाची कौशल्ये आत्मसात करणे, धडाडी दाखवणे त्याला शिकवावे लागेल. मराठी माणूस 'मराठी' आहे अणि त्याचवेळी तो 'भारतीय' आहे, याचे त्याचे भान सुटू नये, याची जाणीव सतत द्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय दळणवळणाची भाषा म्हणून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविणे आणि त्याचवेळी मराठी भाषा जपणे, समृद्ध करणे हे परस्परविरोधी नाही, हे त्याला पटवावे लागेल. एखाद्या समूहाची मातृभाषा हे केवळ त्याच्या संदेशवहनाचे माध्यम नसते. ती त्याच्या संस्कृतीची, इतिहासाची, मूल्यांची आणि जाणिवांची वाहक असते. ज्याक्षणी या भाषेपासून तो तुटतो, त्याक्षणी तो त्याची संस्कृती, मूल्ये आणि जाणिवांपासूनही तुटायला लागतो. त्याचा अधांतरी लटकणारा त्रिशंकू होतो. तो तडफडू लागतो. त्याला ऊर्जा देणारे झरे आटू लागतात. आणि नंतर तो शुष्क होतो. आपल्या मुळांच्या शोधात वैराण भटकू लागतो. अशावेळी तो हितसंबंधीयांच्या जाळ्यात सहज सापडतो. जणू तेच त्याला हवे होते, अशी फसगत करुन घेतो. देशी अथवा परदेशी असलेल्या उत्तम इंग्रजीत व्यवहार करणाऱया पण मराठीशी संबंध तुटलेल्या मंडळींच्या मानसिकतेत जरा डोकावले तर ही तडफड किंवा शुष्कता लगेच ध्यानात येते. वरच्या जात-वर्गाने दिग्दर्शित केलेल्या या वाटेने बहुजन व दलित मराठी माणसाचाही प्रवास वेगाने सुरु झाला आहे. तो कसा नियंत्रित करायचा याचाही युद्धपातळीवर विचार करावा लागेल.
....तर मुद्दा हा की, राज ठाकरेंनी घेतलेल्या 'मराठी माणूस' या मुद्द्यात इतके सारे आणि यासारखे आणखीही अनेक 'मुद्दे' आहेत। असू शकतात. तूर्त, आपल्या भोवतालच्या (मराठी आणि अमराठीही)सहका-यांशी एवढ्या मुद्द्यांची तरी चर्चा सुरु करुया.
- सुरेश सावंत
Wednesday, August 13, 2008
रेशनचा प्रश्न 'राजकीय मुद्दा' का होत नाही?
"प्रश्नच माहीत नाही, तर परिषदेत भूमिका काय मांडणार? अहो, ही आमच्याच पक्षाची स्थिती नाही, तर जे गरिबांचे पक्ष म्हणवतात, त्यांच्याही अजेंड्यावर हा रेशनचा प्रश्न आहे कुठे?"...राज्यात सध्या चौखूर मुसंडी मारणाऱया एका पक्षाच्या सरचिटणीसांची ही प्रांजळ कबुली. रेशनव्यवस्था बळकट करणे या मध्यवर्ती मुद्यावर आयोजित व्हावयाच्या महागाई विरोधी परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया कमी अधिक प्रमाणात इतर पक्षांकडूनही तशीच आली.
राजकीय पक्षांना रेशनचा प्रश्न दखलपात्र वाटत नाही, असे का? रेशनचा प्रश्न सार्वत्रिक राहिलेला नाही, असे समजायचे का? की राजकीयदृष्ट्या तो तेवढा संवेदनशील नाही? की मतांचे पारडे जड करण्याइतकी ताकद त्यात नसल्याने त्याकडे लक्ष देण्याची निकड भासत नाही?
oवरील तिन्ही पर्यायांत तथ्यांश आहे. एकेकाळी मृणालताई-अहिल्याताईंच्या लाटणे मोर्च्यांनी रेशनच्या याच प्रश्नावर मंत्र्यांना सळो की पळो करुन सोडले होते. राजकीय पक्षांना भूमिका घ्यावी लागत होती. तो प्रश्न अव्वल राजकीय बनला होता. सार्वत्रिक चर्चेचा तो विषय होता. मृणाल गोरे व अहिल्या रांगणेकर या रणरागिणी होत्या. त्यांची संघटनशक्ती मजबूत होती. पण केवळ व्यक्तिगत करिश्मा व संघटन कौशल्यामुळे तो प्रश्न राजकीय झालेला नव्हता. परिस्थितीचा एक मोठा व मूलभूत संदर्भ त्याला होता. गरिबांबरोबरच ज्याला मध्यमवर्ग वा कनिष्ठ मध्यमवर्ग म्हणता येईल, अशा व्यापक समाजविभागांचे रेशन न मिळाल्याने व महागाई वाढल्याने जीवन अडत होते, असा तो काळ होता.
पुढे विकासाच्या क्रमात हा समाजविभाग वर सरकला। अनेक सरकारी, संघटित कर्मचाऱयांचे वेतनमान वाढल्याने तसेच महागाई भत्त्याचे संरक्षण मिळाल्याने महागाईची तीव्रता पहिल्यासारखी जाणवेनाशी झाली. हरितक्रांतीने खुल्या बाजारात अन्नधान्य उपलब्ध केले. टंचाईचा, केवळ रेशनवरच जीवनावश्यक वस्तू मिळण्याचा काळ संपला. गॅसचे कनेक्शन मिळण्याची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपून गॅस कनेक्शन्स सहज मिळू लागली. त्यामुळे रेशनच्या रॉकेलवरचे अवलंबित्व वेगाने कमी होऊ लागले. वाढलेली क्रयशक्ती व बाजारातील निवडीचे स्वातंत्र्य यामुळे रेशनच्या निकृष्ट, वेळेवर न मिळणाऱया, मापात कमी असणाऱया वस्तूंसाठी रेशनच्या दुकानावर जाऊन 'मगजमारी' करण्याची या ऊर्ध्वगामी समाजविभागाची नड संपली. साहजिकच या शिक्षित, बोलक्या वर्गाचे रेशनच्या समस्यांबद्दल वेगवेगळ्या मंचांवर आवाज उठवणेही बंद झाले. त्यांच्या विचारविश्वातून रेशन हा विषय परागंदा झाला. वरच्या फळीत असलेले अनेक राजकीय-सामाजिक कार्यकर्ते याच वर्गातून आले आहेत.
समाजाचे हे एक वास्तव आहे. दुसरे वास्तव तेवढेच ठळक आहे. रेशनदुकानावरची 'मगजमारी' टाळण्याचे भाग्य नसलेला खूप मोठा वर्ग आज समाजात आहे. त्याला रेशनची गरज आहे. महागाई भत्त्याचे संरक्षण नसलेला, हातावर पोट असलेला असंघटित क्षेत्रातला मजूर वर्ग, अस्थिर जीवन जगणारे समुदाय शहरात तसेच ग्रामीण भागात फार मोठ्या संख्येने आहेत. त्यांचे जीवन हुळहुळे आहे. अर्थव्यवस्थेतील उण्या बदलांचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. पण सरकारच्या लक्ष्याधारित रेशनव्यवस्थेतील चुकीच्या निकषांनी या विभागातील मोठा समूह सवलतीच्या रेशन योजनांच्या बाहेरच ठेवला गेला आहे.
महागाईचे व अन्नअरिष्टाचे जागतिक वादळ आपल्या देशातही थडकले आहे. महाराष्ट्रात पावसाच्या अवकृपेने ते अधिकच तीव्र होऊ शकते. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली आला आहे. वाढत्या महागाईचा व दुष्काळाचा तडाखा समाजातील गोरगरीब जनतेला अधिक बसतो. या गोरगरीब जनतेच्या अन्नसुरक्षेचे एक साधन म्हणून तसेच महागाई नियंत्रणाचा एक उपाय म्हणून रेशनव्यवस्था बळकट करणे हे शासनाचे परमकर्तव्य आहे. रेशनचा हा गोरगरीब, गरजवंत विभाग बोलका नाही, त्या अर्थाने शिक्षित वा सांस्कृतिक स्थान असलेला नाही. विकसनशील अर्थव्यवस्थेत अधिकाअधिक कष्ट करुन थोडेफार अधिक मिळवायचा अवकाश असल्याने व बाजारात वस्तू महाग का होईना उपलब्ध असल्याने त्याचे जगणेच अडले, अशी निकराची स्थिती अजून नाही. तो आंदोलने करतो. पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करण्याइतके त्याचे उपद्रवमूल्य आज नाही. या विभागाची मते मिळवण्यासाठीचे अन्य प्रचलित मार्ग (स्थानिक व व्यक्तिगत कामे, जात, भावनिक आवाहन इ.) उपलब्ध आहेत. अशावेळी रेशनसारखा प्रश्न निवडणुकीतील मतांच्यादृष्टीने दखलपात्र ठरत नाही.
राजकीय पक्षांनी (सत्ताधारी व विरोधक) समाजातील या दुबळ्या घटकांचे पालकत्व पत्करुन त्यांच्या आरडण्या-ओरडण्याची वाट न पाहता त्यांच्या हिताच्या गोष्टींसाठी खटपट करायची असते. समाजातील विवेकी मंडळींनी त्याची सतत जाणीव देत जागल्याची भूमिका करावयाची असते. खरे म्हणजे, प्रदीर्घ राजकीय-सामाजिक संघर्षाच्या परंपरेतून जन्माला आलेल्या संविधानाद्वारे या कर्तव्याला आपण बांधिलच आहोत. ही बाब राजकीय पक्षांतील संवेदनशील कार्यकर्त्यांच्या मनाला भिडली, तरच रेशनचा प्रश्न त्यांच्या विषयपत्रिकेवर येईल.
रेशनचा प्रश्न राजकीय पक्षांच्या विषयपत्रिकेवर यावा, त्याच्या वेगवेगळ्या आयामांकडे त्यांचे लक्ष वेधावे, या हेतूने अन्न अधिकार अभियान (अन्न अधिकाराच्या प्रश्नावर काम करणाऱया राज्यातील संस्था-संघटनांची आघाडी), टाटा सामाजिक विज्ञान संस्था व सर्वोच्च न्यायालयाच्या आयुक्तांचे राज्य सल्लागार या तिघांच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी महागाई विरोधी परिषद मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे होत आहे. या परिषदेस उपस्थित राहणारे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडल्या जावयाच्या मुद्यांपैकी काही मुद्दे असे आहेः
महाराष्ट्रातील सर्व गरजू, कष्टकरी समूहांना रेशनच्या कक्षेत आणावे. त्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱया शिधावस्तूंचे नियतन अपुरे असल्यास, ते वाढवून घेण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे जोरदार प्रयत्न करावेत. त्या दरम्यान व आवश्यक तर त्यानंतरही स्वतच्या तिजोरीतून राज्याने पुरेशी आर्थिक तरतूद करावी. आपल्या जवळपासची राज्ये (छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू इ.) स्वतचे भरभक्कम अनुदान घालून आपल्या राज्यातली रेशनव्यवस्था बळकट करत आहेत.
अधिक सवलतीच्या दरातील धान्यास पात्र असलेली दारिद्य्ररेषेखालच्यांसाठीची पिवळी कार्डे मिळण्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 15000 रुपयांच्या आत हवी, हा 1997 साली ठरवलेला निकष आजही तसाच असावा, ही बाब अन्यायकारक व गरिबांची चेष्टा करणारी आहे. हा निकष बदलून तो वार्षिक 1 लाख रुपये करण्यात यावा.
अंत्योदय, अन्नपूर्णा व बीपीएल या तिन्ही योजनांसाठी पात्र असलेल्या सर्वांना या योजनांचा लाभ मिळावा. लाभार्थींची पूर्वअनुमानित संख्यामर्यादा (सरकारी भाषेत इष्टांक) असू नये.
रेशनकार्डाचा रेशनबाह्य उपयोग थांबविण्यासाठी कुटुंब ओळखपत्रासारखा पर्याय सरकारने अमलात आणावा. रेशनची गरज नसतानाही केवळ वास्तव्याचे व कुटुंबाचे ओळखपत्र म्हणून रेशनकार्ड वापरले जाण्याचे प्रमाण त्यामुळे कमी होईल व केवळ रेशनसाठीच रेशनकार्ड काढणाऱयाला ते सहज उपलब्ध होऊ शकेल.
दरम्यान, रेशनचा एकही गरजवंत वंचित राहू नये, यासाठी वास्तव्याची कागदपत्रे सादर करु शकत नसलेल्यांना ’रेशन लाभ अधिकार पत्रिका“ देण्याचे आदेश सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्याचे रेशनचे केंद्रीय मंत्री श्री. शरद पवार यांनी लोकसभेत 2004 साली जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. ती तातडीने व्हायला हवी.
गहू, तांदूळ, रॉकेल याचबरोबर साखर, डाळी व खाद्यतेल इ। महागाईचा परिणाम होणाऱया जीवनावश्यक वस्तू रेशनवर स्वस्त दरात, पुरेशा प्रमाणात व नियमितपणे मिळायला हव्या.केशरी (एपीएल) रेशनकार्डधारकांना सरकारच्या अधिकृत माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे 7 रु. किलो दराने 20 किलो गहू व 9.50 रु. दराने 15 किलो तांदूळ असे 35 किलो धान्य दरमहा रेशन दुकानावर मिळावयास हवे. सध्या हे धान्य एकतर लोकांना अजिबात मिळत नाही अथवा अगदी नगण्य मिळते. सरकारने महागाईच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लाभ हा याच्या अतिरिक्त असावा.
- सुरेश सावंत
Monday, June 23, 2008
रेशनव्यवस्थेतील लाभार्थ्यांच्या निवडीसंबंधीचे प्रश्न व उपाय
प्रश्न
1. केंद्र सरकारने कोटा ठरवून दिलेला असल्याने सर्व पात्र लाभार्थींचा समावेश होत नाही.
2. पात्र असूनही प्रचलित बीपीएल लिस्टमध्ये नाव नसल्याने लाभ मिळत नाही.
3. मुंबईसारख्या शहरांमध्ये ग्रामीण भागाप्रमाणे सर्व कुटुंबांची नोंद करणारी बीपीएल लिस्ट नाही. महागनगरपालिकेच्या सुवर्ण जयंती रोजगार योजनेसाठीची बीपीएल लिस्ट निवडक कुटुंबांची व वस्त्यांची असल्याने असंख्य पात्र लाभार्थींची नोंद तिथे असेलच याची खात्री नसते.
4. महाराष्ट्रात आज 3 प्रकारच्या बीपीएल लिस्ट आहेत. डीआरडीएची वार्षिक 20,000 रु., सुवर्ण जयंती रोजगार योजनेची वार्षिक 35,475 रु. व रेशनसाठी 15000 रु.. अशाप्रकारे एकाच राज्यात गरीब मोजण्याचे 3 मापदंड असण्यात काहीच तर्क नाही. शिवाय त्यामुळे गोंधळच होतो.
5. रेशनसाठीची वार्षिक 15,000 रु. उत्पन्नमर्यादा शहरासाठी व 4000 रु. ग्रामीण भागासाठी लक्ष्याधारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या सुरुवातीला म्हणजे 1997 साली महाराष्ट्रात ठरवण्यात आली. मधल्या काळात ग्रामीणची वाढवण्यात येऊन तीही 15,000 रु. वार्षिक करण्यात आली. आज 10 वर्षे उलटून गेल्यावरही ती तेवढीच राहावी, यातही काही तर्क नाही. दरम्यानच्या काळात वाढलेल्या महागाई निर्देशांकाप्रमाणे संघटित कामगारांचे पगार कितीतरी पटीने वाढले. मात्र या पगारवाढीचा न्याय रेशनसाठीचे गरीब ठरविण्यासाठी वापरण्यात आला नाही, ही त्या गरिबांची क्रूर चेष्टा आहे.
6. आर्थिक उत्पन्न मर्यादा गरीब ठरवताना अपुरी आहे. मुंबईत अनेक कचरा वेचक कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित उत्पन्न वार्षिक 15,000 रु. च्या वर जाते. पण त्यांचे अतिशय घाणीत काम करणे, बकाल वस्त्यांत वास्तव्य करणे, त्यामुळे होणाऱया आजारांसाठी होणारा खर्च इ. लक्षात घेता त्यांचे जीवन अत्यंत निकृष्ट असते. पण तरीही ते अधिकृतपणे बीपीएलमध्ये गणले जात नाहीत. हीच स्थिती असंघटित कामगार व अस्थिर जीवन जगणाऱया सर्व समुदायांची आहे. आज मुंबईसारख्या शहरात गरिबातला गरीबही 15,000 रु. वार्षिक उत्पन्नमर्यादेत जगूच शकत नाही. वास्तविक ज्यांना बीपीएलची रेशनकार्डे देण्यात आली आहेत, त्यातल्या एकाही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वरील मर्यादेत असण्याची अजिबात शक्यता नाही.
7. शिवाय रेशनकार्ड देताना आवश्यक ती वास्तव्याची व मूळ ठिकाणचे रेशनकार्ड रद्द केल्याची कागदपत्रे अशी दुबळी कुटुंबे सादर करु शकत नसल्याने त्यांना रेशनकार्ड मिळत नाही.
8। कागदपत्रांची अट शिथील करणारे काही जी.आर. शासनाने काढले आहेत. तथापि, केंद्रीय गृहखात्याकडून रेशनकार्ड देताना विशेष दक्षता घेण्यासंबंधी तसेच चारित्र्य व कागदपत्रांची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश येत गेल्याने या शासननिर्णयांची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. रेशनकार्ड हे रेशनसाठीच असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात रेशनकार्ड हे वास्तव्य व नागरिकत्व सिद्ध करण्याचे एक साधन झाल्याने हे होत आहे. परिणामी, आजही असंख्य गरजवंत कुटुंबे रेशनच्या कक्षेच्या बाहेरच आहेत.
यावर उपाय
1. सर्वप्रथम रेशनकार्ड हे वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरले जाणे पूर्णत बंद करणे. त्यासाठी केवळ आदेश काढून चालणार नाही. (असे अनेक आदेश महाराष्ट्र शासनाने काढले आहेत. रेशनकार्डावर छापील सूचनाही करण्यात आली आहे. तरीही व्यवहारात पासपोर्ट, न्यायालय, नोकरी, शाळा, हॉस्पिटल, पोलीस इ. अनेक ठिकाणी रेशनकार्डाचा वास्तव्याचा पुरावा म्हणून वापर होतोच.)यासाठी `कुटुंबओळखपत्रा'चा पर्याय दिला पाहिजे. मतदार ओळखपत्र हे एका व्यक्तीचे असल्याने त्याचा उपयोग होत नाही. रेशनकार्डावर कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील, वय, नाते इ. असतो. असा तपशील असणारे `कुटुंब ओळखपत्र' सर्व नागरिकांना द्यायला हवे. (हे ओळखपत्र देण्यासाठी प्रारंभी रेशन यंत्रणेचाही वापर करता येईल.) त्यानंतर ज्यांना रेशनसाठी रेशनकार्डाची गरज नसेल, अशा कुटुंबांना रेशन कार्डे परत करण्याचे (सरन्डर) करण्याचे आवाहन करावे. त्यानंतर ज्यांचा 3 महिने रेशनकार्डाचा वापर नसेल, अशांचे रेशनकार्ड रद्द करावे. आज बिगर रेशनसाठी रेशनकार्ड काढण्यासाठी येणाऱयांची गर्दी नाहीशी होईल. ते सर्व कुटुंब ओळखपत्रासाठी रांगा लावतील. आता रेशन कार्यालयात रेशनकार्ड काढण्यासाठी येणारा माणूस हा रेशनसाठीच रेशनकार्ड काढणारा असेल. त्याच्या अर्जातील व्यक्ती व राहण्याची जागा यांची प्रत्यक्ष पाहणी करुन रेशन इन्स्पेक्टर तात्पुरते अथवा कायमस्वरुपी रेशनकार्ड देण्याची शिफारस आपल्या वरिष्ठांना करु शकेल. रेशनकार्डाचे महत्वच कमी झाल्याने कागदपत्रांच्या जंजाळात या माणसांना अडकविण्याचे आता कारणच उरणार नाही. श्रीमंत, उच्च व मध्यमवर्गीय लोकांना कुटुंब ओळखपत्रातच रस असल्याने त्यांनी रेशनकार्ड काढण्याची शक्यता मंदावते. म्हणजेच कनिष्ठ मध्यवर्गीय, गरीब व अतिगरीब विभागच रेशन कार्ड काढतील. समाजातील वरचा 30 टक्क्यांहून अधिक विभाग अशारीतीने व्यवस्थात्मक (सिस्टिमिक) बदलामुळे बाहेर पडेल व गरजवंतच रेशनव्यवस्थेत राहतील. एका वेगळ्या व चांगल्या अर्थाने रेशनव्यवस्था लक्ष्याधारित होईल. आताच्या व्यवस्थेतील राँग एक्सक्लुजन व राँग इन्क्लुजन हे दोन्ही दोष टाळता येतील. बोगस कार्डाच्या व सबसिडी वाया जाण्याच्या समस्या बऱयाच प्रमाणात कमी होतील.
2. हे झाल्यावर जे रेशनव्यवस्थेत राहतील त्या सर्वांना बीपीएल मध्ये घेता येईल. केंद्र सरकारने आवश्यक तर इष्टांक वाढवून द्यायला हवा. नाहीतर राज्य सरकारने तो भार उचलावा. (तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ ही राज्ये असा भार उचलत आहेत.)
3. हे होईपर्यंत अंतरिम पाऊल म्हणून बीपीएलसाठीचा आर्थिक निकष रद्द करुन व्यवसाय व राहण्याची जागा यांच्या आधारे बीपीएल रेशनकार्ड देण्यात यावे. उदा. नाका कामगार, बांधकाम कामगार, वीटभट्टी किंवा ऊसतोडणी कामगार, मोलकरणी किंवा घरगडी, झोपडपट्टीत राहणारे इ. ना बीपीएल रेशनकार्ड द्यावे. कचरा वेचक, हातगाडी ओढणारे, सायकल रिक्शा चालवणारे, आदिम जमाती इ. ना सरसकट `अंत्योदय' योजनेत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (बीपीएलच्या यादीत त्यांचे नाव असण्याची गरज नाही.) त्याच धर्तीवर, नाल्याच्या शेजारी राहणारे, डोंगर उतारावर राहणारे, डंपिंग ग्राऊंडवर किंवा त्याच्या जवळ राहणारे, फुटपाथवर राहणारे इ. ना अंत्योदय मध्ये घेण्यात यावे.
4। वरील पद्धतीतून एक बाब उघड होते, ती म्हणजे, प्रचलित बीपीएल यादीचा व रेशनकार्डाचा संबंध तोडावा। बीपीएल यादी ही 5 वर्षांसाठी असते. (ती ओपनएंडेड नसते.) त्या यादीत चुकीच्या सर्वेक्षणामुळे न आलेले अथवा दरम्यानच्या काळात परिस्थिती ढासळलेले लोक सवलतीच्या रेशनला वंचित राहतात. वाढत्या महागाईच्या काळात अन्नअसुरक्षितता ही प्रवाही स्थिती असते. (जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी अलिकडेच सांगितले की, वाढती महागाई व जागतिक अन्नअरिष्टामुळे अजून 10 कोटी लोक गरीब होतील.)