Wednesday, September 23, 2009

रिडालोसला लाल निशाण पक्षाचे पत्र

लाल निशाण पक्ष

श्रमिक, रॉयल क्रेस्‍ट, लो. टिळक वसाहत गल्‍ली क्र.3, दादर, मुंबई- 400014. फोनः022-24102180


11 सप्‍टेंबर 2009

प्रिय मा. रामदासजी आठवले,

निमंत्रक,

रिपब्लिकन डावी लोकशाही समिती

महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. आपल्‍या पुढाकाराने रिपब्लिकन, डाव्‍या, समाजवादी विचारसरणीच्‍या तसेच अन्‍य अनेक पक्षांची रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्‍थापन झाली आहे. समितीतले आपण सगळे जण जागावाटपाच्‍या अत्‍यंत किचकट व प्रचंड घाईच्‍या कामात सध्‍या व्‍यग्र आहात. अशा व्‍यग्रतेतून वेळ काढून आपण आमचे हे पत्र वाचाल, अशी अपेक्षा आहे.

ही समिती स्‍थापन करताना ही एकजूट केवळ विधानसभा निवडणुकांपुरती राहणार नसून त्‍यानंतरही कष्‍टकरी-दलितांच्‍या प्रश्‍नावर कार्यरत राहणार असल्‍याचे आपण जाहीर केले आहे. तसेच संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनात एकत्र असलेले आम्‍ही लोक पुन्‍हा एकत्र येऊन संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनाला अपेक्षित असलेला परंतु अपुरा राहिलेला कार्यक्रम पुढे नेणार आहोत, असेही आपण व्‍यक्‍त केले आहे. आपल्‍या या भूमिकेचे आम्‍ही मनःपूर्वक स्‍वागत करतो व निवडणुकांनंतर आपल्‍या पुढाकाराखाली होणा-या यासंबंधीच्‍या आंदोलनाचा सक्रीय भाग होण्‍याची इच्‍छाही प्रदर्शित करतो.

महाराष्‍ट्र राज्‍य निर्मितीला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईसह महाराष्‍ट्रासाठी जी संयुक्‍त महाराष्‍ट्र समिती बनविण्‍यात आली होती, त्‍यात सोशालिस्‍ट पार्टी, कम्‍युनिस्‍ट पार्टी तसेच शेड्युल्ड कास्‍ट फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष हे मुख्‍य घटक होते. कॉ. डांगे व साथी एस.एम. जोशी यांच्‍या सहकार्याच्‍या रुपाने कम्‍युनिस्‍ट व सोशालिस्‍टांची एकजूट घडविण्‍यात लाल निशाण पक्षाने कॉ. दत्‍ता देशमुखांच्‍या रुपाने महत्‍वाची भूमिका बजावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्‍यासाठी समितीतर्फे दत्‍ता देशमुख, क्रांतिसिंह नाना पाटील, एस.के. लिमये हीच मंडळी गेली होती. बाबासाहेबांनी शिष्‍टमंडळाचे प्रेमाने स्‍वागत केले आणि ते म्‍हणाले, संयुक्‍त महाराष्‍ट्राला माझा संपूर्ण पाठिंबा आहेच. आणि पुढे त्‍यांनी दत्‍ता देशमुख व नाना पाटलांचा हात हातात घेऊन, आपुलकीने पण खोचकपणे विचारले, संयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य होईल तेव्‍हा तुम्‍ही मराठे (सत्‍तेवर) याल, त्‍यावेळी माझ्या दलित जनतेशी कसे वागणार?’ दत्‍ता व नाना पाटील या दोघांनी तळमळीने उत्‍तर दिले, कधीही अंतर देणार नाही.

57 च्‍या निवडणुकीत बी.सी. कांबळे व दा.म.शिर्के या दोघांना कॉ. दत्‍ता देशमुख व कॉ. संतराम पाटील यांनी साथीला घेऊन बरोबरीची मते मिळवून विजयी होण्‍यात सहाय्य केले. समितीत जागावाटपांवरुन मतभेद सुरु झाले तेव्‍हा, प्रसंगी आम्‍हाला एकही जागा देऊ नका, पण एकजूट टिकवा, ती मोडाल, तर सर्व पडाल, असा इशारा दत्‍ता देशमुखांनी दिला होता. एकमताने लाल निशाण पक्षाच्‍या वाट्याला आलेल्‍या आठही जागा त्‍यावेळी निवडून आल्‍या. त्‍यात त्‍यावेळच्‍या संयुक्‍त मतदारसंघ पद्धतीत कांबळे व शिर्के उभे असलेल्‍या अनुक्रमे नगर व कोल्‍हापूर या जागांचा समावेश होता.

मुंबईसह संयुक्‍त महाराष्‍ट्र मिळविण्‍यात मराठी जनता यशस्‍वी झाली. दिल्‍लीहून महाराष्‍ट्राचा मंगल कलश घेऊन आलेल्‍या यशवंतराव चव्‍हाणांनी केलेल्‍या आवाहनाला मान देऊन शेतकरी कामगार पक्षाचे मातब्‍बर पुढारी शहरी, ग्रामीण नवधनिकांच्‍या वर्चस्‍वाखाली गेलेल्‍या कॉंग्रेसमध्‍ये सामील झाले. वैचारिक मतभेदांचे निमित्‍त करुन समाजवादी व कम्‍युनिस्‍ट आपापल्‍या मूळ छावण्‍यांत परतले. मुंबईसह महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेनंतरच्‍या पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत 62 साली संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचा प्रचंड पराभव झाला. महाराष्‍ट्रावर शहरी व ग्रामीण धनिकांचे वर्चस्‍व प्रस्‍थापित झाले. ते आजतागायत आहे. मुंबईवरील बडे भांडवलदार, बिल्‍डर व व्‍यापारी यांचे प्रभुत्‍व दिवसेंदिवस वाढतेच आहे. कामगार-शेतकरी एकजुटीचा प्रभाव आणि दबाव महाराष्‍ट्र सरकारच्‍या धोरणावर पाडण्‍याचे संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे उद्दिष्‍ट विफल झाले आहे. अन्‍यायाने महाराष्‍ट्राबाहेर ठेवण्‍यात आलेल्‍या बेळगाव, निपाणी, बिदर हे मराठीबहुल भाग अजूनही आपण मराठी राज्‍यात समाविष्‍ट करु शकलेलो नाही.

आम्ही लाल निशाण पक्ष गेली 20 वर्षे देशाच्‍या राजकारणाचा विचार करताना, धर्मांध झोटिंगशाही राजकारणाला विरोध करण्‍यासाठी कॉंग्रेससह सर्व सर्वधर्मसमभाव मानणा-या पक्षांच्‍या एकजुटीचे प्रवक्‍तेपण सातत्‍याने करीत आहोत. केंद्रातील संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्‍या काही धोरणाबाबत आमची तीव्र टीका असतानाही व त्‍याच्‍या विरुद्ध लोकांना निःसंकोचपणे संघटित करत असतानाही, अखिल भारतीय पातळीवर कॉंग्रेससह व्‍यापक लोकशाही आघाडी करण्‍याच्‍या धोरणात बदल करण्‍याची वेळ आली आहे, असे वाटत नाही.

मात्र महाराष्‍ट्रातील कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी सरकारचा व्‍यवहार हा असंवेदनशील, ग्रामीण व शहरी सधनांचे हितरक्षण करणारा व केंद्र सरकारने घेतलेल्‍या जनस्‍वी भूमिका व योजना अंमलात आणण्‍याबाबत दुर्लक्ष करणारा, महाराष्‍ट्राचा मोठा भाग असलेल्‍या दुष्‍काळी व कोरडवाहू शेतीकडे गुन्‍हेगारी दुर्लक्ष करणारा आहे.

अशावेळी खरे पाहता, संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे पुनरुज्‍जीवन व्‍हावे, ही काळाची गरज आहे. महाराष्‍ट्राचा कामगार वर्ग आज फारच दुर्बल झाला आहे. समितीचा मुख्‍य आधार असलेला मुंबईचा गिरणी कामगार, गिरणी मालक आणि सरकार यांनी संगनमताने नेस्‍तनाबूत केला आहे. संघटित क्षेत्रातील इतर कामगार पक्षीय संघटनात्‍मक फुटीमुळे राजकीय दृष्‍ट्या प्रभावशून्‍य बनला आहे. असंघटित क्षेत्रातील संख्‍येने अफाट वाढलेला कामगार विस्‍कळीत आहे. खेडोपाडीचा भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, आदिवासी सधनांच्‍या वर्चस्‍वाखाली आहे.

प्रत्‍येक धंद्यात एक संघटना व सर्व धंद्यातील कामगारांच्‍या वर्गीय एकजुटीची एकच एक केंद्र संघटना, तसेच प्रत्‍येक खेड्यात भूमि‍हीन शेतमजूर, गरीब शेतकरी यांच्‍या एकजुटीच्‍या संघटना व्‍हायला हव्‍यात. श्रमिकांच्‍या या संघटनांबरोबरच सामाजिक अत्‍याचारांना तोंड देणा-या आदिवासी, दलित व महिला या समाजविभागांकडे अग्रक्रमाने लक्ष द्यायला हवे. याचबरोबर आरोग्‍य, शिक्षण व अन्‍य नागरी तसेच सांस्‍कृतिक प्रश्‍न हाती घ्‍यायला हवेत. संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीने या भूमिका घेतल्‍या होत्‍या. त्‍यामुळे समितीला सामर्थ्‍य प्राप्‍त झाले होते. पण समिती विसर्जित झाली आणि त्‍या भूमिकाही उधळल्‍या गेल्‍या. या जनस्‍वी भूमिकांचा आज एकजुटीने पुरस्‍कार अत्‍यंत निकडीचा आहे. म्‍हणूनच पुरोगामी संपूर्ण संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीच्‍या रुपात पुनरुज्‍जीवन आम्‍हाला समयोचित वाटते.

निवडणुकीनंतर या विभागांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जो आंदोलनाचा कार्यक्रम ठरवावयास आपण बसाल, त्‍यावेळी आम्‍हाला आपण निमंत्रित कराल, ही अपेक्षा आहे.

आपल्‍याला मनःपूर्वक शुभेच्‍छा !

आपला भ्रातृभावपूर्वक,

(कॉ. यशवंत चव्‍हाण)

No comments: