'जन्मजात पुरोहितगिरीची पद्धत बंद करुन पुरोहितांचा धंदा सर्व हिंदूंना (सर्व जातींना) खुला केला पाहिजे. जो हिंदू (कोणत्याही जातीचा) उपाध्यायाची परीक्षा उत्तीर्ण होईल त्याला पुरोहिताची सनद दिली पाहिजे.'
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, पान क्र. 280)
आता गणपतीत ब्राम्हण पुरोहितांना प्रचंड मागणी येणार. घरच्या-सार्वजनिक गणेशोत्सवांत आरत्या लोक रोज म्हणतात. पण खास आरत्यांना आणि सत्यनारायणाच्या पूजांना आवर्जून ब्राम्हण आणलेच जातात. बहुजनसमाजाला हा कधीही प्रश्न पडत नाही की ब्राम्हणाच्या हातूनच ही पूजा करणे म्हणजे तो सर्वश्रेष्ठ व आपण निम्नश्रेणीचे आहोत. हा आपला अपमान आपणच करुन घेतो. आपल्या देवाला भजण्यासाठी आपल्याला मध्यस्थाची गरजच काय, याची जाणीवच त्याला होत नाही. पूर्वी याबद्दल चर्चा तरी होत. आता त्याही बंद आहेत. आपल्यातले अनेक पुरोगामी देवाला मानतच नसल्याने ते ह्या चर्चेत पडतच नाहीत. तथापि, आपले मत तूर्त बाजूला ठेवून, गणपती मोठ्या प्रमाणात बसवले जातात, हे लक्षात घेऊन त्याची पूजा गणपती बसवणा-या आपणच करायला हवी, कोणी ब्राम्हण असता कामा नये, एवढा तरी प्रश्न नम्रपणे आपापल्या ठिकाणी आपण का उपस्थित करु नये. तो मानला जाणार नाही, हे ही उघड आहे. तरी असा काही प्रश्न तरी आहे, एवढे तरी पोहोचेल.
तसेच याचवेळी बाबासाहेबांनी 75 वर्षांपूर्वी आपल्या 'जातिनिर्मूलन' या प्रबंधात केलेली उपाध्यायाच्या परीक्षेसंबंधातली वरील सूचनाही चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मला वाटते.
.... सुरेश सावंत
No comments:
Post a Comment