Wednesday, October 27, 2010

आंबेडकरी समूहातील आर्थिक-सांस्कृतिक बदल व आंबेडकरी चळवळीचे भवितव्य

एका साहित्यिक मित्राच्‍या जुने कार्यकर्ते असलेल्‍या वडिलांचा अमृतमहोत्‍सव.

अनेक अधिकारी, संपादक, साहित्यिक, प्रतिष्ठित मंडळी जमलेली. हॉलच्‍या बाहेर अनेक गाड्या लागलेल्‍या.

पंच्‍याहत्‍तरी-ऐंशीचे लोक भाषणात बाबासाहेबांच्‍या काळातल्‍या जुन्‍या स्‍फूर्तिदायी आठवणी जागवत होते. त्‍यांच्‍या वाणीतून, डोळ्यांतून तत्‍कालीन चळवळीचा अभिमान, तेज ओसंडत होते. साठीचे लोक पँथरच्‍या काळातील आठवणींनी सुरुवात करत आज कशी चळवळ संपली आहेचा निराश सूर लावत होते. त्‍यांच्‍या चेह-यांवर काही गमावल्‍याची छाया तरंगत होती.

12 ते 22 वयोगटातील आमची (म्‍हणजे 40 ते 50 चा वयोगट) मुले आजुबाजूला खेळत किंवा गप्‍पा मारत होती. त्‍यांना यात काहीच गम्‍य नव्‍हते. आता ती कंटाळू लागलेली. बुफे च्‍या टेबलावरील पात्रांची झाकणे कधी उघडतात, याची वाट पाहत असलेली.

माझ्या मित्राची शिक्षिका असलेली पत्‍नी मला म्‍हणाली, भाऊजी, ह्यांना आवरतं घ्‍या म्‍हणावं आता. पोरं पार कंटाळलीत. आम्‍हाला त्रास द्यायला लागलीत.

माझ्या घरातला एक प्रसंग.

माझा बाप म्‍हणजे तुझा आजा मेलेली जनावरं ओढायचा असे सांगितल्‍यावर माध्‍यमिक शाळेतील माझा मुलगा मला म्‍हणाला होता- काय पकवतोयस !’

...पुढचं काही ऐकून घ्‍यायला त्‍याला इंटरेस्‍ट नव्‍हता. टीव्‍हीवर चाललेल्‍या रोडीज मधल्‍या युवक-युवतींच्‍या विरोचित करामतींत तो गुंगून गेला.

आपला भू‍तकाळ, आपला समाज, आपली चळवळ याविषयी जाणीवपूर्वक बोलण्‍याचा माझा प्रयत्‍न सुटत नाही. लादले न जाता त्‍याच्‍या कलाकलाने बोलत असतो. थोडा प्रतिसाद, अन् बरेचसे दुर्लक्ष असे चालते.

बालपणापासून फ्लॅट व मिश्र संस्‍कृतीत वाढलेल्‍या माझ्या मुलाला इतरांपासून काही वेगळे दिसत असले तर घरातला बाबासाहेबांचा फोटो, बुद्धाची मूर्ती एवढेच. तो बाय डिफॉल्‍ट निरीश्‍वरवादी आहे. याचे कारण घरात कोणत्‍याही देवाचे अस्तित्‍व नाही, चर्चा नाही.

माझा साहित्यिक‍ मित्र आणि मी एकाच झोपडपट्टीत वाढलेले. त्‍याचे वडील सरकारी कारकून, पुढे बढत्‍या मिळत अधिकारी म्‍हणून निवृत्‍त झालेले. माझे वडील एक निरक्षर गिरणी कामगार. पुढे 82 च्‍या संपात साफ धूळधाण झालेले. आमच्‍या दोघांच्‍या वडिलांच्‍या शिक्षणात-नोकरीत खूप फरक असला तरी आमचे भौतिक-सांस्‍कृतिक वातावरण एकच होते. नंतर हे गतीने बदलत गेले. त्‍याचे कुटुंब आधी फ्लॅट, नंतर बंगल्‍यात फार लवकर गेले. मला फ्लॅटमध्‍ये यायला उशीर लागला. पण हा उशीर तसा सापेक्षच. ज्‍या वस्‍तीतून आम्‍ही काहीजण बाहेर पडलो, तिथे आजही आमचे अनेक मित्र, नातेवाईक राहत आहेतच. त्‍यावेळच्‍या झोपडपट्टीत व आताच्‍या बराच फरक झाला आहे. आता पत्र्याची, कुडाची घरे नाहीत. बहुतेक कॉंक्रिटची झाली आहेत. सार्वजनिक संडास, गटारे यांची व्‍यवस्‍था पूर्वीच्‍या तुलनेत खूप सुधारली आहे. संधी मिळेल तसे आमचे तिथे राहणारे नातेवाईक, मित्र बाहेर पडत आहेत. काही मित्र नामांकित गँगचे सदस्‍य आहेत. त्‍यातील ब-याच जणांचे एन्‍काउंटर झाले. जे शिल्‍लक आहेत, ते भेटल्‍यावर आस्‍थेने, कळवळ्याने म्‍हणतात, बरे झाले तू शिकलास. इथनं बाहेर निघालास. आमचं काही खरं नाही.

आमच्‍या बालपणी दारिद्र्याचा अवतीभवती सुकाळ होता. लग्‍नांच्‍या पंगतीत उघड्या गटाराच्‍या रांगेत मांडी घालून बसायचे आणि अख्‍खे गहू व गूळ यांचेच मिश्रण असलेली लापशी पक्‍वान्‍न म्‍हणून खायचे. एक सांगायला हवे, उपासमार अशी आमच्‍या वाट्याला आली नाही. गावाहून पोट भरायला मुंबईत आलेल्‍या आमच्‍या वडलांना जी उपासमार सोसावी लागली, तिचा आम्‍हाला अनुभव नाही. मुंबईत खरोखरच पोट भरले. 72-73 च्‍या दुष्‍काळातही आम्‍ही शहरातले दलित उपाशी राहिलो नाही. राळ्याचे तांदूळ व जवाच्‍या चपात्‍या का होईना आम्‍हाला मिळाल्‍या. पण आमचे समाजबांधव याच उपासमारीमुळे याच काळात मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मुंबईत स्‍थलांतरित झाले.

मी वडिलांकडून ऐकलेली एक गोष्‍ट. ते म्‍हणत, उपासमार जास्‍तच व्‍हायला लागली की, रानात चरणा-या गुरांतल्‍या एखाद्या जनावराला आम्‍हीच मुंडी पिरगाळून ठार करत असू आणि घरी-महारवाडीत परतत असू. काही काळाने गावातून मेलेले जनावर ओढून नेण्‍यासाठी आम्‍हाला हाक यायची. मग आमची चंगळ व्‍हायची. माझ्या वडिलांची बहीण-माझी आत्‍या उपासमारीने मेली. तीव्रतेत अधिकउणे असले तरी उपासमारीची ही स्थिती कोकणातल्‍या सर्व जातींच्‍या वाट्याला आलेली. कोकणातल्‍या घरटी एकतरी माणसाला मुंबईत यावेच लागले. कोणी बोटीने आले, कोणी चालत. माझे वडिल पैसे नसल्‍याने चालत आले. मुंबईनेच आम्‍हाला तगवले हे मात्र नक्‍की.

आर्थिक वंचनेत, बिनचपलांच्‍या, अपु-या कपड्यांतल्‍या आम्‍हा मुलांना एक सांस्‍कृतिक वैभवाचा काळ लाभला. वर उल्‍लेख केलेल्‍या साहित्यिक मित्राच्‍या वडिलांच्‍या वयाची माणसे बाबासाहेबांच्‍या सभांच्‍या रसभरित आठवणी आम्‍हाला सांगत. आमच्‍या लेबर कॅम्‍पात बाबासाहेबांची सभा होती. चेंबूर स्‍टेशनच्‍या पलीकडे बाबासाहेबांची गाडी थांबली. लेबर कॅम्‍पात यायचे तर बाबासाहेबांना रुळ ओलांडून चालत यावे लागणार. हे काही बरोबर नाही, असे लोकांना वाटले. मग त्‍यातल्‍या पहिलवानांनी सरळ बाबासाहेबांची गाडीच उचलून रुळांच्‍या अलिकडे आणून ठेवली. आमच्‍या महारा-मांगांच्‍या त्‍या वस्‍तीत पहिलवान बरेच असत. आमच्‍याकडे त्‍यावेळी कुस्‍त्‍यांचे फड होत. हे पहिलवान घडविण्‍यासाठी एक तालीमही होती. त्‍या तालमीत आम्‍ही मुलेपण जात असू. पुढे व्‍यायामशाळा आल्‍या. अगदी अलिकडे ती तालीम पाडण्‍यात आली.

बाबासाहेबांच्‍या जयंतीला बैलगाडीत बाबासाहेब, बुद्ध, महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमा ठेवून लेझिम खेळत मिरवणुका निघत. पँथरच्‍या काळातली, दलित अत्‍याचारांविरोधातली, नामांतराची आंदोलने, जयभीम शब्‍दांच्‍या उच्‍चारांतून शरीरात सळसळणारी वीज, स्‍वातंत्र्य हे कुठच्‍या गाढविणीचं नाव आहे ही नामदेव ढसाळांची कविता आणि राजा ढालेंचा साधनेतला राष्‍ट्रध्‍वजासंबंधीचा अवमानकारक उल्‍लेख यांचा अभिमान बाळगून (हे सर्वथैव चूक, अत्‍यंत गैर होते हे नंतर कळले) प्राथमिक शाळेत स्‍वातंत्र्यदिनाच्‍या दिवशी काळी फीत लावून जाण्‍यातली, राष्‍ट्रगीत म्‍हणायला नकार देण्‍यातली बंडखोरी....हे सर्व वैभव होते. बुद्ध की मार्क्‍स, गांधी विरुद्ध आंबेडकर, समाजवादी, आरएसएस या सगळ्या संकल्‍पना-चर्चा-वाद कानांवर आदळत असत. सभांना येणा-या कोणत्‍याही नेत्‍याकडे त्‍यावेळी गाड्या नव्‍हत्‍या. रात्री उशीरा लोकांच्‍या घरीच जेवायचे किंवा साध्‍या हॉटेलात खायचे आणि पहाटे लोकल सुरु झाल्‍या की घरी परतायचे. प्रस्‍थापितांवर आग ओकणारे हे नेते खरोखरच आमचे हीरो होते. जयभीम के नारे पे खून बहे तो बहने दो... ही घोषणा देताना रक्‍तातला थेंब न थेंब पेटून उठायचा.

हळू हळू चळवळ ओसरु लागली. नेत्‍यांचे जलद गतीने पतन व पुढे प्रस्‍थापितीकरण झाले. आम्‍ही मुलांचे आता तरुण झालो होतो. भोवताली संकुचिततेचे डबके साठायला सुरुवात झाली होती. एकप्रकारची कोंडी होऊ लागली होती. यातूनच माझ्यासारख्‍या काहींचा नव्‍या वाटांचा शोध सुरु झाला. माझा स्‍त्री मुक्‍ती संघटनेशी, लाल निशाण पक्षाशी संबंध आल्‍यानंतर कावळ्याने शिवलेल्‍या चिमणीच्‍या पिलाला चिमण्‍या जसे बाहेर टाकतात तसे एक बहिष्‍काराचे वातावरण माझ्याभोवती तयार झाले. पण ते मुख्‍यतः माजी बंडखोर व नंतर प्रस्‍थापित झालेल्‍यांकडून. जवळच्‍या सोबत्‍यांपैकीही काही त्‍यात सामील झाले. पण लोकांची साथ कमी झाली नाही. माझ्या आधीच्‍या पिढीतले डाव्‍या चळवळीत आलेले कार्यकर्ते अक्षरशः समाजातून उठले होते, उठवले गेले होते. त्‍यांच्‍या घरात सोयरीकीही करायला नकार दिला जायचा. माझ्या बाबतीत हे झाले नाही. माझे लग्‍न झाले. स्‍त्री मुक्‍ती संघटनेतल्‍याच एका सवर्ण कार्यकर्तीने माझ्याशी लग्‍न केले. त्‍याबद्दल, तिच्‍या वस्‍तीतल्‍या सहज वावराबद्दल, लोकांत मिसळण्‍याबद्दल एक अपूर्वाई, कौतुक होते. आमची राहती झोपडी दुरुस्‍तीला काढली गेली त्‍यावेळी वस्‍तीबाहेरच्‍या अनेक सहका-यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. या आर्थिक मदतीतून साहित्‍य विकत आणले. बाकी अंगमेहनतीची कामे वस्‍तीतल्‍या कार्यकर्त्‍यांनीच केली. अनेक सामान्‍य माणसे ओळखीची, फारशी ओळखीची नसलेली मदतीला आली. आमची झोपडी दुरुस्‍त करणे हे सामाजिक काम बनले होते. ते एक इर्जिक होते.

मी वस्‍ती सोडली अन् माझे हे सामुदायिक जीवन, सांस्‍कृतिक वैभव ही लयाला गेले. त्‍याची एक पोकळी, तुटलेपण मनात कायम वास्‍तव्‍यास आले. माझ्या मुलाच्‍या वाट्याला माझे आर्थिक-भौतिक भोग आले नाहीत, हे चांगलेच झाले. पण माझ्या सांस्‍कृतिक संपन्‍नतेला तो पारखा राहिला (हे मला वाटते). त्‍या गुणवत्‍तेची (प्रकाराची म्‍हणत नाही मी) पर्यायी सांस्‍कृतिक संपन्‍नताही त्‍याच्‍या भोवताली आज नाही. अर्थात, काय नाही हे ही त्‍याला किंवा त्‍याच्‍या पिढीच्‍या इतर मुलांना कळत नाही. कळणे शक्‍यही नाही. समजून सांगताही येत नाही. तुला नव्‍या जगाची आण, चल उचल हत्‍यार, होऊन हुशार ही वसंत बापटांची त्‍याला अभ्‍यासक्रमात असलेली कविता त्‍याला समजावताना माझ्या नाकी नऊ आले. आण म्‍हणजे शपथ हे त्‍याला समजवू शकलो. पण नवे जग म्‍हणजे काय, आणि त्‍यासाठी हत्‍यार का उचलायचे, हे काही केल्‍या मी त्‍याला समजावू शकलो नाही. अखेरीस त्‍यालाही कवी कशाची आण घ्‍यायला सांगत आहे?’ या प्रश्‍नाचे नव्‍या जगाची एवढे उत्‍तर पाठ करणे पुरेसे वाटले.

मी ज्‍या वस्‍तीतून आलो, तिथे तरी आता ही सांस्‍कृतिक संपन्‍नता आहे का ? अजिबात नाही. बौद्ध वस्‍तीत राहत असल्‍याने, बुद्धविहार शेजारी असल्‍याने बुद्ध, आंबेडकर हे संदर्भ त्‍यांना कळतात. निवडणुकांच्‍या राजकारणात वस्‍ती ढवळून निघत असल्‍याने ते अधिक कळते. जे माझ्या मुलाला कळणे कठीण जाते. पण यापलीकडे त्‍या मुलांना जवळपास कळत नाही. अशाच वस्‍तीतला एक कार्यकर्ता नागपूरला माझ्यासोबत होता. दीक्षाभूमीवरील स्‍तूपात आम्‍ही फिरत होतो. बाबासाहेब व त्‍यांच्‍या वरच्‍या बाजूस बुद्धाची आशीर्वाद देणारी प्रतिमा एकत्रित असलेला एक फोटो समोर होता. सोबतच्‍या त्‍या तरुण कार्यकर्त्‍याने निरागसपणे विचारले, सर, बाबासाहेब अ‍ाणि बुद्ध एकाच वेळेस होते का ?’

बाबासाहेबांसारखा महापुरुष या जगात दुसरा नाही, ते महान होते, बुद्धाइतके कोणी श्रेष्‍ठ नाही, एवढेच या वस्‍तीतल्‍या तरुणांच्‍या कानांवर पडते. महान होते, म्‍हणजे नक्‍की काय, याचा तपशील त्‍यांनी ऐकलेला नसतो. नेत्‍यांनी किंवा मध्‍यमवर्गात गेलेल्‍या कार्यकर्त्‍यांनी हे प्रबोधन करण्‍याची तसदीच घेतलेली नसते.

गेल्‍या महिन्‍यातली गोष्‍ट.

मनसेचे लोक म्‍हणतात, बाबासाहेब आंबेडकर आमचे असे तुम्‍ही का म्‍हणता ? ‘आपले म्‍हणा ना ! त्‍यांनी घटना देशासाठी लिहिली. फक्‍त दलितांसाठी नाही. महाराष्‍ट्र राज्‍याबद्दल, मराठी माणसाबद्दल त्‍यांनी भूमिका मांडली. बाबासाहेब हे आपल्‍या सगळ्यांचे आहेत. सर्व महाराष्‍ट्राचे, सर्व देशाचे आहेत. तुम्‍हीच लोकांनी बाबासाहेबांना संकुचित बनवले.

...वस्‍तीतील एक तरुण कार्यकर्ता बैठक संपल्‍यावर माझ्याशी बोलत होता. नंतर रिपब्लिकन नेत्‍यांना त्‍याने जाम शिव्‍या घातल्‍या आणि मग आपली पोरे मनसेत जातात याला जबाबदार कोण ?’ असा उत्‍तराची अपेक्षा नसणारा प्रश्‍न माझ्यापुढे टाकला.

वरच्‍या सर्व प्रसंगांतील युवा पिढी बौद्धच आहे. पण विविध आर्थिक व शैक्षणिक थरातली. बौद्ध असण्‍याबरोबरच आणखी एक गोष्‍ट तिच्‍यात सामायिक आहे. ती म्‍हणजे- आंबेडकरी चळवळीबाबतची निर्भान, निर्शल्‍य दिशाहिनता. ज्‍याचे भान नाही, ज्‍याचे शल्‍य नाही, ज्‍याचा खेद नाही अशी दिशाहिनता.

ह्याला जबाबदार कोण ?

...परिस्थिती ?

होय. पण काही प्रमाणात. परिस्थिती बदलतच असते. जग परिवर्तनशील आहे. थोपवू म्‍हटले तरी ते थांबणार नाही. जगातल्‍या, समाजातल्‍या सगळ्यांच्‍याच जगण्‍याला ह्या बदलत्‍या परिस्थितीचे संदर्भ असतात. बौद्धांच्‍या तसेच बौद्धेतरांच्‍या.

पण परिस्थिती सुटी नसते. ती एक शृंखला असते. तो एक प्रवाह असतो. स्‍वच्‍छ, गढूळ, डोह, खडक असे सगळे त्‍यात असते. या परिस्थितीच्‍या स्थित्‍यंतरात आधीचे प्रगतीशील घटक पुढच्‍या पिढीकडे जाणीवपूर्वक सोपवावे लागतात. मागच्‍याने पुढच्‍याकडे मशाल सोपवायची असते. मागच्‍याने पुढच्‍याला चाल द्यायची असते. ही जाणीवपूर्वकता चळवळीत विशेष महत्‍वाची असते. आंबेडकरी चळवळीत हे झाले का ? होत आहे का ?

याचे उत्‍तर जवळ जवळ नाही असे द्यावे लागले असते, तरी बरे झाले असते. ते कमी धोकादायक होते. पण विचित्र, तिरपागडे, हानिकारक असे काहीतरी पुढच्‍या पिढीला सोपवले जात आहे. आणि ते खूपच गंभीर आहे.

आंबेडकरी चळवळ याचा अर्थ काय ?

बौद्धांनी (म्‍हणजे पूर्वाश्रमीच्‍या महारांनी) बौद्धांसाठी (म्‍हणजे पूर्वाश्रमीच्‍या महारांसाठी) चालवलेली चळवळ, असा आहे का ?

नाही. ती सर्व पीडितांना, शोषितांना मुक्‍त करणारी मानवमुक्‍तीची चळवळ आहे, अशीच तिची व्‍याख्‍या सगळे आंबेडकरवादी करतात. ती केवळ बौद्धांपुरती संकुचित होणे त्‍यांना तत्‍वतः मान्‍य नाही.

मग वरच्‍या घटनेतील मनसेला बाबासाहेबांचे व्‍यापकत्‍व आजच्‍या आं‍बेडकरी तरुणांना सांगण्‍याचा अधिकार कोणी दिला ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी छेडलेले देशव्‍यापी भूमिहिनांचे आंदोलन, महाराष्ट्राच्‍या सांस्‍कृतिक सारस्‍वताला हादरविणारे दलित साहित्‍य, सामाजिक-राजकीय जीवनाला थरारुन सोडणारी दलित पँथरची गर्जना, नामांतर-रिडल्‍सची आंदोलने अशा अनेक सत्‍कर्मांची नोंद आंबेडकरी चळवळीच्‍या इतिहा‍सात असली तरी आज वट्टात पराभूतता, दिशाहिनता हेच आहे. याला कारण कोण ?

निःसंशय आंबेडकरी चळवळीतले आजचे नेते आणि आजची शिक्षित व मध्‍यमवर्गीय मध्‍यवयीन पिढी.

आज ऐक्‍य केलेल्‍या व एकेकाळी समग्र परिवर्तनाची मांडणी करणा-या रिपब्लिकन नेत्‍यांचा नजिकच्‍या भूतकाळातला व्‍यवहार काय राहिला आहे ? केवळ संधिसाधू असेच म्‍हणावे लागेल. सत्‍तेच्‍या विविध स्‍तरांवर लाभार्थी झालेल्‍या जुन्‍या पँथर कार्यकर्त्‍यांचे पोषाख, व्‍यक्तिमत्‍व, वागणे अन्‍य सत्‍ताधारी पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांहून कोणत्‍याही अर्थाने भिन्‍न दिसत नाही. सत्‍तेच्‍या दलालांच्‍या या बाजारात नव्‍या पिढीला जुना पँथर कसा होता, हे दाखवायचे झाले, तर म्‍युझियमध्‍ये ठेवायला त्‍याचा सांगाडाही शिल्‍लक नाही. एकतर त्‍यांच्‍या हाडांनाही मांद्य आलेले आहे किंवा ती अगदी भुसभुशीत झालेली आहेत.

परिणामी, या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन उमेदवारांचा त्‍यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यांतही (म्‍हणजे बौद्ध मतदार मोठ्या संख्‍येने असलेले विभाग) धुव्‍वा उडाला. याचा अर्थ, ऐक्‍याच्‍या फार्साला नेहमी फसत आलेली आशावादी बौद्ध जनता यावेळच्‍या रिपब्लिकन ऐक्‍यावर मात्र भाळली नाही. तिने एकतर पारंपरिकरित्‍या कॉंग्रेसला आणि तिच्‍यातील तरुणांनी मनसेला कौल दिला. (बसपचे मायाजालही यावेळी फाटले होते)

रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्‍व बौद्धांच्‍या बाहेर कधी गेलेच नाही. त्‍यांनी बाबासाहेब महान होते हे सांगण्‍याच्‍या आणि त्‍यांच्‍या नावाच्‍या वापराच्‍या पल्‍याड परिणामकारक असे काही सांगितलेच नाही. वासाहतिक शोषणाचे विश्‍लेषण करणारे बाबासाहेब, जागतिक लोकशाही लढ्यांचा वारसा व संदर्भ देणारे बाबासाहेब, कामगारांसाठी 8 तासांचा दिवस, कामगार स्‍त्रीला बाळंतपणाची रजा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, समस्‍त हिंदू स्त्रियांना वारसा हक्‍क यांसाठी झगडणारे बाबासाहेब, भाषावार प्रांतरचनेसंबंधी-पाकिस्‍तानविषयी भूमिका मांडणारे बाबासाहेब आम्‍ही अन्‍य समाजाला कधी समजावलेच नाहीत. एवढेच नाही. ज्‍या बाबासाहेबांनी आम्‍हाला वैश्विक बुद्ध दिला. तोही आम्‍ही महार करुन टाकला. अन्‍य समाजातील अनेकांचा बुद्ध हा महार होता असा समज आहे. हे त्‍यांचे अज्ञान आहे, हे खरेच. पण आमचे नाकर्तेपण त्‍यामुळे कमी होत नाही.

आज बौद्धांच्‍यात 74 टक्‍के (ब्राम्‍हण समकक्ष जातींच्‍या खालोखाल) साक्षरता आहे. 4 वर्तमानपत्रे आहेत. उच्‍चपदस्‍थ अधिकारी, विचारवंत आहेत. सुस्थित असा लक्षणीय मध्‍यमवर्ग आहे. तरीही गेल्‍या 59 वर्षांत बाबासाहेबांनी आपल्‍याला दिलेला बुद्ध हा वैश्विक ठेवा सार्वत्रिक करणे सोडाच; आपल्‍या व्‍यतिरिक्‍तच्‍या अन्‍य दलित व मागास जातींपर्यंत आम्‍ही नेऊ शकलो नाही.

भारत बौद्धमय करण्‍याचा मार्ग म्‍हणजे जयंती-मयंतीला आपल्‍याच कोंडाळ्यात बेंबीच्‍या देठापासून भाषणे करणे असा आम्‍ही लावलेला आहे. शिक्षित मध्‍यमवर्गीय झोपडपट्टीतल्‍या जयंतीत प्रमुख पाहुणा म्‍हणून बाबासाहेबांबद्दल, बुद्धाबद्दल मोठमोठ्या गोष्‍टी करतो आणि आपल्‍याच सोसायटीतल्‍या, ऑफिसातल्‍या दुस-या बौद्धाला चारचौघात जयभीम म्‍हणायला कचरतो.

बौद्धांमधला शिक्षित मध्‍यमवर्ग ही खरे तर ताकद आहे. पण तिच्‍यात अनेक विकृती तयार झाल्‍या आहेत. एकूण मध्‍यमवर्गात आलेली आत्‍ममश्‍गुलता बौद्ध मध्‍यवर्गातही गतीने येऊ लागली आहे. शासकीय नोक-या, आरक्षणे, बढत्‍या, महामंडळांची कर्जे, गृहसंस्‍थांतल्‍या सवलती यांत आपल्‍याला व आपल्‍यानंतर आपल्‍या मुलाबाळांनाच लाभ कसा मिळेल, याबाबत तो विलक्षण दक्ष असतो. आपली जात्‍याच असलेली राजकीय-सामाजिक तल्‍लखता तो इथे पुरेपूर वापरतो. त्‍यासाठी वशिला, लाच, सत्‍ताधा-यांची खुशामत इ. रुढ मार्गांतला कोणताही मार्ग त्‍याला वर्ज्‍य नसतो. पण आपल्‍याच समाजातल्‍या गरीब स्‍तरातील बौद्धांचे कष्‍टकरी, गरीब म्‍हणून असलेले प्रश्‍न सोडवण्‍याबाबत, त्‍यांवर चळवळ संघटित करण्‍याबाबत तो अलिप्‍त राहतो. आपल्‍या मुलांसाठी आपण आरक्षण न घेतल्‍यास आपल्‍यातल्‍या गरीब मुलांना त्‍याचा लाभ मिळेल, हा अंतर्गत सामाजिक न्‍याय त्‍याला मंजूर नसतो. आपली मुले अभिजनवर्गात मिसळावीत म्‍हणून आपली ओळख ओळख लपविण्‍याचा, पुसण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न करतो. आंबेडकरी परिभाषेचा वाराही त्‍यांना लागणार नाही, याची निर्लज्‍ज दक्षता घेतो. सोसायटीतल्‍या गणेशोत्‍सवात सर्वधर्मसमभाव किंवा औचित्‍याचा प्रश्‍न म्‍हणून सहभागी होणे वेगळे. पण आम्‍ही तुमच्‍यातलेच हे दाखवण्‍यासाठी स्‍वतःच गणपती बसविण्‍यासारखे प्रकार तो करतो. जसजसा आर्थिक स्‍तर बदलेल, जसजसे घर अनेक खोल्‍यांचे होत जाईल, तसतसा बाबासाहेबांचा फोटोही हॉलमधून बेडरुमध्‍ये आणि नंतर तेथूनही दिसेनासा होतो. हा शिक्षित मध्‍यमवर्ग आपल्‍या नेत्‍यांचे राजकारण दुरुस्‍त करण्‍याचा आग्रह धरण्‍याऐवजी संधी मिळताच तो स्‍वतःच त्‍याचा वाटेकरी होतो. आपल्‍या व्‍यवहाराचे ढोंगी समर्थन करतो. आंबेडकरी चळवळीवरची ही साय दिवसेंदिवस दाट होत चालली आहे. आंबेडकरी चळवळीच्‍या दिशाहिनतेत त्‍यामुळे भर पडते आहे.

आंबेडकरी चळवळीचे भवितव्‍य धोक्‍यात आहे, ही चिंतेची बाब आहे. आणि त्‍याहून चिंतेची बाब म्‍हणजे युवा पिढीला या धोक्‍याची जाणीवच नसणे ही आहे.

यावर उपाय काय ?

ज्‍यांना हे कळते, असे अनेक कार्यकर्ते आजही आंबेडकरी तसेच अन्‍य पुरोगामी चळवळीत आहेत. आंबेडकरी समाजाने आपली मूळ उमेद पुन्‍हा जागवावी, खरेखुरे आंबेडकरी कार्यकर्त्‍याचे नवे तेजोमयी व्‍यक्तित्‍व घडवावे, पहिल्‍यापेक्षा अधिक व्‍यापक जाणीव घेऊन क्रियाशील व्‍हावे, यासाठी या जाणत्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍न करावयास हवेत. परिस्थितीच्‍या रेट्याची वाट न बघता एकएका कार्यकर्त्‍याशी संवाद केला पाहिजे. काही किमान सहमतीच्‍या मुद्द्यांवर हालचाली सुरु केल्‍या पाहिजेत. रिपब्लिकन पक्ष नाम के वास्‍ते का होईना आज एकवटला आहे. त्‍याला योग्‍य दिशा देण्‍याचा प्रयत्‍न व्‍हायला हवा. ही दिशा कोणती हे फार शोधण्‍याची गरजच नाही. आता तरी बाबासाहेबांनी त्‍यांच्‍या खुल्‍या पत्रात मांडलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्‍पना पुरेशी आहे. आधी तिथवर पोहोचणे आवश्‍यक आहे. मग त्‍याचा विकास करता येईल.

काय आहे ही संकल्‍पना ?

लोकशाही रचनेत लोकशाहीच्‍या रक्षणासाठी प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे (खरा रिडालोस), ही तळमळ त्‍यात आहे. त्‍यात कोठेही एकजातीयता, विशिष्‍टता नाही, तर समष्‍टीच्‍या समग्र कल्‍याणाचा घोष त्‍यात आहे. केवळ बौद्धांचा पक्ष असे जे संकुचित स्‍वरुप आजच्‍या रिपब्लिकन पक्षाचे आहे, त्‍याचा मागमूसही बाबासाहेबांच्‍या मूळ संकल्‍पनेत नाही, किंबहुना त्‍यास पूर्ण विरोधी अशीच बाबासाहेबांची मांडणी आहे. या मांडणीबाबत आणखी काही नोंदवत राहणे, ही विनाकारण पुनरुक्‍ती ठरेल. बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षाची संकल्‍पना स्‍पष्‍ट करणारे त्‍यांचे खुले पत्र (ज्‍याचा सगळे ऐक्‍यवादी रिपब्लिकन पुढारी उल्‍लेख करत असतात व त्‍यावर आधारित आमचे ऐक्‍य किंवा पक्ष असल्‍याचा दावा करत असतात व नेमके त्‍याच्‍या विरोधात व्‍यवहार करत असतात) जिज्ञासूंनी मुळातून वाचावे. महाराष्‍ट्र शासनाने प्रकाशित केलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन व भाषणे, खंड 20 मध्‍ये ते उपलब्‍ध आहे.

असा रिपल्किन पक्ष उभा करुन सर्व पीडितांच्‍या मुक्‍तीच्‍या कार्यक्रमावर चळवळ उभारणे व त्‍या क्रमात निवडणुका लढणे असे व्‍हायला हवे.

दुसरे म्‍हणजे, बुद्धविहार केंद्र धरुन वस्‍तीत सामाजिक ऐक्‍य उदयास आले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्‍यांचे विचार व त्‍यांनी दिलेला बौद्ध धम्‍म या सर्व गटातटांत मान्‍यता असलेल्‍या सामायिक व अत्‍यंत आदरणीय बाबी आहेत. प्रत्‍येक बौद्ध वस्‍तीत बुद्धविहार असतेच. या बुद्धविहारात त्‍या वस्‍तीतले सर्व गटातटांना मानणारे सामान्‍य लोक एकत्र येऊ शकतील. बाबासाहेब, त्‍यांचे विचार व बुद्ध धम्‍म या सामायिक बाबींबाबत अधिक समजून घेणे, आपले जाणतेपण वाढविणे व समाज म्‍हणून एक राहणे, हे होऊ शकते. अट एकच, पक्षीय किंवा गटाच्‍या राजकीय भूमिकांची या पातळीवर चर्चा न करणे. प्रत्‍येकाला राजकीय भूमिका घ्‍यायला मोकळीक ठेवणे. समान किमान भूमिकेवर आधारलेल्‍या वस्‍त्‍यांवस्‍त्‍यांमधील अशा सामान्‍यांच्‍या ऐक्‍यातूनच राज्‍यपातळीवरील टिकाऊ ऐक्‍य उदयास येऊ शकेल. अत्‍याचार करु धजणा-यांना या ऐक्‍याचा निश्चितच धाक राहील व राजसत्‍तेलाही या ऐक्‍याची पदोपदी दखल घ्‍यावी लागेल.

असे आणखी अनेक उपाय असू शकतात. अशा उपायांनीच आंबेडकरी चळवळीचे आणि पर्यायाने एकूण पुरोगामी चळवळीचे भवितव्‍य सुरक्षित करता येईल.

- सुरेश सावंत

मार्च 2010 च्‍या ललकारीच्‍या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख

2 comments:

Unknown said...

मुळात कोणीही कुणावर जातीवाचक बंधने घालून तु हेच केलं पाहिजे तु तेच केलं पाहिजे...
तु यांनाच मानलं पाहिजे तु त्यांच्यावर श्रद्धा नाही ठेवली पाहिजे... ही जबरदस्ती का केली जाते आपल्या या बौद्ध धर्मात का कुणास ठाऊक... जे आपल्या समाजातील मी कट्टर जय भीमवाला वगैरे म्हणत फिरत असणार्यानी मुळात कधी गौतम बुद्धांचे आंबेडकरांचे विचार एकतर कधी वाचलेले तरी नसतात किंवा वाचून ही त्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून मोकळे होतात... कुणाचे इथे स्वतंत्र विचारच नाहीत... जो तो जाती धर्माच्या नावाच्या टिमक्या वाजवत राहतो... कोणीच परिपुर्ण नाहीये इथे.. माणूस म्हणून जगायला कधी शिकणार आपण... हेच मोठं कारण होऊ शकतं भविष्यात आपल्या अधःपतनाचं... कारण आपण आपल्या माणसांपेक्षा जास्त महत्व जाती धर्मांना देतोय... आणि हे जर का असंच चालु राहिलं तर खरंच भविष्यात याची खुप मोठी किंमत आपल्या सगळ्यांनाच चुकवावी लागेल.... म्हणून आत्ताच जागे होऊया...
माणूस म्हणून जगूया....

Anonymous said...

मुळात कोणीही कुणावर जातीवाचक बंधने घालून तु हेच केलं पाहिजे तु तेच केलं पाहिजे...
तु यांनाच मानलं पाहिजे तु त्यांच्यावर श्रद्धा नाही ठेवली पाहिजे... ही जबरदस्ती का केली जाते आपल्या या बौद्ध धर्मात का कुणास ठाऊक... जे आपल्या समाजातील मी कट्टर जय भीमवाला वगैरे म्हणत फिरत असणार्यानी मुळात कधी गौतम बुद्धांचे आंबेडकरांचे विचार एकतर कधी वाचलेले तरी नसतात किंवा वाचून ही त्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून मोकळे होतात... कुणाचे इथे स्वतंत्र विचारच नाहीत... जो तो जाती धर्माच्या नावाच्या टिमक्या वाजवत राहतो... कोणीच परिपुर्ण नाहीये इथे.. माणूस म्हणून जगायला कधी शिकणार आपण... हेच मोठं कारण होऊ शकतं भविष्यात आपल्या अधःपतनाचं... कारण आपण आपल्या माणसांपेक्षा जास्त महत्व जाती धर्मांना देतोय... आणि हे जर का असंच चालु राहिलं तर खरंच भविष्यात याची खुप मोठी किंमत आपल्या सगळ्यांनाच चुकवावी लागेल.... म्हणून आत्ताच जागे होऊया...
माणूस म्हणून जगूया....