एका परिसंवादाची तयारी करत होतो. विषय होता- ‘जात ही श्रमाची नसून श्रमिकांची विभागणी आहे’. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जातिनिर्मूलन (Annihilation of cast)’ या 1935 सालच्या पुस्तिकेतील हे गाजलेले विधान आहे. म्हणून मूळ पुस्तिकाच वाचत होतो. वाचता वाचता हबकणे, आपले तसे चुकलेच, आपण तसा बराचसा योग्य विचार करत आलोत, बाबासाहेब किती प्रचंड धैर्याचे होते याचा अभिमान...अशा भावना मनात उमटत गेल्या.
बाबासाहेबांचे धैर्य किती अफाट होते, याची कल्पना आता येणे खरोखर कठीण आहे. लाहोरच्या ‘जातपात तोडक मंडळा’ने बाबासाहेबांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. त्या व्याख्यानाची लिखित प्रत आयोजकांना खूपच जहाल वाटली. काही उल्लेख बदलण्याची त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेबांनी ती मान्य केली नाही. परिणामी व्याख्यान रद्द झाले. हे व्याख्यान पुस्तकरुपाने अनेक भाषांत नंतर प्रसिद्ध झाले. अनेकांनी टीकेची झोड उठवली. महात्मा गांधींनीही ‘यंग इंडिया’मधून त्यावर टीका केली. त्यास मात्र बाबासाहेबांनी प्रत्युत्तर दिले. महात्मा गांधींचा विलक्षण दबदबा असलेला, दलितांची कोणत्याही प्रकारे राजकीय ताकद तयार झालेली नसल्याचा तो काळ. अशा काळात बाबासाहेबांनी एकट्याने दिलेली ही तत्त्वकठोर झुंज अफाट धैर्यवान माणूसच देऊ शकतो.
बाबासाहेबांच्या धैर्याची खास नोंद करण्याचे कारण असे की, ‘जातिनिर्मूलन’ या पुस्तिकेत दलितांचे हित वगैरे मर्यादित विवेचन नाही. खरे म्हणजे, बाबासाहेबांच्या कोणत्याच लिखाणात तसे नाही. त्यांना अखिल हिंदू समाज, अखिल भारतीय समाज जातींच्या दलदलीतून बाहेर पडावा, त्यात खरीखुरी समता नांदावी, त्याच्या जीवनाच्या सर्वांगांत लोकशाही रुजावी ही आस होती. मानवमुक्तीच्या अंतिम ध्येयाचे ते प्रवासी होते.
ही पुस्तिका वाचताना माझ्या मनात ज्या भावना उमटत होत्या त्याचे कारण, 1935 नंतर आता 75 वर्षे झाली तरी, त्यातील बहुतेक संदर्भ ताजे वाटत होते. जाती अजूनही घट्ट आहेत. याचा अर्थ, बाबासाहेबांची उपाययोजना गैरलागू झाली आहे, असा नव्हे. तर त्या अंमलात आणायचे काही प्रमाणात अवधान, ब-याच प्रमाणात धैर्य दाखवले गेले नाही. याहून वाईट म्हणजे, प्रस्थापित विभागाने बाबासाहेबांना ‘देव’ करुन, फ्रेमध्ये बंदिस्त करुन, त्यांचे विचार ‘महान’ होते, असे म्हणत आपल्या संकुचित हितसंबंधांच्या रक्षणाचे त्यांना पहारेकरी केले.
माझ्यासारखी बहुतकरुन ‘कार्य’ करण्यातच ‘रत’ राहणारी कार्यकर्ते मंडळी असे कोणी परिसंवादाला, भाषणाला बोलावले की मुद्दे शोधण्यासाठी वाचन करु लागतात. हे काहीसे परीक्षा आली की अभ्यास करण्यासारखे आहे. वाचन महत्वाचे आहे, हे पटत असतानाही तो आपल्यातील कार्यकर्त्याच्या ‘कार्या’चा अनन्य भाग मात्र बनत नाही. आणि मग असे काही अचानक वाचले की दचकायला, हबकायला होते. हितसंबंधीयांबरोबरच आपण निरागसपणे दुर्लक्ष करणारेही दोषी आहोत, हे जाणवून त्रास व्हायला लागतो.
हा त्रास ‘जातिनिर्मूलन’ पुस्तिकेतील अनेक मुद्द्यांबाबत आहे. पण तो एक स्वतंत्र आणि दीर्घ विवेचनाचा विषय होईल. इथे त्यातील 3-4 मुद्द्यांचाच संदर्भ घेत आहे. तोही मी माझ्या वैयक्तिक व माझ्या समाजाच्या-बौद्ध समाजाच्या-जीवनाबद्दल प्रामुख्याने घेत आहे.
सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील आघाडीची तुकडी असा ‘बौद्ध समाजा’चा लौकिक आहे. स्वाभाविकच बदलाची सुरुवात त्याने स्वतःपासून करणे अपेक्षित आहे. बुद्ध धम्मप्रवेशाने महार हे लांछन घालवून वैज्ञानिकता व नैतिकता यांचा नवा मूलाधार त्याने स्वीकारला. गावगाड्याची पारंपरिक कामे सोडून दिली. शिक्षण हे प्रगतीचे महत्तम साधन मानून त्यात लक्षणीय प्रगती केली. परिवर्तनाच्या विविध सामाजिक-राजकीय चळवळींचा पाठीराखा राहिला. अशा जमेच्या बाजू त्याच्याकडे अनेक आहेत. तरीही अजून खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्याकडून होणे अपेक्षित होते, आहे. पण त्या झालेल्या नाहीत.
बाबासाहेबांनी ‘जातिनिर्मूलन’ या पुस्तिकेत जातीची काही खास वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्यातील एक आहे- ‘जातीला जातीतीलच नेता लागतो’. आजच्या बौद्धांच्या जेवढ्या संघटना आहेत, रिपब्लिकन पक्षाचे जेवढे गट आहेत, त्या सगळ्यांचे नेते बौद्धच आहेत. बौद्धेतर दलितही त्यांना चालत नाही. (अपवाद कांशिराम-मायावती. पण त्यांनी बाबासाहेबांनाच आपले आराध्य मानले असल्याने व पुढे केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर मायावती बौद्ध धर्म स्वीकारणार (?) असल्याने.)
‘सहानुभूती, कौतुक, सहाय्य, प्रोत्साहन हे आपल्या जातीतल्या सदस्यांपुरतेच असते’ असेही एक जातीचे वैशिष्ट्य बाबासाहेब सांगतात. आंबेडकर जयंतीला होणा-या बक्षीस वितरण समारंभांमधील मुले ही मुख्यतः बौद्धच असतात. ‘आपल्या मुलांचे आपणच कौतुक नाही करायचे तर कोणी करायचे?’ असे आयोजक बाणेदारपणे त्याचे समर्थनही करत असतात. ‘आपली मुले’ ही व्याख्या बौद्धांपुरतीच मर्यादित असते. आजवरच्या वंचनेचा इतिहास पाहता आपली मुले वंचित राहता कामा नयेत, याची दक्षता घेणे बरोबरच आहे. पण मर्यादा फक्त आपल्या मुलांपुरतीच का? ‘सब्बे सत्ता सुखि होन्तु (सर्व जगातील प्राणिमात्र सुखी होवोत)’ किंवा ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ या बौद्ध वचनांचे मग काय करायचे? इतर जातींच्या मेळाव्यात हेच होत असते. त्यावर बाबासाहेबांचा आक्षेप आहे. हा आक्षेप आजच्या आंबेडकरअनुयायी बौद्धांना लागू होत नाही का?
‘जातीच्या खास चालीरीती असतात’ असे बाबासाहेब जातीचे वैशिष्ट्य नोंदवतात. महारपणातून मुक्त होऊन उज्ज्वल अशी ‘बौद्ध’ संज्ञा, विचारप्रणाली, जीवनप्रणाली मिळाली. जुन्या चालीरीती, संस्कार, विधींच्या जागी नवे संस्कार, विधी प्रस्थापित करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे ते झालेही. पण आज त्यांचेही कर्मकांड होऊ लागले आहे. काही काळ भगवे चिवर नेसून भिक्खूवेशात भिक्खूंच्या सहवासात राहून धम्मचिंतन, अभ्यास करणे ही बौद्ध परंपरा. असे करणा-यांना ‘श्रामणेर’ म्हणतात. हल्ली दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिनी हजारोंच्या संख्येने भगवी वस्त्रे परिधान करुन बौद्ध मंडळी सामुदायिक मुंडण करुन घेत असतात. तिरुपतीच्या धर्तीवर होणा-या या सामुदायिक मुंडणाला ‘श्रामणेर दीक्षा’ असे म्हणतात. हे कर्मकांड नव्हे काय? बाबासाहेबांनी आपल्या ऐतिहासिक दीक्षासमारंभात पूर्वसुरींशी नाते सांगत महास्थवीर चंद्रमणींच्या हस्ते स्वतः दीक्षा घेतली. पण समोरच्या लाखोंच्या जनसमुदायाला त्यांनी स्वतः दीक्षा दिली. याचे कारण ‘मला भिक्खूच्या रुपात नवा पुरोहितवर्ग उभा करायचा नाही’ अशी त्यांची भूमिका होती. धम्माचा अभ्यास, चिंतन व प्रचार-प्रसार करणे हे मुख्य काम असणा-या भिक्खूंना नामकरण-विवाह ते पुण्यानुमोदन या सर्व विधींना बोलावणे आता प्रतिष्ठेचे झाले आहे.
...याचा अर्थ, जातिनिर्मूलनासाठी जात त्यागणे, त्या जातीला आधार देणारी धर्मव्यवस्था नाकारणे हे बौद्धांनी केले. पण तेच बौद्ध एका नव्या ‘बौद्ध’ या जातीची निर्मिती तर करत नाहीत ना?
आपला अंतिम काळ जवळ येत चालला आहे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. आजाराने शरीर थकत चालले असतानाही ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी समाजाला, जगाला दिला. समकालीन बौद्ध जगतातील अनेक धारणांना छेद देऊन त्यांच्यादृष्टीने मूळ बुद्धविचार त्यांनी ग्रथित केला. 14 ऑक्टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर पुढच्या दीड महिन्यातच 6 डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्म ही जीवनप्रणाली म्हणून लोकांनी स्वीकारावी, असे त्यांना अभिप्रेत होते. नैतिकता, विज्ञाननिष्ठा व लोकशाही यांचे संस्कार रुजवणारी ही जीवनप्रणाली देशाच्या व मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, अशी त्यांची धारणा होती. केवळ एक नवा धर्म किंवा संप्रदाय म्हणून तो पुढे यावा, असे अर्थातच त्यांना नको होते.
बाबासाहेब नोंदवत असलेले आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जातींची उतरंड असते’. याचा अर्थ, प्रत्येक जातीच्या खाली कोणती तरी जात असते. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींतही ही उतरंड होती. ती आजही आहे. महार चांभाराच्या खाली व मांगाच्या वर. आजही बौद्ध झालेल्या महारांशी आंतरजातीय लग्न करायला चांभार समाजाची तयारी नसते. तीच गत बौद्धांनी मांगाच्या घरी सोयरिक करण्याबाबत आहे. सोयरिक याचा अर्थ, रीतसर मागणी वगैरे नाही. ते तर कोणत्याच दोन जातींत होत नाही. मुलामुलींनी परस्पर लग्न करायचे ठरवल्यानंतरच्या या गोष्टी आहेत.
बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी म्हणून बौद्धांनी आंतरजातीय विवाहांचा स्वाभाविकरित्याच पुरस्कार केला पाहिजे. कारण जातिनिर्मूलनाचा एक महत्वाचा उपाय म्हणून ‘आंतरजातीय’ विवाहांचा बाबासाहेबांनी ‘जातिनिर्मूलन’ या पुस्तिकेत पाऊणशे वर्षांपूर्वी पुरस्कार केला आहे. पण तसे होत नाही. जाणीवपूर्वक आपसातच स्थळे (अर्थात समान आर्थिक स्तरात) पाहिली जातात. मुलांनी परस्पर ठरवलेल्या आंतरजातीय लग्नांच्या संदर्भात मुलगी दुस-या जातीची चालते. अर्थात, तीही शक्यतो वरच्या जातीतली. पण आपल्या समाजातली मुलगी दुस-या जातीत जाऊ नये, यासाठी खास प्रयत्न केले जातात. याचे कारण मोठे ‘तात्त्विक’ आहे. माझ्या नात्यातल्या एका मुलीने (ती बौद्ध) सवर्ण मुलाशी लग्न ठरवले. भावकीने विरोध केला. भावकीचे म्हणणे असेः आपले एक माणूस बाबासाहेबांनी ज्या हिंदू धर्माचा त्याग केला त्या हिंदूधर्मात जाणार. ‘सारा भारत बौद्धमय’ करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न त्यामुळे लांबणीवर पडते.
कोकणातल्या भावक्या कर्मठपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना एकवेळ समजून घेऊ. पण बौद्धांमध्ये सर्वाधिक वाचल्या जाणा-या, बौद्धांनी बौद्धांसाठी चालवलेल्या बौद्धांच्या एका वर्तमानपत्राच्या अग्रलेखातील ही विधाने पहाः ‘आंतरजातीय विवाहाने जरी जातीयता कमी होत असली, तरी स्वजातीच्या मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो, हे नाकारुन चालणार नाही. बुद्ध धम्मात जात नसल्याने बौद्धांनी आपल्या मुलामुलींचे विवाह बुद्ध धम्मीयांशीच करावेत. त्यामुळे ‘जाता नाही ती जात’ असे म्हणण्याचा प्रसंग त्यांच्यावर येणार नाही.’
बाबासाहेबांना फ्रेमबंद करुन त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास कसा केला जातो आहे व बौद्ध हीच एक बंदिस्त जात कशी होत आहे, यावर आणखी भाष्य करण्याची यानंतर गरज नाही.
बाबासाहेबांना अपेक्षित असलेले आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आता वाढत चालले आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी तीव्र विरोध, खुनाखूनी, उभयतांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन संपवण्याच्याही घटना होत असतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात या घटना अधिक होतात. तरीही आंतरजातीय विवाहांचे एकूण प्रमाण वाढतच चालले आहे. बाबासाहेबांच्या मताप्रमाणे हे रक्तमिश्रण जाती मोडायला मदत करील. अशा रक्तमिश्रणातून तयार होणारी संतती आई-वडिलांच्या जैविकरित्या कोण्या एका जातीची वाहक नसल्याने किमान त्या संततीच्या मनात तरी एका विशिष्ट जातीचा अभिमान/दुराभिमान असायची शक्यता मंदावते.
मंदावते म्हणायचे कारण जातीची ओळख पूर्णतः संपुष्टात येत नाही. बापाची जात मुलाला लागते. आमच्या घरात आमच्या पिढीतील सर्वांची लग्ने आंतरजातीय आहेत. मी चौकशी केली तर प्रत्येक जोडीतील नव-याची जात मुलाला लागलेली आहे. पतीची जात अधिक पत्नीची जात याचे उत्तर ‘कोणतीही जात नाही’ असे न येता ‘पतीची जात’ असे येते. याचा अर्थ, आंतरजातीय विवाह केल्यानंतरही मुलांना अधिकृतपणे ‘एक जात’ मिळते. धर्म वेगळे असले तर बापाचा धर्म मुलाला मिळतो. अशारीतीने जात किंवा धर्माची ओळख पुढे चालू राहते.
याच्या आधीही एक टप्पा असतो. तो लग्नाचा. आंतरजातीय-धर्मीय विवाह धार्मिक पद्धतीने करावयाचा झाल्यास तो हटकून नव-याच्या जाती किंवा धर्माच्या चालीरीतीप्रमाणेच होतो. पूर्वी वधूचे नाव सर्रास बदलले जायचे. आता बदलले जातेच असे नाही. मात्र आडनाव नव-याचेच लागते. काहीजणी बंड करुन स्वतःचेच आडनाव लावतात. त्यांना हरठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. काहीजणी स्वतःचे व नव-याचे अशी दोन आडनावे लावतात. ही तडजोड मात्र समाजाने स्वीकारलेली दिसते. पत्नीची जात आता कायद्यानेच बदलत नाही. कारण जात ही जन्मसिद्ध आहे. ती स्वीकारता येत नाही. धर्म स्वीकारता येतो. लग्नातच नवरीचे नव-याच्या धर्मात धर्मांतर केले जाते. काहीजणी कागदोपत्री स्वतःचाच धर्म लावतात. पण व्यवहारात मात्र तिला नव-याच्याच धर्माचरणात सहभागी व्हावे लागते. पुरुषसत्ताकता स्त्रीचे दुय्यमत्वच नव्हे, तर जातीचेही संरक्षण करते ती अशी.
पुरोगामी-जाणत्या कार्यकर्त्यांचा व्यवहार कसा होतो ?
माझेच उदाहरण देतो. मी बौद्ध, माझी पत्नी सवर्ण. दोघेही चळवळीतले. चळवळीतच लग्न ठरले. नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठीची नोटीस दिलेली. तिची मुदत संपायच्या आतच माझ्या पत्नीला तिचे घर सोडावे लागल्याने आम्हाला तातडीने लग्न करणे भाग होते. असे लग्न धार्मिक पद्धतीनेच शक्य होते. कोणत्या धर्माप्रमाणे लग्न करायचे, यात विचार करण्याचा माझ्या दृष्टीने प्रश्नच नव्हता. हे लग्न बौद्ध पद्धतीनेच होणार. कारण तो पुरोगामी धर्म आहे. माझ्या होणा-या पत्नीचे काही वेगळे म्हणणे आहे का, असे विचारणेही मला अप्रस्तुत वाटले. तिचेही तेच मत असणार (असले पाहिजे), हे माझ्या मनात ठाम होते. बौद्ध पद्धतीने लग्न करायचे ठरले. तिने त्यास हरकत घेतली नाही. विधीची सूक्ते म्हणण्यास प्रारंभ झाल्यानंतर मध्येच तिचे धर्मांतर करण्यात आले व तिच्याकडून 22 प्रतिज्ञा वदवून घेण्यात आल्या. (बाबासाहेबांनी समाजाला दीक्षा देताना हिंदू धर्म त्यागायचे म्हणजे काय करायचे, यासाठी तत्कालीन संदर्भात या 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या.) त्यात ‘ब्रम्हा, महेश, विष्णू यांना देव मानणार नाही...’ वगैरेंचा समावेश आहे. यावेळी मात्र ती व तिची सवर्ण मित्रमंडळी अस्वस्थ झाली. माझी पत्नी या देवांची किंवा हिंदू धर्माची उपासक होती, असे अजिबात नव्हते. मात्र, असे धर्मांतर व प्रतिज्ञांची जबरदस्ती हा तिच्या स्वतंत्र व्यक्तित्वाचा अवमान होता. तातडीने लग्न होणे ही परिस्थितीची निकड लक्षात घेऊन तिने हे निमूटपणे सहन केले.
काहीतरी गडबड होते आहे, हे मला जाणवले. पण जगात सर्वश्रेष्ठ धर्म बौद्धच आहे व कोणीही पुरोगाम्याने देवांना मानताच कामा नये, ही माझी कठोर धारणा असल्याने माझ्या पत्नीची अस्वस्थता मला पोहोचलीच नाही.
आता कळते की, ही माझी महाभयंकर चूक झाली. धर्मांतर व प्रतिज्ञा या दोन गोष्टी तरी मी थांबवायलाच हव्या होत्या. (मी हतबल वगैरे नव्हतो. ठरवले असते तर विधी काय करायचा, कसा करायचा हे मी सांगू शकत होतो. पंचक्रोशीतील बौद्ध समाजात मी तसा मान्यताप्राप्त कार्यकर्ता होतो.) प्रत्यक्षात माझ्या पत्नीचा कागदोपत्री धर्मही बदललेला नाही आणि तिचे आडनावही बदललेले नाही. पण तरीही तेव्हा मी हस्तक्षेप करायला हवाच होता. ती चूक झालीच. 21 वर्षांपूर्वीची ती चूक आता दुरुस्त होणे शक्य नाही. बूँद से गयी...पद्धतीची ती चूक आहे.
दोन व्यक्तींच्या लग्नात धर्माचा खरे म्हणजे संबंधच काय ? लग्न झालेल्या दोन व्यक्ती आपापल्या धर्माचे आचरण करु शकतात. हे उपासना स्वातंत्र्य त्यांना घटनेने दिलेले आहे. बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिस्वातंत्र्याचे कडवे पुरस्कर्ते होते. पण आम्ही त्यांचे पुरुष अनुयायी स्त्रियांचे अस्तित्व आमच्यातच सामावलेले असते, असे गृहीत धरतो. जुन्या काळात सम्राट अशोक, अकबर यांच्या परधर्मीय राण्या त्यांच्या धर्माचे आचरण करण्यास मुखत्यार होत्या. हे ठाऊक असूनही आम्ही स्वयंसिद्ध पुरोगामी ‘बौद्ध’ स्वतःला त्याबाबतीत अपवाद ठरवतो. बौद्ध हा विचार आहे. तो मनाने पटून स्वीकारावा लागतो. हे आम्ही ठार विसरतो. त्याच्या आकृतिबंधासच महत्व देतो.
पुढे मुलाला शाळेत घालताना धर्म म्हणून ‘बौद्ध’ अशीच मी नोंद केली. खरे म्हणजे काहीही लिहू नये, असा आग्रह धरावा, असा एक विचार होता. पण असे केल्याने मी जात लपवतो, असा माझ्या बौद्ध समाजातून आरोप होईल, ही धास्ती मला होती. कारण जात लपवणारे, जयभीम म्हणायला लाजणारे अनेक मध्यमवर्गीय बौद्ध मला ठाऊक होते. अशांवर सडकून टीका करण्यात मी आघाडीवर असे. अशांना चारचौघात जाहीररित्या जयभीम म्हणून त्यांना अवघडून टाकणे हा माझा कार्यक्रमच असे.
आता वाटते, या पुरोगामीपणाच्या आविष्कारामागे एक सामाजिक मान्यतेचे भय व पोथीवादी अहंता होती. आणि या वैचारिक अहंतेच्या-भयाच्या आत कळत नकळत ‘पुरुषी’ अहंता होती.
आता हे कळू लागल्यावर मी मुलाला सांगितले, ‘तुझा शाळेत लावलेला धर्म व आडनाव मी दिलेले आहे. ते तांत्रिक आहे. कोणताही धर्म हा पटून स्वीकारावा लागतो. त्यामुळे तू जन्मतः बौद्ध असण्याचा प्रश्नच येत नाही. तू 18 वर्षांचा झाल्यावर धर्म, आडनाव ही ओळख तुझी तू ठरव.’
मला वाटते, ज्यांना पटते त्या सर्वांनीच, खास करुन आंतरजातीय अथवा आंतरधर्मीय लग्न करणा-यांनी आपल्या मुलांना कोणताच धर्म अथवा जात लावू नये. (राखीव जागांचा लाभ घेणे ज्यांना आज आवश्यकच आहे, अशांचा अपवाद करावा लागेल.) त्यांना आडनावेही आपली देऊ नयेत. स्वतःचे नाव त्यानंतर आईचे नाव व शेवटी वडिलांचे नाव ही आपल्याकडे काहीजण अनुसरत असलेली पद्धतच योग्य आहे. शाळा-कॉलेजे, सरकारी कार्यालये किंवा जिथे कोठे शक्य असेल तिथे जात/धर्म न नोंदवण्याचा एक पर्याय असलाच पाहिजे. हा पर्याय स्वीकारणा-यांची संख्या आजच्या काळात नक्की वाढू शकते. ती अधिक वाढण्यासाठी प्रचार-प्रसारही करावा लागेल.
जाती ह्या मनातूनच नष्ट व्हाव्या लागतील. वरील उपाय हे त्या अर्थाने बाह्यांग आहे. पण तेच निदर्शक असल्याने ते स्वीकारणे उपयुक्त ठरेल. जातींच्या ओळखीचा प्रवास खंडित होण्याचा तो किमान एक महत्वाचा उपाय नक्की असू शकतो.
- सुरेश सावंत
‘पुरुषस्पंदन’ च्या 2010 च्या दिवाळी अंकासाठी पाठवलेला लेख
No comments:
Post a Comment