Monday, November 22, 2010

विचारविनिमय बैठक

परिवर्तनवादी चळवळींपुढील सामायिक आव्‍हाने व पेच

या विषयावर तीन दिवसीय

विचारविनिमय बैठक

२५ ते २७ फेब्रुवारी २०११

स्‍थळः साने गुरुजी राष्‍ट्रीय स्‍मारक, वडघर, ता. माणगाव, जि. रायगड

प्रिय सहकारी,

परिवर्तनवादी चळवळी म्‍हणत असता, सर्वसाधारणपणे कम्‍युनिस्‍ट, समाजवादी, फुले-आंबेडकरवादी तसेच लोकशाही-मानवतावादी प्रवाह गृहीत आहेत. या चळवळींतील तरुण तसेच वयाच्‍या मध्‍याकडे सरकणा-या क्रियाशील कार्यकर्त्‍यांकडून स्‍वतःच्‍या तसेच एकूण चळवळींबाबत काही अस्‍वस्‍थता व्‍यक्‍त होत असते. या अस्‍वस्‍थतेत आपण एवढे काम करुनही राजकीय हस्‍तक्षेपाची ताकद निर्माण होत नाही ही प्रमुख वेदना असते. त्‍याचबरोबर वरील विविध प्रवाहांमध्‍ये मतभेदांबरोबरच जे सामायिक पुरोगामीपण आहे, त्‍यावर व्‍यापक एकजूट का होत नाही, हे शल्‍य सतावत असते.

खाजगी चर्चांतून व्‍यक्‍त होणा-या या अस्‍वस्‍थतेतून यासंबंधातली काही आव्‍हाने, काही पेच समोर येत असतात. दोन-चार जणांच्‍या या खाजगी व प्रसंगोपात होणा-या चर्चा सामुदायिकरित्‍या अधिक नेमकेपणाने कराव्‍यात, अशी अपेक्षाही काहीजण व्‍यक्‍त करत असतात. अशा सामुदायिक चर्चेच्‍या आयोजनास कोणीतरी निमंत्रण देणे आवश्‍यक होते, म्‍हणून आम्‍ही वैयक्तिक पातळीवर हे निमंत्रण देत आहोत. निमंत्रक या अर्थाने आम्‍ही निमित्‍तमात्र आहोत, हे उघड आहे.

या विचारविनिमयातून राजकीय हस्‍तक्षेप व व्‍यापक एकजूट या संदर्भात चळवळींना कमकुवत करणा-या आव्‍हानांची-पेचांची निश्चिती, त्‍यांच्‍या स्‍वरुपाविषयीचे आपले आकलन व सोडवणुकीचे काही आडाखे याबाबत काही सामायिक आराखडा निर्माण होऊ शकतो का, याचा साकल्‍याने शोध घेणे, हा या चर्चेचा उद्देश असावा, असे आम्‍हाला वाटते. तथापि, या चर्चेतून कोणताही सामायिक कार्यक्रम आखणे, एखादी आघाडी उभी करणे असे अपेक्षित नाही. अभिनिवेशरहित, सौहार्दपूर्ण परस्‍परसंवादास चालना मिळाली, तरी खूप झाले, असे आम्‍हाला वाटते.

या चर्चेत कोण सहभागी होऊ शकते, याविषयी ज्‍या काही सूचना आल्‍या त्‍यानुसार ३० ते ५० वयोगटाच्‍या आसपास असलेल्‍या कार्यकर्त्‍यांना या बैठकीस बोलवावे असे आम्‍ही ठरवले. स्‍वातंत्र्य, संयुक्‍त महाराष्‍ट्र ते मागोवा, युक्रांद, पँथर आदि चळवळींतील प्रत्‍यक्ष सहभागातून प्राप्‍त झालेल्‍या ऐतिहासिक ओझ्यांचे (लहान वयामुळे अथवा जन्‍मच झालेला नसल्‍यामुळे) जे वाहक नाहीत, तथापि, त्‍यांचा प्रगतीशील वारसा मानणा-या तसेच त्‍यांच्‍या संदर्भांचा परिचय असलेल्‍या पुरोगामी चळवळींतील कार्यकर्त्‍यांचा मुख्‍यतः हा विचारविनिमय आहे. यात काही अभ्‍यासक, पत्रकार तसेच निरीक्षक सहभागी होऊ शकतात. तथापि, आपण परस्‍पर कोणाला निमंत्रित करु नये, ही विनंती. आयोजकांशी चर्चा करुन अशांना निमंत्रित केल्‍यास योग्‍य ठरेल.

२५, २६ व २७ फेब्रुवारी २०११ अशी ३ दिवसांची ही बैठक आहे. साने गुरुजी राष्‍ट्रीय स्‍मारक, वडघर, ता. माणगाव, जि. रायगड यांना केलेल्‍या विनंतीनुसार त्‍यांनी बैठकीची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी सहकार्य देऊ केले आहे. राहण्‍या-जेवणाच्‍या खर्चातला काही वाटा आपण उचलावा, यासाठी आपल्‍याकडून आर्थिक योगदान प्रति व्‍यक्‍ती किमान १०० रु. अपेक्षित आहे. प्रवासखर्च ज्‍याचा त्‍याने करावयाचा आहे, हे उघडच आहे.

आपण या बैठकीत सहभागी होण्‍यास तयार आहात का ते कळवावे, तसेच चर्चेच्‍या मुद्द्यांसंबंधी तसेच अन्‍य बाबतीत आपल्‍या काही सूचना असल्‍यास त्‍याही पाठवाव्‍यात, ही विनंती.

आमचे एक जवळचे सहकारी उमेश खाडे यांनी या बैठकीच्‍या समन्‍वयात सहकार्य करण्‍याचे कबुल केले आहे. ते आपल्‍याशी आमच्‍यावतीने आवश्‍यकतेनुसार संपर्क करतील तसेच आपणही त्‍यांच्‍याशी करावा, ही विनंती.

आपले,

उल्‍का महाजन दत्‍ता बाळसराफ सुरेश सावंत

संपर्कः

उल्‍का महाजन (मो.क्र.- 9869232478, ईमेलः ulkamahajan@rediffmail.com)

दत्‍ता बाळसराफ ( मो. क्र. - 9892713049) ईमेलः dattab28@gmail.com )

सुरेश सावंत (मो. क्र. 9892865937 ईमेलः sureshsawant8@hotmail.com)

उमेश खाडे (मो. क्र. – 9892649664 ईमेलः umeshlvk@gmail.com )

पत्रव्‍यवहाराचा पत्‍ताः

उमेश खाडे

एम.के.सी.एल.-निर्माण, प्‍लॅटिनम टेक्‍नो पार्क, ५ वा माळा, युनिट क्र. ५०२/५०५, प्‍लॉट क्र. १७/१८, सेक्‍टर ३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०५.

साने गुरुजी स्‍मारकात पोहोचण्‍यासाठी सूचनाः

· दिव्‍याहून सकाळी ६.१५ वा. सुटणारी दिवा-सावंतवाडी ट्रेन पनवेलला ७.१५ वा. पोहोचते. या ट्रेनने गोरेगाव स्‍टेशनला उतरणे. गोरेगावला ही ट्रेन ९.३० ते १० च्‍या सुमारास पोहोचते. गोरेगाव स्‍टेशन ते स्‍मारक हे अंतर चालत १५ ते २० मिनिटे आहे.

· बसने आल्‍यास माणगाव स्‍टँडला उतरुन रिक्‍शाने स्‍मारकात येता येईल. रिक्‍शा ८० रु. घेईल. अथवा माणगावहून २-३ कि.मी. चालत मोर्बा नाक्‍यावर येऊन सहा सीटर पकडून कुरावडे फाट्याला उतरावे. कुरावडे फाट्यापासून स्‍मारक अडीच कि.मी. आहे. हे अंतर चालत यावे लागते.

No comments: