गो.पु. देशपांडे लिखित, पुणे महानगरपालिका सफाई कामगार युनियननिर्मित व अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ नाटकाचे राज्यात जोरात प्रयोग चालू आहेत. अतुल पेठे हे प्रयोगशील व धाडसी दिग्दर्शक आहेत. त्यांची या आधीची नाटके व फिल्म्स याच्या साक्षीदार आहेत. तेच धाडस याही नाटकाच्या निर्मितीत दिसून येते. या नाटकातल्या कलावंतांपैकी 70 टक्के कलावंत सफाई कामगार आहेत. नाटकात काम करण्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या या कामगारांना ‘कलावंत’ करण्यासाठी अतुल पेठेंनी प्रचंड मेहनत घेतली. अर्थात, युनियनच्या नेत्या कॉ. मुक्ता मनोहरांची मोठी साथ त्यांना त्यासाठी मिळाली. म्हणूनच हे नाटक दर्जेदार झाले आहे.
या नाटकाच्या निर्मितीमागची भूमिका विशद करताना पेठे म्हणतात, ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आचार-विचारांचे आजच्या काळात अर्थ लावून पाहण्याचा या नाटकात प्रयत्न आहे. स्त्री-शूद्रातिशूद्र शिक्षण, जातव्यवस्थेशी लढा, धर्माचा नवा अर्थ, ब्राम्हण व ब्राम्हण्यवाद यातील फरक, सत्यशोधक समाज आणि शेतकरी-कामगार लढ्याची सुरुवाता असे विषय या नाटकात हाताळले गेले आहेत. नाटकाचा बाज हा सत्यशोधकी जलशाचा असून गाणी, नृत्य आणि नाट्य याद्वारे जोतिबा व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जीवनपट कलात्मकरीत्या उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे.’
18 व्या शतकातील जुनाट रुढी व ब्राम्हण्यवाद यावर जोतिबांनी कठोर प्रहार केले. उक्ती, लेखन, अखंड याद्वारेच नाही, तर त्या काळाच्या पार्श्वभूमीवर अचंबित वाटावा, असा प्रत्यक्ष व्यवहार करुन त्यांनी हे प्रहार केले. फुले पती-पत्नींचे हे कार्य केवळ अजोड आहे. मुलासाठी दुस-या लग्नाची वडिलांची सूचना जोतिबांनी तात्काळ नाकारलीच. पण मूल होत नाही म्हणून याच न्यायाने सावित्रीचे दुसरे लग्न केले तर चालेल का, असा खडा सवाल ते वडिलांना करतात. नाटकात हा प्रसंग आहे. ‘बायकोला दुसरा नवरा’ ही कल्पना आजही सहन करणे अशक्य आहे, हे लक्षात घेता जोतिबा काळाच्या किती पुढे होते, ते ध्यानात येते.
उक्ती व कृती जोतिबा-सावित्रीबाईंच्या बाबतील कायमच अभिन्न होती. ब्राम्हण स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या त्या काळात घरातील विधवा पुरुषी वासनेची बळी ठरत असे. अशाच बळी ठरलेल्या काशिबाई या ब्राम्हण विधवेचे बाळंतपण आपल्या घरी या पती-पत्नींनी केले. एवढेच नव्हे, तर तथाकथित ‘पापा’तून जन्माला आलेले हे मूल जोतिबा-सावित्रीबाईंनी दत्तक घेतले. या मुलाचे नाव यशवंत. हाही प्रसंग नाटकात आहे.
याचा पुढचा धागा सांगणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचे नाव ‘यशवंत’ ठेवून जोतिबांच्या विचारांचे आपण वारस असल्याचे जाहीर केले. जोतिबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या बाबासाहेबांनी जोतिबांना आपले गुरु मानले. आज आंबेडकरी समुदायात बाबासाहेबांच्या तसबिरीच्या शेजारी जोतिबांची तसबीर लावली जाते. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीत महात्मा फुलेंच्या विचारांना पुनःस्थापित करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.
आज जोतिबा व बाबासाहेब या दोहोंना हितसंबंधी मंडळी आपल्या सोयीसाठी वापरताना दिसतात. काहींनी ते आपल्या जातीचे म्हणून त्यांच्यावर मालकीही प्रस्थापित केली आहे. साधेपणाने करावयाचा सत्यशोधकी विवाह जोतिबांनी प्रचारला. सत्यनारायणाचा पर्दाफाश करुन त्यामागचे ब्राम्हणांचे कारस्थान उघडे पाडले. तथापि, आज जोतिबांच्या जातीचे व त्यांच्या नावाने संघटना चालवणारे मुखंड बिनदिक्कत भपकेबाज लग्ने व साग्रसंगीत सत्यनारायण घालताना दिसतात. परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्यातही एक विभाग या ‘मालकी’ तत्त्वाचा बळी झालेला दिसतो. आपल्या समाजातल्या बदलाचे नेतृत्व आपल्याच जातीतल्याचे असले पाहिजे, याबाबत तो दक्ष असतो. फारतर अन्य शोषित जातीसमूहातल्या सहका-याला तो सहन करतो. पूर्वाश्रमीच्या पुढारलेल्या जातीतल्या प्रागतिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दल तर तो सहनशीलही नसतो. काहींच्या मनात तर अशांविषयी विखार असतो. या विखाराने कैद मने मग आपल्या मुक्तिदात्यांनाही संकुचित करतात. बहुजनवादी साहित्य-कलेच्या प्रांतातही मग त्याचेच आविष्कार होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले दोघांनीही आपल्या हयातीत ब्राम्हणी वर्चस्वावर कठोर हल्ला करत असताना ब्राम्हण व ब्राम्हण्यवाद यातील फरक कटाक्षाने अधोरेखित केला होता. त्यांच्या या संग्रामात खुद्द ब्राम्हण समाजातूनही सहकारी त्यांना मिळाले होते. आपल्या जातीतल्यांचे शिव्याशाप, बहिष्कार सहन करुन ही मंडळी फुले-आंबेडकरांबरोबर राहिली. ‘सत्यशोधक’ नाटकाने याची ठळक नोंद घेतली, हे या नाटकाचे वैशिष्टय.
महामानव तोच जो अखिल मानवतेचा कनवाळू असतो. त्यांच्या मर्यादित आयुष्यक्रमात, मर्यादित भौगोलिक-सामाजिक क्षेत्रात त्यांना कराव्या लागणा-या शस्त्रक्रिया या स्थान-समाजविशिष्टच असतात. परंतु, त्यामागचा अवकाश हा व्यापक मानवतेचा असतो. अखेर सगळ्या मानवजातीतीतली जळमटे, कुरुपता नाहीशी होऊन ती सुंदर व्हावी, हेच त्यांचे अंतिम ध्येय असते. म्हणूनच जोतिबा आपल्या अखंडात म्हणतात-
ख्रिस्त महंमद ब्राम्हणांशी|धरावे पोटाशी बंधूपरी|
मानव भावंडे सर्व एक सहा|त्याजमध्ये आहा तुम्ही सर्व|
सांप्रतच्या जाणते-अजाणतेपणातून झाकोळलेल्या जोतिबांच्या ह्या महाकरुणेचा शोध घेऊन ‘सत्यशोधक’द्वारे तो उजागर केल्याबद्दल नाटकाच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार व अन्य सर्व सहका-यांना मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा !
- सुरेश सावंत
No comments:
Post a Comment