Tuesday, March 27, 2012

कष्टक-यांच्या ‘ख-याखु-या राज्या ’साठीची दिशा व वृत्ती देणारे नागनाथअण्णा

स्‍वातंत्र्यचळवळीच्‍या अखेरच्‍या टप्‍प्यातले जे अखेरचे मोजके सेनानी आज हयात आहेत, त्‍यातले एक बुलंद सेनानी पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्‍णा नायकवडी 22 मार्चला काळाच्‍या पडद्याआड गेले. देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतर स्‍वातंत्र्यसैनिकांपैकी काहीजण प्रचलित राजकारणात सहभागी झाले, तर अनेकजण पुढच्‍या राजकारणाचा बदलता पोत पाहून ‘आम्‍ही लढलो ते यासाठी नव्‍हे’ असे म्‍हणत एकतर निष्क्रिय झाले किंवा एखाद्या समाजसेवी कामात मग्‍न झाले. या दोहोंपेक्षा वेगळा मार्ग निवडणारे जे कोणी अल्‍प होते, त्‍यात नागनाथअण्‍णांचा समावेश होतो. 90 वर्षांच्‍या कृतार्थ आयुष्‍याची सांगता झालेल्‍या अण्‍णांच्‍या या वैशिष्‍ट्याची नोंद घेणे म्‍हणूनच आवश्‍यक आहे.

1922 साली शेतकरी कुटुंबात जन्‍माला आलेल्‍या अण्‍णांचे 7 वीपर्यंतचे शिक्षण वाळव्‍याला, पुढचे शिक्षण आष्‍टा व कोल्‍हापूरच्‍या प्रिन्‍स शिवाजी मराठा बोर्डिंगमधून झाले. इथूनच ते मॅट्रिक झाले. शालेय जीवनातच विद्यार्थ्‍यांना संघटित करणे, सेवादलात सहभागी होणे आदि उपक्रम करणा-या अण्‍णांनी मुंबईला 9 ऑगस्‍ट 42 च्‍या ‘चले जाव’च्‍या भारलेल्‍या वातावरणात जीवनदानी क्रांतिकार्यकर्ता म्‍हणून काम करण्‍याचा निर्णय घेतला. भगतसिंग, बाबू गेनू यांच्‍या बलिदानाचे प्रथमपासूनच आकर्षण असणा-या अण्‍णांनी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासारखी आझाद हिंद फौज उभी करण्‍यासाठी नानकसिंग व मनसासिंग या सुभाषबाबूंच्‍या दोन साथीदारांना पंजाब, दिल्‍लीमधून वाळव्‍याला आणले. क्रांतिसिंह नाना पाटलांच्‍या नेतृत्‍वाखाली वाळवा परिसरात प्रतिसरकारची उभारणी करुन गावगुंड, गुन्‍हेगार यांना जरब बसवली. चळवळीसाठी साधने मिळविण्‍यासाठी गोव्‍यातून हत्‍यारांची आयात, स्‍पेशल ट्रेन लूट, पोलिसांची हत्‍यारे पळवणे, धुळ्याचा साडेपाच लाखांचा खजिना लुटणे या साहसांतही त्‍यांचा पुढाकार होता. 1944 साली विश्‍वासघाताने अटक झाली असता सातारा तुरुंगातून 44 व्‍या दिवशी तटावरुन उडी मारुन त्‍यांनी पलायन केले. 46 साली ब्रिटिश पोलिसांशी आमनेसामने झुंज देताना जवळचे सहकारी किसन अहीर व नानकसिंग धारातीर्थी पडले. उरलेल्‍या सहका-यांसह त्‍यांच्‍या चितेसमोर अण्‍णांनी शपथ घेतली- कष्‍टक-यांचे खरेखुरे स्‍वराज्‍य येईपर्यंत चळवळीची ज्‍योत तेवत ठेवायची. अण्‍णांच्‍या अखेरच्‍या श्‍वासापर्यंत ही ज्‍योत धगधगताना आपल्‍याला दिसते.

देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतरही तेलंगण तसेच निझामविरोधी लढ्यात त्‍यांचा सहभाग राहिला. हत्‍यारे पुरविल्‍याच्‍या आरोपावरुन भारत सरकारचे वॉरंट निघाल्‍याने भूमिगतही व्‍हावे लागले. या काळातच वाळव्‍यात किसन अहीर विद्यालय, हुतात्‍मा नान‍कसिंग वसतिगृहाची त्यांनी स्‍थापना केली. 57 साली संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे ते आमदार झाले, पुढे 85 साली स्‍वतंत्र आमदार म्‍हणून निवडून आले. गोवा मुक्‍ती संग्राम, भूमिहिन शेतमजूर चळवळ, कष्‍टकरी शेतकरी शेतमजूर परिषद, दुष्‍काळी जनावरांचे कॅम्‍प, काळम्‍मावाडी, वारणा-कोयना धरणग्रस्‍तांचा लढा इ. अनेक लढे कष्‍टक-यांचे खरेखुरे स्‍वराज्‍य आणण्‍याच्‍या प्रेरणेने ते अखेरपर्यंत लढत राहिले

स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्रात सहकाराचे पर्व सुरु झाले. ग्रामीण महाराष्‍ट्रात विकासाचा एक क्रम सुरु झाला. पुढे त्‍यातूनच साखरसम्राटही तयार झाले. तथापि, यातल्‍या सहकाराची ताकद नागनाथअण्णांनी ओळखली. आपले क्रांतिकारी, लढाऊ वळण कायम ठेवून अण्‍णांनी या सहकारी चळवळीत एक विलक्षण हस्‍तक्षेप केला. त्‍यांनी हुतात्‍मा किसन अहीर सहकारी साखर कारखाना काढण्‍याचे ठरवले. परिसरातील दोन कारखान्‍यांत विशिष्‍ट अंतर असल्‍याशिवाय नव्‍या कारखान्‍याला परवानगी न मिळण्‍याचा नियम आडवा आला. त्‍यासाठी खूप संघर्ष करावा लागला. कॉ. दत्‍ता देशमुखांनी सहाय्य केले. अंतराऐवजी त्‍या क्षेत्रातली उसाची उपलब्‍धता पाहा, अशी दत्‍तांनी बाजू मांडली. कारखाना मंजूर झाला. अकरा महिन्‍यात कारखाना उभा राहिला.

नागनाथअण्‍णांचे झपाटलेपण ही काय चीज होती, त्‍याचे हा कारखाना म्‍हणजे मूर्तिमंत प्रतीक आहे. साखर उतारा, साखरेचा दर्जा, शेतक-यांना दर तसेच कामगारांना पगार, बोनस, सुखसोयी, ऊस तोडणी कामगारांची काळजी, परिसर विकास चळवळींना सहाय्य इ. बाबतीत केवळ 6 वर्षांत त्‍यांनी चमत्‍कार वाटावा, असे काम केले. ते किती बारकाईने लक्ष देत याचा नमुना म्‍हणून या सूचना पहा- रिकव्‍हरी वाढून साखरेचा दर्जा उत्‍तम मिळण्‍यासाठी ऊसतोड अत्‍यंत काळजीपूर्वक, तळातून घासून कशी होर्इल, याची खबरदारी घेणे, तुटलेला ऊस शेतात जास्‍त वेळ पडू न देणे तसेच गाडीतळावर जास्‍त साठू न देणे वगैरे.

संस्‍थापक म्‍हणून अण्‍णा कारखान्‍याचे अध्‍यक्ष होऊ शकत होते. पण ते सभासदही झाले नाहीत. अध्‍यक्ष होण्‍याचा प्रश्‍नच नव्‍हता. गावमान्‍यतेने गरीब मुलांची कामगार म्‍हणून भरती, गावमान्‍यतेनेच संचालकांची निवड, एका संचालकाला एकदाच निवडणुकीला उभे राहण्‍याची परवानगी, काटकसरीचे, सचोटीचे प्रशासन अशा अनेक विलक्षण वाटाव्‍या अशा गोष्‍टी अण्‍णांनी सुरु केल्‍या. कारखान्‍यामुळे जी संसाधने तयार झाली, त्‍याचा परिसरविकासासाठी उपयोग झालाच; पण अनेक चळवळींना खात्रीचा हात मिळाला. दलित, भटक्‍या, विमुक्‍त जमातींना तर अण्‍णा आपली भावकी मानत. या विभागांवर कोठे अन्‍याय होत असल्‍याची सूचना वाळव्‍याला फोनवर मिळताक्षणी त्‍यांच्‍या मदतीला अण्‍णा धावत असत. पाणी तसेच धरणग्रस्‍तांच्‍या चळवळीला अण्‍णांनी ऊर्जा दिली. साखर कारखान्‍याचा अध्‍यक्ष दलित करणे, खु्द्द वाळव्यात आंतरजातीय विवाह घडवणे हे अण्‍णांनी केले. वाळव्याला महिला परिषद भरवली. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्‍य संमेलन आयोजित केले. याच संमेलनात पुढे आलेल्‍या कल्‍पनेप्रमाणे महाराष्‍ट्रातील पुरोगामी चळवळींचा हक्‍काचा मंच म्‍हणून ‘अमर हुतात्‍मा’ हे साप्‍ताहिक सुरु केले. समग्र परिवर्तनासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वांगांनी भिडणारा चळवळीचा ‘हुतात्‍मा पॅटर्न’ ते तयार करत होते.

कष्‍टक-यांचे खरेखुरे राज्य आणण्‍यासाठी असे सर्वांगांनी भिडावे लागेल, हे तर ते मानतच, पण सर्व कष्‍टकरी एकवटला पाहिजे, ही तर असे राज्‍य आणण्‍याची पूर्वअट आहे, असेच त्‍यांना वाटे. कष्‍टक-यांच्‍या एका विभागाचा लढा लढत असताना ते त्‍या विभागाला त्‍याच्‍या सहोदर कष्‍टकरी विभागाशी जोडून घ्‍यायची जाणीव सतत देत असत. त्याचवेळी आपले काम चोख करुन संपत्‍ती निर्माण करण्‍याचे, विकास करण्‍याचे आवाहन करत असत. अण्‍णांनी राज्‍यभर दौरा काढून सं‍घटित केलेल्‍या 89 सालच्‍या निफाड येथील साखर कामगार परिषदेत साखर कामगारांना उद्देशून ते म्‍हणाले होते, ‘गावाकडे गेल्‍यावर आपल्‍या भागातील कष्‍टक-यांना एकत्र करा. आपल्‍या कारखान्‍यातील गोंधळ थांबवा. कोणाच्‍याही दडपणाला बळी पडू नका. साखर कारखाने उत्‍कृष्‍ट कसे चालतील ते तुम्‍ही पाहायला हवे. संपत्‍ती कष्‍टातून निर्माण होणार आहे. कष्‍टक-यांचे राज्‍य आल्‍यावर जे करु, ते आता करुया. विकास करुया. त्‍याने सरकारवर दबाव आणू. आपले प्रश्‍न आपण सोडवू. अखेर आपले राज्‍य निर्माण करु.’

कष्‍टक-यांच्‍या ‘ख-याखु-या राज्‍या’चे अस्तित्‍व अजूनही दूर असले तरी त्‍यासाठी लढणा-या कार्यकर्त्‍याची दिशा व वृत्‍ती हीच असावी लागेल. दिशा व वृत्‍तीची ही कायमस्‍वरुपी ठेव ठेवून जगाचा निरोप घेतलेल्‍या नागनाथ अण्‍णांच्‍या स्मृतीस अभिवादन.

- सुरेश सावंत (‘दिव्य मराठी, 26 मार्च 2012’)

No comments: