Friday, October 26, 2012

कार्यकर्त्‍याचे बदलते स्‍वरुप 'बदलणे' शक्‍य आहे


एक वयाने खूप ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते सोशल वर्क कॉलेजमध्‍ये पाहुणे म्‍हणून आले होतेत्‍यावेळी त्‍यांची ओळख करुन घेताना एका विद्यार्थ्‍याने त्‍यांना प्रश्‍न केला, ' सर, तुम्‍ही कोणत्‍या 'प्रोजेक्‍ट' वर काम करत होता ?' त्‍यांनी उत्‍तर दिले, 'मी देश स्‍वतंत्र करण्‍याच्‍या प्रोजेक्‍टवर काम करत होतो.'

एकदा माझा मोबाईल हरवला. दुसरे कार्ड काढण्‍यासाठी पोलिसांकडच्‍या नोंदीची गरज होती. पोलीस ठाण्‍यात गेलो. माझी माहिती एक तरुण कॉन्‍स्‍टेबल घेत होता. नाव, वय, पत्‍ता झाल्‍यावर त्‍याने विचारले- 'धंदा?' मी इमाने इतबारे पूर्णवेळ कार्यकर्ता, अमक्‍या प्रकारचे सामाजिक काम करतो वगैरे सांगितले. तो म्‍हणाला, 'म्‍हणजे धंदा/व्‍यवसाय करत नाही. 'बेकार' आहात.' मी परोपरीने समजावले, 'अहो, मी बेकार नाही. मी ठरवून नोकरी सोडली. मी शिक्षक होतो. माझी पत्‍नी नोकरी करुन घर सांभाळते. सामाजिक काम करण्‍यासाठी मी नोकरी करत नाही.' त्‍याला यातून काहीही स्‍पष्‍ट होत नव्‍हते. 'पूर्णवेळ कार्यकर्ता' अशी नोंद करा, हे माझे म्‍हणणे त्‍याला अखेर पटलेच नाही. तो वारंवार एवढेच म्‍हणत होता, 'तुम्‍ही नोकरी, व्‍यवसाय करत नाही, निवृत्‍त नाही, म्‍हणजे 'बेकार'.' अखेर मी हरलो. म्‍हणालो, 'ठीक आहे. लिहा तुम्‍हाला लिहायचे ते.'  त्‍याने लिहिले- 'बेकार'. माझ्या या 'बेकार' असण्‍याचा मोबाईलचे कार्ड मिळण्‍यावर मात्र काहीही परिणाम झाला नाही.

पूर्वी ओळखीत 'फुलटायमर' सांगितले की बहुतेकांना कळायचे. आता कळतच नाही, अशी स्थिती आहे. हळू हळू 'फुलटायमर' सांगणे मला थांबवावे लागले. मग जे काही सांगायचो, त्‍यातून काही म्‍हणायचे, 'म्‍हणजे तुम्‍ही 'एनजीओ'त काम करता.' मग मी 'एनजीओ'चे नाही, तर 'संघटने'चे काम करतो, असे समजावू लागलो. ते काही केल्‍या त्‍यांना कळेना. 'संघटना म्‍हणजे एनजीओच ना ?' असा त्‍यांचा प्रश्‍न असायचा. यानंतर मात्र एनजीओ व संघटना हा फरक सांगताना माझी फे फे उडायची. चमत्‍कारिक चेहरा करुन समोरचे अखेर गप्‍प व्‍हायचे. पण त्‍यांचे समाधान झालेले नसायचे. काही वेळा मी 'डाव्‍या पक्षाचा फुलटायमर' अशीही ओळख करुन द्यायचो. इथे 'डावे' काय, हे समोरच्‍याला कळायचे नाही. 'कम्‍युनिस्‍ट पक्ष' म्‍हणजे लाल बावटेवाले हे मात्र कळायचे. पण पक्षाचे काम 'फुलटाईम' करायचे असते, डाव्‍या पक्षांतील कार्यकर्त्‍यांचे मानधन हे संसार चालण्‍याइतके नसते, घर जोडीदाराला नोकरी करुनच सांभाळावे लागते, हे कळत नाही. प्रस्‍थापित पक्षांत नेत्‍याच्‍या अवतीभवती सबंध वेळ असणारे कार्यकर्ते हे एखादी इस्‍टेट एजंसी, एखादे रेशन दुकान इ. काहीतरी उपजीविकेचे साधन असलेलेच असतात. तसे काहीही तुमच्‍याकडे नाही आणि तरीही तुम्‍ही पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, हे पटत नाही. पक्षात लोक जातात ते काहीतरी प्रॉपर्टी करायलाच, असे भोवती दिसत असल्‍याने यांचेही काहीतरी न सांगण्‍यासारखे मिळकतीचे स्रोत असणार, असा ते अंदाज बांधतात. ... म्‍हणून हल्‍ली माणूस बघून मी ओळख सांगतो. 'बायको नोकरी करते, मी घरचे पाहातो, काही सामाजिक संघटनांच्‍या कामांत मदत करतो.' ...असे काहीही सांगतो. मग काहीजण 'व्‍हॉलंटरी रिटायर्डमेंट' घेतलीत का, असा प्रश्‍न करतात. तर काहीजण बहुधा नोकरी सुटलेली दिसते; अधिक विचारणे बरे नाही, अशा समजुतीने संवादातील चौकशीचा टप्‍पा थांबवतात.

19 व्‍या वर्षी शिक्षक झालो आणि पंचविसाव्‍या वर्षी नोकरी सोडून फुलटायमर झालो. लग्‍न चळवळीतच झाले. दोघेही कार्यकर्ते. आम्‍ही दोघेही फुलटायमरशिपला योग्‍य होतो. पण, अन्‍य काही घटकांचा विचार करुन फुलटायमरशिपचा निर्णय माझ्याबाबतीत झाला. असे आम्‍ही दोघेच नव्‍हतो. आमच्‍या वयाच्‍या अशा अनेक कार्यकर्ते जोडप्‍यांनी असेच निर्णय घेतले होते. एक फुलटायमर व एकाने नोकरी करणे. असे फुलटायमर होणे, हे कष्‍टाचे असले तरी समाधानाचे-अभिमानाचे होते. एका सुंदर समाजाच्‍या निर्मितीच्‍या ध्‍येयाकडचा तो मन उन्‍नत करणारा प्रवास होता. आजही आहे. फक्‍त त्‍यावेळी भोवतालच्‍यांना तो कळत होता. आज तो तितकासा कळत नाही. या न कळण्‍याचा त्रास करुन न घेता, बदलत्‍या पिढीचा बदलता समज लक्षात घेता, 'देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍याच्‍या प्रोजेक्‍टवर काम करत होतो', एवढे सहज सांगण्‍याची ताकद पहिल्‍या घटनेतील ज्‍येष्‍ठ कार्यकर्त्‍याप्रमाणे आपण बाणवण्‍याची गरज आहे, हे स्‍वतःला पटवत असतो.

हे असे का झाले? लोकांची कार्यकर्त्‍याकडे बघण्‍याची दृष्‍टी बदलली की कार्यकर्त्‍याचे स्‍वरुप बदलले

आमच्‍यासारख्‍या कार्यकर्त्‍यांचा खूप मोठा नसला तरी लक्षणीय प्रवाह होता. आता तो अपवाद होऊ लागला आहे. भोवताली कार्यकर्त्‍यांचे एक वेगळेच स्‍वरुप ठळकपणे लोकांच्‍या समोर येते. जे ठळक दिसते, तेच लोकांना कळते. तो मापदंड असतो. त्‍यावरुन ते इतरांचे मापन करतात. डावे, समाजवादी...असे उल्‍लेख भाषणात आले की समोरच्‍यांना 'समाजवादी' म्‍हणजे मुलायमसिंग-अबू आझमी समोर येतात. समोरच्‍या पिढीला समाजवादी पक्ष म्‍हणून त्‍यांचीच ओळख असते. 'पुरोगामी-प्रतिगामी' या संकल्‍पनाही कळत नाहीत.

म्‍हणजे, कार्यकर्ते बदलले म्‍हणून लोकांची दृष्‍टी बदलली. पण हे कार्यकर्ते एका सामाजिक प्रक्रियेचा भाग असतात. केवळ वैयक्तिक गुणावगुणांचा तो परिपाक नसतो. व्‍यक्‍ती व समष्‍टीच्‍या परस्‍पर क्रिया-प्रतिक्रियांचा तो परिणाम असतो. बदलत्‍या भौतिक-सामाजिक स्थितीचा वस्‍तुनिष्‍ठ, निरहंकारी वेध घेऊन त्‍याप्रमाणे चळवळीला कार्यक्रम देण्‍याची समज व धमक नेतृत्‍वाने दाखवणे आवश्‍यक असते. परिस्थिती पोषक असेल, तर चळवळ भरारते. अन्‍यथा, असलेल्‍या स्थितीत पुढे पुढे सरकावे लागते. किमान टिकून राहावे लागते. हे समुद्रप्रवासासारखे आहे. वा-याने साथ दिली तर बोटीला गती येते. नाहीतर सुकाणू धरुन धीमेपणाने जावे लागते. इथे कप्‍तान वा-याची साथ नाही, म्‍हणून आपले लक्ष्‍यस्‍थान बदलत नाही. चळवळीतील नेतृत्‍वाकडून हे भान अनेकदा सुटताना दिसते. काहीजण वारा बदलला की दिशाही बदलताना दिसतात. ध्‍येयाकडे कूच करताना नाईलाज म्‍हणून वळसा घेणे वेगळे आणि कायम लाटेवर राहण्‍यासाठी ध्‍येयच बदलणे वेगळे. यादृष्‍टीने पुरोगामी चळवळीचा प्रवास पाहिल्‍यास कार्यकर्त्‍याच्‍या बदलत्‍या स्‍वरुपाचा वेध अधिक नीट घेता येईल, असे वाटते.

मला आठवते. मी 9-10 वर्षांचा असेन. पँथरची चळवळ भरात होती. आमच्‍या वस्‍तीत राजा ढाले-नामदेव ढसाळांच्‍या जोरदार सभा, मोर्चे व्‍हायच्‍या. हे दोघे आमचे हिरो होते. 'जयभीम के नारे पे...' घोषणा सुरु झाल्‍या की रोम न् रोम शहारुन उठायचा. सगळं वातावरणच भारुन टाकणारं होतं. राजा ढालेंच्‍या राष्‍ट्रध्‍वजासंबंधीच्‍या 'साधने'तील लेखातील उल्‍लेखाचा आणि नामदेव ढसाळांच्‍या 'स्‍वातंत्र्य कुठच्‍या गाढविणीचं नाव आहे' या कवितेचा इतका प्रभाव होता, की मी शाळेत स्‍वातंत्र्य दिनाला काळी फीत लावून गेलो आहे. कितीतरी काळ राष्‍ट्रगीत म्‍हणायला मी नकार देत असे. नवीन समज आल्‍यावर हा प्रकार मी थांबवला. राजा-नामदेवसह सगळे पँथरचे पुढारी रात्री सभा झाली की तिथेच वस्‍तीत लोकांकडे जेवायचे. रात्री लोकल ट्रेन बंद झाल्‍याने तिथेच गप्‍पांचे फड सुरु व्‍हायचे. पहाटे पहिल्‍या ट्रेनने ही मंडळी परतायची.

पुढे पँथर दुभंगली. राजा ढालेंची मास मुव्‍हमेंट, अरुण कांबळे-रामदास आठवलेंची भारतीय दलित पँथर आणि नंतर आणखी ब-याच चिरफळ्या. प्रारंभ राजा-नामदेवच्‍या वैचारिक भूमिकांतल्‍या मतभेदाने झाला. त्‍या मतभेदालाही एक उंची होती. मात्र मतभेदाची जागा वैयक्तिक महत्‍त्‍वाकांक्षांनी व पुढे स्‍वार्थाने व परिणामी संधिसाधूपणाने घेतल्‍यानंतर आंबेडकरी चळवळीची दारुण वाताहत झाली. समाज बदलत होता. आम्‍हा झोपडपट्टीतल्‍या अर्धनग्‍न मुलांना आमचे निरक्षर आई-वडिल काबाडकष्‍ट करुन 'बाबासाहेब' बनवण्‍यासाठी शिकवत होते. त्‍या वंचित विश्‍वातही आमचे 'महारी लाड' करत होते. आणिबाणीत 'राहील त्‍याचे घर' झाल्‍याने आमची झोपडी आमची झाली. कॉ. डांगेंनी गिरणी कामगारांच्‍या लढाईतून मिळवलेल्‍या महागाई भत्‍त्‍याचे संरक्षण आमच्‍या पित्‍यांच्‍या पगारांना मिळू लागले. क्रयशक्‍ती वाढू लागली. हरितक्रांतीने अन्‍नधान्‍याची उपलब्‍धता वाढलीआम्‍ही शिकलो. नोक-या करु लागलो. सिडको-महाडात घरे 'बुक' करु लागलो. काहीजण 'टेन पर्सेंट'मधली घरे मिळवू लागले. यथावकाश आम्‍ही झोपडपट्टी सोडून फ्लॅटमध्‍ये राहायला आलो. मध्‍यमवर्गात गेलो. वस्‍तीशी संबंध कमी कमी होत गेला. आता आमची मुले बहुसांस्‍कृतिक अपार्टमेंट्समध्‍ये मोठी झाली. त्‍यांचा वस्‍ती, तिथली सांस्‍कृतिकता, आंबेडकरी चळवळीतल्‍या रक्‍त उसळविणा-या घोषणा, बुद्धविहारातल्‍या वंदना, जयंत्‍या, मिरवणुका यांच्‍याशी काहीही संबंध राहिला नाही. दरम्‍यान, वस्‍त्‍यातले हे वातावरणही बदलत गेले.

इथपर्यंतचे सर्व स्‍वाभाविक असे समजू शकतो. पण मुलांचे सोडा, माझ्यासारख्‍या बापांनी वस्‍तीशी संबंध का तोडावा ? त्‍या वस्‍तीत अजूनही आमचे लोक राहत आहेत. त्‍यांच्‍या विकासाची जबाबदारी मला माझी का नाही वाटत ? तेथील बुद्धविहारात किमान पौर्णिमेला मी वंदनेला का नाही जात ? तेथील शिक्षणात कमी पडणा-या मुलांना शिकविणे, पुढचे मार्ग सांगणे यासाठी मी प्रयत्‍न का नाही करत ? मी 'राखीव जागां'बाबत संवेदनशील असतो. त्‍याबाबत काही धोका जाणवला की वस्‍तीला हाक देतो- एक व्‍हा, आपल्‍यावर हल्‍ला होतो आहे. (हे काहीसे मुल्‍ला-मौलवींच्‍या 'मजहब खतरे में है' सारखे). पण वस्‍तीतली मुले राखीव जागांचा लाभ घेण्‍यासाठी दहावी-बारावी उत्‍तीर्णच होत नाहीत, त्‍यासाठी मी काही करत नाही. प्रश्‍न माझ्या मुलांचा असतो. वास्‍तविक माझ्या वडिलांच्‍या सामाजिक-आर्थिक मागासलेपणामुळे मला स्‍कॉलरशिप, सवलती घ्‍याव्‍या लागल्‍या. माझ्या मुलांच्‍याबाबतीत ही स्थिती नसतानाही मी जातीच्‍या आधारावरच्‍या सवलती बिनदिक्‍कत घेत असतो. या सवलती आपल्‍याच वर्गवारीतील आपल्‍यापेक्षा कमकुवत आर्थिक स्थितीतील समूहाला मिळायला हव्‍यात, यासाठीचा अंतर्गत सामाजिक न्‍याय मी करत नाही. याचे समर्थन वरचे सगळेच तसे करतात, असेही मी देतो. म्‍हणजे आमचे प्रस्‍थापित राजकीय, सांस्‍कृतिक नेते जे करतात, त्‍यालाच 'प्रस्‍थापित सरणं गच्‍छामी' म्‍हणत मी अनुसरत राहतो.

हे अजिबात स्‍वाभाविक नाही. हे पतन आहे. पण तेही मी बाबासाहेबांच्‍या प्रतिमेला साक्षी ठेवून करत असतो. कारण बाबासाहेबांना काय म्‍हणायचे आहे, याचे प्रवक्‍तेपण करण्‍याचा मक्‍ताही माझ्याकडेच असतो. या बदलातून नवा कार्यकर्ता उदयाला येतो. आधीचा घरादारावर नांगर फिरवून मराठवाडा विद्यापिठाच्‍या नामांतरासाठी गावोगावी भटकणारा, पोलिसांचा मार खाणारा, तुरुंगात जाणारा कार्यकर्ताच 'एवढं करुन काय मिळालं आम्‍हाला?' असा प्रश्‍न करुन नगरसेवकाचे तिकीट, एखादी रॉकेलची एजन्‍सी, एखादे रेशनचे दुकान मिळवायच्‍या खटपटीला लागतो. आपल्‍या नेत्‍याकडून झाले तर ठीक, नाहीतर प्रस्‍थापित कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीकडे जातो. तेथेही नाही झाले, तर ज्‍यांच्‍याशी ऐतिहासिक हाडवैर त्‍या भाजप-सेनेच्‍या नेत्‍यांच्‍या कच्‍छपि लागतो. आता तर, अधिकृतपणे रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष सेना-भाजपशी सोयरिक करतो आहे. आंबेडकरी चळवळीतला आजचा कार्यकर्ता या सगळ्याचा परिपाक आहे. वा-याची दिशा अनुकूल नाही, म्‍हणून दिशाच बदलण्‍याचा, ध्‍येयापासून च्‍युत होण्‍याचा हा परिणाम आहे.

स्‍वातंत्र्यानंतर विकास होतो आहे, हेच आमच्‍या डाव्‍या व समाजवाद्यांना फारसे कबूल नाही. हा विकास विषम आहे. पण गरीब अधिक गरीब होतो आहे, असा नाही. काहीजण वंचित राहत आहेत. पण अन्‍य गरीब समूह आधीच्‍या तुलनेत पुढे जात आहेत. लढाई 'गरीब अधिक गरीब होतो आहे' हे सिद्ध करण्‍यासाठी नव्‍हे, तर सम्‍यक, संतुलित विकासासाठी, या विकासातील न्‍याय्य वाट्यासाठी हवी. ही दिशा हरवल्‍याने डाव्‍या चळवळी कष्‍टक-यांच्‍या ट्रेन युनियन टाईप चळवळींपुरत्‍या मर्यादित झाल्‍या. शिवाय, समाजाचे 'आर्थिक-भौतिक'बरोबरच 'सामाजिक-सांस्‍कृतिक' अंग असते याचे भान न राहिल्‍याने आम्‍ही डावे समाजाला समग्रपणे भिडू शकलो नाही. जात, मराठी माणूस...या बाबी आमच्‍या अजेंड्यावर प्राधान्‍य मिळवूच शकल्‍या नाहीत. याचबरोबर, सूक्ष्‍म मतभेदांचा कीस काढताना समान किमान कार्यक्रमावर व्‍यापक एकजूट उभी करण्‍यातही आम्‍ही कमी पडलो. त्‍यामुळे अधिकाअधिक दुबळे झालो. प्रतिगामी शक्‍तींचे त्‍यामुळे फावले. आज एकजुटी होतात, त्‍या निवडणुका जवळ आल्‍यावर. मग 'मुलायसिंग यादवां'मध्‍ये प्रकाश कारतांना भावी पंतप्रधान दिसू लागतो. भाजपचा व डाव्‍यांचा भारत बंद योगायोगाने एकाच दिवशी होतो. बंदच्‍या सभेतही योगायोगाने भाजपचे नेते व डावे नेते एकत्र येतात व परस्‍परांना आलिंगन देतात. हा संधिसाधूपणा की दिवाळखोरी?

ज्‍यांना पुरोगामी चळवळी एकजुटीत नको होत्‍या, सबंध कष्‍टक-यांची एकजूट ज्‍यांना नको आहे, अशा शक्‍तींनी एनजीओंची भूछत्रे वाढवायला प्रारंभ केला. चळवळीची तीच गाणी गात, तीच झोळी, तोच झब्‍बा घालून ऐंशी-नव्‍वदीच्‍या दशकात पुरोगामी कार्यकर्ता फंडिंग घेऊन रिंगणात काम करु लागला. मोर्चे, घोषणा तशाच द्यायच्‍या पण आपल्‍या रिंगणात. दुस-याशी एकजूट नाही. चळवळीत तन, मन व धन हे ज्‍यांची चळवळ आहे, त्‍यांचेच हवे, तरच ती चळवळ स्‍वावलंबी व 'आमची' होते. अन्‍यथा कोणीतरी दाता व आम्‍ही उपकृत अशी अवस्‍था तयार होते. एनजीओंनी ते झाले. चळवळीचे मूळ व्‍यक्तित्‍व बिघडू नये, या मर्यादेत देणग्‍या घेणे वेगळे व मोठी प्रशिक्षण केंद्रे, गाड्या व परिषदांना देशात-परदेशात विमानाने प्रवास या फंडिंगमधूनच होणे वेगळे. पूर्वी आपल्‍या नेत्‍याला लोक वर्गणी काढून गाडी घेऊन देत, परदेशी प्रवासासाठी निधी उभारत. त्‍यात जे सत्‍व होते, ते आता हरवले आहे. प्रश्‍न विमान प्रवास, किती मानधन, किती सुविधा हा नसून 'स्‍वावलंबी लोकचळवळीचे' या क्रमात मातेरे होणे, हा आहे. एनजीओकरणाच्‍या मागच्‍या शक्‍तींना डावे झोडत असतात. पण आपल्‍या दिवाळखोर व्‍यवहाराने पुरोगामी चळवळीला जी दिशाहिनता आली, त्‍याचा 90 टक्‍के भाग यामागे आहे, हे सोयिस्‍करपणे विसरतात. 'चळवळी'चा 'प्रोजेक्‍ट' व्‍हायला (अण्‍णा-केजरीवालांच्‍या अराजकी आंदोलनालाहीआम्‍ही डावे, समाजवादी, आंबेडकरवादी अधिक जबाबदार आहोत. परस्‍परांतील मतभेद चर्चेत ठेवत समान कार्यक्रमावर निरहंकारी एकजुटीचा व्‍यवहार करत राहिलो असतो, तर ध्‍येयाप्रत नाही, निदान त्‍या दिशेने वल्‍हवत टिकून तरी राहिलो असतो. समाजासाठी काही करावेसे वाटणा-या कार्यकर्त्‍यांना एक ठळक पर्याय तरी दिसला असता. कार्यकर्त्‍याचे स्‍वरुप अधिकाधिक अधःपतित होत चालले आहे. एनजीओतही आता झोलाछाप कार्यकर्ता लोप पावत सुटाबुटातले 'एक्‍झीक्‍युटिव्‍ह' आले आहेत. राजकारणात एकेकाळचा विद्रोही डीक्‍लास कार्यकर्ता सफारी, अंगठ्या व गाडीधारी झाला आहे. राजा-नामदेवच्‍या जमान्‍यात परस्‍परांना अरेतुरे करणारी आत्‍मीय कॉम्रेडशीप जाऊन सगळ्यांनाच 'साहेब' उपाधी लागली आहे. एकट्या राजा ढालेंबाबत राजा ढाले आगे बढो... म्‍हटले की मलाच माझा गौरव झाल्‍याचा आनंद व्‍हायचा. राजा ढाले आमच्‍या अस्मितेचे प्रतीक असायचे. या सामूहिक अस्मितेच्‍या जागी आता खुजी स्‍वकेंद्रितता आली आहे. आमच्‍या प्रत्‍येकाचे नाव स्‍टेजवरच्‍या नेत्‍याने घेतलेच पाहिजे, नाहीतर मी नाराज होतो, अशी अवस्‍था आहेहे प्रस्‍थापितांतील अवगुणांचे अनुकरण आहे. तोच आमचा प्रतिष्‍ठेचा मानदंड झाला आहे. नव्‍या संस्‍कृतीचा उद्घोष करणारे आम्‍ही पुरोगामी प्रतिगामी मानदंडांचे कळत न कळत वहन करतो आहोत.

आजतरी हे असे आहे. हे बदलणे शक्‍य आहे? जरुर शक्‍य आहे. त्‍यासाठी ज्‍यांना हे बदलावे असे मनापासून वाटते, त्‍यांनी प्रथम बदलण्‍याचा निश्‍चय करायला हवा. एनजीओंना, प्रस्‍थापितांना शिव्‍या देऊन आपला आधार आज वाढणार नाही. एनजीओ-प्रस्‍थापितांत असलेल्‍या आपल्‍या कार्यकर्त्‍यांशी जवळीक साधणारा व्‍यवहार हवा. खूप सबुरी हवी. अजूनही पालापाचोळा पूर्ण वाळलेला नाही. भरारा आग लागेल, चळवळ पसरेल, अशी स्थिती नाही. आपल्‍या कष्‍टकरी-दलित विभागांतच अनेक आर्थिक स्‍तर (त्‍यामुळे हितसंबंध) तयार झालेत, हे लक्षात घेऊन डावपेच आखावे लागतील.

...या सगळ्याबाबत ठरवता येईल. पण सर्वात आधी ठरले पाहिजे ते - मी दांभिक होणार नाही. मी प्रस्‍थापितांच्‍या मूल्‍यांना शरण जाणार नाही. मी लोकानुनयीही होणार नाही. मी ध्‍येयधार्जिणा होईन. सगळा काफीला प्रचलित वाटेने पुढे निघून गेला तरी वळणावर मी एकटा ठामपणे उभा राहीन. परंतु, निग्रह व अहंता यात मी नक्‍की फरक करेन. अपरिहार्यता, डावपेच म्‍हणून वळसे मला मंजूर असतील, पण ध्‍येयापासून ढळणार नाही. बदलत्‍या परिस्थितीनुसार ध्‍येयाच्‍या तपशीलाची चिकित्‍सा करत आवश्‍यकतेनुसार ते अद्यावत मात्र करत राहीन. माझ्यासारख्‍या व्‍यक्‍तींचे जाणत्‍या योगदानाने तथापि, समष्‍टीच्‍या हालचालीनेच परिवर्तन घडणार आहे, हे मी मनोमनी पटवेन, त्‍यादृष्‍टीने संघटनेचे जाळे विणण्‍यात सहभागी होईन.

मला वाटते, यातूनच आजच्‍या कार्यकर्त्‍याच्‍या अधःपतित, दिशाहिन बदलाला सम्‍यकतेत बदलण्‍याची काहीएक शक्‍यता आहे.

ता. क. दीनदुबळ्या समाजाच्‍या विकासासाठी आयुष्‍य वेचणारे एकटे-दुकटे सेवाभावी कार्यकर्ते आजही महाराष्‍ट्रात तसेच देशात आहेत. त्‍यांच्‍याविषयी मला नितांत आदर आहे. तथापि, असे कार्यकर्ते त्‍या विशिष्‍ट गावात-वस्‍तीत-विभागात लोकजीवन सुखकर करत असले, तरी ज्‍याला समग्र राजकीय-सामाजिक व्‍यवस्‍था परिवर्तन म्‍हटले जाते, त्‍याविषयी त्‍यांची जाहीर भूमिका व हस्‍तक्षेप निदर्शनास येत नाही. म्‍हणून त्‍यांचा विचार वरच्‍या विवेचनात केलेला नाही.

- सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com
9892865937
(हा लेख 'त्रैमासिक अन्‍वीक्षण'च्‍या ऑक्‍टो-डिसें12 च्‍या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

Friday, October 12, 2012

माझा मित्र अवि (अशोक दाभाडे) याने 84-85 च्‍या दरम्‍यान केव्‍हातरी दिलेले ग्रीटिंग्स कार्ड




दलाई लामांची भेट, मॅक्‍लोडगंज, धर्मशाळा, 2003


दलाई लामांची भेट, मॅक्‍लोडगंज, धर्मशाळा, 2003


मी पाचवीचा वर्गशिक्षक, 85-86, मुक्‍तानंद हायस्‍कूल, चेंबूर


सहकारी शिक्षकांसोबत, 1985, स्‍वामी मुक्‍तानंद हायस्‍कूल, चेंबूर


काय मिळवितो मी गावी जाऊन ?


जुन्‍या दैनंदिनीतील 84 सालातील एका नोंदीतील हा उताराः 


Wednesday, October 3, 2012

आरक्षणाच्‍या प्रश्‍नावर सम्‍यक जागरण हवे

राज्‍यसभेत समाजवादी पक्ष व बसपा यांचे दोन खासदार मारामारीवर उतरले आणि पदोन्‍नतीतील आरक्षणाचा वाद अधिक चर्चेत आला. सरकार आणू पाहत असलेल्‍या 117 व्‍या घटनादुरुस्‍तीला सपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी मान्‍यता दिली होती. तथापि, सपाने घातलेल्‍या गोंधळानंतर द्रमुकने यात ओबीसींचाही समावेश असला पाहिजे, असा पवित्रा घेतला. ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून घेतल्‍याच्‍या व सपाने सरकारला पाठिंबा दिल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर या घटनादुरुस्‍तीचे आता काय होते ते पाहायचे. ओबीसींच्‍या समावेशासहित ही घटनादुरुस्‍ती होईल, असा काहींचा कयास आहे. तथापि, ज्‍या 16 (4ए) कलमात ही दुरुस्‍ती करावयाची आहे, त्‍या कलमातील मूळ तरतूद ही केवळ अनुसूचित जाती व जमातींसाठीचीच आहे. त्‍यामुळे ओबीसींच्‍या समावेशाचा मुद्दाच येत नाही, असे काहींना वाटते.

वादाचा धुरळा उडाला की, त्‍यात समजापसमजांचे अनेक कपटे तरंगू लागतात. तसेच इथेही झाले. दलित व आदिवासींना नोक-या लागतानाचे असलेले आरक्षण सरकार आता घटनादुरुस्‍ती करुन प्रथमच पदोन्‍नतीतही लागू करत आहे, हा असाच एक समज. 1955 पासून घटनेतील नोकरीतील आरक्षणासंबंधीचे कलम 16(4) अन्‍वये अनुसूचित जाती व जमातींना पदोन्‍नतीतील आरक्षण सुरु झाले. मंडलच्‍या वावटळीत 1992 च्‍या इंदिरा साहनी खटल्‍यात सर्वोच्‍च न्‍यायालयाने 16(4) या कलमात पदोन्‍नती हा शब्‍द नसल्‍याने त्‍या कलमाच्‍या मर्यादेबाहेर जाऊन हे आरक्षण देण्‍यात आल्‍याचे नमूद करुन ते रद्द केले. 1995 साली 77 वी घटनादुरुस्‍ती करुन सरकारने या कलमात 16 (4ए) ची भर घालून त्‍यात पदोन्‍नती असा स्‍पष्‍ट उल्‍लेख करुन पदोन्‍नतीतील आरक्षणाला संरक्षण दिले. 85 व्‍या घटनादुरुस्‍तीने 2001 साली आरक्षणाद्वारे पदोन्‍नती झालेल्‍यांना पुढील पदोन्‍नतीत आरक्षण मिळण्‍यासंबंधीची आणखी सुधारणा करण्‍यात आली. एम नागराज खटल्‍याच्‍या निकालात 2006 साली या घटनादुरुस्‍त्‍यांना न्‍यायालयाने मान्‍यता देत असतानाच काही अटींची पूर्तता करण्‍याच्‍या सूचना सरकारला केल्‍या. 50 टक्‍के आरक्षणाची मर्यादा, आरक्षण द्यावयाच्‍या घटकांचे मागासलेपण, आरक्षण द्यावयाच्‍या पदांवर त्‍यांचे पुरेसे प्रतिनिधीत्‍व नसणे तसेच सर्वसाधारण प्रशासकीय कार्यक्षमता राखणे या बाबींची खातरजमा करणे या त्‍या अटी होत्‍या. उत्‍तर प्रदेश सरकारने या अटींची पूर्तता न करता अशी आरक्षणे दिली असल्‍याने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने आणि नंतर सर्वोच्‍च न्‍यायालयाने यावर्षीच्‍या 27 एप्रिल रोजी यू. पी. पॉवर कॉर्पोरेशन विरुद्ध राजेश कुमार खटल्‍याचा निकाल देताना उत्‍तर प्रदेश सरकारच्‍या कायद्यातील संबंधित तरतूद, नियम व आदेश रद्दबातल ठरवले. पदोन्‍नतीतील आरक्षणाच्‍या मूळ तत्‍त्‍वाला विरोध न करता नागराज खटल्‍यातील वरील अटींची आठवण न्‍यायालयाने उत्‍तर प्रदेश सरकारला करुन दिली आहे.

ज्‍यांनी या अटींची पूर्तता केली आहे, अशा महाराष्‍ट्रासह अनेक राज्‍यांच्‍यामध्‍ये पदोन्‍नतीत दलित-आदिवासींना आरक्षण आहे. काही तज्‍ज्ञांच्‍या मते, या अटीच गैरलागू आहेत. उदा. हे आरक्षण अनुसूचित जाती व जमातींना असल्‍याने त्‍यांची संख्‍या 50 टक्‍क्यांपेक्षा जास्‍त व्‍हायचा संबंधच येत नाही. एकूण लोकसंख्‍येत हे दोन समुदाय 25 टक्‍क्‍यांच्‍या आसपासच आहेत (त्‍यांचे आरक्षण 22.5 टक्‍के - दलित 15 व आदिवासी 7.5 - इतकेच आहे). इंदिरा सहानी खटल्‍याच्‍या निवाड्यातील हा मुद्दा ओबीसींबाबत होता. तो इथे लावण्‍यात काही प्रयोजन नाही. अनुसूचित जातींबाबत मागासलेपण हा निकष नसून 'अस्‍पृश्‍यता' हा निकष घटनेत आहे. आदिवासींबाबत त्‍यांचे 'एकाकीपण' हा निकष आहे. अस्‍पृश्‍यता व एकाकीपणामुळे त्‍यांच्‍या विकासाचे मार्ग बंद झाले होते. ते घटनेने खुले केले. ते करत असताना त्‍यांचे पुरेसे प्रतिनिधीत्‍व नाही, हे घटनेत गृहीतच धरण्‍यात आलेले आहे. म्‍हणून या बाबतची खातरजमा करण्‍याची जबाबदारी या तरतुदीला आव्‍हान देणा-यांवरच टाकली पाहिजे, असे हे तज्‍ज्ञ म्‍हणतात. ज्‍या पदासाठी ते आरक्षण आहे, त्‍याची किमान गुणवत्‍ता त्‍या उमेदवाराची असतेच, मग प्रशासकीय कार्यक्षमता दलित-आदिवासींमुळेच कशी धोक्‍यात येईल, असा प्रश्‍नही हे तज्‍ज्ञ करतात. सरकारी प्रशासनाच्‍या कार्यक्षमतेबाबत एकूणच प्रश्‍नचिन्‍ह असताना ते दलित-आदिवासींनाच नेमके लावण्‍यात काय मतलब, अशीही विचारणा ते करतात.

आणि म्‍हणूनच, या अटी काढून टाकणारी घटनादुरुस्‍ती होणे त्‍यांना गरजेचे वाटते. सरकारची प्रस्‍तावित 117 वी घटनादुरुस्‍ती या दिशेने जाणारी आहे. मूळ कलम व दुरुस्‍तीसाठीचे प्रस्‍तावित कलम खाली दिले आहे. ते पाहिल्‍यावर हे लक्षात येईल.

मूळ कलमः

16[4A]... "Nothing in this article shall prevent the State from making any provision for reservation in matters of promotion, with consequential seniority, to any class or classes of posts in the services under the State in favour of the Scheduled Castes and Scheduled Tribes which, in the opinion of the State, are not adequately represented in the services under the State".

प्रस्‍तावित दुरुस्‍तीः

16[4A]... Notwithstanding anything contained elsewhere in the Constitution, the Scheduled Castes and the Scheduled Tribes notified under article 341 and 342, respectively, shall be deemed to be backward and nothing in this article or article 335 shall prevent the State from making any provision for reservation in matters of promotion, with consequential seniority, to any class or classes of posts in the services under the State in favour of the Scheduled Castes and Scheduled Tribes to the extent of the percentage of reservation provided to the Scheduled Castes and Scheduled Tribes in the services of the State.'

या दुरुस्‍तीतील adequately represented म्‍हणजेच पर्याप्‍त प्रतिनिधीत्‍वाची अट काढून टाकणे ही बाब भटक्‍या-विमुक्‍तांसारख्‍या अजूनही केंद्र सरकारातील आरक्षणाच्‍या कक्षेबाहेर असलेल्‍या घटकांच्‍या समावेशाच्‍या दृष्‍टीने धोक्‍याची ठरेल, असेही बोलले जाते.

पदोन्‍नतीतील आरक्षणाच्‍या वादातील हा वस्‍तुनिष्‍ठ तपशील पाहिल्‍यावर आता त्‍याच्‍या सामाजिक-राजकीय परिमाणांचा विचार करणे सोपे जाईल.

जन्‍मजात जातींची श्रेणीबद्ध रचना हे भारतीय समाजव्‍यवस्‍थेचे खास वैशिष्‍ट्य. कोणतेही वैयक्तिक कर्तृत्‍व अथवा दोष नसताना विशिष्‍ट जातीत जन्‍माला आल्‍यामुळे काहींना सन्‍मान व संपदा बहाल करण्‍यात आली, तर काहींच्‍या वाट्याला सामाजिक व भौतिक अवहेलना आली. ज्‍यांच्‍या स्‍पर्श व सावलीचाही विटाळ मानला गेला त्‍या अस्‍पृश्‍यांशी तर मनुष्‍यत्‍वाला काळीमा फासणारे वर्तन करण्‍यात आले. आदिवासींच्‍या वाट्याला अस्‍पृश्‍यता नाही, तथापि, नागर समाजाच्‍या बाहेरचे जंगलातील एकाकी वास्‍तव्‍य वाट्यास आल्‍याने सर्वसाधारण मानवी विकास प्रवाहापासूनही ते अलग पडले. काहींना प्रगतीचे तर काहींना अवनतीचे हे आरक्षण हजारो वर्षे होते. स्‍वतंत्र भारताने सबंध जनतेच्‍या विकासाची दिशा ठरवताना ज्‍यांच्‍या वाट्याला हजारो वर्षांचा अन्‍याय आला, त्‍यांना इतरांच्‍या बरोबरीने येण्‍यासाठी काही खास तरतुदी घटनेद्वारे बहाल केल्‍या. त्‍यातील आरक्षण ही एक व्‍यवस्‍था. आजचे आपण भारतीय नागरिक आपापल्‍या पूर्वजांनी हजारो वर्षे भोगलेल्‍या प्रगतीच्‍या अथवा अवनतीच्‍या आरक्षणाचे वारसदार आहोत, हे विसरता कामा नये. खास करुन प्रगतीच्‍या आरक्षणाच्‍या वारसदारांनी तर हे खास लक्षात ठेवले पाहिजे. आज ते जे आहेत, त्‍यामागे या दीर्घ आरक्षणाचा लाभ आहे, हे मनाला पटविले, तरच दलित-आदिवासींच्‍या अथवा अन्‍य सामाजिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांना दिल्‍या जाणा-या खास आरक्षणाचा तसेच सवलतींचा सहानुभू‍तीने व सम्‍यक समजाने विचार करणे शक्‍य होईल. तसेच ज्‍यांना हे खास संरक्षण व सहाय्य देण्‍यात येते आहे, त्‍या सामाजिकदृष्‍ट्या दुर्बल विभागातील लोकांनीही ही तात्‍पुरती व्‍यवस्‍था आहे व आपला समाजविभाग सर्वसाधारण समाजाच्‍या विकासाच्‍या पातळीपर्यंत येईपर्यंतच ती आहे, हे स्‍वतःला पटवले पाहिजे. ही वेळ लवकर येण्‍याचे प्रयत्‍न सर्व समाजाने करण्‍याची गरज आहे.

या अन्‍यायाचा हजारो वर्षांचा कालावधी लक्षात घेता, त्‍याच्‍या परिमार्जनाचा स्‍वतंत्र भारतातील 55-60 वर्षांचा काळ हा फार नव्‍हे. खरे तर, किती काळ यापेक्षाही या काळात हे पिडित विभाग सर्व समाजाच्‍या बरोबरीने कितपत आले, त्‍याचा लेखाजोखा आवश्‍यक आहे. डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी या वादाच्‍या दरम्‍यान एका इंग्रजी पत्राला मुलाखत देताना दिलेली आकडेवारी यादृष्‍टीने उद्बोधक आहे. ते म्‍हणतात, केंद्र सरकारच्‍या प्रशासनात 149 सचिवांमध्‍ये आज एकही दलित नाही. 108 अतिरिक्‍त सचिवांपैकी केवळ दोन, 477 संयुक्‍त सचिवांपैकी 31, तर 590 संचालकांपैकी फक्‍त 17 दलित समाजातल्‍या व्‍यक्‍ती आहेत. आदिवासींपैकी 4 जण सचिव आहेत, तथापि, उर्वरित पदश्रेणींमध्‍ये त्‍यांची संख्‍या अगदीच नगण्‍य आहे. अलिकडील एका अभ्‍यासाचा हवाला देऊन ते पुढे सांगतात, खाजगी कंपन्‍यांमधील 1000 संचालकांमध्‍ये 94 टक्‍के उच्‍चवर्णीय, 3 टक्‍के ओबीसी तर 3 टक्‍के दलित आहेत. याचा अर्थ, 68 टक्‍के (ओबीसी 50 टक्‍के व दलित 18 टक्‍के) लोकसंख्‍येच्‍या विभागाला केवळ 6 टक्‍क्‍यांवर समाधान मागावे लागत आहे. या मागचे कारण, या समाजविभागातील व्‍यक्‍ती कार्यक्षम व गुणवान असू शकत नाहीत, ही मनोधारणा असल्‍याचे डॉ. मुणगेकरांनी नमूद केले आहे.

पदोन्‍नतीतील आरक्षणाचा प्रश्‍न जिथे येतो, त्‍या उच्‍च पदांसंबंधीची ही आकडेवारी पाहिल्‍यास केवळ नोकरीच्‍या प्रवेशावेळचे आरक्षण पुरेसे नसून पदोन्‍नतीच्‍या प्रत्‍येक पातळीवरील आरक्षणाचे समर्थन करावे लागेल. दैनंदिन जीवनात आपल्‍या भोवताली जे दलित समाजातले एखाद-दोन बडे अधिकारी दिसतात, त्‍यावरुन तो सबंध समाजच जणू पुढच्‍या पातळीपर्यंत आला आहे, असा समज सवर्ण समाजाने करुन घेता कामा नये. सवर्ण समाजाला अजून एक गोष्‍ट खटकते. आणि ती रास्‍त आहे. ती म्‍हणजे, हे बडे अधिकारी आपल्‍या मुलांनाही या आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी खटपट करताना दिसतात. वास्‍तविक, या विभागातील ज्‍या व्‍यक्‍ती सर्वसाधारण समाजाची पातळी ओलांडून पुढे गेल्‍या असतील, त्‍यांनी स्‍वतःहून हे आरक्षण वा सवलत नाकारणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे, त्‍या वर्गवारीतील निम्‍न आर्थिक स्‍तरातील व्‍यक्‍तींना त्‍या जागा उपलब्‍ध होऊन अंतर्गत सामाजिक न्‍याय होईल. ओबीसींना लावण्‍यात आलेली क्रिमी लेयरची अट दलित-आदिवासींनाही लागू करा, अशी मागणी होते आहे. मात्र, सबंध देशातील दलित-आदिवासींच्‍या प्रगतीचा थर या मागणीच्‍या समर्थनाइतका वर गेलेला नाही. शिवाय, दलित आदिवासींचे आरक्षण हे आर्थिक मागासलेपणावर निर्भर नसून त्‍यांच्‍या वाट्याला आलेली सामाजिक अवहेलना हा या आरक्षणाचा आधार आहे. या सामाजिक अवहेलनेमुळे विकासाच्‍या सर्वच अंगांवर त्‍यांना मागे राहावे लागले. आर्थिक व शैक्षणिकदृष्‍ट्या वरच्‍या थरातील दलितालाही त्‍याच्‍या जातीच्‍या तथाकथित खालच्‍या स्‍थानामुळे विशिष्‍ट पदावर तेथील उच्‍च्‍पदस्‍थांच्‍या सवर्ण मानसिकतेमुळे नाकारले जाऊ शकते. जाते. डॉ. मुणगेकरांची आकडेवारी हेच दर्शवते. म्‍हणून, आज तरी दलित-आदिवासींमधील पुढारलेल्‍या व्‍यक्‍तींनी वैयक्त्‍िाक पातळीवर स्‍वतःहून आरक्षण व सवलती नाकारणे आवश्‍यक आहे. यामुळे अंतर्गत सामाजिक न्‍याय तर हाईलच. शिवाय सवर्ण समाजालाही त्‍यातून चांगला संदेश जाईल.

दलित-आदिवासींमध्‍ये आरक्षणामुळे व खास सवलतींमुळे काय फरक पडला याबाबत अनेक अभ्‍यास सध्‍या होत आहेत. या अभ्‍यासांतून दलित-आदिवासींपैकी काही व्‍यक्‍तींचा विकास झाला हे नक्‍की, परंतु, त्‍यांच्‍या समाजाच्‍या विकासात या आरक्षण व खास सवलतींपेक्षाही देशातील सर्वसाधारण विकासाचा अधिक वाटा असल्‍याचे काही अभ्‍यासक नमूद करत आहेत. याचा अर्थ, राखीव जागांना प्रतीकात्‍मक महत्‍वच अधिक आहे. आमचा माणूस कलेक्‍टर झाला, यातून जी प्रेरणा व ऊर्जा त्‍या समाजाला मिळते, ती हजारो वर्षे नागवला गेलेला तो समाजच जाणू शकतो.

सरकारी नोक-या कमी होणे व शिक्षणाचे झपाट्याने खाजगीकरण होण्‍याच्‍या या काळात या आरक्षणाचा प्रतीकात्‍मक पैस अधिकच आकसत जाणार आहे. ही बाब, पदोन्‍नतीतील आरक्षणाच्‍या समर्थक मायावती व विरोधक मुलायमसिंग यांना ठाऊक नाही का ? त्‍यांनाच काय भाजप, काँग्रेस सगळयांनाच चांगली ठाऊक आहे. पदोन्‍नतीतील आरक्षणासंबंधीच्‍या या आधीच्‍या घटनादुरुस्‍त्‍या कॉंग्रेस तसेच भाजपच्‍या सत्‍ताकाळातही झाल्‍या आहेत. जवळपास इतर सर्व पक्षांनी त्‍यास नेहमीच पाठिंबा दिला आहे. काही वेळा तर संसदेत फारशी चर्चा न होताच त्‍या मंजूर झाल्‍या आहेत. भारतातील स्‍वातंत्र्य चळवळ व सामाजिक सुधारणांची चळवळ या दोहोंच्‍या मंथनातून निर्माण झालेल्‍या मूल्‍यांवर भारतीय राज्‍यघटना अधिष्ठित आहे. या मूल्‍यांच्‍या आदरापोटी हे पक्ष पाठिंबा देतात, हे गृहीत धरावेच लागेल. तथापि, असलेल्‍या नोक-यांच्‍यातच वाटप करायचे असल्‍याने फारशी तोशीस न घेताही ज्‍या वर्गाच्‍या नावाने हे आरक्षण द्यायचे आहे, त्‍याच्‍या मतांची सहानुभू‍ती मिळवता येते. दिवसेंदिवस आकसत जाणा-या नोक-यांमधील आरक्षण व खास सवलतींच्‍या पलीकडे जाऊन दुर्बल विभागाकडे विशेष लक्ष देऊन सबंध समाजाचा गतीने विकास करण्‍यासंबंधीची धोरणे केद्र तसेच राज्‍य सरकारांत जिथे कोठे हे राजकीय पक्ष असतील, तिथे त्‍यांनी घ्‍यायला हवीत. हा अधिक जबाबदारीचा व्‍यवहार होईल. आरक्षणाचे समर्थक व विरोधक म्‍हणून संसदेत एकमेकांच्‍या अंगावर जाणे हा त्‍या त्‍या समाजविभागांची मते आरक्षित करण्‍यासाठीचा बेजबाबदार संधिसाधूपणा आहे. या लघुदृष्‍टीतून या राजकीय पक्षांना बाहेर काढण्‍यासाठी समाजातल्‍या दलित, आदिवासी, ओबीसी तसेच उच्‍चवर्णीय सूज्ञ मंडळींनी आरक्षणाच्‍या प्रश्‍नावर आपापल्‍या समाजात सम्‍यक जागरण करणे आवश्‍यक आहे.

- सुरेश सावंत

इंदुकाकींशी असलेले एक वैयक्तिक नाते

मी राजकीय-सामाजिक कार्यकर्ता असलो, तरी इंदुकाकींच्‍या राजकीय-सामाजिक जीवनाचा मला जवळून परिचय नाही. तसेच त्‍यांच्‍याशी तसा नियमित संपर्कही नव्‍हता. त्‍यामुळे त्‍याविषयी बोलणे हे इतरांच्‍या अनुभवावरुन बोलणे होईल. इंदुकाकींशी असलेले नाते हे वैयक्तिक, तथापि राजकीय-सामाजिक संदर्भ असलेले होते. या नात्‍याचे तपशील खूप नसले तरी ते अत्‍यंत 'जिव्‍हाळ्या'चे होते, एवढे नक्‍की.
इंदुकाकींशी पहिली भेट कोल्‍हापूरला 1989 साली झाली. शिक्षकाच्‍या नोकरीचा राजीनामा देऊन लाल निशाण पक्षाचा मी पूर्णवेळ कार्यकर्ता झालो होतो. घरी आई-वडिल व धाकटा भाऊ यांची जबाबदारी होतीच. वाळव्‍याला नागनाथ अण्‍णा काढत असलेल्‍या साप्‍ताहिकाचे काम पाहण्‍यासाठी मला एस. के. लिमयेंनी पाठविले. याबाबतच्‍या व्‍यावहारिक बाबींची सर्व स्‍पष्‍टता झालीच होती असे नाही. माझे नुकतेच लग्‍न झाले होते. त्‍याच वर्षी मी एम.. तर पत्‍नी सुवर्णा बी.. झाली होती. तिला पुढे शिकायचे होते. अर्थात, हे शिक्षण कोल्‍हापूरलाच होणार होते. त्‍यामुळे वाळवा व कोल्‍हापूर राहणे व प्रवास याचे काही ठरवणे गरजेचे होते. मी 25 वर्षांचा तर सुवर्णा 23 वर्षांची. घरच्‍यांचा विरोध पत्‍करुन आंतरजातीय विवाह केलेला. दोघेही आम्‍ही चळवळीतले. तथापि, मुंबईसारख्‍या शहरात वाढलेले. ग्रामीण जीवनाचा तसा खास परिचय नसलेले. हा वैयक्तिक तपशील मुद्दाम देत आहे. कारण त्‍याशिवाय इंदुकाकींचे आम्‍हा उभयतांच्‍या जीवनातले महत्‍व लक्षात येणार नाही.
सुवर्णाने कोल्‍हापूरला एम.एस.डब्‍ल्‍यूच्‍या अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेतला. प्रारंभी वाळव्‍याहून कोल्‍हापूरला रोज प्रवास करुन पाहिला. परंतु, ते कठीण जाऊ लागले. मग कॉलेजच्‍याच वसतिगृहात ती राहू लागली. आणि दोन-तीन महिन्‍यांतच राजकीय-व्‍याव‍हारिक कारणांनी मला वाळवा सोडून मुंबईस परतावे लागले. एकत्र संसार करता यावा, यासाठी मुंबईऐवजी कोल्‍हापूरला शिकायचा निर्णय घेतलेल्‍या सुवर्णाला पुढची दोन वर्षे एकटीने कोल्‍हापूरला काढावी लागली.
ज्‍या मानसिक स्थितीतून आम्‍ही या काळात जात होतो, त्‍याचा बोध मुंबईचे भाऊ फाटक वगळता आमच्‍या अन्‍य ज्‍येष्‍ठ कॉम्रेड्सना किती होत होता, याची कल्‍पना नाही. कारण तसे ते कधी व्‍यक्‍त झाले नाहीत. मात्र, एक व्‍यक्‍ती कोल्‍हापूरला हे सगळे जाणून आमच्‍या ठाम पाठीशी उभी राहिली ती म्‍हणजे इंदुकाकी.
इदुकाकींच्‍या पहिल्‍या भेटीतच आम्‍हाला जाणवले की, त्‍यांना आमची मनःस्थिती बरोबर कळते आहे. सुवर्णाला पुढची दोन वर्षे त्‍यांचे घर म्‍हणजे माहेरच होते. इंदुकाकींची माया अकृत्रिम होती. त्‍यावेळच्‍या घालमेलीत पुढे न शिकता मुंबईला परत यावे, असा एक निर्णय सुवर्णाने घेतला होता. त्‍यावेळी तिची समजून काढणे, ऐकत नाही म्‍हटल्‍यानंतर मुंबईला पाठवणी करणे व निर्णय बदलून कोल्‍हापूरला परत आल्‍यावर शिक्षण पूर्ण होईपर्यंत आधार देणे हे इंदुकाकींनी केले. राजकीय कारणाने झालेली परंतु वैयक्तिकरित्‍या सोसावी लागलेली ही घालमेल, ताण सुसह्य होण्‍यात इंदुकाकींचा आधार कळीचा होता.
सुवर्णाला इदुकाकी लेक म्‍हणत आणि म्‍हणून मी जावई. काहीसा भिडस्‍त स्‍वभाव असलेला मी इंदुकाकींच्‍या घरी मात्र हक्‍काने उतरत असे व पाहुणचार घेत असे. इंदुकाकींच्‍या खळाळत्‍या झ-यासारख्‍या पारदर्शक, मोकळ्या-ढाकळ्या फटकळ व लाघवी व्‍यक्तिमत्‍वाच्‍या सहवासात राहणे हा तसाच मोकळा आनंद होता. जीवनराव व इंदुकाकींना स्‍वतःचे अपत्‍य नव्‍हते. हे सांगितल्‍यावरच कळायचे व नंतर लक्षातही राहायचे नाही. कारण त्‍यांचे घर कोठल्‍याही लेकुरवाळ्या घरापेक्षा अधिक भरलेले व नांदते होते. पुतणे, पुतण्‍या, अन्‍य नात्‍यागोत्‍याच्‍या मुलंमुली, घरकामासाठीच्‍या मुली ही सगळीच त्‍यांची अपत्‍ये असायची. त्‍यांची नातीसुद्धा सांगितल्‍यावरच कळायची. त्‍यांच्‍या राहत्‍या वसाहतीच्‍या म्‍हणजे राजेंद्र नगराच्‍या आसपासच्‍या झोपडपट्टीतील लोकांशी त्‍यांचे जे संबंध मला दिसायचे, तेही अशाच मोकळ्या नात्‍याचे असायचे. त्‍यांची विचारपूस, अडीनडीला मदतीस जाणे हा माणसांची असोशी असलेल्‍या इंदुकाकींचा श्‍वासच होता.
एखाद्याने काही चांगले केले, की त्‍याचा सतत प्रचार त्‍या करत. 'जीवनरावांना स्‍वातंत्र्य सैनिकाचे पेन्‍श्‍ान सुरेश-सुवर्णामुळे सुरु झाले,' असे त्‍या सांगत असल्‍याचे कानावर आल्‍यावर प्रथम तर काहीच कळेना. नंतर लक्षात आले, केव्‍हातरी एकदा त्‍यांच्‍या सांगण्‍यावरुन 'पुढारी'च्‍या कचेरीत जाऊन प्रजा परिषदेच्‍या आंदोलनातील जीवनरावांच्‍या सहभागाविषयीच्‍या बातम्‍यांचे संदर्भ आम्‍ही आणले होते. यात आमचे कर्तृत्‍व ते काय ? पण इदुकाकींच्‍या बोलण्‍यावरुन एखाद्याला वाटावे, अरे किती मोठे काम यांनी केले !
जीवनरावांच्‍या इंदुकाकी खरोखर अर्धांगिनी होत्‍या. म्‍हणजे, इंदुकाकींमुळेच जीवनराव संपूर्ण होते. इंदुकाकींशिवाय जीवनरावांची कल्‍पनाच करता यायची नाही, इतके ते इंदुकाकींशी अभिन्‍न होते. जीवनराव गेल्‍यावर मात्र इंदुकाकीही एकट्या झाल्‍याचे जाणवू लागले. त्‍या आता अधिक वेगाने सामाजिक काम करु लागल्‍या, त्‍यांचे मनुष्‍य वेल्‍हाळपण कायम होते. वय, आजार वाढत होते. आमचे कोल्‍हापूरला येणे फार क्‍वचित असायचे. तथापि, पक्ष बैठकांना मुंबईला त्‍या भेटत. तेच मोकळे, मायेचे हसू आणि चौकशी. त्‍यांच्‍या शेवटच्‍या आजारातून त्‍या उठल्‍यावर कोल्‍हापूरला त्‍यांची भेट झाली. तेव्‍हा आता त्‍या शारीरिकदृष्‍ट्या थकल्‍या आहेत, हे जाणवले. पण उमेद, माया, मोकळा फटकळपणा चिरतरुणच होता.
त्‍यांचे आजारातून उठणे फार काळ टिकले नाही. काही दिवसांतच अचानक त्‍या गेल्‍याची बातमी आली. जुने प्रसंग, त्‍यांचे आमच्‍या आयुष्‍याच्‍या एका वळणावरचे आधार देणे या स्‍मृतींनी वेदना झाल्‍या. तथापि, दुस-यांना आनंद देत स्‍वतःही आनंदी राहून एक कृतार्थ आयुष्‍य त्‍या जगल्‍या हे समाधान मनात ठसवायचा प्रयत्‍न केला. शोकसभेला कोल्‍हापूरला आल्‍यावर आता ते हक्‍काचे घर कायमचे बंद झाले, ही कळ मात्र खोलवर ठसठसून गेली.
- सुरेश सावंत
'मुराळी'साठी लिहिलेला लेख