Friday, October 26, 2012

कार्यकर्त्‍याचे बदलते स्‍वरुप 'बदलणे' शक्‍य आहे


एक वयाने खूप ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते सोशल वर्क कॉलेजमध्‍ये पाहुणे म्‍हणून आले होतेत्‍यावेळी त्‍यांची ओळख करुन घेताना एका विद्यार्थ्‍याने त्‍यांना प्रश्‍न केला, ' सर, तुम्‍ही कोणत्‍या 'प्रोजेक्‍ट' वर काम करत होता ?' त्‍यांनी उत्‍तर दिले, 'मी देश स्‍वतंत्र करण्‍याच्‍या प्रोजेक्‍टवर काम करत होतो.'

एकदा माझा मोबाईल हरवला. दुसरे कार्ड काढण्‍यासाठी पोलिसांकडच्‍या नोंदीची गरज होती. पोलीस ठाण्‍यात गेलो. माझी माहिती एक तरुण कॉन्‍स्‍टेबल घेत होता. नाव, वय, पत्‍ता झाल्‍यावर त्‍याने विचारले- 'धंदा?' मी इमाने इतबारे पूर्णवेळ कार्यकर्ता, अमक्‍या प्रकारचे सामाजिक काम करतो वगैरे सांगितले. तो म्‍हणाला, 'म्‍हणजे धंदा/व्‍यवसाय करत नाही. 'बेकार' आहात.' मी परोपरीने समजावले, 'अहो, मी बेकार नाही. मी ठरवून नोकरी सोडली. मी शिक्षक होतो. माझी पत्‍नी नोकरी करुन घर सांभाळते. सामाजिक काम करण्‍यासाठी मी नोकरी करत नाही.' त्‍याला यातून काहीही स्‍पष्‍ट होत नव्‍हते. 'पूर्णवेळ कार्यकर्ता' अशी नोंद करा, हे माझे म्‍हणणे त्‍याला अखेर पटलेच नाही. तो वारंवार एवढेच म्‍हणत होता, 'तुम्‍ही नोकरी, व्‍यवसाय करत नाही, निवृत्‍त नाही, म्‍हणजे 'बेकार'.' अखेर मी हरलो. म्‍हणालो, 'ठीक आहे. लिहा तुम्‍हाला लिहायचे ते.'  त्‍याने लिहिले- 'बेकार'. माझ्या या 'बेकार' असण्‍याचा मोबाईलचे कार्ड मिळण्‍यावर मात्र काहीही परिणाम झाला नाही.

पूर्वी ओळखीत 'फुलटायमर' सांगितले की बहुतेकांना कळायचे. आता कळतच नाही, अशी स्थिती आहे. हळू हळू 'फुलटायमर' सांगणे मला थांबवावे लागले. मग जे काही सांगायचो, त्‍यातून काही म्‍हणायचे, 'म्‍हणजे तुम्‍ही 'एनजीओ'त काम करता.' मग मी 'एनजीओ'चे नाही, तर 'संघटने'चे काम करतो, असे समजावू लागलो. ते काही केल्‍या त्‍यांना कळेना. 'संघटना म्‍हणजे एनजीओच ना ?' असा त्‍यांचा प्रश्‍न असायचा. यानंतर मात्र एनजीओ व संघटना हा फरक सांगताना माझी फे फे उडायची. चमत्‍कारिक चेहरा करुन समोरचे अखेर गप्‍प व्‍हायचे. पण त्‍यांचे समाधान झालेले नसायचे. काही वेळा मी 'डाव्‍या पक्षाचा फुलटायमर' अशीही ओळख करुन द्यायचो. इथे 'डावे' काय, हे समोरच्‍याला कळायचे नाही. 'कम्‍युनिस्‍ट पक्ष' म्‍हणजे लाल बावटेवाले हे मात्र कळायचे. पण पक्षाचे काम 'फुलटाईम' करायचे असते, डाव्‍या पक्षांतील कार्यकर्त्‍यांचे मानधन हे संसार चालण्‍याइतके नसते, घर जोडीदाराला नोकरी करुनच सांभाळावे लागते, हे कळत नाही. प्रस्‍थापित पक्षांत नेत्‍याच्‍या अवतीभवती सबंध वेळ असणारे कार्यकर्ते हे एखादी इस्‍टेट एजंसी, एखादे रेशन दुकान इ. काहीतरी उपजीविकेचे साधन असलेलेच असतात. तसे काहीही तुमच्‍याकडे नाही आणि तरीही तुम्‍ही पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, हे पटत नाही. पक्षात लोक जातात ते काहीतरी प्रॉपर्टी करायलाच, असे भोवती दिसत असल्‍याने यांचेही काहीतरी न सांगण्‍यासारखे मिळकतीचे स्रोत असणार, असा ते अंदाज बांधतात. ... म्‍हणून हल्‍ली माणूस बघून मी ओळख सांगतो. 'बायको नोकरी करते, मी घरचे पाहातो, काही सामाजिक संघटनांच्‍या कामांत मदत करतो.' ...असे काहीही सांगतो. मग काहीजण 'व्‍हॉलंटरी रिटायर्डमेंट' घेतलीत का, असा प्रश्‍न करतात. तर काहीजण बहुधा नोकरी सुटलेली दिसते; अधिक विचारणे बरे नाही, अशा समजुतीने संवादातील चौकशीचा टप्‍पा थांबवतात.

19 व्‍या वर्षी शिक्षक झालो आणि पंचविसाव्‍या वर्षी नोकरी सोडून फुलटायमर झालो. लग्‍न चळवळीतच झाले. दोघेही कार्यकर्ते. आम्‍ही दोघेही फुलटायमरशिपला योग्‍य होतो. पण, अन्‍य काही घटकांचा विचार करुन फुलटायमरशिपचा निर्णय माझ्याबाबतीत झाला. असे आम्‍ही दोघेच नव्‍हतो. आमच्‍या वयाच्‍या अशा अनेक कार्यकर्ते जोडप्‍यांनी असेच निर्णय घेतले होते. एक फुलटायमर व एकाने नोकरी करणे. असे फुलटायमर होणे, हे कष्‍टाचे असले तरी समाधानाचे-अभिमानाचे होते. एका सुंदर समाजाच्‍या निर्मितीच्‍या ध्‍येयाकडचा तो मन उन्‍नत करणारा प्रवास होता. आजही आहे. फक्‍त त्‍यावेळी भोवतालच्‍यांना तो कळत होता. आज तो तितकासा कळत नाही. या न कळण्‍याचा त्रास करुन न घेता, बदलत्‍या पिढीचा बदलता समज लक्षात घेता, 'देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍याच्‍या प्रोजेक्‍टवर काम करत होतो', एवढे सहज सांगण्‍याची ताकद पहिल्‍या घटनेतील ज्‍येष्‍ठ कार्यकर्त्‍याप्रमाणे आपण बाणवण्‍याची गरज आहे, हे स्‍वतःला पटवत असतो.

हे असे का झाले? लोकांची कार्यकर्त्‍याकडे बघण्‍याची दृष्‍टी बदलली की कार्यकर्त्‍याचे स्‍वरुप बदलले

आमच्‍यासारख्‍या कार्यकर्त्‍यांचा खूप मोठा नसला तरी लक्षणीय प्रवाह होता. आता तो अपवाद होऊ लागला आहे. भोवताली कार्यकर्त्‍यांचे एक वेगळेच स्‍वरुप ठळकपणे लोकांच्‍या समोर येते. जे ठळक दिसते, तेच लोकांना कळते. तो मापदंड असतो. त्‍यावरुन ते इतरांचे मापन करतात. डावे, समाजवादी...असे उल्‍लेख भाषणात आले की समोरच्‍यांना 'समाजवादी' म्‍हणजे मुलायमसिंग-अबू आझमी समोर येतात. समोरच्‍या पिढीला समाजवादी पक्ष म्‍हणून त्‍यांचीच ओळख असते. 'पुरोगामी-प्रतिगामी' या संकल्‍पनाही कळत नाहीत.

म्‍हणजे, कार्यकर्ते बदलले म्‍हणून लोकांची दृष्‍टी बदलली. पण हे कार्यकर्ते एका सामाजिक प्रक्रियेचा भाग असतात. केवळ वैयक्तिक गुणावगुणांचा तो परिपाक नसतो. व्‍यक्‍ती व समष्‍टीच्‍या परस्‍पर क्रिया-प्रतिक्रियांचा तो परिणाम असतो. बदलत्‍या भौतिक-सामाजिक स्थितीचा वस्‍तुनिष्‍ठ, निरहंकारी वेध घेऊन त्‍याप्रमाणे चळवळीला कार्यक्रम देण्‍याची समज व धमक नेतृत्‍वाने दाखवणे आवश्‍यक असते. परिस्थिती पोषक असेल, तर चळवळ भरारते. अन्‍यथा, असलेल्‍या स्थितीत पुढे पुढे सरकावे लागते. किमान टिकून राहावे लागते. हे समुद्रप्रवासासारखे आहे. वा-याने साथ दिली तर बोटीला गती येते. नाहीतर सुकाणू धरुन धीमेपणाने जावे लागते. इथे कप्‍तान वा-याची साथ नाही, म्‍हणून आपले लक्ष्‍यस्‍थान बदलत नाही. चळवळीतील नेतृत्‍वाकडून हे भान अनेकदा सुटताना दिसते. काहीजण वारा बदलला की दिशाही बदलताना दिसतात. ध्‍येयाकडे कूच करताना नाईलाज म्‍हणून वळसा घेणे वेगळे आणि कायम लाटेवर राहण्‍यासाठी ध्‍येयच बदलणे वेगळे. यादृष्‍टीने पुरोगामी चळवळीचा प्रवास पाहिल्‍यास कार्यकर्त्‍याच्‍या बदलत्‍या स्‍वरुपाचा वेध अधिक नीट घेता येईल, असे वाटते.

मला आठवते. मी 9-10 वर्षांचा असेन. पँथरची चळवळ भरात होती. आमच्‍या वस्‍तीत राजा ढाले-नामदेव ढसाळांच्‍या जोरदार सभा, मोर्चे व्‍हायच्‍या. हे दोघे आमचे हिरो होते. 'जयभीम के नारे पे...' घोषणा सुरु झाल्‍या की रोम न् रोम शहारुन उठायचा. सगळं वातावरणच भारुन टाकणारं होतं. राजा ढालेंच्‍या राष्‍ट्रध्‍वजासंबंधीच्‍या 'साधने'तील लेखातील उल्‍लेखाचा आणि नामदेव ढसाळांच्‍या 'स्‍वातंत्र्य कुठच्‍या गाढविणीचं नाव आहे' या कवितेचा इतका प्रभाव होता, की मी शाळेत स्‍वातंत्र्य दिनाला काळी फीत लावून गेलो आहे. कितीतरी काळ राष्‍ट्रगीत म्‍हणायला मी नकार देत असे. नवीन समज आल्‍यावर हा प्रकार मी थांबवला. राजा-नामदेवसह सगळे पँथरचे पुढारी रात्री सभा झाली की तिथेच वस्‍तीत लोकांकडे जेवायचे. रात्री लोकल ट्रेन बंद झाल्‍याने तिथेच गप्‍पांचे फड सुरु व्‍हायचे. पहाटे पहिल्‍या ट्रेनने ही मंडळी परतायची.

पुढे पँथर दुभंगली. राजा ढालेंची मास मुव्‍हमेंट, अरुण कांबळे-रामदास आठवलेंची भारतीय दलित पँथर आणि नंतर आणखी ब-याच चिरफळ्या. प्रारंभ राजा-नामदेवच्‍या वैचारिक भूमिकांतल्‍या मतभेदाने झाला. त्‍या मतभेदालाही एक उंची होती. मात्र मतभेदाची जागा वैयक्तिक महत्‍त्‍वाकांक्षांनी व पुढे स्‍वार्थाने व परिणामी संधिसाधूपणाने घेतल्‍यानंतर आंबेडकरी चळवळीची दारुण वाताहत झाली. समाज बदलत होता. आम्‍हा झोपडपट्टीतल्‍या अर्धनग्‍न मुलांना आमचे निरक्षर आई-वडिल काबाडकष्‍ट करुन 'बाबासाहेब' बनवण्‍यासाठी शिकवत होते. त्‍या वंचित विश्‍वातही आमचे 'महारी लाड' करत होते. आणिबाणीत 'राहील त्‍याचे घर' झाल्‍याने आमची झोपडी आमची झाली. कॉ. डांगेंनी गिरणी कामगारांच्‍या लढाईतून मिळवलेल्‍या महागाई भत्‍त्‍याचे संरक्षण आमच्‍या पित्‍यांच्‍या पगारांना मिळू लागले. क्रयशक्‍ती वाढू लागली. हरितक्रांतीने अन्‍नधान्‍याची उपलब्‍धता वाढलीआम्‍ही शिकलो. नोक-या करु लागलो. सिडको-महाडात घरे 'बुक' करु लागलो. काहीजण 'टेन पर्सेंट'मधली घरे मिळवू लागले. यथावकाश आम्‍ही झोपडपट्टी सोडून फ्लॅटमध्‍ये राहायला आलो. मध्‍यमवर्गात गेलो. वस्‍तीशी संबंध कमी कमी होत गेला. आता आमची मुले बहुसांस्‍कृतिक अपार्टमेंट्समध्‍ये मोठी झाली. त्‍यांचा वस्‍ती, तिथली सांस्‍कृतिकता, आंबेडकरी चळवळीतल्‍या रक्‍त उसळविणा-या घोषणा, बुद्धविहारातल्‍या वंदना, जयंत्‍या, मिरवणुका यांच्‍याशी काहीही संबंध राहिला नाही. दरम्‍यान, वस्‍त्‍यातले हे वातावरणही बदलत गेले.

इथपर्यंतचे सर्व स्‍वाभाविक असे समजू शकतो. पण मुलांचे सोडा, माझ्यासारख्‍या बापांनी वस्‍तीशी संबंध का तोडावा ? त्‍या वस्‍तीत अजूनही आमचे लोक राहत आहेत. त्‍यांच्‍या विकासाची जबाबदारी मला माझी का नाही वाटत ? तेथील बुद्धविहारात किमान पौर्णिमेला मी वंदनेला का नाही जात ? तेथील शिक्षणात कमी पडणा-या मुलांना शिकविणे, पुढचे मार्ग सांगणे यासाठी मी प्रयत्‍न का नाही करत ? मी 'राखीव जागां'बाबत संवेदनशील असतो. त्‍याबाबत काही धोका जाणवला की वस्‍तीला हाक देतो- एक व्‍हा, आपल्‍यावर हल्‍ला होतो आहे. (हे काहीसे मुल्‍ला-मौलवींच्‍या 'मजहब खतरे में है' सारखे). पण वस्‍तीतली मुले राखीव जागांचा लाभ घेण्‍यासाठी दहावी-बारावी उत्‍तीर्णच होत नाहीत, त्‍यासाठी मी काही करत नाही. प्रश्‍न माझ्या मुलांचा असतो. वास्‍तविक माझ्या वडिलांच्‍या सामाजिक-आर्थिक मागासलेपणामुळे मला स्‍कॉलरशिप, सवलती घ्‍याव्‍या लागल्‍या. माझ्या मुलांच्‍याबाबतीत ही स्थिती नसतानाही मी जातीच्‍या आधारावरच्‍या सवलती बिनदिक्‍कत घेत असतो. या सवलती आपल्‍याच वर्गवारीतील आपल्‍यापेक्षा कमकुवत आर्थिक स्थितीतील समूहाला मिळायला हव्‍यात, यासाठीचा अंतर्गत सामाजिक न्‍याय मी करत नाही. याचे समर्थन वरचे सगळेच तसे करतात, असेही मी देतो. म्‍हणजे आमचे प्रस्‍थापित राजकीय, सांस्‍कृतिक नेते जे करतात, त्‍यालाच 'प्रस्‍थापित सरणं गच्‍छामी' म्‍हणत मी अनुसरत राहतो.

हे अजिबात स्‍वाभाविक नाही. हे पतन आहे. पण तेही मी बाबासाहेबांच्‍या प्रतिमेला साक्षी ठेवून करत असतो. कारण बाबासाहेबांना काय म्‍हणायचे आहे, याचे प्रवक्‍तेपण करण्‍याचा मक्‍ताही माझ्याकडेच असतो. या बदलातून नवा कार्यकर्ता उदयाला येतो. आधीचा घरादारावर नांगर फिरवून मराठवाडा विद्यापिठाच्‍या नामांतरासाठी गावोगावी भटकणारा, पोलिसांचा मार खाणारा, तुरुंगात जाणारा कार्यकर्ताच 'एवढं करुन काय मिळालं आम्‍हाला?' असा प्रश्‍न करुन नगरसेवकाचे तिकीट, एखादी रॉकेलची एजन्‍सी, एखादे रेशनचे दुकान मिळवायच्‍या खटपटीला लागतो. आपल्‍या नेत्‍याकडून झाले तर ठीक, नाहीतर प्रस्‍थापित कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीकडे जातो. तेथेही नाही झाले, तर ज्‍यांच्‍याशी ऐतिहासिक हाडवैर त्‍या भाजप-सेनेच्‍या नेत्‍यांच्‍या कच्‍छपि लागतो. आता तर, अधिकृतपणे रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष सेना-भाजपशी सोयरिक करतो आहे. आंबेडकरी चळवळीतला आजचा कार्यकर्ता या सगळ्याचा परिपाक आहे. वा-याची दिशा अनुकूल नाही, म्‍हणून दिशाच बदलण्‍याचा, ध्‍येयापासून च्‍युत होण्‍याचा हा परिणाम आहे.

स्‍वातंत्र्यानंतर विकास होतो आहे, हेच आमच्‍या डाव्‍या व समाजवाद्यांना फारसे कबूल नाही. हा विकास विषम आहे. पण गरीब अधिक गरीब होतो आहे, असा नाही. काहीजण वंचित राहत आहेत. पण अन्‍य गरीब समूह आधीच्‍या तुलनेत पुढे जात आहेत. लढाई 'गरीब अधिक गरीब होतो आहे' हे सिद्ध करण्‍यासाठी नव्‍हे, तर सम्‍यक, संतुलित विकासासाठी, या विकासातील न्‍याय्य वाट्यासाठी हवी. ही दिशा हरवल्‍याने डाव्‍या चळवळी कष्‍टक-यांच्‍या ट्रेन युनियन टाईप चळवळींपुरत्‍या मर्यादित झाल्‍या. शिवाय, समाजाचे 'आर्थिक-भौतिक'बरोबरच 'सामाजिक-सांस्‍कृतिक' अंग असते याचे भान न राहिल्‍याने आम्‍ही डावे समाजाला समग्रपणे भिडू शकलो नाही. जात, मराठी माणूस...या बाबी आमच्‍या अजेंड्यावर प्राधान्‍य मिळवूच शकल्‍या नाहीत. याचबरोबर, सूक्ष्‍म मतभेदांचा कीस काढताना समान किमान कार्यक्रमावर व्‍यापक एकजूट उभी करण्‍यातही आम्‍ही कमी पडलो. त्‍यामुळे अधिकाअधिक दुबळे झालो. प्रतिगामी शक्‍तींचे त्‍यामुळे फावले. आज एकजुटी होतात, त्‍या निवडणुका जवळ आल्‍यावर. मग 'मुलायसिंग यादवां'मध्‍ये प्रकाश कारतांना भावी पंतप्रधान दिसू लागतो. भाजपचा व डाव्‍यांचा भारत बंद योगायोगाने एकाच दिवशी होतो. बंदच्‍या सभेतही योगायोगाने भाजपचे नेते व डावे नेते एकत्र येतात व परस्‍परांना आलिंगन देतात. हा संधिसाधूपणा की दिवाळखोरी?

ज्‍यांना पुरोगामी चळवळी एकजुटीत नको होत्‍या, सबंध कष्‍टक-यांची एकजूट ज्‍यांना नको आहे, अशा शक्‍तींनी एनजीओंची भूछत्रे वाढवायला प्रारंभ केला. चळवळीची तीच गाणी गात, तीच झोळी, तोच झब्‍बा घालून ऐंशी-नव्‍वदीच्‍या दशकात पुरोगामी कार्यकर्ता फंडिंग घेऊन रिंगणात काम करु लागला. मोर्चे, घोषणा तशाच द्यायच्‍या पण आपल्‍या रिंगणात. दुस-याशी एकजूट नाही. चळवळीत तन, मन व धन हे ज्‍यांची चळवळ आहे, त्‍यांचेच हवे, तरच ती चळवळ स्‍वावलंबी व 'आमची' होते. अन्‍यथा कोणीतरी दाता व आम्‍ही उपकृत अशी अवस्‍था तयार होते. एनजीओंनी ते झाले. चळवळीचे मूळ व्‍यक्तित्‍व बिघडू नये, या मर्यादेत देणग्‍या घेणे वेगळे व मोठी प्रशिक्षण केंद्रे, गाड्या व परिषदांना देशात-परदेशात विमानाने प्रवास या फंडिंगमधूनच होणे वेगळे. पूर्वी आपल्‍या नेत्‍याला लोक वर्गणी काढून गाडी घेऊन देत, परदेशी प्रवासासाठी निधी उभारत. त्‍यात जे सत्‍व होते, ते आता हरवले आहे. प्रश्‍न विमान प्रवास, किती मानधन, किती सुविधा हा नसून 'स्‍वावलंबी लोकचळवळीचे' या क्रमात मातेरे होणे, हा आहे. एनजीओकरणाच्‍या मागच्‍या शक्‍तींना डावे झोडत असतात. पण आपल्‍या दिवाळखोर व्‍यवहाराने पुरोगामी चळवळीला जी दिशाहिनता आली, त्‍याचा 90 टक्‍के भाग यामागे आहे, हे सोयिस्‍करपणे विसरतात. 'चळवळी'चा 'प्रोजेक्‍ट' व्‍हायला (अण्‍णा-केजरीवालांच्‍या अराजकी आंदोलनालाहीआम्‍ही डावे, समाजवादी, आंबेडकरवादी अधिक जबाबदार आहोत. परस्‍परांतील मतभेद चर्चेत ठेवत समान कार्यक्रमावर निरहंकारी एकजुटीचा व्‍यवहार करत राहिलो असतो, तर ध्‍येयाप्रत नाही, निदान त्‍या दिशेने वल्‍हवत टिकून तरी राहिलो असतो. समाजासाठी काही करावेसे वाटणा-या कार्यकर्त्‍यांना एक ठळक पर्याय तरी दिसला असता. कार्यकर्त्‍याचे स्‍वरुप अधिकाधिक अधःपतित होत चालले आहे. एनजीओतही आता झोलाछाप कार्यकर्ता लोप पावत सुटाबुटातले 'एक्‍झीक्‍युटिव्‍ह' आले आहेत. राजकारणात एकेकाळचा विद्रोही डीक्‍लास कार्यकर्ता सफारी, अंगठ्या व गाडीधारी झाला आहे. राजा-नामदेवच्‍या जमान्‍यात परस्‍परांना अरेतुरे करणारी आत्‍मीय कॉम्रेडशीप जाऊन सगळ्यांनाच 'साहेब' उपाधी लागली आहे. एकट्या राजा ढालेंबाबत राजा ढाले आगे बढो... म्‍हटले की मलाच माझा गौरव झाल्‍याचा आनंद व्‍हायचा. राजा ढाले आमच्‍या अस्मितेचे प्रतीक असायचे. या सामूहिक अस्मितेच्‍या जागी आता खुजी स्‍वकेंद्रितता आली आहे. आमच्‍या प्रत्‍येकाचे नाव स्‍टेजवरच्‍या नेत्‍याने घेतलेच पाहिजे, नाहीतर मी नाराज होतो, अशी अवस्‍था आहेहे प्रस्‍थापितांतील अवगुणांचे अनुकरण आहे. तोच आमचा प्रतिष्‍ठेचा मानदंड झाला आहे. नव्‍या संस्‍कृतीचा उद्घोष करणारे आम्‍ही पुरोगामी प्रतिगामी मानदंडांचे कळत न कळत वहन करतो आहोत.

आजतरी हे असे आहे. हे बदलणे शक्‍य आहे? जरुर शक्‍य आहे. त्‍यासाठी ज्‍यांना हे बदलावे असे मनापासून वाटते, त्‍यांनी प्रथम बदलण्‍याचा निश्‍चय करायला हवा. एनजीओंना, प्रस्‍थापितांना शिव्‍या देऊन आपला आधार आज वाढणार नाही. एनजीओ-प्रस्‍थापितांत असलेल्‍या आपल्‍या कार्यकर्त्‍यांशी जवळीक साधणारा व्‍यवहार हवा. खूप सबुरी हवी. अजूनही पालापाचोळा पूर्ण वाळलेला नाही. भरारा आग लागेल, चळवळ पसरेल, अशी स्थिती नाही. आपल्‍या कष्‍टकरी-दलित विभागांतच अनेक आर्थिक स्‍तर (त्‍यामुळे हितसंबंध) तयार झालेत, हे लक्षात घेऊन डावपेच आखावे लागतील.

...या सगळ्याबाबत ठरवता येईल. पण सर्वात आधी ठरले पाहिजे ते - मी दांभिक होणार नाही. मी प्रस्‍थापितांच्‍या मूल्‍यांना शरण जाणार नाही. मी लोकानुनयीही होणार नाही. मी ध्‍येयधार्जिणा होईन. सगळा काफीला प्रचलित वाटेने पुढे निघून गेला तरी वळणावर मी एकटा ठामपणे उभा राहीन. परंतु, निग्रह व अहंता यात मी नक्‍की फरक करेन. अपरिहार्यता, डावपेच म्‍हणून वळसे मला मंजूर असतील, पण ध्‍येयापासून ढळणार नाही. बदलत्‍या परिस्थितीनुसार ध्‍येयाच्‍या तपशीलाची चिकित्‍सा करत आवश्‍यकतेनुसार ते अद्यावत मात्र करत राहीन. माझ्यासारख्‍या व्‍यक्‍तींचे जाणत्‍या योगदानाने तथापि, समष्‍टीच्‍या हालचालीनेच परिवर्तन घडणार आहे, हे मी मनोमनी पटवेन, त्‍यादृष्‍टीने संघटनेचे जाळे विणण्‍यात सहभागी होईन.

मला वाटते, यातूनच आजच्‍या कार्यकर्त्‍याच्‍या अधःपतित, दिशाहिन बदलाला सम्‍यकतेत बदलण्‍याची काहीएक शक्‍यता आहे.

ता. क. दीनदुबळ्या समाजाच्‍या विकासासाठी आयुष्‍य वेचणारे एकटे-दुकटे सेवाभावी कार्यकर्ते आजही महाराष्‍ट्रात तसेच देशात आहेत. त्‍यांच्‍याविषयी मला नितांत आदर आहे. तथापि, असे कार्यकर्ते त्‍या विशिष्‍ट गावात-वस्‍तीत-विभागात लोकजीवन सुखकर करत असले, तरी ज्‍याला समग्र राजकीय-सामाजिक व्‍यवस्‍था परिवर्तन म्‍हटले जाते, त्‍याविषयी त्‍यांची जाहीर भूमिका व हस्‍तक्षेप निदर्शनास येत नाही. म्‍हणून त्‍यांचा विचार वरच्‍या विवेचनात केलेला नाही.

- सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com
9892865937
(हा लेख 'त्रैमासिक अन्‍वीक्षण'च्‍या ऑक्‍टो-डिसें12 च्‍या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

1 comment:

Dhananjay said...

सुरेशकाका,
आपला लेख आवडला