मी
राजकीय-सामाजिक
कार्यकर्ता असलो, तरी
इंदुकाकींच्या राजकीय-सामाजिक
जीवनाचा मला जवळून परिचय नाही.
तसेच त्यांच्याशी
तसा नियमित संपर्कही नव्हता.
त्यामुळे
त्याविषयी बोलणे हे इतरांच्या
अनुभवावरुन बोलणे होईल.
इंदुकाकींशी
असलेले नाते हे वैयक्तिक,
तथापि राजकीय-सामाजिक
संदर्भ असलेले होते. या
नात्याचे तपशील खूप नसले
तरी ते अत्यंत 'जिव्हाळ्या'चे
होते, एवढे
नक्की.
इंदुकाकींशी
पहिली भेट कोल्हापूरला 1989
साली झाली.
शिक्षकाच्या
नोकरीचा राजीनामा देऊन लाल
निशाण पक्षाचा मी पूर्णवेळ
कार्यकर्ता झालो होतो.
घरी आई-वडिल
व धाकटा भाऊ यांची जबाबदारी
होतीच. वाळव्याला
नागनाथ अण्णा काढत असलेल्या
साप्ताहिकाचे काम पाहण्यासाठी
मला एस. के.
लिमयेंनी
पाठविले. याबाबतच्या
व्यावहारिक बाबींची सर्व
स्पष्टता झालीच होती असे
नाही. माझे
नुकतेच लग्न झाले होते.
त्याच वर्षी
मी एम.ए.
तर पत्नी
सुवर्णा बी.ए.
झाली होती.
तिला पुढे
शिकायचे होते. अर्थात,
हे शिक्षण
कोल्हापूरलाच होणार होते.
त्यामुळे
वाळवा व कोल्हापूर राहणे व
प्रवास याचे काही ठरवणे गरजेचे
होते. मी
25 वर्षांचा
तर सुवर्णा 23 वर्षांची.
घरच्यांचा
विरोध पत्करुन आंतरजातीय
विवाह केलेला. दोघेही
आम्ही चळवळीतले. तथापि,
मुंबईसारख्या
शहरात वाढलेले. ग्रामीण
जीवनाचा तसा खास परिचय नसलेले.
हा वैयक्तिक
तपशील मुद्दाम देत आहे.
कारण त्याशिवाय
इंदुकाकींचे आम्हा उभयतांच्या
जीवनातले महत्व लक्षात येणार
नाही.
सुवर्णाने
कोल्हापूरला एम.एस.डब्ल्यूच्या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश
घेतला. प्रारंभी
वाळव्याहून कोल्हापूरला
रोज प्रवास करुन पाहिला.
परंतु,
ते कठीण जाऊ
लागले. मग
कॉलेजच्याच वसतिगृहात ती
राहू लागली. आणि
दोन-तीन
महिन्यांतच राजकीय-व्यावहारिक
कारणांनी मला वाळवा सोडून
मुंबईस परतावे लागले.
एकत्र संसार
करता यावा, यासाठी
मुंबईऐवजी कोल्हापूरला
शिकायचा निर्णय घेतलेल्या
सुवर्णाला पुढची दोन वर्षे
एकटीने कोल्हापूरला काढावी
लागली.
ज्या
मानसिक स्थितीतून आम्ही या
काळात जात होतो, त्याचा
बोध मुंबईचे भाऊ फाटक वगळता
आमच्या अन्य ज्येष्ठ
कॉम्रेड्सना किती होत होता,
याची कल्पना
नाही. कारण
तसे ते कधी व्यक्त झाले
नाहीत. मात्र,
एक व्यक्ती
कोल्हापूरला हे सगळे जाणून
आमच्या ठाम पाठीशी उभी राहिली
ती म्हणजे इंदुकाकी.
इदुकाकींच्या
पहिल्या भेटीतच आम्हाला
जाणवले की, त्यांना
आमची मनःस्थिती बरोबर कळते
आहे. सुवर्णाला
पुढची दोन वर्षे त्यांचे घर
म्हणजे माहेरच होते.
इंदुकाकींची
माया अकृत्रिम होती.
त्यावेळच्या
घालमेलीत पुढे न शिकता मुंबईला
परत यावे, असा
एक निर्णय सुवर्णाने घेतला
होता. त्यावेळी
तिची समजून काढणे, ऐकत
नाही म्हटल्यानंतर मुंबईला
पाठवणी करणे व निर्णय बदलून
कोल्हापूरला परत आल्यावर
शिक्षण पूर्ण होईपर्यंत आधार
देणे हे इंदुकाकींनी केले.
राजकीय कारणाने
झालेली परंतु वैयक्तिकरित्या
सोसावी लागलेली ही घालमेल,
ताण सुसह्य
होण्यात इंदुकाकींचा आधार
कळीचा होता.
सुवर्णाला
इदुकाकी लेक म्हणत आणि म्हणून
मी जावई. काहीसा
भिडस्त स्वभाव असलेला मी
इंदुकाकींच्या घरी मात्र
हक्काने उतरत असे व पाहुणचार
घेत असे. इंदुकाकींच्या
खळाळत्या झ-यासारख्या
पारदर्शक, मोकळ्या-ढाकळ्या
फटकळ व लाघवी व्यक्तिमत्वाच्या
सहवासात राहणे हा तसाच मोकळा
आनंद होता. जीवनराव
व इंदुकाकींना स्वतःचे अपत्य
नव्हते. हे
सांगितल्यावरच कळायचे व
नंतर लक्षातही राहायचे नाही.
कारण त्यांचे
घर कोठल्याही लेकुरवाळ्या
घरापेक्षा अधिक भरलेले व
नांदते होते. पुतणे,
पुतण्या,
अन्य
नात्यागोत्याच्या मुलंमुली,
घरकामासाठीच्या
मुली ही सगळीच त्यांची अपत्ये
असायची. त्यांची
नातीसुद्धा सांगितल्यावरच
कळायची. त्यांच्या
राहत्या वसाहतीच्या म्हणजे
राजेंद्र नगराच्या आसपासच्या
झोपडपट्टीतील लोकांशी त्यांचे
जे संबंध मला दिसायचे,
तेही अशाच
मोकळ्या नात्याचे असायचे.
त्यांची
विचारपूस, अडीनडीला
मदतीस जाणे हा माणसांची असोशी
असलेल्या इंदुकाकींचा श्वासच
होता.
एखाद्याने
काही चांगले केले, की
त्याचा सतत प्रचार त्या
करत. 'जीवनरावांना
स्वातंत्र्य सैनिकाचे
पेन्श्ान सुरेश-सुवर्णामुळे
सुरु झाले,' असे
त्या सांगत असल्याचे कानावर
आल्यावर प्रथम तर काहीच
कळेना. नंतर
लक्षात आले, केव्हातरी
एकदा त्यांच्या सांगण्यावरुन
'पुढारी'च्या
कचेरीत जाऊन प्रजा परिषदेच्या
आंदोलनातील जीवनरावांच्या
सहभागाविषयीच्या बातम्यांचे
संदर्भ आम्ही आणले होते.
यात आमचे
कर्तृत्व ते काय ? पण
इदुकाकींच्या बोलण्यावरुन
एखाद्याला वाटावे, अरे
किती मोठे काम यांनी केले !
जीवनरावांच्या
इंदुकाकी खरोखर अर्धांगिनी
होत्या. म्हणजे,
इंदुकाकींमुळेच
जीवनराव संपूर्ण होते.
इंदुकाकींशिवाय
जीवनरावांची कल्पनाच करता
यायची नाही, इतके
ते इंदुकाकींशी अभिन्न होते.
जीवनराव
गेल्यावर मात्र इंदुकाकीही
एकट्या झाल्याचे जाणवू लागले.
त्या आता अधिक
वेगाने सामाजिक काम करु
लागल्या, त्यांचे
मनुष्य वेल्हाळपण कायम
होते. वय,
आजार वाढत
होते. आमचे
कोल्हापूरला येणे फार क्वचित
असायचे. तथापि,
पक्ष बैठकांना
मुंबईला त्या भेटत. तेच
मोकळे, मायेचे
हसू आणि चौकशी. त्यांच्या
शेवटच्या आजारातून त्या
उठल्यावर कोल्हापूरला
त्यांची भेट झाली.
तेव्हा आता
त्या शारीरिकदृष्ट्या
थकल्या आहेत, हे
जाणवले. पण
उमेद, माया,
मोकळा फटकळपणा
चिरतरुणच होता.
त्यांचे
आजारातून उठणे फार काळ टिकले
नाही. काही
दिवसांतच अचानक त्या गेल्याची
बातमी आली. जुने
प्रसंग, त्यांचे
आमच्या आयुष्याच्या एका
वळणावरचे आधार देणे या स्मृतींनी
वेदना झाल्या. तथापि,
दुस-यांना
आनंद देत स्वतःही आनंदी राहून
एक कृतार्थ आयुष्य त्या
जगल्या हे समाधान मनात ठसवायचा
प्रयत्न केला. शोकसभेला
कोल्हापूरला आल्यावर आता
ते हक्काचे घर कायमचे बंद
झाले, ही
कळ मात्र खोलवर ठसठसून गेली.
- सुरेश
सावंत
'मुराळी'साठी लिहिलेला लेख
No comments:
Post a Comment