Thursday, December 20, 2012

प्रकट चिंतनः दिल्‍लीतील बलात्‍काराच्‍या क्रौर्याची परिसीमा गाठणा-या घटनेविषयी

  • या घटनेने अख्‍खा देश हादरला आहे. मीही हादरलो आहे.

  • गुन्‍हेगारांना तातडीने व अत्‍यंत कडक शासन व्‍हायला हवे असे मलाही वाटते. तथापि, काहीजण फाशी तर काही जण castration (पुरुषाचे वृषण काढून त्‍याला नपुंसक बनविणे) अशा शिक्षांची मागणी करत आहेत. त्‍यांविषयी मात्र मनात किंतु आहेत. विचार करतो आहे. पण या शिक्षांच्‍या बाजूने मन अजून तयार होत नाही. फास्‍ट ट्रॅक कोर्टात रोज सुनावणी होऊन आताच्‍या कायद्यातील कठोरात कठोर शिक्षा तातडीने व्‍हायला हवी, एवढे मात्र निश्चित वाटते.

  • आपली अंतर्गत सुरक्षा, कायदा-सुव्‍यवस्‍था संभाव्‍य गुन्‍हेगारांना जबर धाक वाटावी, अशी नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. यादृष्‍टीने पोलिस यंत्रणेत आवश्‍यक त्‍या सुधारणा तातडीने होणे गरजेचे आहे. त्‍याविषयी अनेक सूचना येऊ लागल्‍या आहेत. त्‍यांचा गांभीर्याने विचार व्‍हायला हवा.

  • एक लक्षात घ्‍यायला हवे असे वाटते. अशा सुधारणा करुन पोलिस यंत्रणा कितीही परिणामकारक केली, तरी त्‍यास मर्यादा राहणारच. अशा गुन्‍ह्यांबाबत नागरिकांनी सजग राहून, वेळेवर हस्‍तक्षेप करणेही गरजेचे आहे. दादरला पत्‍नी समजून ज्‍याने दुस-याच मुलीवर कोयत्‍याने वार केले, त्‍याला लोकांनी तिथल्‍या तिथे पकडून पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले, हे यादृष्‍टीने खूप आश्‍वासक आहे.

  • दिल्‍लीच्‍या या घटनेबाबत ज्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाल्‍या, त्‍यात बॉलिवूडमधील अनेकांनी कठोर शिक्षांची मागणी केली आहे. तथापि, त्‍यांच्‍यापैकीच एक, अनुराग कश्‍यप यांनी आपल्‍या बिरादरीला आत्‍मचिंतन करायला लावले आहे. त्‍यांनी स्‍त्रीकडे भोगवस्‍तू म्‍हणूनच पाहायला शिकवणा-या 'तू चिज बडी है मस्‍त मस्‍त' सारख्‍या 'आयटम सॉंग' कडे लक्ष वेधले आहे. मला हे खूप महत्‍वाचे वाटते. गणपती, आंबेडकर जयंती इ. अनेक सार्वजनिक उत्‍सवांच्‍या वेळी, अगदी शाळा-कॉलेजांतील गॅदरिंगला, टीव्‍हीवरच्‍या नृत्‍यस्‍पर्धांवेळी या प्रकारच्‍या गाण्‍यांना खास मागणी आपल्‍याकडूनच असते. आपल्‍या मुलींना-अगदी न कळत्‍या मुलींनाही आपण हीच गाणी शिकवून नाचायला लावतो. त्‍यांना लोकांनी शिट्या, टाळया वाजवल्‍या की आपण पालक कृतार्थ होत असतो. मुलींच्‍या 'वस्‍तूकरणात' आपण हा जो क्रियाशील सहभाग घेत असतो, त्‍याचे काय करायचे ?

  • मुंबईसारख्‍या शहरांत नवरात्रातले टिप-यांच्‍या तालावर चढत जाणारे दांडिया नृत्‍य आता मोकळ्या मैदानावर दिसणे बंद झाले आहे. आधी गणपती पडद्यात बंद झाले आणि नंतर दांडिया. गणपतीचे बाहेरुन दर्शन आता घेता येत नाही. तथापि, रांग लावून बिनपैश्‍याने त्‍यास अजूनही बघता येते. दांडियाला मात्र ब-यापैकी पैसे मोजल्‍याशिवाय जाता येत नाही. या दांडियात आता निखळ मूळ गुजराती लोकसंगीत नसते. त्‍याचे बॉलिवूडी गाण्‍यांशी फ्यूजन केले जाते. ही गाणी 'तू चिज...' सारखीच असतात. हल्‍ली नवरात्रानंतर अविवाहित तरुण मुलींच्‍या गर्भपाताच्‍या घटना वाढल्‍याचे वृत्‍तांत आहेत.

  • आपल्‍या गणपती, नवरात्र, दहीहंडी, होळीसारख्‍या सणांचे हे बाजारीकरण आम्‍ही मुकाटपणे नव्‍हे, सहर्ष स्‍वीकारले यास जबाबदार कोण ?

  • सध्‍याच्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेने भौतिक विकास नक्‍की साधला आहे. पण तो आजही विषम व असंतुलित आहे. त्‍यागाची, साधेपणाची महती गाणारा पूर्वीचा मध्‍यमवर्ग आज विलक्षण गतीने अर्थसंपन्‍न झाला आहे. गरजेपेक्षाही प्रतिष्‍ठेसाठी तो गाड्या, मोबाईल बदलतो. राहण्‍यापेक्षाही गुंतवणूक म्‍हणून घरे घेतो. प्रसंगी भाड्याने न देता रिकामी ठेवतो. सोसायटीत राहणा-यांची ही सुबत्‍ता आणि त्‍या सोसायटीची रखवाली करणा-या सिक्‍युरिटी गार्डला जेमतेम 3 ते 5 हजार रुपये महिन्‍याचा पगार. सोसायटीतल्‍यांची साधनसंपदा तो रोज बघत असतो. अर्ध्‍याअधु-या तंग कपड्यातल्‍या मुली-बाया त्‍याच्‍या समोरुन सतत जात येत असतात. या स्थितीत त्‍याच्‍या मनात काय चालत असेल ? त्‍याचे गाव, तिथली गरिबी, तिथल्‍या मुली, तिथली वंचना आणि इथे...? - अशा या विषमतेचे काय करायचे ? वॉचमन, ट्रक-शाळा-कंपन्‍यांचे ड्रायव्‍हर-क्लिनर, सफाई कामगार असलेल्‍या या मंडळींनी अशा विषमतेत मन मात्र 'सं‍तुलित' ठेवायचे अशी अपेक्षा बहुधा आपण करतो आहोत.

  • मध्‍यम-उच्‍च मध्‍यमवर्गातले तरी 'संतुलित' मनाचे आहेत का ? नाहीत. राहू शकत नाहीत. स्‍पर्धेच्‍या, प्रतिष्‍ठेच्‍या, प्रगतीच्‍या, सुखाच्‍या, मनोरंजनाच्‍या 'चकव्‍या' मापदंडांचे तेही बळी आहेत.

  • म्‍हणूनच, विषमतेच्‍या या सर्व थरांत विकृती जन्‍मास येतात. त्‍या गुन्‍ह्यांना जन्‍म देतात.

  • ज्‍या सुविधा आपल्‍याला आहेत, त्‍या सर्व समाजाला मिळायला हव्‍यात, यासाठी मी प्रयत्‍न करायला हवा. जो सन्‍मान, सामाजिक स्‍थान मला आहे, ते प्रत्‍येक व्‍यक्‍तीला मिळायला हवे यासाठी माझी खटपट राहील. सत्‍ता-प्रतिष्‍ठा-पैसा या मागे दमछाक होईपर्यंत धावण्‍याला लगाम घालून मोकळ्या आकाशाकडे, अथांग समुद्राकडे पाहण्‍यास, माणसांत रमण्‍यास वेळ काढेन. कातडीपेक्षा मनाच्‍या सौंदर्याचा वेध घेईन. वाद्यांच्‍या कर्कश्‍य गोंगाटाऐवजी संगीताचा मधूर सूर ओळखायला लागेन. रंगांच्‍या-आकारांच्‍या-कसरतींच्‍या चमत्‍कृतींतील निरर्थकता समजून घेऊन ख-या कलेचा आस्‍वाद घेईन.

  • ...आजच्‍या विकृतींना, पर्यायाने गुन्‍ह्यांना उतार मिळण्‍याचा हा सरळ साधा मार्ग आहे.

    - सुरेश सावंत
    20 डिसेंबर 12

No comments: