Sunday, May 31, 2015

अंधाराने कडे घातले घराभोवती...

मी ज्या शाळेत शिक्षक होतो, त्या शाळेत माझे ज्येष्ठ सहकारी असलेल्या एका शिक्षकांचा आज संध्याकाळी मला फोन आला. तब्बल २७ वर्षांनी. वर्तमानपत्रातील एका लेखाखालील माझ्या नावावरुन त्यांनी माझा शोध काढला होता. तो सुरेश सावंत मीच ही खात्री पटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आणि अर्थात मलाही.

१९८४ साली वयाच्या १९ व्या वर्षी मी शिक्षक झालो. पाच वर्षांनी ८९ साली वयाच्या २५ व्या वर्षी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. नोकरीत असतानाच मी शिकत होतो. नोकरी सोडली त्याच वर्षी एम. ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो. नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा माझा हा निर्णय नातेवाईक-मित्र, एमएचे प्राध्यापक तसेच शाळेतल्या सहकाऱ्यांपैकी बहुतेकांना न पटलेला होता. घरची आर्थिक स्थिती वाईट. मीच एकमेव कमावता. हे या न पटण्याचे तसे सबळ कारण होते. एक वर्ष विनावेतन रजा घे. नाही जमले तर परत नोकरीत येण्याचा मार्ग खुला राहील, असा सावधानतेचा सल्ला आस्थेने देणारेही यात अनेक होते. पण तो मी मानला नाही. परतीचे दोर कापायचा माझ्या राजकीय गुरुंचा सल्लाच मला योग्य वाटला.

आम्ही बोलत होतो. खूप आठवणी निघाल्या. सध्या त्यांचे काय चाललेय, मी काय करतोय, मुलांचं काय चाललंय, कोण शिक्षक आता कोठे आहेत वगैरे बरेच बोलून झाल्यावर ते म्हणाले, एक विचारु, तू शाळेत जे करायचास, मुलांच्या गराड्यात असायचास, त्यावरुन तुझा पिंड हा आदर्श शिक्षकाचा आहे, असे आम्हाला वाटायचे. आता एवढ्या वर्षांनंतर तुला काय वाटते? तू जो मार्ग पत्करलास त्याने तुला अधिक समाधान दिले की तू शिक्षक राहिला असतास तर अधिक समाधानी झाला असतास?

मी दचकलो. पण उत्तर लगेच दिले. म्हणालो, आयुष्याचे सार्थक म्हणून काही असते. मी जो मार्ग पत्करला, तो आयुष्य सार्थकी लावायचा होता. व्यक्तिगत अभिरुची, आवड यापेक्षा कर्तव्य मोठे समजणाऱ्यांची परंपरा मानणारा मी आहे. त्या सार्थकतेच्या दिशेनेच माझा प्रवास झाला. मी समाधानी आहे. पण, एक कल्पना म्हणून, मला सर्वसाधारण आयुष्य जगायची पुन्हा पहिल्यापासून संधी मिळाली, तर ज्यात मला आनंद मिळेल व समाजालाही उपयुक्त ठरेल, असे काम म्हणून मी शिक्षक होणेच कबूल करेन. तुम्ही म्हणता तसा तोच माझा पिंड आहे. 

काही वेळाने पुढे प्रत्यक्ष भेटायचे ठरवून आमचा फोन थांबला. 

उत्तर देऊन झाले. खरे तेच बोललो. तरीही खपली निघाली ती निघालीच. माझ्या भोवती मुलांचे अन् माझे मुलांभोवती रुंजी घालणे, बागडणे, सहली, रिकाम्या तासाला मुलांनी मला ओढून वर्गावर नेणे, स्नेहसंमेलने, त्यातील कार्यक्रम बसविणे, शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे रमणे इ. कितीतरी आठवणी अंगावर चाल करुन आल्या. इंदिरा संतांच्या या ओळींनी आगंतुकपणे माझ्याभोवती आता फेर धरला आहेः 'अंधाराने कडे घातले घराभोवती, जलधारांनी झडप घातली कौलारांवर, एकाकीपण आले पसरत दिशादिशांतुन...घेरायास्तव'

असो. सकाळपर्यंत थांबेल हे. असे होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
- सुरेश सावंत

Wednesday, May 20, 2015

आम्ही कवीच्या बाजूचे...

आजच्या लोकसत्तेत (२० मे २०१५) प्रसिद्ध झालेली 'गांधी मला भेटला' या कवितेच्या वादाविषयीची आमची भूमिकाः

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या १९८४ सालच्या कवितेवरून १९९४ मध्ये सुरू झालेला वाद आता न्यायालयातही एका वळणावर आलेला असताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य, त्याला मर्यादा घालणारे वर्चस्ववादी राजकारण आणि कलाकृतीचा आशय व दर्जा यांची चर्चा होणे आवश्यक आहे. ती साध्या भाषेत करणारा हा मसुदा...
...............................

'गांधी मला भेटला' या वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या कवितेवरून सध्या न्यायालयीन वाद सुरू आहे. समाजातही तिच्याविषयी चर्चा सुरू आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक संकेत आदी मूल्यांबाबतच्या चर्चा सुरू आहेत. या चच्रेत राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या व सामाजिक सुधारणेच्या महान संग्रामातून विकसित झालेल्या पुरोगामी वारशावर उघड तसेच प्रच्छन्न हल्ले करून त्यांविषयी गोंधळ माजवणे सुरू आहे. या पुरोगामी वारशाचे वारसदार या नात्याने या चच्रेत भाग घेणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटते. त्यादृष्टीने आम्ही काही मुद्दे खाली नोंदवत आहोत :

ही कविता १९८३ सालची असून अशोक शहाणेंच्या प्रास प्रकाशनाने ती पोस्टर पोएट्रीच्या स्वरूपात १९८४ साली प्रसिद्ध केली. १९९४ साली बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या अंकात ती पुनप्र्रकाशित करण्यात आली. बँकेतल्या वरिष्ठांच्या काही गरप्रकारांना उघडकीस आणण्याचा लौकिक असलेले तुळजापूरकर हे या अंकाचे संपादक होते. आधी १० वष्रे ज्या कवितेवर काहीही आक्षेप घेतला गेला नव्हता, त्या कवितेवर या वेळी मात्र आक्षेप घेऊन कवी वसंत गुर्जर व या अंकाचे संपादक तुळजापूरकर यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. गांधीजींसारख्या ऐतिहासिक महान व्यक्तीचा अवमान व अश्लील भाषा या मुद्दय़ाच्या आधारे १९९४ साली दावा दाखल करणारी संघटना होती संघकुळातली पतितपावन संघटना. संपादक म्हणून तुळजापूरकर यांनी आधीच माफी मागितल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुक्त केले असून कवी गुर्जर यांच्यावर मात्र लातूर येथील न्यायालयात खटला चालू राहणार आहे. गुर्जर यांनी माफी मागायला नकार दिला आहे.

या घटनेत कलाकृतीचा दर्जा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि राजकारण हे तिन्ही मुद्दे समाविष्ट आहेत. त्यातील राजकारणाचा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतला पाहिजे. कारण हा खटला दाखल करण्यामागील प्रेरणाच राजकीय आहे. 

पतितपावन संघटनेचे गांधीप्रेम हे पूतनामावशीचे प्रेम आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पतितपावन ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे. आणि हिंदुत्ववादी संघटनांना गांधींबद्दल किती प्रेम आणि आदर वाटतो हे जगजाहीर आहे. पण पतितपावन संघटना असे म्हणू शकते की, 'आमचा गांधींच्या काही भूमिकांना विरोध आहे. पण गांधींबद्दल मात्र आदर आहे.' पण या म्हणण्यातदेखील केवळ चलाखी असणार आहे. हे समजण्यासाठी केवळ एकाच गोष्ट पुरेशी आहे. गांधीहत्येचा, एका खुनी माणसाचा गौरव करणारे 'मी नथुराम बोलतोय' हे नाटक महाराष्ट्रात गेली कित्येक वष्रे जोरात चालू आहे. पण पतितपावन संघटनेने त्यावर बंदी घालण्याची गोष्ट तर सोडाच, साधा निषेधही केलेला नाही. यावरूनच पतितपावन संघटनेचे 'राजकारण' स्पष्ट होते. महात्मा गांधींचा अधिकृत वारसा सांगणाऱ्या विचारवंतांकडून वा संघटनांकडून या कवितेबद्दल आक्षेप घेतले न जाणे व पतितपावन संघटनेने ते घेणे हेही पुरेसे बोलके आहे.

मग या कवितेबद्दल आक्षेप घेण्यामागील पतितपावन संघटनेचे 'राजकारण' काय असेल? ते उघड आहे. त्यांना या निमित्ताने कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणायची आहे. त्यांचा खरा आक्षेप कवितेतील भाषेबद्दल आहे. 'गांधींचा अपमान' हा देखावा आहे. एकदा का सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला हवा तसा निर्णय मिळाला की मग एखादी कलाकृती आमच्या देव-देवतांचा तसेच त्यांना राजकीयदृष्टय़ा सोयीच्या असलेल्या ऐतिहासिक व्यक्तींचा अपमान करते असा मुद्दा उपस्थित करून त्या कलाकृतीवर बंदी घालणे पतितपावनसारख्या संघटनांना शक्य होणार आहे. आज जगात अनेक ठिकाणी मूलतत्त्ववादाला जोर आला आहे. अलीकडच्या इस्लामी राष्ट्रांतील घटना तर त्याचे ठळक उदाहरण आहे. हा मूलतत्त्ववाद येथील बहुसंख्य हिंदू धर्मीयांत रुजवणे, त्यास असहिष्णू बनविणे व प्राचीन काळापासून वैचारिक मतभिन्नतेचे जागरण करत एकत्र नांदणाऱ्या बहुसांस्कृतिक 'भारतीयत्वा'ला कमजोर करणे, अशी ही रणनीती आहे. महाराष्ट्रातील विचारी जनतेने हे समजून घेण्याची गरज आहे.

बंदी हवी कुणाला?

येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे. 'मी नथुराम बोलतोय' या नाटकावर बंदी घालण्याची मागणी जरी कोणी केली तरी आमचा त्या मागणीला पूर्ण विरोध असेल. नथुराम गोडसेंचे विचार आम्हाला अजिबात मान्य नाहीत आणि त्याची कृती आम्हाला घृणास्पद वाटते. पण म्हणून त्याची राजकीय भूमिका मांडण्याच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणे आम्हाला पूर्ण चुकीचे वाटते. हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेऊ या की, महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांना ते िहदुत्ववादाच्या विरोधात असल्यामुळे 'स्यूडो-सेक्युलर' म्हणून हिणवण्यात आले आहे त्यांपकी कोणीही, 'मी नथुराम बोलतोय' या नाटकावर बंदी आणली पाहिजे, असे म्हटलेले नाही. उलट अशी बंदी आणता कामा नये अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे. विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य या गोष्टी अत्यंत मोलाच्या आहेत. त्यांना तडा गेला तर एक सुसंस्कृत लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येण्याच्या आपल्या ध्येयालाच तडा जाऊ शकेल.

समाजातल्या साचले-कुजलेपणावर आपल्या कवितांद्वारे कोरडे ओढणारे संवेदनशील कवी म्हणून वसंत दत्तात्रय गुर्जर परिचित आहेत. त्यांनी या कवितेत गांधीजींच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांचा समाचार उपरोधिक-रूपकात्मक शैलीने घेतला आहे. हा उपरोध प्रभावी व कलात्मकरीत्या व्यक्त करतानाची अपरिहार्यता म्हणून बहुजन समाजात व्यापकरीत्या वापरली जाणारी भाषा कवीने वापरली आहे. तिला अश्लील ठरविले गेल्यास संत तुकारामांपासून नामदेव ढसाळांपर्यंत अनेकांना निकाली काढावे लागेल. कवितेचे अभिन्न अंग म्हणून येणारी ही भाषा, तिचा लहेजा व रूपकात्मता इंग्रजी अनुवादाद्वारे आकलन होणे कठीण आहे. ही कविता समजून घेताना न्यायालयालाही हीच मर्यादा पडली असावी. वास्तविक न्यायालयाने मराठी भाषेचे तज्ज्ञ, साहित्यिक, गांधीवादी विचारवंत अशांचा Amicus curiae (न्यायालयाचे मित्रवकील) म्हणून सल्ला घ्यायला हवा. 

सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आमच्या हाती नाही. पण वृत्तपत्रांतील बातम्यांमधून न्यायालयाचे जे म्हणणे कळते त्यानुसार भाषा, ऐतिहासिक व्यक्तींचा अवमान यादृष्टीने कलाकृतीचे मापन करताना प्रचलित सामाजिक संकेतांचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला आहे. तोही निसरडा आहे. काळ, समाजविभाग, संस्कृती, प्रदेशनिहाय हे संकेत भिन्न असू शकतात. भारतातील हिंदू समाजातच उत्तरेत रावण खलनायक, तर दक्षिणेत तो नायक मानला जातो. असे अनेक बाबतींत संभवते. खुद्द या कवितेबाबत ८३ सालचे सामाजिक संकेत विचारात घेणार की ९४ सालचे? ते ठरवणार कसे? असे प्रश्न उभे राहतात. 

रुपकांचा अन्वयार्थ
 
सर्वसाधारण वैचारिक अभिव्यक्ती व कलात्मक अभिव्यक्ती यातही फरक आहे. वैचारिक अभिव्यक्ती सरळ असते, त्यामुळे तिचा अर्थ स्पष्ट असू शकतो. कलात्मक अभिव्यक्ती ही अशी सरळ नसते. ती अनेकविध पद्धतींची असते. तिचा अर्थ शब्दश: घेण्याने फसगत होऊ शकते. या कवितेत गांधीजी कवीला जिथे भेटतात, तिथे प्रत्यक्ष गांधीजी भेटतात, असे कवीला म्हणायचे नसते. त्याला काही वेगळे सूचित करायचे असते. अशा वेळी कवितेचा-कलेचा अर्थ लावणे कलावंतांवर, त्या क्षेत्रातील समीक्षकांवर सोडणेच उचित ठरते.

सर्वसाधारण समाज त्याचा अर्थ कसा लावतो, हे महत्त्वाचे आहेच. त्या दृष्टीने कलाकारांसहित सर्वानीच विवेकी राहावे, हे म्हणणे निराळे. पण त्यामुळे समाजातील सर्वाना स्पष्टपणे अर्थबोध होईल वा आक्षेपार्ह असणार नाही अशीच कलाकृती तयार करा, असा आदेश कलावंतांना दिला तर कला ही कला राहणारच नाही. समाजात कलेबाबतच्या समजाची प्रौढता असलेले तसेच नसलेलेही असतात. त्यासाठी कलाकृतीतील रुपकांचा अन्वयार्थ लावता येण्याची, त्यातील सौंदर्यस्थळे हेरण्याची, त्यातील संदेश समजण्याची कुवत व कलेबाबतचा उदार दृष्टिकोन आपल्या समाजात वाढायला पाहिजे. तो वाढवण्यासाठी व जोपासण्यासाठी कलावंत, विचारवंत, सामाजिक-राजकीय संघटना तसेच सरकार या सगळ्यांनीच प्रयत्नशील असले पाहिजे. 

आज गांधींचा अपवाद वगळता इतर अनेक इतिहासकालीन आणि आधुनिक काळातील लोकांचे आपण दैवतीकरण केले आहे. त्यांच्या विचारांवरील, कृतीवरील कोणतीही टीका सहन केली जात नाही. अशी टीका करणाऱ्या लोकांना त्याची मोठी, जबर किंमत द्यावी लागू शकते. सुदैवाने महात्मा गांधींसारख्या जगन्मान्यता असलेल्या नेत्याच्या बाबतीत तो धोका नाही. म्हणून आम्ही ही भूमिका घेण्याचे धर्य दाखवू शकतो याची आम्ही प्रामाणिक कबुलीदेखील येथे देत आहोत. जे स्वातंत्र्य आपल्याला महात्मा गांधींबद्दल मिळते तेच स्वातंत्र्य महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या बाबतीत मिळण्याइतका महाराष्ट्र सुसंस्कृत आणि विचारी व्हावा, अशी या निमित्ताने कळकळीची अपेक्षा व्यक्त करतो.

शेवटी पुन्हा एकदा, या प्रकरणातील 'पतितपावन' संघटनेच्या राजकारणाचा निषेध करतो आणि कवी वसंत गुर्जरांच्या आम्ही बाजूने आहोत, हे जाहीर करतो.

-------------------------------------------

शांता गोखले, उल्का महाजन, सुरेश सावंत, मिलिंद मुरुगकर, लोकेश शेवडे, भारती शर्मा, मधुकर डुबे, नीला लिमये  यांनी विचारविनिमयाने हा मसुदा प्रसृत केला आहे.


Saturday, May 16, 2015

'गांधी मला भेटला' च्या वादात भूमिका काय घ्यायची?

गुर्जरांचे मित्र त्यांच्या कवितांविषयी:
त्यांची सर्वांत गाजलेली सर्वश्रेष्ठ कविता म्हणजे अशोक शहाणे यांनी छापलेली, आणि तिच्यावर झालेल्या खटल्यामुळे प्रसिद्धी पावलेली ‘गांधी मला भेटला’. - राजा ढाले (खेळ, 2011)
समकालीन मराठी कवितेत वसंतचं वैशिष्ट्य त्याची भाषा आहे. ती सांकेतिक, रूढ भाषेविरुद्ध जाऊन सभोवारची सर्वसामान्यांची, वरवर सपाट वाटणारी पण खोलवर दडलेल्या दुःखांकडे घेऊन जाण्याचा निर्देश करणारी आहे. ती जेव्हा सामाजिक-राजकीय विसंगतीकडे बोट दाखवते तेव्हाही विद्रोहाची आक्रमकता दूर ठेवून सर्वसामान्यांच्या कवेत असलेला उपहास वापरते. आणि या उपहासाला फक्त स्वगताचंच, स्वतःशी संवाद करण्याचंच रूप असतं. यामुळे ती नारेबाजी- शेरेबाजीतून स्वतःला वाचवते. वसंतची कविता भारतीय लोकशाहीचा गाभा असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेचाच सर्जनशील वापर करते. -चंद्रकांत पाटील (‘पाटीवरच्या टीपा’, साकेत प्रकाशन)
मी:
ढाले-ढसाळ-गुर्जर या वातावरणातच आम्ही घडलो. हे little magazine वाले आमचे त्या काळी हिरो होते. पुढे त्यांची घसरण सुरु झाली. त्याच्याशी मी सहमत नसलो तरी साचलेल्या-सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारलेल्या या मंडळींनी आम्हाला विलक्षण ताकद दिली, हे त्यांचे आमच्या पिढीवरील ऋण मोठे आहे.
मग मी काय भूमिका घ्यायची?
माझी 'बाजू' गुर्जरांची आहे. या कवितेने गांधीजींचा अवमान होतो म्हणून कोर्टात गेलेल्या पतितपावन संघटनेचे गांधीजींविषयीचे प्रेम हे पुतनामाशीचे प्रेम आहे, हेही मला ठाऊक आहे. पण तरीही मला सुस्पष्ट भूमिका घेता येत नाही. यात अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. त्यातील काही असे:
विचार स्वातंत्र्य व कलात्मक स्वातंत्र्य एकच समजायचे का? समाज संकेत व समाजाच्या प्रगल्भतेची अवस्था कलावंताने लक्षात घ्यायची की नाही? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी आज ढोंगबाजी चालू आहे, त्याबद्दल 'आंबेडकर मला भेटला' अशी कविता कोणी लिहिली तर काय होईल? गांधीजींबद्दल हे चालू शकते. कारण त्यांच्या मागे फक्त सरकारी भिंत आहे. खुद्द राजा ढालेंची प्रतिक्रिया काय राहील? नामदेव ढसाळांनी एका कवितेत बाबासाहेबांविषयी गुर्जरांच्या तुलनेत अत्यंत मामुली उल्लेख केले होते. त्यावरुनही गदारोळ झाला होता. कलात्मकता समजण्यासाठीची प्रगल्भता समाजात यावी यासाठी साहित्यिक-कलावंतांचे कला प्रसवण्याव्यतिरिक्त काही प्रयत्न-कार्यक्रम राहणार आहेत का?
...I'm confused.मला भूमिका ठरवायला मदत हवी आहे.
- सुरेश सावंत

केस तर केस; भीमजयंतीला वाजणार २४ बेस


…जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी ‘अत्त दीप भव’ (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, ‘सब्बे सत्ता सुखि होन्तु’ च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे…या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.

१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो.

पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. आपल्या लोकांच्या काय भावना आहेत, हे कळावे, म्हणून तो फोटो पाठवला.’

दुपारीच याचा प्रत्यय आला. कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज जवळ येत गेला तसा अधिकच असह्य होऊ लागला. घराच्या भिंती कंप पावू लागल्या. छातीत धकधक होऊ लागले. घराबाहेर आलो. अर्थातच जयंतीची मिरवणूक होती. मला आलेल्या संदेशासारखेच भल्या मोठ्या स्पीकर्सचे थरावर थर असलेले मोठे ट्रेलरसारखे वाहन अग्रभागी. त्याच्या मागे डीजेच्या तालावर बेधुंद नाचणारे तरुण. ‘आजचा दिवस आमचा आहे’ ही भावना त्यातून ओसंडत होती. मिरवणुकीतले बाकी महिला-पुरुष घोषणा देत होते. पण या घोषणा डीजेच्या आवाजात कुठच्या कुठे हरवून जात होत्या.

काही काळ मिरवणुकीत चाललो. पण आवाज आणि उन्ह अगदीच असह्य व्हायला लागले. मग इतरांच्या नकळत हलकेच बाहेर पडलो. मिरवणूक लांब गेल्यावर आवाजही कमी झाला. अन् मी ‘हुश्श’ केले.

मी आता मध्यमवर्गीय आहे. वस्ती सुटली आहे. नुकतीच पन्नाशीही झाली आहे. उन्हाचा-आवाजाचा त्रास पहिल्यापेक्षा अधिक जाणवू लागला आहे. पण कार्यकर्ता असल्याने तसेच अनेक नातेवाईक तिथेच राहत असल्याने वस्तीशी माझे संबंध तुटलेले नाहीत. पण पूर्वीची हस्तक्षेपाची ताकद आता राहिलेली नाही; क्षीण झालेली आहे म्हणा फारतर. कारण केलेली सूचना अगदीच कोणी अव्हेरत नाही. कधीतरी एखादी अमलातही येते.

आंबेडकरी समूहात हे जे काही बदलते आहे, ते सर्वस्वी त्याचे वैशिष्ट्य नाही. भोवतालच्या समाजात जे वारे वाहते आहे, ते त्याच्याही काना-डोक्यात शिरत आहे. शिवाय काही बाबी खास त्याच्या स्वतःच्याही आहेत. गणपती-दहिहंडी-शिवजयंतीला जर २४ बेस डिजेच्या तालावर लोक बेहोश होत असतील, फटाक्यांची आतषबाजी, रोषणाईचा झगमगाट हेच उत्सवाच्या यशस्वीतेचे मानदंड ठरत असतील; तर मग आंबेडकर जयंतीही त्याच मानदंडांवर साजरी होणार. सगळंच आवाजी-झगमगाटी असेल, तर जयंतीही तशीच असणार. इतर जर कायदा उल्लंघत असतील, तर मग आमच्यावरही होऊ द्या केस, ही बेफिकीरी येते. अजूनही दलित-आंबेडकरी समुदायाच्या वाट्याला अत्याचार, अवमान, दुजाभाव येत असल्याने या बेफिकीरीला विद्रोहाचाही एक आयाम असतो, हे विसरुन चालणार नाही.

पण त्यामुळे हे योग्य ठरत नाही. ते सिगरेट ओढतात-दारु पितात ते चालते; मग मी हे केले तर काय वावगे झाले, हे समर्थन गैर आहे. जे कोणालाच हितावह नाही, ते दुसरा करतो म्हणून आपण करण्याने आपल्याला हितावह ठरत नाही.

हे लिहिताना जुन्या काळी सगळं कसं आदर्श होतं आणि आता सगळं ढासळत चाललं आहे, असा माझा आविर्भाव मुळीच नाही. आवाजाचे-रोषणाईचे तंत्र व आर्थिक क्षमता आजच्याच तेव्हा असत्या तर डीजे व थाटमाट तेव्हाही दिसणे अशक्य नव्हते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर १४ तारीख सुरु झाली की लाऊडस्पीकरचे भोंगे जे ‘उद्धरली कोटी कुळे-भीमा तुझ्या जन्मामुळे’ गायला लागायचे त्याने बिगर आंबेडकरी माणसाची खाडकन झोपच उडायची. ती त्या रात्री तरी पुन्हा लागणे कठीण होते. आमच्या अंगावर रोमांच उभे राहत, ते आम्ही त्या समाजाचे होतो म्हणून. आम्ही कोणी, खास करुन मुले त्या रात्री झोपतच नसू. पताका लावणे, भिंतीवर बाबासाहेबांच्या प्रतिमा रंगवणे, मंडपात पाणी मारणे, फलकावर जयंतीचा कार्यक्रम लिहिणे यात आम्हाला परमानंद मिळायचा. आता ही अनेक कामे पैश्यांनी आऊटसोर्स केली जातात.

फरक पडला आहे, तो प्रेरणांत. विचारांत. जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी ‘अत्त दीप भव’ (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, ‘सब्बे सत्ता सुखि होन्तु’ च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे…या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.

या प्रेरणा, जाणिवा आता आहेत, असे दिसत नाही. किमान सार्वत्रिक तरी नक्की नाहीत. अर्थात आमच्या वेदनांचा अनुभव वा त्यांची तीव्रता आताच्या मुलांमध्ये नाही, हेही कारण आहेच. पण नफा-नुकसानीच्या भाषेत बोलायचे, तर आर्थिक-भौतिक अभावग्रस्ततेत लक्षणीय घट झाली असली तरी जाणिवांचे दारिद्र्य हे खूप मोठे नुकसान आहे. बैलगाडीत बुद्ध-बाबासाहेब-फुल्यांच्या प्रतिमा व लेझिम अशा मिरवणुकांच्या जागी डीजेचा आवाजी, झगमगाटी बदल हे एकवेळ चालू शकेल. पण त्यावेळी होणाऱ्या व्याख्यानमाला आता अपवादानेच होतात. आंबेडकर, गांधी, मार्क्स यांतील मतभेद कोणते, मूर्तिपूजा नाकारणाऱ्या बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांनी स्वीकारण्यामागचे कारण काय, देवाची पूजा आणि बुद्धाची पूजा यातला फरक, अगरबत्ती, मेणबत्ती, फुले यांचे प्रतीकात्मक अर्थ, मंगळसूत्र घालायचे की नाही, कुंकू लावायचे की नाही…अशा चर्चांनी तेव्हा रात्री उजाडायच्या. बोलणारे बोलायचे. बाकीचे रस घेऊन ऐकत असायचे. आताच्या मुलांना हे प्रश्न ग्रासतात, असे दिसत नाही. स्मार्ट फोनवर बाबासाहेबांची पूजा बांधणारे अविवेकी संदेश, फोटो मात्र शेअर होत असतात. विभूतिपूजेच्या विरोधात असलेल्या बाबासाहेबांची ‘गर्व से कहो’चालीवर यथासांग डिजिटल पूजा होत असते. एक जीवनप्रणाली, जीवन व चळवळ उन्नत करण्याचे वैचारिक साधन याअर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे, असे म्हटले होते. आज त्याला व्यवस्थित धर्माचे स्वरुप आले आहे. त्याच्याविषयी थोडे अधिक बोलू.

बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबरला दिली आणि जेमतेम दीड महिन्यात ६ डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्माच्या आचरणाविषयी त्यांना नीट आखणी करायला तसा वेळच मिळाला नाही. काही तयारी त्यांनी आधीपासून केली होती. त्यामुळे किमान ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ सिद्ध झाला. विधिंविषयी वगैरे काही भाषणांत उल्लेख केलेले होते. त्या सगळ्याबाबत बाबासाहेबांच्या नंतरच्या नेत्यांनी एकवाक्यतेने काही ठरवायला हवे होते. राजकीय बाबतीतला त्यांचा कर्मदरिद्रिपणा इथेही दिसतो. धार्मिक संस्था निघाल्या. पण त्याही बव्हंशी राजकीय पंखाखालीच राहिल्या. धार्मिक बाबतीत दिशादिग्दर्शन करणारी आंबेडकरी बौद्धांची मध्यवर्ती मान्यता असलेली एकच एक संस्था नाही.

‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे काही ठिकाणी ग्रंथ लावल्यासारखे ‘पठन’ केले जाते. या ग्रंथाची पारायणे केलेले लोक मला भेटतात. पण या ग्रंथातला नेमका एक भाग वाचायचा विसरतात, तो म्हणजे ‘परिचय’. ग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या या छोटेखानी परिचयात बाबासाहेब बौद्ध धम्माच्या प्रसारात ज्यामुळे अडथळा येतो असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करत नाही. फक्त एकच करतो. तो म्हणजे भिख्खू संघाचा. त्यांच्या काळातील पारंपरिक भिख्खूंचे ऐषारामी राहणे त्यांना खटकत असे. भिख्खूंचे समाजापासून तुटणे हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे एक कारण ते समजत. ते भिख्खूंच्या भूमिकेविषयी साशंक होते. तो एक पूर्णपुरुष असेल तर समाजाला त्याचा काही उपयोग नाही, भिख्खू हा सामान्य माणसाचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असायला हवा, असे ते या परिचयात म्हणतात. त्यांच्या दृष्टीने तो एक पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो उच्चासनावर बसणारा, विधी लावणारा पुरोहित नव्हे. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षासमारंभात महास्थवीर चंद्रमणींच्या हस्ते स्वतः पत्नीसह दीक्षा घेऊन परंपरेशी नाते जोडले. मात्र समोरच्या लाखोंच्या समुदायाला त्यांनी स्वतः दीक्षा दिली. चंद्रमणींच्या हस्तेच समाजाला दीक्षा दिली असती, तर दीक्षा किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी भिख्खूचीच गरज असते, असे समाजाला वाटले असते व एक नवा चिवरधारी पुरोहित तयार झाला असता, असे बाबासाहेबांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणीही उपासक कोणतेही विधी लावू शकतो. त्यासाठी भिख्खूची गरज नाही, हे सूत्र त्यांनी इथे समाजाला दिले. दीक्षा समारंभाला लाखो लोक होते. पण सगळा समाज काही तेथे नव्हता. त्याला कोण दीक्षा देणार? त्यासाठी दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, असे त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी मुंबईच्या कामगार मैदानात झालेल्या दीक्षा समारंभात बॅरिस्टर भंडारेंच्या हस्ते दीक्षा घेतली.

आजही विधी लावण्याचे काम सामान्यांतलाच एकजण विधिकर्ता (बौद्धाचार्य असे चुकीचे नाव त्याला पडले आहे) म्हणून करतो. तथापि, थोडी अर्थसंपन्नता आलेला यजमान यासाठी भिख्खूला पाचारण करण्यात, त्याला उच्चासनावर बसवून, मंतरलेला धागा मनगटात बांधून विधी करण्यात प्रतिष्ठा मानताना दिसतो आहे. त्याचे अनुकरण मग सामान्य आर्थिक कुवतीचाही माणूस करताना आढळतो. बुद्धविचारांचे मार्गदर्शन, प्रवचन, प्रचार-प्रसार याच कामाला पूर्ण वाहून घेण्याऐवजी अशा विधी लावण्याच्या कामांत भिख्खूंचे जथे सामील होताना दिसू लागले आहे. ‘वंदामि भन्ते’तील ज्येष्ठ मित्राला आदरार्थी करावयाच्या संबोधनात आता लीनता येऊ लागलेली आहे. यथावकाश भिख्खूंचे ऐषारामी मठ उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये. लग्न साधेपणाने करावयाचा बाबासाहेबांचा संदेशही उधळला जावू लागला आहे. थाटमाट व प्रतिष्ठेचे सगळे संकेत खास करुन मध्यम व उच्च मध्यमवर्गीय आंबेडकरी समुदायांत रुजायला सुरूवात झाली आहे. बुद्धाने प्रचारासाठी संस्कृतऐवजी पाली ही लोकभाषा निवडली. आज पाली लोकभाषा नाही. तरी विधिची सूक्ते पालीतच म्हटली जातात. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे नाही. पण काहीही कळले नाही तरी पालीत म्हणण्यालाच आज प्रतिष्ठा आहे.

बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीचे भले परिणाम अनुभवणाऱ्या मला हे प्रतिक्रांतीचे संकेत अस्वस्थ करतात. अर्थात, पुढे काय होणार याची केवळ चिंता वाहण्याऐवजी आपल्याला वाटणारा हस्तक्षेप करत राहणे, हेच श्रेयस्कर असते. ते करण्याचा यत्न मी करत असतो. यावेळी १३ एप्रिलला रात्री १२ वा. मला एका वस्तीत पाहुणा म्हणून बोलावले होते. (हल्ली असे बोलावणे कमी झाले आहे.) रात्री १२ च्या ठोक्याला माझ्या हस्ते ध्वजारोहण झाले. बुद्ध-बाबासाहेबांच्या प्रतिमांना हार घातले गेले. नंतर काही काळ फटाक्यांची आतषबाजी. नंतर वंदना. पूजा पाठ. आणि मग माझे भाषण. वर जे लिहिले ते आणि इतर बरेच बोललो. आगामी वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीचे १२५ वे आहे. ते साजरे करण्याकरता शेवटी मी काही कार्यक्रम सुचवला. पहाटे घरी परतलो. दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीतल्या ‘२४ बेसला’ घाबरुन घरी आलो. आणि थोड्याच वेळात रात्रीच्या आयोजकांचा फोन आला. ते म्हणाले- “तुमच्या भाषणावर आम्ही कार्यकर्ते चर्चा करत बसलो होतो. आम्हाला तुमचे पटले. आम्ही दर पौर्णिमेला एक प्रबोधनपर कार्यक्रम ह्या वर्षी नियमतिपणे घ्यायचे ठरवले आहे. तुमचे मार्गदर्शन मात्र लागेल”.

आता माझी जबाबदारी आहे, हे वर्षभराचे कार्यक्रम त्यांना सुचवणे व ते उद्दिष्टानुरुप होतील, यासाठी प्रयत्न करणे. ही जबाबदारी मी आनंदाने पार पाडेन.

– सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com
_____________________________
साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, मे २०१५
(‘बुद्ध आणि….दीक्षा घेतली’ हा परिच्छेद ‘आंदोलन’मधील लेखात समाविष्ट नाही.)

Friday, May 1, 2015

ज्या नात्यात आत्मीयता नसते, ते खात्रीने पवित्र बंधन नव्हे - पं. जवाहरलाल नेहरु

'लग्न हे भारतात पवित्र बंधन, विवाहाअंतर्गत बलात्कार अपराध नाही! - भारत सरकार' या आशयाचे शीर्षक असलेली बातमी ही आज माध्यमांतली 'ताजा खबर' आहे. या बातमीनुसार भारतात लग्न म्हणजे पवित्र संस्कार, बंधन मानले जात असल्याने विवाहाअंतर्गत होणाऱ्या बलात्काराला गुन्हा मानण्यास भारत सरकारने नकार दिला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सरकारतर्फे हे मत व्यक्त केलं आहे.

ही बातमी वाचल्यानंतर आजपासून ५९ वर्षांपूर्वी, १९५५ सालच्या मे महिन्याच्या ५ तारखेला संसदेत दिल्या गेलेल्या पं. जवाहरलाल नेहरुंच्या भाषणाची आठवण झाली. संदर्भ होता हिंदू कोड बिलाचा. हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. प्रतिगामी हिंदुत्ववादी शक्तींचा या बिलाला विरोध होताच, पण कॉँग्रेस अंतर्गतही त्याला एका विचारप्रवाहाचा विरोध होता. त्यामुळे या बिलाच्या बाजूने असलेल्या नेहरुंनाही माघार घ्यावी लागली होती. १९५२ च्या निवडणुकांतील भरभक्कम बहुमताने पं. नेहरुंना मोठी ताकद दिली. या ताकदीच्या जोरावर त्यांनी हे बिल खंडित स्वरुपात संसदेत आणले. यावेळीही त्याला जोरदार विरोध झाला. आज सत्तेत असलेल्या भाजपचे पूर्वसूरी या विरोधात आघाडीवर होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या एन. सी. चटर्जी यांनी आजच्या केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरींचीच भाषा त्यावेळी वापरली होती. हिंदू कोड बिलात हिंदू स्त्रीला देऊ केलेल्या घटस्फोटाच्या अधिकाराला त्यांनी कडाडून विरोध केला. 'विवाह हा पवित्र संस्कार, पवित्र बंधन, पवित्र विधी आहे. त्यामुळे अशा पवित्र संस्काराने जोडलेले नाते तोडण्याचा कायद्याला अधिकार असू शकत नाही' अशी भूमिका त्यांनी संसदेत मांडली. सरकारचे प्रमुख या नात्याने पं. जवाहरलाल नेहरु यांनी या विरोधाचा खणखणीत समाचार घेतला. त्यांच्या त्या भाषणातील ही काही स्वैर अनुवादित विधानेः

‘पती-पत्नीच्या आत्मीय नात्यातच हे पवित्र बंधन असू शकते. ज्या नात्यात आत्मीयता नसते, तिरस्कार असतो, ते नाते चालू ठेवणे म्हणजे जीवन अधिक कटू करणे होय. अशाने त्या नात्याच्या अस्तित्वाचा पायाच डळमळीत होतो. ...हे खात्रीने पवित्र बंधन नव्हे!’

सीता-सावित्रीसारख्या स्त्रियांच्या महान त्यागाची परंपरा, मनू-याज्ञवल्क्य यांच्या वारशाची महती हिंदुत्ववादी विरोधकांकडून संसदेत गायली गेली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नेहरु प्रतिप्रश्न करतात, “सीता-सावित्री होण्याचा उपदेश स्त्रियांनाच का म्हणून? पुरुषांना का नाही राम, सत्यवान बनायला सांगत?”

संस्कृती-परंपरांचा जुना वारसा सांगणाऱ्यांना पंडितजी पुढे बजावतात, “आता काळ बदलला आहे. अर्धी मानवता बंधनात ठेवून खरी लोकशाही आपण आणू शकत नाही.”

बदलत्या काळाचा भविष्यलक्ष्यी वेध घेऊन पुरोगामी पावले टाकणारे नेहरुंच्या नेतृत्वाखालचे ते सरकार आणि आज ५९ वर्षांनंतर अधिक पुढची पावले टाकण्याऐवजी सांस्कृतिक इतिहासाची चाके उलटी फिरवू पाहणारे मोदींच्या नेतृत्वाखालचे हे सरकार!

किती ही भयप्रद विसंगती!

- सुरेश सावंत