'लग्न हे भारतात पवित्र बंधन, विवाहाअंतर्गत बलात्कार अपराध नाही! - भारत सरकार' या आशयाचे शीर्षक असलेली बातमी ही आज माध्यमांतली 'ताजा खबर' आहे. या बातमीनुसार भारतात लग्न म्हणजे पवित्र संस्कार, बंधन मानले जात असल्याने विवाहाअंतर्गत होणाऱ्या बलात्काराला गुन्हा मानण्यास भारत सरकारने नकार दिला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सरकारतर्फे हे मत व्यक्त केलं आहे.
ही बातमी वाचल्यानंतर आजपासून ५९ वर्षांपूर्वी, १९५५ सालच्या मे महिन्याच्या ५ तारखेला संसदेत दिल्या गेलेल्या पं. जवाहरलाल नेहरुंच्या भाषणाची आठवण झाली. संदर्भ होता हिंदू कोड बिलाचा. हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. प्रतिगामी हिंदुत्ववादी शक्तींचा या बिलाला विरोध होताच, पण कॉँग्रेस अंतर्गतही त्याला एका विचारप्रवाहाचा विरोध होता. त्यामुळे या बिलाच्या बाजूने असलेल्या नेहरुंनाही माघार घ्यावी लागली होती. १९५२ च्या निवडणुकांतील भरभक्कम बहुमताने पं. नेहरुंना मोठी ताकद दिली. या ताकदीच्या जोरावर त्यांनी हे बिल खंडित स्वरुपात संसदेत आणले. यावेळीही त्याला जोरदार विरोध झाला. आज सत्तेत असलेल्या भाजपचे पूर्वसूरी या विरोधात आघाडीवर होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या एन. सी. चटर्जी यांनी आजच्या केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरींचीच भाषा त्यावेळी वापरली होती. हिंदू कोड बिलात हिंदू स्त्रीला देऊ केलेल्या घटस्फोटाच्या अधिकाराला त्यांनी कडाडून विरोध केला. 'विवाह हा पवित्र संस्कार, पवित्र बंधन, पवित्र विधी आहे. त्यामुळे अशा पवित्र संस्काराने जोडलेले नाते तोडण्याचा कायद्याला अधिकार असू शकत नाही' अशी भूमिका त्यांनी संसदेत मांडली. सरकारचे प्रमुख या नात्याने पं. जवाहरलाल नेहरु यांनी या विरोधाचा खणखणीत समाचार घेतला. त्यांच्या त्या भाषणातील ही काही स्वैर अनुवादित विधानेः
‘पती-पत्नीच्या आत्मीय नात्यातच हे पवित्र बंधन असू शकते. ज्या नात्यात आत्मीयता नसते, तिरस्कार असतो, ते नाते चालू ठेवणे म्हणजे जीवन अधिक कटू करणे होय. अशाने त्या नात्याच्या अस्तित्वाचा पायाच डळमळीत होतो. ...हे खात्रीने पवित्र बंधन नव्हे!’
सीता-सावित्रीसारख्या स्त्रियांच्या महान त्यागाची परंपरा, मनू-याज्ञवल्क्य यांच्या वारशाची महती हिंदुत्ववादी विरोधकांकडून संसदेत गायली गेली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नेहरु प्रतिप्रश्न करतात, “सीता-सावित्री होण्याचा उपदेश स्त्रियांनाच का म्हणून? पुरुषांना का नाही राम, सत्यवान बनायला सांगत?”
संस्कृती-परंपरांचा जुना वारसा सांगणाऱ्यांना पंडितजी पुढे बजावतात, “आता काळ बदलला आहे. अर्धी मानवता बंधनात ठेवून खरी लोकशाही आपण आणू शकत नाही.”
बदलत्या काळाचा भविष्यलक्ष्यी वेध घेऊन पुरोगामी पावले टाकणारे नेहरुंच्या नेतृत्वाखालचे ते सरकार आणि आज ५९ वर्षांनंतर अधिक पुढची पावले टाकण्याऐवजी सांस्कृतिक इतिहासाची चाके उलटी फिरवू पाहणारे मोदींच्या नेतृत्वाखालचे हे सरकार!
किती ही भयप्रद विसंगती!
- सुरेश सावंत
1 comment:
४ मे २०१५ रोजी 'मी मराठी'मध्ये हा लेख छापला गेला. त्याची लिंकः
http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=422&boxid=772213544&ed_date=2015-05-04&ed_code=820009&ed_page=9
Post a Comment