Sunday, May 31, 2015

अंधाराने कडे घातले घराभोवती...

मी ज्या शाळेत शिक्षक होतो, त्या शाळेत माझे ज्येष्ठ सहकारी असलेल्या एका शिक्षकांचा आज संध्याकाळी मला फोन आला. तब्बल २७ वर्षांनी. वर्तमानपत्रातील एका लेखाखालील माझ्या नावावरुन त्यांनी माझा शोध काढला होता. तो सुरेश सावंत मीच ही खात्री पटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आणि अर्थात मलाही.

१९८४ साली वयाच्या १९ व्या वर्षी मी शिक्षक झालो. पाच वर्षांनी ८९ साली वयाच्या २५ व्या वर्षी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. नोकरीत असतानाच मी शिकत होतो. नोकरी सोडली त्याच वर्षी एम. ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो. नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा माझा हा निर्णय नातेवाईक-मित्र, एमएचे प्राध्यापक तसेच शाळेतल्या सहकाऱ्यांपैकी बहुतेकांना न पटलेला होता. घरची आर्थिक स्थिती वाईट. मीच एकमेव कमावता. हे या न पटण्याचे तसे सबळ कारण होते. एक वर्ष विनावेतन रजा घे. नाही जमले तर परत नोकरीत येण्याचा मार्ग खुला राहील, असा सावधानतेचा सल्ला आस्थेने देणारेही यात अनेक होते. पण तो मी मानला नाही. परतीचे दोर कापायचा माझ्या राजकीय गुरुंचा सल्लाच मला योग्य वाटला.

आम्ही बोलत होतो. खूप आठवणी निघाल्या. सध्या त्यांचे काय चाललेय, मी काय करतोय, मुलांचं काय चाललंय, कोण शिक्षक आता कोठे आहेत वगैरे बरेच बोलून झाल्यावर ते म्हणाले, एक विचारु, तू शाळेत जे करायचास, मुलांच्या गराड्यात असायचास, त्यावरुन तुझा पिंड हा आदर्श शिक्षकाचा आहे, असे आम्हाला वाटायचे. आता एवढ्या वर्षांनंतर तुला काय वाटते? तू जो मार्ग पत्करलास त्याने तुला अधिक समाधान दिले की तू शिक्षक राहिला असतास तर अधिक समाधानी झाला असतास?

मी दचकलो. पण उत्तर लगेच दिले. म्हणालो, आयुष्याचे सार्थक म्हणून काही असते. मी जो मार्ग पत्करला, तो आयुष्य सार्थकी लावायचा होता. व्यक्तिगत अभिरुची, आवड यापेक्षा कर्तव्य मोठे समजणाऱ्यांची परंपरा मानणारा मी आहे. त्या सार्थकतेच्या दिशेनेच माझा प्रवास झाला. मी समाधानी आहे. पण, एक कल्पना म्हणून, मला सर्वसाधारण आयुष्य जगायची पुन्हा पहिल्यापासून संधी मिळाली, तर ज्यात मला आनंद मिळेल व समाजालाही उपयुक्त ठरेल, असे काम म्हणून मी शिक्षक होणेच कबूल करेन. तुम्ही म्हणता तसा तोच माझा पिंड आहे. 

काही वेळाने पुढे प्रत्यक्ष भेटायचे ठरवून आमचा फोन थांबला. 

उत्तर देऊन झाले. खरे तेच बोललो. तरीही खपली निघाली ती निघालीच. माझ्या भोवती मुलांचे अन् माझे मुलांभोवती रुंजी घालणे, बागडणे, सहली, रिकाम्या तासाला मुलांनी मला ओढून वर्गावर नेणे, स्नेहसंमेलने, त्यातील कार्यक्रम बसविणे, शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे रमणे इ. कितीतरी आठवणी अंगावर चाल करुन आल्या. इंदिरा संतांच्या या ओळींनी आगंतुकपणे माझ्याभोवती आता फेर धरला आहेः 'अंधाराने कडे घातले घराभोवती, जलधारांनी झडप घातली कौलारांवर, एकाकीपण आले पसरत दिशादिशांतुन...घेरायास्तव'

असो. सकाळपर्यंत थांबेल हे. असे होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
- सुरेश सावंत

No comments: