‘दादरी येथील हत्याकांड आणि पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे यासारख्या घटना अतिशय दुर्दैवी अशाच आहेत. पण, त्या घटनांचा संबंध केंद्र सरकारशी जोडणे मुळीच योग्य नाही. भाजपा केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या घटना घडत आल्या आहेत. त्यावेळी ढोंगी धर्मनिरपेक्षवादी शांत राहायचे. आता भाजपा सत्तेवर असल्याने ते या घटनांना जातीय रंग देत आहेत’ - नरेंद्र मोदी (‘आनंद बाजार पत्रिका’ या बंगाली दैनिकाला दिलेली मुलाखत)
यापूर्वीच्या व आताच्याही बहुसंख्य घटना या भाजपच्या भावकीतल्या संघटनांनी व त्यांच्याच प्रवृत्तीच्या दुसरीकडच्या कट्टरपंथीयांनी समाजात जे सांप्रदायिकतेचे विष भिनवण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्यातून झालेल्या आहेत. नरेंद्र दाभोलकर किंवा कलबुर्गी यांची हत्या ज्या राज्यांत व काळात झाली त्यावेळी भाजपचे तिथे सरकार नसले तरीही याच मंडळींनी निर्माण केलेल्या विषाक्त वातावरणाचे ते बळी आहेत. आता तर भाजप (म्हणजे हीच सगळी भावकी) सत्तेत आल्याने त्यांचा उन्माद अधिकच वाढला आहे. परिणामी वातावरण अधिकच विषाक्त होत आहे. त्यामुळे राज्यात आमचे सरकार नाही किंवा पूर्वी आम्ही सत्तेत नव्हतो, ही मोदींची तांत्रिक कारणे पूर्णतः गैरलागू आहेत.
वल्लभभाई पटेल हे भाजपचे हल्ली आराध्य दैवत आहे. या वल्लभभाईंनी गांधीहत्येच्या संदर्भात त्यांच्याच परिवारातील श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या पत्रातील खालील मजकूराविषयी मोदींचे काय म्हणणे आहे?
'रा. स्व. संघ व हिंदू महासभा या संघटनांच्या व विशेषतः संघाच्या कारवायांमुळे देशात जे वातावरण तयार झाले होते, त्यामुळेच गांधींच्या खुनासारखे घृणास्पद कृत्य घडू शकले. हिंदूमहासभेला मानणारा अतिरेकी गट गांधीखुनाच्या कटात सामील होता, याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. रा. स्व. संघाच्या कारवाया या राज्य व सरकार दोहोंच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरणाऱ्या आहेत.' (वल्लभभाई पटेल पत्रसंग्रह, खंड ६, पान ३२३, नवजीवन प्रकाशन, १९७३)
गांधीहत्येवेळी तर काँग्रेस सत्तेवर होती. हत्या दिल्लीत झाली. दिल्ली केंद्राच्या ताब्यात होती. नेहरु पंतप्रधान व स्वतः वल्लभभाई गृहमंत्री होते. त्या अर्थाने गांधीहत्येला तेच जबाबदार होते, असे मोदींनी म्हणायला हवे. या खूनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नथुराम गोडसेने केली असली तरी असा खून करण्यासाठी पोषक विषाक्त वातावरण ज्यांच्या कारवायांनी तयार केले गेले त्या हिंदू महासभा व रा. स्व. संघाला वल्लभभाईंनी स्पष्टपणे जबाबदार धरले आहे.
मोदी वल्लभभाईंचे शिष्योत्तम स्वतःला म्हणवत असतील, तर आपल्या या गुरुचा तर्क त्यांना मान्य आहे का? नसल्यास, वल्लभभाईंची ही मीमांसा आम्हाला मान्य नाही. आधुनिक भारताचा पाया घालणारे नेहरु मरणोत्तरही आम्हाला छळत आहेत. त्यांनी घट्ट केलेली भारताची सहिष्णू-सेक्युलर वीण अजूनही आम्हाला पूर्णतः उसवता येत नाही. उलट, मनात नसतानाही नाईलाजाने देशी-परदेशी जाहीर भाषणात तेच बोलावे लागते. म्हणून त्यांना बदनाम करुन संपविण्यासाठी कधी वल्लभभाई तर कधी नेताजी आम्ही हवे तेव्हा दत्तक घेतो, हवे तसे वापरतो, हे सांगण्याचा ५६ इंची बाणेदारपणा मोदी दाखवणार आहेत का?
- सुरेश सावंत
No comments:
Post a Comment