Sunday, October 25, 2015

पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक-कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी विवेकवादी नागरिकांचे निदर्शन

देशातील अविवेकी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक-कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी

विवेकवादी नागरिकांचे निदर्शन

गुरुवार, ५ नोव्हेंबर, दु. ३ वा., आझाद मैदान, मुंबई


आमची भूमिका व आवाहन

विचार पटत नाहीत म्हणून साहित्यिक-विचारवंतांचे खून, आमच्या धर्मश्रद्धांना मंजूर नसलेले गोमांस खाल्लेत अथवा खात असल्याचा संशय-अफवा यावरुन हजारोंच्या जमावाने अल्पसंख्याक समूहातील व्यक्तींच्या घरादाराचा विध्वंस करुन तर कधी रस्त्यात गाठून निर्घृणपणे हत्या करणे, दलितांविषयीची तुच्छता व संताप यामुळे रात्री झोपेत असलेल्या दलित कुटुंबाच्या घरात पेट्रोल टाकून दोन लहानग्यांना निर्ममपणे जिवंत जाळणेआरक्षणाच्या फेरविचाराची गोंधळ वाढवणारी चर्चा सुरु करुन सामाजिक विद्वेष भडकवण्याचा प्रयत्न करणे अशा असंख्य घटना हा देशात सध्या अपवाद नव्हे, तर परिपाठ झाला आहे.

हिंदू कट्टरपंथीय व त्याला प्रतिसाद देणारे मुस्लिम कट्टरपंथीय यांच्या संयुक्त प्रयत्नांनी देशातील वातावरण कलुषित होणे हा आपला जुना अनुभव आहे. याआधीच्या राज्यकर्त्यांनी या विष पेरणाऱ्या शक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात अनेकदा कमकुवतपणा दाखवला व त्यामुळे त्यांची ताकद  वाढली, हे खरे आहे. तथापि, या राज्यकर्त्यांचे सांप्रदायिकतेचे विष पेरणे अधिकृत धोरण नव्हते. सध्या प्रचंड बहुमताने केंद्रात निवडून आलेल्या भाजपचा व त्यांच्या संघपरिवाराचा इतिहास पाहता सांप्रदायिकतेला व हिंदू प्रभुत्ववादाला चालना देणे हे त्यांचे अधिकृत धोरणच आहे. पंतप्रधान अथवा भाजपच्या प्रवक्त्यांचे जाहीर निवेदन काहीही असो, त्यांचे खासदार म्हणून लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या साधू-साध्वींची, मंत्र्यांची आगलाऊ, चिथावणीखोर तसेच अल्पसंख्याक व दलितांची मानहानी करणारी विधाने राजरोस चाललेली असतात.

तुम्ही घेतलेल्या घटनेच्या शपथेच्या हे विरोधात असल्याचा आरोप लावून पंतप्रधानांनी यांपैकी एकाचाही राजीनामा घेतल्याचे उदाहरण नाही. परदेशात बुद्धाच्या-गांधीजींच्या देशातून आल्याचे ते अभिमानाने सांगत असतात. मात्र या महामानवांनी प्रचारलेल्या करुणेला ते मान देतात, असे दिसत नाही. अत्याचार पिडितांना भेट देण्याची अथवा त्यांच्याशी सहवेदना प्रकट करण्याची त्यांनी तातडी दाखवल्याचे अजून एकही उदाहरण नाही.

वास्तविक, या वेळच्या निवडणुकीत मोदींच्या नावाने जे भरघोस मतदान झाले, त्यातून त्यांच्याकडे मोठी नैतिक व राजकीय ताकद तयार झाली आहे. तथापि, त्यांच्या परिवारातील या उपद्रवी मंडळींना ते या ताकदीचा वापर करुन आळा घालत नाहीत. त्यांना तो घालायचाच नाही, असे यावरुन दिसते. राष्ट्रीय स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या प्रदीर्घ संघर्षातून लोकशाही, धर्मनिरपेक्षता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये उत्क्रांत झाली व पुढे संविधानाचा पाया बनली. ही मूल्ये निर्माणाची प्रक्रिया ज्या स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या आंदोलनांत चालली होती, त्याच्या कायम विरोधी राहण्याचेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले आहे. ते आमचे चुकले अशी कधीही आत्मटीका त्यांनी केलेली नाही. लोकशाही प्रक्रियेचा वापर करुन आपले प्रभुत्ववादी राजकारण करण्याचा त्यांचा डाव आहे. संघपरिवाराच्या घटकांकडून देशाची सहिष्णू, सेक्युलर व सामाजिकी न्याय यांची वीण उसवायचे सध्या जे जोरदार प्रयत्न चालू आहेत, तो या त्यांच्या धोरणाचाच भाग आहे, असे म्हणावे लागते.

वर नमूद केलेल्या या अतिशय गंभीर व चिंताजनक वातावरणाने व्यथित होऊन देशातील व महाराष्ट्रातील साहित्यिक-कलावंतांनी आपले साहित्य अकादमीचे तसेच अन्य सरकारी पुरस्कार मिळालेल्या रकमांसहित सरकारला परत करण्याची भूमिका घेतली, असे आमचे मापन आहे. या साहित्यिक-कलावंतांनी गट करुन, बैठक करुन सामुदायिकपणे हा निर्णय घेतलेला नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या कारणांची त्यांची म्हणून विविध तपशीलांची निवेदने त्यांनी दिलेली आहेत. त्या तपशीलांविषयी काहींची वेगळी मते असू शकतात. त्यांविषयी ज्यांना शंका आहेत, अशी मंडळी त्यांना त्याबाबत विचारणाही करत आहेत.

आम्ही त्या तपशीलात जात नाही. आजच्या भयकारी बनत चाललेल्या वातावरणामुळे व सरकारच्या त्यातील प्रभावी हस्तक्षेपाच्या अनास्थेपायी अस्वस्थ होऊन या संवेदनशील कलावंतांनी सरकारच्या व समाजाच्या विवेकाला आवाहन करण्याचे ठरवले. आपला निषेध व आवाहन सरकार तसेच समाजापर्यंत पोहोचविण्याचे त्यांच्याकडे असलेले एक साधन म्हणून शासनाने दिलेले पुरस्कार शासनाला परत करण्याची प्रतीकात्मक कृती ते करत आहेत, असे आम्ही समजतो. तुम्ही आधी का नाही परत केलेत वा ते न करताही निषेध व्यक्त करता आला असता, आदि अनेक मते अनेकांची असू शकतात. त्याविषयी या कलावंतांनी उत्तरे दिली आहेत. पुढेही देतील. तथापि, त्यामुळे त्यांच्या आजच्या हेतूंविषयी संशय घेणे हे गैर आहे, असे आम्हाला वाटते.

पुरस्कार परत करण्याच्या मार्गाविषयी वेगळे मत असलेले, तथापि पुरस्कार परत करणाऱ्यांच्या इतक्याच तीव्र भावना व भूमिका असलेले साहित्यिक-कलावंत समाजात आहेत आणि ते त्यांचा निषेध विविध पद्धतीने व्यक्त करत आहेत. त्यांचाही आम्ही आदर करतो. पुरस्कार परत करणाऱ्यांपेक्षा कोणत्याही प्रकारे त्यांच्या भावना कमी प्रतीच्या आहेत, असे आम्ही मानत नाही. किंबहुना, समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने व पद्धतीने आजच्या विषाक्त होत असलेल्या वातावरणात हस्तक्षेप करायला हवा, अशीच आमची अपेक्षा आहे.

५ नोव्हेंबरचे हे निदर्शन हा विवेकी नागरिक म्हणून आम्ही आमच्या परीने करत असलेला असाच एक हस्तक्षेप आहे. आपल्या मनात काही किंतु-परंतु असू शकतात. पण आपण जर आमच्या हेतूंशी सहमत असाल, तर  आपण या निदर्शनांत जरुर सहभागी व्हावे. इतर समविचारी मंडळींनाही सहभागी होण्याचे आवाहन करावे. हे निवेदन फेसबुक, व्हॉट्सअप तसेच ईमेलद्वारे विस्तृत प्रमाणावर शेअर करावे.

आपण येत असल्याचे संपर्कासाठीच्या खालील मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर कळवावे, ही नम्र विनंती.

आपले,

संजय शिंदे, प्रफुल्ल शिंदे, वैभव छाया, जॉन अल्मेडा, राजू कोरडे, सुरेश सावंत, सुनील गजाकोश, देवचंद रणदिवे, निसार अली, बाळासाहेब पवार, ओमप्रकाश पासी, श्रीधर क्षीरसागर, वैभव मोरे

संयोजन समिती

विवेकवादी लोकशाही मंच
________________________________
संपर्कः sanjaysushma1991@gmail.com , 9820890318
प्रकाशकः संजय शिंदे, श्रमिक, रॉयल क्रेस्ट, लो. टिळक वसाहत, रस्ता क्र. ३, दादर (पूर्व), मुंबई- १४.

No comments: