Thursday, October 15, 2015

लोक पुरोगाम्यांकडे कसे पाहतात?

हा लेख लिहीत असताना ‘सनातन’च्या समीर गायकवाडला व आणखी तिघांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. त्यांची चौकशी चालू आहे. दाभोलकरांचे खूनी प्रदीर्घ काळ सापडत नव्हते. पानसरेंच्या खून्यांचेही तसेच होते की काय असे वाटत होते. त्यात कलबुर्गींच्या त्याच प्रकारे झालेल्या खूनाची भर पडली. अशा वेळी पानसरेंच्या खून प्रकरणात असे काही लोक पकडले जाणे ही आश्वासक बाब आहे. मुख्य म्हणजे ज्या हिंदू मूलतत्त्ववादी ‘सनातन’कडे पुरोगामी बोट दाखवत होते, त्याला या अटकेमुळे पुष्टी मिळाली आहे. राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने राजकीय दबाव अथवा आकसापोटी ही कारवाई झाली, असे म्हणण्याला आता जागा नाही. या अटकेचे पुढे, विशेषतः केस उभी राहताना-राहिल्यावर काय होईल, मालेगाव-समझौता एक्सप्रेस खटल्याप्रमाणे ही केस पातळ करण्याचे प्रयत्न होणार नाहीत ना, या शंका रास्त आहेत. पण ते सगळे पुढचे. तूर्त, भाजप सरकार या प्रकरणात तटस्थतेचा दावा करायला मोकळे आहे, हे निश्चित.

आपल्या उद्दिष्टाकडे सरकताना आपल्यातल्याच काहींचा बळी देणे अपरिहार्य आहे, ही संघाची धूर्तताही यामागे असू शकते. संघ जे बोलतो तेच त्याला म्हणायचे असते किंवा ताबडतोबीने जी कृती ते करतात तेच त्यांना साधायचे असते असा संघाचा इतिहास नाही. सोयीनुसार ते कसेही बदलू शकतात, काहीही बोलू, काहीही करु शकतात. त्यातून तार्किक निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. त्यांचा इतिहास, त्यांच्या गुरुजनांचे विचारधन यातील काहीही त्यांना त्याज्य वाटल्याचे त्यांनी जाहीर केलेले नाही किंवा कोणतीही आत्मटीका केलेली नाही. ते ज्या रणनीती वापरतात, त्यांच्या फळाची तातडीने अपेक्षा ते करत नाहीत. त्यांची सबुरी दीर्घ पल्ल्याची असते. त्यांच्या राजकीय साधनाचे-भाजपचे त्यांना हवे तसे भरभक्कम बहुमताचे सरकार केंद्रात आल्याने व पुढे एवढेच बहुमत मिळेल यावर विसंबणे बरोबर नाही हे त्यांना कळत असल्याने परिवारातील घटक अधिक सक्रिय होणे अगदी स्वाभाविक आहे. काही वेळा यातील काही घटक चेकाळतात किंवा चेकाळल्यासारखे दिसतात. तथापि, त्या सगळ्यांत एक मेळ असतो. संघपरिवार हा एक वाद्यवृंद आहे. त्यातील प्रत्येक घटकाचे आपले एक वाद्य, आपली एक भूमिका असते. परस्परांशी औपचारिक संघटनात्मक नाते नसले तरी ते परस्परांना पूरक असतात. इतरांना काही वेळा त्यात बेसूरपणा भले वाटला, तरी अंतर्गत त्यांचे सूर संवादीच असतात. काही जागा चुकल्या तरी सरसंघचालक हा नैतिक अधिकारी पुरुष आपल्या कटाक्षाने त्या लगेच दुरुस्त करतो. ते एक सैन्यदळ आहे. सरसंघचालक सेनापतीने वाटून दिलेले बुरुज प्रत्येकजण निष्ठेने सांभाळत असतो. त्यांच्या या लवचिक, सशक्त पिळामुळे समाजातील सौम्य हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांपासून कट्टर पंथीयांपर्यंत, सेवाभावी काम करु इच्छिणाऱ्यांपासून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांपर्यंत समाजातील विविध छटांचे लोक ते सामावून घेत असतात. आपला जनाधार वाढवत असतात.

पुरोगाम्यांच्यात याची चिंताजनक वानवा आहे. विचार थोर असून चालत नाही. तो रुजवण्यासाठी सुनियोजित प्रचार व संघटना असावी लागते. नाहीतर बी वाऱ्यावर उडून जाते. ते रुजत नाही. एकूणच भारतीय समाजाचे विविधतापूर्ण स्वरुप व आजवर प्रत्ययाला आलेली अंगभूत सूज्ञता या बळावर आपले सर्व काही चालू आहे. भारतीयांचे हे वैशिष्ट्य नादुरुस्त करण्याच्या प्रयत्नांनी काही वळसे पडतात. पण त्या सगळ्यांतून देश पुन्हा सावरतो. पण याला पुरोगाम्यांनी आपली ताकद समजू नये किंवा त्यावर कायमचा भरवसा ठेवू नये. ती आपल्या जमेची बाब असू शकते. पण ती बोनस समजावी. आपल्या ताकदीने व कौशल्याने आपण समाजाची ही घडी विस्कटू देणार नाही, हा निश्चय करण्याची गरज आहे. हा निश्चय परिणामकारक व्हायचा असेल तर आपल्या ताकदीला व कौशल्याला हानी पोहोचवणाऱ्या आपल्या कमजोऱ्यांचा वस्तुनिष्ठ शोध घेऊन त्या तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे.

आताच्या या समीर गायकवाडच्या अटकेनंतर ‘खरे सूत्रधार बहुजनांना हाताशी धरुन आपला कार्यभाग साधतात’ असा आरोप पुरोगामी वर्तुळांतून काहींनी सुरु केला. माध्यमांनी त्याला आणखी फोडणी दिली. ज्यांना पुरोगामी-प्रतिगामी हे शब्दही समजत नाहीत, असा समाज याकडे कसा पाहतो, त्याच्यावर आपल्या या वक्तव्याचा काय परिणाम होतो, डावपेच म्हणूनतरी लांब पल्ल्याचे यात काही हित आहे का, याचा ही पुरोगामी मंडळी काय विचार करतात हे मला कळत नाही.

आज समाज सरळ सरळ ब्राम्हण-ब्राम्हणेतर पद्धतीने विभागला गेलेला नाही. ज्याला ब्राम्हणी मूल्यविचार म्हणू तो मानणारे आता बहुजनांतही लक्षणीय आहेत व स्वतःच्या प्रेरणेनेच ते याचे वाहक-चालक झालेले आहेत. अशावेळी कोणीतरी ब्राम्हण सूत्रधार व बहुजन केवळ कठपुतळ्या आहेत, हे समाजाला समजत नाही. कारण तसे दिसत नाही. सरसंघचालक व मुख्य पदाधिकारी सोडले तर संघात व संघपरिवारातील अन्य संघटनांत पुढाकाराने असणाऱ्यांत ब्राम्हणच आहेत, असे आता दिसत नाही. (उद्या सरसंघचालक म्हणून ब्राम्हणेतर व्यक्तीची ते निवड करणारच नाहीत असे नाही. तेवढे ते लवचिक नक्की आहेत. त्या व्यक्तीत त्यांना सोयीचे ब्राम्हण्य ठासून भरलेले असले म्हणजे झाले.) पंतप्रधान मोदी तेली म्हणजे ओबीसी आहेत. त्यांना कोणी ब्राम्हण सूत्रधारांचे कठपुतळी म्हणणे म्हणजे कठीणच होईल. ते स्वतः सूत्रधारांतले एक आहेत. त्यांनी संघप्रणीत ब्राम्हणी विचार आत्मसात केला आहे, असे जरुर म्हणूया. पण कोणीतरी ब्राम्हण व्यक्ती वा समूह त्यांच्यावर अधिसत्ता गाजवतो आहे व त्याबरहुकूम ते वागत आहेत, असे समजणे ही आत्मवंचना ठरेल. या सूत्रधार ब्राम्हण व्यक्ती वा समूहाचा पर्दाफाश केला की बहुजन त्यांच्याबाबतीत निराभास होतील व आपल्या मूळ ‘पुरोगामी (?)’ भूमिकेवर परत येतील, ही आपण आपली फसवणूक करुन घेण्यासारखे आहे. आजच्या नाजूक स्थितीत ते बेजबाबदारपणाचेही आहे. हिंदूंतील प्रत्येक जातीत पुरोगामी व प्रतिगामी आहेत, अशी आजची स्थिती आहे. हिंदू मूलतत्त्ववाद्यांच्या (मग ते ब्राम्हण असोत अथवा ब्राम्हणेतर) आम्ही विरोधात आहोत, अशी सुस्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. ते लोकांना कळू शकते.

सनातनसारख्या संस्थांना ‘हिंदुत्ववादी’ म्हणून पुरोगामी संबोधतात तेव्हा त्यांना कडवे धर्मवादी किंवा मूलतत्त्ववादी असे म्हणायचे असते. सनातनही स्वतःला हिंदुत्ववादीच म्हणवते. हिंदू धर्माचे खरेखुरे अनुसरण करणारे असे त्यांना म्हणायचे असते. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे. म्हणजे त्यांचेही एक हिंदुत्व होते. पण त्यांचे हिंदुत्व सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव मानणारे होते. देशाच्या राजकीय व प्रशासकीय व्यवहारात ढवळाढवळ करणारे नव्हते. भागवतपंथीय वारकरी हिंदू (व म्हणून हिंदुत्ववादी) या ओळखीतच आज मोडतात. बौद्धत्ववादी, जैनत्ववादी, शीखत्ववादी असे त्या त्या धर्मातल्या कोणी स्वतःला म्हटले, तर ते प्रतिगामी ठरत नसल्यास हिंदूने मात्र स्वतःला हिंदुत्ववादी म्हटल्यास प्रतिगामी कसे ठरते, असा अनेक सामान्य हिंदूंना प्रश्न पडतो. हा देश फक्त हिंदूंचा नाही. पण तो हिंदूंचाही आहे. आणि हे हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या स्वतःच्या ओळखीला असे नकारात्मक मानले जाणे त्यांना मानवत नाही, असे अनेकांशी बोलताना लक्षात येते. (डॉ. आंबेडकरांनी सबंध हिंदूधर्मच- म्हणजे हिंदुत्वच नाकारले. त्यांनी बौद्धधम्म स्वीकारला. त्याचा अर्थ, संदर्भ हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण हे पाऊल न उचलणारे बहुसंख्य पुरोगामी हिंदू धर्मातच आहेत. त्यांपैकी कागदोपत्री धर्म न नोंदवणारे अपवादानेच असतील.) या हिंदूंपासून सनातनसारख्या मूलतत्त्ववादी हिंदूंना वेगळे काढण्याऐवजी सनातनलाच या सबंध हिंदूंचा-हिंदुत्वाचा ताबा आपण देत असतो, असे मला वाटते. पुरोगाम्यांची धर्मचिकित्सा न कळणाऱ्यांची समाजात आज बहुसंख्या आहे. अशावेळी पुरोगाम्यांकडून निषेधात्मक पद्धतीने होणारा हिंदुत्ववादी हा उल्लेख अपेक्षित परिणाम साधतो असे वाटत नाही. म्हणूनच यातही सुस्पष्टता आणून सनातन किंवा बजरंग दलसारख्यांसाठी हिंदू कट्टरपंथी किंवा मूलतत्त्ववादी अथवा यासारखे काही वेगळे संबोधन वापरायला हवे.

मूळात हिंदू ही संज्ञा नव्हतीच. सिंधू नदीच्या पलीकडच्यांना दिलेल्या नामाभिधानाचे ते अपभ्रंशित रुप आहे, ही व्युत्पत्ती पटवण्याची ही वेळ नव्हे. ते सावकाश करायचे काम आहे. आज हिंदूंतल्या पुरोगाम्यांनी स्वतःची हिंदू ही ओळख दाखवून हिंदूंच्या कळपातल्या या लांडग्यांना बाहेर काढायला हवे. आजचे प्राधान्य ते आहे. पण ते समजण्यात आपली पुरोगामी मंडळी गडबड करतात. सैद्धांतिक स्पष्टतेच्या या अस्थानी आग्रहाच्या तार्किक कर्कशतेतून आपण बाहेर यायला हवे.

‘लोकसत्तेत आलेले शेषराव मोरेंचे अंदमानच्या साहित्य संमेलनातील भाषण किती छान आहे नाही!’ हा अभिप्राय मी आमच्या सोबत्यांकडूनच ऐकला आहे. ती त्यांची प्रामाणिक, बाळबोध भावना होती. शेषराव मोरे हे ‘आपल्यातलेच’ (पुरोगामी छावणी) तलेच आहेत, अशी त्यांच्यापैकी काहींची समजूतही होती. त्यांच्याशी बोलताना नेहमीप्रमाणेच माझी दमछाक झाली. जातिव्यवस्था, जागतिकीकरण याबाबतची मोरेंची निरीक्षणे किंवा सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी ही मंडळी मोरेंशी सहमत होती. पुरोगाम्यांकडून काळ्या-पांढऱ्याऐवजी अनेक करड्या छटा असलेले बदलते वास्तव, त्यातील अंतर्विरोध नीट मांडले गेले असते, या मांडणीत सावरकरांना नाकारताना त्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून लोकांच्या मनात जो खोल ठसा आहे, त्याचा योग्य तो आदर राखला गेला असता, तर ही दमछाकीची वेळ बहुधा आली नसती.

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना झालेल्या विरोधाची कारणे सांगतानाही अशीच दमछाक झाली. तरी अलिकडेच कॉ. पानसरेंचे शिवाजी महाराजांवरील भाषण यातील काहींना ऐकवले होते. त्यांचे पुस्तकही वाचायला सांगितले होते. त्यामुळे थोडे सोपे गेले. पण सामान्यांना जर पुरंदरेंनीच सांगितलेला शिवाजी ठाऊक असला व डांगे किंवा पानसरेंचा शिवाजी पोहोचवायचा आपण फारसा प्रयत्नच केलेला नसला, तर ‘पुरंदरेंना विरोध का?’ याचे उत्तर ते ‘ब्राम्हण’ आहेत म्हणून, हेच लोकांपर्यंत पोहोचते. पुरोगामी हेच खरे जातियवादी आहेत, हे पटवायला भाजप सरकारला व संघपरिवाराला त्यामुळे सोपे झाले.

पुरोगाम्यांच्या या कमकुवत जागांबद्दल आत्मचिकित्सा म्हणून अजून बरेच लिहावे लागेल. ते यथावकाश लिहीन. तूर्त, या प्रतिकूल माहोलाचा नीट समज घेण्यासाठी आपल्या भोवतालच्या-जवळच्या मंडळींना सहाय्य करणे हा दिनक्रम म्हणून अंगिकारावा, अशी पुरोगामी सहकाऱ्यांना विनंती आहे. हे प्रासंगिक घटनांबाबत चर्चा छेडून करता येते. त्यासाठी भाषणे, लेख, माध्यमांना प्रतिक्रिया, शिबिरे, निदर्शने हीच साधने आहेत असे नव्हे. ते करावेच. ते करताना आपल्या सहवासात येणाऱ्या एकट्या-दुकट्या तरुण मंडळींशी अनौपचारिक बोलण्याचे विसरु नये एवढेच. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________________

(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, ऑक्टोबर २०१५)

No comments: