Saturday, January 30, 2016

लोक किती सहिष्णू आहेत!

आठवड्याभरापूर्वीची गोष्ट.

बेल वाजल्याने दरवाजा उघडला. बाहेर २०-२२ वयोगटातील मुले.

"काका, २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची माहिती द्यायला आम्ही आलो आहोत. आपण सकाळी सत्यनारायणाची पूजा व नंतर मुलांच्या-महिलांच्या स्पर्धा व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणार आहोत. स्टेज, डीजे धरुन यावेळी बराच खर्च येणार आहे. म्हणून ९०० रु. वर्गणी ठरवत आहोत."

तसे आम्ही या वसाहतीत नवीन. त्यामुळे इथल्या सणउत्सवांचा, रिवाजांचा मर्यादित परिचय. आपण राहतो तेथील सण-उत्सवांत सामील व्हायला हवे, ही माझी भूमिका जुनीच. पण सत्यनारायण आणि तोही २६ जानेवारीला आणि त्यासाठी ९०० रु. वर्गणी द्यायची याने मी आतून खवळलो. पण खवळणे बाहेरुन न दाखवण्याइतका मी संयमी आहे. तरुण मुले. समाजाचे, देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, अशी ही पिढी. त्यांना समजावणे ही आपली जबाबदारी आहे.

मी सुरु झालो, "हे बघा. मी महात्मा फुलेंचा अनुयायी आहे. मी सत्यनाराणाच्या विरोधात आहे. महात्मा फुलेंनी सत्यनारायणाबद्दल काय सांगितले ठाऊक आहे..."

मी बोलत होतो. शिक्षकापुढे मुकाट उभे राहून ऐकण्याच्या शिस्तीने ती मुले ऐकत होती. 

एक पॉज घेतला. आता नवीन मुद्दा.

"सत्यनाराणायचं हे पटलं तर घ्या. नाहीतर सोडा. पण २६ जानेवारी हा तर राष्ट्रीय सण. आपले राष्ट्र काही एका धर्माचे नाही. मग फक्त हिंदूंचा असलेला सत्यनारायण हा विधी त्या दिवशी करणे कितपत योग्य ठरते?...आणि हे बघा, वर्गणी एवढी देणे मला शक्य नाही."

एवढा वेळ गप्प असलेल्या मुलांतल्या एकाने चटकन विचारले, "मग तुम्ही किती देऊ शकाल?"

"दोनशे."

मी आता निगोशिएट करणार होतो. पण काही न बोलता मुले गेली. वर्गणीसाठी दोन दिवसांनी ती नक्की परत येणार हा माझा होरा होता. २५ तारखेला ती मुले आलीही. त्यांनी अदबीने मला आमंत्रण दिले.

"काका, सत्यनारायणाच्या पूजेला नक्की या."

वर्गणीचं ते काही बोललेच नाहीत.

दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीला सकाळी खिडकी उघडली तर आमच्या आवारात माझ्या खिडकीच्या समोरच दोन स्टेज. भटजीची सत्यनारायणाची तयारी सुरु होती. मी खिडकी लावून घेतली. पण आत नको इतक्या मोठ्या आवाजात सगळे ऐकू येत होते. सत्यनारायणाची कथा ऐकली. महाआरतीचे आवाहन ऐकले. नंतर मुलांच्या स्पर्धा, त्यांचे आनंदाने चेकाळणे सगळे ऐकू येत होते. टीव्हीचा आवाज मोठा केला. पण तरीही ऐकू येतच होते. संध्याकाळी महिलांचा हळदी-कुंकू. रात्री 'शांताबाई' व अन्य गाणी आणि नाच. डीजेने खिडक्यांच्या खाचा हादरत होत्या. हे सगळं काय चाललंय ते न बघताही कळत होतं. पण मधूनच कुतुहल जागे होई. खिडकी उघडावी वाटे. पण ते बरोबर होणार नाही. आपण वर्गणी दिलेली नाही. आपल्याला खिडकीत उभे असलेले त्या मुलांनी पाहिले तर... 

खिडकी नाहीच उघडली. रात्री उशीरा सगळे शांत झाल्यावर हुश्श वाटले.

दुसऱ्या दिवशी ती मुले पुन्हा दाराशी. 

"काका, काल तुम्ही नव्हता. हा तुमचा प्रसाद."

"............."

- सुरेश सावंत

No comments: