Sunday, January 24, 2016

राम गुहांच्या भाषणातील 'पक्ष व लेखक-कलावंताचे स्वातंत्र्य' या मुद्द्याविषयी

२३ जानेवारी २०१६
प्रिय स्नेही,

परवा मुंबई विद्यापीठात निखिल वागळेंच्या पुढाकाराने विजय तेंडुलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजिलेल्या रामचंद्र गुहांच्या 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेले ८ धोके' या विषयावरील व्याख्यानाला आपल्यापैकी अनेक जण उपस्थित होते. सध्याच्या काळात ज्यांचे लेखन व भाषण समाजाची सम्यक घडण करायला मदतनीस होते, अशांपैकी गुहा आहेत, असे मी मानतो. त्यांची अनेक मते मला पटतात. काहींविषयी मला वेगळेही वाटत असते. पण ते खूप मूलभूत नाही. तथापि, परवाच्या त्यांच्या भाषणातील एका आनुषंगिक मताबाबत माझ्या मनात मूलभूत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, ते आपल्याला सांगावे, असे मला वाटते. 'लेखक किंवा कलाकाराने पक्षाशी संबंध ठेवला तर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही अंशी तरी निश्चित परिणाम होतो. हे होऊ द्यायचे नसेल, तर त्याने कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवता कामा नये,'  या त्यांच्या मताविषयी मला प्रश्न आहे. खरे म्हणजे या क्षणी ते मला पटलेले नाही. काही संदिग्धता माझ्याही मनात आहे. आणखी काही मुद्दे, स्पष्टता यथावकाश इतर कोणाकडून आल्यास त्याविषयी मतनिश्चिती व्हायला मदत होईल. म्हणून, तूर्त ते प्रश्नचिन्ह आहे, असे मी म्हटले आहे.

आजचा राजकीय पक्षांचा (भांडवली तसेच डाव्या) व्यवहार पाहिला, तर असे बंधन येते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण तो व्यवहार झाला. गुहा व्यवहाराविषयी बोलत असते तर प्रश्न नव्हता. ते तत्त्व, सूत्र म्हणून ते मांडतात. जे कलाकार, लेखक राजकीय पक्षात सामील होतात, त्यांच्याविषयी त्यांना अनादर नाही. ती त्यांची निवड आहे. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे, म्हणून त्यांच्या या निर्णयाचा ते आदरच करतात. पण तरीही तत्त्व म्हणून कलाकाराने-लेखकाने स्वतंत्रच राहिले पाहिजे, असे ते मानतात. कलाकार-लेखकाने व्यापक राजकीय भूमिका घेऊ नयेत, यालाही त्यांचा विरोध नाही. ही भूमिका पक्षीय नको, असे त्यांचे म्हणणे आहे.

काल प्रश्नोत्तरांच्या वेळी नचिकेत कुलकर्णी (आमचा/आपला एक तरुण अभ्यासक मित्र) नेही प्रश्न विचारायला हात वर केला होता. पण वेळेच्या मर्यादेमुळे त्याला प्रश्न विचारायला संधी मिळाली नाही. मी औत्सुक्यापोटी त्याला तू कोणता प्रश्न विचारणार होतास, म्हणून विचारले. त्यालाही हाच प्रश्न विचारायचा होता. घाईत झालेल्या या आमच्या बोलण्यात त्याने कैफी आझमींचे, भीष्म सहानींचे नाव घेतले. त्यांना कोठे मर्यादा पडल्या असे त्याला म्हणायचे असावे. तू यावर लेख लिही, अशी मी त्याला सूचना केली. त्याला बहुधा ती कल्पना पसंत पडली, असा माझा अंदाज आहे. निघायच्या घाईत अधिक बोलता आले नाही.

त्याचा हा मुद्दा मला रास्त वाटतो. कैफी आझमी, भीष्म सहानी, बलराज सहानी, ए. के. हंगल या कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते, म्हणून मर्यादा पडल्या असे दिसत नाही. नारायण सुर्वे खाजगीत पक्षव्यवहाराविषयी किंतुपरंतु व्यक्त करत असत. पण त्यांच्या कवितांच्या कलात्मक मूल्यांवर त्याचा परिणाम झाला, असे मला वाटत नाही. इथे, कम्युनिस्ट पक्षांच्या व्यवहाराला सर्टिफिकेट मी देत नाही, हे लक्षात घ्यावे. व्यवहारात गडबडी झाल्या आहेत. होऊ शकतात. तत्त्व म्हणून पाहायचे तर वरील मंडळींच्या अभिव्यक्तीवर त्यांच्या पक्षसान्निध्यामुळे बंधन आले नाही, एवढेच मला सांगायचे आहे. कोणी रशिया-चीनमधील कम्युनिस्ट पक्षांच्या व्यवहाराविषयी बोलेल. जरुर बोलावे. अॅन रँड (Ayn Rand)सोव्हिएट सोडून अमेरिकेत गेल्याने तिचे आविष्कार स्वातंत्र्य बहरले, याविषयी तिने व इतरांनी जे म्हटले आहे, त्याविषयीही मला काही म्हणायचे नाही. ती चर्चा जरुर व्हावी.

पक्षाशी जोडले गेले की प्रतिभेच्या आविष्काराचे स्वातंत्र्य गडबडते, त्याला तडजोड करावी लागते, या तत्त्वाबाबत मला प्रश्न आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य आणि विचारवंताचे स्वातंत्र्य यांच्या आविष्कारात फरक आहे. कलाकृती रुपकात्मक, सांकेतिक बोलते. तिचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जाऊ शकतो. विचारवंताला ती मुभा नसते. त्याचे म्हणणे शब्दशः असते. समजा विचारवंताची भूमिका व तो ज्या पक्षाचा असेल त्याची भूमिका यात विरोध, फरक असेल तर? असू शकतो. व्यक्तिगत भूमिका व अशा अनेक व्यक्तींच्या गटाची, पक्षाची भूमिका यात फरक असू शकतो. अनेकांच्या मतांची ती सामायिक सहमती असते. म्हणजेच तडजोड असते. ती अपरिहार्य असते. पक्षातच कशाला, संघटनेत, गटात, कुटुंबातही असा व्यवहार करावा लागतो. तो आवश्यक असतो. कोणताही सामुदायिक व्यवहार हा व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा तसे पाहिले तर संकोचच करतो. समाज चालण्यासाठी तो आवश्यकच असतो. मुद्दा आहे, मला एकाच वेळी व्यक्ती म्हणून व पक्ष, गट, समूह म्हणून म्हणणे मांडता येते का? यायला हवे. माझे वैयक्तिक म्हणणे हे आहे व माझ्या गटाचे सहमतीचे म्हणणे अमुक आहे, असे मांडता आले पाहिजे. पण ते कोठे, कधी याचे तारतम्य मात्र हवे.

विशिष्ट पक्षाचा, संघटनेचा प्रवक्ता म्हणून मी बोलत असेन तर तिथे त्या पक्षाची, संघटनेची सामुदायिक सहमतीची भूमिकाच मी मांडेन. तिथे कोणी तुमची वैयक्तिक भूमिका काय, असे विचारले तर आताचा हा मंच वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी नाही वा ते आता इथे अप्रस्तुत आहे, असे मी म्हणेन. हे म्हणताना मी माझ्या स्वातंत्र्याचा संकोच करत नाही, तर अधिक जबाबदारीने सामुदायिक शिस्त पाळतो.

ज्यांना अशा दोन भूमिका ठेवता येतात, हे कळत नाही, असे पक्षात लोक असले तर ते वैयक्तिक व सामुदायिक सहमती यात फरक करत नाहीत व आक्षेप घेतात. तो त्या पक्षाच्या धुरिणांच्या-कार्यकर्त्यांच्या समजाचा प्रश्न झाला. त्यामुळे काही वैयक्तिक भूमिका ही सामुदायिक भूमिकेत विसर्जित व्हायला हवी, असे तत्त्व तयार होत नाही.

समाजाची त्या विशिष्ट काळातली, त्या विशिष्ट संदर्भातली समजाची पातळी व विरोधकांचे डावपेच या पार्श्वभूमीवर 'सत्य ते कोठेही, कधीही वदणारच' असे करुन चालत नसते. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, समोर खांब आला तरी मी सरळच जाणार व त्याला धडकणार, असे करुन चालत नसते. त्याप्रमाणे 'इष्ट समयी इष्ट तेवढेच बोलणार' हेच योग्य ठरते.

या मुद्द्याच्या अधिक स्पष्टतेसाठी माझा दोन महिन्यांपूर्वी 'आंदोलन'मध्ये  लिहिलेला 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्वअट' हा लेख खाली देत आहे. तो वाचावा. आपल्यातल्या काहींनी तो आधी वाचलाही असावा.

पक्षाशी, संघटनेशी कोणताही संबंध न ठेवणारा व स्वमत बाणेदारपणे कधीही, कोठेही व्यक्त करणारा लेखक-कलावंत बाणेदार असू शकतो; पण योग्यअयोग्य वेळेचा, समाजाच्या समजाचा, कोणत्या शक्तींना बळ द्यायचे याचा अंदाज घेत समाजाला पुढे न्यायची प्रगल्भता त्यात असेलच असे नाही. अस्थानी बाणेदारपणाएेवजी योग्य वेळेची निवड करणारी प्रगल्भता मला महत्त्वाची वाटते. 

पक्षाशी संबंध म्हणजे अधःपतन व स्वतंत्र बाण्याने एकटे राहणे हेच श्रेष्ठ असे गुहांना नक्की म्हणायचे नाही. पण फार पाचपोच नसणाऱ्यांना वा नवागतांना त्याचा अर्थ तोच लागू शकतो. तसा अर्थ लागणे हे नुकसानकारक आहे, असे मला वाटते. आंबेडकर, गांधी, नेहरु, डांगे, मंडेला, एस. एम. जोशी या सगळ्या आदरणीय मंडळींना पक्ष होते, हे लक्षात ठेवायला हवे.

थांबतो. जे वाटले ते स्वैरपणे व्यक्त केले आहे. अधिक विचारांती पुन्हा कधीतरी यावर लिहीन.

सदिच्छांसह,
सुरेश सावंत
_____________________________________

मेलद्वारे आलेल्या काही प्रतिक्रियाः

सुरेश,
तुम्ही फार महत्वाचे लिहिले आहे. विशेषतः तुमच्या लेखातील खालील मजकुराशी शंभर टक्के सहमत आहे. संघटनेअंतर्गत अल्पमतवाल्यांना आपले वेगळे मत मांडण्याची व नोंदविण्याची (Dissent Note)  संधी असणे व बहुमताने झालेला निर्णय कुरकुर न करता अल्पमतवाल्यांनी सुद्धा अमलात आणायचा, आपले वेगळे मत कुठे आणि कसे व्यक्त करायचे याचा पाचपोच बाळगायचा. अंतर्गत विचारपीठ (फोरम) आणि सार्वजनिक विचारपीठावर बोलताना तारतम्य बाळगायचे व बहुमतवाल्यांनीही अल्पमत वाल्यांचा सन्मान राखायचा हे पाळले असते तर परिवर्तनवाद्यांच्या अनेक संघटना आता बहरत दिसल्या असत्या.......सुभाष वारे  

तुमच्या लेखातील खालील मजकुराशी शंभर टक्के सहमत आहे.  

कलाकाराचे स्वातंत्र्य आणि विचारवंताचे स्वातंत्र्य यांच्या आविष्कारात फरक आहे. कलाकृती रुपकात्मक, सांकेतिक बोलते. तिचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जाऊ शकतो. विचारवंताला ती मुभा नसते. त्याचे म्हणणे शब्दशः असते. समजा विचारवंताची भूमिका व तो ज्या पक्षाचा असेल त्याची भूमिका यात विरोध, फरक असेल तर? असू शकतो. व्यक्तिगत भूमिका व अशा अनेक व्यक्तींच्या गटाची, पक्षाची भूमिका यात फरक असू शकतो. अनेकांच्या मतांची ती सामायिक सहमती असते. म्हणजेच तडजोड असते. ती अपरिहार्य असते. पक्षातच कशाला, संघटनेत, गटात, कुटुंबातही असा व्यवहार करावा लागतो. तो आवश्यक असतो. कोणताही सामुदायिक व्यवहार हा व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा तसे पाहिले तर संकोचच करतो. समाज चालण्यासाठी तो आवश्यकच असतो. मुद्दा आहे, मला एकाच वेळी व्यक्ती म्हणून व पक्ष, गट, समूह म्हणून म्हणणे मांडता येते का? यायला हवे. माझे वैयक्तिक म्हणणे हे आहे व माझ्या गटाचे सहमतीचे म्हणणे अमुक आहे, असे मांडता आले पाहिजे. पण ते कोठे, कधी याचे तारतम्य मात्र हवे.

विशिष्ट पक्षाचा, संघटनेचा प्रवक्ता म्हणून मी बोलत असेन तर तिथे त्या पक्षाची, संघटनेची सामुदायिक सहमतीची भूमिकाच मी मांडेन. तिथे कोणी तुमची वैयक्तिक भूमिका काय, असे विचारले तर आताचा हा मंच वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी नाही वा ते आता इथे अप्रस्तुत आहे, असे मी म्हणेन. हे म्हणताना मी माझ्या स्वातंत्र्याचा संकोच करत नाही, तर अधिक जबाबदारीने सामुदायिक शिस्त पाळतो.

ज्यांना अशा दोन भूमिका ठेवता येतात, हे कळत नाही, असे पक्षात लोक असले तर ते वैयक्तिक व सामुदायिक सहमती यात फरक करत नाहीत व आक्षेप घेतात. तो त्या पक्षाच्या धुरिणांच्या-कार्यकर्त्यांच्या समजाचा प्रश्न झाला. त्यामुळे काही वैयक्तिक भूमिका ही सामुदायिक भूमिकेत विसर्जित व्हायला हवी, असे तत्त्व तयार होत नाही.

समाजाची त्या विशिष्ट काळातली, त्या विशिष्ट संदर्भातली समजाची पातळी व विरोधकांचे डावपेच या पार्श्वभूमीवर 'सत्य ते कोठेही, कधीही वदणारच' असे करुन चालत नसते. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, समोर खांब आला तरी मी सरळच जाणार व त्याला धडकणार, असे करुन चालत नसते. त्याप्रमाणे 'इष्ट समयी इष्ट तेवढेच बोलणार' हेच योग्य ठरते.

----------------------------------------------

प्रिय सुरेश सावंत यांस,
स.न.
रामचंद्र गुहा यांच्या विधानावरचा तुमचा आक्षेप बरोबर आहे. गुहांच्या मनातली शंका अगदीच चूक आहे असं नाही, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं येऊ नयेत असं वाटत असेल तर लेखकाने कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवू नये, असं ते म्हणतात ते पटण्यासारखं नाही. याचा एक थेट व्यत्यास असा होतो की जे पक्षाशी संबंध ठेवतात ते राजकारणी वा राजकीय कार्यकर्ते ठरतात आणि तसे ते ठरले की लेखक म्हणून नालायक ठरतात. अशी भिंत देखील भेदभावाला खतपाणी घालेल. 
पक्षाशी संबंधित लेखकावर व्यक्त होताना मर्यादा येतात, असा जर गुहांच्या म्हणण्याचा अर्थ घेतला तर तो आजच्या काळात बरोबर आहे. किंबहुना राजकीय विचार प्रणाली मानणाऱ्या संघटनांशी संबंधित लेखकावर असा दबाव अप्रत्यक्षरित्या असतो. त्याच्यावर ज्या विचारप्रणालीचे संस्कार होतात तिचे आदर्श हे लेखकासाठी वंदनीय ठरतात आणि तो त्यांच्या विरोधात जाऊ धजावत नाही किंबहुना त्या आदर्शांनी आखून दिलेल्या चौकटीपलीकडे तो सहसा बघत नाही. सत्य त्याही पलिकडे असू शकतं असं मानायची त्याची तयारी असत नाही. पण हे सर्वसाधारण लेखकाच्या बाबतीत खरं आहे. ही सर्वसाधारणतेची पायरी ओलांडून पुढे जाणाऱ्या लेखकाला या चौकटीवर मात करावीच लागते आणि तो त्याचा आंतरिक झगडा असतो. तो सर्व इझम्सच्या चौकटे लांघून मानवतावादाकडे जाण्याचा प्रयास असतो. तो मानवतावाद या शब्दाच्या केवळ उच्चाराइतका सोपा नसतो.
रामचंद्र गुहा ज्या विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात बोलले त्या खुद्द तेंडुलकरांनी मला एकदा जे सांगितलं ते असं होतं की, 'लिहिताना तू कोणाचा नाहीस हे लक्षात ठेव.' ही अतिशय मोलाची गोष्ट आहे. आपण कोणत्या पक्षाचे असो नसो, संघटनांशी बांधिल असो नसो, मात्र जगताना आणि भोवतालचं जगणं बघताना आपली एक भूमिका तयार होत असते. कधी नकळतपणे तर कधी थेट आपण एखाद्या राजकीय विचाराशी, एखाद्या तत्त्वप्रणालीशी जोडले जात असतो. तिचा चष्मा चढवून सर्वत्र बघू लागलेलो असतो. हे देखील एक गरज आहे. त्या शिवाय आपल्या जगण्याची कक्षा व्यापक होत नाही. आपली भूमिका तयार होत नाही. कुठल्याही काळात भूमिका असणं आणि ती घेणं गरजेचं असतं. आणि कुठलीही भूमिका ही राजकीयच असते. पण सर्जनशील लेखन ही स्वायत्त गोष्ट आहे. तिच्या प्रदेशात जेव्हा तुम्ही शिरता तेव्हा आत झिरपलेल्या विचारांचा दाब कमी करून स्वतःलाच प्रश्न विचारावे लागतात. तिथे गोष्ट माणूस समजून घेण्याची असते आणि कोणताही माणूस हा विचारप्रणाली, मानसशास्त्राचे आडाखे, तर्काच्या खुंट्या यांच्या पार पलिकडे असतो. प्रत्येक माणूस हेच एक स्वतंत्र विश्व असतं आणि अशी अनेक विश्वं एकमेकांशी घसली जातात, संपर्कात येतात तेव्हा जगण्याचं एक जगडव्याळ रूप समोर दिसू लागतं. ते कवेत घेणं हा अत्यंत कष्टसाध्य प्रवास असतो. तो फारच कमी लोकांना जमतो. पण तिथवर पोचायची धडपड तर प्रत्येकालाच करावी लागते. या प्रवासात तुम्ही म्हणता तसं व्यक्ती आणि समष्टी या दोन्ही घटकांचं अस्तित्व मान्य करूनच चालावं लागतं. अर्थात हा प्रवास लेखकाला स्वतःचा स्वतःच करावा लागतो. तो करणाऱ्याला जे सत्य सापडतं ते मांडायचं धैर्य त्याचं त्यालाच कमवावं लागतं. त्यासाठी त्याला गुहांप्रमाणे उसने सल्ले देऊन उपयोगाचे नसतात. खरा लेखक आपल्याला सापडलेल्या सत्याची किंमत मोजायला तयार असतो. तो आजूबाजूला काय पर्यावरण आहे आणि काय शहाणपणाचं आहे याचा विचार करत नाही. जो आपल्या पक्षाला घबरून आपल्याला सापडलेलं सत्य सांगणार नाही तो खरा लेखक नव्हे. मग तो पक्षालाच काय कोणालाही घाबरेल. दबाव केवळ राजकीय पक्षांचाच असतो असं नाही, तो समाजाचा, कुटुंबाचा, व्यवहरातील नात्यांचा, संस्कारांचा कशाचाही असतो. हा दबाव घ्यायचा की नाही, हीच  लेखकाची पहिली कसोटी असते. असो.
तुमचं विवेचन सुंदर आणि विचाराला चालना देणारं आहे. त्याबद्दल धन्यवाद.
आपला मित्र
जयंत पवार

----------------------------------

अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत त्यापैकी किती जणांनी त्यावेळच्या सोव्हिएट राशियाचा चिकित्सक आढावा घेतला किंवा पक्षाला घ्यायला भाग पाडले? व्यापक दृष्ट्या डअवे असणे वेगळे आणि पक्षाच्या भूमिकेची चिकित्सा करणे वेगळे. पदाधिकारी असतांना तर वेगळे मत मांडणे शक्यच नाही. विचारपूर्वक, योग्य वेळी, योग्य प्रसंगी वगैरे प्रगल्भता आवश्यक आहेच. वि.का. राजवाडे, ढेरे वगैरे मंडळीवरही हिंदुत्ववाद्यांचे वार झालेच असते. त्यांच्या सनरक्षणासाठी  कोणता पक्ष पुढे आला असता?
छाया दातार

----------------------------


Praveen Bardapurkar Suresh Sawant....तुमच्या प्रतिपादनात तथ्य आहे-च 





No comments: