Saturday, January 30, 2016

शनिच्या फेऱ्यात पुरोगामी

शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावरुन महिलांना दर्शन घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाबाबत पुरोगामी वर्तुळात खूप गोंधळ आहे. पुरोगाम्यांत अनेक पीठे आहेत. काहींना वाटते, देवावर विश्वास ठेवणे, हीच अंधश्रद्धा आहे, तिथे अशा आंदोलनाला पाठिंबा देण्याचा प्रश्न येतोच कोठे? पुरोगामी निरीश्वरवादीच असतात, असायला हवेत, असे हे पीठ मानते. इतर अनेक गुण जुळले, तरी देव मानतो या एका कारणावरुन ते एखाद्याला त्याज्य ठरवतात. आंबेडकरी पीठाला तर जग बौद्धमय झाल्याशिवाय परिवर्तनाचे चक्र पूर्ण फिरणारच नाही, असे वाटते. बाबासाहेबांनी मंदिरप्रवेशाचे लढे सोडले, देवांच्या ३६ कोटी मांदियाळी असलेल्या हिंदूधर्मालाच त्यागले व बौद्ध धम्म स्वीकारला. त्यामुळे हिंदू देवळातील प्रवेशासाठीच्या कोणाच्याही लढ्याला पाठिंबा द्यायचा प्रश्नच संभवत नाही. असा निरर्थक लढा देणाऱ्यांनी लवकरात लवकर बौद्ध धम्मात धर्मांतरित होण्याशिवाय त्यांच्या उन्नतीचा दुसरा कोणताही मार्ग नाही. खरं म्हणजे, निरीश्वरवादी पुरोगाम्यांनाही ते ढोंगी समजतात. एकीकडे निरीश्वरवादी स्वतःला म्हणायचे व दुसरीकडे हिंदू धर्मातच राहायचे ही आंबेडकरी पीठाला शुद्ध दांभिकता वाटते. असे दोन्ही दगडांवर पाय ठेवणारे हे खरे पुरोगामी नाहीतच, असे त्यांचे म्हणणे असते. अर्थात, तथागताच्या करुणा, मैत्री, सब्बे सत्ता सुखी होन्तु वगैरे भूमिकांतून सभोवतालच्यांची मने परिवर्तीत करावी व असे होणे हाच खरा सद्धम्माचा प्रसार आहे, एवढी उसंत सध्याच्या गतिमान काळात त्यांच्याकडे नाही. त्याऐवजी लोकांनी साग्रसंगीत धर्मांतर करावे व लेखी बौद्ध व्हावे हाच जग बौद्धमय करण्याचा जलद व टिकाऊ मार्ग त्यांना वाटतो. ऐतिहासिक भौतिकवादी वर्गलढ्याच्या क्रांतिकारी शास्त्रावर आधारित व्यवहार करणाऱ्या ज्या डाव्यांना शनिसारख्या अंतराळात भ्रमण करणाऱ्या ग्रहगोलाला देवळात प्रस्थापित करणाऱ्यांच्या अशास्त्रीयतेबाबतच तुच्छता वाटत असते, त्यांनी अशा शनिच्या दर्शनासाठी आग्रह करणाऱ्यांना पाठिंबा देणे म्हणजे स्वतःचे अगदीच अधःपतन करुन घेणे आहे. महिलांचा हा लढा समतेसाठीचा असू शकतो, अशी मान्यता देणारेही पीठ पुरोगाम्यांत आहे. पण हा लढा शुद्ध, चारित्र्यवान पुरोगाम्यांनीच द्यायला हवा, याबाबत ते चोखंदळ आहेत. भूमाता ब्रिगेड हे जातियवादी संभाजी ब्रिगेडचेच पिल्लू आहे, त्या तृप्ती देसाईंची काँग्रेसशी सोयरिक आहे, त्यामुळे यात राजकारण आहे, शिवाय त्या स्टंटबाज आहेत, महिलांना पैसे देऊन त्यांनी सत्याग्रहाला आणले आहे, नाहीतरी निवडणुकीत पैसे वाटण्याचा उद्योग ही मंडळी करतच असतात...असे बरेच त्यांनी शोधलेले असते. तेव्हा अशांना पाठिंबा देणे म्हणजे आपल्या धुतल्या चारित्र्याला गटारात बुचकळणे नाही का? त्यामुळे तूर्त पाठिंबा वगैरे काही शक्य नाही. बाकी अनेक पीठे अशीही आहेत ज्यांचे अजून काही ठरत नाही. विचार चालू आहे. पाठिंबा द्यावा, असेही वाटते. पण इतर पीठे काय म्हणतील, याचीही काळजी वाटते. आपल्या पुरोगामीत्वाला उगीच बट्टा लागायला नको, आपण काही चुकीचे केले असे पुढे सिद्ध व्हायला नको. त्यामुळे सध्यातरी आपण शहाणपणाने गप्प राहावे, असे त्यांनी ठरवले आहे. हे असे असले तरी संविधानातील समतेच्या, उपासना स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर पाठिंबा द्यायलाच हवा, अशी भूमिका घेणारेही पुरोगामी आहेत. पण त्यांचे संघटित पीठ नाही. या सगळ्यात सन्मान्य अपवाद आहेतच. पण ते अपवादच.

पहिलाच परिच्छेद खूप लांबला. आता बदलतो.

तर मला वाटते-म्हणजे खूप काही वाटत नाही, एवढेच वाटते, की आपण भूमाता ब्रिगेडच्या या महिलांना पाठिंबा द्यायला हवा. आपण देव मानत नसलो, तरी जे देव मानतात, त्यांना विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. त्याचा आपण आदर करुन या मूल्यांच्या संरक्षणासाठी, स्त्रियांच्या समान हक्कांसाठी आपण पाठिंबा द्यायला हवा. हा लढा देणाऱ्या या मंडळींच्या चारित्र्याविषयी, त्यांच्या शैलीविषयी आपल्याला प्रश्न असला, तर सरळ त्यांच्यात सहभागी होऊ नये. त्यांच्या केवळ आताच्या मुद्द्याला आपली समग्र भूमिका विशद करुन बाहेरुन पाठिंबा द्यावा. आपापल्या ठिकाणी निदर्शने, पत्र परिषदा किंवा साधे निवेदन वर्तमानपत्रांत देणे या मार्गांनी हे करता येऊ शकते. संघटना म्हणून अंतर्गत सहमती नसेल, तर व्यक्तिगत पातळीवर समविचारी मंडळी सह्यांचे संयुक्त निवेदन काढू शकतात किंवा समाजमाध्यमांवर एकट्याचा पाठिंबा जाहीर करु शकतात. पाठिंब्याचा हा चहुबाजूंनी हाकारा प्रतिगाम्यांच्या बंदोबस्तासाठी खूप आवश्यक आहे. आपल्या गप्प राहण्याने काळ सोकावता कामा नये, ही खबरदारी घ्यायलाच हवी.

संविधानाने घटनात्मक मूल्यांचे दमन करणाऱ्या धर्मरुढींना स्वातंत्र्य दिलेले नाही. सांविधानिक अधिकारांचे हनन होत असेल, तर अशा धर्मकृत्यांत हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार आहे. पण हा अधिकार बजावण्याऐवजी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते म्हणून आम्ही अशा आंदोलनांना परवानगी देऊ शकत नाही, असे निमित्त करुन सरकार आपल्या कर्तव्यापासून हटते. मतांसाठी समाजातील कमकुवतपणाचे लांगूलचालन करण्याची, त्यांचा वापर करण्याची सत्ताधारी व विरोधक दोहोंकडच्या राजकारण्यांची जुनीच वहिवाट आहे. ती मोडली पाहिजे. आताही भूमाता संघटनेच्या महिला ज्या सनदशीरपणे आंदोलन करत होत्या, ते पाहिल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा भंग करत असल्याने त्यांना रोखावे लागले, हे सरकारचे म्हणणे हा मोठा भंपक विनोद वाटतो. घटनात्मक अधिकार डावलणाऱ्या शनिमंदिराच्या व्यवस्थापकांना आवरण्याऐवजी १४४ कलमाचा बहाणा करुन घटनात्मक अधिकार मागणाऱ्या भूमाता संघटनेचे आंदोलन मोडून काढणे हा सरकारचा व्यवहार सांविधानिक नैतिकतेचा अवमान आहे. सरकार अनेक पुरोगामी आंदोलनांबाबत असा व्यवहार करत असते, हा अनुभव आपल्याला नवीन नाही.

यानिमित्ताने फक्त शनि शिंगणापूरच नव्हे, तर अन्य देवळांतल्या तसेच केवळ हिंदूच नव्हे तर अन्य धर्मांतल्या स्त्रियांबाबतच्या दुजाभावाविषयी आवाज उठवायला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सर्व धर्मांतल्या सनातन्यांना चेपायची ही संधी गमावता कामा नये. हाजीअली दर्ग्यातील प्रवेशाविषयी मुस्लिम महिलांनी लागलीच आझाद मैदानात निदर्शन केले. ही खूप आश्वासक घटना आहे. आपले समज-गैरसमज, तात्त्विकता, पावित्र्य यांबाबतच्या गंडांच्या शनिफेऱ्यातून बाहेर पडून या घटनांचे मुक्तपणे स्वागत करायला हवे. त्यांच्या भोवती एक व्यापक संरक्षक कवच उभारायला हवे. प्राप्त स्थितीतले हे पुढे जाणारे अंकुर शोधणे व जोपासणे यालाच पुरोगामीत्व म्हणतात.

- सुरेश सावंत
sawant.suresh@gmail.com

No comments: