Monday, February 29, 2016

‘बोल्ड’ हे ‘ब्युटिफूल’च हवे



‘बाबा, एक फ्रेंड येणार आहे. आम्हाला काही discuss करायचे आहे.’ मुलाचा फोन.

माझा मुलगा ‘टीन’ वयोगटातला.

‘हो. येऊ दे की.’ मी.

बेल वाजल्यावर दरवाजा उघडला. समोर माझा मुलगा आणि एक मुलगी. मुलगी असणं मला अनपेक्षित होतं. फ्रेंड म्हणजे मुलगाच असणार असं मी गृहीत धरलं होतं. का? - माझा समज. संस्कार. मुलाचा मित्र मुलगाच असणार. जास्तीकरुन समाजात असंच असतं ना. आमच्यावेळी तर हे असंच अधिक होतं. शिवाय त्याने लिंगनिरपेक्ष फ्रेंड शब्द वापरला होता. मैत्रीण असे म्हटले असते, तर प्रश्नच नव्हता. मी काही जुन्या विचारांचा नाही. म्हणजे मुलाला मैत्रिणी असू नयेत, मुलाचे मित्र मुलगेच असावेत वगैरे. मलाही मैत्रिणी होत्याच की. पण आम्ही त्यांचा उल्लेख मैत्रिणी करायला कचरायचो. माझ्या वर्गातली, शाळेतली...असे काहीतरी सांगायचो. त्याही तसंच करायच्या. असो.

मुलगा व त्याची ‘फ्रेंड’ आतल्या खोलीत discuss करु लागले. मी बाहेर हॉलमध्ये माझ्या कामात. पण एक कान आत काय चालले आहे, त्याकडे होता. त्यांचे हसणे-खिदळणे कानावर पडत होते. त्यांना काही खायला द्यावे म्हणून आत गेलो. ती दोघं ‘पुरेसे’ अंतर ठेवून बसली नव्हती. मुलगे-मुलगे बसतील इतक्या सहजतेने बसले होते.

असाच दुसरा एक प्रसंग. आम्ही पुण्याला गाडी करुन चाललो होतो. एक जागा रिकामी होती. मुलाने विचारले, ‘एक फ्रेंड सोबत आली तर चालेल का? तिलाही पुण्यालाच जायचे आहे.’ आम्हाला काहीच प्रश्न नव्हता. एक जागा रिकामी जाण्यापेक्षा आपल्या संबंधातले कोणी त्या जागेवर येत असेल, तर चांगलेच होते. आम्ही रुकार दिला. ही ‘फ्रेंड’ दुसरी होती. Discuss वाली नव्हती. त्यांच्या गप्पा, त्यांच्यातले अंतर discuss प्रसंगाप्रमाणेच. इयरफोनचे एक टोक याच्या कानात तर दुसरे तिच्या.

तिसरा प्रसंग. ‘व्हॅलेंटाईन डे’चा. माझा मुलगा कॉफीचा भोक्ता. स्टारबक्स कॉफी शॉपचा परमनंट मेंबर असल्यासारखा तिथे जात असतो. तासनतास बसत असतो. त्याच्या म्हणण्यानुसार, लॅपटॉपवर काम करत असतो. मिटिंग करत असतो. Discuss करत असतो. आम्ही नाही इराण्याच्या हॉटेलमध्ये पडून असू. ५० पैश्यांच्या कटिंगमध्ये ३ जण. थोडी श्रीमंती असली की बनमस्का आणि आणखी चहा. आता इराणी बंद व्हायला लागलेत. जे कोणी शिल्लक आहेत, तिथे आता १५ रुपयाला चहा. भलताच महाग. कटिंग मिळत नाही. स्टारबक्समध्ये तर दीडशेच्या पुढेच कॉफी सुरु होते. पण तिथे महाग-स्वस्त तुलना करायला काळाचा अवकाशच नाही. हे प्रकरण अलिकडचे. (असावे. म्हणजे मला आधी माहीत नव्हते.) आणि आम्ही इराण्यावाले तिथे जाण्याचा संभवही कमी. तर, प्रसंग व्हॅलेंटाईन डेचा. स्टारबक्सच्या फुकट ट्रीटची ऑफर माझ्या मुलाला मिळाली. अट एकच ‘कपल’ने यायचं. आम्ही पती-पत्नींनी कान-मान उंचावली. आता हा कोणाला सोबत नेणार? त्याला विचारले. त्याने नाव सांगितले. ही तिसरीच कोणी मैत्रीण होती. तिलाच का? तर तिलाही कॉफीची आवड होती. आणि ती त्याच्याप्रमाणेच बरेच तास कॉफी पीत बसणार होती. कॉफीचे खरे दर्दी असेच असतात, हे आम्हाला ठाऊक नव्हते. बीअर-दारु पिणारे माहीत होते. त्यामुळे या निकषांवर स्टारबक्समध्ये यायला लायक व त्यावेळेस जी उपलब्ध असेल, अशी मैत्रीण त्याच्यासोबत गेली.

खरं म्हणजे, मला छान वाटले. असूयाही वाटली. आपल्याही अशा वेगवेगळ्या आवडीच्या मैत्रिणी होत्या. (त्यांना मैत्रिणी अशी जाहीर संज्ञा आम्ही वापरत नव्हतो, हे वर आलंच आहे.) काहींना साहित्यात-कवितांत रस होता. काहींना खूप गप्पा मारण्यात रस होता. काहींना चांगलेचुंगले पदार्थ करण्यात रस होता. काहींना नृत्य-गाणे-नाटकात रस होता. काहींना फिरण्यात रस होता. पण यापैकी आपल्या आवडीशी मेळ असणाऱ्या कोणाहीबरोबरोबर एकट्याने जाण्याचा योग येणे शक्य नव्हते. जायचे तर गटाने. याची एवढी सवय (किंवा धसका) आहे की, हल्ली सहकारी कार्यकर्ती/मैत्रीण (हल्ली मैत्रीण म्हणण्याइतपत आम्ही पुढारलो आहोत) एकटी सोबत असली तरी हॉटेलमध्ये जाताना अजून कोणीतरी सोबत असेल, याची दक्षता घेत असतो. आमच्या अध्यापक विद्यालयातील शिक्षिका शिकवताना एकदा म्हणाल्या, ‘..म्हणजे असे पहा. कोणी म्हणाले- माझ्या बायकोचा हा मित्र. तर कसे वाटेल?’ बायकोचा मित्र म्हणजे जणू तिचा प्रियकरच, असे त्यांना सुचवायचे होते, हे कळल्याने मला खूप निराश व्हायला झाले. मला काही मैत्रिणी होत्या. पण त्या सगळ्यांना मैत्रीण मानणे कठीण झाले होते. कोणातरी एकीलाच मैत्रीण म्हणू शकत होतो. अर्थात ती माझी प्रेयसी व्हायला हवी होती व पुढे तिच्याशी लग्नही व्हायला हवे होते. हे काही शक्य नव्हते. आम्ही मग बरेचदा काहींना राखीव करुन उर्वरित मैत्रिणींकडून रक्षाबंधन किंवा भाऊबीज करुन घेत असू. असे केले की आम्ही सेफ. तिच्या घरी मोकळेपणाने जात असू. शिक्षकांसमोरही आम्ही छान एकत्र वावरत असू. बाजारात खरेदीला एकत्र जात असू. मानलेली बहीण किंवा मानलेला भाऊ हे आमचे त्यावेळी संरक्षक कवच होते.

माझ्या मुलाला किंवा त्याच्या मैत्रिणींना ही सर्कस करावी लागत नाही, हे किती छान आहे. जसा मुलगा मित्र तशी मुलगी मैत्रीण. त्याच्या पाठीवर मी थाप मारेन तशी तिच्या मारेन. त्याच्या खांद्यावर हात ठेवेन, तसा तिच्या ठेवेन. ज्या मित्राशी ज्या बाबतीत माझे जुळते त्याच्याबरोबर मी ती गोष्ट करेन. त्याचरीतीने मी मैत्रिणीची निवड करेन.

स्त्रीला स्पर्श ही तर इलेक्ट्रिक शॉकसारखीच बाब वाटायची आम्हाला. अर्थात, स्त्री-पुरुष आकर्षणाचे वय सुरु झाल्यावर. त्या हॅंगओव्हरमधून मी अजूनही पूर्ण बाहेर निघालो नसेन म्हणा, म्हणूनच गाडीत बसताना सहकारी कार्यकर्तीला आपला स्पर्श कमीतकमी होईल, याची दक्षता घेत असतो. माझ्या या वागण्याची त्या थट्टा करत असतात. त्यांच्या दृष्टीने माझ्या या अतिरेकाचा त्यांना त्रासही होत असावा. एकतर एकदा चिडून म्हणाली, ‘तू जर असं करशील तर तुझ्या मांडीवरच बसेन.’ हे ऐकून सटपटलो होतो. दिल्लीला एका कार्यकर्तीने ‘hug’केले तेव्हा तो मला सांस्कृतिक शॉक होता. पुढे त्याची सवय झाली. जिच्याशी अधिक जवळची मैत्री झाली तिच्याशी बोलतानाही आम्ही ‘मेरे मेहबूब’मधल्या राजेंद्र कुमार-साधनासारखे दोघांत ५ फूट अंतर ठेवून बोलत असू. (आम्ही म्हणत असता एका विशिष्ट आर्थिक व सामाजिक स्तरातील हा अनुभव आहे, हे नमूद करायला हवे. माझ्या वयोगटातील अन्य स्तरांतील मंडळींच्या अनुभवांत फरक असू शकतो.)

या नवीन मुलांची ही नाती मोकळेपणाची आहेत, त्यातून जोड्या शोधण्याचा प्रयत्न करु नये, हे कळते. तरीही आम्ही त्यांच्या फेसबुकवरचे संवाद, फोटो तपासत असतो. ते तर कधी कधी अब्रम्हण्यम् वाटते. काय भाषेत (त्यात लैंगिक comments असतात) ही मंडळी बोलत असतात, काही सहन होत नाही. पण सांगताही येत नाही. अशीच comment मैत्रिणीच्या पोस्टवर आमच्या माहितीतल्या एका मुलाने केली. त्याच्या काकांनी वडिलधारेपणाने त्याला अशी भाषा न वापरण्याचा सल्ला फेसबुकवरच जाहीरपणे दिला. त्यावर त्या मुलाच्या मैत्रिणीनेच या काकाला प्रौढपणाने समजावले, ‘अंकल, यह कोई बडी बात नहीं.’ ...मी लक्ष ठेवतो. पण असा सल्ला देण्याचे धारिष्ट्य करत नाही.

काय आहे, चेतन भगतची ‘One night at call centre’ वाचल्यापासून थोडी धाकधूक असते. त्याच्या कादंबरीतल्या पोरी पर्समध्ये निरोध ठेवून असतात. कोणाशीही, कोठेही (अगदी गाडीतही) सेक्स करतात. ते वाचल्यावर आपली मुले-मुलीही असेच काही करत असतील, अशी दृश्ये डोळ्यासमोर तरळू लागतात. मोकळी मैत्री ठीक आहे. पण असे काही झाले तर काय?

शरीरसंबंध हे लग्नानंतरच असायला हवेत, ही धारणा आमच्या आत घट्ट असते. वास्तविक, शरीराच्या अन्य गरजांप्रमाणे ती एक, असेच त्याकडे पहायला हवे. अर्थात, यात अधिक जबाबदारी हवी. परस्परांविषयी एक जवळकीचे-प्रीतीचे नाते तयार झाल्यावरच या संबंधांतील रंगत वाढते, हे या पिढीने समजून घ्यायला हवे, हे नक्की. कोणाचे कितीजणांशी संबंध आले, लग्नाआधी की नंतर यावर नैतिकता ठरवू नये, हे बरोबर. पण नाते गंभीर व जबाबदार असायलाच हवे. 

कुटुंबव्यवस्था बदलत आली आहे. ती पुढेही बदलत राहणार आहे. ‘चारचौघी’ नाटकात नायिकेचा दोघा पुरुषांबरोबर एकत्र राहण्याचा निर्णय एक पती-एक पत्नी या नैतिक गृहितकाला धक्का देऊन जातो. पण त्या तिघांना जर ते चालणार असेल, तर इतरांना त्यात पडण्याचे कारण काय? त्यामुळे समाजाला काय त्रास होतो? तेच समलिंगी संबंधाचे आहे. हे संबंध ठेवणाऱ्यांची ती वैयक्तिक निवड आहे. ‘फायर’ सिनेमात हे संबंध दाखवल्यावर समाजात अस्वस्थता तयार झाली. टीका झाली. विरोध झाला. आता तर अशा संबंधांना प्रतिबंध करणाऱ्या ३७७ कलमाचा फेरविचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयात घाटत आहे. हे सुचिन्ह आहे. ‘पिकू’सारख्या सिनेमात नायिका virgin नाही, हे तिचा बापच सांगत राहतो. तिच्या नायिकापणाला त्यामुळे बाधा पोहोचत नाही. 

माझ्या मुलासारखा नव्या पिढीतील एक विभाग जातीपातींच्या स्वरुपाला बराचसा अनभिज्ञ आहे. हे एकापरीने चांगलेही आहे. जातींचा अंदाज घ्यायला म्हणून, त्याला त्याच्या मित्र-मैत्रिणींची नावे आम्ही विचारतो. पहिलेच नाव तो सांगतो. आडनाव विचारले तर त्याला बहुधा ते माहितच नसते. त्याच्या शाळेतही पहिल्या नावानेच हाक मारत. जी काही आडनावे त्याला माहीत असतात, ती लिहिलेली. त्यांचा उच्चार त्याने ऐकलेला नसतो. त्यामुळे ‘फडणवीस’ चा उच्चार तो ’फडनाविस’ असा करतो; तर ’कांबळे’ हे आडनाव ’कांबले’ असे उच्चारतो. वास्तविक, तो मराठी माध्यमातला आहे. पालकसभेत मुलांचे पेपर बघायला दिले जात त्यावेळी त्याने मराठी-हिंदीत उत्तम निबंध लिहिलेले मी वाचले आहेत. पण त्याचे हे मराठी माध्यम नावाजलेल्या इंग्रजी शाळेतले. त्यामुळे इंग्रजीचे वातावरण भोवताली व शाळाही मराठी माध्यमांतल्या मुलांचे इंग्रजी खास लक्ष देऊन करुन घेणारी. त्यामुळे त्याची आताची व्यवहाराची-मनोरंजनाची भाषा मुख्यत्वेकरुन इंग्रजी असते. त्याचे मित्रवर्तुळही त्याच प्रकारचे आहे. ही मंडळी मराठी जवळपास वाचतच नाहीत. (त्यामुळेच तर मी त्याची उदाहरणे बिनधास्तपणे या लेखात घेतली आहेत. तो हा लेख वाचणार नाही, हे मला ठाऊक आहे. मुद्दाम खोड काढायला कोणी निदर्शनास आणून दिला तरच.)

तर, माझ्या मुलाचा हा विभाग बव्हंशी जातपात न कळणारा आहे. आजच्या बाहेरच्या राजकीय वातावरणामुळे हिंदू-मुसलमान कळणारा आहे. पण त्याचा त्यांच्या संबंधावर परिणाम होत नाही. ही मंडळी त्या अर्थाने बरीचशी सेक्युलर आहेत. शहरात स्त्री-पुरुष संबंधांतला धीटपणा अमलात आणण्यासाठीच्या अनुकूल वातावरणात राहणारी. हे ग्रामीण वा अन्य आर्थिक-सामाजिक वातावरणातील मुलांना सरसकट लागू होणार नाही. पण तेथेही मुले-मुली बऱ्यापैकी धीट झालेली आढळतात. सर्व थरांतल्या मुलांच्या या धिटाईचे स्वागत करताना नातेसंबंधांतल्या जबाबदारीची व त्यातील सौंदर्याची जाणीव त्यांना करुन देणे निकडीचे आहे.

‘इन्ही लोगोंने ले लिना (हिंदीत ‘लिया’; अवधी बोलीत ‘लिना’) दुपट्टा मेरा’ असे पाकिजात मीनाकुमारी गाते तेव्हा, तिची ही शिकायत बाईचे शोषण करणाऱ्या पुरुषजातीविषयी, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेविषयी असते. माझा दुपट्टा (अब्रू) कोणी घेतला ते मला काय विचारता;  शिपाई, व्यापारी आणि तुम्ही स्वतःला विचारा, असे ती बजावत असते. स्त्रीचे दुय्यमत्व व शोषण हे शेकडो-हजारो वर्षांचे दुखणे आहे. मोकळ्या होत चाललेल्या वातावरणातही त्याची वेदना तीव्र आहे. दीपिका पदुकोणच्या पेहरावावर ट्विटरवरुन निरर्गल कॉमेंट करण्यात टाईम्ससारख्या प्रथितयश बातमीदार संस्थेचाही तोल जातो. अर्थात, दीपिकाही ‘हो. स्त्रियांना स्तन असतात. मी स्त्री आहे. मलाही स्तन आहेत व स्तनांमध्ये दरी.’ असे त्याला सणसणीत लगावते. दीपिकावर (खरं म्हणजे ९९ जणींवर) चित्रित झालेला My body, My mind, My choice हा अडिच मिनिटांचा लघुचित्रपट पुरुषप्रधानतेच्या मुस्काटात लगावलेली अशीच सणसणीत चपराक आहे. स्वतःच्या शरीरावरील अधिकाराविषयी, कोणाशी संबंध ठेवावे वा ठेवू नये याविषयी ती जे काही बोलताना दाखवले आहे, ते खूपच Bold आहे. पण गैर नाही. ते असंच्या असं आता अमलात आणलं पाहिजे किंवा येईल, असं नव्हे. तिच्या या भावनांचा उद्रेक पुरुषप्रधान व्यवस्थेतील ‘इन्ही लोगों’मुळे आहे, हे विसरता कामा नये.

या सगळ्या Boldnessचे, धिटाईचे आधी म्हटल्याप्रमाणे स्वागतच आहे. पण या धिटाईला जबाबदारीचे, परस्परांवरील प्रेमाचे कोंदण आवश्यक आहे. तरच हे ‘BOLD’ ‘BEAUTIFUL’ होईल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
______________________________________

साभारः मी मराठी, रविवार, २८ फेब्रुवारी २०१६

http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=940&boxid=55940529&ed_date=2016-2-28&ed_code=820009&ed_page=16

No comments: