अलिकडेच मी एक पोस्ट फेसबुकवर व व्हॉट्सअपवर टाकली होती. ती अशीः
‘माझ्या लहानपणी आमच्या वस्तीत दलित पँथरने व्हॉल्टेअरची जयंती साजरी केल्याचे मला आठवते. त्यावेळी हा कोण बाबा, त्याचा आमचा काय संबंध, बुद्ध फुले, शाहू, आंबेडकर यांच्या परंपरेशी त्याचे काय नाते हा प्रश्न आमच्या आया-बापांना तेव्हा पडला होता. या फ्रेंच विद्रोही विचारवंताने कॅथॉलिक चर्चच्या कर्मठपणावर कसा हल्ला चढवला होता वगैरे मांडत आपले जागतिक प्रगतिशील परंपरेशी नाते कसे आहे ते लोकांना पँथरच्या तरुण नेत्यांनी त्यावेळी लोकांना समजावून सांगितले. आम्हा मुलांना हे एकदम भारी, प्रेरक वाटले होते. आपला लढा केवळ आपल्या वस्तीत, शहरात, राज्यात नसून तो जागतिक आहे याचा विलक्षण अभिमान वाटला होता.
पुढे आम्ही नेल्सन मंडेलांच्या सुटकेवेळी असाच एक कार्यक्रम आमच्या वस्तीत केला होता. त्याहीवेळी हा कोण काळा बाबा, त्याचा आपला काय संबंध, तो येणार आहे का इथं..असे प्रश्न आम्हालाही विचारले गेले. मग आम्हीही जसं आमच्या पँथरच्या नेत्यांनी लोकांना समजावले होते तसे सविस्तर समजावून सांगितले. लोक उन्नत होऊन परतल्याचे आठवते.
...आपल्या थेट परंपरेतील महामानवांचे दिन साजरे करत असतानाच देश-विदेशातील ही व्यापक परंपराही लोकांपर्यंत नेण्याची जाणीवपूर्वक खटपट या काळात व्हायला हवी असे वाटते.’
यावर मला बऱ्याच स्वागताच्या प्रतिक्रिया आल्या. विरोधाची एकही नाही. पण ही पोस्ट मला का टाकावीशी वाटली त्याचे कारण त्यात नमूद केले असते तर मात्र असे सरसकट स्वागत बहुधा झाले नसते. ते आता नोंदवतो. कारण ते ‘कारण’ हाच या लेखाचा विषय आहे.
ज्या दिवशी ही पोस्ट टाकली तो दिवस सम्राट अशोक जयंतीचा होता. बौद्ध समाजातल्या (इथे बौद्ध याचा अर्थ बाबासाहेबांच्या आदेशाने, प्रेरणेने बौद्ध झालेला पूर्वाश्रमीचा महार समाज) काहींनी सम्राट अशोकाची जयंती साजरी करण्यासाठी लोकांना जोरदार आवाहन सुरु केले होते. त्याप्रमाणे काही ठिकाणी ती झाली. आता दरवर्षी तो परिपाठ सुरु होईल.
वास्तविक यामुळे एक बौद्ध या नात्याने मला आनंदच व्हायला हवा. पण तसे न होता माझ्या मनात अस्वस्थता दाटून आली. या अस्वस्थतेलाही एक क्रम आहे. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला जथ्याने बौद्ध लोक जात असतात, यामुळे मी अस्वस्थ होतो. रमाबाई आंबेडकरांची जयंती साजरी होऊ लागली आहे, त्यानेही मी अस्वस्थ होतो. एवढेच नव्हे; तर हल्ली ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर व धम्म चक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर उसळणाऱ्या गर्दीमुळेही मी अस्वस्थ होऊ लागलो आहे.
अस्वस्थतेचे कन्फेशन देतोच आहे, तर अजूनही काही बाबी नोंदवतो. जयंती तसेच तत्सम समारंभांत बौद्ध स्त्रियांच्या गळ्यात पांढरे मंगळसूत्र बघताना मला त्रास होतो. काही पुरुषांच्या गळ्यातील अशोकचक्र व बुद्धाच्या मूर्ती लटकणाऱ्या जाडजूड चैनी पाहून अति होते व हसू येते. बौद्ध विधीवेळी भीमस्तुती म्हणतात त्याही वेळी मला त्रास होतो. लग्नात नवरा-नवरीला जे कर्तव्य पालनाचे वचन घ्यायला लावतात त्यातील दोहोंच्या कर्तव्यातील फरकामुळे मला संतापायला होते. जयंतीच्या मिरवणुकांतल्या डिजेचा घणघणाटाने अनेकांचे डोके ठणठणते. त्या अनेकांत मीही असतो. गावी पंचक्रोशीत नसेल असे दिमाखदार भव्य बुद्धविहार बांधण्याचा संकल्प भावकीच्या बैठकीत होतो त्यावेळी बहुमताचा निर्णय मान्य करुन वर्गणी देण्याची तयारी मी दर्शवतो; तथापि, मला या संकल्पाशी सहमत होता येत नाही.
कन्फेशन थांबवतो. ही यादी अजून बरीच लांबेल. मुद्दा पोहोचण्यासाठी वरील यादी पुरेशी आहे. आता कारणाची चर्चा.
सम्राट अशोक निःसंशय एक महान सम्राट होता. २३०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या देवानाम् प्रियदर्शीने गिरनार येथील शिलालेखावर खोदलेला संदेश असा आहे – 'देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा सर्व संप्रदायांना मान देतो. संन्यासी आणि गृहस्थाश्रमी या दोघांनाही मान देतो. ...स्वत:च्या संप्रदायाची स्तुती न करणे, परसंप्रदायाची अवास्तव निंदा न करणे...अन्य संप्रदायांचा सुध्दा वाजवी सत्कार केलाच पाहिजे...एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत व मानावेत...’ या राजाची परंपरा अशी की त्याचे आजोबा जैन, वडिल वैदिक व तो स्वतः बौद्ध. पुन्हा त्याच्या घरात सगळेच बौद्ध नाहीत. त्यांच्या विभिन्न उपासनापद्धती. एक बौद्ध सम्राट स्वतःच्या धर्माचा प्रचार-प्रसार जरुर करतो; पण ना घरातल्यांना ना त्याच्या राज्यातल्या जनतेला आपल्या धर्माचा स्वीकार करायला भाग पाडत. उलट त्या सर्वांना उपासनेचे स्वातंत्र्य देतो व अन्य सर्वांना या स्वातंत्र्याचा मान राखायला, आदर करायला सांगतो. त्याच्या या महानतेमुळेच त्याचा सारनाथचा सिंहस्तंभ स्वतंत्र भारताची राजमुद्रा बनते, तर या स्तंभावरील धम्मचक्र आपल्या राष्ट्रध्वजाच्या मध्यावर झळकू लागते
अशा या महान राजाची जयंती साऱ्या राष्ट्रानेच साजरी करायला हवी. आज ती होते. पण चुकून कुठेतरी. ती मोठ्या प्रमाणात साजरी करुन त्याच्या व्यापक विचारांचे जागरण समाजात व्हावे या उद्देशाने आम्ही आजचे आंबेडकरदीक्षित बौद्ध त्याच्या जयंती उत्सवाचे आवाहन करत आहोत का? मला तसे वाटत नाही. हा महान राजा बौद्ध होता, त्याचे हे बौद्धपण आपण ‘क्लेम’ करायला हवे, हा हेतू इथे प्रबळ आहे. कोणी म्हणेल, ‘हेच व्यापक विचार आमच्या मनात होते, तुम्ही आमच्यावर संकुचितपणाचा आरोप करत आहात.’ अशांशी मला प्रतिवाद करायचा नाही. त्यांचे म्हणणे मी मान्य करतो. त्यांची खरोखरच तशी भावना असू शकते. पण हे अपवाद आहेत. अधिकतर लोकांचा हेतू हा संकुचितपणाकडेच कललेला दिसतो. जर तसे नसेल तर येत्या काळात सम्राट अकबराच्या जयंतीचेही आवाहन व्हायला हवे. कारण अशोकाशी वैचारिक साधर्म्य असलेला अकबर हा तसाच महान राजा होता. पण तो बौद्ध नव्हता. तत्कालीन मुस्लिम धर्ममार्तंडांशी पंगा घेत त्याने त्याचा वेगळा धर्म स्थापन केला होता.
श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य घटनेत बाबासाहेबांनी नोंदवले आहे. अशोक किंवा अकबराप्रमाणे आम्ही आमच्या घरच्यांच्या या स्वातंत्र्याचा आदर करतो का? आंतरधर्मीय लग्नात मुलगा बौद्ध असला व मुलगी अन्य धर्मीय असली तर लग्न हमखास बौद्ध पद्धतीनेच होते. आम्ही लग्न लावताना २२ प्रतिज्ञा देऊन तिचे धर्मांतरही करतो. या मुलीने आमच्या बौद्ध मुलाला वरताना तो बौद्ध आहे म्हणून निवडलेले नसते. तो तिला आवडतो. त्याच्याशी तिला लग्न करायचे असते. त्याच्या धर्माशी तिला काहीही लागते नसू शकते. अशावेळी तिचे धर्मांतर म्हणजे तिच्या उपासना स्वातंत्र्यावर आम्ही केलेले आक्रमण नव्हे काय? विशेष विवाह कायद्याखाली लग्न करु, ज्याचा धर्म त्याच्याकडे राहील, त्यांची होणारी मुले १८ वर्षांनंतर त्यांच्या धर्माचा निर्णय करतील, अशी भूमिका आम्ही का नाही घेत? संविधानकार बाबासाहेबांच्या जन्मापूर्वीच मृत्यू पावलेल्या त्यांच्या गुरुने-महात्मा फुलेंनी मात्र असे उपासना स्वातंत्र्य असलेल्या भिन्नधर्मीय सदस्यांच्या कुटुंबाचे स्वप्न रंगवले होते. आम्ही नवयानी बौद्ध अशा कुटुंबांना परवानगी देतो का? स्टीव्ह जॉब्स, सुरेश भट, रुपाताई कुलकर्णी किंवा रोहित वेमुलाची आई, एकनाथ आव्हाड, लक्ष्मण माने आदि मंडळींच्या बौद्ध धम्म स्वीकाराचे आम्ही दिल खोलून स्वागत करतो ते त्यांनी धर्मबदलाचे स्वातंत्र्य मोठ्या धीराने अमलात आणले यासाठी? मुळीच नाही. ते त्यांचा धर्म सोडून ‘आमच्या धर्मात’ आले याचा आम्हाला आनंद व अभिमान वाटतो. समजा आज एखाद्या बौद्धाने त्याला पटलेला एखादा धर्म स्वीकारला तर त्याचे (धर्मस्वातंत्र्य बजावल्याबद्दल) आम्ही अभिनंदन करु का? कठीण आहे. बौद्ध आई-बापाच्या पोटी जन्माला आलेला कोणी बंडखोर तरुण स्वतःला निधर्मी म्हणायला लागला तरी आम्हाला जाचते-डाचते. माणसे केवळ नास्तिक किंवा पुरोगामी असून आम्हाला चालत नाही. ती बौद्ध का होत नाहीत, असा त्यांना आमचा सवाल असतो. बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांनाच खरे नास्तिक किंवा पुरोगामी असल्याची मान्यता देणारे धर्मपीठ आम्ही तयार केले आहे.
कोणी म्हणेल आपल्या धर्माविषयीची ही भावना, हे वागणे तर सगळ्याच धर्मात असते. आम्हा बौद्धांनाच का दोष देता? हो. देतो. कारण दोहोंचा शब्दशः अर्थ एकच असला तरी आपण बौद्ध हा धम्म मानतो. धर्म नाही. ईश्वर, आत्मा यांसह अनेक पारंपरिक धर्मवैशिष्ट्ये नाकारून नीतीला आराध्यस्थान देणारा, विज्ञानाशी सुसंगती साधणारा धम्म एक विचार, भूमिका व जीवनशैली म्हणून आम्ही स्वीकारला. बाबासाहेब धम्म व धर्म यात फरक करतात तेव्हा त्यांना हे सर्व अभिप्रेत असते. दीक्षा घेण्यापूर्वी संविधान लिहिलेले आहे. दलित-पीडितांच्या उन्नतीचा संघर्ष संपलेला नाही. तो पुढे लढवायचा आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना ते मांडत आहेत. अशावेळी या सगळ्याला पूरक ठरणारा असा बौद्ध धम्म बाबासाहेब आम्हाला देतात. आज त्यातील हा हेतू धूसर होत जाऊन जो धर्म त्यांनी नाकारला त्या धर्माचेच स्वरुप आम्ही बौद्ध धम्माला देऊ लागलो आहोत.
बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला त्यावेळी पुरेसे प्रबोधन होऊन वैयक्तिकरित्या लोकांनी निर्णय घेतलेला नव्हता. तेवढा अवधीही बाबासाहेबांना नव्हता. कोणती तत्त्वे सोडायची व कोणती धरायची याबाबत लोकांची निश्चिती होती. आणि खुद्द त्यांचा परमप्रिय नेता बौद्ध व्हायला सांगतो आहे, हे त्यांना त्यावेळी पुरेसे होते. अशा काळात बाबासाहेबांनी जमेल तेवढी सूत्रे २२ प्रतिज्ञांद्वारे तसेच अन्य प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यापलीकडे काही करणे शक्य नव्हते. बौद्ध धम्मात प्रवेश केल्यानंतर दीड महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. अशावेळी या धम्मस्वीकारातील मर्म समजून त्याच्या व्यावहारिक विकासाची प्रक्रिया त्यांच्या जाणत्या अनुयायांनी चालवावयास हवी. त्यात आम्ही कमी पडतो आहोत. मंगळसूत्र हे पुरुषी वर्चस्वाचे चिन्ह आहे. ते प्रारंभीच्या टप्प्यात नाकारणे शक्य नव्हते. पण हळूहळू त्याबाबत लोकमानस तयार करायचा आम्ही काही प्रयत्न केला असे झाले नाही. त्यामुळे हिंदू धर्माहून आम्ही वेगळे कसे तर हिंदू स्त्रिया काळे मंगळसूत्र घालतात, म्हणून आम्ही पांढरे घालणार. धार्मिक कार्यात, उत्सवात आम्ही पांढऱ्या साड्या नेसतोच. पांढरा हा पवित्र रंग. म्हणून आमचे मंगळसूत्र पांढरे. यात केवळ रंग बदलला. ‘मंगळसूत्रा’मागचे मूळ सूत्र पुरुष माझा मालक हे तसेच राहते. लग्नात वर-वधू वचन घेतात, त्यात पतीने पत्नीला अलंकारादि बाबींनी संतुष्ट ठेवायचे असते व पत्नीने पतीने कमवून आणलेल्या संपत्तीचे रक्षण व घरच्यांचा मान राखायचा असतो. हल्ली दोघेही कमावत असताना हे वचन म्हणजे कर्मकांड नव्हे काय? आणि घरच्यांचा मान राखायची जबाबदारी ही फक्त पत्नीची कशी काय? पती-पत्नी हे मित्र असावेत असे बाबासाहेब म्हणतात, शिवाय घटनेत दर्जाची व संधीची समानता स्त्री-पुरुष दोहोंना दिलेली आहे. अशावेळी लग्नातली ही शपथ या मूल्यांशी सुसंगत नाही, हे आपल्याला का कळू नये? विभूतिपूजा नाकारणाऱ्या बाबासाहेबांची स्तुती करणारी भीमस्तुती आमच्या विधीचा भाग कशी काय असू शकते? धम्माचे विचार आत्मसात करण्याऐवजी दर्शनी बाबींवरुन आमचे बौद्धपण ठरु लागल्याने बुद्ध, अशोकचक्र ही चिन्हे असलेले दागिने वापरणे, भव्य विहार उभे करणे आम्हाला कळीचे वाटते.
भीमा कोरेगावचा पेशवाईविरोधात महार सैन्याने दिलेला ऐतिहासिक लढा संदर्भातच समजून घेतला पाहिजे. पेशवाईतील गळ्यात मडके व कमरेला झाडू बांधायला लावणाऱ्या मानवतेला काळिमा लावणाऱ्या नीच व्यवहाराबाबतची प्रचंड चीड या त्वेषाने लढलेल्या महार सैन्याच्या मनात होती. त्यांच्या या शौर्याला अभिवादन करताना या लढाईनंतर इंग्रजांच्या ताब्यात संपूर्ण देश जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाली याचीही नोंद आपल्याजवळ हवी. हा ऐतिहासिक अंतर्विरोध समजून घेणे सोडा, आता त्यास केवळ तीर्थयात्रेचे स्वरुप आले आहे. चवदार तळे, चैत्यभूमी, दीक्षाभूमी ही आता बौद्धांची धार्मिक तीर्थक्षेत्रे झाली आहेत. तेथे जाऊन वैचारिक प्रेरणा घेणे यापेक्षा भक्तिभाव प्रभावी होतो आहे.
आम्ही बौद्ध धम्म स्वीकारला. तो मला अमूक कारणांनी पटतो याची स्पष्टता, हा धम्म धर्म म्हणून नाही तर विचार म्हणून पसरला पाहिजे, त्यासाठी आमचे वागणे मैत्रीपूर्ण, सहिष्णू, करुणावंत व दुसऱ्याचा सन्मान करणारे असायला हवे. स्वतःच्या धम्माविषयी, भूमिकेविषयी हट्टाग्रही बनून स्वतःभोवती कोश उभा करण्याऐवजी विविध प्रकारचे पुरोगामीत्व संकलित करण्याची मधमाशी वृत्ती जोपासायला हवी. जे जे दलित, कष्टकरी, शोषित, पिडितांना पुढे जायला मदतनीस ठरेल; एवढेच नव्हे तर अख्ख्या मानवतेला उन्नत करेल अशा सगळ्या विचारांचा, सगळ्या महामानवांचा नीरक्षीर विवेकाने आपण पुरस्कार करायला हवा. ‘सब्बे सत्ता सुखि होन्तू’ या बुद्धाने दिलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने प्रस्थान करण्याची ती पूर्वअट आहे. अन्यथा धम्माकडून धर्माकडे ही घसरण अटळ आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
___________________________________
वाटसरु, १६ ते ३० एप्रिल २०१७
No comments:
Post a Comment