Thursday, May 4, 2017

..आणि बुद्ध हसला!

आजच्या वृत्तपत्राची हेडलाईन:
'रणभूमी आणि वेळ आम्ही ठरवू! जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेची किंमत मोजावी लागेल.. भारताचा पाकिस्तानला सज्जड इशारा.'
याचा अर्थ त्यांनी आमचे सैनिक ज्या क्रूरतेने मारले त्याच क्रूरतेने आम्ही तिकडचे सैनिक मारणार. यात या दोन देशांतील राजकारण ठरवण्यात ज्यांचा काहीही संबंध नाही अशी (मरण्या-मारण्याचा पेशा पत्करलेल्या) सैनिकांतली 'माणसे' मरणार. याआधी मेलीत. पुढेही मरणार. त्यांनी आमची माणसे मारली की आम्ही त्यांची मारणार. आम्ही त्यांची मारली की ते आमची माणसे मारणार. अखेर दोहोंकडची 'माणसेच' मरणार!. ..हा सूडाचा प्रवास असा कुठवर चालणार?
येत्या १० तारखेला बुद्धजयंती आहे. ती जगभर साजरी होणार. त्यानिमित्ताने जागतिक तसेच आपले राष्ट्रीय नेते (सरकारातील व सरकारात नसलेले) जनतेला शुभेच्छा देणार. बुद्धाच्या मानवतेच्या संदेशांची उजळणी करणार.
त्यात हा संदेश प्रमुख असणार:
| न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचनं । अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो |
‘वैराने वैर कधीच संपत नाही. ते अवैरानेच संपते आणि हाच सनातन धर्म होय.’ - तथागत गौतम बुद्ध
भारत हा खास बुद्धाचा देश. राष्ट्रपतींच्या आसनामागे तो असतो. आपली राजमुद्रा (सिंहस्तंभ) व राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र (धम्मचक्र) त्याच्याशी संबंधित. बुद्ध ही आपली राष्ट्रीय अस्मिता. मी बुद्धाच्या देशातून आलो असे आपले राष्ट्रप्रमुख जगात अभिमाने सांगत असतात.
बुद्धाचा रास्त अभिमान बाळगणारे हे नेते बुद्धजयंतीला संदेश देताना बुद्धाच्या वरील संदेशाचा अर्थ कसा लावणार ठाऊक नाही. पण मला मात्र ही अडचण येणार आहे. बुद्धजयंतीला एके ठिकाणी मला बोलायचे आहे. त्यावेळी मी वरील हेडलाईन व बुद्धाचा हा संदेश याची संगती कशी लावू? बुद्धाचे म्हणणे आजही मार्गदर्शक आहे हे मला लोकांना पटवून द्यायचे आहे.
'Need to kill व Will to kill' असा फरक करु? तो तर शाकाहार-मांसाहारातील द्वंद्व निपटण्यासाठी आहे. आम्ही स्वतःहून हल्ला करत नाही, पण कोणी आगळीक केली तर त्याची गय करत नाही, हे तत्त्व सांगू? यात राष्ट्रीय बाणा आहे. पण या सगळ्यात निरपराध माणसे मरणार त्याचे काय? ..आजच्या काळात त्याला इलाज नाही. ते अपरिहार्य आहे. जगाची ती रीती आहे. ..पण मग ही रीती व बुद्धाचा संदेश यांचे नाते काय? ..बुद्धाचा संदेश हे अंतिम लक्ष्य आहे. त्याकडे लगेच जाता येणार नाही. त्या दिशेच्या प्रवासात अशा विसंगती राहणारच. ..पण चर्चा हा मार्ग नाही का? ती तर करुच. ती आपण करतोच. पण आताच्या या प्रसंगात आपल्या जनतेला आम्ही 'बांगड्या भरलेल्या नाहीत' (स्त्रीत्व हे बुळगे व पुरुषत्व हे कर्तबगार) याचा प्रत्यय कसा देणार? तेव्हा जशास तसे उत्तर आधी देऊ. म्हणजे जेवढी त्यांनी मारली किमान तेवढी तरी 'माणसे' मारु. फारतर त्यांचे डोळे वगैरे नाही काढणार. चर्चा पुढे करायच्या आहेतच. त्याशिवाय पुढचा मार्ग कसा निघेल. त्यासाठी चर्चा हवीच.
...हो, अशी वळणे, वळसे घेत नक्की बोलता येईल.
युद्धाचा नाही पण माझ्या भाषणापुरता प्रश्न सुटला. समाधानाने वर पाहिले. ..समोरच्या मूर्तीतला बुद्ध हसत होता. लक्षात आले. हे नेहमीचे हसू नाही. मी चमकलो. बारकाईने पाहिले. त्याच्या अर्धमिटल्या पापण्यांतून विषाद झरत होता.
- सुरेश सावंत

No comments: