Wednesday, June 28, 2017

'माझ्या देशात' किती सुरक्षित आहे मी!

अखलाक, जाहीद, पेहलू खान...असे बरेच आणि आताचा कोवळा जुनैद यांची गत पाहता मी मुसलमान नाही ही किती भाग्याची गोष्ट आहे असे वाटते. मला घर भाड्याने किंवा विकत घेताना, देताना काहीही त्रास होत नाही. माझे आईवडील पुरोगामी नसल्याने (ते निरक्षर असल्याने त्यांना पुरोगामी म्हणजे काय हेही ठाऊक नव्हते) त्यांनी धर्म आणि नावाचा संबंध असता नये या उदात्त हेतूने किंवा मुस्लिम सुधारकांचे स्मरण म्हणून माझे नाव 'हमीद' वगैरे ठेवले नाही, हेही किती बरे झाले.

माझ्या आडनावावरुन मी बौद्ध (पूर्वाश्रमीच्या महारांतून बौद्ध झालेल्यांच्या पोटचा म्हणजे दलित) आहे हे कळत नाही, त्यामुळे माझ्याकडे बघणाऱ्या सवर्णांच्या नजरेत मला अजिबात काही 'वेगळेपणा' जाणवत नाही. किती हायसं वाटतं याने!

मुख्य म्हणजे मी कुठेही खेड्यातल्या अल्पसंख्य दलित वस्तीत राहत नाही. त्यामुळे मानहानी, असुरक्षितता मला कधी जाणवलीच नाही. मी इथे शहरात जिथे आमचा समाज लक्षणीय संख्येने राहतो अशा सुरक्षित ठिकाणी जन्मलो, वाढलो. आता वस्तीत राहत नाही. आमची चळवळही मजबूत नाही. पण तरीही गरज पडली की समाज धावत येतो याचा अनुभव आहे व पुढेही येईल याची खात्री आहे.

पुन्हा मी मराठी. म्हणजे परप्रांतीय नाही. त्यातही कोकणी. (मुंबई हा कोकणाचाच भाग असल्याने) मुंबई माझी हक्काची. त्यामुळे 'खळ्ळ खट्याक'ची भीती स्वप्नातही अनुभवता येत नाही.

शिवाय मी 'पुरुष' असल्याने 'बाई'पणाचे भोग माझ्या वाट्याला येणेच अशक्य!

मी फॅसिझमविरोधात बोलतो, लिहितो, चळवळीत सहभागीही होतो. पण मी इतका दखलपात्र वा प्रसिद्धही नाही की माझा खून होईल.

...खरंच 'माझ्या देशात' किती सुरक्षित आहे मी!

- सुरेश सावंत


______________________________________

कालच्या indian express मध्ये जुनेदच्या गावातील भयभीत लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर मला हे तीव्रतेने जाणवले. माझ्याच देशात माझे देशबांधव मला शत्रू समजतात ही त्यांची भावना, युध्द वा दंगलकाळात मुलाबाळांना सावधगिरीच्या ज्या सूचना द्याव्या लागतात, ती बाहेरून येइपर्यंत जी हुरहूर लागते ते वातावरण आज दैनंदिन आहे.

'भारत खरेच माझा देश आहे का?' हा प्रश्न या मुस्लिम मुलांच्या मनात तयार झाला व त्याला अतिरेकी प्रवृत्तींनी हवा दिली तर नवे अतिरेकी यातूनच तयार होणार आहेत. म्हणजे त्यांना आपण जन्म देणार आहोत. पर्यायाने आपणही असुरक्षित होणार आहोत.
 
९२- ९३ च्या दंगलीत धारावी व शिवाजी नगरमध्ये ही भावना मूळ धरताना आम्ही अनुभवली व त्याच वर्षीच्या १२ मार्चला झालेल्या बॉम्बस्फोटांनी त्याचे प्रत्यंतरही दिले. आज जे दोषी म्हणून सिद्ध झाले आहेत, ते कायद्याने योग्यच आहे. पण ज्यांनी 'मंदिर वही बनायेंगे' च्या रणभेरी फुंकत काढलेल्या रथयात्रेने देशभर उन्माद तयार केला, ज्यांनी 'एक धक्का और दो' चा आदेश देऊन मशीद पाडली, ज्यांनी सामना आणि नवाकाळमधून रोज गरळ ओकली ते या अतिरेक्यांचे खरे जन्मदाते आज मोकळे व प्रतिष्ठित आहेत. एव्हढेच नव्हे तर राज्य व देशाचे सत्ताधारी आहेत.

Tuesday, June 6, 2017

सहारनपूरः परिवर्तनवाद्यांना आव्हान



सहारनपूरमधील दलितांवरचा हल्ला, खून, त्यांच्या घरांची राखरांगोळी हे काही अपवादात्मक प्रकरण नाही. या आधी याहून कितीतरी भयानक हल्ले दलितांवर झालेले आहेत. जातिवादाची भारतीय मानसिकता व परंपरा पाहता नजिकच्या भविष्यात ते थांबतील असेही नाही. मग सहारनपूरच्या हिंसेचे वेगळेपण काय व त्यातून काही इशारा मिळतो काय? सरसकट वेगळेपण व आतापर्यंत न मिळालेला खास वेगळा इशारा त्यातून मिळतो असेही म्हणता येणार नाही. तथापि, त्यातून जे घटक एकत्रितपणे आज समोर येतात, त्यांचा अर्थ दलित व एकूणच पुरोगामी चळवळीला मार्गदर्शक ठरु शकतात.

उच्चवर्णीय जातिवादी मानसिकतेचे सूत्र कायम असले तरी त्याच्या भोवतालचे काही संदर्भ अलिकडे बदलत आहेत. एकूण विकासप्रक्रियेच्या क्रमात तथाकथित उच्चवर्णीय व दलित यांच्या आर्थिक व शैक्षणिक स्थितीत बदल होत आहेत. सहारनपूरच्या ज्या शब्बीरपूर गावात ५ मे चा पहिला हिंसाचार झाला व ५५ घरे जाळून टाकली गेली, त्या गावातील शिक्षित दलित मुलांपैकी ७५ टक्के मुले पदवीधर आहेत. अशा स्थितीत ही मुले पारपंरिक वर्णव्यवस्थेची उतरंड मानतील वा जातिगत व्यवसाय करतील ही शक्यताच नाही. ज्या ठाकूरांच्या डोळ्यांवर ही प्रगती येते त्यांची स्थिती काय? तर त्यांच्यातही मोठे बदल झालेत. विकासप्रक्रियेचा लाभ सगळ्याच ठाकूरांना सारख्या प्रमाणात मिळाला किंवा घेता आला असे नाही. त्यांच्यातले काहीजण श्रीमंत आहेत, परदेशातही आहेत. काही भारतात वेगवेगळ्या शहरांत व्यापारउदिमात आहेत. पण विकासाची गाडी सुटलेलेही लक्षणीय आहेत. गावात राहणाऱ्यांच्यात या विकासात मागे राहिलेल्यांचा भरणा मोठा आहे. त्यांच्या अंतर्गत असलेली ही विषमता त्यांना अस्वस्थ करते. पण त्याचे कारण सोयिस्करपणे दलित धरले जाते. दलितांचे शिक्षण, त्यांची नेटकी होणारी निवासस्थाने, नोकऱ्या यांचे कारण त्यांना राखीव जागा आहेत व प्रगत दलितही ते घेत आहेत, त्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही, असा सोयीचा तर्क या गावातल्या ठाकूर तरुणांच्या मनात हितसंबंधीयांकडून ठासला जातो. परिस्थितीचा ताण असला तरी जुना सरंजामी पीळ जात नाही, सामाजिकदृष्ट्या आपल्या खालच्या स्तरावर असलेले दलित पुढे जात आहेत व आम्ही मागे राहत आहोत, याच्या खऱ्याखोट्या आभासाचे ते भक्ष्य होतात. (आपल्याकडचे मराठा आंदोलन आठवा.)

यातूनच आंबेडकर जयंतीला शब्बीरपूरच्या रविदास मंदिराच्या आवारात उंच चबुतऱ्यावरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आक्षेप घेतला जातो. ठाकूरांचा पुतळ्याला आक्षेप नाही. तो उंचावर असण्याला आहे. कारण हे रविदास मंदिर तिठ्यावर आहे. तेथून ठाकूरांची जा-ये असते. त्यांना तो पुतळा उंचावर असल्याने दिसत राहणार. बाबासाहेब घटनाकार असले तरी दलित आहेत व त्यांच्या नाकावर टिच्चून पुढे जाणाऱ्या दलितांचे ते स्फूर्तिदाते आहेत म्हणून ठाकूरांना ते खिजवणारे वाटते. जवळच्याच घडकौली गावाच्या सीमेवर ‘द ग्रेट चमार’ ही मध्यावर मोठी अक्षरे व त्यांच्या वर दोन कोपऱ्यात जयभीम, जयभारत असे शब्द असलेल्या पाटीला असाच काही काळापूर्वी तिथल्या ठाकूरांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून तिथे तणाव तयार झाला होता.

अशी विद्वेषाला अनुकूल भूमी असली की काही विघ्नसंतोषी, अविवेकी, धन, वर्ण व पौरुषाचा माज असलेल्या नेतृत्वांची सरशी होत असते. शेरसिंग राणा हे असेच नेते. शेरसिंग राणा फुलनदेवींचा खूनी. ठाकूरांच्या अवमानाचा बदला घेणारा जुनाट मनोवृत्तीच्या ठाकुरांच्या दृष्टीने वीर. स्वतः श्रीमंत जमिनदार. जेलमधून काही काळ फरार. त्या काळात राणा प्रताप आदि ठाकुरांच्या अस्मितांच्या अफगाणिस्तानपर्यंतच्या खाणाखुणा जमा करत गूढ भटकंती. त्यानंतर अटक. जन्मठेप. आणि अलिकडे जामिनावर बाहेर. या काळात त्याने ठाकूरांचा राजपूत बाणा परजण्यासाठी ‘राजपूत रेजिमेंट’ तयार केली. ही बिहारमध्ये दलितांच्या कत्तली करणाऱ्या रणवीर सेनेच्या समकक्ष संघटना. ५ मे रोजीच्या राणा प्रताप जयंतीच्या शिमलाना गावातील महोत्सवाचा प्रमुख अतिथी असतात शेरसिंग राणा. या उत्सवाला पंजाब, हरयाणा अशा विविध राज्यांतून २५०० च्या वर राजपुतकुलीन जमलेले असतात. ३ किलोमीटरवरच्या शब्बीरपूर गावातून शिमलानाला मिरवणुकीने यायला निघालेल्या ठाकूरांशी डीजेवरुन बाचाबाची होते. त्याचे निमित्त साधून दलितांवर हल्ला होतो. दलित दगडांनी प्रत्युत्तर देतात. ठाकूर माघारी जातात. अधिक तयारीनिशी येतात. आता त्यांची संख्या वाढलेली असते. हातात गावठी बंदुका व फेकल्यावर लगेच पेटणाऱ्या रसायनांचे फुगे असतात. जाळपोळ, मारहाण, रविदासांच्या मूर्तीची तोडफोड होते. या तोडफोडीत सामील एका ठाकूर तरुणाच्या कपाळाला दगड लागतो. तो मरतो. (पोस्टमार्टेममध्ये तो दगडाने नव्हे तर श्वास कोंडून मेल्याचा निष्कर्ष निघाला आहे.) दरम्यान शिमलाना उत्सवात ही बातमी पोहोचते. ठाकुरांतले काही समजदार लोक आपण विचलित होऊ नये, आपल्यातले काही लोक शब्बीरपूरला काय झाले ते पाहायला गेले आहेत, आपण आपला कार्यक्रम चालू ठेवूया, असे आवाहन करत असतात. तथापि, मंचावर असलेले शेरसिंग राणा हे जुमानत नाहीत. ‘’आताच मोबाईलवर आपल्यातले ४ तरुण दलितांनी ठार केलेत, असे मला कळले आहे. अशावेळी मी इथे थांबून उत्सव करत राहणे मला अवमानकारक वाटते. आपण आपल्या शब्बीरपूरच्या बांधवांच्या मदतीला गेले पाहिजे.” असे एकप्रकारे जमावाला चेतवून ते मंचावरुन खाली उतरतात. शब्बीरपूरमध्ये व आसपास जो काही विनाश झाला, तो पूर्वनियोजित होता, असे या घटनाक्रमावरुन काही तटस्थ पत्रकार अनुमान काढतात. या पत्रकारांनी शेरसिंग राणाच्या घेतलेल्या ध्वनिचित्र मुलाखतीत ते स्त्रियांच्या व दलितांच्या आरक्षणाला आक्षेप घेताना दिसतात. त्यांच्या राजपूत रेजिमेंटने आरक्षणविरोधी मोहीम याच काळात जोरात सुरु केलेली आहे.

महत्वाचा नवीन संदर्भ म्हणजे केंद्रात व राज्यात या सगळ्या जुनाट सरंजामी तणांना पोषक सरकारे आली आहेत. अशा विद्वेषी राजकारणाचे मेरुमणी असलेले आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे मायावतींच्या २३ मे च्या शब्बीरपूरमधील सभेनंतर परतणाऱ्यांवर व त्यानिमित्ताने अन्य गावांतील दलितांवर जे हल्ले केले गेले व त्यात एका दलित युवकाचा खून झाला त्या दंग्यांत सहभागींची ‘अभी सरकार हमारी है और प्रशासन भी हमारा है’ ही वक्तवे अनेकांनी नोंदवली आहेत. मुसलमानांच्या विरोधात दलितांचा हिंदू म्हणून वापर व दुसरीकडे दलित म्हणून आमच्या बरोबरीला येता कामा नये यासाठीचा धडा या चालीला आता सरकारी वरदहस्त आहे.

या संघर्षात उतरलेली भीम आर्मी ही सहारणपूरच्या दलितांची महाराष्ट्रातल्या दलित पँथरची आवृत्ती. तोच विद्रोह, तोच जोश, अरेला कारे म्हणायची तीच जिद्द. पण महाराष्ट्रातल्या दलित पँथरच्या पतनाचे भवितव्य यांच्याही वाट्याला येणारच नाही असे नाही. त्यासाठी भीम आर्मीचे नेतृत्व किती सावध आहे, ते कळत नाही. काहीही असो. आज त्यांना सहाय्यभूत ठरणे व जोपासणे, नीट वळण मिळेल याची खटपट करणे गरजेचे आहे. तथापि, मायावती त्यांची भाजपचे पिल्लू म्हणून संभावना करत आहेत. स्वतःच्या नेतृत्वाला आव्हान म्हणून याकडे न बघता या नव्या स्फुल्लिंगाला वाव देऊन मायावतींनी पालकत्वाची भूमिका निभावणे ही काळाची गरज आहे.

निवडणुकांतील गणिते ध्यानात घेऊन ठाकुरांबद्दल आक्रमक वा सौम्य न राहता ठाकुरांच्यात ज्या आर्थिक श्रेणी तयार झाल्या आहेत, त्यात निम्न स्तरावर राहिलेल्यांच्या प्रश्नांना आवाज देणे, त्या प्रश्नांशी दलितांच्या प्रश्नांची सांगड घालणे, आरक्षणाबाबतचे गैरसमज दूर करणे, धार्मिक विद्वेषाविरोधात ठाम भूमिका घेणे आणि अशारीतीने एकूण व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी या सर्व पीडित घटकांना एकवटणे हे खरेखुरे आंबेडकरी राजकारण आहे. ते करण्यासाठी मायावती, भीम आर्मी व एकूणच परिवर्तनवादी शक्तींना सहारनपूरच्या हिंसेने एकप्रकारे इशाराच दिला आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
___________________________________

दिव्य मराठी, ६ जून २०१७

Thursday, June 1, 2017

कल्याण होवो माझे, तुमचे अन् शत्रूचे..!


ही एका छोट्या हस्तक्षेपाबाबतची निरीक्षणे आहेत. एरव्ही हा लेखाचा विषय बहुधा झाला नसता. तथापि, प्रगतीशील शक्तींच्यादृष्टीने वर्तमानातील प्रतिकूलतेचे तपमान एवढे चढले आहे की अशी एखादी हळुवार झुळूकही सुखावून जाते. हा लेख लिहिताना जो खरोखरीचा उष्मा अनुभवतो आहे, एखाद्या झुळूकीची प्रतीक्षा करतो आहे, त्यामुळेही हे आधीचे वाक्य सुचले असावे. पण मनावर आदळणाऱ्या भोवतालच्या घटनांच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत, हे कारण अधिक खरे.

आम्ही या बुद्धजयंतीच्या आधल्या दिवशी ९ मे ला एक ‘बंधुता यात्रा’ काढली. आम्ही म्हणजे ‘संविधान संवर्धन समिती’. मुख्यतः आंबेडकरी समुदायातील, मी जिथे वाढलो त्या मुंबईच्या चेंबूर-गोवंडी परिसरातील कार्यकर्त्यांचा हा सामायिक मंच. हे कार्यकर्ते विविध पक्ष, संघटनांशी संबंधित आहेत. तथापि, संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठीच्या उपक्रमांत मोकळेपणाने सहभागी होता यावे म्हणून वैयक्तिक पातळीवर ते ८-९ वर्षांपासून या मंचाशी संबंधित आहेत. हा तसा अनौपचारिक मंच आहे. अध्यक्ष, सेक्रेटरी अशी काही पदे वा औपचारिक रचना नाही. कार्यक्रमाच्या गरजेनुसार संयोजन समिती तयार केली जाते. कार्यक्रमही तसे प्रासंगिकच. नियमित काही नाही. अण्णा हजारेंच्या २०११ च्या आंदोलनावेळी आम्ही वेगळी भूमिका घेऊन निदर्शने केली होती. अण्णाप्रणीत आंदोलनाचा हा टप्पा लोकशाहीला घातक, अराजकाकडे जाणारा व फॅसिस्ट शक्तींना चालना देणारा आहे, असे आमचे म्हणणे होते. त्यावेळी अण्णासमर्थकांनी आम्हाला जोरदार शिव्याशाप दिले होते. असो. तर २०११ नंतर आम्ही परत एकत्र आलो ते २०१४ ला मोदी सत्तेवर आल्यावर. घटना धोक्यात येण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे काम आम्ही सुरु केले. त्यात खूप सातत्य राहिले नाही. अधिक सातत्याने क्रियाशील झालो ते मराठा क्रांती मोर्चे सुरु झाल्यावर. या आंदोलनाबाबत दलित-ओबीसींमधून जात म्हणून प्रतिरोध संघटित करण्याचा प्रचलित मार्ग न अवलंबता आरक्षण, दलित अत्याचार, बेकारी, शिक्षण या प्रश्नांची व्यवस्थात्मक व शासकीय धोरणांतील मूळे उलगडून सांगण्याचा क्रम आम्ही सुरु केला. परिषदा, मेळावे, शिबिरे हे मार्ग अवलंबून या सर्व समाज विभागांतील पिडितांनी सर्व विभागांतील शोषकांच्या विरोधात एकवटावे, यासाठीचा संवाद आम्ही सुरु केला. तो मात्र नियमितपणे सुरु झाला. याच्या जोडीनेच संविधानातील मूल्यांच्या प्रसाराच्या कामालाही गती आली. त्याचाच एक भाग म्हणजे ही ‘बंधुता यात्रा’.

संविधान सभेत संविधान मंजुरीच्या आधल्या दिवशी २५ नोव्हेंबर १९४९ ला केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल.’ बाबासाहेबांनी अधोरेखित केलेले बंधुतेचे हे महत्व जनतेच्या ध्यानात आणून देण्यासाठी, मैत्री, करुणेचा संदेश देणाऱ्या ज्या बुद्धाकडून त्यांनी हे तत्त्व घेतले होते त्या बुद्धाच्या जयंतीच्या निमित्ताने ही ‘बंधुता यात्रा’ काढणे औचित्यपूर्ण ठरेल असे आम्हाला वाटले. एक महिना आधी आम्ही तयारी सुरु केली.

एकतर अशी महिनाभर आधी तयारी वगैरे आमच्या रीतीत (पॅंथरोत्तर संस्कारात) फारसे बसणारे नाही. एकूण बऱ्याच अंतर्गत रीती व विचार पद्धती बदलण्याचा हा आमचा खटाटोप आहे. आम्ही तसे ‘घटना बचाव’वाले. म्हणजे ‘बाबासाहेबांच्या घटनेला कोणी हात लावला तर त्याचे हात कलम करु’ बाण्याचे. अशी आरोळी देताना घटना १०० हून अधिक वेळा दुरुस्त झाली, हे आमच्या गावीही नसते. त्यामुळे घटना बचाव नव्हे, तर घटनेतील मूल्यांचे रक्षण व गरजेनुसार त्यांचा विकास या अर्थाने संविधानाचे संवर्धन हे आपले उद्दिष्ट असायला हवे, ही बाजू बरीच लढवायला लागली तेव्हा कुठे संविधान बचाव ऐवजी संविधान संवर्धन समिती हे नाव मान्य झाले होते.

आताही ‘बंधुता यात्रा’ हा तसा तथाकथित आंबेडकरी बाण्याच्या दृष्टीने ‘पानी कम’ प्रकार होता. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने काढावयाची मिरवणूक ही तशीच तोलामोलाची हवी. म्हणजे डीजे, भव्य कटआऊट वगैरे. पण मधल्या आमच्या विचार मंथनातून जी काही किमान नैतिक ताकद तयार झाली होती, त्या पार्श्वभूमीवर यात्रेचे बंधुता हे नाव, तीही शांततेने, गाणी, घोषणा व्यापक व समाजातील सद्भावना संघटित करणाऱ्या असायला हव्यात याला मान्यता मिळाली. ‘यात्रा’ आपल्या संस्कृतीत बसत नाही, म्हणून तो शब्द नको, अशी एक सूचना आली. पण आपल्या संस्कृतीत ती कशी बसत नाही, याचे स्पष्टीकरण द्यायला सूचनाकर्ता कोणत्याच बैठकीला हजर न राहिल्याने ती सूचना तशीच बारगळली. चर्चा, मतभेद बैठकीत मांडायचे. निर्णय झाला की त्याला नंतर फाटे फोडायचे नाहीत, हे कटाक्षाने पाळले गेले.

गायीच्या नावाने माणसाची कत्तल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आक्रसणारा अवकाश या पार्श्वभूमीवरची ही बंधुता यात्रा हा त्या अर्थाने एक राजकीय हस्तक्षेप होता. त्यामुळे त्यासंबंधीच्या निवेदनात, घोषणांत देशातील काही घटनांचे उल्लेख व आक्रमकता असायला हवी अशी एक सूचना होती आणि ही सूचना करणाऱ्या कार्यकर्त्याने परिश्रमपूर्वक निवेदनात तशा दुरुस्त्या करुन बैठकीत चर्चेला ठेवल्या. तथापि, या सूचना आल्या ती शेवटच्या काही बैठकांतली एक होती. तोवर निवेदन छापून प्रसृतही झाले होते. त्यामुळे आपल्या भाषणांत या घटनांचा उल्लेख करावा. तथापि, कार्यक्रमाचे शांततामय व समाजाच्या विवेकाला विनम्र आवाहन करण्याचे स्वरुप लक्षात घेता चढा स्वर यावेळी ठेवू नये, असे ठरले. या कार्यकर्त्यानेही तो प्रश्न अजिबात प्रतिष्ठेचा न करता सामूहिक निर्णयप्रक्रियेला व शिस्तीला मान दिला.

आमच्या (आंबेडकरी समुदायाच्या) कोणत्याही कार्यक्रमाला सर्वसाधारणपणे त्रिसरण-पंचशीलाने सुरुवात होते. इथे तर बुद्धजयंतीचा संदर्भ होता. तरीही ही यात्रा फक्त बौद्धांची नाही. बौद्धांचा पुढाकार व बहुसंख्या असली तरी ती संविधानाला मानणाऱ्या सर्व समुदायांची आहे. त्यामुळे त्रिसरण-पंचशील घेऊ नये, संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने प्रारंभ व एका संकल्पाने समारोप करावा, या सूचनेला सगळ्यांनी मान्यता दिली. कोणकोणत्या महामानवांचा जयजयकार यात्रेत करावा, या चर्चेच्या वेळी मी एक मुद्दा मांडला. बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर या दोहोंचे घटना व बुद्धजयंतीसंबंधीचे औचित्य लक्षात घेऊन त्या दोघांपुरताच जयजयकार मर्यादित ठेवावा. नेहमीच्या सवयीने शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज ही नावे यावेळी त्यात आणू नयेत. जर ती आणली तर मग गांधी, नेहरु, पटेल का नाही? त्यांचा तर घटना निर्मिती व स्वतंत्र भारत आकाराला येण्याशी थेट संबंध आहे. माझे हे म्हणणे सगळ्यांना रुचले असेल असे नाही. कोणी बोलले नाही. पण स्वागतही झाले नाही. तर्काला धरुन व आदर राखायचा म्हणूनही ते मान्य केले गेले असावे. मात्र जे मान्य केले गेले ते कटाक्षाने पाळले गेले. एकूण यात्रेत चुकून एक-दोनदा धिक्काराची घोषणा दिली गेली. बाकी जे ठरले त्याबरहुकूमच सगळे झाले.

आपले एक कलापथक असावे, अशी इच्छा आधीपासूनच आमची होती. यावेळी त्यास चालना मिळाली. किमान साज म्हणून निदान डफ व खंजिरी तरी असावी अशी सूचना आली. बैठकीतच कोणी ३००, कोणी ५०० कोणी १००० रु. दिले. तेवढी साधने आली. संविधानातील मूल्यांवर काही नवीन गाणी रचली गेली. चळवळीच्या नेहमीच्या गाण्यांतून व्यापक, शांत, मानवतेला प्राधान्य देणारी गाणी निवडली गेली. त्यांचा सराव केला गेला. या सरावाच्या वेळी गाण्यांच्या अर्थाबाबत चर्चा व्हायच्या. नव्या गाण्यांत त्यानुसार काही बदल केले जायचे. हा सराव (एकूण तयारीच्या सर्वच बैठका) ही एकप्रकारे अभ्यासमंडळेही असायची. कलापथकाची किमान तयारी झाल्यावर वस्त्यांतून, चौकांतून हे कलापथक गाणी म्हणायचे. लोक जमले की एक कार्यकर्ता बंधुता यात्रेत सहभागी होण्याबाबतचे निवेदन व आवाहन करायचा. यावेळी कार्यक्रमाचा बॅनर असायचा व पत्रके वाटली जायची.

या काळातल्या तयारीच्या बैठका अभ्यासमंडळे असायची म्हणजे काय याची एक-दोन उदाहरणे देतो. ‘राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाचेच हित की एकूण मानवता सुखी होण्याकडचा प्रवास? मग यात शेजारी देशाचे-पाकिस्तानचेही हित समाविष्ट आहे की नाही? मग पाकिस्तानशी युद्ध करायचे की नाही? काश्मीर प्रश्नाची गुंतागुंत’ यावर बरीच चर्चा झाली. स्त्री-पुरुष समता आपण मानतो. पण आपल्याच कार्यक्रमांत मंचावर तसेच निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचे स्थान नगण्य असते. हे बदलण्यावर आपला कटाक्ष असायला हवा, हे या चर्चांतूनच अधोरेखित झाले. बंधुता हा शब्द लिंगनिरपेक्ष नाही. तथापि, बंधुता-भगिनीभाव असा जोडशब्द वापरण्याचा काटेकोरपणा यावेळी न करता बंधुतेचे आवाहन करताना ते बंधू-भगिनीभाव असा व्यापक अर्थ सांगत करावे. मुस्लिमांशी सहकार्य याचा अर्थ त्यांच्यातील सांप्रदायिक कट्टरतेकडे दुर्लक्ष करणे, त्याबाबतीत सौम्य राहणे नव्हे, हेही बोलले गेले. ‘हमारा राष्ट्रवाद-जय भारत, जय जगत’ या घोषणेतील देशाचे कल्याण मानवतेच्या कल्याणातच आहे, या तत्त्वाबाबत बोलताना ‘जय हिंद’ म्हणायचे की ‘जय भारत’ यावरही बरीच चर्चा झाली. वास्तविक त्यात द्वैत नाही, हे माझे म्हणणे मी ताणतो आहे असे लक्षात आल्याने सोडून दिले. ‘जय भारत’ला सहमती दर्शवली.

प्रत्यक्ष यात्रा ५-६ किलोमीटर असावी. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे चालणे सर्वांनाच सोपे वाटले नाही. पण जवळपास सगळे चालले. एकूण लोक आमच्या हिशेबाने ४०० असायला हवे होते. पण काही ऐनवेळच्या अडचणींनी सहभागींची संख्या जास्तीत जास्त ३०० पर्यंतच गेली. प्रारंभी कमी, मध्ये स्वागत व्हायचे तिथे काही लोक वाढायचे. समारोपाच्या सभेत शेवटच्या भाषणाला ही संख्या १०० राहिली. यात्रेत पुढे संविधानाच्या सरनाम्याचे कटआऊट, बॅनर्स, लाऊड स्पीकर व कलाथकाचे लोक वाहून नेणारा छोट्या ट्रकच्या आकाराचा टेम्पो होता. सरनामा मराठी, हिंदी व उर्दू या तिन्ही भाषांत होता. यात्रा तीन ठिकाणी थांबली. तेथील लोकांनी गाणी म्हणून, ताशे वाजवून, पाणी व सरबत पाजून स्वागत केले. तिसऱ्या ठिकाणी एका मौलवींनी सरनाम्याचे वाचन केले. समारोपाच्या सभेला स्थानिक नगरसेविकाही हजर होत्या. यात्रेत तसेच मंचावर महिलांचे तसेच विविध जात-धर्माच्या व्यक्तींचे (यात ब्राम्हणही आले) सन्मान्य प्रतिनिधीत्व ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला गेला.

लोक रस्त्यावर उतरवायचा आमचा जुना इतिहास कितीही वैभवशाली असला तरी आता, तेही कोणत्या भौतिक वा भावनिक नव्हे, तर विवेकवादी कार्यक्रमावर लोकांची जमवाजमव करणे हे कठीण जाते, हे वास्तव आम्हाला ठाऊक होते. खर्चाचाही प्रश्न होता. त्यामुळे मूळ प्रस्ताव एका जागी ‘बंधुता मेळावा’ घेण्याचा होता. तथापि, एका कार्यकर्त्याने यात्रेची कल्पना मांडली. इतरांनी दुजोरा दिला. या प्रक्रियेत सहभागी एका मोठ्य़ा संघटनेने (जिच्याकडे निधी व पूर्णवेळ कार्यकर्त्यांची ताकद चांगली आहे) या सूचनेला अनुमोदन दिल्याने व लोकांच्या जमवाजमवीचा मुख्य भार आम्ही उचलू याची खात्री दिल्याने यात्रा काढायचा निर्णय झाला. या संघटनेने खरोखरच मनापासून त्यात भाग घेतला. त्यांचे कार्यकर्ते राबलेच शिवाय त्यांनी टेम्पो व त्यावरील बॅनर, लाऊड स्पीकर आदिंचा मोठा खर्च उललला. बैठका व सरावासाठी कार्यालय, त्यावेळचे चहापान हीही जबाबदारी त्यांनी सहज स्वीकारली. यात कोठेही त्यांनी आपले नाव यावे असा दूरान्वयानेही प्रयत्न केला नाही. अशाच एका संघटनेने संविधानातील मूल्यांवरच्या एका पुस्तिकेची छपाई करुन दिली. तिचे प्रकाशन समारोपाच्या सभेत केले गेले. या दोन्ही संघटनांचे काही कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवरही इतरांप्रमाणे आर्थिक भार उचलण्यात सहभागी होतेच. कार्यकर्त्यांकडून आलेली वैयक्तिक देणगी ५०० ते २००० रु. या दरम्यान होती. कार्यक्रम चेंबूरमध्ये असला तरी त्यासाठी नालासोपारा, कल्याण, उल्हासनगर, बोरीवली, पनवेल अशा दूरच्या तसेच जवळच्याही ठिकाणांहून नियमितपणे तयारीसाठी येण्याचा या कार्यकर्त्यांना सोसावा लागलेला (व यापुढेही लागणारा) प्रवासखर्च बराच आहे. हे नोकरी करणारे कार्यकर्ते असल्याने संध्याकाळी सुरु होणारी बैठक रात्री ११-१२ वाजेपर्यंत चालते. समारोपाच्या सभेची जबाबदारी (स्टेज, लाऊड स्पीकर, दिवे इ.) एक स्थानिक संघटना घेईल असा खात्रीचा अंदाज होता. पण ऐनवेळी काही कारणाने ते बारगळले. मोठी अडचण तयार झाली. तथापि, तिथल्या एका दुसऱ्या संघटनेच्या समितीशी संबंधित कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर आवश्यक तेवढा निधी जमा केला व ही चिंता दूर केली. साधनांच्या-निधीच्या तपशीलाचे विस्तृत वर्णन यासाठी केले की फंडिंग पॅटर्न व राजकीय नेत्यांची स्पॉन्सरशिप हे दोन्ही प्रकार आम्ही जाणीवपूर्वक स्वार होऊ दिले नाहीत.

संविधानातील मूल्यांना आज असलेला धोका पुरेपूर जाणणाऱ्या व त्याबद्दल विविध माध्यमांतून चिंता व्यक्त करणाऱ्या आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी प्रवाहांतील आमच्या काही जवळच्या मित्रमंडळींना या प्रक्रियेत – किमान यात्रेतल्या एखाद्या टप्पात सहभागी होण्याचे आम्ही आवाहन केले होते. काहींनी येतो सांगितले. त्यातले काही आले. काही तर खूप दुरून, उन्हाचा त्रास सोसत आले. काहींनी अडचण कळवली. काहींना असे कळवणे जमले नाही. काहींनी यापुढच्या कामासाठी आर्थिक सहाय्याची तयारी दर्शवली. एकूण सहभागी होणाऱ्यांचा (कार्यकर्त्यांसहित) सरासरी आर्थिक स्तर हा मुख्यतः वस्तीत राहणाऱ्यांचा व काही प्रमाणात (या वस्त्यांतून थोडे वर सरकलेल्या) कनिष्ठ मध्यमवर्गीयांचा होता.

बंधुता यात्रा ही मुख्यतः भारताचे शासन व लोकजीवन यांचा चबुतरा असलेल्या सांविधानिक मूल्यांचे स्मरण व त्याचे जतन करण्यासाठीचे आवाहन करण्यासाठी होती. समारोपाच्या भाषणांत त्यांचा यथोचित आढावा घेतला गेला. बुद्धाच्या मैत्री, करुणेचे मानवतेला आवाहन व त्याच्या चिन्हांचा राजमुद्रा किंवा अशोकचक्र म्हणून देशाने केलेला स्वीकार, ख्रिस्ताची क्षमा, पैगंबराची बंधुता व शांतता, ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील मैत्र, कबीर-बुल्लेशहाकृत प्रेमाची महती, तुकारामांची दया-क्षमा-शांती, महात्मा फुलेंचे ‘ख्रिस्त, महंमद, ब्राम्हणाशी-धरावे पोटाशी बंधुपरी’ हे आवाहन, साने गुरुजींचा जगाला प्रेम अर्पिणारा खरा धर्म आणि अगदी अलिकडे न्यायालयाच्या निकालानंतर गोध्रातील अत्याचाराची बळी असलेल्या बिल्किस बानोने मला सूड नको-न्याय हवा, हे काढलेले उद्गार...हा सर्व काळाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील प्रेम, करुणा, मैत्री, क्षमा, बंधुतेचा महान वारसा व त्याचे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाशी असलेले नाते या भाषणांतून उलगडले गेले. शेवटी सर्वांनी उभे राहून जाहीर संकल्प घेतला व त्यानंतर या यात्रेचे एकप्रकारे ‘शीर्षक गीत’ झालेल्या ‘राहो सुखाने हा मानव इथे’ या गीताने सांगता झाली. बुद्धाचा संदेश-पर्यायाने आमच्या बंधुता यात्रेचा संदेश नेमकेपणाने सांगणाऱ्या या गीतातील मन उन्नत करणाऱ्या या ओळींनी या लेखाचा शेवट करतो-

‘कल्याण व्हावे माझे नि तुमचे| कल्याण व्हावे शत्रूचे अन् मित्रांचे |

राहो सुखाने हा मानव इथे| या भूवरी या भूवरी इथे |’


- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

__________________

बंधुता यात्रेच्या अखेरीस घेतलेला संकल्प:
१) आमचा भारत कोणा एका धर्म, जात, पंथाचा नाही; तो भारतीय जनतेचा आहे, यावर माझा विश्वास आहे.
२) भारताच्या विचारबहुल संस्कृतीचा पाया असलेली सहिष्णुता व आदर ही मूल्ये आम्ही कधीही ढासळू देणार नाही.
३) एखाद्याचे म्हणणे मला पटणार नाही, तथापि, त्याच्या मत मांडण्याच्या अधिकाराचे मी रक्षण करेन.
४) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये हे आम्ही आमच्या जीवनाचे ध्येय मानतो.
५) या मूल्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी आमच्यात बंधू-भगिनीभाव नांदला पाहिजे यासाठी आम्ही सदैव दक्ष राहू. 
जय भारत-जय जगत!
_____________________

आंदोलन, जून २०१७