सहारनपूरमधील दलितांवरचा हल्ला, खून, त्यांच्या घरांची राखरांगोळी हे काही अपवादात्मक प्रकरण नाही. या आधी याहून कितीतरी भयानक हल्ले दलितांवर झालेले आहेत. जातिवादाची भारतीय मानसिकता व परंपरा पाहता नजिकच्या भविष्यात ते थांबतील असेही नाही. मग सहारनपूरच्या हिंसेचे वेगळेपण काय व त्यातून काही इशारा मिळतो काय? सरसकट वेगळेपण व आतापर्यंत न मिळालेला खास वेगळा इशारा त्यातून मिळतो असेही म्हणता येणार नाही. तथापि, त्यातून जे घटक एकत्रितपणे आज समोर येतात, त्यांचा अर्थ दलित व एकूणच पुरोगामी चळवळीला मार्गदर्शक ठरु शकतात.
उच्चवर्णीय जातिवादी मानसिकतेचे सूत्र कायम असले तरी त्याच्या भोवतालचे काही संदर्भ अलिकडे बदलत आहेत. एकूण विकासप्रक्रियेच्या क्रमात तथाकथित उच्चवर्णीय व दलित यांच्या आर्थिक व शैक्षणिक स्थितीत बदल होत आहेत. सहारनपूरच्या ज्या शब्बीरपूर गावात ५ मे चा पहिला हिंसाचार झाला व ५५ घरे जाळून टाकली गेली, त्या गावातील शिक्षित दलित मुलांपैकी ७५ टक्के मुले पदवीधर आहेत. अशा स्थितीत ही मुले पारपंरिक वर्णव्यवस्थेची उतरंड मानतील वा जातिगत व्यवसाय करतील ही शक्यताच नाही. ज्या ठाकूरांच्या डोळ्यांवर ही प्रगती येते त्यांची स्थिती काय? तर त्यांच्यातही मोठे बदल झालेत. विकासप्रक्रियेचा लाभ सगळ्याच ठाकूरांना सारख्या प्रमाणात मिळाला किंवा घेता आला असे नाही. त्यांच्यातले काहीजण श्रीमंत आहेत, परदेशातही आहेत. काही भारतात वेगवेगळ्या शहरांत व्यापारउदिमात आहेत. पण विकासाची गाडी सुटलेलेही लक्षणीय आहेत. गावात राहणाऱ्यांच्यात या विकासात मागे राहिलेल्यांचा भरणा मोठा आहे. त्यांच्या अंतर्गत असलेली ही विषमता त्यांना अस्वस्थ करते. पण त्याचे कारण सोयिस्करपणे दलित धरले जाते. दलितांचे शिक्षण, त्यांची नेटकी होणारी निवासस्थाने, नोकऱ्या यांचे कारण त्यांना राखीव जागा आहेत व प्रगत दलितही ते घेत आहेत, त्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही, असा सोयीचा तर्क या गावातल्या ठाकूर तरुणांच्या मनात हितसंबंधीयांकडून ठासला जातो. परिस्थितीचा ताण असला तरी जुना सरंजामी पीळ जात नाही, सामाजिकदृष्ट्या आपल्या खालच्या स्तरावर असलेले दलित पुढे जात आहेत व आम्ही मागे राहत आहोत, याच्या खऱ्याखोट्या आभासाचे ते भक्ष्य होतात. (आपल्याकडचे मराठा आंदोलन आठवा.)
यातूनच आंबेडकर जयंतीला शब्बीरपूरच्या रविदास मंदिराच्या आवारात उंच चबुतऱ्यावरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आक्षेप घेतला जातो. ठाकूरांचा पुतळ्याला आक्षेप नाही. तो उंचावर असण्याला आहे. कारण हे रविदास मंदिर तिठ्यावर आहे. तेथून ठाकूरांची जा-ये असते. त्यांना तो पुतळा उंचावर असल्याने दिसत राहणार. बाबासाहेब घटनाकार असले तरी दलित आहेत व त्यांच्या नाकावर टिच्चून पुढे जाणाऱ्या दलितांचे ते स्फूर्तिदाते आहेत म्हणून ठाकूरांना ते खिजवणारे वाटते. जवळच्याच घडकौली गावाच्या सीमेवर ‘द ग्रेट चमार’ ही मध्यावर मोठी अक्षरे व त्यांच्या वर दोन कोपऱ्यात जयभीम, जयभारत असे शब्द असलेल्या पाटीला असाच काही काळापूर्वी तिथल्या ठाकूरांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून तिथे तणाव तयार झाला होता.
अशी विद्वेषाला अनुकूल भूमी असली की काही विघ्नसंतोषी, अविवेकी, धन, वर्ण व पौरुषाचा माज असलेल्या नेतृत्वांची सरशी होत असते. शेरसिंग राणा हे असेच नेते. शेरसिंग राणा फुलनदेवींचा खूनी. ठाकूरांच्या अवमानाचा बदला घेणारा जुनाट मनोवृत्तीच्या ठाकुरांच्या दृष्टीने वीर. स्वतः श्रीमंत जमिनदार. जेलमधून काही काळ फरार. त्या काळात राणा प्रताप आदि ठाकुरांच्या अस्मितांच्या अफगाणिस्तानपर्यंतच्या खाणाखुणा जमा करत गूढ भटकंती. त्यानंतर अटक. जन्मठेप. आणि अलिकडे जामिनावर बाहेर. या काळात त्याने ठाकूरांचा राजपूत बाणा परजण्यासाठी ‘राजपूत रेजिमेंट’ तयार केली. ही बिहारमध्ये दलितांच्या कत्तली करणाऱ्या रणवीर सेनेच्या समकक्ष संघटना. ५ मे रोजीच्या राणा प्रताप जयंतीच्या शिमलाना गावातील महोत्सवाचा प्रमुख अतिथी असतात शेरसिंग राणा. या उत्सवाला पंजाब, हरयाणा अशा विविध राज्यांतून २५०० च्या वर राजपुतकुलीन जमलेले असतात. ३ किलोमीटरवरच्या शब्बीरपूर गावातून शिमलानाला मिरवणुकीने यायला निघालेल्या ठाकूरांशी डीजेवरुन बाचाबाची होते. त्याचे निमित्त साधून दलितांवर हल्ला होतो. दलित दगडांनी प्रत्युत्तर देतात. ठाकूर माघारी जातात. अधिक तयारीनिशी येतात. आता त्यांची संख्या वाढलेली असते. हातात गावठी बंदुका व फेकल्यावर लगेच पेटणाऱ्या रसायनांचे फुगे असतात. जाळपोळ, मारहाण, रविदासांच्या मूर्तीची तोडफोड होते. या तोडफोडीत सामील एका ठाकूर तरुणाच्या कपाळाला दगड लागतो. तो मरतो. (पोस्टमार्टेममध्ये तो दगडाने नव्हे तर श्वास कोंडून मेल्याचा निष्कर्ष निघाला आहे.) दरम्यान शिमलाना उत्सवात ही बातमी पोहोचते. ठाकुरांतले काही समजदार लोक आपण विचलित होऊ नये, आपल्यातले काही लोक शब्बीरपूरला काय झाले ते पाहायला गेले आहेत, आपण आपला कार्यक्रम चालू ठेवूया, असे आवाहन करत असतात. तथापि, मंचावर असलेले शेरसिंग राणा हे जुमानत नाहीत. ‘’आताच मोबाईलवर आपल्यातले ४ तरुण दलितांनी ठार केलेत, असे मला कळले आहे. अशावेळी मी इथे थांबून उत्सव करत राहणे मला अवमानकारक वाटते. आपण आपल्या शब्बीरपूरच्या बांधवांच्या मदतीला गेले पाहिजे.” असे एकप्रकारे जमावाला चेतवून ते मंचावरुन खाली उतरतात. शब्बीरपूरमध्ये व आसपास जो काही विनाश झाला, तो पूर्वनियोजित होता, असे या घटनाक्रमावरुन काही तटस्थ पत्रकार अनुमान काढतात. या पत्रकारांनी शेरसिंग राणाच्या घेतलेल्या ध्वनिचित्र मुलाखतीत ते स्त्रियांच्या व दलितांच्या आरक्षणाला आक्षेप घेताना दिसतात. त्यांच्या राजपूत रेजिमेंटने आरक्षणविरोधी मोहीम याच काळात जोरात सुरु केलेली आहे.
महत्वाचा नवीन संदर्भ म्हणजे केंद्रात व राज्यात या सगळ्या जुनाट सरंजामी तणांना पोषक सरकारे आली आहेत. अशा विद्वेषी राजकारणाचे मेरुमणी असलेले आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे मायावतींच्या २३ मे च्या शब्बीरपूरमधील सभेनंतर परतणाऱ्यांवर व त्यानिमित्ताने अन्य गावांतील दलितांवर जे हल्ले केले गेले व त्यात एका दलित युवकाचा खून झाला त्या दंग्यांत सहभागींची ‘अभी सरकार हमारी है और प्रशासन भी हमारा है’ ही वक्तवे अनेकांनी नोंदवली आहेत. मुसलमानांच्या विरोधात दलितांचा हिंदू म्हणून वापर व दुसरीकडे दलित म्हणून आमच्या बरोबरीला येता कामा नये यासाठीचा धडा या चालीला आता सरकारी वरदहस्त आहे.
या संघर्षात उतरलेली भीम आर्मी ही सहारणपूरच्या दलितांची महाराष्ट्रातल्या दलित पँथरची आवृत्ती. तोच विद्रोह, तोच जोश, अरेला कारे म्हणायची तीच जिद्द. पण महाराष्ट्रातल्या दलित पँथरच्या पतनाचे भवितव्य यांच्याही वाट्याला येणारच नाही असे नाही. त्यासाठी भीम आर्मीचे नेतृत्व किती सावध आहे, ते कळत नाही. काहीही असो. आज त्यांना सहाय्यभूत ठरणे व जोपासणे, नीट वळण मिळेल याची खटपट करणे गरजेचे आहे. तथापि, मायावती त्यांची भाजपचे पिल्लू म्हणून संभावना करत आहेत. स्वतःच्या नेतृत्वाला आव्हान म्हणून याकडे न बघता या नव्या स्फुल्लिंगाला वाव देऊन मायावतींनी पालकत्वाची भूमिका निभावणे ही काळाची गरज आहे.
निवडणुकांतील गणिते ध्यानात घेऊन ठाकुरांबद्दल आक्रमक वा सौम्य न राहता ठाकुरांच्यात ज्या आर्थिक श्रेणी तयार झाल्या आहेत, त्यात निम्न स्तरावर राहिलेल्यांच्या प्रश्नांना आवाज देणे, त्या प्रश्नांशी दलितांच्या प्रश्नांची सांगड घालणे, आरक्षणाबाबतचे गैरसमज दूर करणे, धार्मिक विद्वेषाविरोधात ठाम भूमिका घेणे आणि अशारीतीने एकूण व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी या सर्व पीडित घटकांना एकवटणे हे खरेखुरे आंबेडकरी राजकारण आहे. ते करण्यासाठी मायावती, भीम आर्मी व एकूणच परिवर्तनवादी शक्तींना सहारनपूरच्या हिंसेने एकप्रकारे इशाराच दिला आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________ _________
दिव्य मराठी, ६ जून २०१७
No comments:
Post a Comment