Thursday, June 1, 2017

कल्याण होवो माझे, तुमचे अन् शत्रूचे..!


ही एका छोट्या हस्तक्षेपाबाबतची निरीक्षणे आहेत. एरव्ही हा लेखाचा विषय बहुधा झाला नसता. तथापि, प्रगतीशील शक्तींच्यादृष्टीने वर्तमानातील प्रतिकूलतेचे तपमान एवढे चढले आहे की अशी एखादी हळुवार झुळूकही सुखावून जाते. हा लेख लिहिताना जो खरोखरीचा उष्मा अनुभवतो आहे, एखाद्या झुळूकीची प्रतीक्षा करतो आहे, त्यामुळेही हे आधीचे वाक्य सुचले असावे. पण मनावर आदळणाऱ्या भोवतालच्या घटनांच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत, हे कारण अधिक खरे.

आम्ही या बुद्धजयंतीच्या आधल्या दिवशी ९ मे ला एक ‘बंधुता यात्रा’ काढली. आम्ही म्हणजे ‘संविधान संवर्धन समिती’. मुख्यतः आंबेडकरी समुदायातील, मी जिथे वाढलो त्या मुंबईच्या चेंबूर-गोवंडी परिसरातील कार्यकर्त्यांचा हा सामायिक मंच. हे कार्यकर्ते विविध पक्ष, संघटनांशी संबंधित आहेत. तथापि, संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठीच्या उपक्रमांत मोकळेपणाने सहभागी होता यावे म्हणून वैयक्तिक पातळीवर ते ८-९ वर्षांपासून या मंचाशी संबंधित आहेत. हा तसा अनौपचारिक मंच आहे. अध्यक्ष, सेक्रेटरी अशी काही पदे वा औपचारिक रचना नाही. कार्यक्रमाच्या गरजेनुसार संयोजन समिती तयार केली जाते. कार्यक्रमही तसे प्रासंगिकच. नियमित काही नाही. अण्णा हजारेंच्या २०११ च्या आंदोलनावेळी आम्ही वेगळी भूमिका घेऊन निदर्शने केली होती. अण्णाप्रणीत आंदोलनाचा हा टप्पा लोकशाहीला घातक, अराजकाकडे जाणारा व फॅसिस्ट शक्तींना चालना देणारा आहे, असे आमचे म्हणणे होते. त्यावेळी अण्णासमर्थकांनी आम्हाला जोरदार शिव्याशाप दिले होते. असो. तर २०११ नंतर आम्ही परत एकत्र आलो ते २०१४ ला मोदी सत्तेवर आल्यावर. घटना धोक्यात येण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे काम आम्ही सुरु केले. त्यात खूप सातत्य राहिले नाही. अधिक सातत्याने क्रियाशील झालो ते मराठा क्रांती मोर्चे सुरु झाल्यावर. या आंदोलनाबाबत दलित-ओबीसींमधून जात म्हणून प्रतिरोध संघटित करण्याचा प्रचलित मार्ग न अवलंबता आरक्षण, दलित अत्याचार, बेकारी, शिक्षण या प्रश्नांची व्यवस्थात्मक व शासकीय धोरणांतील मूळे उलगडून सांगण्याचा क्रम आम्ही सुरु केला. परिषदा, मेळावे, शिबिरे हे मार्ग अवलंबून या सर्व समाज विभागांतील पिडितांनी सर्व विभागांतील शोषकांच्या विरोधात एकवटावे, यासाठीचा संवाद आम्ही सुरु केला. तो मात्र नियमितपणे सुरु झाला. याच्या जोडीनेच संविधानातील मूल्यांच्या प्रसाराच्या कामालाही गती आली. त्याचाच एक भाग म्हणजे ही ‘बंधुता यात्रा’.

संविधान सभेत संविधान मंजुरीच्या आधल्या दिवशी २५ नोव्हेंबर १९४९ ला केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल.’ बाबासाहेबांनी अधोरेखित केलेले बंधुतेचे हे महत्व जनतेच्या ध्यानात आणून देण्यासाठी, मैत्री, करुणेचा संदेश देणाऱ्या ज्या बुद्धाकडून त्यांनी हे तत्त्व घेतले होते त्या बुद्धाच्या जयंतीच्या निमित्ताने ही ‘बंधुता यात्रा’ काढणे औचित्यपूर्ण ठरेल असे आम्हाला वाटले. एक महिना आधी आम्ही तयारी सुरु केली.

एकतर अशी महिनाभर आधी तयारी वगैरे आमच्या रीतीत (पॅंथरोत्तर संस्कारात) फारसे बसणारे नाही. एकूण बऱ्याच अंतर्गत रीती व विचार पद्धती बदलण्याचा हा आमचा खटाटोप आहे. आम्ही तसे ‘घटना बचाव’वाले. म्हणजे ‘बाबासाहेबांच्या घटनेला कोणी हात लावला तर त्याचे हात कलम करु’ बाण्याचे. अशी आरोळी देताना घटना १०० हून अधिक वेळा दुरुस्त झाली, हे आमच्या गावीही नसते. त्यामुळे घटना बचाव नव्हे, तर घटनेतील मूल्यांचे रक्षण व गरजेनुसार त्यांचा विकास या अर्थाने संविधानाचे संवर्धन हे आपले उद्दिष्ट असायला हवे, ही बाजू बरीच लढवायला लागली तेव्हा कुठे संविधान बचाव ऐवजी संविधान संवर्धन समिती हे नाव मान्य झाले होते.

आताही ‘बंधुता यात्रा’ हा तसा तथाकथित आंबेडकरी बाण्याच्या दृष्टीने ‘पानी कम’ प्रकार होता. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने काढावयाची मिरवणूक ही तशीच तोलामोलाची हवी. म्हणजे डीजे, भव्य कटआऊट वगैरे. पण मधल्या आमच्या विचार मंथनातून जी काही किमान नैतिक ताकद तयार झाली होती, त्या पार्श्वभूमीवर यात्रेचे बंधुता हे नाव, तीही शांततेने, गाणी, घोषणा व्यापक व समाजातील सद्भावना संघटित करणाऱ्या असायला हव्यात याला मान्यता मिळाली. ‘यात्रा’ आपल्या संस्कृतीत बसत नाही, म्हणून तो शब्द नको, अशी एक सूचना आली. पण आपल्या संस्कृतीत ती कशी बसत नाही, याचे स्पष्टीकरण द्यायला सूचनाकर्ता कोणत्याच बैठकीला हजर न राहिल्याने ती सूचना तशीच बारगळली. चर्चा, मतभेद बैठकीत मांडायचे. निर्णय झाला की त्याला नंतर फाटे फोडायचे नाहीत, हे कटाक्षाने पाळले गेले.

गायीच्या नावाने माणसाची कत्तल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आक्रसणारा अवकाश या पार्श्वभूमीवरची ही बंधुता यात्रा हा त्या अर्थाने एक राजकीय हस्तक्षेप होता. त्यामुळे त्यासंबंधीच्या निवेदनात, घोषणांत देशातील काही घटनांचे उल्लेख व आक्रमकता असायला हवी अशी एक सूचना होती आणि ही सूचना करणाऱ्या कार्यकर्त्याने परिश्रमपूर्वक निवेदनात तशा दुरुस्त्या करुन बैठकीत चर्चेला ठेवल्या. तथापि, या सूचना आल्या ती शेवटच्या काही बैठकांतली एक होती. तोवर निवेदन छापून प्रसृतही झाले होते. त्यामुळे आपल्या भाषणांत या घटनांचा उल्लेख करावा. तथापि, कार्यक्रमाचे शांततामय व समाजाच्या विवेकाला विनम्र आवाहन करण्याचे स्वरुप लक्षात घेता चढा स्वर यावेळी ठेवू नये, असे ठरले. या कार्यकर्त्यानेही तो प्रश्न अजिबात प्रतिष्ठेचा न करता सामूहिक निर्णयप्रक्रियेला व शिस्तीला मान दिला.

आमच्या (आंबेडकरी समुदायाच्या) कोणत्याही कार्यक्रमाला सर्वसाधारणपणे त्रिसरण-पंचशीलाने सुरुवात होते. इथे तर बुद्धजयंतीचा संदर्भ होता. तरीही ही यात्रा फक्त बौद्धांची नाही. बौद्धांचा पुढाकार व बहुसंख्या असली तरी ती संविधानाला मानणाऱ्या सर्व समुदायांची आहे. त्यामुळे त्रिसरण-पंचशील घेऊ नये, संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने प्रारंभ व एका संकल्पाने समारोप करावा, या सूचनेला सगळ्यांनी मान्यता दिली. कोणकोणत्या महामानवांचा जयजयकार यात्रेत करावा, या चर्चेच्या वेळी मी एक मुद्दा मांडला. बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर या दोहोंचे घटना व बुद्धजयंतीसंबंधीचे औचित्य लक्षात घेऊन त्या दोघांपुरताच जयजयकार मर्यादित ठेवावा. नेहमीच्या सवयीने शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज ही नावे यावेळी त्यात आणू नयेत. जर ती आणली तर मग गांधी, नेहरु, पटेल का नाही? त्यांचा तर घटना निर्मिती व स्वतंत्र भारत आकाराला येण्याशी थेट संबंध आहे. माझे हे म्हणणे सगळ्यांना रुचले असेल असे नाही. कोणी बोलले नाही. पण स्वागतही झाले नाही. तर्काला धरुन व आदर राखायचा म्हणूनही ते मान्य केले गेले असावे. मात्र जे मान्य केले गेले ते कटाक्षाने पाळले गेले. एकूण यात्रेत चुकून एक-दोनदा धिक्काराची घोषणा दिली गेली. बाकी जे ठरले त्याबरहुकूमच सगळे झाले.

आपले एक कलापथक असावे, अशी इच्छा आधीपासूनच आमची होती. यावेळी त्यास चालना मिळाली. किमान साज म्हणून निदान डफ व खंजिरी तरी असावी अशी सूचना आली. बैठकीतच कोणी ३००, कोणी ५०० कोणी १००० रु. दिले. तेवढी साधने आली. संविधानातील मूल्यांवर काही नवीन गाणी रचली गेली. चळवळीच्या नेहमीच्या गाण्यांतून व्यापक, शांत, मानवतेला प्राधान्य देणारी गाणी निवडली गेली. त्यांचा सराव केला गेला. या सरावाच्या वेळी गाण्यांच्या अर्थाबाबत चर्चा व्हायच्या. नव्या गाण्यांत त्यानुसार काही बदल केले जायचे. हा सराव (एकूण तयारीच्या सर्वच बैठका) ही एकप्रकारे अभ्यासमंडळेही असायची. कलापथकाची किमान तयारी झाल्यावर वस्त्यांतून, चौकांतून हे कलापथक गाणी म्हणायचे. लोक जमले की एक कार्यकर्ता बंधुता यात्रेत सहभागी होण्याबाबतचे निवेदन व आवाहन करायचा. यावेळी कार्यक्रमाचा बॅनर असायचा व पत्रके वाटली जायची.

या काळातल्या तयारीच्या बैठका अभ्यासमंडळे असायची म्हणजे काय याची एक-दोन उदाहरणे देतो. ‘राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाचेच हित की एकूण मानवता सुखी होण्याकडचा प्रवास? मग यात शेजारी देशाचे-पाकिस्तानचेही हित समाविष्ट आहे की नाही? मग पाकिस्तानशी युद्ध करायचे की नाही? काश्मीर प्रश्नाची गुंतागुंत’ यावर बरीच चर्चा झाली. स्त्री-पुरुष समता आपण मानतो. पण आपल्याच कार्यक्रमांत मंचावर तसेच निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचे स्थान नगण्य असते. हे बदलण्यावर आपला कटाक्ष असायला हवा, हे या चर्चांतूनच अधोरेखित झाले. बंधुता हा शब्द लिंगनिरपेक्ष नाही. तथापि, बंधुता-भगिनीभाव असा जोडशब्द वापरण्याचा काटेकोरपणा यावेळी न करता बंधुतेचे आवाहन करताना ते बंधू-भगिनीभाव असा व्यापक अर्थ सांगत करावे. मुस्लिमांशी सहकार्य याचा अर्थ त्यांच्यातील सांप्रदायिक कट्टरतेकडे दुर्लक्ष करणे, त्याबाबतीत सौम्य राहणे नव्हे, हेही बोलले गेले. ‘हमारा राष्ट्रवाद-जय भारत, जय जगत’ या घोषणेतील देशाचे कल्याण मानवतेच्या कल्याणातच आहे, या तत्त्वाबाबत बोलताना ‘जय हिंद’ म्हणायचे की ‘जय भारत’ यावरही बरीच चर्चा झाली. वास्तविक त्यात द्वैत नाही, हे माझे म्हणणे मी ताणतो आहे असे लक्षात आल्याने सोडून दिले. ‘जय भारत’ला सहमती दर्शवली.

प्रत्यक्ष यात्रा ५-६ किलोमीटर असावी. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे चालणे सर्वांनाच सोपे वाटले नाही. पण जवळपास सगळे चालले. एकूण लोक आमच्या हिशेबाने ४०० असायला हवे होते. पण काही ऐनवेळच्या अडचणींनी सहभागींची संख्या जास्तीत जास्त ३०० पर्यंतच गेली. प्रारंभी कमी, मध्ये स्वागत व्हायचे तिथे काही लोक वाढायचे. समारोपाच्या सभेत शेवटच्या भाषणाला ही संख्या १०० राहिली. यात्रेत पुढे संविधानाच्या सरनाम्याचे कटआऊट, बॅनर्स, लाऊड स्पीकर व कलाथकाचे लोक वाहून नेणारा छोट्या ट्रकच्या आकाराचा टेम्पो होता. सरनामा मराठी, हिंदी व उर्दू या तिन्ही भाषांत होता. यात्रा तीन ठिकाणी थांबली. तेथील लोकांनी गाणी म्हणून, ताशे वाजवून, पाणी व सरबत पाजून स्वागत केले. तिसऱ्या ठिकाणी एका मौलवींनी सरनाम्याचे वाचन केले. समारोपाच्या सभेला स्थानिक नगरसेविकाही हजर होत्या. यात्रेत तसेच मंचावर महिलांचे तसेच विविध जात-धर्माच्या व्यक्तींचे (यात ब्राम्हणही आले) सन्मान्य प्रतिनिधीत्व ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला गेला.

लोक रस्त्यावर उतरवायचा आमचा जुना इतिहास कितीही वैभवशाली असला तरी आता, तेही कोणत्या भौतिक वा भावनिक नव्हे, तर विवेकवादी कार्यक्रमावर लोकांची जमवाजमव करणे हे कठीण जाते, हे वास्तव आम्हाला ठाऊक होते. खर्चाचाही प्रश्न होता. त्यामुळे मूळ प्रस्ताव एका जागी ‘बंधुता मेळावा’ घेण्याचा होता. तथापि, एका कार्यकर्त्याने यात्रेची कल्पना मांडली. इतरांनी दुजोरा दिला. या प्रक्रियेत सहभागी एका मोठ्य़ा संघटनेने (जिच्याकडे निधी व पूर्णवेळ कार्यकर्त्यांची ताकद चांगली आहे) या सूचनेला अनुमोदन दिल्याने व लोकांच्या जमवाजमवीचा मुख्य भार आम्ही उचलू याची खात्री दिल्याने यात्रा काढायचा निर्णय झाला. या संघटनेने खरोखरच मनापासून त्यात भाग घेतला. त्यांचे कार्यकर्ते राबलेच शिवाय त्यांनी टेम्पो व त्यावरील बॅनर, लाऊड स्पीकर आदिंचा मोठा खर्च उललला. बैठका व सरावासाठी कार्यालय, त्यावेळचे चहापान हीही जबाबदारी त्यांनी सहज स्वीकारली. यात कोठेही त्यांनी आपले नाव यावे असा दूरान्वयानेही प्रयत्न केला नाही. अशाच एका संघटनेने संविधानातील मूल्यांवरच्या एका पुस्तिकेची छपाई करुन दिली. तिचे प्रकाशन समारोपाच्या सभेत केले गेले. या दोन्ही संघटनांचे काही कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवरही इतरांप्रमाणे आर्थिक भार उचलण्यात सहभागी होतेच. कार्यकर्त्यांकडून आलेली वैयक्तिक देणगी ५०० ते २००० रु. या दरम्यान होती. कार्यक्रम चेंबूरमध्ये असला तरी त्यासाठी नालासोपारा, कल्याण, उल्हासनगर, बोरीवली, पनवेल अशा दूरच्या तसेच जवळच्याही ठिकाणांहून नियमितपणे तयारीसाठी येण्याचा या कार्यकर्त्यांना सोसावा लागलेला (व यापुढेही लागणारा) प्रवासखर्च बराच आहे. हे नोकरी करणारे कार्यकर्ते असल्याने संध्याकाळी सुरु होणारी बैठक रात्री ११-१२ वाजेपर्यंत चालते. समारोपाच्या सभेची जबाबदारी (स्टेज, लाऊड स्पीकर, दिवे इ.) एक स्थानिक संघटना घेईल असा खात्रीचा अंदाज होता. पण ऐनवेळी काही कारणाने ते बारगळले. मोठी अडचण तयार झाली. तथापि, तिथल्या एका दुसऱ्या संघटनेच्या समितीशी संबंधित कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर आवश्यक तेवढा निधी जमा केला व ही चिंता दूर केली. साधनांच्या-निधीच्या तपशीलाचे विस्तृत वर्णन यासाठी केले की फंडिंग पॅटर्न व राजकीय नेत्यांची स्पॉन्सरशिप हे दोन्ही प्रकार आम्ही जाणीवपूर्वक स्वार होऊ दिले नाहीत.

संविधानातील मूल्यांना आज असलेला धोका पुरेपूर जाणणाऱ्या व त्याबद्दल विविध माध्यमांतून चिंता व्यक्त करणाऱ्या आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी प्रवाहांतील आमच्या काही जवळच्या मित्रमंडळींना या प्रक्रियेत – किमान यात्रेतल्या एखाद्या टप्पात सहभागी होण्याचे आम्ही आवाहन केले होते. काहींनी येतो सांगितले. त्यातले काही आले. काही तर खूप दुरून, उन्हाचा त्रास सोसत आले. काहींनी अडचण कळवली. काहींना असे कळवणे जमले नाही. काहींनी यापुढच्या कामासाठी आर्थिक सहाय्याची तयारी दर्शवली. एकूण सहभागी होणाऱ्यांचा (कार्यकर्त्यांसहित) सरासरी आर्थिक स्तर हा मुख्यतः वस्तीत राहणाऱ्यांचा व काही प्रमाणात (या वस्त्यांतून थोडे वर सरकलेल्या) कनिष्ठ मध्यमवर्गीयांचा होता.

बंधुता यात्रा ही मुख्यतः भारताचे शासन व लोकजीवन यांचा चबुतरा असलेल्या सांविधानिक मूल्यांचे स्मरण व त्याचे जतन करण्यासाठीचे आवाहन करण्यासाठी होती. समारोपाच्या भाषणांत त्यांचा यथोचित आढावा घेतला गेला. बुद्धाच्या मैत्री, करुणेचे मानवतेला आवाहन व त्याच्या चिन्हांचा राजमुद्रा किंवा अशोकचक्र म्हणून देशाने केलेला स्वीकार, ख्रिस्ताची क्षमा, पैगंबराची बंधुता व शांतता, ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील मैत्र, कबीर-बुल्लेशहाकृत प्रेमाची महती, तुकारामांची दया-क्षमा-शांती, महात्मा फुलेंचे ‘ख्रिस्त, महंमद, ब्राम्हणाशी-धरावे पोटाशी बंधुपरी’ हे आवाहन, साने गुरुजींचा जगाला प्रेम अर्पिणारा खरा धर्म आणि अगदी अलिकडे न्यायालयाच्या निकालानंतर गोध्रातील अत्याचाराची बळी असलेल्या बिल्किस बानोने मला सूड नको-न्याय हवा, हे काढलेले उद्गार...हा सर्व काळाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील प्रेम, करुणा, मैत्री, क्षमा, बंधुतेचा महान वारसा व त्याचे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाशी असलेले नाते या भाषणांतून उलगडले गेले. शेवटी सर्वांनी उभे राहून जाहीर संकल्प घेतला व त्यानंतर या यात्रेचे एकप्रकारे ‘शीर्षक गीत’ झालेल्या ‘राहो सुखाने हा मानव इथे’ या गीताने सांगता झाली. बुद्धाचा संदेश-पर्यायाने आमच्या बंधुता यात्रेचा संदेश नेमकेपणाने सांगणाऱ्या या गीतातील मन उन्नत करणाऱ्या या ओळींनी या लेखाचा शेवट करतो-

‘कल्याण व्हावे माझे नि तुमचे| कल्याण व्हावे शत्रूचे अन् मित्रांचे |

राहो सुखाने हा मानव इथे| या भूवरी या भूवरी इथे |’


- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

__________________

बंधुता यात्रेच्या अखेरीस घेतलेला संकल्प:
१) आमचा भारत कोणा एका धर्म, जात, पंथाचा नाही; तो भारतीय जनतेचा आहे, यावर माझा विश्वास आहे.
२) भारताच्या विचारबहुल संस्कृतीचा पाया असलेली सहिष्णुता व आदर ही मूल्ये आम्ही कधीही ढासळू देणार नाही.
३) एखाद्याचे म्हणणे मला पटणार नाही, तथापि, त्याच्या मत मांडण्याच्या अधिकाराचे मी रक्षण करेन.
४) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये हे आम्ही आमच्या जीवनाचे ध्येय मानतो.
५) या मूल्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी आमच्यात बंधू-भगिनीभाव नांदला पाहिजे यासाठी आम्ही सदैव दक्ष राहू. 
जय भारत-जय जगत!
_____________________

आंदोलन, जून २०१७


1 comment:

Anonymous said...

छान लिहिलंय सर.अभिनंदन..

मनोज धोत्रे खेड,रत्नागिरी