Monday, December 20, 2021
सांविधानिक नैतिकता
Wednesday, December 8, 2021
लोकशाही चॅनलवरील चर्चेत सहभाग
६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोकशाही चॅनलवरील चर्चेत सहाभाग.
त्याची लिंक ;
सह्याद्री वाहिनीवरील विशेष कार्यक्रमात सहभाग
सह्याद्री वाहिनीवर ३ डिसेंबर २०२१ रोजीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या विशेष कार्यक्रमात माझा सहभाग.
त्याची लिंक :
Tuesday, December 7, 2021
या मानसिकतेचे काय करायचे..?
“करोनाने एवढे कंबरडे मोडले आहे, तरी लोक उसळून का उठत नाहीत?”
Thursday, November 25, 2021
संविधान बदलले जाऊ शकते का?
'संविधान बदलले जाऊ शकते का?’ याचे उत्तर आहे : “हो. संविधानात दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात. मात्र ते संपूर्ण बदलले जाऊ शकत नाही.” काळ स्थिर नसतो. समाजातही बदल होत असतात. काही नव्या गरजा तयार होत असतात. राज्यघटना राज्याच्या कारभाराची नियमावली असते; त्याप्रमाणे देशातील जनतेच्या विकासाचा संकल्पही त्यात असतो. या संकल्पपूर्तीच्या दृष्टीने अधिक स्पष्टता आणण्यासाठी तसेच काही बाधा दूर करण्यासाठी घटनतेतील दुरुस्त्यांचे आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी समर्थन केले आहे. संपत्तीचा अधिकार जमीन सुधारणांच्या आड येत होता, म्हणून घटना अमलात आल्याच्या वर्षभरातच अशी दुरुस्ती करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्येच घटनादुरुस्तीचे समर्थन केले होते. ते करताना थॉमस जेफरसनचे पुढील उद्गार त्यांनी उद्धृत केले - “प्रत्येक पिढी हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे असे आपण समजावे. प्रत्येक पिढीला बहुमताने स्वतःला बांधून घेण्याचा तेवढा हक्क आहे. दुसऱ्या देशातील रहिवाशांवर बंधने घालण्याचा जसा तिला हक्क नाही, तसा आपल्या मागून येणाऱ्या पिढीवरही बंधने घालून ठेवण्याचा तिला हक्क नाही.” डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात, “घटना परिषद जर या तत्त्वापासून कर्तव्यच्युत झाली असती तर ती दोषास्पद ठरली असती, इतकेच नव्हे तर निषेधार्हही ठरली असती."
आपले भवितव्य ठरविण्याच्या पुढच्या पिढ्यांच्या लोकशाही अधिकाराला जपणारी आपली घटना लवचिक आहे. मात्र ती अति लवचिक तसेच अति कर्मठही नाही. दुरुस्त्यांची प्रक्रिया घटनेच्या ३६८ व्या अनुच्छेदाने नमूद केली आहे. हा अधिकार संसदेला आहे. मात्र संसदेकडे कितीही बहुमताची ताकद असली तरी घटनेचा ‘मूलभूत ढाचा’ (Basic structure) तिला बदलता येणार नाही, असा १९७३ च्या केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दंडक घालून दिला आहे. श्रेष्ठ काय- संसद की न्यायालय? हा तिढा जुन्या काळापासून चर्चेत आहे. वास्तविक संसद व न्यायालय या दोन्हींच्या अधिकार कक्षा निश्चित आहेत. कायदे करण्याचा अधिकार जनतेचे प्रतिनिधीगृह म्हणून संसदेलाच आहे. तथापि, घटनेतील तरतुदींशी हे कायदे सुसंगत आहेत की नाहीत, याचा अर्थ लावण्याचा अधिकार न्यायालयाला घटनेनेच दिला आहे. तो अर्थ पटला नाही, तर घटनादुरुस्ती करुन संसद न्यायालयाच्या निर्णयावर उपाय करु शकते. मात्र हे उपाय संपूर्ण घटनाच बदलण्याचे असता कामा नयेत. दुरुस्ती आणि नवी रचना यात सर्वोच्च न्यायालयाने फरक केला आहे. घटनाकारांच्या मूळ हेतूंनाच सुरुंग लावणारी दुरुस्ती करता येणार नाही, हे मूलभूत ढाच्याबाबतच्या वर नमूद केलेल्या केशवानंद भारती निकालाचे सूत्र. ते आजही टिकून आहे.
या मूलभूत ढाच्यात काय येते? याबाबत काही बाबींची नोंद केशवानंद भारती निकालात न्यायालयाने केली आहे. त्याचवेळी प्रसंगोपात या बाबी ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला दिला आहे. आजवरच्या निकालांतून आलेले मूलभूत ढाच्याचे किंवा संरचनेचे काही घटक पुढील प्रमाणे : संविधानाची सर्वोच्चता, देशाची एकता व सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणंत्रात्मक राज्यपद्धती, संघराज्यीय रचना, धर्मनिरपेक्षता, व्यक्तिस्वातंत्र्य, संसदीय प्रणाली, कायद्याचे राज्य, समतेचे तत्त्व, मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक सूत्रे यांत सौहार्द व समतोल इत्यादी.
संविधानाच्या उद्देशिकेत इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत १९७६ साली ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवादी, धर्मनिरपेक्ष या शब्दांची भर घातली गेली. या संकल्पना मूळ घटनेच्या भाग नसताना त्या इंदिरा गांधींनी घुसडल्या, पर्यायाने त्या काढून टाकायला हव्यात, अशी मोहीम काही मंडळींनी त्यावेळी हाती घेतली. न्यायालयातही काही लोक गेले. मात्र न्यायालयाने ही दुरुस्ती रद्द केली नाही. उद्देशिकेच्या मूळ रचनेतले काही न वगळता, संविधानाला अभिप्रेत उद्दिष्टांची अधिक स्पष्टता करणारे हे शब्द आहेत, म्हणून न्यायालयाने ते तसेच ठेवले.
आरक्षणाच्या सध्याच्या धुमश्चक्रीत ५० टक्क्यांची मर्यादा हा विषय कळीचा झाला आहे. शैक्षणिक-सामाजिक मागासलेपण, पर्याप्त प्रतिनिधीत्वाचा अभाव व मुख्य प्रवाहापासूनची अतिदूरता या निकषावर ही मर्यादा उठवण्यास न्यायालयाची अनुमती आहे. मात्र सरसकट नव्या घटकांना आरक्षण देता येणार नाही. ज्यांना दिले गेले, त्यांचे रहित झाले. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. खुद्द केंद्र सरकारने दिलेले आर्थिक आरक्षणही धोक्यात येण्याची शक्यता आहे. ५० टक्क्यांच्या मर्यादेवर संसदेत खूप गदारोळ झाला. अजूनतरी सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. एकूण आरक्षण निम्म्या जागांहून अधिक झाल्यास समतेच्या व खुल्या संधीच्या तत्त्वाला त्यामुळे बाधा येते, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीतील मांडणीचा आधार हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. समान संधी वगैरे यामागच्या आधारभूत बाबी मूलभूत ढाच्याचा भाग मानला जातो. अशा स्थितीत ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा कायदा केंद्राने केला, तरी न्यायालयात तो टिकण्याची शक्यता कमीच आहे.
यावर उपाय काय? संसदेच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा पुढे करुन न्यायालयाला चाप बसविण्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न जोर पकडू शकतात. अशावेळी एक सूचना येईल, ती म्हणजे केशवानंद भारती खटल्यातील मूलभूत ढाचा निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी त्याहून अधिक ताकदीचे घटनापीठ नेमण्याची. केशवानंद भारती खटल्यात १३ न्यायाधीशांचे घटनापीठ होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे विषम संख्येसाठी १५ न्यायाधीशांचे घटनापीठ नेमणे. यातून न्यायाधीशांच्या एकमताने वा बहुमताने समजा मूलभूत ढाचा संकल्पना रद्द झाली तर काय होईल? – आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचा प्रश्न नक्की सुटेल. पण केवळ तेवढ्यावरच थांबणार नाही. त्यासाठी तयार केलेल्या छिद्राने धरणच फुटू शकते. म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्षता, संपत्तीच्या अधिकारावरची बंधने आदि खूप साऱ्या दुरुस्त्या रद्दबातल करण्याचे अधिकार संसदेला मिळू शकतील. जात, धर्म वा तत्सम कारणांनी भावना भडकावून प्रचंड बहुमत मिळवलेली मंडळी अख्खी घटनाच बदलू शकतील.
हा धोका टाळण्यासाठी घटनादुरुस्तीबाबतची अति लवचिकता वा अति कर्मठता यांच्या मध्ये असलेली संविधानाची आजची स्थिती टिकवण्याचा विवेक अत्यंत गरजेचा आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, २१ नोव्हेंबर २०२१ )
Monday, November 1, 2021
बाबासाहेबांचा संविधान सभेतील फेरप्रवेश
घटना समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशाला तसेच स्वागताला तयार नसणाऱ्या काँग्रेसनेच देशाच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना मुंबईतून बिनविरोध निवडून आणले. पुढे देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कायदामंत्री आणि घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना आज जग ओळखते. ..या काळातील घटनाक्रमाबद्दल आणि त्यातील श्रेय-अपश्रेयाच्या वाटणीबद्दल बरेच वाद आहेत. अनेक ग्रह, समजुतींच्या सावटाखाली या काळातील दृश्ये त्यांच्या मूळ रुपात, रंगात पाहणे अनेकांना कठीण जाते. आता स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली आहेत. घटनेला पुढील दोन वर्षांनी पंच्याहत्तर वर्षे होतील. या दीर्घ काळानंतर तरी संविधान निर्मितीच्या तसेच त्याच्या मागच्या पुढच्या काळातील घटनाक्रमांचा अभ्यास वस्तुनिष्ठपणे व्हायला हवा.
डॉ. रावसाहेब कसबे यांच्या ‘डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’ या पुस्तकाची सहावी आवृत्ती आणि त्यांचा नवा ग्रंथ ‘महात्मा गांधीः पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ या दोन पुस्तकातील काही संदर्भ, अवतरणे यांच्या सहाय्याने काही मुद्दे खाली नोंदवत आहे. त्यांना अभ्यासक नव्या सक्षम पुराव्यांच्या आधारे आव्हान देऊ शकतात. तशी आव्हाने या काळाचे अधिक वस्तुनिष्ठ चित्र मिळायला मदतनीसच ठरतील.
भारतातील स्वातंत्र्याच्या आंदोलनाची वाढती धग आणि दुसऱ्या महायुद्धाने खचलेली साम्राज्याची ताकद यामुळे ब्रिटिश सरकार भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीला लागले. १९४६ साली कॅबिनेट मिशन त्यासाठी भारतात आले. भारतीय नेत्यांशी झालेल्या चर्चेतून काही काळातच स्वतंत्र व्हावयाच्या भारताची राज्यघटना बनविण्यासाठी संविधान सभा तयार करावयाचे ठरले. संविधान सभेत निवडून येणाऱ्या सदस्यांसाठी सर्वसाधारणपणे आजच्या राज्यसभेसारखी पद्धती अवलंबण्यात आली. म्हणजे प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांनी घटना समितीचे प्रतिनिधी मतदानाद्वारे निवडून पाठवायचे. याचा अर्थ पक्षीय बलाबल इथे आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला १९३७ च्या निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. मात्र आताच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला १९४६ च्या निवडणुकीत मुंबई प्रांतात पूर्ण अपयश आले होते. अशावेळी त्यांना घटना समितीवर निवडून कोण देणार?
या दरम्यानच्या काही घटना समजून घ्यायला हव्या.
मध्यवर्ती सरकारातील प्रतिनिधीत्वाबाबत बाबासाहेबांनी इंग्लंडला जाऊन सत्ताधारी तसेच विरोधकांतील ताकदवर मंडळींच्या भेटी घेऊन प्रयत्न केले. मात्र अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम-शिखांप्रमाणे अस्पृश्यांच्या खास प्रतिनिधीत्वाबाबत ब्रिटिशांनी हात झटकले. माजी पंतप्रधान चर्चिलनी बाबासाहेबांशी आपल्या निवासस्थानी भोजन देऊन चर्चा केली. त्यांनी त्यांच्या प्रश्नाशी सहानुभूती व्यक्त केली. पण ते सत्तेवर नसल्याने फार काही करु शकणार नव्हते. कॅबिनेट मिशन भारतातून इंग्लंडला माघारी आले होते. त्यातील एक मंत्री क्रिप्स यांनी ब्रिटिश संसदेत केलेल्या भाषणात बाबासाहेबांच्या मुद्द्यावर म्हणणे मांडले. बाबासाहेबांचे आद्यचरित्रकार चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी ९ व्या खंडात क्रिप्सच्या या भाषणातील काही भाग नोंदवला आहे. तो असा – “डॉ. आंबेडकरांचा पक्ष केवळ मुंबई आणि मध्यप्रांतातच प्रबळ आहे. त्याचे भारतातील इतर प्रांतांत अस्तित्व नाही. काँग्रेस पक्षातर्फे अस्पृश्यांचा पक्ष कार्य करीत आहे....पुणे कराराप्रमाणे १९४६ साली ज्या निवडणुका झाल्या त्यात आंबेडकरांच्या पक्षाचे सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या पाठिंब्यावर जे अस्पृश्यवर्गातील उमेदवार निवडणुकीस उभे राहिले ते सर्व निवडून आले. डॉ. आंबेडकरांनी आणि त्यांच्या पक्षाने अस्पृश्यांच्या हक्कासाठी जिवापाड लढा दिला, तरी ही परिस्थिती लक्षात घेता त्या पक्षाला मध्यवर्ती सरकारात प्रतिनिधीत्व देणे हे कमिशनला योग्य वाटले नाही. ” काँग्रेस पक्षांतर्गत अस्पृश्य प्रतिनिधींतर्फे अस्पृश्यांचे हित होईल, असा भरवसा क्रिप्स यांनी व्यक्त केला.
देशच सोडून जायचा असल्याने ब्रिटिशांना आता बाबासाहेबांची गरज राहिलेली नव्हती. त्यामुळे गोलमेज परिषदेत बाबासाहेबांच्या बाजूने असलेल्या ब्रिटिशांनी आता खाका वर केल्या. बाबासाहेबांच्या पदरी निराशा आली. १९४२ साली चले जावचा नारा देऊन काँग्रेस ब्रिटिशांच्या विरोधात लढत होती, तर बाबासाहेब व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. बाबासाहेब काही स्वातंत्र्याच्या विरोधात व ब्रिटिशांच्या बाजूने नव्हते. त्याविषयी त्यांची भूमिका त्यांच्या लिखाणात-भाषणात सविस्तर आलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर नवे सत्ताधारी अस्पृश्यांशी काय व्यवहार करणार ही त्यांची चिंता होती. त्यासाठी जमेल तेवढ्या संरक्षक तरतुदी ब्रिटिशांकडून त्यांना करुन घ्यायच्या होत्या. व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात जाण्याचे त्यांचे हे समर्थन होते. तेथील त्यांची कामगिरी देशातील अनेक मूलभूत सुधारणांना चालना देणारी ठरली, हे विदित आहेच. मात्र सर्वसामान्य जनता हे अंतर्विरोध समजण्याच्या स्थितीत नव्हती. तिला काँग्रेस ब्रिटिशांविरोधात लढते आहे व बाबासाहेब त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, हे दिसत होते. सर्वसाधारण जनतेत यामुळे जी प्रतिकूल भावना तयार झाली, त्याचा फटका शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला निवडणुकीत बसला, असा एक अंदाज व्यक्त केला जातो.
पुणे करारातील राखीव जागांच्या तडजोडीऐवजी स्वतंत्र मतदार संघ असते तर ही पाळी आली नसती असे बाबासाहेबांना वाटू लागले होते. त्यामुळे व इतर अनेक कारणांनी काँग्रेसबद्दल बाबासाहेबांच्या मनात व वाणीत तीव्रता आली होती. बाबासाहेब व काँग्रेस यांच्यातील तणाव या दरम्यान खूप वाढलेला होता. बाबासाहेबांच्या टीकेचे कठोर वार काँग्रेस नेत्यांना हैराण करत होते. त्यामुळे काँग्रेसचे नसतानाही काही कायदेतज्ज्ञांना त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन काँग्रेसने निवडून दिले. मात्र बाबासाहेबांची कायद्यातली तज्ज्ञता व प्रकांड पांडित्य पुरेपूर ठाऊक असूनही ही ब्याद घटना समितीत नको म्हणून काँग्रेसने त्यांना सहकार्य केले नाही. या संदर्भात ‘दलित बंधू’ या वृत्तपत्राच्या २५ जुलै १९४६ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत बाबासाहेबांचे उद्गार असे आहेत – ‘मुंबई प्रांतात गेली कित्येक वर्षे काढलेल्या माझ्यासारख्याने घटना समितीवर येऊ नये म्हणून उघडे असलेले सर्व दरवाजे काँग्रेसने बंद केले.’
स्वतंत्र भारतात अस्पृश्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी बाबासाहेबांना घटना समितीवर काहीही करुन जायचे होते. अखेरीस त्यांचे पूर्व बंगालमधील शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सहकारी जोगेंद्र मंडल यांनी आपल्या पक्षाला कमी पडणाऱ्या मतांसाठी मुस्लिम लीगचे सहाय्य घेतले व बाबासाहेबांना घटना समितीवर निवडून पाठवले. नेहरुंनी १३ डिसेंबर १९४६ ला घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. या ठरावावरील १७ डिसेंबर १९४६ रोजीच्या चर्चेत बाबासाहेबांनी केलेल्या राष्ट्रीय जाणिवेच्या भाषणाने अख्खे सभागृह मंत्रमुग्ध झाले. विरोधकही हर्षभरित होऊन टाळ्या वाजवत होते. देशभरच्या वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांची जोरदार प्रशंसा केली. यानंतर बाबासाहेबांकडे संविधान सभेत वेगवेगळ्या उपसमित्यांच्या जबाबदाऱ्या येऊ लागल्या. बाबासाहेबांची संविधान सभेतील अपरिहार्यता अधोरेखित झाली. त्यांच्या हाताने घटना साकारणार हे भविष्य जवळपास निश्चित झाले. ...आणि एक संकट उभे ठाकले. देशाला अपेक्षेच्या आधीच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळणार, तेही फाळणीच्या जखमेसहित हे जाहीर झाले. फाळणीमुळे बाबासाहेबांचा पूर्व बंगालमधला मतदार संघ पाकिस्तानमध्ये गेला. साहजिकच बाबासाहेब घटना समितीच्या बाहेर जाण्याची पाळी आली. आता काय करायचे?
मात्र आता बाबासाहेब घटना समितीत असणे ही केवळ अस्पृश्यांची नव्हे, तर देशाची गरज बनली होती. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातही ते असावे, अशी काँग्रेस अंतर्गत चर्चा सुरु झाली होती. बाबासाहेब आणि गांधीजी व त्यांच्यामार्फत नेहरु, पटेल यांच्यात यासाठीच्या संवादासाठीची मध्यस्थी करण्यात लंडनस्थित म्युरिएल लेस्टर या बाई कामी आल्या. या बाई गांधी व आंबेडकर या दोहोंशी स्नेह असलेल्या त्यांच्या सामायिक हितचिंतक होत्या. (या संवादासाठी घटना समितीच्या एक सदस्य राजकुमारी अमृत कौर यांनी केलेल्या शिष्टाईचीही नोंद रामचंद्र गुहा यांनी केली आहे.) म्युरिएल भारतात येऊन गांधीजी व आंबेडकर यांना भेटल्या. खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या ९ व्या चरित्रखंडात म्युरिएल बाईंच्या शिष्टाईचे वर्णन केले आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणे गांधीजींना त्या म्हणत – “...तुम्ही आंबेडकरसाहेबांना चांगले वागवीत नाही. म्हणून ते तुमच्याशी सहकार्य करीत नाहीत.” त्यावर गांधीजींचे उत्तर होते - “हो. हे खरे आहे. ही आम्हा हिंदूंची चूक आहे व ती त्यांनी सुधारावी. आंबेडकरांचे सहकार्य अस्पृश्यांचे व देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी मिळवावे. ते फार विद्वान आहेत. पण माझ्या सूचनेला आमचे काही काँग्रेसमन महत्व देत नाहीत. डॉ. आंबेडकरांनी मध्यवर्ती मंत्रिमंडळात असावे, असे आम्हा कित्येक काँग्रेसवाल्यांचे प्रामाणिक मत आहे. पण त्यांना मंत्रिमंडळात कोणी व कसे आणावे, हा मोठा पेच आहे.”
खैरमोडेंनी मग म्युरिएल बाबासाहेबांना भेटल्या त्याची नोंद केली आहे. बाबासाहेब म्युरिएलना म्हणतात – “गांधीजी व काँग्रेसचे लोक मला कोंडीत पकडून नामोहरम करण्यात टपलेले आहेत.” नंतर या मुद्द्याला अनुरुप असे आपले १९३० ते १९४० च्या काळातील कटू अनुभव बाबासाहेबांनी म्युरिएलना सांगितले. म्युरिएलनी बाबासाहेबांना समजावले – “डॉक्टरसाहेब, झाले ते गेले. आता तुम्ही पूर्वग्रह बाजूला सारावेत आणि मंत्रिमंडळात जावे, हे तुमच्या कार्याच्या दृष्टीने हितावह होणार आहे.” परोपरीने त्यांनी समजावले. पण बाबासाहेबांनी नकार किंवा होकारही दिला नाही. म्युरिएल हा वृत्तांत गांधीजींच्या कानावर घालतात. पुढची नोंद खैरमोडे अशी करतात – ‘१९४७ साली गांधींनी वल्लभभाई व जवाहरलाल यांना सुचविले की, डॉ. आंबेडकर यांना मंत्रिमंडळात आणण्याचे प्रयत्न करा.’
मंत्रिमंडळात घेण्यासाठी बाबासाहेबांना प्रथम घटना समितीवर निवडून आणणे भाग होते. घटना समितीचे एक सदस्य बॅ. जयकर यांच्या राजिनाम्यामुळे मुंबई प्रांतात एक जागा रिकामी झाली होती. आंबेडकरांना तिथून निवडून आणण्याचे काँग्रेसने ठरवले. आपल्या पक्षाच्या माणसाऐवजी आपल्यावर सतत टीकेचे प्रहार करणाऱ्या बाबासाहेबांसारख्या विरोधकाला निवडून देण्यासाठी, या कठोर टीकेने नाराज असलेल्या मुंबई प्रांतातील काँग्रेसच्या नेत्यांना समजावणे गरजेचे होते. गांधीजींच्या सूचनेप्रमाणे घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई प्रांताचे पंतप्रधान (म्हणजे मुख्यमंत्री) बाळासाहेब खेर यांना ३० जून १९४७ रोजी एक पत्र पाठवले. त्याच्या मागेपुढे सरदार वल्लभभाई पटेल यांनी खेरांशी फोनवर बोलणे केले व दुसऱ्या दिवशी त्यांनीही खेरांना सविस्तर पत्र लिहिले. राजेंद्र प्रसादांचे पत्र वसंत मून यांनी बाबासाहेबांच्या भाषणे व लेखनाच्या १३ व्या खंडात छापले आहे. ते असेः
‘अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की त्यांच्या सेवेला आपण मुकू नये, असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरु होत आहे. त्या सत्रास डॉ. आंबेडकर उपस्थित राहावेत, अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही त्यांना निवडून द्यावे.’
१ जुलै १९४७ रोजी खेरांना पाठवलेल्या पत्रात सरदार पटेल म्हणतात – ‘काल रात्री तुमच्याशी बोलणे केलेच आहे. शक्यतो १४ जुलैपूर्वी डॉ. आंबेडकर निवडून येतील, अशी व्यवस्था तुम्ही केलीच पाहिजे. ४ जुलैपर्यंत नामांकन पत्रे दाखल करावयाची असतील तर कसलीच अडचण येणार नाही. जर नामांकन पत्र दाखल करण्याची तारीख बदलून ती ११ जुलै करण्यात आली, तर तुम्हावर सोपवलेले काम पूर्ण करण्याचा एकच मार्ग उरतो. तो म्हणजे अन्य उमेदवारांनी आपली नामांकन पत्रे मागे घ्यावीत, यासाठी त्यांचे मन वळवण्याचा. काही झाले तरी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करालच.’
खेरांनी बरीच धावपळ केली. या सगळ्यांचे प्रयत्न फळास आले. मुंबई विधिमंडळातील काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना घटना समितीवर बिनविरोध निवडून आणले. घटना समितीतील सर्वात कळीच्या अशा मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. केवळ अस्पृश्य समाजाच्या हितासाठी घटना समितीत यायचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या बाबासाहेबांच्या हातून सर्व भारतीयांचे भवितव्य घडविणारी राज्यघटना साकार करण्याचे महान कार्य पार पडले. भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाचाही मान त्यांना मिळाला.
मंत्रिपद स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांना ३० एप्रिल १९४८ ला नेहरुंनी एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात – ‘तुम्ही माझ्या निमंत्रणानुसार मंत्रिमंडळात आल्यापासून आपल्या दोघांत किंचितही द्वेषभावना निर्माण होण्यासारखा प्रसंग आलेला नाही... त्या काळात तुम्ही संघभावनेने सहकार्य केले, हे मी आनंदाने मान्य करतो. मी तुम्हाला मंत्रिमंडळात येण्याचे निमंत्रण दिले, तेव्हा कोणतीही अट घातली नाही. एखाद्या मोठ्या कार्यात सहकार्य करावे, अशी विनंती करताना काही अटी घालणे योग्य नाही.’
२९ ऑगस्ट १९४७ ला बाबासाहेबांना मसुदा समितीचे अध्यक्ष घोषित केले गेले. त्यानंतरही ते गांधीजी आणि काँग्रेसच्या विरोधात मधून-मधून बोलत असत. त्यामुळे काँग्रेस नेते अस्वस्थ होत आणि काळजीही करत. ६ मे १९४८ रोजी या संदर्भात सरदार पटेलांनी सी. पी. रामस्वामी अय्यर यांना पाठविलेल्या पत्रात लिहिले होते – ‘डॉ. आंबेडकर शक्य तितके दिवस आमच्याबरोबर राहतील, असे मी आपणास आश्वासन देतो. आपल्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी ते काहीही बोलतील; परंतु, त्यांचा देशाला उपयोग आहे आणि होईल याची मला पूर्णतया जाणीव आहे.’
परस्परांचे प्रखर विरोधक असतानाही देशहिताच्या सामायिक मुद्द्यासाठी एकत्र येण्यातले, अहंता, प्रतिष्ठा व वैयक्तिक स्वार्थाच्या दलदलीत न अडकता परस्परांना सहन करत मार्गक्रमणा करण्यातले हे सौंदर्य आजही जपले पाहिजे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, नोव्हेंबर २०२१)
Sunday, October 17, 2021
भागवतांची चिंता व त्यावरचा उपाय
अलिकडेच उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लग्नासारख्या छोट्या स्वार्थासाठी हिंदू मुले-मुली धर्म बदलतात हे चूक आहे’, असे मत व्यक्त केले. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी 'हिंदू-मुसलमानांचा 'डीएनए' एकच आहे, दोहोंचे पूर्वज समान आहेत’ असे ते एका जाहीर सभेत बोलले होते. 'हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व' असे तर ते नेहमीच बोलत असतात. मग मोहन भागवतांना मुलांनी धर्म बदलण्याची चिंता का? भागवतांच्या व्याख्येप्रमाणे असा धर्म बदलणाऱ्यांचे हिंदुत्व व डीएनए तर तोच राहणार आहे.
त्यांच्या म्हणण्याची संगती लागत नाही. कारण एकीकडे उत्तराखंडच्या भाषणात ते पालकांना कानपिचक्या देतात- “आमच्या मुलांना (अशा धर्मांतरास प्रवृत्त न होण्याच्या दृष्टीने) आम्हीच तयार करत नाही. घरातच त्यांना तसे संस्कार देण्याची गरज आहे. आपल्या धर्माबाबत अभिमान, आपल्या उपासनेबद्दल आदर त्यांच्या मनात तयार करायला हवा.” म्हणजे इथे ते हिंदू हा अन्य धर्मांप्रमाणे एक संघटित, विशिष्ट उपासना पद्धती असलेला धर्म (रिलिजन) असा अर्थ घेतात. अनेकविध धारणा, विविध उपासना पद्धती यांना सामावणारे हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व ही इतर वेळची त्यांची भूमिका त्यांना इथे अभिप्रेत नाही. पण पुन्हा लगेचच ते भारतीय परंपरेवर येतात. या परंपरेची प्रशंसा ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी केल्याचा ते उल्लेख करतात. आई-वडिलांची सेवा कशी करायची हे भारतीय परंपरेतून आपण शिकले पाहिजे, असे थॅचरबाईंनी म्हटल्याचे ते नमूद करतात. पुढे बोलताना ते म्हणतात, “वेदांपासून महाभारतापर्यंत आमचे ग्रंथ आम्हाला धर्माचे पालन कसे करायचे ते सांगतात.” वेद, महाभारत यांमधला धर्म हा रिलिजन नव्हे. त्यातला धर्माचा अर्थ नीती, कर्तव्य असा आहे. मार्गारेट थॅचर या नीती धर्माने प्रभावित आहेत. हिंदू रिलिजनने नाही.
भागवत हिंदू धर्म व हिंदुत्व बहुधा वेगळे धरत असावेत. भारतीयत्वात किंवा त्यांच्या संज्ञेनुसार हिंदुत्वात हिंदू, मुसलमान किंवा अन्य धर्मीय या सर्व भारतीयांचा समावेश होतो. कारण त्यांचे पूर्वज समान आहेत. त्यांचा डीएनए एक आहे. मुलांनी आपला धर्म सोडून दुसरा स्वीकारला तरी ते या व्यापक हिंदुत्व वा भारतीयत्वाचाच घटक राहतात. त्याची चिंता असायचे मग कारण नाही. मात्र त्यांना ती चिंता वाटते. म्हणजेच हिंदू हा रिलिजन आहे असे ते मानतात. हिंदुत्वात सगळे सामावतात, मात्र हिंदू हे जन्मानेच असावे लागतात. त्यात दुसरे सामावू शकत नाहीत. त्यातले बाहेर जाऊ शकत नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो.
घोळ होतो आहे. हा हिंदू – हिंदुत्वाचा घोळ भागवत सोडवतील तेव्हा सोडवोत. पण त्यांची आताची चिंता (मुलांनी लग्नासाठी धर्म बदलणे) दूर करण्याचा मार्ग कठीण नाही. तो त्या अर्थाने त्यांच्याच हातात आहे. कसा ते पाहू.
पटलेला धर्म स्वीकारण्याचा अधिकार घटनेने आपल्याला अनुच्छेद २५ नुसार दिलेला आहे. मी माझा जन्मजात धर्म सोडून मला पटलेला दुसरा धर्म स्वीकारु शकतो. उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या हिंदू धर्मात जन्मास आले तो सोडून १४ ऑक्टोबर १९५६ ला ते बौद्ध झाले. त्यांच्या आवाहनाप्रमाणे त्यांच्या लाखो अनुयायांनीही त्यांचे अनुकरण करत हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला. इथे हिंदू धर्म त्यागाची व बौद्ध धर्म स्वीकाराची कारणे बाबासाहेबांनी दिली आहेत. ती कोणाला पटोत न पटोत, पण ती ठोस आहेत, हे कबूल करावे लागते.
लग्नासाठी धर्म बदलणे यात अशी कारणे नाहीत. पहिला धर्म सोडून दुसरा स्वीकारण्यामागे तो पटल्याचा मुद्दा इथे नाही. यात एक तांत्रिक अपरिहार्यता आहे. घटनेने पती-पत्नी म्हणून कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या व्यक्तीची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विशेष विवाह कायद्याची त्यासाठी तरतूद सरकारने केली आहे. या कायद्याखाली लग्न करताना उभयतांपैकी कोणालाही आपला धर्म बदलण्याची गरज नसते. तथापि, यासाठीच्या प्रक्रियेत एक अडचण आहे. या कायद्याखाली एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर एक महिन्याने लग्न करता येते. हा एक महिना विवाह नोंदणी निबंधकांच्या वेब पोर्टलवर कोणाचे काही आक्षेप आहेत का ते विचारण्यासाठी लग्न करु इच्छिणाऱ्या जोडीची माहिती जाहीर केली जाते. या लग्नाच्या विरोधात जर आई-वडिल वा अन्य नातेवाईक वा धर्माचे ठेकेदार असतील तर त्यांना ही एक महिन्याची मुदत व माहिती म्हणजे लग्नात मोडता घालायला आयती संधीच असते. कायदेशीरदृष्ट्या सज्ञान व दोहोंची संमती असेल तर नातेवाईक काहीच करु शकत नाहीत. पण मारहाण, धमक्या, अपहरण या मार्गांनी ते हे लग्न मोडतात. अशा विरोधामुळे तातडीने व लपून-छपून लग्न करु पाहणाऱ्या जोडप्याला हा कायदा आधार देत नाही. त्यासाठी मग धार्मिक विधीचा आधार घेतला जातो. धार्मिक पद्धतीत वधू - वर एकाच धर्माचे असावे लागतात. ज्या एकाचा तो धर्म नसेल त्याला तो पटो वा न पटो केवळ लग्नासाठी जोडीदाराचा धर्म स्वीकारावा लागतो. याला उपाय विशेष विवाह कायद्यातली जाहीर नोटीशीची अट रद्द करणे व या जोडप्याला त्यांनी मागणी केल्यास सुरक्षितपणे महिनाभर गुप्तपणे राहता येईल अशी व्यवस्था सरकारने करणे हा आहे. जीवनाचा साथीदार निवडताना धर्म बदलण्याचे हे अपरिहार्य कारण नक्कीच छोटे नाही.
मोहन भागवत ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आहेत, त्या संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक असलेले नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी आपले संघाशी असलेले नाते सोडलेले नाही. या नात्याचा हवाला देऊन मोहन भागवतांनी मुला-मुलींना लग्नासाठी धर्म बदलावा लागू नये म्हणून विशेष विवाह कायद्यात वर सुचवलेली दुरुस्ती करण्याचे आवाहन मोदींना करायला हवे. ते झाल्यास आपल्या पसंतीचा जोडीदार (मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, आर्थिक स्तरातला असो) मुलामुलींनी निवडावा असे आवाहन मोहन भागवत बिनधोकपणे करु शकतील. यात काही विघ्न येऊ नये यासाठी अशा मुलांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा आदेश त्यांनी संघ स्वयंसेवकांना दिल्यास व्यापक, उदार भारतीयत्व वा त्यांच्या भाषेत हिंदुत्व अधिकच झळाळून उठेल. अशारीतीने हिंदू धर्म व हिंदुत्व दोन्ही सुरक्षित राहतील.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १७ ऑक्टोबर २०२१)
Saturday, October 2, 2021
भवतालातील व्यथांचा कृतिप्रवण वेध
पंच्याहत्तरीचा लेखाजोगा घेण्याचे हे वर्ष. स्वातंत्र्याने खूप काही बदलले. विकासाला चालना मिळाली. लोकांचे जीवनमान उंचावले. मात्र या विकासाचे, जीवनमान सुधारण्याचे प्रमाण समलयीत झाले नाही. काहींना अमाप तर काहींच्या वाट्याला अल्प आले. काहींची तर विकासाची गाडी चुकली असेही दिसते. बदलाच्या प्रक्रियेत नवे प्रश्न तयार झाले. त्यांचे ताण वा वेदना तीव्र आहेत. हे भोग वाट्याला आलेल्यांच्या मनात स्वातंत्र्याने मला काय दिले हा प्रश्न, शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर याचे मोजमाप वैचारिक, ललित, संशोधनात्मक अंगाने होत आले आहे. त्या क्रमात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या या टप्प्यावर ‘भवताल’ मधील लेखन पाहायला हवे. स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या लेखिका वृषाली मगदूम संवेदनशीलतेने व डोळसपणे आपला हा भवताल निरखताना दिसतात. हे त्यांचे निरखणे दुरुन नाही. कार्यकर्त्या म्हणून भवतालातील कुरुपता दूर करण्यात स्वतः हस्तक्षेप करतानाचे त्यांचे हे निरीक्षण आहे. म्हणूनच स्वातंत्र्य अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने समाजाची मानसिकता, कृती व शासकीय धोरणाची दिशा काय असावी याची सूत्रेही त्यातून व्यक्त होतात. कथा-कादंबरीकार असलेल्या वृषाली मगदूम यांचे ‘भवताल’ मधील लेख हे नुसते विचारांची मांडणी करणारे लेख नाहीत. त्यात घटनांची मालिका आहे, संवाद आहेत. या घटना कथा-कादंबरीप्रमाणे काल्पनिक नाहीत. वास्तविक आहेत. त्यामुळे या लेखांना कथालेख अथवा कथात्म लेख म्हणणे अधिक योग्य राहील. या कथात्म स्वरुपामुळे दोन-तीन बैठकीत वाचून पूर्ण होण्याची वाचनीयता या पुस्तकाला लाभली आहे.
शिक्षण, दारु, रेशन, शौचालय, बालविवाह, स्त्रीचे दुय्यमत्व, लैंगिक छळ, समलिंगी, ज्येष्ठ नागरिक, जात-धर्माचे भेद, रुढीप्रियता असे अनेकविध विषय वृषाली मगदूम इथे हाताळतात. त्यांच्या आजच्या स्थितीचे मोजमाप करतात. साक्षरतेचे, शिक्षणाचे प्रमाण स्वातंत्र्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षांत लक्षणीय वाढले आहे. तथापि, अन्य देशांच्या अगदी आपल्या शेजारच्या चीनच्या तुलनेत आपण मागे आहोत, याची नोंद इथे आहे. आपल्या देशातील बदलांची गती पाहायची तर गेल्या दशकातील आकडे स्त्री शिक्षणाचे प्रमाण व जागृती वाढल्याचे दाखवतात. त्याचवेळी या प्रगतीच्या गतीशी स्त्रियांतील आत्मविश्वास, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, समतेचा विचार यांची गती अनुरुप आहे का, हा प्रश्नही उपस्थित केला गेला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक छळाच्या विरोधात कायदा आला. ‘विशाखा मार्गदर्शक सूचना’ आल्या. तरी त्यांचे संरक्षण मिळण्यात स्त्रियांना अनंत अडचणी येतात. ही घटना घडते तेव्हा दोघांव्यतिरिक्त कोणी नसते. त्यामुळे ती सिद्ध करणे महिलेला अवघड जाते. तो अनुभव सांगण्याची लाज वाटते. व्यवस्थापनाच्या प्रमुख स्थानी स्त्री असली तरीही एकूण पुरुषप्रधान संस्कारांचेच वर्चस्व असल्याने या प्रकरणांत चालढकल होत राहते. न्याय दुरापास्त होतो. मुलग्यांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण प्रगत विचार परंपरेच्या महाराष्ट्रात घटते आहे. २००१ च्या जनगणनेत अन्य राज्यांच्या तुलनेत चौथ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र २०११ च्या जनगणनेत दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगून राज्यातील गर्भलिंग परीक्षेच्या घटना लेखिकेने नोंदवल्या आहेत. भौतिक उन्नतीच्या क्रमात ‘मुलगाच हवा’ ही मागास मानसिकता वाढते आहे.
त्यातच या मागास मानसिकतेला हल्ली जाति-धर्माच्या गडद होणाऱ्या भेदांची फोडणी बसते आहे. महात्मा फुले व सावित्रीबाईंना घरातून बाहेर काढल्यावर ते उस्मानशेकडे राहायला गेल्याचे नोंदवून लेखिका सवाल करतात - फुले पती-पत्नींच्या स्त्रीहक्काच्या लढ्याच्या परंपरेतील महाराष्ट्रात स्त्रियांतील भगिनीभाव संपुष्टात आला आहे का? हिंदू-मुस्लिम स्त्रियांच्या मनातील एकमेकांविषयीचे अंतर वाढते आहे. मुस्लिम मुलींत बुरख्याचे प्रमाण वाढले आहे. पण त्याचबरोबर ‘आमचा धर्म सांगतो व तो आम्ही घातलाच पाहिजे हे मला पटले आहे’ हे त्या सांगतात ते अधिक चिंतेचे आहे. लेखिकेची प्राध्यापिका मैत्रिण पौरोहित्य करणाऱ्या बाईचा सत्कार करण्याची सूचना करते. स्त्रियाही पुरुषांप्रमाणेच पौरोहित्य करु शकतात, हे तिला अभिमानाचे वा विशेष कर्तृत्वाचे वाटते. अन्य एके ठिकाणी असे पौरोहित्य करणारी स्त्री ‘सौभाग्यवती’ असण्याची अट असल्याचे लेखिका नोंदवतात.
जात दुस्वास्वाची कीड दोन दलित गरीब समूहांतही कशी शिरली आहे, याचा साक्षात्कार लेखिकेला अचंबित करणारा व खंतावणारा आहे. १४ एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या फोटोला अभिवादन करण्याचा कार्यक्रम कचरा वेचक महिलांच्या वस्तीत झाला. काही काळाने संघटनेच्या कार्यालयात बसलेल्या लेखिकेला वस्तीतून एका महिलेचा फोन आला – “ताई, बाया कचऱ्यावरुन आल्यात व भांडू लागल्यात. त्यांचे नवरे दारु पिऊन आलेत व आंबेडकरांच्या फोटोपुढील फुलं, गुलाल फेकून दिलाय.” लेखिका पुढे लिहिते – ‘मला अतिशय राग आला. पोलिसांना सांगून मी त्यांना आत टाकले. संध्याकाळी सोडायला लावले. दुसऱ्या दिवशी वस्तीत मीटिंग घेतली तर कळले, संघटनेनं अण्णा भाऊ साठेंचा कार्यक्रम कधी घेतला नाही. मग बाबासाहेबांचाच का?’
कचरा वेचक भगिनी हीच ओळख ठाऊक असलेल्या लेखिकेला हा भेद नवीन होता. बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमीचे महार व मातंग या गावकुसाबाहेरच्या दलित जाती. बाबासाहेब आंबेडकर या दोहोंचे उद्धारकर्ते. थोर साहित्यिक व शाहीर अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते. खुद्द अण्णा भाऊ साठे बाबासाहेबांबद्दल ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेला मला भीमराव’ हे शाहिरी कवन गातात. इथे मात्र हेच अण्णा भाऊ साठे त्यांच्या जन्माच्या जातीमुळे मातंग समाजाला पूज्य बनतात. तर बाबासाहेब महार जातीत जन्माला आल्याने परके होतात. हे खूपच त्रासदायक आहे. दलित चळवळीतील आंबेडकरोत्तर नेतृत्वाचा व्यवहार आणि दलितांत पाचर मारण्यात ज्यांचा फायदा आहे, असे बाहेरचे हितसंबंधी यांच्यामुळे ही वेळ आली आहे. हे वेळीच सांधले गेले पाहिजे.
कचरा वेचक महिला हा स्त्री मुक्ती संघटनेच्या कामाचा व पर्यायाने लेखिकेच्या कामाचा मुख्य भाग आहे. आंबेडकरी चळवळीचा वावर असलेल्या स्थिर वस्त्यांहून अगदी वेगळ्या, अधिक वंचित, अधिक दैन्य असलेल्या या अतिगरीब कचरा वेचकांच्या वस्त्या आहेत. हिरावलेले माणूसपण, असहाय्य बकाल भग्नता आणि त्यातही वाट शोधत, फोडत बाहेर येणारे जीवनाच्या चैतन्याचे हिरवे कोंब हे या वस्त्यांचे व्यक्तित्व. या कचरा वेचक महिला, त्यांच्या वस्त्या, तेथील प्रश्न यांवर बरेच लेख या पुस्तकात आहेत. ते वाचताना ‘जिन्हे नाज़ हैं हिंद पर वो कहाँ हैं..?’ हा प्यासातल्या गुरुदत्तचा प्रश्न आपल्या संवेदनांना सतत धडका देत राहतो. माणूस नावाच्या प्राण्यासाठी संविधानाने घोषित केलेल्या मूलभूत अधिकारांचा इथे काहीच थांग लागत नाही.
ज्या गरिबांसाठी रेशनची व्यवस्था आहे, तिचा लाभ घेण्यासाठी लागणारे रेशनकार्ड कागदोपत्री पुराव्यांशिवाय मिळत नाही. कारण वास्तव्य अधिकृत नाही. अधिकारी म्हणतात जन्माचा दाखला आणा, मग रेशनकार्ड देतो. जन्मदाखला काढायला गेले की तेथील अधिकारी म्हणतात त्यासाठी आधी रेशनकार्ड लागेल. आधी कोंबडी की आधी अंडे यासारखाच हा जटिल प्रश्न बनवला जातो. पैसे दिले की सगळं सोपं होऊन जातं. पण तो मार्ग न अवलंबता हक्कासाठी लढायचा दूरवरचा मार्ग पत्करायचे शिक्षण संघटना लोकांना देते. पण हा मार्ग खूप बिकट, थकविणारा असतो. याचे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. शहराच्या स्वच्छतेत, घरकामांसाठी ही माणसे हवी असतात. पण विकसित होणाऱ्या शहरांत, वाढत्या टोलेजंग, आलिशान इमारती ज्या जागांवर उभ्या राहतात, त्यावरील या वस्त्या फुंकरीने उडवून लावल्या जातात. वस्त्यांतील या माणसांचे जगणे वावटळीतल्या कागदाच्या कपट्यांप्रमाणे अवकाशात अधांतरी इतस्ततः भरकटत राहते.
या वस्त्यांतली पुरुषांची व्यसनाधीनता आणि त्याचे परिणाम ही गृहीत बाब आहे. पण स्त्रियांची व्यसनाधीनता चिंतेचे गांभीर्य भूमितीश्रेणीने वाढवते. दारु पिणाऱ्या मीनाला आई हटकते तेव्हा ती आईला शिविगाळ करते. म्हणते – “मी माझ्या पैश्याची पिते. पैसे कमावते. मला तुला अडवायचा अधिकार नाही.” लेखिका पुढे लिहिते – ‘मीना दारुच्या गुत्त्यावर जाते. दारु पिते. शरीर विकते. पाचशेची नोट घेऊन फुल्ल टाईट होऊन घरी परतते. शुद्धीवर येते तेव्हा तिला या साऱ्याची लाज वाटते. दारु सोडायची तिला तीव्र इच्छा असते. पण हे दुष्टचक्र ती भेदू शकत नाही.’
निला या कचरा वेचक तरुणीची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्याच्या ती प्रेमात पडते व ज्याच्यापासून तिला मूल होते, तो तिला व बाळाला पुलाखाली सोडून जातो. त्या अवस्थेतही तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. तिचे मानसिक संतुलन जाते. रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिला वस्तीतल्या महिला आणतात. उपचार करतात. पुढे तिला मनोरुग्णालयात दाखल करावे लागते. मुलाला तिच्यापासून विलग करुन बालगृहात ठेवावे लागते. ती बरी झाल्यावर इथून मला सोडवा, बाळाला मला भेटवा, असा आकांत करत राहते. या सगळ्यात लेखिका व संघटनेचे कार्यकर्ते पोलीस, संस्था, हितचिंतक डॉक्टर, मीनाचे नातेवाईक यांना गाठून प्रचंड प्रयत्न करतात. यातून बरेच यश मिळते, पण शेवट परिपूर्ण होत नाही. समाजबदलाचे संघर्ष विशिष्ट मुदतीचे असू शकत नाहीत, हे खरे. पण त्यात भरडणाऱ्या आपल्याशी संबंधित व्यक्तीला मदत करण्यात आपण पुरे पडलो नाही, ही टोचणी राहतेच.
ज्येष्ठांचे प्रश्न हा विकासाच्या नव्या प्रारुपातला एक महत्वाचा घटक. लेखिकेने तिच्या अवतीभवतीच्या, मित्र-मैत्रिणींच्या मध्यवर्गीय घरांतली उदाहरणे देऊन, आपल्या युरोपभेटीतल्या निरीक्षणांमधून त्याचे विविध आयाम मांडले आहेत. परदेशी मुले असलेले वृद्ध, मुले इथेच असली तरी आई एकाकडे तर वडिल दुसऱ्याकडे, आपल्या आईवडिलांना बायकोने सांभाळणे गृहीत धरणाऱ्या नवऱ्याला बायकोचे आईवडिल न चालणे, म्हातारपणातील ज्येष्ठांच्या स्वभावाचे मुलांना होणारे त्रास अशा अनेक बाबींची नोंद या लेखांत आहे. या ताणांचा-त्रासांचा निरास होण्यासाठी लेखिकेला उपाय वाटतो तो असा – ‘..एकमेकाला समजून घेऊन संवाद करणे गरजेचे आहे. आपल्या देशातले वृद्धाश्रम व पाळणाघरे जेव्हा बंद होतील तेव्हाच कुटुंबसंस्था विकसित होईल. कुटुंबसंस्था विकसित झाली की व्यक्तिवाद संपुष्टात येईल.’ लेखिकेच्या संवेदनशील मनाचा हा आशावाद जरुर; पण तो तसा आकाराला येणे हे ऐतिहासिक क्रम पाहता संभवनीय वाटत नाही. कुटुंबसंस्था विकसित झाली की व्यक्तिवाद संपुष्टात येईल की व्यक्तिवाद संपुष्टात आल्यावर कुटुंबसंस्था विकसित होईल? व्यक्तिवादाला जन्म देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे काय? वृद्धाश्रम, पाळणाघरे बंद होणे हा कुटुंबसंस्था विकसित होण्याचा निकष असू शकत नाही. सांप्रत अर्थचौकटीत ज्या पुढच्या टप्प्यावर स्त्री-पुरुष नाते जाणार आहे, त्या टप्प्यावरील कुटुंबाची रचना नव्या रीतीचीच राहणार आहे. लेखिकेला अपेक्षित परस्पर आदर, जिव्हाळा, जबाबदारी या मूल्यांचा आधार त्या रचनेला कसा मिळेल ही चिंता अर्थातच महत्वाची आहे.
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतल्या या भवतालात स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत काय बदल व्हायला हवेत, म्हणजेच स्वातंत्र्य अधिक अर्थपूर्ण कसे करायचे, यासाठीचे मुद्दे स्त्री मुक्ती संघटनेने प्रकाशित केलेल्या वृषाली मगदूम यांच्या ‘भवताल’ या पुस्तकाने सशक्तपणे पुरवले आहेत.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________
| भवताल |
वृषाली मगदूम
स्त्री मुक्ती संघटनेचे प्रकाशन
मूल्य : रु. १५० | पृष्ठे : २५५
__________
(आंदोलन, ऑक्टोबर २०२१)
Sunday, September 12, 2021
मूलभूत अधिकारांचे मोल जपूया
युरोप-अमेरिकेतल्या राज्यक्रांत्यांनी व प्रबोधन चळवळींनी राज्यव्यवस्थेचे केंद्र व्यक्ती मानले. व्यक्तीला जन्मजात काही अधिकार असतात. हे मूलभूत अधिकार राज्य प्रदान करत नाही. तर राज्याने त्यांचे संरक्षण करायचे असते, ते अबाधित ठेवायचे असतात, ही भूमिका यातून पुढे आली. इंग्रज या मूल्यांचे वाहक असलेल्या व्यवस्थेतून आले होते तरी ते साम्राज्यवादी होते. त्यांच्या देशात ज्यासाठी त्यांनी लढा दिला, अधिकार मिळवले, ते त्यांना वसाहतींतल्या जनतेला द्यायचे नव्हते. भारतातल्या नवशिक्षित वर्गाला त्यांनी घेतलेल्या इंग्रजी शिक्षणातूनच या विसंगतीचा बोध झाला. या नवशिक्षित वर्गाने त्यावर बोट ठेवायला व हक्क मागायला सुरुवात केली. प्रारंभी अर्ज-विनंत्या, वसाहतीअंतर्गत स्वायत्तता आणि पुढे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी असा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रवास झाला. आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा या वादांच्या दोन्ही बाजूचे नेते मानवाच्या मूलभूत अधिकारांचे पुरस्कर्ते होते. या दोन्ही लढ्यांतून या अधिकारांच्या स्वरुपाचा विकासच झाला. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा हेतू स्पष्ट करताना म्हणतात – ‘हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे.’ १९२८ साली मोतिलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेने जो अहवाल तयार केला, त्याने स्त्री-पुरुषांना नागरिक म्हणून समान अधिकारांची तसेच धर्मपालनाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. १९३१ च्या कराची येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात तर मूलभूत अधिकारांची सनदच मंजूर करण्यात आली. त्यात अभिव्यक्ती, सभा घेणे, संघटना बांधणे यांचे स्वातंत्र्य तसेच कायद्याच्या समोर सर्व समान व सर्वांना कायद्याचे समान संरक्षण, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार यांचा समावेश केला गेला. नेहरु रिपोर्ट तसेच कराची ठराव यांत व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य बहाल करतानाच राज्याचा कोणताही धर्म असणार नाही तसेच सार्वजनिक व्यवस्था, आरोग्य, नैतिकता यांना हानी पोहोचविणाऱ्या धार्मिक कृतींना प्रतिबंध करण्याचा अधिकार सरकारला राहील हेही जाहीर केले गेले. म्हणजेच मूलभूत अधिकार हा अनिर्बंध असणार नाही, हेही त्यातून सूचित केले गेले.
या सगळ्या परंपरेतून भारतीय संविधानात भाग तीन मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला. समतेचा अधिकार (अनुच्छेद १४ ते १८), स्वातंत्र्याचा अधिकार (अनुच्छेद १९ ते २२), शोषणाच्या विरोधात अधिकार (अनुच्छेद २३ व २४), धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार (अनुच्छेद २५ ते २८), सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार (अनुच्छेद २९ व ३०), घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार (अनुच्छेद ३२) असे हे आपल्या घटनेतील मूलभूत अधिकारांचे गट आहेत. यात पूर्वी असलेला अनुच्छेद ३१ नुसारचा संपत्तीचा अधिकार आता मूलभूत अधिकार राहिलेला नाही. राज्याला सार्वजनिक हितासाठी खाजगी मालमत्ता योग्य मोबदला देऊन ताब्यात घेण्यास अडथळे तयार होऊ लागल्याने पहिल्या घटनादुरुस्तीत तो रद्द करण्यात आला. पुढे ४४ व्या घटनादुरुस्तीद्वारे तो ३०० व्या कलमात टाकून मूलभूत ऐवजी तो कायदेशीर अधिकार ठरवण्यात आला.
अनुच्छेद १४ ते १८ मध्ये कायद्यापुढे सर्व समान, लिंग, जात, धर्म, प्रदेश, भाषा यांवरुन भेद केला जाणार नाही, सर्वांना समान संधी मिळणार असे नमूद केले आहे. त्यावरुन काहींना वाटते, मग आरक्षणासारख्या तरतुदी या समान संधीच्या तत्त्वाचे हनन करत नाहीत का? तर तसे नाही. दोन्ही पाय धड असलेला व एक पाय अधू असलेल्यांची स्पर्धा समान होत नाही. त्यासाठी जो अधू आहे, त्याचे अधुपण दूर करण्यासाठी काही उपाय करावे लागतील, समान स्पर्धेसाठी त्याला सक्षम करावे लागेल. यासाठी १५ व १६ व्या अनुच्छेदांत सामाजिक व शैक्षणिक मागासलेले तसेच अन्य प्रकारच्या मागासवर्गांसाठी विशेष तरतुदी करण्यासाठी राज्याला अनुमती देण्यात आली आहे. स्वतंत्र भारतात प्रत्येक व्यक्तीचे मूल्य एक हे आपण नक्की केले. त्यामुळे जुन्या राजेरजवाड्यांच्या छत्रपती, नवाब तसेच इंग्रज सरकारने दिलेल्या सर वगैरे पदव्या नावाच्या प्रारंभी लावायला आता बंदी आहे. भारतरत्न, पद्मभूषण या उपाध्या आजचे सरकारही देते. पण ते नियमितपणे सर्वत्र नावाच्या आधी लावून कोणी मिरवू शकत नाही. संरक्षण दलांतील हुद्दे तसेच शैक्षणिक पदव्या मात्र लावता येतात.
स्वातंत्र्याच्या अधिकारांतले अनुच्छेद १९ मधील अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे खूप व्यापक आहे. शांतता व सनदशीर मार्गाने टीका करण्याचा अधिकार व या टीकेला टीकेने प्रत्युत्तर करण्याचा अधिकार देशवासीयांना आहे. अलीकडे अशी टीका सहन न होणारे हिंसेवर उतरतात हे आपण पाहतो. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या हा एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच खून आहे. अंध, घातक रुढींवर यांच्या शतपटीने अधिक कठोर लिहिणारे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आता असते तर त्यांनाही बहुधा याच रीतीने संपवले गेले असते.
मूलभूत अधिकाराच्या हननाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार अनुच्छेद ३२ मध्ये आहे. या आधीचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बोबडे यांनी या कलमाखाली येणाऱ्या याचिकांत कपात करण्याचे मत जाहीरपणे व्यक्त केले होते. कलम ३२ ला अपंग करणे म्हणजे मूलभूत अधिकारांचा जीवच काढून घेणे आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – ‘अनुच्छेद ३२ विना संविधान अर्थहिन आहे. हे कलम संविधानाचा आत्मा व हृदय आहे.’
शासन, न्यायालय ही मूलभूत अधिकारांच्या रक्षणाची साधने जरुर. मात्र समाजाने ते मान्य करणे हे अधिक मूलभूत आहे. समाजाची मानसिकता त्याच्या विरोधात असेल तर घटनेत अधिकार असूनही ते लोकांना मिळणे दुरापास्त ठरते. आज ही मानसिकता दुरुस्त करण्याचे प्रबोधन अत्यंत आवश्यक झाले आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १२ सप्टेंबर २०२१)
________
सागर पिलारे यांचा फेसबुकवर आलेला दुरुस्ती सुचविणारा अभिप्राय :
Although the heading of Art. 18 is abolition of titles, it does not abolish existing titles. It only prohibits the State from conferring titles. Also the citizens have been prohibited from accepting title from foreign states. Chhatrapati, Nawab are not the titles conferred by the State and hence can be freely used. Those knighted prior to coming into force of the Constitution can use the title Sir. Hon. Supreme Court has held that Bharat Ratna, Padma Bhushan etc. are awards and not titles. If a living person uses them as title, the same can be withdrawn. There is no bar to use them with names of dead awardees.
Wednesday, September 1, 2021
स्वातंत्र्याचे मोजमाप कसे करायचे?
Wednesday, August 25, 2021
सब्बे सङ्खार अनिच्च
कासेगावला त्यांच्याकडूनच खूप वर्षांपूर्वी घेतलेले पुस्तक वाचतो आहे. त्याचा अखेरचा टप्पा सुरु आहे. तो पूर्ण होण्याआधीच गेल ऑम्व्हेट गेल्या. वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजाराने त्या गेल्या. तरीही अर्ध्यातून त्या गेल्या हीच भावना माझ्या मनाला डाचते आहे.
प्रगत परदेशातून येऊन, इथल्या मातीशी नाते जोडून, इथला सहचर निवडून, इथल्या चळवळींचे अभिन्न अंग झालेल्या या कार्यकर्त्या विदुषीने आमच्या इतिहासाचे, वैचारिक - सांस्कृतिक वारश्याचे नवे आयाम, नवे संदर्भ आमच्यासमोर उलगडले. आमच्या प्रगतिशील चळवळींना दिशा देण्यात या अन्वयार्थाचा मोठा वाटा आहे. ही गरज अजून संपलेली नाही. उलट त्यात अरिष्ट आले आहे. अशावेळी गेल ऑम्व्हेट यांचे जाणे वय, आजार ही रास्त कारणे असली तरीही अर्ध्यातून जाणेच वाटते आहे.
तथागत गौतम बुद्ध त्यांच्या अंतिम समयी शोकाकुल अनुयायांना उपदेश करताना म्हणतात - सब्बे सङ्खार अनिच्च. (सर्व अस्तित्व, जाणीवा अनित्य आहेत.)
अनित्यता हे सनातन सत्य आहे. आपण कोणीही त्यास अपवाद असणार नाही आहोत. पुस्तक पुरे होवो न होवो, कुठल्यातरी पानावर पुस्तक मलाही मिटावेच लागेल. तरीही ते कबूल करणे कठीण जाते, असह्य होते हे खरे.
डॉ. गेल ऑम्व्हेट या आमच्या थोर कार्यकर्त्या विदुषीस मनोभावे आदरांजली!
- सुरेश सावंत
Sunday, August 15, 2021
नेहरुंच्या ‘नियतीशी करारा’ ची मूल्यचौकट
Saturday, August 7, 2021
ऐ मेरे प्यारे वतन : राष्ट्रप्रेम की राष्ट्रद्रोह?
मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान' या गाण्यातील वतन भारत नाही, तर अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानातून सुका मेवा आणून भारतात विकणाऱ्या गरीब व्यापाऱ्याच्या भूमिकेतील बलराज साहनी यांच्या तोंडी हे गीत आहे.
भारतात राहायचे, कमवायचे आणि गोडवे आपल्या देशाचे गायचे हा बहुधा आज राष्ट्रद्रोह मानला जाऊ शकतो.
रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित १९६१ च्या काबुलीवाला सिनेमातील हे गाणे आहे. प्रेमधवन यांनी लिहिलेले, सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले मन्नाडेंच्या आवाजातील हे गाणे मातृभूमीच्या आठवणीने कोणालाही व्याकुळ करणारेच आहे.
ऐकणाऱ्याला आपापली मातृभूमी आठवते. तो देशच असेल असे नाही. आपले गाव असू शकते. ते वैराण असेल, पण माझे गाव असेल. माझी आई माझी असते. माझ्या वडिलांना आयुष्यभर मुंबईत नोकरी करुनही इथे काही करण्याऐवजी कोकणातले आपले घर बांधायचे व तिथेच शेवटचा श्वास घ्यायचा होता. त्यांच्या परमप्रिय मातृभूमीची व्याख्या कोकणातील छोटे गाव होते.
हे वतनाचे प्रेम (गाव, राज्य, देश, जग ...काहीही व्याप्ती असणारे) अन्य कोणाच्याही वतनाच्या प्रेमाआड येत नाही. त्याचा आदर, पुरस्कारच ते करते.
________
संकुचित राष्ट्रवादाच्या जोखडातून मुक्त होऊन आंतरराष्ट्रीय सहजीवनाचा महान संदेश देणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन!
________
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान
तू ही मेरी आरजू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आये उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस ज़ुबां को जिसपे आये तेरा नाम
सब से प्यारी सुबह तेरी, सब से रंगीं तेरी शाम
माँ का दिल बनके कभी सीने से लग जाता है तू
और कभी नन्ही सी बेटी बनके याद आता है तू
जितना याद आता है मुझको उतना तड़पाता है तू
छोड़कर तेरी ज़मीन को दूर आ पहुचे हैं हम
फिर भी है यही तमन्ना तेरे जर्रों की कसम
हम जहाँ पैदा हुये उस जगह ही निकले दम
......