Sunday, August 15, 2021

नेहरुंच्या ‘नियतीशी करारा’ ची मूल्यचौकट


आज पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी सुरु होत आहे. पंडित नेहरुंच्या १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ‘नियतीशी करार’ (Tryst With Destiny) या जगप्रसिद्ध भाषणाचेही हे पंच्याहत्तरावे वर्ष आहे. ‘खूप वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. त्या कराराच्या पूर्ततेची आता वेळ येऊन ठेपली आहे...मध्यरात्रीचे ठोके पडतील त्यावेळी सारे जग झोपलेले असेल, मात्र भारतात नवजीवन व स्वातंत्र्याची जागृती संचारत असेल.’ ...या शब्दांनी ते भाषणाचा प्रारंभ करतात. ‘खूप वर्षांपूर्वी’ याला १९२९ च्या लाहोर येथील काँग्रेसच्या अधिवेशनातील संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाचा संदर्भ आहे. तन-मन उन्नत करणाऱ्या भावना, देशासाठी प्राण अर्पण केलेल्यांप्रती कृतज्ञता, स्वदेशाबरोबरच अखिल जगाबद्दलची संवेदना, आपल्यापासून अलग झालेल्या पाकिस्तानी जनतेबद्दल भ्रातृ-भगिनीभावी कळवळा, नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव व त्यासाठीचा संकल्प यांनी ओतप्रोत असे हे भाषण अमोघ वक्तृत्वाचा अजोड आविष्कार आहे. त्यातून व्यक्त होणारी मूल्यचौकट स्वातंत्र्य चळवळीची परंपरा तसेच संविधानातील भूमिकेला अधोरेखित करणारी, कोंदण देणारी आहे. म्हणजेच भाषण नेहरुंच्या मुखातून, त्यांच्या शैलीतून व्यक्त झाले असले तरी ते त्या काळातल्या देश स्वतंत्र करुन त्याला घडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सर्वच महानुभावांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे.

हे त्यांचे लाल किल्ल्यावरील भाषण नाही. हे भाषण नेहरुंनी घटना समितीच्या सदस्यांपुढे सभागृहात १४ ऑगस्टच्या रात्री ११ वा. सुरु झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या स्वागताच्या समारंभात केले. त्यानंतर रात्री १२ वा. शपथ घेतली गेली, महिला सदस्यांनी राष्ट्रध्वज अर्पण केला आणि ‘जन गण मन’ गाऊन कार्यक्रम संपला. १५ ऑगस्टला दिवसभर विविध कार्यक्रमांत नेहरु सहभागी झाले आणि १६ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून नेहरुंचे स्वातंत्र्यदिनाचे पहिले जाहीर भाषण झाले.

या भाषणातील मूल्यविचारांचे काही संदर्भ आणि संक्षिप्त परिचय खाली देत आहे.

हे भाषण सुरु असताना एका बाजूला जनतेचा तुफान जल्लोष तर दुसरीकडे फाळणीमुळे हिंदू-मुस्लिम दंगलींचा रक्तपात सुरु होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सूत्रधार गांधीजी मात्र या जल्लोषात सामील नव्हते. ते हिंदू-मुस्लिम दंगली शमविण्यासाठी नोहाखलीत होते. नेहरुंच्या मनावर आणि त्यांच्या भाषणावर या सगळ्याची संमिश्र छाया होती. त्यांच्या भाषणात या जल्लोष व दुःखाच्या छायेची ते नोंद घेतात. हे स्वातंत्र्य कशासाठी सांगताना ते गांधींजींचे स्मरण करतात. त्यांना स्वातंत्र्याचे शिल्पकार व राष्ट्रपिता संबोधून त्यांच्या अपेक्षेची नोंद करतात. नेहरु म्हणतात, “भारताची सेवा म्हणजे कोट्यवधी दीनदलितांची सेवा आहे. याचा अर्थ दारिद्र्य, अज्ञान व संधीची विषमता आपल्याला संपवावी लागणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसले पाहिजेत, अशी आमच्या पिढीतील सर्वांत मोठ्या व्यक्तीची (गांधीजींची) आकांक्षा आहे. कदाचित हे आपल्या क्षमतेपलिकडील असेल. पण जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहे, तोपर्यंत आपले काम पूर्ण होणार नाही.” या सगळ्याची पूर्तता करायला स्वातंत्र्याने आपल्याला संधी दिली आहे व ती आपण सोडता कामा नये, हे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे, असेही ते सांगतात.

आपल्या दुःखमुक्तीसाठी केवळ नाही, तर आपले शेजारी, जग या सगळ्यांच्या दुःखमुक्तीसाठी आपण प्रयत्नरत राहायला हवे, हा व्यापक, वैश्विक दृष्टिकोण या भाषणात ते सतत देत राहतात. ते म्हणतात, “आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्हाला काम करायचे आहे. परिश्रम घ्यायचे आहेत. ही स्वप्ने केवळ भारताची नसून वैश्विक आहेत. वैश्विक वातावरणात देश व नागरिकांची वीण परस्परांशी इतकी जुळलेली आहे की तिला अलिप्त करता येणार नाही. शांततेच्या संदर्भात असे म्हटले जाते की तिचे विभाजन करता येत नाही. स्वातंत्र्याचेही आणि आता समृद्धीचेही तसेच आहे. इतकेच काय पण संकटांनाही विभक्त करता येत नाही.”

फाळणीच्या पार्श्वभूमीवर जिनांचा भाषा-व्यवहार आणि त्याला प्रतिक्रिया देणारे भारतातील कर्मठ राष्ट्रवादी यांच्यामुळे एक कडवट व विखारी वातावरण तयार झाले होते. ते पार करुन बंधुत्वाच्या भावनेला साद घालत नेहरु या भाषणात म्हणतात, “राजकीय सीमांनी तुटलेल्या (पाकिस्तानातील) आमच्या भावंडांबरोबर स्वातंत्र्य सोहळ्याचा हा आनंद आम्ही एकत्रित भोगू शकत नसलो, तरी ते आमचे आहेत, कायम आमचे राहतील. त्यांच्या सुख-दुःखाचे आम्ही भागीदार असू.”

याच विखारी वातावरणात या देशाच्या मालकीबद्दल बुद्धिभेद करणाऱ्यांना ते बजावतात, “कोणत्याही धर्माचे असू, आम्ही भारताची एकसमान मुले आहोत. या देशावर आमचा अधिकार एकसारखा आणि त्याच्याप्रतिच्या जबाबदाऱ्याही समान राहतील. विचारात व कृतीत सांप्रदायिकता आणि संकुचित मानसिकता ठेवून कोणतेही राष्ट्र महान होत नसते.”

आधी म्हटल्याप्रमाणे नेहरु या भूमिकेचे प्रवक्ते होते. भूमिका मात्र राष्ट्रमुक्तीच्या लढ्यातील व तिच्या भविष्यासाठी झगडणाऱ्या सगळ्यांची होती. म्हणूनच नेहरुंच्या भाषणानंतर स्वातंत्र्यात पदार्पण करताना रात्री बाराच्या ठोक्याला संविधान सभेतल्या सदस्यांनी जी शपथ घेतली त्यातही हीच भूमिका अधोरेखित होताना दिसते. -

'तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वतःस अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे.'

नेहरुंच्या ‘नियतीशी करारा’ तील ही भूमिका व मूल्यचौकटीचे या पंच्याहत्तर वर्षात काय झाले, नव्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तिचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी काय करायला हवे, याबद्दलची चिकित्सा व त्यानुसार कृतीचा संकल्प करुन या कराराचे नूतनीकरण करुया.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुण्यनगरी, १५ ऑगस्ट २०२१)

No comments: