Tuesday, March 27, 2012

कष्टक-यांच्या ‘ख-याखु-या राज्या ’साठीची दिशा व वृत्ती देणारे नागनाथअण्णा

स्‍वातंत्र्यचळवळीच्‍या अखेरच्‍या टप्‍प्यातले जे अखेरचे मोजके सेनानी आज हयात आहेत, त्‍यातले एक बुलंद सेनानी पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्‍णा नायकवडी 22 मार्चला काळाच्‍या पडद्याआड गेले. देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतर स्‍वातंत्र्यसैनिकांपैकी काहीजण प्रचलित राजकारणात सहभागी झाले, तर अनेकजण पुढच्‍या राजकारणाचा बदलता पोत पाहून ‘आम्‍ही लढलो ते यासाठी नव्‍हे’ असे म्‍हणत एकतर निष्क्रिय झाले किंवा एखाद्या समाजसेवी कामात मग्‍न झाले. या दोहोंपेक्षा वेगळा मार्ग निवडणारे जे कोणी अल्‍प होते, त्‍यात नागनाथअण्‍णांचा समावेश होतो. 90 वर्षांच्‍या कृतार्थ आयुष्‍याची सांगता झालेल्‍या अण्‍णांच्‍या या वैशिष्‍ट्याची नोंद घेणे म्‍हणूनच आवश्‍यक आहे.

1922 साली शेतकरी कुटुंबात जन्‍माला आलेल्‍या अण्‍णांचे 7 वीपर्यंतचे शिक्षण वाळव्‍याला, पुढचे शिक्षण आष्‍टा व कोल्‍हापूरच्‍या प्रिन्‍स शिवाजी मराठा बोर्डिंगमधून झाले. इथूनच ते मॅट्रिक झाले. शालेय जीवनातच विद्यार्थ्‍यांना संघटित करणे, सेवादलात सहभागी होणे आदि उपक्रम करणा-या अण्‍णांनी मुंबईला 9 ऑगस्‍ट 42 च्‍या ‘चले जाव’च्‍या भारलेल्‍या वातावरणात जीवनदानी क्रांतिकार्यकर्ता म्‍हणून काम करण्‍याचा निर्णय घेतला. भगतसिंग, बाबू गेनू यांच्‍या बलिदानाचे प्रथमपासूनच आकर्षण असणा-या अण्‍णांनी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासारखी आझाद हिंद फौज उभी करण्‍यासाठी नानकसिंग व मनसासिंग या सुभाषबाबूंच्‍या दोन साथीदारांना पंजाब, दिल्‍लीमधून वाळव्‍याला आणले. क्रांतिसिंह नाना पाटलांच्‍या नेतृत्‍वाखाली वाळवा परिसरात प्रतिसरकारची उभारणी करुन गावगुंड, गुन्‍हेगार यांना जरब बसवली. चळवळीसाठी साधने मिळविण्‍यासाठी गोव्‍यातून हत्‍यारांची आयात, स्‍पेशल ट्रेन लूट, पोलिसांची हत्‍यारे पळवणे, धुळ्याचा साडेपाच लाखांचा खजिना लुटणे या साहसांतही त्‍यांचा पुढाकार होता. 1944 साली विश्‍वासघाताने अटक झाली असता सातारा तुरुंगातून 44 व्‍या दिवशी तटावरुन उडी मारुन त्‍यांनी पलायन केले. 46 साली ब्रिटिश पोलिसांशी आमनेसामने झुंज देताना जवळचे सहकारी किसन अहीर व नानकसिंग धारातीर्थी पडले. उरलेल्‍या सहका-यांसह त्‍यांच्‍या चितेसमोर अण्‍णांनी शपथ घेतली- कष्‍टक-यांचे खरेखुरे स्‍वराज्‍य येईपर्यंत चळवळीची ज्‍योत तेवत ठेवायची. अण्‍णांच्‍या अखेरच्‍या श्‍वासापर्यंत ही ज्‍योत धगधगताना आपल्‍याला दिसते.

देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतरही तेलंगण तसेच निझामविरोधी लढ्यात त्‍यांचा सहभाग राहिला. हत्‍यारे पुरविल्‍याच्‍या आरोपावरुन भारत सरकारचे वॉरंट निघाल्‍याने भूमिगतही व्‍हावे लागले. या काळातच वाळव्‍यात किसन अहीर विद्यालय, हुतात्‍मा नान‍कसिंग वसतिगृहाची त्यांनी स्‍थापना केली. 57 साली संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे ते आमदार झाले, पुढे 85 साली स्‍वतंत्र आमदार म्‍हणून निवडून आले. गोवा मुक्‍ती संग्राम, भूमिहिन शेतमजूर चळवळ, कष्‍टकरी शेतकरी शेतमजूर परिषद, दुष्‍काळी जनावरांचे कॅम्‍प, काळम्‍मावाडी, वारणा-कोयना धरणग्रस्‍तांचा लढा इ. अनेक लढे कष्‍टक-यांचे खरेखुरे स्‍वराज्‍य आणण्‍याच्‍या प्रेरणेने ते अखेरपर्यंत लढत राहिले

स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्रात सहकाराचे पर्व सुरु झाले. ग्रामीण महाराष्‍ट्रात विकासाचा एक क्रम सुरु झाला. पुढे त्‍यातूनच साखरसम्राटही तयार झाले. तथापि, यातल्‍या सहकाराची ताकद नागनाथअण्णांनी ओळखली. आपले क्रांतिकारी, लढाऊ वळण कायम ठेवून अण्‍णांनी या सहकारी चळवळीत एक विलक्षण हस्‍तक्षेप केला. त्‍यांनी हुतात्‍मा किसन अहीर सहकारी साखर कारखाना काढण्‍याचे ठरवले. परिसरातील दोन कारखान्‍यांत विशिष्‍ट अंतर असल्‍याशिवाय नव्‍या कारखान्‍याला परवानगी न मिळण्‍याचा नियम आडवा आला. त्‍यासाठी खूप संघर्ष करावा लागला. कॉ. दत्‍ता देशमुखांनी सहाय्य केले. अंतराऐवजी त्‍या क्षेत्रातली उसाची उपलब्‍धता पाहा, अशी दत्‍तांनी बाजू मांडली. कारखाना मंजूर झाला. अकरा महिन्‍यात कारखाना उभा राहिला.

नागनाथअण्‍णांचे झपाटलेपण ही काय चीज होती, त्‍याचे हा कारखाना म्‍हणजे मूर्तिमंत प्रतीक आहे. साखर उतारा, साखरेचा दर्जा, शेतक-यांना दर तसेच कामगारांना पगार, बोनस, सुखसोयी, ऊस तोडणी कामगारांची काळजी, परिसर विकास चळवळींना सहाय्य इ. बाबतीत केवळ 6 वर्षांत त्‍यांनी चमत्‍कार वाटावा, असे काम केले. ते किती बारकाईने लक्ष देत याचा नमुना म्‍हणून या सूचना पहा- रिकव्‍हरी वाढून साखरेचा दर्जा उत्‍तम मिळण्‍यासाठी ऊसतोड अत्‍यंत काळजीपूर्वक, तळातून घासून कशी होर्इल, याची खबरदारी घेणे, तुटलेला ऊस शेतात जास्‍त वेळ पडू न देणे तसेच गाडीतळावर जास्‍त साठू न देणे वगैरे.

संस्‍थापक म्‍हणून अण्‍णा कारखान्‍याचे अध्‍यक्ष होऊ शकत होते. पण ते सभासदही झाले नाहीत. अध्‍यक्ष होण्‍याचा प्रश्‍नच नव्‍हता. गावमान्‍यतेने गरीब मुलांची कामगार म्‍हणून भरती, गावमान्‍यतेनेच संचालकांची निवड, एका संचालकाला एकदाच निवडणुकीला उभे राहण्‍याची परवानगी, काटकसरीचे, सचोटीचे प्रशासन अशा अनेक विलक्षण वाटाव्‍या अशा गोष्‍टी अण्‍णांनी सुरु केल्‍या. कारखान्‍यामुळे जी संसाधने तयार झाली, त्‍याचा परिसरविकासासाठी उपयोग झालाच; पण अनेक चळवळींना खात्रीचा हात मिळाला. दलित, भटक्‍या, विमुक्‍त जमातींना तर अण्‍णा आपली भावकी मानत. या विभागांवर कोठे अन्‍याय होत असल्‍याची सूचना वाळव्‍याला फोनवर मिळताक्षणी त्‍यांच्‍या मदतीला अण्‍णा धावत असत. पाणी तसेच धरणग्रस्‍तांच्‍या चळवळीला अण्‍णांनी ऊर्जा दिली. साखर कारखान्‍याचा अध्‍यक्ष दलित करणे, खु्द्द वाळव्यात आंतरजातीय विवाह घडवणे हे अण्‍णांनी केले. वाळव्याला महिला परिषद भरवली. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्‍य संमेलन आयोजित केले. याच संमेलनात पुढे आलेल्‍या कल्‍पनेप्रमाणे महाराष्‍ट्रातील पुरोगामी चळवळींचा हक्‍काचा मंच म्‍हणून ‘अमर हुतात्‍मा’ हे साप्‍ताहिक सुरु केले. समग्र परिवर्तनासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वांगांनी भिडणारा चळवळीचा ‘हुतात्‍मा पॅटर्न’ ते तयार करत होते.

कष्‍टक-यांचे खरेखुरे राज्य आणण्‍यासाठी असे सर्वांगांनी भिडावे लागेल, हे तर ते मानतच, पण सर्व कष्‍टकरी एकवटला पाहिजे, ही तर असे राज्‍य आणण्‍याची पूर्वअट आहे, असेच त्‍यांना वाटे. कष्‍टक-यांच्‍या एका विभागाचा लढा लढत असताना ते त्‍या विभागाला त्‍याच्‍या सहोदर कष्‍टकरी विभागाशी जोडून घ्‍यायची जाणीव सतत देत असत. त्याचवेळी आपले काम चोख करुन संपत्‍ती निर्माण करण्‍याचे, विकास करण्‍याचे आवाहन करत असत. अण्‍णांनी राज्‍यभर दौरा काढून सं‍घटित केलेल्‍या 89 सालच्‍या निफाड येथील साखर कामगार परिषदेत साखर कामगारांना उद्देशून ते म्‍हणाले होते, ‘गावाकडे गेल्‍यावर आपल्‍या भागातील कष्‍टक-यांना एकत्र करा. आपल्‍या कारखान्‍यातील गोंधळ थांबवा. कोणाच्‍याही दडपणाला बळी पडू नका. साखर कारखाने उत्‍कृष्‍ट कसे चालतील ते तुम्‍ही पाहायला हवे. संपत्‍ती कष्‍टातून निर्माण होणार आहे. कष्‍टक-यांचे राज्‍य आल्‍यावर जे करु, ते आता करुया. विकास करुया. त्‍याने सरकारवर दबाव आणू. आपले प्रश्‍न आपण सोडवू. अखेर आपले राज्‍य निर्माण करु.’

कष्‍टक-यांच्‍या ‘ख-याखु-या राज्‍या’चे अस्तित्‍व अजूनही दूर असले तरी त्‍यासाठी लढणा-या कार्यकर्त्‍याची दिशा व वृत्‍ती हीच असावी लागेल. दिशा व वृत्‍तीची ही कायमस्‍वरुपी ठेव ठेवून जगाचा निरोप घेतलेल्‍या नागनाथ अण्‍णांच्‍या स्मृतीस अभिवादन.

- सुरेश सावंत (‘दिव्य मराठी, 26 मार्च 2012’)

जोतिबांच्या महाकरुणेचा शोध घेणारे नाटकः ‘सत्यशोधक’


गो.पु. देशपांडे लिखित, पुणे महानगरपालिका सफाई कामगार युनियननिर्मित व अतुल पेठे दिग्‍‍दर्शित ‘सत्‍यशोधक’ नाटकाचे राज्‍यात जोरात प्रयोग चालू आहेत. अतुल पेठे हे प्रयोगशील व धाडसी दिग्‍दर्शक आहेत. त्‍यांची या आधीची नाटके व फिल्‍म्स याच्‍या साक्षीदार आहेत. तेच धाडस याही नाटकाच्‍या निर्मितीत दिसून येते. या नाटकातल्‍या कलावंतांपैकी 70 टक्‍के कलावंत सफाई कामगार आहेत. नाटकात काम करण्‍याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्‍या या कामगारांना ‘कलावंत’ करण्‍यासाठी अतुल पेठेंनी प्रचंड मेहनत घेतली. अर्थात, युनियनच्‍या नेत्‍या कॉ. मुक्‍ता मनोहरांची मोठी साथ त्‍यांना त्‍यासाठी मिळाली. म्‍हणूनच हे नाटक दर्जेदार झाले आहे.

या नाटकाच्‍या निर्मितीमागची भूमिका विशद करताना पेठे म्‍हणतात, ‘महात्‍मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्‍या आचार-विचारांचे आजच्‍या काळात अर्थ लावून पाहण्‍याचा या नाटकात प्रयत्‍न आहे. स्‍त्री-शूद्रातिशूद्र शिक्षण, जातव्‍यवस्‍थेशी लढा, धर्माचा नवा अर्थ, ब्राम्‍हण व ब्राम्‍हण्‍यवाद यातील फरक, सत्‍यशोधक समाज आणि शेतकरी-कामगार लढ्याची सुरुवाता असे विषय या नाटकात हाताळले गेले आहेत. नाटकाचा बाज हा सत्‍यशोधकी जलशाचा असून गाणी, नृत्‍य आणि नाट्य याद्वारे जोतिबा व त्‍यांच्‍या पत्‍नी सावित्रीबाई यांचा जीवनपट कलात्‍मकरीत्‍या उलगडण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.’

18 व्‍या शतकातील जुनाट रुढी व ब्राम्‍हण्‍यवाद यावर जोतिबांनी कठोर प्रहार केले. उक्‍ती, लेखन, अखंड याद्वारेच नाही, तर त्‍या काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर अचंबित वाटावा, असा प्रत्‍यक्ष व्‍यवहार करुन त्‍यांनी हे प्रहार केले. फुले पती-पत्‍नींचे हे कार्य केवळ अजोड आहे. मुलासाठी दुस-या लग्‍नाची वडिलांची सूचना जोतिबांनी तात्‍काळ नाकारलीच. पण मूल होत नाही म्‍हणून याच न्यायाने सावित्रीचे दुसरे लग्‍न केले तर चालेल का, असा खडा सवाल ते वडिलांना करतात. नाटकात हा प्रसंग आहे. ‘बायकोला दुसरा नवरा’ ही कल्‍पना आजही सहन करणे अशक्‍य आहे, हे लक्षात घेता जोति‍बा काळाच्‍या किती पुढे होते, ते ध्‍यानात येते.

उक्‍ती व कृती जोतिबा-सावित्रीबाईंच्‍या बाबतील कायमच अभिन्‍न होती. ब्राम्‍हण स्‍त्रीला पुनर्विवाहाची बंदी असलेल्‍या एकत्र कुटुंब पद्धतीच्‍या त्‍या काळात घरातील विधवा पुरुषी वासनेची बळी ठरत असे. अशाच बळी ठरलेल्‍या काशिबाई या ब्राम्‍हण विधवेचे बाळंतपण आपल्‍या घरी या पती-पत्‍नींनी केले. एवढेच नव्‍हे, तर तथाकथित ‘पापा’तून जन्‍माला आलेले हे मूल जोतिबा-सावित्रीबाईंनी दत्‍तक घेतले. या मुलाचे नाव यशवंत. हाही प्रसंग नाटकात आहे.

याचा पुढचा धागा सांगणे आवश्‍यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्‍या मुलाचे नाव ‘यशवंत’ ठेवून जोतिबांच्‍या विचारांचे आपण वारस असल्‍याचे जाहीर केले. जोतिबांच्‍या मृत्‍युनंतर जन्‍माला आलेल्‍या बाबासाहेबांनी जोतिबांना आपले गुरु मानले. आज आंबेडकरी समुदायात बाबासाहेबांच्‍या तसबिरीच्‍या शेजारी जोतिबांची तसबीर लावली जाते. महाराष्‍ट्राच्‍या पुरोगामी चळवळीत महात्‍मा फुलेंच्‍या विचारांना पुनःस्‍थापित करण्‍याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.

आज जोतिबा व बाबासाहेब या दोहोंना हितसंबंधी मंडळी आपल्‍या सोयीसाठी वापरताना दिसतात. काहींनी ते आपल्‍या जातीचे म्‍हणून त्‍यांच्‍यावर मालकीही प्रस्‍थापित केली आहे. साधेपणाने करावयाचा सत्‍यशोधकी विवाह जोतिबांनी प्रचारला. सत्‍यनारायणाचा पर्दाफाश करुन त्‍यामागचे ब्राम्‍हणांचे कारस्‍थान उघडे पाडले. तथापि, आज जोतिबांच्‍या जातीचे व त्‍यांच्‍या नावाने संघटना चालवणारे मुखंड बिनदिक्‍कत भपकेबाज लग्‍ने व साग्रसंगीत सत्‍यनारायण घालताना दिसतात. परिवर्तनवादी कार्यकर्त्‍यांच्‍यातही एक विभाग या ‘मालकी’ तत्त्‍वाचा बळी झालेला दिसतो. आपल्‍या समाजातल्‍या बदलाचे नेतृत्‍व आपल्‍याच जातीतल्‍याचे असले पाहिजे, याबाबत तो दक्ष असतो. फारतर अन्‍य शोषित जातीसमूहातल्‍या सहका-याला तो सहन करतो. पूर्वाश्रमीच्‍या पुढारलेल्‍या जातीतल्या प्रागतिक कार्यकर्त्‍यांच्‍या सहकार्याबद्दल तर तो सहनशीलही नसतो. काहींच्‍या मनात तर अशांविषयी विखार असतो. या विखाराने कैद मने मग आपल्‍या मुक्तिदात्‍यांनाही संकुचित करतात. बहुजनवादी साहित्‍य-कलेच्‍या प्रांतातही मग त्‍याचेच आविष्‍कार होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा जोतिबा फुले दोघांनीही आपल्‍या हयातीत ब्राम्‍हणी वर्चस्‍वावर कठोर हल्‍ला करत असताना ब्राम्‍हण व ब्राम्‍हण्‍यवाद यातील फरक कटाक्षाने अधोरेखित केला होता. त्‍यांच्‍या या संग्रामात खुद्द ब्राम्‍हण समाजातूनही सहकारी त्‍यांना मिळाले होते. आपल्‍या जातीतल्‍यांचे शिव्‍याशाप, बहिष्‍कार सहन करुन ही मंडळी फुले-आंबेडकरांबरोबर राहिली. ‘सत्‍यशोधक’ नाटकाने याची ठळक नोंद घेतली, हे या नाटकाचे वैशिष्‍टय.

महामानव तोच जो अखिल मानवतेचा कनवाळू असतो. त्‍यांच्‍या मर्यादित आयुष्‍यक्रमात, मर्यादित भौगोलिक-सामाजिक क्षेत्रात त्‍यांना कराव्‍या लागणा-या शस्‍त्रक्रिया या स्‍थान-समाजविशिष्‍टच असतात. परंतु, त्‍यामागचा अवकाश हा व्‍यापक मानवतेचा असतो. अखेर सगळ्या मानवजातीतीतली जळमटे, कुरुपता नाहीशी होऊन ती सुंदर व्‍हावी, हेच त्‍यांचे अंतिम ध्‍येय असते. म्‍हणूनच जोतिबा आपल्‍या अखंडात म्‍हणतात-

ख्रिस्‍त महंमद ब्राम्‍हणांशी|धरावे पोटाशी बंधूपरी|

मानव भावंडे सर्व एक सहा|त्‍याजमध्‍ये आहा तुम्‍ही सर्व|

सांप्रतच्‍या जाणते-अजाणतेपणातून झाकोळलेल्‍या जोतिबांच्‍या ह्या महाकरुणेचा शोध घेऊन ‘सत्‍यशोधक’द्वारे तो उजागर केल्‍याबद्दल नाटकाच्‍या लेखक, दिग्‍दर्शक, निर्माते, कलाकार व अन्‍य सर्व सहका-यांना मनःपूर्वक धन्‍यवाद व शुभेच्‍छा !

- सुरेश सावंत

Friday, March 16, 2012

अर्थसंकल्‍प व अन्‍नसुरक्षा


हा अर्थसंकल्‍प कोणालाच खुश करणारा नाही, असे सर्वसाधारणपणे म्‍हटले जाते आहे. कार्पोरेट व मध्‍यमवर्गाला मिळणा-या सवलतींना काहीसा लगाम बसला आहे. जागतिक व देशांतर्गत आर्थिक वातावरणात असलेला ताण हे जरी याचे कारण असले, तरी सरकारचे आर्थिक धोरण बदलते आहे, असे मुळीच नाही. उत्‍पादक शक्‍तींना मोकळीक देऊन संपत्‍ती वाढेल व या वाढीव संपत्‍तीतील काही भाग झिरपत तळच्‍या वर्गापर्यंत जाईल, ही धारणा तशीच आहे. म्‍हणूनच शिक्षण, आरोग्‍य, पिण्‍याचे पाणी व सांडपाण्‍याची व्‍यवस्‍था यांबाबतच्‍या तरतुदी नेहमीप्रमाणेच जेमतेम आहेत.

यास रेशन, अन्‍न सुरक्षा या बाबींचा अपवाद करावा लागेल. त्‍यांची निश्चित व ठोस नोंद अर्थसंकल्‍पात घेण्‍यात आली आहे. अर्थात, अन्‍न सुरक्षा कायदा होऊ नये आणि झालाच तर तो प्रभावी होऊ नये, अशी खटपट सरकारमधीलच काही शक्‍ती करत होत्‍या, अजूनही करत आहेत. सोनिया गांधींनी व्‍यक्तिशः लावून धरल्‍यामुळे अन्‍न सुरक्षा कायदा सरकारला करावा लागत आहे. साहजिकच ‘राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा विधेयक 2011’ संसदेच्‍या स्‍थायी समितीसमोर असून या कायद्याद्वारे गरीब व दुर्बल विभागांच्‍या अन्‍नसुरक्षेसाठी निश्चित अशी पावले सरकार उचलत आहे’ असे अर्थमंत्र्यांना आपल्‍या भाषणात सांगावे लागले आहे. अर्थमंत्र्यांनी म्‍हटल्‍याप्रमाणे हे विधेयक परिणामकारकरीत्‍या अमलात यावे म्‍हणून रेशन यंत्रणेला ‘आधार’चा आधार दिला जाणार आहे. आधार क्रमांकाची जोड देऊन सबंध रेशन व्‍यवस्‍थेचे संगणकीकरण करण्‍यात येत आहे. हे संगणकीकरण यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

विकासाच्‍या वेगवान गतीत कुपोषितांच्‍या लक्षणीय संख्‍येचे लांच्‍छनही देशाला सोसावे लागते आहे. अलिकडेच या संदर्भातील एका अहवालाचे प्रकाशन करताना ही शरमेची बाब असल्‍याचे सांगून खुद्द पंतप्रधानांनीच याची कबुली दिली होती. या समस्‍येला हाताळण्‍यासाठी कुपोषितांची संख्‍या अधिक असलेल्‍या 200 जिल्‍ह्यांत बहुक्षेत्रीय कार्यक्रम राबवला जाणार असून त्‍याद्वारे पोषणमूल्‍ये, सांडपाण्‍याचा निचरा, पिण्‍याचे पाणी, प्राथमिक आरोग्‍य व्‍यवस्‍था, स्‍त्रीशिक्षण, अन्‍नसुरक्षा आणि ग्राहक संरक्षण यांबाबतच्‍या उप‍क्रमांची सम‍न्‍वयित अंमलबजावणी केली जाणार असल्‍याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे. अंगणवाडी योजनेसाठीच्‍या तरतुदीतही 58 टक्‍क्‍यांनी वाढ करण्‍यात आली आहे. गेल्‍यावर्षी 10,000 कोटी रु.ची ही तरतूद यावर्षी 15,850 कोटी रु. इतकी असणार आहे. मध्‍यान्‍ह भोजन योजनेची परिणामकारकता लक्षात घेऊन तिच्‍या तरतुदीच्‍या रकमेतही वाढ करण्‍यात आली आहे. या बाबी स्‍वागतार्ह आहेत.

‘अनुदाने’ हा अन्‍नसुरक्षेच्‍या अंमलबजावणीशी संबंधित महत्‍वाचा मुद्दा आहे. त्‍यात मूलभूत बदल सरकार करु पाहते आहे. एकतर, जीडीपीच्‍या 2.5 टक्‍के असलेले अनुदान यावर्षी 2 टक्‍क्‍यांवर व क्रमात 1.75 टक्‍क्‍यांवर आणण्‍याचा सरकारचा मानस आहे. स‍बसिडी वाचवण्‍याचा प्रयत्‍न करणे वेगळे व अशी मर्यादा आधीच ठरविणे वेगळे. अशी मर्यादा आ‍धीच निश्चित करणे, ही चिंतेची बाब असली तरी अन्‍नसुरक्षा कायद्यासाठीच्‍या सबसिडीला सरकार हात लावणार नाही, ही आश्‍वासक गोष्‍ट आहे. अनुदानाच्‍या वाढत्‍या प्रमाणाला पेट्रोलियम पदार्थ, खते यांवरील सबसिडी मुख्‍यतः जबाबदार आहे. या पदार्थांवरील सबसिडी ही फक्‍त गरीब वर्गासाठी नसते. किंबहुना गरीब नसलेला वर्गच तिचा अधिक फायदा घेतो. या सबसिडीला लगाम लावणे आवश्‍यकच होते. ते धैर्य सरकार दाखवते आहे, याचे स्‍वागत करायला हवे. स‍बसिडी लाभार्थ्‍यापर्यंत नेमकेपणाने पोहोचावी यासाठी नंदन नीलकेणींच्‍या नेतृत्‍वाखालील टास्‍क फोर्सने सुचविल्‍याप्रमाणे थेट अनुदान देण्‍याची पद्धत अवलंबली जाणार आहे. खतांची सबसिडी शेतक-याला थेट दिली जाणार आहे. घरगुती वापराचा गॅस तसेच केरोसीन यांचे दर बाजारभावाशी सुसंगत करुन सवलतीस पात्र असणा-यांना अनुदानाची रक्‍कम थेट दिली जाणार आहे. सध्‍या त्‍याचे पायलट प्रोजेक्‍ट चालू आहेत. अनुदान थेट दिल्‍याने या वस्‍तूंचा काळाबाजार रोखला जाणार आहे. पात्र लोकांची निवड, वाढत्या महागाईशी सुसंगत अनुदानाच्‍या रकमेत वाढ इ. आव्‍हाने या पद्धतीत जरुर आहेत. तथापि, सरकारच्‍या – पर्यायाने जनतेच्‍या पैश्‍यांचा अपव्‍यय टाळणे व गरजूंना निश्चितपणे त्‍यांचा लाभ मिळणे यासाठी हे पाऊल उचलणे आवश्‍यकच होते. सरकारने हे धाडस दाखवल्‍याबद्दल त्‍याचे अभिनंदनच करावयास हवे.

- सुरेश सावंत

Thursday, March 1, 2012

विचारसरणी परिचय वर्गः विषयसूची

शास्त्रीय समाजवादी शिक्षण संस्‍था

आयोजित ऑगस्‍ट ते नोव्‍हेंबर 2011 या कालावधीतील

विचारसरणी परिचय वर्ग

(मार्क्‍सवाद, गांधीवाद, फुले-आंबेडकरवाद, भारतीय स्‍वातंत्र्य चळवळ व जगाची ओळख)

विषय

1. वर्ण व जातिव्‍यवस्‍थेचा उदय, व जातिअंताचा संघर्ष

2. फुले-आंबेडकर वाद

3. मार्क्‍सवाद

4. स्‍वातंत्र्य चळवळीचा इतिहास

5. संविधान निर्मिती, फाळणी व संस्‍थाने खालसा

6. 1950 चे जग

7. शीतयुद्धोत्‍तर जग

8. स्‍वातंत्र्योत्‍तर भारताची वाटचाल

मुद्दे व उपमुद्दे -
  • आधुनिक विचारसरणी या कल्‍पनावादी नसून भौतिकवादी आहेत
  • समाजशास्‍त्र व निसर्गशास्‍त्रातला फरक
  • मानवाचा इतिहास
  • टोळी, गणसंस्‍था - प्राथमिक साम्‍यवाद, लोकशाही
  • गुलामी, सरंजामशाही, भूदास
  • भांडवलशाही – औद्योगिक क्रांती, युरोपातल्‍या राज्‍यक्रांत्‍या, आधुनिक लोकशाही तसेच स्‍वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्‍यत्रयींचा उदय
  • खाजगी मालकी, कुटुंबसंस्‍थेचा उदय, शासन
  • पाया व इमला
  • वर्णव्‍यवस्‍था – प्रारंभी गुण व कर्मावर आधारित समाज संघटन
  • जातिव्‍यवस्‍था – भारतीय उपखंडातील वैशिष्‍ट्य, जातींच्‍या निर्मितीसंबंधीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुकरणाचा सिद्धांत, जातीची लक्षणे
  • जातिअंताची चळवळ
  • बुद्धकाळ – गणसंस्‍था व राजेशाहीचा संधिकाल, बुद्धाचे जीवन व विचार
  • संतांचे योगदान
  • इंग्रजांच्‍या आगमनाबरोबर आलेल्‍या नवविचार व आर्थिक-भौतिक उलथापालथींनी जातिव्‍यवस्‍थेला दिलेला धक्‍का
  • आ‍धी राजकीय की आ‍धी सामाजिक, हा वाद
  • महात्‍मा फुले, छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातिअंतविषयक विचार व कार्य
  • जातिव्‍यवस्‍थेचे आजचे स्‍वरुप व तिच्‍या अंताच्‍या चळवळीतले अडथळे
  • महात्‍मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातिअंताव्‍यतिरिक्‍तचे कार्य व विचार
  • म. फुले - स्त्रियांची शाळा, विधवांच्‍या बाळंतपणासाठीचा आश्रम, सत्‍यशोधक समाज
  • डॉ. आंबेडकर – स्त्रियांविषयीचे विचार, हिंदू कोड बिल, अर्थ व समाजशास्‍त्रविषयक लेखन
  • महात्‍मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या भूमिकांतले भेद, पुणे करार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीबाबतची भूमि‍का व रिपब्लिकन पक्षाची संकल्‍पना
  • आरक्षण
  • दलित, आदिवासींना लोकसंख्‍येतील प्रमाणानुसार आरक्षण
  • राष्‍ट्रीय पातळीवरः दलित - 13 टक्‍के, आदिवासी - 9 टक्‍के (राज्‍यपातळीवर तेथील लोकसंख्‍येतील प्रमाणाच्‍या आधारे)
  • 49 टक्‍क्यांपेक्षा अधिक राखीव जागा ठेवण्‍याची अनुमती घटना देत नसल्‍याने ओबीसींना 27 टक्‍के आरक्षण
  • दलित, आदिवासींना शिक्षण, नोकरी व राजकीय प्रतिनिधीत्‍व यात आरक्षण आहे. ओबीसींना राजकीय प्रतिनिधीत्‍वाबाबत फक्‍त स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांत आहे. लोकसभा, विधानसभांमध्‍ये नाही.
  • स्त्रियांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये प्रारंभी 33 टक्‍के व आता 50 टक्‍के आरक्षण
  • लोकसभा व विधानसभेतील 33 टक्‍के आरक्षणासाठी राज्‍यसभेत विधेयक संमत, अजून लोकसभेची मंजुरी बाकी
  • लढा चिवट, सर्वपक्षीय पुरुषी विरोध
  • हे आरक्षण आधीच्‍या प्रत्‍येक आरक्षणाला उभा छेद देणार असल्‍याने दलित, आदिवासींच्‍या आरक्षणात 33 टक्‍के आरक्षण दलित, आदिवासी स्त्रियांना राहणार आहे. ओपनमध्‍ये ओपनमधील स्त्रियांना 33 टक्‍के आरक्षण असणार आहे.
  • जातींची जनगणना
  • मार्क्‍सवादाची सूत्रे व संकल्‍पना
  • मार्क्‍स व एंगल्‍सच्‍या कालखंडाचे वैशिष्‍ट्य
  • विरोधविकासवाद, ऐतिहासिक भौतिकवाद
  • व्‍यापारी भांडवलशाही, औद्योगिक भांडवलशाही व वित्तिय भांडवलशाही
  • साम्राज्‍यवाद, समाजवाद
  • उत्‍पादन साधन
  • वर्ग, विक्रेय वस्‍तू, श्रमशक्‍ती, क्रयशक्‍ती, वरकड, नफा
  • भांडवलाचे केंद्रीकरण, उर्वरित समाजाचे दरिद्रीकरण
  • अतिउत्‍पादनाचे अरिष्‍ट, मंदी
  • शासनाचे ४ स्‍तंभ
  • मानवाचा ज्ञात इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास
  • सोव्हिएत युनियन व चीन मधील राज्‍यक्रांतीची तोंडओळख
  • भारतीय स्‍वातंत्र्य चळवळ व समतेचा लढा
  • 1623 – र्इस्‍ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, 1757- प्‍लासीची लढाई, अनेक राज्‍ये खालसा, 1857 चे बंड, र्इस्‍ट इंडिया कंपनी जाऊन राणीचे राज्‍य आले
  • 1885 – राष्‍ट्रीय सभेची स्‍थापना, प्रशासकीय सुधारणांचा आग्रह, वार्षिक अधिवेशनांची सुरुवात
  • वंगभंग (1905), मुस्लिम लीगची स्‍थापना, लो. टिळकांना 6 वर्षांची शिक्षा, गिरणी कामगारांचा संप, स्‍वदेशी, बहिष्‍काराची चळवळ, जहाल-मवाळ वाद
  • हिंदू-मुस्लिम तणाव (1909), लखनौ करार (1916), होमरुल चळवळ, चंपारण सत्‍याग्रह, रौलेट अॅक्‍ट, जालियनवाला बाग हत्‍याकांड, असहकार चळवळ (1920), चौरीचौरा, सायमन कमिशन
  • 1929 – संपूर्ण स्‍वातंत्र्याचा लाहोर येथील ठराव, सविनय कायदेभंग, दांडीयात्रा
  • 1935 – पहिली प्रांतीय निवडणूक, जागतिक फॅसिझमला विरोध, 1942 – चलेजाव आंदोलन, 1946 – नाविकांचे बंड
  • सिमला परिषद निष्‍फळ, धर्माधारित फाळणी निश्चित, बंगालमध्‍ये धार्मिक दंगली
  • 1947 – स्‍वातंत्र्य व फाळणी
  • भारतीय स्‍वातंत्र्य चळवळीतील महत्‍वाचे आयाम व घटना
  • समाजसुधारणांच्‍या चळवळीः ईश्‍वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे
  • सशस्‍त्र क्रांतिकारी चळवळीचे टप्‍पे
  • कम्‍युनिस्‍ट पक्ष, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्‍थापना
  • मीरत कट खटला
  • ट्रेड युनियन कायदा संमत, गिरणी कामगारांचा 1928 चा ऐतिहासिक संप, 1939 चे महागाई भत्‍ता आंदोलन
  • खान अब्‍दुल गफारखान, लाल डगलेवाल्‍यांची चळवळ, धर्माच्‍या आधारावर फाळणीला विरोध
  • राष्‍ट्रीय भांडवलदार
  • म. गांधी – अस्‍पृश्‍यता निवारण, स्त्रियांची चळवळीत भागिदारी, हिंदू-मुस्लिम ऐक्‍य, विश्‍वस्‍त संकल्‍पना, लढ्याची असहकार, सत्‍याग्रह ही नवी आयुधे, जीवनातल्‍या सर्व प्रश्‍नांभोवती संघटन
  • संविधान निर्मिती, फाळणी व संस्‍थाने खालसा (1946 ते 1950)
  • संविधान समितीची स्‍थापना, स्‍वरुप तसेच मतमतांतरांची घुसळण
  • संस्‍थाने खालसा (500 च्‍या आसपास), प्रजा परिषदांची चळवळ (म्‍हैसूर, काठियावाड, ओरिसा), हैद्राबाद स्‍वातंत्र्य संग्राम, काश्‍मीर टोळीवाल्‍यांचे आक्रमण, भारतीय सैन्‍याचा हस्‍तक्षेप, 370 वे कलम
  • फाळणीनंतरच्‍या प्रचंड दंगली व कत्‍तली, पूर्व व पश्चिम पाकिस्‍तानमधून लाखो निर्वासितांचे लोंढे व त्‍यांचे पुनर्वसन
  • राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघातर्फे हिंदूंचे संघटन, 1948 – म. गांधींची हत्‍या, तेलंगणा सशस्‍त्र उठाव, ईशान्‍य भारतातील आसाम व अन्‍य जमाती, टोळ्या प्रदेशांचे विलिनीकरणाचे प्रश्‍न 
  • 1950 चे जग
  • 1945 – दुसरे महायुद्ध समाप्‍त, 1946 – अमेरिकेने जपानवर अणुबॉम्‍ब टाकले, युद्धामुळे युरोप खिळखिळे, अनेक गुलाम राष्‍ट्रे स्वतंत्र होण्‍याचा क्रम
  • 1945 – संयुक्‍त राष्‍ट्रसंघाची स्‍थापना, 1949 – नाटो स्‍थापना, 1948 – गॅट करार, 1944 – आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीची स्‍थापना, जागतिक बँक
  • 1955 – अलिप्‍ततावादी चळवळ, बांडुंग परिषद, पंचशील तत्‍त्‍व, भारताचा पुरस्‍कार
  • शीतयुद्ध – अमेरिका, सोव्हिएत यांचे अनुक्रमे पाकिस्‍तान व अफगाणिस्‍तानात सैन्‍य, अमेरिकेची मूलतत्‍तवाद्यांना धार्मिक चिथावणी, शस्‍त्र व आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, तालि‍बान्‍यांचा उदय
  • शीतयुद्धोत्‍तर जग (1991 ते 2011)
  • 1991 – सोव्हिएत युनियनचे विघटन – एक राजकीय तत्त्वप्रणाली संपल्‍याचा दावा – जग एकखांबी की बहुखांबी – जागतिकीकरणः एक की दोन प्रकारचे – भांडवलाला मुक्‍त प्रवेश पण श्रमाला (कामगारांना) निर्बंध
  • 21 व्‍या शतकात लॅटिन अमेरिकेत नवीन राजकीय समीकरणे, अमेरिकन वर्चस्‍व झुगारले
  • युरोपातल्‍या 17 देशांचे मिळून एकच चलन – युरो
  • गॅटची जागा जागतिक व्‍यापार संघटनेने घेतली (WTO)
  • जागतिक हितसंबंधांची नवीन जुळणी – G – 20, SAFTA, BRIC, IBSA इ.
  • अमेरिकन ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्‍ला, अमेरिकेचे जगाला दहशतवादविरोधी आवाहन, इराक, अफगाणवरील अमेरिकेचे हल्‍ले, ‘दहशतवाद म्‍हणजे इस्‍लामिक दहशतवाद’ हा छुपा प्रचार
  • अमेरिका, युरोपीय देशांकडून मुक्‍त बाजारपेठेची मांडणी, प्रत्‍यक्षात स्‍वतःच्‍या देशात संरक्षणाचे धोरण
  • अमेरिकन अर्थव्‍यवस्‍थेतील अरिष्‍ट, युरोपमध्‍ये - ग्रीस, इटली, स्‍पेन, पोर्तुगाल इ. अर्थव्‍यवस्‍था ग‍र्तेत, ‘नफा भांडवलदारांचा, त्‍यांचा तोटा मात्र सरकारी तिजोरीतून भरणे’ हे व्‍यवहारसूत्र
  • फ्रान्‍स, जर्मनी, इंग्‍लंड, अमेरिका – कामगारांचे सातत्‍याने बंद, निदर्शने, संप
  • बेकारी, सामाजिक सुरक्षिततेत घट इ. मुळे वांशिक अस्‍वस्‍थता, फ्रान्‍स , इंग्‍लंड, स्‍पेन इ. ठिकाणी काळ्या, आशियाई लोकांवर वाढते हल्‍ले, नोकरीत स्‍थानिकांना, नंतर युरोपियनांना प्राधान्‍य देण्‍याचे धोरण
  • जागतिकीकरणाचा फटका - अमेरिका व युरोप. चीन, भारत अर्थव्‍यवस्‍थेला वेग
  • 2011 – अरब राष्‍ट्रांत स्‍थानिक हुकूमशहा व लष्‍करशहांविरोधात उठाव – पाश्‍चात्‍य राष्‍ट्रांचे तेलाचे राजकारण – जनतेची लोकशाही सत्‍तेच्‍या मागणीसाठी सातत्‍याने आंदोलने – साम्राज्‍यवाद्यांच्‍या ‘इस्‍लामिक दहशतवाद’ या सिद्धांताला छेद देणा-या सकारात्‍मक घटना

Thursday, January 26, 2012

‘अन्‍न सुरक्षा विधेयका’तील पान क्र. 18 ते 23 चा मराठी अनुवाद

(मूळ इंग्रजी ‘अन्‍न सुरक्षा विधेयका’तील पान क्र. 18 ते 23

चा मराठी अनुवाद – सुरेश सावंत)

अनुसूची 1

(पहा विभाग 3(1), 30 (1), (4) आणि 32 (2), (3))

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील अनुदानित दर

प्राधान्‍य गटासाठीचे अनुदानित दर

सर्वसाधारण गटासाठीचे अनुदानित दर

1

2

तांदूळ प्रति किलो रु. 3, गहू प्रति किलो रु. 2 आणि भरड धान्‍य प्रति किलो रु. 1 पेक्षा अधिक नाही.

गहू, भरड धान्‍य, तांदूळ यांच्‍या किमान आधारभूत किंमतीच्‍या निम्‍म्‍यापेक्षा अधिक दर नाही.

अनुसूची 2

(पहा विभाग 4(), 5 (1) आणि 6)

पोषणमूल्‍यांचा दर्जा

पोषणमूल्‍यांचा दर्जाः एकात्मिक बालविकास सेवा योजनेत 6 महिने ते 3 वर्षे, 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुले आणि गरोदर व स्‍तनदा माता यांना ‘घरी घेऊन जावयाचा शिधा’ (Take home ration) किंवा ‘पौष्टिक गरम शिजवलेले जेवण’ किंवा ‘खाण्‍यासाठी तयार आहार’ यासाठी निश्चित केलेला दर्जा तसेच मध्‍यान्‍ह भोजन योजनेत प्राथमिक शाळेतील कनिष्‍ठ व ज्‍येष्‍ठ इयत्‍तांतील मुलांसाठी निश्चित केलेला दर्जा असा आहेः

अनु. क्र.

वर्गवारी

आहाराचा प्रकार

उष्‍मांक (कि.कॅ.)

प्रथिने (ग्रॅ)

1

2

3

4

5

1

मुले (6 महिने ते 3 वर्षे)

घरी घेऊन जावयाचा शिधा

500

12-15

2

मुले (3 ते 6 वर्षे)

सकाळचा नाश्‍ता व गरम शिजवलेले जेवण

500

12-15

3

कुपोषित मुले (6 महिने ते 6 वर्षे)

घरी घेऊन जावयाचा शिधा

800

20-25

4

कनिष्‍ठ प्राथमिक वर्ग

गरम शिजवलेले जेवण

450

12

5

ज्‍येष्‍ठ प्राथमिक वर्ग

गरम शिजवलेले जेवण

700

20

6

गरोदर व स्‍तनदा माता

गरम शिजवलेले जेवण

600

18-20

Note: 1.—Energy Dense Food fortified with micronutrients as per 50 per cent. of Recommended Dietary Allowance.

Note: 2.—Meals shall be prepared in accordance with the prevailing Food Laws.

NB: Nutritional standards are notified to provide balance diet and nutritious foods in terms of the calorie counts, protein value and micronutrients specified.

अनुसूची 3

(पहा विभाग 39)

अन्‍न सुरक्षा संवर्धित करण्‍यासाठीच्‍या तरतुदी

(1) शेतीला चालना –

a. छोट्या आणि सीमांत शेतक-यांच्‍या हितरक्षणाच्‍या दृष्‍टीतून शेतिसुधारणा;

b. शेतीतील गुंतवणुकीत वाढ, संशोधन व विकास यांचा त्‍यात समावेश, विस्‍तार सेवा, उत्‍पादकता व उत्‍पादन वाढीसाठी पाणीपुरवठ्याच्‍या छोट्या योजना व वीज;

c. योग्‍य मोबदला देणारे भाव, पत, पाणीपुरवठा, वीज, पीक विमा यांची हमी;

d. जमीन व पाणी अन्‍न उत्‍पादनाऐवजी अन्‍य बाबींसाठी अवाजवी कारणाने वळविण्‍यास प्रतिबंध.

(2) खरेदी, साठवणूक व वाहतूक संबंधित हस्‍तक्षेप –

a. स्‍थानिक भरड धान्यांची खरेदी तसेच विकेंद्रित खरेदी यांस प्रोत्‍साहन;

b. खरेदी प्रक्रियांमध्‍ये भौगोलिक वैविध्‍य;

c. आधुनिक व शास्‍त्रीय गोदामांची पुरेशी व विकेंद्रित निर्मिती;

d. अन्‍नधान्‍याच्‍या वाहतुकीस सर्वोच्‍च प्राधान्‍य, त्‍यासाठी पुरेशा रेक्सची व्‍यवस्‍था तसेच अतिरिक्‍त धान्‍य उत्‍पादक प्रदेशांकडून या धान्‍याची गरज असलेल्‍या प्रदेशांकडे वाहतूक करणा-या रेल्‍वे लाईन्‍समध्‍ये वाढ.

(3) अन्‍य; खालील बाबींची व्‍यवस्‍था –

a. सुरक्षित व पुरेसे पिण्‍याचे पाणी व सांडपाण्याचा निचरा;

b. आरोग्‍य तपासणी;

c. किशोरवयीन मुलींना पोषणमूल्‍ये, आरोग्‍य व शिक्षण;

d. ज्‍येष्‍ठ ना‍गरि‍क, अपंग व एकल महिला यांना पुरेशी पेन्‍शन.

उद्देश व कारणांचे निवेदन

घटनेच्‍या कलम 47 अन्‍वये, शासनाने आपल्‍या जनतेचे जीवनमान व तिची पोषणमूल्‍ये यांत वृद्धी तसेच सार्वजनिक आरोग्‍यात सुधारणा यांस आपले एक प्राथमिक कर्तव्‍य मानले आहे. मानवी हक्‍क आणि आर्थिक, सामाजिक व सांस्‍कृतिक अधिकारविषयक आंतरराष्‍ट्रीय परिषदेच्‍या वैश्विक जाहिरनाम्‍यानेसुद्धा (ज्‍यावर भारतानेही सही केली आहे) प्रत्‍येक व्‍यक्‍तीला पुरेसे अन्‍न मिळण्‍याचा अधिकार आहे, याची दखल घेण्‍याची जबाबदारी सर्व घटक देशांवर टाकली आहे. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सहस्रक विकास ध्‍येयांमध्‍ये आत्‍यंतिक दारिद्र्याचे व उपासमारीचे निर्मूलन हे एक ध्‍येय मानले आहे.

2. घटना तसेच आंतरराष्‍ट्रीय परिषदांनी दिलेल्‍या जबाबदा-यांचे पालन करताना, अन्‍न सुरक्षा प्रदान करणे, हे सरकारच्‍या नियोजन व धोरणाचे लक्ष्‍य राहिले आहे. अन्‍न सुरक्षा म्‍हणजे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्‍यासाठी अन्‍नधान्‍याची पुरेशी उपलब्‍धता तसेच वैयक्तिक पातळीवर रास्‍त दरात, पुरेशा प्रमाणात ते मिळणे होय. अन्‍नधान्‍याच्‍या उत्‍पादनातील स्‍वयंपूर्णता ही राष्‍ट्रीय पातळीवरची एक प्रमुख मिळकत आहे. कुटुंबाच्‍या पातळीवरील अन्‍नसुरक्षेसाठी सरकार लक्ष्‍याधारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक, अंत्‍योदय लाभार्थी तसेच दारिद्र्यरेषेवरील कार्डधारक यांना अनुदानित अन्‍नधान्‍य पुरविते. दारिद्र्यरेषेखाली कार्डधारकांना-अंत्‍योदय लाभार्थींना प्रति कुटुंब प्रति माह 35 किलो धान्‍य मिळते, तर दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांना मिळणा-या धान्‍याचे प्रमाण केंद्राकडे उपलब्‍ध साठ्यानुसार ठरवले जाते. स्त्रिया व मुले, नैसर्गिक आपत्‍तीग्रस्‍त आदिंसाठीच्‍या धान्‍यआधारित कल्‍याणकारी योजनांतील धान्‍यही अनुदानित दरात दिले जाते.

3. असे असले तरीही, जनतेची अन्‍नसुरक्षा हे नेहमीच आव्‍हान राहिले आहे. राष्‍ट्राच्‍या मानवसंसाधनाचा दर्जा उंचावण्‍याच्‍या दृष्‍टीनेही जनतेच्‍या, विशेषतः स्त्रिया व मुलांच्‍या, पोषणाची स्थिती सुधारणे गरजेचे आहे. प्रस्‍तावित कायदा अन्‍नसुरक्षेचा प्रश्‍न हाताळण्‍याच्‍या सध्‍याच्‍या पद्धतीतच बदल करतो. सध्‍याच्‍या कल्‍याणकारी पवित्र्याऐवजी तो हक्‍काचा पवित्रा घेतो. लक्ष्‍याधारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेची व्‍याप्‍ती वाढविण्‍याबरोबरच पात्र लाभार्थींना विशिष्‍ट प्रमाणातील धान्‍य जास्‍त अनुदानित दरात मिळण्‍याचा अधिकार तो बहाल करतो. स्त्रिया व मुले तसेच अन्‍य विशेष गट, उदा. निराधार, बेघर, आपत्‍ती व आणिबाणीग्रस्‍त व्‍यक्‍ती, उपासमारीत जगणा-या व्‍यक्‍ती यांना मोफत अथवा रास्‍त दरात जेवण मिळण्‍याचा अधिकार हा कायदा प्रदान करतो.

4. वरील परिच्‍छेदांतील बाबी लक्षात घेऊन ‘राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा विधेयक, 2011’ या नावाचा एक नवा कायदा प्रस्‍तावित करण्‍यात येत आहे. या कायद्यान्‍वये –

a. मानवी जीवनचक्र पद्धतीने (पोटातील बाळापासून म्‍हातारपणापर्यंत), जनतेला सन्‍मानाने जीवन जगता यावे यासाठी पुरेशा प्रमाणातील दर्जेदार अन्‍न रास्‍त दरात उपलब्‍ध मिळेल.

b. प्राधान्‍य गटातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीस दरमहा 7 किलो तर सर्वसाधारण गटातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीस दरमहा 3 किलो धान्‍य प्रस्‍तावित कायद्यातील अनुसूची 1 मध्‍ये नमूद केलेल्‍या दरांत राज्‍य सरकारकडून सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेद्वारे मिळेल. हा अधिकार ग्रामीण भागातील 75 टक्‍के लोकांना तर शहरातील 50 टक्‍के लोकांना मिळेल. ग्रामीण भागातील 46 टक्‍के लोक तर शहरातील 28 टक्‍के लोक प्राधान्‍य गटात घेतले जातील.

c. अनुसूची 2 मध्‍ये नमूद केलेली पोषणमूल्‍ये प्राप्‍त होतील, असा आहार स्‍थानिक अंगणवाडीद्वारे प्रत्‍येक गरोदर व स्‍तनदा मातेला गरोदरपणात व त्‍यानंतर एकूण 6 महिने मोफत मिळेल. तसेच एकूण 6 महिने प्रति माह 1000 रु. मातृत्‍व अनुदान या स्त्रियांना मिळेल. या अनुदानाचा खर्च राज्‍य व केंद्र आपसात वाटून घेईल. हे अनुदान देण्‍याचे हप्‍ते केंद्र सरकार ठरवेल.

d. 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्‍येक मुलाला मोफत जेवणाचा अधिकार दिलेला आहे. तो असा-

i. अनुसूची 2 मध्‍ये नमूद केलेली पोषणमूल्‍ये असलेले व वयोमानास अनुकूल असे मोफत जेवण 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना स्‍थानिक अंगणवाडीमार्फत मिळेल.

ii. अनुसूची 2 मध्‍ये नमूद केलेल्‍या पोषणमूल्‍यांप्रमाणे, 6 ते 14 वर्षे वयाच्‍या मुलांना एक वेळचे मध्‍यान्‍ह भोजन स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था संचालित, सरकारी तसेच सरकार अनुदानित शाळांमध्‍ये इयत्‍ता 8 वीपर्यंत रोज (शाळांच्‍या सुट्या वगळून) व मोफत मिळेल.

e. कुपोषित मुलांचा शोध स्‍थानिक अंगणवाडीद्वारे घेतला जार्इल व त्‍यांच्‍यासाठी अनुसूची 2 मध्‍ये नमूद केलेल्‍या दर्जाची पोषणमूल्‍ये असलेले जेवण मोफत दिले जाईल. यासंबंधीची मार्गदर्शक तत्‍त्‍वे तसेच राज्‍य-केंद्र खर्चाची वाटणी केंद्र सरकार निश्चित करेल.

f. निराधार व्‍यक्‍तींना रोज एकवेळचे जेवण मोफत मिळेल, तर बेघर व्‍यक्‍तींना सामुदायिक स्‍वयंपाक घरांद्वारे (community kitchens) ‘परवडणा-या किंमतीत’ जेवण मिळेल. यासंबंधीची योजना तसेच राज्‍य-केंद्र खर्चाची वाटणी केंद्र सरकार निश्चित करेल.

g. आणिबाणीच्‍या अथवा आपत्‍तीच्‍या काळात, आपत्तिग्रस्‍त व्‍यक्‍तींना आप‍त्‍ती आल्‍याच्‍या तारखेपासून पुढील 3 महिने रोज दोन वेळा मोफत जेवण देण्‍याची सोय राज्‍य सरकार करेल. यासंबंधीची योजना तसेच राज्‍य-केंद्र खर्चाची वाटणी केंद्र सरकार निश्चित करेल.

h. उपासमार होणा-या तसेच त्‍यासदृश्‍य स्थितीत राहणा-या व्‍यक्‍तींची निश्चिती करुन, पुढील 6 महिने, त्‍यांना रोज दोन वेळा मोफत जेवण देण्‍याची सोय राज्‍य सरकार करेल. यासंबंधीची योजना तसेच राज्‍य-केंद्र खर्चाची वाटणी केंद्र सरकार निश्चित करेल.

i. विभाग 2, 3 व 4 मधील प्रस्‍तावित अधिकारांना पात्र असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला, देय धान्‍य अथवा जेवण न मिळाल्‍यास, केंद्र सरकारने निश्चित केलेल्‍या कालावधी व पद्धतीप्रमाणे, संबंधित राज्‍य सरकारने अन्‍न सुरक्षा भत्‍ता द्यावयाचा आहे.

j. लक्ष्‍याधारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेद्वारे देश पातळीवर निश्चित केलेल्‍या टक्‍केवारीप्रमाणे ग्रामीण व शहरी विभागातील प्राधान्‍य व सर्वसाधारण गटातील कुटुंबांना अनुदानित दरात धान्‍य मिळेल. वेळोवेळी, त्‍यांचे राज्‍यवार प्रमाण ठरविण्‍याचा अधिकार केंद्र सरकारला देण्‍यात आलेला आहे.

k. प्रस्‍तावित कायद्यातील अधिकारांच्‍या लाभासाठी, प्राधान्‍य व सर्वसाधारण गटासाठीचे तसेच कोणाला वगळावयाचे यांचे निकष ठरविण्‍यासाठीची मार्गदर्शक सूत्रे निश्चित करण्‍याचे अधिकार केंद्र सरकारला देण्‍यात आले आहेत.

l. केंद्र सरकारच्‍या मार्गदर्शक सूत्रांनुसार, प्राधान्‍य व सर्वसाधारण गटातील कुटुंबांची निवड करण्‍याचे काम राज्‍य सरकारे अथवा केंद्र सरकारने ठरविलेल्‍या संस्‍थेकरवी केले जाईल.

m. प्रस्‍तावित कायद्याने ठरविलेल्‍या भूमिकेशी संवादी राहून केंद्र व राज्‍य सरकारे लक्ष्‍याधारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिकाधिक सुधारणा करत राहतील.

n. प्राधान्‍य व सर्वसाधारण गटातील कुटुंबांना रेशन कार्डे देताना, त्‍या कुटुंबातील 18 वर्षांहून अधिक वय असलेल्‍या सर्वात ज्‍येष्‍ठ स्‍त्रीला कुटुंब प्रमुख मानले जाईल.

o. अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा स्‍थापित करण्‍याचे बंधन केंद्र व राज्‍य सरकारांवर टाकलेले आहे. या यंत्रणांत, कॉल सेंटर्स, हेल्‍प लाईन्‍स, नोडल अधिका-याची नियुक्‍ती तसेच संबंधित सरकारांनी निश्चित केलेल्‍या अन्‍य यंत्रणांचा समावेश असेल. तसेच प्रस्‍तावित कायद्याच्‍या विभाग, 2, 3 व 4 मध्‍ये नमूद केलेल्‍या अन्‍नधान्‍य तसेच जेवणांसंबंधीच्‍या अधिकारांबाबतच्‍या तक्रारींचा वेगाने व परिणामकारक निपटारा होण्‍यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यात, आवश्‍यक कर्मचारी वृंदासह जिल्‍हा तक्रार निवारण अधिका-याची नियुक्‍ती राज्‍य सरकारे करतील.

p. प्रस्‍तावित कायद्यातील तरतुदींच्‍या अंमलबजावणीची देखरेख व मूल्‍यांकन यासाठी प्रत्‍येक राज्‍य सरकार राज्‍य अन्‍न आयोग स्‍थापन करेल तर केंद्र सरकार राष्‍ट्रीय अन्‍न आयोग स्‍थापन करेल.

q. प्रस्‍तावित कायद्याने बहाल केलेल्‍या अधिकारांप्रमाणे तसेच अनुसूची 1 मध्‍ये नमूद केलेल्‍या दरांप्रमाणे प्राधान्‍य व सर्वसाधारण गटातील कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेद्वारे वितरित करण्यासाठी आवश्‍यक प्रमाणातील धान्‍य राज्‍य सरकारांना नियमित पुरविण्‍याचे बंधन केंद्र सरकारवर टाकण्‍यात आले आहे.

r. प्रत्‍येक योजनेसाठी केंद्राने दिलेल्‍या मार्गदर्शक सूत्रानुसार केंद्राच्‍या विविध मंत्रालये व विभागांच्‍या योजनांची तसेच त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या योजनांची अन्‍न सुरक्षा राखण्‍याच्‍या दृष्‍टीने अंमलबजावणी व देखरेख हे राज्‍य सरकारचे काम राहील. प्रस्‍तावित कायद्याची आपल्‍या कार्यक्षेत्रात चोख अंमलबजावणी होण्‍याच्‍या दृष्‍टीने स्‍थानिक यंत्रणा जबाबदार राहतील.

s. रेशन दुकाने, सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था तसेच अन्‍य कल्‍याणकारी योजनांचा ठराविक काळाच्‍या अंतराने सामाजिक लेखाजोखा (सोशल ऑडिट) राज्‍य सरकार स्‍वतः अथवा स्‍थानिक यंत्रणा अथवा अन्‍य यंत्रणा वा मंडळे आयोजित करतील. तसेच राज्‍य सरकारने निश्‍चित केलेल्‍या पद्धतीनुसार, या सोशल ऑडिटमधून निघालेले निष्‍कर्ष प्रसिद्ध करणे व त्‍यांवर आवश्‍यक कार्यवाही करणे ही सुद्धा त्‍यांची जबाबदारी राहील.

t. जिल्‍हा तक्रार निवारण अधिका-याने शिफारस केलेली उपाययोजना एखाद्या अधिका-याने अथवा यंत्रणेने केली नाही तसेच त्‍याचे कोणतेही वाजवी कारण नमूद केले नाही अथवा या शिफारशीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, म्‍हणून ते दोषी आहेत, असे आपली बाजू मांडण्‍याची योग्‍य संधी दिल्‍यानंतरही राज्‍य अन्‍न आयोग अथवा राष्‍ट्रीय अन्‍न आयोगाला वाटले तर अशा अधिका-यास अथवा यंत्रणेस जास्‍तीत जास्‍त 5000 रु.चा दंड ठोठावला जाईल.

5. कलमांसबंधीचे टिपण या विधेयकात समाविष्‍ट विविध तरतुदींचे तपशिलात स्‍पष्‍टीकरण करते.

6. हे विधेयक वरील उद्दिष्‍टे पूर्ण करु इच्छिते.

के. व्‍ही. थॉमस

नवी दिल्‍ली

19 डिसेंबर, 2011.