Wednesday, January 28, 2015

RIP की आदरांजली?

मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहताना बहुतेकांकडून सवयीने comment नोंदवली जाते -'RIP'. 'Rest in peace'चा हा संक्षेप. मृतात्म्यास शांती/चिरशांती लाभो, असा त्याचा अर्थ. माणूस मेल्यावर दहन झाल्यास त्याची राख होते किंवा दफन झाल्यास माती होते. शांतीचा अनुभव घेण्यासाठीची जाणीव मेंदू असला तरच होणार. मेंदूच नष्ट झाल्यावर अशी चिरशांती मृत व्यक्ती कशी काय अनुभवणार? जी काय शांती मिळावयास हवी, तिची कामना आपण ती व्यक्ती जिवंत असतानाच करणे संयुक्तिक नव्हे काय? किमान लोक आपल्याविषयी अशा भावना व्यक्त करुन आपली दखल घेत आहेत, यामुळे ती व्यक्ती काही काळ तरी नक्की सुखावेल. कारण हे समजण्यासाठीचा तिचा मेंदू तेव्हा जिवंत असतो.

तात्पर्य, मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP ऐवजी 'आदरांजली', 'स्मृतीस अभिवादन' असे म्हणणे वास्तवाला धरुन होईल.

------------------------

टीपः 'आत्मा अमर आहे'अशी ठाम समजूत असलेल्यांना वरील अपील लागू नाही. अशी समजूत बाळगण्याच्या त्यांच्या अधिकाराचा मी आदर करतो.

Saturday, January 3, 2015

वसंतराव गोवारीकर गेले! काही आठवणी जाग्या झाल्या...

९०-९१ साल असावे. मी डॉ. माधव चव्हाणांबरोबर (सध्या'प्रथम'चे प्रमुख) साक्षरतेच्या आंदोलनात काम करत होतो. साक्षरतेसाठीचे संसाधन केंद्र ते जिथे शिकवत त्या माटुंग्याच्या UDCTत भीम रास्करांच्या नेतृत्वाखाली चालत होते. या केंद्राचा मीही एक भाग होतो. 

एके दिवशी तेथील फोन खणखणला. मी उचलला. माझ्या 'हॅलो..' नंतर पलीकडून शांत, हळुवार स्वर आले, "मी वसंत गोवारीकर बोलतोय. माधव आहे का?" मी उडालोच. साक्षात वसंतराव गोवारीकर! तेही दिल्लीहून! तेव्हा दिल्लीचा फोन म्हणजे ट्रंक कॉल. भरभक्कम बिल व्हायचे. बोलणाऱ्या दोहोंपैकी कोणावर तरी त्याचा भार येणार. अशा ट्रंक कॉलचे मला नेहमीच दडपण यायचे. त्यात एका प्रचंड मोठ्या माणसाबरोबर मी बोलत होतो. त्यांची ख्याती शालेय जीवनापासूनच ऐकत आलो होतो. यावेळी ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व भारत सरकारच्य विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. 

मी काही क्षण चाचरलो. पण गोवारीकरच इतक्या निवांतपणी व खास मराठीत बोलत होते की मीही सावरलो. माधव लेक्चरला की कुठे होता, ते सांगितले. त्यांनी माधवसाठी काहीतरी निरोप दिला. 

खास मराठीत म्हणण्याचे कारण त्यात कोठेही इंग्रजी शब्द नव्हता. दिल्ली-परदेशी वावरलेली (आता तर कॉलेजला गेलेली बहुतेक सगळीच) माणसे मराठी असूनही मिंग्लिशमध्ये बोलताना दिसतात. गोवारीकरांच्या पिढीचेच बहुधा हे वैशिष्टय असावे. या व त्यांच्या आधीच्याही पिढीतील इंग्रजी शिक्षण घेतलेली-विशेषतः इंग्रजांच्या काळात शिक्षण घेतलेली मराठी माणसे एकावेळी एकाच भाषेत बोलताना मी पाहिली आहेत. इंग्रजीत बोलताना ती इंग्रजीतच बोलत. मराठीत बोलताना मराठीतच बोलत. 

गोवारीकर व माधवचे संबंध तसे जुने. माधवचे वडील (लाल निशाण पक्षाचे) कॉ. यशवंतराव चव्हाण व गोवारीकर यांचा स्नेह-परिचय बहुधा कोल्हापूरच्या त्यांच्या लहानपणापासूनचा. गोवारीकरांच्या मुंबईत माधव (व बहुधा यशवंतरावांबरोबरही) दोन-तीन भेटी झाल्या. या भेटींत एकदा त्यांच्याबरोबर चेंबूरच्या आचार्य उद्यानाजवळील 'योगी' हॉटेलमध्ये जेवायला गेल्याचेही खास लक्षात आहे. हे खास लक्षात राहण्याचे कारण म्हणजे योगी हे आमच्यादृष्टीने तेव्हाचे मोठ्या लोकांचे हॉटेल. वस्तीत राहणारे आम्ही लहानपणापासून त्या हॉटेलच्या अवतीभोवती फिरत असू. पण आत जाणे हमारे बस की बात नव्हती. आता ते किंवा त्यासारखी हॉटेले तशी मोठी वाटत नाहीत. अशा हॉटेलांत जाणे आता अगदी सहज नाही, पण खूप कठीणही वाटत नाही. असो. 

चेंबूरला आमचे साक्षरतेचे काम ज्या चेंबूर-गोवंडी परिसरात चालले होते, त्या परिसरातील देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून इंधन की काहीतरी करण्याचा एक प्रयोग चालू होता. तसेच लोखंडे मार्ग, लुंबिनी बाग येथील वस्त्यांत गोल आकाराच्या पे अँड युज तत्वावरच्या शौचालयांचा प्रयोग चालू होता. या दोन्ही प्रयोगांशी गोवारीकरांचा जवळून संबंध होता. काय ते आता विसरलो. पण आम्हाला प्रत्यक्ष त्यांनीच ही ठिकाणे फिरुन दाखवली. या दोन्ही प्रयोगांत आम्ही लक्ष घालावे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यापैकी, गोल आकाराची शौचालये आमच्या-कोरो साक्षरता समितीच्या स्थानिक युवक व महिला कार्यकर्त्यांनी चालवायला घेतली. चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तो आर्थिक आधारही झाला. पुढे या कार्यकर्त्यांचीच संस्था करुन त्यांनाच ती सोपवण्यात आली. २५ वर्षे होत आली. आजही ती उत्तम चालू आहेत. 

या परिसरात फिरताना ही शौचालये दिसली की वसंतराव गोवारीकरांची हटकून आठवण येई. त्यांचे संयत, ऋजू व्यक्तित्व व 'खास'मराठीतून बोलणे आठवे. आता तर ते अधिकच आठवेल. 

...वसंतराव तुम्हाला आदरांजली!

- सुरेश सावंत

Friday, November 7, 2014

दलित अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी

दलित अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठीच्या उपायांमधील एक कळीचा उपाय बाबासाहेबांचे एक सहकारी व आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते मांडत असत त्याप्रमाणे 'गावकुसाच्या आतल्या व गावकुसाच्या बाहेरच्या समतावाद्यांची एकजूट' हाच आहे, असे मला वाटते.
सूचना बाळबोध वाटेल, पण माणसातील 'माणसाला', त्याच्या विवेकाला, त्याच्यातील सत्प्रवृत्ततेला साद घालणारे, वाईटाविरोधी संघटितपणे उभे राहण्याचे 'संतपद्धतीचे' आवाहन करणारे सवर्णांचा पुढाकार असलेले जथे-यात्रा संवेदनशील, अत्याचारप्रवण भागांमध्ये का निघू नयेत? मनात अनेक जातीय किल्मिषे असणाऱ्या सर्वांचाच अशा हत्यांना पाठिंबा असतो असे नाही. आज ही माणसे गप्प, तटस्थ राहतात. 'मतभेद, भांडणे चर्चेने वा कायद्याने सुटली पाहिजेत, कायदा हातात घेता कामा नये, अशी अमानुष कृत्ये तर होताच कामा नयेत', असे ठामपणे सांगणारी कृतीशील माणसे तयार करणे अगदी अशक्य आहे का? ग्रामसभा, शाळा, काॅलेजे, महिला मंडळे, बचत गट, युवक मंडळे, उत्सव मंडळे, देवळांच्या कमिट्या अशा अनेक मंचांवर माणसांशी संपर्क करुन, फाटे फोडणाऱ्या अन्य कोणत्याही चर्चा न करता केवळ वरील मर्यादित भूमिकेवर लोकांना संघटित करणे, जाहीर शपथांचे कार्यक्रम करणे, शांतता समित्या तयार करणे शक्य आहे का? ... पूर्वी असे उपक्रम अनेक विषयांबाबत झालेले आहेत. स्त्री मुक्ती संघटनेने राज्याच्या तसेच देशाच्या अनेक भागांत काढलेल्या स्त्री-पुरुष समानता यात्रांमध्ये सहभागी असताना तसेच मुंबईतील ९२-९३ च्या दंगलींत राष्ट्रीय एकता समितीत काम करत असताना मीही हा अनुभव काही प्रमाणात घेतलेला आहे. अधिक सखोल सामाजिक-राजकीय मांडणी करणाऱ्या आंदोलनांचे महत्व आहेच. त्यांना पर्याय म्हणून नव्हे, तर पूरक म्हणून या उपक्रमाचा विचार करता येणे शक्य आहे.

मोर्चे-निदर्शनांची उपयुक्तता काय?

जवखेड्याच्या अमानुष हत्याकांडाच्या विरोधात चाललेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर एका सबंधितांकडून असा मेसेज आलाः

...पण सुरेश , लोक बरेचदा असं म्हणतात की मोर्चे आन्दोलनं करून काही होत नाही ... त्यांचं हे मत मला नाही पटत. पण त्यांना हे पटवून द्यायला हवं असही वाटतं मला ... त्यावर काही लिखाण असेल तर सांग ना ... मोर्चे आन्दोलनांचं महत्व सांगणारा लेख .. तू लिही नाहीतर...

त्यांना माझे उत्तरः

माेर्चे-निदर्शने हा आंदोलनाचा एक कार्यक्रम असतो. स्वातंत्र्यासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच अनेक राजकीय, सामाजिक मागण्यांसाठी तो आपल्या महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर अशा अनेक महान नेत्यांकडून अवलंबला गेला आहे. आजही अवलंबला जातो आहे. ज्यांचा प्रश्न आहे त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, समाजातील अन्य घटकांचे लक्ष वेधणे व ज्यांच्याविरोधात तो आहे, त्यांचे लक्ष वेधण्याबरोबरच मागण्या मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर संघशक्तीचा दबाव आणणे ही उद्दिष्टे त्यामागे असतात. आणि बहुतांशवेळा ती सफलही झालेली दिसतात. जेव्हा सरकारच परके होते व ते काहीच प्रतिसाद देत नव्हते, तेव्हा ही निदर्शने हिंसकही झाली. हे हिंसक होणे योग्य की अयोग्य याबाबत स्वातंत्र्य चळवळीत मतभेद होते. जे सरकार आपले नाहीच, ते शांततामय निदर्शनांनी बधत नसेल तर केवळ नाईलाज म्हणून अशी हिंसा मला मंजूर आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण निवडलेले सरकार असते. ते बदलण्याचा निवडणुका हा लोकशाहीद्वारे आपण स्वीकारलेला मार्ग आहे. अशावेळी हिंसक आंदोलन मला अजिबात मंजूर नाही. सनदशीर, शांततामय निदर्शनेच असायला हवीत. जर सरकार ऐकत नसेल, तर प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींद्वारे सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणे, समान प्रश्न असलेल्यांची अधिकाधिक व्यापक एकजूट उभारणे, अन्य समाजाला आपले म्हणणे पटविण्याचा प्रयत्न करणे, न्यायालयात जाणे व अखेरीस निवडणुकांत भागिदारी करणे हेच उपाय अवलंबले पाहिजेत. अन्यथा अराजक तयार होईल. ही संसदीय लोकशाही प्रणाली आमचे प्रश्न सोडवू शकत नाही, अशी ज्यांची भूमिका असते, अशी (उदा. नक्षलवादी) मंडळी हिंसेचा मार्ग अनुसरतात. त्यांच्या प्रश्नांशी मी सहमत आहे, पण त्यांच्या या मार्गाशी नाही. कारण संसदीय लोकशाही प्रणालीत त्यांच्या प्रश्नांची सुनवाई होणे आज जिकीरीचे असू शकते, परंतु, अजिबात शक्य नाही, असे मला वाटत नाही.

याच भूमिकेने मी दलित अत्याचारांच्या विरोधातील आंदोलनाकडे पाहतो. खैरलांजी हत्याकांडाच्या वर्षपूर्तीनिमित्त ७ वर्षांपूर्वी याविषयी चर्चा करणारा 'पुढच्या खैरलांजी टाळण्यासाठी चळवळीच्या आत्मपरीक्षणाची गरज' या शीर्षकाचा एक लेख मी लिहिला होता. तत्कालीन तपशीलाचे काही संदर्भ वगळता त्यातील भूमिका आजही लागू ठरते, असे मला वाटते. तो वाचण्यासाठी व download करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे, ही विनंतीः

Sunday, August 31, 2014

दोन व्यथा - एक अपरिहार्य; दुसरी पर्याय असलेली! ...(FB status व त्यावरील चर्चा)

दया पवारांची,
'दिस कासऱ्याला आला, जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरु, माझं लेकरु, पाटीखाली मी डालिते..'
ही व्यथा काळीज कुटणारी. आपल्या टाहोने आभाळ विस्फोटवणारी. या लेकराची माय असहाय्य, काहीही पर्याय नसलेली. व्यवसायाचे कोणतेही निवडस्वातंत्र्य नसलेली.
संदीप खरेंची,
'दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..'
हीही व्यथा. डोळे पाणवणारी. पण अपरिहार्य नाही. भौतिक समृद्धीत जीवनाची सार्थकता मानणाऱ्या या पालकांचा, अधिकाधिक साधनसंपन्नतेसाठी जीवघेण्या शर्यतीचा पर्याय ही स्वतःची निवड आहे. त्यांनी ठरवले तर तुलनेने कमी मिळकतीचे, पण ही व्यथा कमी करणारे व्यवसाय निवडण्याची क्षमता त्यांच्या शिक्षणाने-सामाजिक स्थानाने त्यांना दिलेली आहे.

- सुरेश सावंत

  • Sanyogita Dhamdhere मला नाही असं वाटत. घर, शिक्षण, आरोग्य यावरील वाढते खर्च म्हणून दोघांना काम करणे अपरिहार्य झालं आहे.
    तसंच जे शिक्षण घेतलं आहे त्याला बरहुकूम काम नाही केल तर केव्हढी साधन संपती वाया जाईल.
    स्वतःची उन्नती करण्यासाठी घराबाहेर पडून जे काम करतात त्याने देशाचाही विकासच होत अस्तो.
    असं धोरण ठरवल्यास कमी महत्वाची, कमी वेळेची, कमी पगाराची नोकरी आणि मुलासह इतर जबाबदार्या सांभाळण्याची तयारी बायकांनाच ठेवावी लागते.
    प्रवासात जाणारा वेळ , मुलांना सांभाळण्याच्या प्रशिक्षित सेवा नसणे,कामाच्या सोयीच्या वेळा नसने. कमीत कमी कर्मचार्या कडून जास्तीत जास्त काम करून घेण्याची वृत्ती यामुळे ८ तासात काम आटोपून बहुतांश पालक घरी परतू शकत नहित.एकल पालकांचं काय ?
    2 hrs · Like · 1
  • Meera Sirsamkar << दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
    नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..' >> यातले पालकही व्यवस्थेची शिकार असतात . पर्याय नसतो त्यांच्यापुढे सुद्धा .... कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून पाहिलेय मी ...
    1 hr · Like · 2
  • Avinash Shukla आज स्त्रियांना नोकरी करणे हे जरुरीचे झाले आहे नाही तर कनिष्ठ मध्यमवर्गासाठी जीवन जिकिरीचे होते अन तसेही शिक्षण घेऊन त्याचा काय उपयोग? मुलांच्या शिक्षणासाठी साठी थोडे जास्त लक्ष्य द्यावे लागते हे मान्य पण ते जीवनाच्या थोड्या वर्षासाठी असते अन त्यानंतर स्त्रियांसाठी एक पोकळी निर्माण होऊ शकते जर नोकरी नसली तर. त्यातच ज्या मुली professional कोर्सेस करतात त्यांनी तर जरूर नोकरी करावी. अर्थात ह्याचे ज्ञान पेरेंट लोकांना पण झालेच पाहिजे.
    9 mins · Like
  • Suresh Sawant 'मुलगी झाली हो' नाटकात 'मूल नाही एकट्या बाईचे-जसे ते बाईचे, तसे ते पुरुषाचे. मूल जबाबदारी समाजाची. म्हणून पाळणाघर हवे. वस्तीवस्तीत पाळणाघर हवे. कामाच्या ठिकाणी पाळणाघर हवे.' अशी भूमिका व मागणी आहे. मी त्याचा समर्थक आहे. मुलासाठी आईने घरी थांबणे हा मुद्दा मला अर्थातच मान्य नाही. आजच्या स्थितीत सर्वांना परवडणारी, उत्तम दर्जाची पाळणाघरे उपलब्ध करणे हे सरकारचे काम आहे. आजचे मूल (मग ते पाटीखाली डालले जाणारे अथवा मध्यमवर्गीय घरात एकाकी उसासणारे) उद्याचा नागरिक व देशाचा आधारस्तंभ असल्याने त्याची उत्तम जोपासना ही सरकारची जबाबदारी असायला हवी. त्यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा. दुसरे, प्राप्त स्थितीत घरी लवकर पोहोचण्याच्यादृष्टीने सोयीची म्हणून कमी मिळकतीची नोकरी ही तडजोड आहे.शक्य होईल त्यांनी करायला हवी. तथापि, वाढत्या तंत्रज्ञानाने कमी वेळात, कमी श्रमात अधिक उत्पादन होत असते. अशावेळी कामगाराचे वेतन वाढत जाऊन कामाचे तास मात्र कमी व्हायला हवेत. अधिक लोक कामाला लागायला हवेत. पण तसे होत नाही. मालकशाही ही जादा उत्पादनाची मलई गिळंकृत करत असते. आजच्या विषमतेला जन्म देणाऱ्या-माणसाचे यंत्र बनवणाऱ्या या व्यवस्थेला व बहुतांशी तिची पाठराखण करणाऱ्या सरकारला आपण प्रश्न विचारणार आहोत का? त्यांच्या विरोधात व्यापक एकजुटीचे आंदोलन करणार आहोत का? आज आम्हा मध्यमर्गीयांना (निम्न व उच्च दोन्ही जातींतल्या) आपल्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील समुदायांशी जोडून घेणे कमी प्रतीचे वाटते. शाळा, वस्त्या, रुग्णालये, वाहतूक व्यवस्था आम्हाला वेगळ्याच हव्या आहेत. त्यांच्या मुलांशी आमच्या मुलांचा संबंध येता कामा नये, याबाबत आम्ही किती दक्ष असतो! आम्ही मालक नसतो. पण स्वतःला कामगार म्हणवून घेण्यात अपमान वाटतो. आम्ही executive, representative, programme officer इ. इ. बरेच काही असतो. पण कामगार नक्की नसतो. संदीप खरेंच्याच दुसऱ्या एका गीताप्रमाणे 'मी मोर्चा नेला नाही..मी संपही केला नाही' असे वदणारा हा दांभिक एकाकी समूह आहे. त्याची वेदना कितीही खरी असली तरी ती व्यवस्था परिवर्तनाला निरुपयोगी आहे.

Wednesday, July 2, 2014

पुरुषसूक्तासंबंधीच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा

विठ्ठल पूजेप्रसंगी पुरुषसूक्तावरून वाद उफाळणार?

पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या ॠग्वेदातील पुरुषसूक्तास तीव्र विरोध करीत, या प्रश्नावर येत्या आषाढी यात्रेत आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला असून, याउलट, पुरुषसूक्तामध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब नाही. पुरुषसुक्ताला विरोध करण्यापूर्वी डॉ. पाटणकर यांनी त्याचा अभ्यास करावा, असा सल्ला देत भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी पुरुषसूक्ताचे समर्थन केले आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या पूजेवरून डॉ. पाटणकर व उत्पात यांच्यातील वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बडवे-उत्पातांसह अन्य सेवेकऱ्यांचा दैनंदिन पूजाअर्चा करण्याचा अधिकार संपुष्टात आला आहे. या पाश्र्वभूमीवर मंदिर समितीनेही मंदिरात दैनंदिन पूजा व इतर धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पुजारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी समाजातील सर्वच स्तरातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यात ब्राह्मणेतर म्हणजे थेट दलित, ओबीसींसह महिलांनादेखील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी म्हणून काम पाहण्याचा मान प्राप्त होणार असतानाच त्यावर पुन्हा वाद उपस्थित झाला. यासंदर्भात मंदिर समितीने राज्य शासनाकडे निर्णय सोपविला आहे. त्यामुळे पुजारी नियुक्तीचा वाद तूर्तास बाजूला पडला आहे.

तथापि, एकीकडे पुजारी नियुक्ती निर्णयाचे समाजात सर्वत्र स्वागत होत असतानाच मंदिर समितीने कचखाऊ भूमिका घेतल्यानंतर आता मंदिरात विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पुरुषसूक्तावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मंदिरात महिला व दलितांसह सर्वानाच पुजारीपदावर काम करण्याची संधी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करणारे डॉ. भारत पाटणकर यांनी, कोणत्याही दबावाला बळी न पडता सामाजिक क्रांती घडविणाऱ्या पुजारी नियुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, विठ्ठल पूजेप्रसंगी म्हटले जाणारे पुरुषसूक्त म्हटले जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

डॉ. पाटणकर यांचा आक्षेप अमान्य करताना पंढरपुरातील भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी, डॉ. पाटणकर यांनी पुरुषसूक्तांचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला आहे. संत साहित्यात कोठेही वेदाची निंदानालस्ती आढळत नाही. सबंध देशभरात देवदेवतांच्या पूजा पुरुषसूक्ताने करण्यात येते. यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. वेदात जन्माबाबत रूपक आहे. त्याचा शब्दश: अर्थ लावू नये, असे उत्पात यांचे म्हणणे आहे.

पुरूषसूक्त म्हणजे जातीची उतरंड दर्शविण्याचे द्योतक आहे. विठ्ठलाकडे जातीभेद नसताना तेथे पुरूषसुक्त म्हणायचे कशासाठी. पुरूषसूक्ताऐवजी संत ज्ञानेश्वरांचे पयासदान किंवा संत तुकारामांचे अभंग म्हटले जावे.

(लोकसत्ता, ३ जुलै १४)

--------------------------------------------------------------------
ऋग्वेदात हे पुरुषसूक्त असून यात सर्वशक्तिमान परमेश्वराचे वर्णन केले आहे. ज्याला हजारो हात, हजारो कान, हजारो डोळे, हजारो पाय असलेला हा परमेश्वर असल्याचे सांगताना, यातील एका मंत्रात ब्राह्मण वर्ण मुखातून, क्षत्रिय वर्ण बाहुंमधून, वैश्य वर्ण मांडीतून आणि शूद्र वर्ण पायातून उगम पावल्याचे वर्णन आहे.
-------------------------------------------------------

पुरुषसूक्ताविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात-
'The scheme of the Purusha Sukta is unique, inasmuch as it fixes a permanent warrant of precedence among the different classes, which neither time nor circumstances can alter. The warrant of precedence is based on the principle of graded inequality among the four classes, whereby it recognises the Brahmin to be above all, the Kshatriya below the Brahmin but above the Vaishya and the Shudra, the Vaishya below the Kshatriya but above the Shudra and the Shudra below all.'
बाबासाहेबांची संपूर्ण भूमिका वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः
--------------------------------------------------------------------

Saturday, May 24, 2014

मोदींना वेळ तर द्या. त्यांच्यावर टीका करायची घाई का?

मोदींना वेळ तर द्या. त्यांच्यावर टीका करायची घाई का? ते वाईटच करणार आहेत कशावरुन? हा तुमचा पूर्वग्रह नाही का?... यारीतीचे प्रश्न आम्हा मोदींच्या टीकाकारांना विचारले जातात.

हे प्रश्न स्वाभाविक आहेत. पण रास्त नाहीत.

मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. त्या कामाचा एक भाग म्हणूनच ते राजकारणात आले. आताही भाजपच्या अडवाणी, सुषमा स्वराज आदिंना बाजूला सारुन संघानेच भाजपचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना निवडले आहे. आधी जनसंघ व नंतरचा भाजप ही संघाची राजकीय साधने आहेत. संघाचा आदेश प्रमाण मानणाऱ्या भाजपने किंवा मोदींनी संघपरिवाराच्या विचारांतला अमूक भाग आम्ही नाकारतो व अमूक स्वीकारतो, असे म्हटलेले नाही. म्हणजे संघाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीच मोदी पंतप्रधान झाले आहेत.

जर माझा संघाच्या विचारांना पूर्ण विरोध असेल, तर त्यांचा कडवा सैनिक मोदी (व ते ज्याचे नेतृत्व करतात तो भाजप) यांच्या हातात देशाची सूत्रे असता कामा नयेत, अशीच माझी इच्छा राहणार. अर्थात भाजप लोकशाही प्रक्रियेतून निवडून आला आहे, तो लोकशाहीच्या प्रक्रियेतूनच पराभूत झाला पाहिजे, हे मी मानतो. त्यासाठी जनमत तयार करणे हा मोदींच्या टीकाकारांना लोकशाहीनेच दिलेला अधिकार आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालचे सरकार जे निर्णय घेईल, ते सगळे वाईटच असतील, असे अजिबात नाही. उलट, आधीच्या सरकारपेक्षा त्यांच्या कारकीर्दीत अधिक वेगाने विकास होण्याचीही शक्यता आहे. ज्या योजना आधीच्या सरकारने आणल्या, परंतु, त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही, त्या अधिक परिणामकारकपणेही अमलात येऊ शकतात.

मग तरीही आम्ही टीकाच करणार का? या बाबतीत टीका करण्याचा प्रश्नच नाही. उलट जे चांगले झाले त्याला चांगलेच म्हणणार. छत्तीसगडमध्ये रेशनची योजना ज्या परिणामकारकपणे राबवली जात आहे, त्याचा मी प्रशंसक आहे. तसे लेखही मी लिहिले आहेत. ज्यांच्या पुढाकाराने हे घडले ते मुख्यमंत्री रमणसिंग भाजपचे आहेत, ही बाब अशी प्रशंसा करताना मला अडचणीची वाटली नाही.

मात्र, विकास हा देशाच्या प्रगतीचा एकमेव मापदंड नाही. या विकासाचे न्याय्य वाटप, देशाची एकात्मता-अखंडता, जनतेतील बंधुता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय व सद्भाव, अल्पसंख्याकांची सुरक्षितता, स्त्रियांना समान अधिकार, लोकशाहीचा विस्तार, उपेक्षितांना झुकते माप, पुरोगामी इतिहास व परंपरांचा आदर, आंतरराष्ट्रीय शांतता व साहचर्य इ. सारख्या मूल्यांची जोपासना देशात कशी होते यावर देशाची खरी संपन्नता अवलंबून आहे. संघाची विचारधारा अशा संपन्नतेला अडथळा आहे, अशी माझी धारणा आहे. आणि अशा विचारधारेचे मोदी जोवर वाहक आहेत, तोवर त्यांच्या विकासाच्या पावलांचे स्वागत करुनही मी त्यांचा विरोधक राहणार.

- सुरेश सावंत