विजयालक्ष्मी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या भगिनी. या दोघा बंधु-भगिनींना प्रश्न विचारताना पत्रकार कसा फरक करतात, याबद्दल त्या लिहितात – ‘एकदम थेट, स्पष्ट आणि बुद्धिगम्य प्रश्न माझ्या भावाला विचारले जातात. मीही सार्वजनिक कार्य करते. मात्र मला विचारले जाणारे प्रश्न माझे कपडे, मुलं आणि आपला विवेक शाबूत ठेवायला सधन घरातल्या महिला करत असलेल्या किरकोळ उपक्रमांविषयी असतात.’
बाई आणि तीही बड्या घरची विशेष ते काय करणार? विशेष कर्तबगारी ही पुरुषाची मक्तेदारी, ही धारणा या पत्रकारांची पक्की असते. स्त्रियांना दुय्यम समजणाऱ्या या वृत्तीबद्दल विजयालक्ष्मींना संताप येतो. उदारमतवादी, प्रगत विचारांचे वडील-भाऊ असतानाही स्वतःच्या घरात या दुय्यमतेच्या कडवट अनुभवातून त्या गेलेल्या असतात.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत असताना बाईला दुय्यमतेचं हे अधिकचं ओझं कायम वागवावं लागतं. संविधानसभेतल्या ज्या महिलांविषयी आपण समजून घेत आहोत, त्या सर्व महिलांच्या विचारात-कामात हा मुद्दा ठसठशीतपणे येतो हे आपल्या लक्षात आलंच असेल.
आज विजयालक्ष्मी पंडितांविषयी अधिक जाणून घेऊ.
अलाहाबाद म्हणजे आताच्या प्रयागराजमध्ये १८ ऑगस्ट १९०० रोजी स्वरुप कुमारींचा जन्म झाला. विजयालक्ष्मी हे त्यांचं लग्नानंतरचं बदललेलं नाव. वडील मोतिलाल नेहरु आणि आई स्वरुप राणी. आई आणि लेक दोहोंच्या नावात स्वरुप असलं तरी आई राणी आणि लेक कुमारी. स्वरुप कुमारीला घरी लाडानं ‘नन्ही’ म्हटलं जाई. थोरला भाऊ जवाहरलाल आणि स्वरुप कुमारी यांच्यात ११ वर्षांचं अंतर होतं. इथलं नेहरु कुटुंबीयांचं निवासस्थान ‘आनंद भवन.’ राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचं ते एक केंद्र होतं. पुढे नेहरु कुटुंबानं काँग्रेस पक्षाला ते देणगीस्वरुपात दिलं.
मोतिलाल नेहरु काँग्रेस पक्षाचे मोठे नेते. नामांकित वकील. उच्चभ्रू राहणी. प्रगतीशील विचार. तरीही स्वरुप कुमारीला बाहेर शिकायला पाठवलं जात नाही. तिचं औपचारिक शिक्षण होत नाही. तिला घरीच खाजगी शिकवणी लावली जाते. स्वरुपला पुढे विद्यापीठात शिकायला जायचं असतं. मात्र त्यास नकार मिळतो. भाऊ जवाहरलाल मात्र लंडनला उच्च शिक्षण घेत असतो. एका बाजूला स्त्रियांच्या अधिकारासाठी आवाज उठवणं आणि दुसरीकडं आपल्याच मुलीला शिक्षणासाठी घराबाहेर पडू न देणं, या वडिलांच्या विरोधाभासी वागण्याची विजयालक्ष्मींनी आपल्या लिखाणात नोंद केली आहे.
इथं एक लक्षात घ्यायला हवं. नेहरु कुटुंबीयांचं घर आनंद भवन हेच एक विविध अनुभवांची, संस्कारांची शाळा असते. पाश्चात्य जीवनशैली, ब्रिटिश स्नेह्यांचं घरी येणं-जाणं, काँग्रेसच्या नेत्यांच्या चर्चा यांतून स्वरुप कुमारींचे विचार आणि वृत्ती घडत होती. विरोधकांशी संघर्ष करताना माणूस म्हणून त्यांच्याबद्दल द्वेषभाव न बाळगणं हा मोठा संस्कार आमच्यावर झाल्याचं विजयालक्ष्मी नमूद करतात. ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष आणि तरीही ब्रिटिश व्यक्तींशी मैत्री हे दृश्य त्या घरातच पाहत होत्या.
एकदा गोपाळ कृष्ण गोखले घरी येतात. तिला विचारतात – “तू घातलेले कपडे स्वदेशी आहेत का?” त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून भारतातल्या कापड उद्योगाला चालना मिळण्याचं महत्व स्वरुप कुमारीला कळतं. १९१६ साली लखनौला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला स्वरुप कुमारी जाते. अॅनी बेझंट आणि सरोजिनी नायडू यांच्या भाषणांनी ती प्रभावित होते. आयरिश होमरुल चळवळीनं आपल्या इथल्या होमरुल चळवळीला कशी प्रेरणा दिली हे तिला यातून समजतं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच आंतरराष्ट्रीय चळवळींचा अवकाश तिच्या लक्षात येतो.
गांधीजींच्या प्रभावामुळे आपल्या घरातली उंची राहणी साधी झालेली स्वरुप कुमारीनं पाहिली होती. मात्र साबरमती आश्रमात गेल्यावर तिथली अगदी काटसरीची राहणी आणि नैतिकतेचे नियम तिला भावले नाहीत. गांधीजींविषयी आदर पण त्यांच्या सगळ्याच भूमिकांशी सहमती नाही, असा एक गट काँग्रेसमध्ये होताच. त्यात स्वरुप कुमारीचा समावेश झाला.
१९२० च्या सुमारास रणजित पंडित नावाचा तरुण बॅरिस्टर आनंद भवनध्ये येतो. एका कायदेशीर प्रकरणात त्याला मोतिलाल नेहरुंचा सल्ला हवा होता. आनंद भवनमध्ये मुक्काम असताना त्याची आणि स्वरुप कुमारीची भेट होते. इथंच त्यांची मैत्री होते आणि लग्नही ठरतं. कुटुंबाची मान्यता मिळते. १९२१ च्या १० मे रोजी लग्न समारंभ ठरतो. एक अडचण उभी राहते. गांधीजींचा आग्रह असतो, नवरीनं खादीची साडी नेसायची. अजिबात दागिने घालायचे नाहीत. स्वरुप कुमारीची आई याला तीव्र विरोध करते. लग्नानंतर आशीर्वाद घ्यायला नवं जोडपं गांधीजींना भेटतं. गांधीजी त्यांना विनासंबंध, विनापत्य केवळ मित्र म्हणून राहण्याची सूचना करतात. विजयालक्ष्मी ही सूचना उडवून लावते. तिला चारचौघांसारखं ‘सामान्य वैवाहिक जीवन’ जगायचं असतं.
लग्नानंतर रणजित आणि विजयालक्ष्मी राजकोटला, रणजितच्या घरी राहायला लागतात. रणजितच्या घरची माणसं या लग्नावर नाखुश असतात. आपल्या मुलाचं भविष्य ब्रिटिशविरोधात लढणाऱ्या नेहरु परिवाराशी संबंध आल्यानं धोक्यात येईल अशी त्यांना भीती वाटत होती. पंडित कुटुंब आता राजकोटला राहत असलं तरी त्यांचं मूळ घराणं रत्नागिरी जिल्ह्यातलं. या जोडप्याला तीन मुली होतात. त्यातल्या एक प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल. १९२६ ला पंडित कुटुंब अलाहाबादला स्थलांतरित होतं.
विजयालक्ष्मी अलाहाबादला काँग्रेसच्या कामात उत्साहानं भाग घेऊ लागतात. ब्रिटिशविरोधी मोर्चे, सभा संघटित करु लागतात. भाषणं देऊ लागतात. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांचे वडील, भाऊ आणि नवरा तुरुंगात जातात. वडील मोतिलाल नेहरु तुरुंगात आजारी पडतात आणि १९३१ साली त्यांचा आजार बळावून निधन होतं. एक वर्षानंतर विजयालक्ष्मींना शहर काँग्रेस समितीच्या सभेचं नेतृत्व करण्याच्या आरोपाखाली सश्रम कारावासाची शिक्षा होते. विजयालक्ष्मींना लखनौच्या तुरुंगात ठेवलं जातं. तिथं त्यांना वेगळ्याच वास्तवाची प्रचिती येते. स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक तुरुंगात आपापल्या जातीच्या तथाकथित श्रेणी पाळत होते. ही बाब जवळपास ९० वर्षांनी आताही आपल्या तुरुंगात आढळते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं तुरुंगातील जातिभेदांना लगाम घालण्याचे आदेश अलीकडेच दिले.
१९३४ साली विजयालक्ष्मी अलाहाबाद नगरपालिकेवर निवडून गेल्या. शिक्षण समितीच्या अध्यक्ष झाल्या. पोषक आहार म्हणून केवळ दूध दिलं जाई. त्याऐवजी त्यांनी मध्यान्ह भोजन योजना सुरु केली. त्यासाठीचा पुरेसा निधी नगरपालिकेकडं नसल्यानं लोकवर्गणीतून त्यांनी तो उभारला. शिक्षण समितीच्या त्या अध्यक्ष असतानाच एक घटना घडली. एक तरुण विधवा शिक्षिका गरोदर राहिल्यानं तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं. विजयालक्ष्मी शालेय प्रशासनाच्या या कृतीवर संतापल्या. हा अन्यायकारक नियम बदलण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. पण उपयोग झाला नाही. त्यांनी वैयक्तिक पातळीवर त्या विधवा शिक्षिकेचं मूल दत्तक देऊन तिला नवी नोकरी लागण्यासाठी प्रयत्न केले. पण संबंधित पुरुषाला मोकळं सोडून स्त्रीला दोषी ठरवणारा दांभिक नियम काही त्या बदलू शकल्या नाहीत. त्या म्हणतात हा मुद्दा सामाजिक संरचनेचा आहे. एखाद-दोन हस्तक्षेपांनी तो बदलणं कठीण आहे.
१९३६-३७ साली विजयालक्ष्मी संयुक्त प्रांताच्या विधान सभेवर कानपूरमधून निवडून गेल्या. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य खात्याचं कॅबिनेट मंत्री केलं जातं. भारतातल्या त्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. स्त्रियांच्या समान अधिकारांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय महिला परिषदेत त्या सक्रिय असतात. १९३८ साली परिषदेच्या त्या उपाध्यक्ष आणि १९४२ साली अध्यक्ष होतात. या पदाचा वापर करुन जगातल्या महिलांना युद्धाच्या विरोधात उभं राहण्याचं त्या आवाहन करतात. युद्धात वित्त, मनुष्यहानी होते. पण मनुष्यहानीत मुख्यतः स्त्रिया आणि मुलं मारली जातात. नवरे मारले गेल्यानं बाईवर त्या घराची अख्खी जबाबदारी पडते. युक्रेन, गाझा, इराण, जेरुसलेम इथल्या हल्ल्यांत आपण हे आता अनुभवत आहोत.
१९४२ च्या उठावानंतर ब्रिटिशविरोधी संघर्षाला तेज चढलं. अटकसत्र जोरात सुरु झालं. पंडित पति-पत्नी दोघंही तुरुंगात गेली. तुरुंगवासामुळे १९३२ सालापासूनच तब्येत ढासळत गेलेल्या रणजित पंडितांचा या वेळचा तुरुंगवास जीवावर बेतला. १९४३ साली बरेली तुरुंगात योग्य उपचाराविना त्यांचा मृत्यू झाला. विजयालक्ष्मी आणि पंडित कुटुंबावर हा मोठा आघात होता. आधी वडील आणि आता नवरा दोघंही तुरुंगवासात तब्येत ढासळल्यानं गेले.
रणजित पंडितांच्या मृत्यूनं दुसरं एक संकट विजयालक्ष्मींवर आलं. त्यांना मुलगा नसल्यानं रणजित पंडितांच्या संपत्तीवर त्या किंवा मुली अधिकार सांगू शकल्या नाहीत. सासरच्यांनी स्वतःहून काही हिस्सा द्यायला नकार दिला. रणजित आणि विजयालक्ष्मी या दोघांचं संयुक्त खातंही दीरानं गोठवलं. मुलींनाही वारसा हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाची किती गरज होती, हे यावरुन लक्षात येतं. तसा कायदा त्यावेळी असता तर हा प्रसंग विजयालक्ष्मी आणि त्यांच्या मुलींवर आला नसता.
पती गेल्यावर विजयालक्ष्मींवर कामाचा बोजा आणखी वाढला. कलकत्त्याला दुष्काळात मदत करायला त्या गेल्या. तथापि, तेथून लगेचच गांधीजींनी त्यांना अमेरिकेला पाठवलं. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं यासाठी अमेरिकेचा दबाव यावा म्हणून अमेरिकेचं जनमत संघटित करणं, तिथल्या विविध घटकांशी संवाद करणं, परिषदांत बाजू मांडणं हे शिष्टाईचं काम विजयालक्ष्मींना अमेरिकेत जाऊन करायचं होतं. पण याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारनं त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेतला. अखेर काही खटपटींनंतर अमेरिकन लष्करी विमानानं विनापासपोर्ट त्या अमेरिकेला पोहोचल्या. खुद्द तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनीच ही मदत केली असं बोललं जातं.
संविधानसभेवर त्या निवडल्या गेल्या. पण तिथं फार काही त्या करु शकल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्याच्या, शिष्टाई करण्याच्या जबाबदाऱ्या विजयालक्ष्मींवर येत गेल्यानं त्यांना बराच काळ परदेशी राहावं लागे. मॉस्को, मेक्सिको आणि वॉशिंग्टन येथे राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. एक वर्षानंतर त्यांनी एकाच वेळी इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये राजदूत म्हणून काम केलं.
विजयालक्ष्मी भारतात परतल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९६४ ते १९६८ पर्यंत त्या लोकसभेत खासदार राहिल्या. त्यानंतर सक्रिय राजकारणातून त्या निवृत्त झाल्या. मात्र जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली त्यावेळी त्यांनी उघडपणे आपली भाची इंदिरा गांधी यांच्या विरोधात भूमिका घेतली.
१ डिसेंबर १९९० रोजी डेहराडून येथे त्यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आणीबाणीच्यावेळी विरोधकांना तुरुंगात टाकणं, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं याबद्दल एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या – ‘असहमती प्रकट करण्याच्या अधिकाराशिवाय लोकशाही टिकू शकत नाही.’ किमान एवढ्याचा आग्रह सार्वजनिक जीवनात आपण धरणं ही विजयालक्ष्मी पंडितांना उचित आदरांजली ठरेल.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा शेवटचा सोळावा भाग ११ मार्च २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.