27 मे 2009
प्रिय मिलिंद,
25 मे 2009 च्या लोकसत्तेतील ‘अडवाणींचा वारसा...’ या तुझ्या लेखातील ‘समूहवाद’ या संज्ञेविषयी, संकल्पनेविषयी माझे मत विचारले आहेस. मी विचार करतो आहे. निष्कर्षाला मी अजून आलेलो नाही. विचारांची प्रक्रिया सुरु असतानाच हे लिहितो आहे. हे काहीसे प्रकट चिंतन...loud thinking….
लेख वाचत असताना दोन लोक माझ्या डोळ्यांसमोर तरळत होते. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरी ‘The Fountainhead’ ची लेखिका Ayn Rand. या दोन्ही व्यक्ती माणसाला ‘व्यक्ती’ म्हणून परमोच्च स्थान देत होत्या. या दोन्ही व्यक्ती ‘साम्यवादा’च्या कठोर टीकाकार होत्या. याचा अर्थ, भांडवलशाहीच्या निर्दयी नफेखोरीच्या बाजूच्या होत्या, असे अजिबात नाही. त्यांचा ‘व्यक्ती’च्या बाजूने असलेला पक्षपात मानवाच्या ‘व्यक्तित्वा’चा अत्युच्च सन्मान व विकास अपेक्षित होता. त्यात निर्दयी स्पर्धेचा लवलेशही नव्हता, उलट या स्पर्धेला त्यांचा ठाम विरोधच होता.
आंबेडकर व Ayn Rand यांचे साधर्म्य इथेच संपते. Ayn Rand ‘व्यक्तिवादा’ची (indivisualism) पुरस्कर्ती होती. तर डॉ. आंबेडकर ‘व्यक्तिस्वातंत्र्या’च्या बाजूचे होते. Ayn Rand च्या संदर्भातील खालील अवतरण तिचे म्हणणे स्पष्ट करण्यास पुरेसे आहेः
‘
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात म्हणतातः ‘माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि Ayn Rand या दोहोंचा असलेला ‘कम्युनिझम’ला विरोध खरे म्हणजे त्यावेळच्या ‘कम्युनिस्टांना’, त्यांच्या व्यवहाराला (तो व्यवहार अपरिहार्य होता का, ही एक स्वतंत्र चर्चा आहे.) मुख्यतः विरोध होता, असे मला वाटते. याचा अर्थ, कम्युनिझमला त्यांचा सैद्धांतिक विरोध नव्हता, असे मला म्हणायचे नाही. माझ्या अंगावर जे कम्युनिझमच्या संस्कारांचे दोन-चार शिंतोडे उडाले, त्यात ‘व्यक्ती’चे माहात्म्य कमी लेखल्याचे मला जाणवले नाही. उलट बाबासाहेबांच्या बुद्धधम्माच्या आकलनातील ‘माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते’ हाच माझ्यावरील कम्युनिझचा छाप होता, आहे. माणूस (व्यक्ती), माणसाचे माणसाशी असलेले नाते (समूह), या जगातील (इहवाद) या तिन्ही संज्ञांची संयुक्तता बाबासाहेबांना महत्वाची वाटते. मार्क्सला याविषयी काही आपत्ती होती, असे मला वाटत नाही. ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे उत्पादनसंबंधांच्या पायावरील मानवी विकास तपासताना व्यक्ती, समूह आणि इहवाद या तिन्हींची संयुक्तता अध्याहृतच आहे.
मला शाळेत शिकलेली कवी नीरजांच्या एका कवितेतील ही ओळ आठवतेः ‘फूल होता है पहले बाग का, बाद में डाली का.’
चेंबूरच्या झोपडपट्टीत जिथे मी जन्मापासून 30 वर्षे होतो, तिथे आम्ही विद्यार्थ्यांनी शाळेत असतानाच ‘प्रागतिक विद्यार्थी संघ’ नावाची एक संस्था स्थापली होती. आपल्या भोवतालचा अंधार दूर व्हायचा असेल, तर आपणच प्रकाशित व्हायला हवे, या अर्थाचे बुद्धाचे वचन ‘अत्त दीप भव’ (स्वयंप्रकाशित व्हा) हे आमचे प्रेरक विधान होते. आणि हे स्वयंप्रकाशित्व साधण्याचा मार्ग म्हणून कवी नीरजांची वरील ओळ आमचा आधार होता. आमच्या कोणाच्याच घरात वीज नव्हती, कोणी घरात शिकलेले नव्हते. अशावेळी बुद्धविहारात एकत्र बसून अभ्यास करणे, तो करताना ज्याला ज्या विषयात गती आहे, त्याने त्यात गती नसणा-यांना मदत करणे, आपल्याहून लहान मुलांचे वर्ग घेणे आणि त्याचबरोबर स्त्री-पुरुष समतेच्या प्रचारात, अंधश्रद्धाविरोधी उपक्रमांत, वैचारिक उद्बोधनांत, दलित चळवळीच्या संघर्षांत सक्रीय भागिदारी करणे हे एकसमयावच्छेकरुन चालायचे. आधी अभ्यास करुन स्वतःच्या पायावर उभे राहू व मग सामाजिक काम करु, हे आमच्या मनाला शिवतही नव्हते. स्वविकास व समूहविकास यांत तेढ नव्हे, उलट अपरिहार्य परस्परपूरकताच होती. आमच्या व्यक्तित्वविकासाचा सामूहिकत्व हा आधार होता. ती समूहाची बाग नसती तर आमच्या व्यक्तित्वाची फुले फुललीच नसती.
आक्षेप समूहाने व्यक्तीला जखडणे, त्याच्या फुलण्यावर लगाम घालणे याला असू शकतो. बाग फुलांच्या उमलण्याला, विकासाला अवकाश व संरक्षण देण्यासाठीच असते. उमलणे-विकसणे याची व्याख्या ठरवणे, बागेच्या सौंदर्याच्या संकल्पनेत हे फुलणे-विकसणे मर्यादित करणे, विशिष्ट छाप लादणे हे होऊ शकते. पण ती ‘बाग’ या गोष्टीची स्वाभाविक अपरिहार्यता नाही. ‘बाग’ केवळ आपल्या हितासाठी लुटू पाहणा-यांचे हितसंबंध आणि बागेतील अन्य घटकांचे अनवधान, अज्ञान, तडजोड, धारणा व विकासक्रम यातून हे ‘लादणे’ अथवा ‘प्रभुत्व’ संपादणे होते.
मानवी विकास ही सामूहिक, परस्परजीवी, परस्पर परिणामकारी अशीच प्रक्रिया आहे. आजच्या अर्थाने व्यक्तिवाद किंवा व्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पना फार पुढे जन्माला आली. टोळी, सरंजामी अवस्थेत समूह हाच केंद्रस्थानी दिसतो. लांडग्याची शिकार करताना स्वतःच शिकार झालेल्या टोळीतील सदस्याला तो अखेर मरणार आहे, हे लक्षात येताच तिथेच तडफडत सोडून आपल्या गुहेत परतणारी टोळी ‘निर्दयी’ म्हणायची की खाजगी संपत्ती नसलेली साम्यवादाची उच्च अवस्था मानायची? ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही व्यक्तित्व लोपविणारी स्वामिनिष्ठा सरंजामशाहीचे उन्नत मूल्य मानायचे तर याच सरंजामशाहीत जातिव्यवस्थेसारख्या मानव्याला काळीमा फासणा-या निर्घृण पद्धतीचा विकास झाला. भांडवलशाहीत व्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पना पुढे आली. ती मानवी विकासाच्या प्रवासात अव्वल, कदाचित सर्वोच्चही आहे. पण त्याचवेळी ‘खुद का देख’ या वेळ आल्यास पिलाला पायाखाली घेण्याच्या वृत्तीलाही अवसर प्राप्त झाला. ‘भांडवलशाही ही कवटीतून अमृत आणणारी राक्षसी आहे’ हे त्या अर्थानेच मार्क्सने म्हटले आहे. समाजाचा भौतिक विकास टीपेला नेणारी, लोकशाहीचा पुकारा करणारी ही अवस्था माणूस, माणसाचे माणसाशी असलेले नाते या सर्वांना ‘कमोडीटी’चा संदर्भ देते. मानवी विकासाची प्रत्येक अवस्था ही आधीच्या अवस्थेपेक्षा समाजाला पुढे नेणारी या अर्थाने पुरोगामी होती. आजची भांडवलशाही त्या अर्थाने पुरोगामी आहे. भांडवली लोकशाही विकासाची पूर्तता करुन समाजविकासाची पुढची अवस्था (आमच्या म्हणजे डाव्या विचारांच्या लोकांच्या मते समाजवादाची) आल्यावर कमोडीटीवाले नाही, तर खरेखुरे मानवी ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ आणि त्याला जपणारा, जोपासणारा, फुलविणारा ‘समूह’ जन्मास येईल. ज्यांना मार्क्सवाद मान्य नाही, अशारीतीने मानवी विकासाचा क्रम मंजूर नाही, तथापि, जे मानवतावादी जरुर आहेत, त्यांनाही अशी अवस्था हवीशी वाटतेच. त्यांच्या मनात व्यक्ती व समूह हे द्वैत असण्याचे कारण नाही.
तुझा लेख वाचताना हे सगळे माझ्या मनात तरळून गेले. याचा अर्थ, वर मी जी बाजू मांडली तिच्या विरुद्ध तुझी बाजू आहे, असे मी म्हणत नाही. मात्र जसे हे सर्व माझ्या मनात आले, तसे माझ्यासारख्या अनेक वाचकांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात ‘‘व्यक्तिवाद’ विरुद्ध ‘समूहवाद’’ हा तुझा वाक्प्रयोग वाचून येऊ शकते.
आता तुझ्या मांडणीविषयी.
डॉ. बाबासाहेब व्यक्तीच्या अधिकाराचे संरक्षण भारतीय घटनेत होण्याच्या दृष्टीने घारीच्या नजरेने दक्ष होते. शहाबानोसंदर्भातील कोर्टाचा निकाल हा लोकशाहीचा आत्मा असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने दिलेला निर्णय होता, हे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तथापि, त्याच्याविरोधात उभे राहिलेले हे केवळ समूहवादी असे म्हटल्यास ते वर्णन नेमके होते, असे मला वाटत नाही. ज्यांनी विरोध केला ते धर्माचे ठेकेदार होते, राजकीय सत्तेसाठी धर्माचा वापर करणारी चलाख राजकारणी मंडळी होती आणि त्यांच्या प्रचाराला बळी पडणारी समाजातील मागासलेपणा, अज्ञान व धर्मविषयक चुकीच्या धारणांना बळी पडलेली मुस्लिम जनता होती. ‘समूह’ म्हटल्याने हे सर्व व्यक्त होते, असे मला वाटत नाही. व्यक्ती व व्यक्तीच्या विकासाला पोषक राहणा-या समूहाच्या प्रगतीला आपल्या स्वार्थी, संकुचित हितासाठी अवरुद्ध करणारा त्याच समूहातील हा एक गट, वर्ग होता. या समूहांतर्गत एका प्रतिगामी गटाने शहाबानो निर्णयाला विरोध केला.
घटनादुरुस्तीचा राजीव गांधींनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी होता, हे तुझे म्हणणे बरोबरच आहे. राजीव गांधी काही प्रतिगामी नव्हते. तत्कालीन राजकीय महानाट्याच्या अनेक सूत्रधारांशी चार हात करतानाचे ते एक डावपेचात्मक पाऊल होते. पुढे जाताना समाजमनातील अनेक दुर्बल दुवे केवळ कायद्याने नष्ट होत नाहीत, ते हळुवार हाताळावे लागतात. अशा पार्श्वभूमीवरची ती कृती होती. पण ती निर्विवादपणे चूकच झाली. या चुकीने मुस्लिम आणि हिंदू मूलतत्त्ववाद्यांना इंधनच मिळाले.
भाजपचा घटनादुरुस्तीला असलेला विरोध हा कम्युनिस्टांहून किंवा आरिफ खान यांच्याहून मूलगामीपणे वेगळा होता, हे ही बरोबरच आहे. अडवाणींनी मुस्लिम स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची बाजू घेण्याऐवजी या लढाईचे रुपांतर मोठ्या धूर्तपणे ‘समूह’ विरुद्ध ‘समूह’ असे केले. हे ही अगदी खरे. कारण त्यांना मुस्लिम काय, हिंदू स्त्रियांच्याही व्यक्तिस्वातंत्र्याशी देणेघेणे नव्हते. इथे, अडवाणी हे हिंदू समूहाच्या प्रगतीला आपल्या स्वार्थी, संकुचित हितासाठी अवरुद्ध करणा-या त्याच समूहातील एका गटाचे, वर्गाचे प्रतिनिधी होते. हिंदू धर्मातील ठेकेदार, राजकीय सत्तेसाठी धर्माचा वापर करणा-या चलाख राजकारणी मंडळींचे अध्वर्यू होते. त्यांच्या प्रचाराला बळी पडणारी समाजातील मागासलेपणा, अज्ञान व धर्मविषयक चुकीच्या धारणांना बळी पडलेली हिंदू जनता होतीच. तिच्यावर व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा मुस्लिम अनुनय हेच बिंबवले गेले. अशा धर्मभावना, अस्मितांनी समाजाला लगेच झिंग येते, हा वारंवार येणारा अनुभव आहे.
पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर स्तुतिसुमने उधळणारे अडवाणी हे ‘व्यक्तिवादी’ वगैरे अजिबात नाहीत. त्यांना भारताचे पंतप्रधान होण्यासाठी मुस्लिम समाजात, जगतात आणि भारतातील सेक्युलर विचारवंतांच्या मनात आपल्या ‘सेक्युलर’ प्रतिमेचा आभास तयार करावयाचा होता. अशी प्रतिमा आपल्या हिंदू समाजातील आधाराला डळमळीत करेल, असे वाटणा-या तसेच अडवाणी पंतप्रधान होण्याला विरोध असणा-या भाजप तसेच संघातील त्यांच्या विरोधकांनी अडवाणींचा हा आभासी ‘सेक्युलर’ फुगा फोडला. आताचे लोकसभेचे निकाल पाहता, तू म्हणतोस तसा अडवाणींना काव्यगत न्याय जरुर मिळाला.
लोकसभेच्या स्थिर सरकारच्या जनतेच्या कौलानंतर सेक्युलॅरिझम आपसूकच प्रस्थापित होईल, असे नाही. संघटित मूलतत्त्ववादी टोळ्या संपलेल्या नाहीत. फार तर काही काळ त्या भूमिगत राहतील. संधीची वाट पाहतील आणि नंतर कदाचित अधिक भीषण कारवाया करतील. ‘सेक्युलॅरिझम’ च्या मागे या टोळ्यांहून अधिक चिवट अशी संघटित ताकद उभी करावी लागेल. केवळ सद्भावनेने चालणार नाही. भारतीय जनतेत ही सद्भावना व्यापक प्रमाणात आहेच. पण ती संघटित नाही.
अडवाणींनी पुरस्कारलेला, प्रचारलेला व संघटित केलेला हा मूलतत्त्वादाचा वारसा पुढेही प्रभाव गाजवत राहणारच आहे. या वारशाला ‘समूहवाद’ म्हटल्याने ‘मूलतत्त्ववादी झुंडशाही’ हा त्याचा गाभा व्यक्त होत नाही.
‘व्यक्तिवाद’ विरुद्ध ‘समूहवाद’ अशा मांडणीतून तू लेखात वर्णिलेला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी राजकारण-समाजकारणाचा संघर्ष स्पष्टपणे व्यक्त होतो, असे मला वाटत नाही.
Ayn Rand प्रमाणे एकूण वैश्विकरीत्या ‘व्यक्ती’ व ‘समूह’ यांची मांडणी तुला करावयाची असल्यास निराळे. मग त्या मांडणीच्या विवेचनातील संदर्भ, उदाहरणेही वैश्विक राहतील.
कदाचित, याहूनही काही वेगळे तुला मांडावयाचे असल्यास तशा लेखाची अथवा लेखमालेची अपेक्षा.
व्यक्ती, समूह या संकल्पनांचा विचार करण्यास चालना दिल्याबद्दल तुला मनःपूर्वक धन्यवाद.
- सुरेश सावंत