फडकत आम्ही उभे ठेविले
फडकत आम्ही उभे ठेविले, लाल निशाण हे लाल निशाण || धृ ||
कुणी म्हणाले, हे एकांडे
ही तर पोरे आताची
कशी प्रतिष्ठा लाभे यांना
आंतरराष्ट्रीय कीर्तीची
कष्टक-यांना निष्ठा देणे हेच आमुचे शक्तिस्थान || 1 ||
खुशाल वाटो मठ हा कोणा
संघटनेचे बळ पसरे
कष्टक-यांची नवीन शक्ती
महाराष्ट्री ती या विचरे
प्रतिगाम्यांना या राष्ट्राच्या होईल आता हे आव्हान || 2 ||
तत्त्वनिष्ठता आम्ही राखिली
शर्थ करुनी धीराने
जे जे ठावे आम्हास झाले
जनास ते ते शिकविणे
पदोपदी जनसंघटनेचा कृतीत आणला मंत्र महान || 3 ||
दिव्यसंगरी वर्गलढ्याच्या
लेनिनवादी दृष्टीचे
रहस्य उमजो दारिद्र्याचे
तसेच त्याच्या नाशाचे
कामगार हा नेता व्हावा होऊनी त्याला वर्गज्ञान || 4 ||
वर्गलढ्याचे अखेरचे ते
भारत अजूनी घडायचे
कौरव किंवा पांडव यास्तव
नाही आता लढायचे
एकलव्य चिरवंचित घेई राज्य स्थापण्या धनुष्यबाण || 5 ||
- कॉ. सुमन कात्रे
No comments:
Post a Comment