Thursday, February 19, 2015

आपचा विजय केवळ बिजली-पानी-भ्रष्टाचार यामुळे...?

आपचा विजय अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण व आश्वासक आहे, हे निश्चित. तथापि, आपच्या दिल्ली विजयाची वैशिष्ट्ये नोंदवताना जात-धर्माला थारा न देता बिजली-सडक-पानी हेच जनतेने महत्वाचे मानले, असे एक मत मांडले जाते. हे संपूर्ण खरे नाही. एकूण गोरगरीब जनतेच्या या प्रश्नांना आपच्या गेल्या काही वर्षांतील दिल्लीच्या रस्त्यांवरील धुमश्चक्रीत आवाज मिळाला, हे खरे. मध्यमवर्गाला भ्रष्टाचारमुक्त दिल्ली, सुरक्षितता यासाठी लढणारा आप त्याच्या प्रामाणिकतेमुळे व नव्या धडाडीच्या नेतृत्वामुळे जवळचा वाटला, हेही खरे. मोदींच्या लोकसभेतील यशाच्या वेळी हिंदुत्ववादी मांडणीऐवजी विकासाचा मूड प्रभावी होता. हा मूडही आपला उपयोगी ठरला. याच्या परिणामी, मायावतींना मानणारा दलित व भाजपकडे स्वाभाविकपणे कल असलेला हिंदू मध्यमवर्गीय बहुसंख्येने आपच्या बाजूने उभा राहिला. इथवर बरोबर आहे.

तथापि, मुस्लिम व शिखांचे भरघोस मतदान आपला होण्यात केवळ बिजली-सडक..नाही. काँग्रेसचे विविध कारणांनी क्षीण झालेले अस्तित्व व त्यामुळे तयार झालेली ढोबळ सर्वसमावेशक ‘लोकवादी’ राजकारणाची पोकळी आपला काँग्रेसने जणू आंदण दिली. काँग्रेसच्या पारंपरिक दलित, मुस्लिम मतदारांना दुसरा भक्कम पर्याय हवा होता. ८४ च्या दंगलीत भरडलेले शिख काँग्रेसवर आधीच नाराज; त्यात भाजप व आपने त्याला गेला काही काळ भरपूर इंधन देऊन ती वाढवली होती. काँग्रेसवरची शिखांची ही नाराजी मागच्या निवडणुकांत भाजपला मदतनीस ठरली होती. यावेळी मात्र शिखांनी भाजपला दूर सारले व आपचा स्वीकार केला. मतदानाची काही आकडेवारी पाहू.

दिल्लीच्या लोकसंख्येत १२ टक्के मुस्लिम. त्यातल्या ७७ टक्क्यांनी आपला मतदान केले. शिख दिल्लीच्या लोकसंख्येत ४ टक्के. त्यातल्या ५७ टक्क्यांनी आपला मते टाकली. गेल्या वेळी ६८ टक्के शिखांनी भाजपला मतदान केले होते. यावेळी ते ३४ टक्के आहे.

मोदींच्या राज्यारोहणानंतर हिंदुत्ववादी संघटनांना जे बळ मिळाले व घर वापसी इ. जे चाळे सुरू झाले, त्याची धास्ती मुस्लिम आणि शिखांनीही घेतली व त्यांनी आपला भरघोस पाठिंबा दिला.

त्यामुळे केवळ बिजली-पानीचा हा विजय आहे, एवढंच मापन करणे व देशात आता हेच वातावरण असणार आहे, असा निष्कर्ष काढणे घाईचे होईल.

- सुरेश सावंत

No comments: