Friday, February 20, 2015

मोदींच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या निवेदनाचे स्वागत जरुर; पण सावध

ख्रिस्ती संमेलनात बोलताना आपण कोणालाही धार्मिक अतिरेक करू देणार नाही तसेच देशातील जनतेस धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपल्याला हव्या त्या धर्माचे अनुसरण करण्याची मुभा देशातील नागरिकांना पूर्णपणे आहे, असे मोदींनी निःसंदिग्ध विधान केले. भारतीय संविधान व आपल्या राजकीय परंपरेला हे धरुनच असले, तरीही मोदींचे सहोदर असलेल्या हिंदुत्ववादी मंडळींनी अलिकडे जी मुक्ताफळे उधळली वा कारवाया केल्या त्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे सुस्पष्ट निवेदन महत्वाचे आहे. स्वागतार्ह आहे.
तथापि, यावरुन मोदी वेगळे व ही कारवायाखोर मंडळी वेगळी, त्यांच्याशी मोदींचा काहीही संबंध नाही, एकेकाळी असतील ते संघाचे प्रचारक, आता ते देशाचे पंतप्रधान आहेत अशी समजूत करुन घेणे धोक्याचे ठरेल. पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार करताना मी काय पथ्ये पाळणार आहे, याची त्यांनी जाहीर ग्वाही दिली, एवढ्याचसाठी हे स्वागत.
मग शंका काय आहे?
शंका ही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचा परिवार-ज्याला संघपरिवार म्हटले जाते तो झोटिंग आहे. झोटिंग हे रुप बदलणारं भूत. ते एकदा घरवापसी जोरदार पुकारणार, दुसरीकडे इथे सर्व धर्म समान आहेत, त्यांना त्यांच्या प्रचार-प्रसाराचे स्वातंत्र्य आहे, असेही म्हणणार. ४ मुलांना जन्म देण्याचे आवाहन एका बाजूला, तर अशी मुले जन्माला घालणारी स्त्री ही काय मशीन आहे, असे फटकारणे दुसऱ्या बाजूला. पलट्या मारत राहणे हे संघपरिवाराचे वैशिष्ट्य. या पलट्या मूळ उद्देशाच्या दिशेने जाण्यासाठीचे डावपेच, तडजोडी असतात, हे लक्षात घ्यायला हवे. तर, अशा या संघाचे मोदी पूर्णवेळ कार्यकर्ते, प्रचारक होते. आजही आहेत. जीवन त्यासाठीच त्यांनी वाहिलेले आहे. पंतप्रधान ही त्यांची निराळी जबाबदारी नाही. तर संघाच्या उद्दिष्टपूर्तीच्या मोहिमेचा एक भाग आहे. भारताचे संविधान, समाजाचे सद्य स्वरुप व परंपरा, आंतरराष्ट्रीय वातावरण लक्षात घेता जमेल तितकी आपली कार्यक्रमपत्रिका रेटायची; कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष; असा त्यांचा म्हणजेच मोदींचा प्रयत्न राहणार.
अलिकडेच काही मुस्लिम धर्मगुरुंनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून संघाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सहा प्रश्न विचारले आहेत. भारत हे हिंदू राष्ट्र आहे असे संघाचे मत आहे का, भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघाने कोणता मसुदा तयार केला आहे का, हे हिंदू राष्ट्र हिंदू धर्मग्रंथांवर आधारित आहे का, की संघाने नवे तत्त्वज्ञान तयार केले आहे, धर्मांतराबाबत संघाला काय हवे आहे, संघाला मुस्लिमांकडून कोणत्या प्रकारचे राष्ट्रप्रेम हवे आहे आणि संघाचे इस्लामबाबत मत काय आहे, असे हे सहा प्रश्न आहेत. मुस्लिम धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाला लगेच उत्तरे देण्यास संघाच्या पदाधिकाऱ्याने नकार दिला व मुस्लिम संघटनांची परिषद घ्या, तिथे ही उत्तरे देऊ, असे सांगितले आहे.
लगेच उत्तरे देण्याइतपत भूमिका व अभिव्यक्ती यांत तार्किक सुसंगती ठेवण्यात संघाने कधीच सचोटी दाखवलेली नाही. ती भोवतालच्या संदर्भानुसार चलाखीची राहिलेली आहे. वरील प्रश्नांची उत्तरे संघ देईलही. या नव्या संदर्भात रचलेल्या उत्तरांत आपण अनेक कोलांट्या, पलट्या पाहू शकू.
म्हणूनच, संघस्वयंसेवक, संघप्रचारक पंतप्रधान मोदींच्या वरील निवेदनाचे स्वागत जरुर हवे; पण ते संघचारित्र्याच्या या पार्श्वभूमीवर सावध हवे.
- सुरेश सावंत

No comments: