Thursday, February 26, 2015

कॉ. पानसरेंच्या हत्येनंतर भाऊ तोरसेकर यांनी पुरोगाम्यांवर केलेली टीका, त्यामुळे व्यथित झालेल्या मैत्रिणीच्या भावना व माझे तिला पत्र

भाऊ तोरसेकरांची टीकाः

पोर लाडावलेले असले, मग त्याला वेळीच वठणीवर आणावे लागते. अन्यथा असे पोर शेफ़ारत जाते आणि अतिरेक करू लागते. आपल्यालडे पुरोगामीत्व किंवा सेक्युलर नावाचे पोर असेच दिवसेदिवस खुप शेफ़ारले आहे. ते ओळखण्याची अक्कल स्वत:ला बुद्धीमंत मानणार्‍यांना नसली, तरी सामान्य जनतेला पुरेशी आहे. म्हणूनच कुठल्याही शेफ़ारत जाणार्‍या पोराला वेळीच वठणीवर आणायचे कौशल्य आजवर सामान्य बुद्धीच्या भारतीयांनी दाखवले आहे. अलिकडेच दिल्लीच्या निकालातून त्या जनतेने भाजपाच्या शेफ़ारत चाललेल्या मस्तवालपणाला वठणीवर आणले. पण ते भाजपाचे पोर तरी कशामुळे शेफ़ारले होते? आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भाजपावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे? ती नैतिक ताकद पुरोगामीत्वाचे उपरणे पांघरून निषेधाची होमहवने करण्यात गर्क असलेल्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे आठ महिन्यात भाजपाला दिल्लीतल्या जनतेने त्याची औकात दाखवून दिली. याचा अर्थ आता भाजपा वा मोदींचा शेवट सुरू झाला, असल्या धुंदीत पुन्हा तथाकथित सेक्युलर पुरोगामी शेफ़ारल्यासारखे वागू लागले तर नवल नाही. आजकालच्या पुरोगाम्यांची अवस्था तर आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशीच असते.

अशा एकूण धुंदीतल्या पुरोगाम्यांना पुन्हा शेफ़ारून जायला नुसती संधीच हवी होती. दिल्लीने तो मोका दिला आणि कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने तर हे लाडावलेले पोर पुन्हा शेफ़ारल्यागत भरकटू लागले. अजून कुठला पुरावा हाती नाही की तपासाला दिशाही मिळालेली नाही, अशा स्थितीत बेलगाम आरोपांची बरसात सुरू झाली. जगातल्या कुठल्याही दुर्घटनेला हिंदूत्ववादी वा हिंदू संघटनाच जबाबदार असतात, असा त्यांचा एक आवडता सिद्धांत आहे. त्यामुळे मग विनाविलंब कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे खापर हिंदू संघटनावर फ़ोडण्याची स्पर्धाच सुरू झाली. इथपर्यंतही ठिक म्हणता येईल. कुठेही असे बेछूट आरोप आपल्या प्रतिस्पर्ध्यावर होतच असतात. पण त्यासाठी थेट नथूरामपर्यंत जाणे आणि आपण कसे अहिंसेचे पुजक असल्याचा आव आणणे; म्हणजे डोक्यावरून पाणी झाले. ज्यांच्या अशा वल्गना चालू आहेत, त्यांना त्यांचीच वंशावळ मग सांगणे भाग होते. पण दुर्दैवाने स्वत:ला जाणकार व विश्लेषक म्हणवून घेणारी मोठमोठी तोंडे अशावेळी मुग गिळून गप्प बसतात, हाच आजवरचा अनुभव आहे. मग ते काम कोणी तरी करायला हवे ना? आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे? की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात? नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना? जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल? गेल्या काही वर्षात केरळमध्ये डझनावारी हत्या कोणाच्या झाल्या व कोणी केल्या?

आपल्या विचारांशी व भूमिकेशी सहमत नसतील त्यांना खुन पाडून संपवायची लढाई कम्युनिस्टांनी गेल्या शतकात जगभर अंमलात आणलेली आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद नव्हता. त्यामुळे जो कोणी कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे गोडवे गातो, त्याने उगाच विचारांचा संघर्ष विचारांनीच करायवी मानभावी भाषा करण्यात अर्थ नाही. मजेची गोष्ट म्हणजे असे आज कोणी म्हटले, मग तमाम पुरोगामी एकाच बापाचे वारस असल्यासारखे अंगावर येतात. पण वास्तवात ते एकाच पित्याची संतान नाहीत आणि कालपरवा त्यांचेच पुर्वज एकमेकांवर असेच अरोप करत होते. दाभोळकरांनी ज्यांचा वारसा चालविला, ते एस एम जोशी, नानासाहेब गोरे किंवा बॅरिस्टर नाथ पै यांनी अर्धशतकापुर्वी कोणाकडे खुनी व रक्तपिपासू म्हणून बोटे दाखवली होती? त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी? नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते? त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता? छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्वयंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते? तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता? वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय? केरळात एका मार्क्सवादी नेत्याने विरोधकांना ठार मारण्याचा जो ‘विचार’ मांडला, त्याचे चित्रणही प्रसिद्ध आहे. त्याचा निषेध यापैकी कितीजणांनी केला होता?

संवेदनाशील असणे म्हणजे काय असते बुवा? चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय? त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो? ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात? आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती? नथूरामच्या नामजपाची जपमाळ अहोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही? त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही? इतिहासाचा तो कोळसा उगाळण्याची इच्छा नव्हती. पण शेफ़ारलेल्यांना शुद्धीवर आणण्यासाठी तोच कोळसा उगाळणे भाग आहे. मोठ्या तोंडांची दातखिळी बसली असेल, तर लहान तोंडी मोठा घास घेणेही भाग आहे.

मैत्रिणीच्या भावनाः

सुरेश, ह्याला कोणी उत्तर देईल काय? असे बोलणारे कोणी आले की मी गडबडते. ...काय करायचं ह्याचं?

माझे तिला पत्रः

असल्या युक्तिवादाने, विशेषतः ऐतिहासिक संदर्भांच्या दाव्यांनी काही क्षण गडबडून जायला होणे स्वाभाविक आहे. त्याचे एक कारण हे ऐतिहासिक संदर्भ व तत्कालीन परिस्थितीचे सूक्ष्म तपशील आपल्याला ठाऊक नसतात. दुसरे कारण आपण ज्या गृहितकावर प्रतिक्रिया दिली, ते गृहितक खोटे तर नाही ना, असा आपल्या मनात उमटणारा प्रश्न. अशी प्रतिक्रिया द्यायला आपण खरे म्हणजे घाई करायला नको होती, असे एका बाजूने मन खात राहते. दुसऱ्या बाजूने आपले म्हणणे खरेच आहे, हे सिद्ध करणारे मजबूत पुरावे आपल्याला मिळावेत, विरोधकाच्या युक्तिवादाला पराभूत करणारा युक्तिवाद आपण किंवा आपल्या बाजूच्यांनी करायला हवा, त्यांची बोलती बंद करावी, असे वाटत असते.

हे सर्व स्वाभाविक आहे. असे ऐतिहासिक तपशील, संदर्भ आपल्यातील जाणकारांनी शोधून विरोधकांना उत्तर नक्की द्यायला हवे. हे आवश्यकच आहे. पण अशा उत्तरानंतर विरोधक आणखी काही संदर्भ देतात. मग त्याला आणखी प्रत्युत्तरे द्यावी लागतात. हेही करायलाच हवे. आपल्यात असे करणारी अभ्यासकांची एक फळी निश्चित हवी. तशी ती आपल्यात नाही, असे नाही. तथापि, ती वेळच्यावेळी ही उत्तरे देण्याइतपत सावध व तत्पर नाही. आपण संघटित व परस्परपूरक नाही, ही आपली मोठी उणीव आहे.

मुद्दा असा आहे, असा युक्तिवाद परतवून लावेपर्यंत आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींनी काय करायचे? ज्यांच्यात अशा अभ्यासाची कुवत नाही किंवा सवड नाही किंवा अन्य प्राधान्याच्या कामात व्यग्र आहेत, अशांनी मग असहाय, निरुत्तर होऊन गप्प राहायचे का? आपले चुकले तर काय घ्या, लोक आपल्याला काय म्हणतील म्हणून माघार घ्यायची का?

आपण असे करावे, हाच तर असा युक्तिवाद करणाऱ्यांचा खरा हेतू असतो.

मग आपण काय करावे?

आपण सत्य, सुंदर, मंगलाची आराधना नित्य करायला हवी. हे जग मानव्यपूर्ण व्हावे, सकलांचे कल्याण होवो (यात विरोधकांचेही कल्याण अभिप्रेत आहे) यासाठीची करुणा व कामना आपल्या मनात हवी. थोडक्यात, बुद्द, ख्रिस्त किंवा संतांनी ज्या मानवतेची शिकवण दिली, ती आपल्यात हवी. यासाठी कोणत्याही ऐतिहासिक संदर्भांची जरुरी नाही.

कोणावरही अन्याय, अत्याचार होत असेल, तर त्याने आपण कळवळून जायला हवे. त्याच्या प्रतिकारासाठी, प्रतिबंधासाठी उभे राहायला हवे. यासाठीही अभ्यासाची गरज नाही.

दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येच्या विरोधात पहिली प्रतिक्रिया तीच हवी. मग दुसरी प्रतिक्रिया येते ती अधिक समजाने. अशा हत्या वैयक्तिक हेवेदाव्यांमुळे होऊ शकतात की नाही? होऊ शकतात. पण या दोहोंच्या बाबतीत हे संभवत नाही, कारण त्यांचे पूर्ण पारदर्शक चरित्र व त्यांचे जीवनध्येय. ज्यांनी समाज सुधारण्यासाठी जीवन वेचले, त्यांच्याबाबतीत हे त्यांचे कार्य ज्यांना मंजूर नाही, अशांनीच हे कृत्य केले असणार हा संशय, तर्क योग्यच ठरतो. इथे हा संशय वा तर्क संघपरिवारातील कट्टरपंथीयांबाबत व्यक्त होणे हे चूक नाही. नथुराम आमचा नाही, असे कितीही अंग झटकायचा प्रयत्न संघाने केला, तरी नथुराम हा त्यांच्याच शिकवणुकीतून तयार झाला होता व त्यांच्याच मिशनची गांधींजींना मारुन त्याने पूर्तता केली, हे उघड आहे. कायद्याने भले संघ खूनी ठरला नाही, पण खरा खूनी संघच आहे. कारण त्याने जी विषाक्त वातावरणनिर्मिती केली त्यात नथुराम घडला.

मग आपण पुढच्या अधिक समजाने म्हणतो, की नथुरामप्रवृत्तीच्या विरोधातील मंडळींनी एक व्हावे. नथुराम किंवा संघप्रवृत्ती म्हणजे ज्यांना संविधानाच्या प्रास्ताविकातील मूल्ये मूळातच मंजूर नाहीत, अशा प्रवृत्ती. या मूल्यांना सातत्याने प्रकट, अप्रकट, चलाखीने विरोध करणे हाच त्यांचा इतिहास राहिला आहे. संविधानाची शपथ घेऊन संसदीय राजकारण करतानाही त्यांच्या या कारवाया आपण आज पाहतो आहोत.

नथुरामप्रवृत्तीच्या विरोधातील शक्ती म्हणजे संविधानातील मूल्यांचे वारसदार. या मूल्यांची निर्मिती ज्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या संघर्षातून झाली त्या संघर्षात सहभागी लोक. यात लोकशाहीवादी, समाजवादी, गांधीवादी, फुले-आंबेडकरवादी, कम्युनिस्ट या प्रवाहांतील संघटना, व्यक्ती, पक्ष यांचा समावेश होतो.

ज्या अर्थी, हे प्रवाह वेगळे आहेत, त्या अर्थी, त्या प्रत्येकाचे इतरांहून काही निराळे मत आहे. संविधानातील मूल्ये हा सामायिक सहमतीचा धागा आहे. पण ही मूल्ये पुढे कशी न्यावीत, विकसित कशी करावीत, याविषयी त्यांच्या भूमिका व कार्यक्रम यात फरक आहे. यांचे आपसातील मतभेद आणि संघाशी असलेले मतभेद यांचे स्वरुप म्हणजे काळरेषेवरील शून्याच्या उणे बाजूला संघ तर धन बाजूला या संघटना असा आहे. त्या वेगवेगळ्या अंकांवर असतील, पण हे सगळे अंक धन आहेत.

धन बाजूंच्यात जो विरोध आहे, त्याचा आविष्कार हिंसकही झाला आहे. ही हिंसा समर्थनीय नक्कीच नाही. मतभेदांपोटी खूनाखूनी हे वाईटच आहे. पण हे त्यांचे अधिकृत धोरण नाही. उण्या बाजूकडच्यांना कोणतेही साधन वर्ज्य नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात कम्युनिस्टांच्या व्यवहारात विरोधकांशी व आपल्यातल्या भिन्न मतवाल्यांशी हिंसक व्यवहार झाला आहे. कामगार-कष्टकऱ्यांच्या समाजवादी राज्याच्या ध्येयासाठी वर्गशत्रूशी लढताना जी कमालीची सावधानता बाळगायला हवी, जी पोलादी शिस्त व संघटना हवी, त्या गरजेपोटी हा हिंसक व्यवहार झाला, असे समर्थन मी ऐकलेले होते. त्या परिस्थितीतले ताणे-बाणे तपशीलात मला ठाऊक नाहीत. पण असा व्यवहार व्हायला नको होता, असेच मला वाटते. तथापि, वंशप्रभुत्वाने झपाटलेल्या हिटलरची हिंसा आणि जग आपल्या साम्राज्यवादी पंखाखाली घेण्यासाठी चाल करत असलेल्या या हिटलरला रोखणाऱ्या स्टॅलिनची हिंसा मी ‘एकाच प्रतीची’ मानत नाही. औरंगजेबाला दाढी व शिवाजीलाही दाढी म्हणून दोघे एक असे आपण म्हणत नाही, तसेच हे.

अर्थात, याचे तपशील अभ्यासकांनी शोधल्यावर जे नवीन समजेल, त्याप्रमाणे आपल्या मतात यथोचित बदल करायलाच हवा. आपले ते सर्व समर्थनीय किंवा आपल्याची बाजू घेतलीच पाहिजे, अशा मनोभूमिकेने आपण स्वतःला संकुचित करणे म्हणजे चुकांतून शिकण्याची संधी गमावणे होय. वकिली युक्तिवादातून सत्याचा जय होतो, असा आपला अनुभव नाही. उपलब्ध पुरावे व वकिलाचे कौशल्य यास त्याचे श्रेय जाते. (उदाहरणादाखल थोडी स्वस्तुती करतो. लोकशाही श्रेष्ठ की हुकूमशाही श्रेष्ठ या शालेय जीवनातील वादविवाद स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याला विषय निवडण्याची संधी देऊन माझ्या वाट्याला आलेला विषय घेऊन मी स्पर्धा जिंकली आहे. त्याने लोकशाही निवडली. मी हुकूमशाहीचे समर्थन केले. माझ्या जिंकण्याने माझे वादविवाद कौशल्य श्रेष्ठ ठरले. माझे वैयक्तिक मत अर्थातच लोकशाहीच्या बाजूने होते. प्रतिस्पर्ध्याने हुकूमशाही निवडली असती, तर मी लोकशाही जिंकून दाखवली असती.) वकिली युक्तिवादाने विरोधकाला नामोहरम करणे, निरुत्तर करणे प्रसंगोपात करावे लागले, तरी तो सत्याकडे जाण्याचा मार्ग नव्हे, हे आपण स्वतःला पटवले पाहिजे. म्हणूनच, मला उद्या कोणी युक्तिवादाने निरुत्तर केले, तरी त्याने मला पराभूत वाटता कामा नये.

समोरच्यांविषयी जेव्हा ‘शेफारलेले’ सारखी विशेषणे, ‘वठणीवर’ आणण्याची भाषा वापरली जाते, तेव्हा एक आविर्भाव घेऊन, तुम्हाला खोटे पाडण्यासाठीच युक्तिवाद केला जातो, तेव्हा ती वस्तुनिष्ठ चिकित्सा नसते. दुसऱ्याला दुरुस्त करण्याची भूमिका नसते, तर त्याच्याविषयीचा द्वेष, संताप असतो. ते गरळ ओकले जाते; मात्र वकिली युक्तिवादाने, समोरच्याला बेसावध गाठून संदर्भांचे सुरे चालवून. या लढाईत युक्तिवादाने उतरावेच लागेल. पण त्याची मर्यादा आपल्याला स्पष्ट हवी. शिवाय समोरच्याविषयी घृणा न ठेवता, उद्या तोही बदलला पाहिजे, सगळी मानवजात सुखी झाली पाहिजे, या करुणेनेच ही लढाई लढायला हवी. याचा अर्थ टीकेची भाषा मवाळ असावी, असे मी म्हणत नाही. कठोर दंभस्फोट जरुर हवा. आवश्यक तो त्वेषही हवा. चीड, राग नसेल तर हल्ला जोरदार होत नाही, हे मला पटत नाही. डॉक्टर जेव्हा धनुर्वात झालेला पाय कापतात, तेव्हा त्यांच्या मनात रोग्याविषयी राग नसतो, उलट तो त्याचे उर्वरित अंग सुरक्षित राहावे, अशीच इच्छा असते. आपली सामाजिक लढाई या ऑपरेशनसारखी असायला हवी.

भाऊ तोरसेकरांची टीका द्वेषपूर्ण आहे. पुरोगाम्यांना ठोकण्यासाठी केलेली आहे. तिच्यात पुरोगामी चळवळ दुरुस्त करण्याची आस्था नाही. एवढेच नाही, तर दाभोलकर-पानसरेंच्या हत्येविषयी खेद-खंत-निषेध असे काही नाही. ‘कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने...’ अशा चालीच्या लेखनातून कॉ. पानसरेंच्या हत्येचे गांभीर्य ते कमी करतात, असे वाटते. इतरही विधाने त्यांची अशीच आहेत.

भारतातील कम्युनिस्टांनी बदलत्या परिस्थितीत संसदीय प्रणालीचा स्वीकार केला आहे. नक्षलवादी पद्धतीने जाणाऱ्या कम्युनिस्टांनी तो केलेला नाही. त्यांचे उद्दिष्ट कितीही उन्नत असले व त्यासाठी सर्वस्व त्यागून जीवन अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत मला वैयक्तिक पातळीवर कितीही कणव असली, तरी आजचा त्यांचा हिंसक व्यवहार मला निषिद्ध व डावपेचात्मकरीत्याही गैर वाटतो. त्यांना मी संविधान परिवारात धरत नाही.

ज्या टीकेतून माझे शिक्षण होत नाही, जी टीका केवळ उच्छेद करते, पुरोगामी छावणीतल्यांच्या मनात हेतुतः गोंधळ उडवते, विरोधकांना मदतनीस ठरते किंवा विरोधकांचा डावपेच म्हणूनच ती केली जाते, अशी टीका आपले मनोधैर्य ढासळवायला खरे म्हणजे पात्रच नाही. जरी काही चलबिचल झाली, तरी लगेच सावरावे. भोवतालच्या आपल्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी त्याबाबत काही विचारल्यास वर मांडलेली भूमिका प्रांजळपणे जमेल तेवढी सांगावी. बाकी येणाऱ्या काळावर व परिस्थितीवर सोडून द्यावे. टीका किंवा आपले समर्थन यामुळेच लोक बदलतात, असे नाही. आपल्या निरपेक्ष खूप गोष्टी घडत असतात. त्यांचा परिणाम लोकांवर होत असतो. शिवाय ‘मित्रांना समर्थनाची गरज नसते; तर विरोधकांना कितीही केले तरी समर्थन पटत नाही’ हे बोलही ध्यानी धरावे.

तोरसेकरांच्या टीकेतील मुद्द्यांवर लिहून आपल्यातला कोणीतरी तज्ज्ञ त्यातील यथार्थता अथवा वैयर्थता लवकरच स्पष्ट करेल, अशी आशा धरुया. त्यावेळी जे नवीन शिक्षण होईल त्याप्रमाणे व्यवहारात बदल करु. तूर्त, अशा स्पष्टतेअभावी बिचकून थांबण्याचे काहीच कारण नाही.

सदिच्छांसह,

सुरेश

No comments: