Monday, October 23, 2017

ती सध्या काय करते?


ती अलिकडेच निवृत्त झाली. बहुधा स्वेच्छानिवृत्ती असावी. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी असली तरी निवृत्तीचे वय झाले असावे असे वाटत नाही. असो. काहीही असो. ते तसे महत्वाचे नाही. मुद्दा हा की तिने मला निवृत्तीच्या निरोप समारंभाचा आमच्या एका सामायिक मित्राकरवी निरोप पाठवला होता. आश्चर्य वाटले. कारण गेल्या ३३ वर्षांत आमचा संपर्क नाही. एकमेकांना पाहिलेलेही नाही. कार्यक्रमाला गेलो नाही. त्या दिवशी एक काम होते. त्याचे कारण दिले. पण मला जायचे नव्हते, हा खरा मुद्दा होता. ज्या संबंधांना संपून एवढा प्रदीर्घ काळ लोटला त्यांच्या एखाद्या पापुद्र्यालाही-कोणत्याही निमित्ताने स्पर्श मला नको होता.

म्हणजे मी हे सहज घेऊ शकत नव्हतो. ती आजही माझ्या डोक्यात-मनात आहे, हे कबूल करतो. वास्तविक आमचा ओळखीपासून निरोपापर्यंतचा सगळा काळ जेमतेम दोन वर्षांचा. त्यातला आमच्या जवळ असण्याचा अगदीच अल्प. बाकी एकमेकांचा ‘संदर्भ’ असण्याचा. पण हा संदर्भ पिळवटणारा, घुसमटवणारा. या संदर्भाचा अवकाश उमलत्या वयातील दोन स्त्री-पुरुषांच्या भावना-आकांक्षांचा केवळ नव्हता. त्याला आर्थिक स्थिती व जात या कठोर वास्तवांचे कराल पहारे होते. पुढच्या एका टप्प्यावर हे पहारे भेदणारीही मला भेटली. पण परस्परांवर जीव ओवाळून टाकू पाहणाऱ्या अनेक उमलत्या फुलांचे गुलाबी निःश्वास गुदमरवून टाकणारी आर्थिक-जात वास्तवाची तटबंदी आजही मजबूत आहे. हा संदर्भ बहुधा तिला माझ्या मनातून विसर्जित होऊ देत नसण्याचे महत्वाचे कारण असावा.

ती मराठा. मी बौद्ध. ती इमारतीत राहणारी. मी झोपडपट्टीत. अर्थात, नेहमीप्रमाणे हे संदर्भ आमच्या जवळीकीच्या प्रारंभी आले नव्हते. ते दरम्यान आले. आमची मैत्री खूप चांगली. एकमेकांना आश्वस्त करणारी. जपणारी. ती तशीच राहिली असती तर आम्ही आजही उत्तम मित्र असतो. ती उत्तम गायची. अक्षर सुरेख. कॉलेजच्या स्नेसंमेलनातल्या तिच्या नृत्यांची तालीमही चुकवू नये इतकी मला ती भावायची. मित्रमंडळींबरोबर असतानाचे हास्यविनोद, थट्टामस्करी, फिरणे, आग्रहाने आपल्या डब्यातले खाऊ घालणे याची आजही असोशी वाटते. पण मैत्रीच्या पुढचे काही बंध तयार होऊ लागले आणि हे विस्कटले.

बंध तयार होण्याचा काळ अर्थातच मोहरण्याचा होता. स्वतःच्या तसेच इतरांच्या कवितांचे सूचक, थेट संदर्भ या बंधांची वाट प्रशस्त करत होते. मी या काळात डायरी लिहीत असे. ती गद्य असे. तशीच अगद्यही. त्यातील ही एक नोंदः

‘किती वेंधळा रे तू! साधी भेळ तुला नीट खाता येऊ नये.’ – तू म्हणालीस.
बुडता सूर्य लाटांशी लपाछपी खेळताना
स्वतःजवळची भेळ भरवताना
मी तुझं बोट कधी चावलं कळलंच नाही.
...आता एक चित्कार कानभर
सूर्य मुकाट बुडताना;
व सांडलेली भेळ इतस्तत:

आमचे मैत्रीच्या पुढचे नाते सिद्ध झाल्या झाल्याच खरे तर हे इतस्ततः विखुरणेही सुरु झाले. जी कधीच संपू नये असे वाटले ती अगदी दुर्मीळ अशी समुद्रकिनारीची एक भेट अगदी कालच्यासारखी स्मरणात आहे. बिलगून बसलेले. हातात हात गुंफलेले. कलत्या सूर्यकिरणांनी मंद लाटांवर एक वाट प्रकाशमान केलेली. आमच्यापासून सुरु होऊन दूर क्षितीजात विरुन जाणारी. ती गात होतीः ‘..पत्ता पत्ता बूटा बूटा..’ जया-अमिताभचे ‘एक नजर’मधले गीत. तिच्या आवाजात ऐकलेली गाणी रेडिओ-टीव्हीवर लागली की ती समोर येई. आजही येते. तिच्या आठवणीसाठीही ती ऐकतो.

माझा काळ दलित पॅंथरच्या उताराचा. पण तरीही वस्त्या धगधगत होत्या. आम्हीही त्यातच घडत होतो. चळवळीत कधी पडलो असा कोणी प्रश्न केला तर आमच्या वस्तीत राहणाऱ्या त्या पिढीचे उत्तर असेल- जन्माला आल्या आल्या. एका बाजूला नाजूक भावनिक आंदोलने व दुसऱ्या बाजूला-नव्हे भोवताली रणरणती सामाजिक आंदोलने. हे सोबतच चालले होते. सामाजिक परिवर्तनाची चळवळ हेच आपले भागधेय हे तेव्हाच नक्की झाले होते. आणि ते नॉन निगोशिएबल होते.

अर्थात त्याबद्दल तिने थेट अभिप्राय कधीच दिला नाही. आमच्या चर्चा-संवादात हे संदर्भ असायचे. माझ्या अस्तित्वाचा तो भागच असल्याने अपरिहार्यपणे यायचे. ‘माझ्या घरी या नात्याचा स्वीकार होणे कठीण, वडिलांची मी खूप लाडकी आहे. त्यांना कसे दुखवायचे?..’ हे प्रश्न तिच्या बोलण्यात वाढू लागले. अनिश्चितता, अस्थिरता आम्हाला घेरु लागली. तिचा स्वर जड होई. डोळे भरुन येत. आमच्या एकत्र असण्यातला अधिकाधिक वेळ या अस्थिरतेच्या ताणाने भरलेला असायचा. जवळच्या मित्र-मैत्रिणींनी तिला निर्णयात आधार द्यायचा खूप प्रयत्न केला. त्यामुळे ती दोलायमान मात्र होई.

या दोलायमान अवस्थेत दुसऱ्या टोकाला गेलेला लंबक वेगाने या टोकाला आल्यावर तिने मला लिहिलेले हे पत्रः

प्रिय सुरेश,

‘हमे तुमसे प्यार कितना
ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते
तुम्हारे बिना’

मी आतापर्यंत तुला दुःख आणि दुःखच दिलं आहे. पण आता येणारे आषाढमेघ न बरसता निघून जाण्यासाठी नव्हेत. या गदगदणाऱ्या शिशिराची झळ आपल्या वसंत बहाराला लागणार नाही याचे आश्वासन देते. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. तुझं भवितव्य उज्जवल आहे यात तिळमात्र शंका नाही.

चांगला अभ्यास कर.

तुझी आणि तुझीच,

……

(पत्राच्या खालच्या मोकळ्या जागेत मोठी ठळक आद्याक्षरांना हंसाचा आकार दिलेली आमची दोघांची नावे.)

तिच्या सुरेख अक्षरातले हे पत्र मी अजून जपून ठेवले आहे. हे लिहिताना ते माझ्या समोरच आहे.

आश्वस्ततेचा हा काळ अगदीच मामुली ठरला. पुन्हा तीच दोलायमान आंदोलने. याची नोंद करताना डायरीत मी लिहिलेः

तुझं न येणं गृहीत धरुनही
मी उभा होतो कारंज्याशी
तुझ्या प्रतीक्षेत केव्हाचा!
कारंजे...जसे तुझे शब्द
तुषाराची सप्तरंगी कमान
तुझ्या भोवती;
तशीच हौदाची चाकोरीही.
हौदाचे कठडे
खरंच इतके बळकट
की तुलाच हवी आहे कमान..?

आमच्या नात्याला अधिकृत विराम न देताच ते विरत गेले. कॉलेज संपले. प्रत्यक्ष दिसणेही संपले. तिच्या पत्राशिवाय तिचा फोटो वगैरे काहीही जवळ ठेवले नाही. आम्ही एकत्रित केलेल्या नाटकाचा फोटोही मी घेतला नाही. तिने तो घेतला असे मला नंतर कळले.

आमच्या नात्याची ही अटळ परिणती आहे, याचा पुरेपूर अंदाज आला असतानाही मी स्वतःला स्थिर ठेवू शकलो नाही. बाहेरुन दिसलो नाही तरी आतून खूप विकल झालो. पण या स्थितीत राहण्याची चैनही करता येत नव्हती. आधीच गरीबी. त्यात गिरणी संपाने केलेली वाताहत. आई-वडिलांची आजारपणं. लहान भावाची जबाबदारी. कॉलेज करत राहणं शक्य नव्हतं. कमावणं भाग होतं. नोकरीला लागलो. पुढचे शिक्षण नोकरी करत केले. सामाजिक कामात होतोच. तो तर श्वासच होता. संधी मिळताच पूर्णवेळ कार्यकर्ता व्हायचे हे मनात होतेच. आंबेडकरी परिसराबरोबरच अन्य पुरोगामी चळवळींतला सहभागही वाढत गेला.

जीवनाचा हा नवा टप्पा सुरु झालेला असतानाच ती लग्नाची पत्रिका द्यायला घरी आली. मी नव्हतो. आईजवळ ठेवून गेली. तिच्या लग्नाच्या दिवशीच मी स्त्री मुक्ती संघटनेच्या विदर्भ दौऱ्यात नाटकात उभा होतो. माझे पात्र गंभीर होते. त्यात भावूक होणे हा नाटकाचाच भाग होता. खरं तर हे पात्र करताना मी आपसूकच भावूक होई. पण आजच्या अश्रूंना एक वेगळे परिमाण होते. नाटक संपल्यावर आंघोळीला गेलो. कडाक्याच्या थंडीत कितीतरी वेळ नळाखाली बसून राहिलो.

डायरीत एक नोंद आहेः

कालपरवापर्यंत दूरवर का होईना 
एक ‘घर’ होतं माझ्या दृष्टिक्षेपात...
आज अखंड मुशाफिरीची दीक्षा.
कुठले कवडसे, कुठल्या तिरीपी,
कुठलीच शलाका जोजारणं नाही.
पायलीभर चांदण्या ओतून अवकाशाचे मापन नाही.
समाधान, खेद, हर्ष, दुःख..सारे पडद्याआड;
मला अनोळखी आहेत ते.

दुसरी एक नोंद अशीः

जखम मुक्तपणे वाहू द्यावी...
शुष्क मांसात चोपडावी माती 
पाहिजे तर ‘निर्दय’ या संज्ञेने.
राखेला खाक होण्याची भीती आता कशासाठी..?
अंगणातला गुलमोहोर पेटला तरी खंत नाही.
निःश्वासाची गोष्टच दूर
विझविण्याचा प्रयत्न नाही.
वैफल्य- स्थितप्रज्ञतेचा पाया भरतं का..?

मी स्थितप्रज्ञ वगैरे काही झालो नाही. तिच्या लग्नानंतर तिच्याविषयीच्या खोल कुठेतरी असलेल्या प्रतीक्षेला विराम मिळाला एवढेच. तिच्याविषयी काही तक्रार नव्हती. पुढेही राहिली नाही. या काळात मीनाकुमारी, गुरुदत्त हे दोस्त वाटत. त्यांच्याशी कितीतरी गुजगोष्टी मी डायरीत केल्या आहेत. ‘चाँद तन्हा है आसमाँ तन्हा, दिल मिला है कहाँ-कहाँ तन्हा’ या मीनाच्या ओळी वेदनेवर फुंकर घालत. गुरुदत्त या स्थितीला एक भला थोरला सामाजिक आयाम देई. कितीतरी वेळा पाहिलेल्या ‘प्यासा’तला गुरुदत्त ही आपलीच प्रतिमा वाटे. दुरावलेल्या माला सिन्हाला तो जे म्हणतो ते माझेच उद्गार वाटत- “मुझे तुमसे शिकायत नहीं. मुझे शिकायत है समाज के इस ढाँचे से.” भोवताली घोंगावणाऱ्या फुले-आंबेडकरी, डाव्या-समाजवादी चळवळींमुळे हेच विचारसूत्र आम्हाला मिळाले. माझे दारिद्र्य, माझी जात व त्यामुळे येणारी प्रेमातली विफलता यास मी किंवा ती जबाबदार नाही, तर जबाबदार आहे ही 'समाजव्यवस्था'. ...आणि म्हणूनच पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला ही वंचना, ही विफलता येऊ द्यायची नसेल, तर समाजाचा हा 'ढाँचा' बदलला पाहिजे हे ध्येय अधिकच पक्के झाले.

हा प्रवास एकट्याने करावा लागणार याची तयारी मनाशी झाली होती. याचा अर्थ जोडीदाराची आस संपली होती असे नव्हे. पण ती मिळेल याची प्रतीक्षा मात्र सोडली. मनाने वास्तवाचा स्वीकार बऱ्याच प्रमाणात केला होता.  ज्या कोणी सहकारी, मैत्रिणी सहवासात येत त्यांना कोणत्यातरी निमित्ताने घर-वस्ती अगत्याने दाखवत असे. त्यामुळे संबंधांचा पाया प्रारंभीच पुरेसा स्पष्ट होई. आमच्या वस्तीत संघटनेच्या उच्चवर्णीय सहकारी मुली सोबत येत त्यावेळी नेहमीचा एक प्रश्न वस्तीतल्या कार्यकर्त्या मित्रांकडून येई– ‘यातली कोण लग्न करुन येईल का राहायला या झोपडपट्टीत?’ त्यांना मी समजावत असे- ‘अरे, त्या माझ्या सहकारी आहेत. आपल्या वस्तीत येतात याचे आपण स्वागत करायला हवे. माझ्याशी लग्न करुन इथे राहणे ही त्यांच्या कामाची पावती कशी काय असू शकते?’

पण यातल्याच एकीने माझ्याशी लग्न केले. समजून-उमजून. वस्ती, घर, आई-वडील सगळे सगळे बघून. तिला घरी संघर्ष करावा लागला. आई-भावंडांनी साथ दिली. पण वडिलांचा विरोध तीव्र होता. विरोधाचे कारण जात. तिला घरातून बाहेर पडावे लागले. ज्या वस्तीत आम्ही राहत होतो, तिथे तिला काय सोसावे लागले हे कळायचे असेल तर ‘सैराट’मधील आर्ची-परशा पळून जाऊन ज्या घरात राहतात, ते घर डोळ्यासमोर आणा. ज्या शौचालयात जाताना आर्चीला कसंनुसं होत होतं त्यापेक्षा वाईट स्थिती आमच्या सार्वजनिक शौचालयांची होती. तिने हे सोसलं वगैरे म्हणणे तिला फारसे पटत नाही. तिची भूमिका असते- ‘ती माझी निवड होती. आयुष्यात काय हवंय याची मला स्पष्टता होती.’ त्यामुळे मीही तिने काय व कसे सोसले हे जाहीरपणे सांगण्याचे किंवा त्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्याचे धारिष्ट्य अजून तरी दाखवलेले नाही.

चळवळीतले सहकारी म्हणून वस्तीतल्या तसेच बाहेरच्या अनेक कामांत आम्ही एकत्र असू. पण घर चालवणे, सांभाळणे व उभे करण्यात तिचाच वाटा आहे. आमचे लग्न झाले तेव्हा मी पंचविशीत व ती तेवीस वर्षांची होती. ती शिकत होती. त्याचवेळी मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. चळवळीतल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने तिचे शिक्षण व नोकरी मिळेपर्यंतचा काळ आम्ही निभावला. आई-वडिलांची आजारपणं, अन्य नातेवाईकांचे करणे ही जबाबदारी तिने अधिक उचलली. वस्तीतल्या तसेच गावातल्या लोकांशी तिच्या दोस्तीने माझे त्यांच्याशी नव्याने संबंध तयार झाले. मी कार्यकर्ता होतो. मांडणी करण्यात मला गती होती. पण व्यक्ती-व्यक्तींशी हृदयाचे नाते जोडून त्यांना संघटित करण्यातले तिचे कसब माझ्यात नव्हते.

आम्ही संघटनेत एकत्र होतो. पण जेव्हा जोडीदार म्हणून विचार करण्यासाठी भेटलो, त्या दिवसाला उद्देशून मी जे लिहिले व तिला दिले त्यातल्या शेवटच्या काही ओळी अशा आहेतः

हे २५ जून १९८८,
उगवलास अन् मावळलास त्याच सूर्यास्ताने
जगरहाटीचे, रुढ नियमांचे बाज सांभाळत;
तरीही
उसळलास माझ्या आत-भोवती
किनारा गिळू पाहणाऱ्या समुद्रलाटांचे तुफानणारे श्वास होऊन,
मात्र उसळलास, तुफानलास, झेपावलास एवढेच नाही;
तर गेलास याच्याही पल्याड आणि-
शांतवलास आदिम ज्वालाडोह,
तुफानणाऱ्या लाटांना दिलीस हलक्या समुद्रगाजेची कुजबुज,
बेमुर्वत आषाढसरी झाल्या कारंज्याची थुईथुई,
काळ्या मेघांची भयकारी गुहा छेदून दिलेस
निरभ्र आकाश
पिवळे, शांत, निळे
ज्यात पाखरांचा विहार
मनसोक्त, मुक्त, संथ...

भौतिक स्थितीत तसेच चळवळीत ज्या काही लाटा वरखाली व्हायच्या त्या होत राहिल्या. पण आमच्या नात्याचे हे निरभ्र, मुक्त, संथत्व आजही ढळलेले नाही. उलट त्याला आता एक प्रौढ गहिरेपण आलं आहे. खरं म्हणजे आता आम्ही अनेक जबाबदाऱ्यांतून बऱ्यापैकी मुक्त आहोत. आम्ही दोघेच एकत्र असणे, जाणे हे आता अधिक होते. लग्नावेळी आमचा हनिमून होऊ शकला नाही. पण आता ‘हनिमूनी’अवस्था ही नित्यावस्था आहे.

आणि याला ‘तिची’आठवण बाधा होत नाही. काळाचा अगदी लहान पण मनाचा मोठा अवकाश व्यापणारा तो टप्पा डायरीसारखा सोबत राहिला. पुढेही राहील. मंद. तेवत. कधीतरी झुळूकीने ज्योत हलेल. मोठी होईल. एवढेच.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________

पुरुष उवाच, दिवाळी. २०१७

Thursday, October 19, 2017

या वादांवर मार्ग काढण्यासाठी एकत्र बसून चर्चा करुया !

बौद्धांनी दिवाळी करावी की करु नये याबद्दल घमासान चर्चेच्या पोस्ट्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. तथापि, या वादाचे लागते असलेले लोक अगदी नगण्य आहेत. या दोहोंच्या वादाचे काहीही पडलेले नसलेला बौद्ध समाजातील मोठा विभाग आपल्याला हवे तेच करतो आहे. हे वाद त्याच्या गावीही नाहीत.

आजच आम्ही काही सहकारी या विषयावर बोलत होतो. आमचे एक सहकारी हिरामण खंडागळे यांनी एक आठवण सांगितली. त्यांची सांगण्याची ढब न्यारी आहे. शेवटी आम्ही खो खो हसत सुटलो. मी ऐकले ते माझ्या शब्दांत मांडतो.
बौद्ध बहुसंख्येने राहत असलेल्या एका इमारतीत वरच्या माळ्यावरील एका बौद्ध इसमाच्या घरी तुळशीचे लग्न होते. खालच्या मजल्यावरील काही बौद्धांना हे सहन झाले नाही. बौद्ध असताना हा इसम हिंदू रुढी पाळतोच कसा? त्यांनी जाऊन त्याला असे न करण्याबद्दल तंबी दिली. तरीही तो ऐकेना. त्याच इमारतीत रिपब्लिकन पक्षाचे एक ज्येष्ठ नेते राहत होते. तंबी देणारे लोक त्यांच्याकडे गेले. तुम्ही तरी समज द्या त्याला, अशी या लोकांनी नेत्याला विनंती केली. नेत्याने फोन लावला त्या वरच्या मजल्यावरील इसमाला. लोकांची तक्रार सांगितली. नेत्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन तो इसम नेत्यास म्हणाला, “साहेब, मी तुळशीचे लग्न लावतो आहे, हे बरोबर. आणि मी ते लावणार. कारण ते मी हिंदू पद्धतीने लावत नाही. मी ते बौद्ध पद्धतीने लावतो आहे.”

आम्ही खो खो हसलो खरे. पण असे प्रकार गंभीरपणे करणाऱ्यांची अनेक उदाहरणे नंतर इतर सहकाऱ्यांनीही सांगितली. मयतालाही बौद्ध असल्याने नीळ लावणे वगैरे.

२६ नोव्हेंबरला संविधान दिनी मुंबईच्या देवनार पांजरापोळ येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दादर चैत्यभूमीपर्यंत अनेक संघटना मिळून आम्ही संविधान जागर यात्रा काढणार आहोत. तिच्या तयारीसाठी या नवरात्रात अनेक मंडपांतच आमच्या बैठका झाल्या. देवी बसवणारी ही वस्त्यांतील तरुण मुले आमचा आदर करत. दांडियाची सुरुवात व्हायच्या आधी त्यांचा मंच व माईक वापरायला देत. बैठकीला बसत. शेवटी यात्रेत आम्ही येणार आहोत, असे आश्वासन देत. एके ठिकाणी एक आयोजक तरुण म्हणाला, “सर, बिनधास्त बोला. आपलेच लोक आहेत.”

आपलेच म्हणजे बौद्ध. या मुलांना कोणतेही वैषम्य वाटत नव्हते, कोणताही अपराधीभाव त्यांच्यात नव्हता. जशी आंबेडकर जयंती तसा देवीचा उत्सव. तसाच गणपती. बाबासाहेबांबद्दल कणभरही कमी अभिमान नाही. तसेच गणपती-देवीबद्दलही काही वावडे नाही. एकदम समभाव.
मी राहत होतो त्या वस्तीतल्या मंडपातही अशीच बैठक झाली. तोच अनुभव...आपले लोक वगैरे. या वस्तीत आमचे एक पँथरचे नेते बौद्ध असतानाही होळी वगैरे कोणी रचली तर ती उद्धस्त करायचे. गणपती बसवायची तर कुणाची हिंमतच नव्हती. आम्ही मुले त्यांच्यासोबत असू. त्यांचे हे ‘अँग्री यंग मॅन’ असणे आम्हाला विलक्षण भावायचे. आमचे ते आदर्श होते. या जुन्या आठवणी एका बाजूला मनात उसळून येत होत्या अन् माझ्या त्याच वस्तीत देवीच्या मूर्तीच्या साक्षीने मी तरुण मुलांना संविधानातील मूल्ये समजावून सांगत होतो.

आहे हे असे आहे. यावर मार्ग काय?

ज्याला जे बरोबर वाटते तेच खरे व तेच इतरांनी ऐकायला हवे; नाहीतर तो धर्मद्रोह असे करुन कसे चालेल?
दिवाळीबद्दल गेल्या वर्षी एका मोठ्या धम्म परिषदेत मंचावरील भिख्खूंकडूनच दोन मते व्यक्त झाली. एका भन्तेंनी बौद्धांनी दिवाळी करु नये अशी भूमिका मांडली. त्याचे ऐतिहासिक कारण दिले. दुसऱ्या भन्तेंनी दिवाळी हा बौद्धांचा सण आहे, असे जोरदार समर्थन केले. त्यांनीही ऐतिहासिक संदर्भ दिले.

अशावेळी सर्वसामान्य बौद्धांनी (तुळशीचे लग्नवाले किंवा नवरात्रवाले सोडून जे या वादांना थोडी किंमत देतात त्यांनी) काय करावे, असा प्रश्न उभा राहतो. बौद्ध सूत्रांचे नव्या परिस्थितीत अर्थ लावण्यासाठी बुद्धानंतर शंभर वर्षांनी वा अशोकाच्या काळात धम्म संगिती (म्हणजे परिषदा) झाल्याची इतिहासात नोंद आहे. संगिती हा मोठा प्रकार झाला. पण आपण बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेनंतर आता ६१ वर्षांनी जे प्रश्न आपल्याला पडतात, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किमान छोट्या छोट्या परिषदा का घेऊ नयेत?

या परिषदांत बौद्धांमधल्या विविध मतांच्या प्रतिनिधींना बोलवावे. त्यांना आपले म्हणणे सकारण मांडायला सांगावे. त्याची टिपणे आधी वितरित करावी. मांडणी झाल्यावर त्या वक्त्यास प्रश्न विचारावे. दुसऱ्या मताच्या वक्त्यालाही हीच संधी मिळावी. अभिनिवेश, वकिली युक्तिवाद या मांडणींत नसावा. आपल्या मतांच्या लोकांनाच केवळ टाळ्या अशी गटबाजी नसावी. इतरांना आपले म्हणणे समजावून सांगणे, पटविणे ही रीत असावी. ही चर्चा लिहून काढावी. त्यातील विरोधाचे व सहमतीचे मुद्दे नीट नोंदवून त्यांचे इतिवृत्त तयार करावे. ते विचारार्थ विविध माध्यमांतून प्रसारित करावे. शक्य झाल्यास ही चर्चा रेकॉर्ड करुन यू ट्यूबवर अपलोड करावी. परिषद चालू असताना ती फेसबुक लाईव्हही करता येईल. या परिषदेत कोणत्याही निर्णयाला येऊ नये. अशा परिषदा महाराष्ट्रात विविध ठिकाणी व्हाव्यात. पहिल्या फेरीच्या परिषदांनंतर ६ महिन्यांनी दुसरी फेरी करावी. अशा काही फेऱ्यांनंतर एक मध्यवर्ती परिषद करावी. तिच्यातही निर्णयवजा काही जाहीर न करता सहमतीचे मुद्दे विशेष अधोरेखित करुन तुम्ही याचा विचार करा, असे समाजाला आवाहन करावे.

आज तमाम महाराष्ट्रातल्या बौद्धांची एकच एक शिखर संघटना नाही, ही वस्तुस्थिती मान्य करुन आमचेच ऐकायला हवे असा कोणत्याही संघटनेने आग्रह धरु नये. त्याने काहीही हाताशी लागणार नाही. अशा अधिकारी केंद्राकडे वाटचाल हा लांबचा पल्ला आहे. ते धर्मपीठ होता कामा नये ही सुद्धा दक्षता घ्यायला हवी. या परिषदांमुळे आज मनाला वाटेल तसे तलवारी परजणे चालू आहे, ते थांबून गंभीर चर्चेला लोक बसले तरी खूप यश मिळाले असे समजायला हवे.

हे कोणी करायचे?

माझ्याकडे सगळी स्पष्टता व आराखडा आहे असे नव्हे. मी कल्पना मांडतो आहे. आपल्या सगळ्यांच्या सूचनांतून त्यास अधिक आकार येऊ शकेल. क्रमात मलाही अजून काही सुचेल. एक नक्की वाटते. तरुणांनी यात पुढाकार घेतला तर अधिक बरे. याचा अर्थ ज्येष्ठांनी हे करण्यास प्रतिबंध आहे असे नव्हे. कोणत्याही राजकीय गटाच्या, मताच्या व्यक्तीस यातून वगळू नये. कोणालाही अस्पृश्य ठरवू नये. गंभीरपणे म्हणणे मांडणाऱ्या कोणालाही यात प्रवेश असावा.

या परिषदांकडे जाण्यासाठी सुरुवात म्हणून एखादा ‘नवयानी बौद्धः चिकित्सा व उपाय’ या किंवा अधिक उचित नावाने फेसबुक गटही सुरु करता येईल. अट एकच यावर ‘शुभ धम्म सकाळ, कडक जयभीम’ अशा पोस्ट्स न टाकता विषयाला अनुसरुनच चिकित्सा करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या तसेच उपाय सुचविणाऱ्या पोस्ट्स टाकल्या जाव्यात. याच्या admin ची जबाबदारी घेणाऱ्यांनी याबाबत दक्ष राहण्याची गरज असेल.

आपण या दिशेने चर्चा सुरु केली की अशा अनेक कल्पना पुढे येऊ शकतील.

बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे व त्याला मानणाऱ्या समुदायाचे भवितव्य नीट मार्गी लागण्यासाठी असे काहीतरी करण्याची गरज आहे, असे मला तीव्रतेने वाटते.

आपण विचार करावा, विनंती.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_______________________________________________

(आपणास योग्य वाटल्यास हे टिपण आपण ऑनलाईन तसेच प्रिंट माध्यमांद्वारे शेअर करावे ही विनंती.)

Tuesday, October 17, 2017

राम-कृष्ण गेले...भीम-बुद्ध आले


माझ्या जन्मापूर्वीची ही गोष्ट आहे. बाबासाहेबांनी मृत जनावरांचे मांस खाणे सोडायला सांगितले. मला आठवते त्याप्रमाणे आमच्या घरात मृत सोडाच मोठ्याचे मांसही खाल्ले जात नसे. फक्त कोंबड्या-बकऱ्याचेच मटण असे. आई त्याबाबत अधिक दक्ष असे. आमच्या नात्यातले, शेजारचे जे कोणी मोठ्याचे मांस खात त्यांना ती कमी प्रतीची माने. आपण बौद्ध म्हणजे काहीतरी उच्च आहोत. असे मोठ्याचे मटण खाण्याने आपण भ्रष्ट होतो, असा तिचा माझ्यावरील संस्कार आहे.

आमच्या घरी बुद्ध व बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणत्याही देवाचे फोटो मी पाहिले नाहीत. (हे आमचे वैशिष्ट्य. काही बौद्धांच्या घरांत ते आजही दिसतात.) ती या फोटोंना नित्यनेमाने हार घाली. त्यांच्यासमोर उदबत्ती-मेणबत्ती लावे. माझे वडिल वंदना घेत. आम्ही घरातले हात जोडून त्यात सामील होत असू. दुसऱ्या कोणत्याही देवाला न भजणाऱ्या माझ्या आईच्या अंगात सात आसरा (मोठ्या बाया असेही या देवींना म्हणतात) मात्र येत. तिच्या अंगात आले की लोक जमा होत व तिला आपल्या अडचणी सांगत, गाऱ्हाणे घालत. तिच्या अंगातली देवी त्यांना उत्तरे देई. मार्ग सांगे. या प्रकारात कुठेही कोणाकडून पैसे किंवा अन्य काही स्वीकारले जात नसे. परोपकाराचीच भावना असे. आम्ही मुलांनी थोडे कळू लागल्यावर गावी आमच्या बौद्धवाडीत ज्या कोणाच्या अंगात येईल त्याला दंड बसवला जाईल, असे विद्रोही फर्मान काढले. वाडीतल्या अनेक स्त्रियांप्रमाणे माझ्या आईच्या अंगात येणेही तेव्हापासून बंद झाले.

माझी आई माझ्या मित्रांशी अत्यंत आपुलकीने वागे. पण त्यांच्या जातींविषयी जागरुक असे. मांग ही जात आमच्या तुलनेत तथाकथित खालची. म्हणून मांगाच्या घरी जेवू नकोस, पाणी पिऊ नकोस अशी ती सांगे. फक्त सांगे. घरी आलेल्या मांग मित्राला तिने खाऊ-पिऊ घालण्यात काही कसर केल्याचे मला आठवत नाही.

आजच्या महाराष्ट्रातल्या बौद्धांचा, त्यातील महिलांचा विचार करताना बाबासाहेबांच्या ‘नवयानी’ बौद्ध धम्माचा संदर्भ घ्यावा लागेल. पारंपरिक बौद्ध धर्माशी इथल्या बौद्धांचा त्या अर्थाने संबंध नाही. म्हणूनच मग पारंपरिक बौद्ध धर्मात स्त्रीला दुय्यम लेखले गेल्याचा तत्त्व म्हणून अंगिकार करण्याची सूट बाबासाहेबांनी दीक्षा दिलेल्या बौद्धांना मिळत नाही. शिवाय बौद्ध धम्म स्वीकार हा बाबासाहेबांच्या वैचारिक विकासाचा शेवटचा टप्पा धरला तर बाबासाहेबांनी थेट १९२७ च्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून संविधानर्मिती प्रक्रिया व १९५१ च्या हिंदू कोड बिलापर्यंत तसेच या दरम्यानच्या अनेक भाषणांतून जी स्त्रीविषयक भूमिका मांडली ती चौकट स्वीकारावी लागते. ही चौकट आधुनिक स्त्रीवादाची आहे. स्त्री-पुरुषांचा दर्जा समान, पती-पत्नी मित्र, स्त्रीला पिता-पतीच्या संपत्तीत हक्क, घटस्फोटाचा अधिकार, द्विभार्या प्रतिबंधाद्वारे पतीच्या श्रेष्ठत्वाला लगाम, कामाच्या ठिकाणी बाळंतपणाच्या रजेचा अधिकार, आंतरजातीय लग्नाचा पुरस्कार आदि भूमिकांनी बाबासाहेबांनी या चौकटीचा आशय संपन्न केला आहे. महाराष्ट्रातल्या नवदीक्षित बौद्धांना आपल्या बौद्धत्वाची हीच चौकट स्वीकारावी लागते.

मानवी समाजाच्या विकासक्रमात धर्माच्या स्थानाची चिकित्सा करताना अभ्यासक जी सूत्रे मांडतात, त्यात पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे गौणत्व हा सामायिक भाग आहे. त्याच्या तीव्रतेत कमीअधिक फरक असला तरी स्त्रीला सगळ्याच धर्मांनी पुरुषापेक्षा दुय्यम मानलेले आढळते. स्त्रीला कमी लेखण्यात जैन वा बौद्ध हे प्रगतीशील धर्मही अपवाद नाहीत. ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या आपल्या पुस्तकाच्या अखेरच्या भागात विविध धर्मांतील स्त्रियांच्या स्थानाविषयी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विवेचन केले आहे. त्यात बौद्ध धर्माविषयी काही नोंदी ते करतात. आपले पालनपोषण केलेल्या सावत्र आईला ती स्त्री असल्याने भिक्षुसंघात प्रवेश देण्यास अनुत्सुक असलेले बुद्ध आपला शिष्य आनंद याच्या आग्रहाखातर काही अटींवर राजी होतात. मात्र त्याचवेळी स्त्रियांच्या भिक्षुसंघातील प्रवेशामुळे बौद्ध धम्म हजार वर्षांऐवजी पाचशे वर्षेच टिकेल असे उद्गार काढतात. नुकताच संघात प्रविष्ट झालेला तरुण भिक्षू समोर आल्यास शंभर वर्षे वयाच्या भिक्षुणीनेही उठून उभे राहायला हवे, ही भिक्षूसंघाची प्रथा होती. भार्येचे प्रकार सांगताना सातवा दासीभार्या हा सर्वोत्तम प्रकार असल्याचे बुद्ध सांगतात. बुद्धांचा याबाबतीतला दृष्टिकोण ‘परंपरागत’ होता, असे डॉ. साळुंखे म्हणतात, पण त्याचवेळी ‘..तरीही तत्कालीन समाजाचा विचार करता तुलनात्मक दृष्ट्या तो खूप उदार होता’ अशी प्रशंसाही करतात. त्यासाठी लिच्छवी सरदारांनी बुद्ध आपल्याकडेच यावेत यासाठी आटापिटा चालवला असतानाही ते आम्रपाली या गणिकेच्या निमंत्रणाचा स्वीकार करतात, या घटनेचे उदाहरण देतात. एकूण, ‘गौतम बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोण संमिश्र होता’ असा डॉ. साळुंखेंचा निर्वाळा आहे.

स्त्रीविषयक भूमिका ही अत्यंत महत्वाची असली तरी केवळ तिच्यावरुन एखाद्याचे संपूर्ण मापन करणे चुकीचे ठरेल, हे खरे. ऐतिहासिक क्रम लक्षात घेऊन गौतम बुद्धाच्या प्रगतिशील विचारांतली ती एक उणीव आहे, एवढी नोंद करुन आपण पुढे सरकायला हवे हेही बरोबर. पण त्याचे आज कोणत्याही प्रकारे समर्थन होता कामा नये, हेही तेवढेच खरे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला स्वीकारताना ही दक्षता घेतली आहे. अडीच हजार वर्षांनी बुद्धाचे नेमके काय स्वीकारायचे याचा निर्णय करताना मानवाच्या कल्याणाला ते उपयुक्त आहे का, अनुभवाच्या कसोटीला ते उतरते आहे का, हे बुद्धाने सांगितलेले निकषच ते वापरतात. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा त्यांचा ग्रंथ या कसोट्यांवरच सिद्ध झाला आहे. बौद्ध धर्मात हीनयान, महायान असे पंथ तयार झाले. ते नाकारुन आम्ही स्वीकारलेला बौद्ध धम्म हे ‘नवयान’ आहे, असे ते जाहीर करतात.

ही चौकट हा अर्थातच आदर्श आहे. प्रत्यक्षात काय झाले? काय आहे? ...डॉ. साळुंखेंचाच शब्द वापरायचा तर जे झाले व जे आहे त्याचे ‘संमिश्र’ असेच वर्णन करावे लागेल. महाडच्या परिषदेत व त्यानंतर अनेक ठिकाणी व खास करुन बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपली जातीची ओळख दर्शवणाऱ्या चिन्हांचा त्याग करायला बाबासाहेबांनी सांगितले. लुगडे नेसण्याची पद्धत बदलण्याचे त्यांचे आवाहन महार स्त्रियांनी लगोलग स्वीकारले. आमचे कुटुंब बौद्ध. म्हणजे पूर्वाश्रमीचे महार. माझ्या आईला मी कधीही ढोपरापर्यंतच्या लुगड्यात बघितले नाही. ती व्यवस्थित घोट्यापर्यंत नऊवारी लुगड्यात असायची. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिने वाख्या (कोपरापर्यंतचे चांदी किंवा कथिलाचे दागिने) वापरणे बंद केले. हे तिने सांगितले.

एकूण महार समाजात बौद्ध होण्याने एक निराळेच चैतन्य निर्माण झाले. हे चैतन्य, ही अस्मिता त्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात क्रांती घडवणारी ठरली. मुलांची शिक्षणे, सामाजिक चळवळी या सगळ्याला विलक्षण धार आली. संस्कारांच्या प्रभावी वाहक स्त्रिया असतात, असे बाबासाहेबांसकट अनेकांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे या अस्मितेच्या, आपल्या मुलाबाळांना शिकवले पाहिजे या प्रेरणेच्या त्या वाहक नक्की झाल्या. मात्र जुन्या ईश्वरी संकेतांतून बाहेर पडून बुद्धाच्या विवेकवादाला त्यांनी स्वीकारले किंवा समाजातील सर्वच विषमतेला त्यांनी नाकारले असे झाले नाही. बुद्धाला ईश्वरी शक्ती म्हणून भजणे हीच बव्हंशी तिची भावना असे. मुलाला पाळण्यात घालताना या बौद्ध बाया आता पाळणा गाताना कृष्ण-रामाच्या जागी ‘भिमाईच्या पोटी भीम जन्मला जो बाळा जो जो रे’ म्हणू लागल्या. त्यात सिद्धार्थाचे नाव गुंफू लागल्या. लग्नातल्या गाण्यांचेही तेच. हिंदू सांस्कृतिक चौकट बव्हंशी तीच. तिच्यातील नावे, प्रतिमा बदलल्या गेल्या. हल्ली हिंदूंच्या चारधामांप्रमाणे बौद्ध स्थळांचे दर्शन सुरु झाले आहे. ही तीर्थस्थळांची यात्राच असते. स्त्रियांचा त्यात अधिक भरणा असतो. मुलगा बाबासाहेब झाला पाहिजे, ही तिची (व बापाचीही) प्रेरणा मुलीबाबत मात्र तेवढ्याच तोलाची नसे. अजूनही नाही. दारु पिऊन आलेल्या नवऱ्याच्या ती लाथा खाईल. प्रसंगी त्यालाही बदडून काढेल. घराचा सगळा आर्थिक भार उचलेल. पण उतरंडीत पुरुषाला ती वरचाच मानेल. ‘नवऱ्याला मित्र माना’ हे १९२७ चे बाबासाहेबांचे विधान तिच्या मनात नीटसे रुजले असे दिसत नाही. एकूण व्यवस्थेचाच तो भाग आहे. बौद्ध म्हणून तिच्याकडून वेगळी अपेक्षा करणे हे कदाचित जादाचे होईल.

पॅंथरच्या काळात आणि त्यानंतरही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अगदी मध्यरात्रीही शिजवून जेवायला घालण्याचे काम या माऊलींनी केले आहे. आणि पुरुष कार्यकर्त्यांनी तिला गृहीत धरले आहे. आई म्हणून तिच्यावर त्यांनी कितीही भावपूर्ण कविता केल्या असतील. पण रात्री उशीरा येऊन आई किंवा बहिणीला उठवून जेवायला वाढायला लावणे, सकाळी उशीरा उठल्यावर आई-बहिणींनी आंघोळीचे पाणी काढणे, समोर चहा ठेवणे या सेवा घेताना तो पारंपरिक पुरुषच असतो. स्त्रीमुक्तीच्या वल्गना करणारे हे पुरुष बहिणीच्या सार्वजनिक वावराबाबत नैतिक रक्षकच असतात. आमचे मोर्चे, सभा, जयंत्या यांत स्त्रियांची संख्या मोठी. पण वक्त्यांत व निर्णयप्रक्रियेत नगण्य. आमच्या गावी कोकणात भावकीच्या किंवा गावच्या मंडळाच्या बैठका बसतात तेव्हा स्त्रियाही असतात. पण त्या खळ्याच्या (अंगणाच्या) एका कोपऱ्यात. मुख्य गोलात सगळे पुरुष. विषय सावित्रीबाईंच्या जयंतीचा असला तरी हीच स्थिती.

बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही वैचारिक, तत्त्वज्ञानात्मक होती. त्यातला विद्रोह, अस्मिता खूप खोलवर समाजात पोहोचली. त्याने त्यांच्या मानसिक-भावनिक प्रेरणांत आमूलाग्र म्हणावा इतका बदल झाला. पण विचारांचा भाग त्याप्रमाणात पोहोचला असे झाले नाही. बाबासाहेबांना ते मुख्यतः अपेक्षित होते. ते एके ठिकाणी म्हणतात- '..त्यांना (लोकांना) बौद्ध धर्माच्या वाङ्मयापेक्षा बौद्ध धर्मात पूजापाठ कशाप्रकारे होतो, हे जाणून घेण्याचे वेडच लागले आहे. आम्हाला  बौद्धधर्माचा पूजापाठ कसा असतो यासंबंधी काहीतरी वाङ्मय द्या, असा  सारखा तगादा लागून राहिला आहे. माझ्या शारीरिक अस्वस्थतेमुळे त्यांची जिज्ञासा पुरी करणे मला आतापर्यंत शक्य झाले नाही. तशात बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ याचा या देशात अगदीच लोप झाला आहे. त्या कारणांमुळे या प्रश्नासंबंधी बौद्ध धर्मातील पूजापद्धती व त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाही. त्या फक्त ज्या देशांमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे, तेथेच मिळू शकतात.'

बाबासाहेबांनी श्रीलंकेतून अशा गाथा मिळवल्या. त्या गुणतिलके नावाच्या आपल्या एका श्रीलंकन मित्राला गायला लावून त्याच्या रेकॉर्ड्स तयार केल्या. लग्नविधीबद्दल एका पत्रात ते म्हणतात, ‘बौद्ध विवाह विधी अगदी साधा आहे. त्यात होम किंवा सप्तपदी नाही. मातीचे एक कोरे भांडे मध्ये ठेवायचे. ते पाण्याने काठोकाठ भरायचे. त्याच्या एका बाजूला वधूने व दुसऱ्या बाजूला वराने उभे राहायचे. या भांड्यात कापसाचा धागा सोडायचा. या धाग्याची दोन टोके एक वधूच्या हातात व दुसरे वराच्या हातात धरायचे. कोणीतरी महामंगल सूत्त म्हणायचे. वधू-वरांनी पांढरे कपडे घालायचे असतात.’

गाथांच्या रेकॉर्ड्स बौद्ध धम्माच्या दीक्षेपूर्वीच १९५० साली बाबासाहेबांनी मिळवल्या होत्या. पण विधिसंबंधीचे त्यांचे पत्र ४ डिसेंबर १९५६ चे-म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी दोन दिवस आधीचे आहे. १४ ऑक्टोबरला त्यांनी दीक्षा घेतली व ६ डिसेंबरला ते गेले. जेमतेम दीड महिन्याचे हे अंतर आहे. त्यात त्यांचे आजारपण. अशा स्थितीत एका नव्या धर्माच्या (पारंपरिक बौद्ध धर्मातल्या कित्येक बाबी त्यांनी नाकारल्या होत्या) तत्त्वज्ञानाला ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाच्या रुपाने ते आकार देऊ शकले तरी विधींची रचना करायला त्यांना पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यांचे प्राधान्य तत्त्वज्ञान होते. ते त्यांनी पूर्ण केले.

हे तत्त्वज्ञान व त्यास अनुरुप विधींची रचना करुन ती लोकांपर्यंत नेण्याचे काम हे बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचे होते. पण ते तेवढ्या प्रभावी वा अपेक्षेप्रमाणे झाल्याचे दिसत नाही. भारतीय बौद्ध महासभा तयार झाली. पण अंतर्गत वादांनी तिला पोखरले. कोकणातील बौद्धजन पंचायत समितीने जातपंचायतीचेच मुख्यतः काम केले. पुढे या दोन संस्थांच्या कामांच्या सीमारेषा काय यावरुन वाद झाले. अनेक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने बौद्धजन पंचायत समितीचेच काम करायला सुरुवात केली. या काळात ज्यांनी विधीचे स्वरुप ठरवले, त्यातील गाथा रचल्या यात बाबासाहेबांच्या भूमिकेशी अनुरुपता ठेवल्याचे दिसत नाही. साधेपणाऐवजी ऐपतीप्रमाणे लग्ने होऊ लागली. विभूतिपूजेच्या विरोधात बाबासाहेब होते, पण त्यांच्यावरची ‘भीमस्तुती’ विधीचा अपरिहार्य भाग झाली. महामंगल सुत्ताऐवजी ‘जयमंगल अष्टगाथा’ (ज्यात जातक कथांतील चमत्कारांचे वर्णन आहे) मंगलाष्टकांना समांतर चालीवर म्हणणे सुरु झाले. वधू-वरांच्या ज्या शपथा आल्या, त्यात स्त्रीचे पारंपरिक स्थान सुरक्षित ठेवायचा प्रयत्न आहे. त्यात पतीने पत्नीला अलंकारादि बाबींनी संतुष्ट ठेवायचे असते व पत्नीने पतीने कमवून आणलेल्या संपत्तीचे रक्षण व घरच्यांचा मान राखायचा असतो. हल्ली दोघेही कमावत असताना हे वचन वस्तुस्थितीशी विसंगत नव्हे काय? आणि घरच्यांचा मान राखायची जबाबदारी ही फक्त पत्नीची कशी काय? पती-पत्नी हे मित्र असावेत असे बाबासाहेब म्हणतात, शिवाय घटनेत दर्जाची व संधीची समानता स्त्री-पुरुष दोहोंना दिलेली आहे. तरीही लग्नातली ही शपथ या मूल्यांशी सुसंगत नाही, हे लोकांना कळत नाही. त्यांना त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही. म्हणजेच त्याला कर्मकांडाचे स्वरुप आले आहे.

बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा घेताना ती चंद्रमणी या महास्थवीर भिख्खूंच्या हस्ते घेतली. प्राचीन बौद्ध परंपरेकडून एकप्रकारे त्यांनी वारसा घेतला. पण समोरच्या जनसमुदायाला त्यांनी स्वतः दिली. दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, कोणत्याही विधीसाठी भिख्खूची गरज नाही, हे त्यातून त्यांना दाखवायचे होते. भिख्खूच्या रुपाने एक नवा पुरोहित मला तयार करायचा नाही, ही त्यांची भूमिका होती. भिख्खूचे काम धम्म समजावून सांगण्याचे. त्याचा प्रसार करण्याचे. आज भिख्खूकरवी विधी लावणे प्रतिष्ठेचे समजले जाते. नामकरणापासून जलदानविधीपर्यंत भिख्खूंचा हस्तक्षेप सुरु आहे. त्यांच्या उत्पन्नाचेही (पुरोहिताप्रमाणे) ते साधन बनले आहे. या काषायवस्त्रधारी पुरोहिताच्या भजनी लागणाऱ्यांत स्त्रियांचा मोठा भरणा असतो. भिख्खूंच्या चरणी माथा टेकणे, त्यांचे आशीर्वाद घेणे, भक्तिभावाने त्यांची प्रवचने ऐकणे व त्यांना दान देणे यांत बौद्ध महिला आघाडीवर असतात. देवळातल्या महिला भजनी मंडळांच्या धर्तीवर बुद्धविहारात वंदना म्हणणे व ग्रंथपठन करणे या उपक्रमांत बौद्ध महिलांचा पुढाकार वाढतो आहे. ‘वर्षावासा’चे कार्यक्रम ‘चातुर्मासा’च्या भक्तिभावनेने केले जात आहेत.

बुद्धाने कार्यकारणभावाला महत्व दिले होते. बाबासाहेबांनी याच कार्यकारणभावाने धर्मग्रंथांची व बुद्धाचीही चिकित्सा केली. आज त्यांचे अनुयायी याला रजा देत आहेत. मंगळसूत्र वास्तविक पुरुषप्रधानतेचे प्रतीक. प्रारंभीच्या काळात त्याला नकार देण्याइतकी प्रगल्भता नसणे स्वाभाविक होते. पण हळूहळू त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या त्यागापर्यंत समाजाची मानसिकता तयार करणे गेल्या ६२ वर्षांत का शक्य झाले नाही? याचे कारण आहे कार्यकारणभावाला, तत्त्वज्ञानाला रजा देऊन विचारशून्य कर्मकांडी मनःस्थितीला शरण जाणे. महिला याच्या पहिल्या भक्ष्य आहेत. मंगळसूत्राचा त्याग राहिला बाजूला, आजही ते झोकात बौद्ध स्त्रियांच्या गळ्यात (ऐपतीप्रमाणे तोळ्यांत) डोलत असते. एक बदल होतो आहे. आता लक्षणीय संख्येने विशेषतः शहरातील बौद्ध महिला पांढरे मंगळसूत्र घालू लागल्या आहेत. पांढऱ्या साड्या नेसतात. म्हणून बहुधा पांढरे मणी. आपण हिंदू नाही, म्हणून हिंदूंसारखे काळे मणी नको. आपण बौद्ध आहोत. म्हणजे वेगळे आहोत. म्हणून  पांढरे मंगळसूत्र. यात काळ्याचे पांढरे झाल्याने मूळ ‘पुरुषप्रधानतेच्या मालकी’चे तत्त्व कुठे बदलते? ते तसेच राहते.

जातिव्यवस्थेचा मध्यवर्ती बिंदू (चालक नव्हे) स्त्री असते. तिचे तथाकथित पावित्र्य जातीची प्रतिष्ठा टिकवते. या स्त्रीने परजातीतील पुरुषाला वरु नये, ही दक्षता जातव्यवस्थेत घेतली जाते. बाबासाहेबांनी जातिनिर्मूलनाचा एक प्रभावी उपाय आंतरजातीय लग्न हा सांगितला आहे. बौद्धांनी आपल्या उद्धारकर्त्याचा हा उपदेश शिरोधार्य मानायला हवा. पण तसे होत नाही. एकतर जातीतच लग्नाची खटपट असते. झालेच आंतरजातीय तर तथाकथित वरच्या जातीची मुलगी आपल्याकडे आलेली चालते. पण आपली मुलगी तथाकथित उतरंडीत आपल्या खालच्या स्तरावरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली बौद्धांना चालत नाही. एकूण मुलीने दुसऱ्या जातीत जाणेच फारसे रुचत नाही. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न एका संख्येने मागे पडते, ही समजूत हेही त्यामागे एक कारण असते. दुसऱ्या जातीची मुलगी आली तर हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एका संख्येने पुढे तरी सरकता येते. भारत बौद्धमय करण्याच्या वैचारिक क्रांतीला माणसांवर बौद्धपणाचे ठप्पे लावण्याची ही प्रतिक्रांती गिळू पाहते आहे.

खुद्द बुद्धाने त्याचा धम्म विचारांनी पटला तर स्वीकारण्याचे आवाहन केले होते. आज बौद्धांच्यात कागदोपत्री, विधीद्वारे परधर्मीय मुलगी तांत्रिकदृष्ट्या बौद्ध होणे पुरेसे असते. तिने आमच्या मुलाशी लग्न केले, म्हणजे ती आपोआपच बौद्ध झाली. बाबासाहेबांनी संविधानात विचार, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य व्यक्तीला दिले आहे. या परधर्मीय मुलीच्या व्यक्ती म्हणून असलेल्या या अधिकाराचा गळा त्यांचेच अनुयायी घोटतात या आरोपाला बौद्धांचे उत्तर काय?

बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने जी आत्मिक ताकद वाढली, जी मिळकत झाली ती गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चालले आहे ते घसरणीच्या दिशेने आहे, असेच म्हणायला लागेल. पण हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. आणि ते खोटे आहे, असे कोणी म्हणणार नाही. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे. पुरोगामी चळवळीच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संवेदनशीलता त्याच दाखवत असतात. मी स्वतः ‘वर्षावासा’च्या तसेच बौद्धांच्या अनेक कार्यक्रमांत व्याख्यानांना जात असतो. त्यावेळी जी आत्मटीका करतो, त्याला महिलांमधून विशेष प्रतिसाद मिळतो. नंतर त्या भेटूनही बोलतात. त्यांना ते वेगळे व विचारार्ह वाटते. आत्मटीकेचा हा प्रवाह गतिमान झाला, तर हा प्रतिसादही वाढेल. पण आत्मटीकेचा प्रवाह गतिमान कधी होईल?...तूर्त ठाऊक नाही.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________

अक्षर, दिवाळी, २०१७

Sunday, October 8, 2017

संविधानातील मूल्ये का व कशी समजून घ्यायची?

‘संविधान म्हणजे काय?’ हा प्रश्न शाळेतल्या मुलांना विचारला की बहुधा मुले त्यांच्या पाठ्यपुस्तकातली संविधानाची उद्देशिका दाखवतात. त्यांचा तर्क चुकीचा नसतो. कारण त्या उद्देशिकेच्या वर मोठ्या अक्षरात ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले असते व त्याच्या खाली त्याहून लहान आकारात ‘उद्देशिका’ असे लिहिलेले असते. गंमत म्हणजे ही मुले अभिमानाने सांगतात, “आम्हाला संविधान पाठ आहे.” त्यांना पाठ असते ती उद्देशिका. पाहुण्यांसमोर असे न चुकता घडाघड मुले बोलू लागली की शिक्षकांचे चेहरेही उजळतात. पूर्वी राष्ट्रगीतानंतर ‘भारत माझा देश आहे..’ ही प्रतिज्ञा अनेक शाळांतून म्हटली जाई. हल्ली त्यात सरकारी आदेशाने ‘उद्देशिके’ची भर पडली आहे.

मुलांनी ती पाठ म्हटली की त्यांचे आम्ही कौतुक करतो. मग हळूच त्यांचा अवमान किंवा ती खजिल होणार नाहीत अशा बेताने प्रश्न विचारतो, “तुम्ही आता ‘आम्ही, भारतीय लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा...’ असे जे म्हणालात त्यातील ‘सार्वभौम’ म्हणजे काय ते जरा सांगाल का?”

अर्थात, त्यांची गडबड उडते. सांगता येत नाही. उद्देशिकेतील मूल्यांविषयी फक्त शिक्षकांची म्हणून स्वतंत्रपणे सत्रे घेतानाही (काही अपवाद वगळता) यापेक्षा खूप वेगळा अनुभव नसतो. त्यांना संविधान ठाऊक असते. उद्देशिका म्हणजेच संविधान असे ते म्हणत नाहीत. पण सार्वभौम, समाजवाद या संकल्पनांचा अर्थ नीटसा कळला आहे, असे दिसत नाही.

पाठ असल्यास उत्तम. पण पाठ असो अथवा नसो. अर्थ समजणे महत्वाचे असते, याला अजूनही आपण कमी महत्व देतो याचा हा परिणाम आहे.

वस्त्यांमध्ये निरक्षर, अल्पशिक्षित महिला-पुरुषांसमोर बोलताना ‘संविधान’ हा शब्दच त्यापैकी अनेकांनी ऐकलेला नसतो, असे लक्षात येते. ‘घटना’ हा शब्द त्यातील काहींना ठाऊक असतो. तर काहींना तोही ठाऊक नसतो. “घटना म्हणजे काय?” असे विचाल्यावर ‘जी घडते ती घटना म्हणजे प्रसंग’ असा अर्थही काहीजण सांगतात. याला अपवाद बौद्ध समाजाचा असतो. बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत हे त्यांच्या मनात इतके मुरलेले असते की ‘देशाची घटना म्हणजे देशाचा कारभार करण्याच्या नियमांचा ग्रंथ’ हे त्यांतल्या बहुतेकांना ठाऊक असते. तथापि, सार्वभौम वगैरे शब्दांचा अर्थ विचारला की त्यांच्या समजाची अवस्था इतरांहून फारशी वेगळी नसते.

हे अनुभव विस्ताराने नोंदविण्याचे कारण एवढेच की आपला देश ज्या घटनेवर चालतो, त्या घटनेतील आशयाविषयी आपला समाज किती दक्ष आहे, याचे गांभीर्य आपल्याला कळावे. घटनेचे अभिमानी ‘घटनेला हात लावू देणार नाही’ वगैरे ठणकावून सांगतात. पण ‘या घटनेत काय आहे हे सांगता का?’ असे विचारल्यावर त्यांचीही भंबेरी उडते.

पण खरेच घटना समजून घेण्याची गरज आहे का? ती न समजल्याने आजवर काय अडले की जे पुढे अडणार आहे?

हो. अडले आहे. पुढेही अडणार आहे.

आज आपल्या देशात राजा नाही. राजा त्याला वाटेल ते निर्णय घेई, प्रजेला तो विचारत नसे. काही चांगले राजे प्रजेच्या मनाचा अंदाज घेऊन आपला कारभार तिच्या हितासाठी करत असत. पण प्रजेचे म्हणणे विचारात घेणे त्यांना बंधनकारक नसे. तसा काही नियम नसे. राजाला जनता निवडून देत नसे. तो वंशपरंपरागत असे. आता ती स्थिती गेली. आता सरकार प्रत्येक बाबतीत आपले म्हणणे विचारत नाही. पण आपण विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करतो म्हणजेच त्याने आपल्या म्हणण्याचे प्रतिनिधीत्व करावे, असे गृहीत आहे. आपण प्रचंड लोकसंख्येचे लोक सगळे एकत्र येऊन निर्णय घेऊ शकत नाही म्हणून आपले प्रतिनिधी आपण निवडतो. ते आपले प्रतिनिधी आहेत. आपले म्हणणे त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर मांडायचे असते. हे त्यांनी नीट मांडले नाही किंवा आपल्या हिताच्या विरोधात वागले तर पुढच्या वेळी आपण त्यांना निवडून देत नाही. म्हणजेच आपण सर्वसामान्य लोक अप्रत्यक्षपणे कारभार करतो. म्हणजेच आपण जनता आता देशाची सर्वाधिकारी आहोत. जुन्या भाषेत आपण राजा आहोत. जुन्या वंशपरंपरागत राजांची शाही म्हणजे सत्ता आता गेली. आता लोकांची शाही म्हणजेच लोकशाही आली आहे. ही लोकशाही कशी चालवायची याविषयी आपण सगळ्यांनी मिळून (म्हणजे आपल्या प्रतिनिधींनी) राज्यकारभाराच्या नियमांचे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणजे भारताची राज्यघटना. त्यात काय आहे हे आपल्याला ठाऊक नसेल तर आपण देशाचा कारभार करणार कसा? निवडून देऊ तो बघेल, तो घटना वाचेल, असे जर त्याच्यावरच सर्व सोपवले तर तो त्याच्या मनाला वाटेल तसा स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेईल किंवा निर्णयात सहभागी होईल. म्हणजे, तो प्रतिनिधी आपला; पण निर्णय घेणार त्याच्या हिताचे, अशी गडबड होईल. सध्या अशी गडबड होते आहे. म्हणून घटनेत काय आहे, याविषयी आपण जागृत असायला हवे.

एखादा माणूस शिक्षक होतो. त्यासाठी त्याला डीएड किंवा बीएड करावे लागते. म्हणजे कसे शिकवावे त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. विजेची कामे करणाऱ्याला इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण घ्यावे लागते. बिगर माहितीने अंदाजाने त्याने काम केले तर त्यालाही शॉक लागेल व इतरांचाही जीव धोक्यात येईल. असे प्रत्येक कामाचे आपल्याला सांगता येईल. मग देशाचा कारभार चालवणारे जर आपण असू तर तो कसा चालवायचा, किमान तो चालवणारे नीट चालवतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण आपण घ्यायला नको का?

हो. घ्यायला हवे. पण कसे? घटना तर खूप मोठी आहे. शिवाय त्यातील कलमांची भाषा इतकी तांत्रिक व बोजड आहे की ती सगळ्यांनाच समजणार कशी?

हाही प्रश्न बरोबर आहे. पण त्याचीही घटनाकारांनी सोय करुन ठेवली आहे. घटनेच्या सुरुवातीला ‘उद्देशिका’ छापली आहे. या उद्देशिकेला प्रास्ताविका, सरनामा असेही म्हणतात. या उद्देशिकेत अख्खी घटना सामावलेली आहे. म्हणजे जे जे घटनेत आहे, त्याचे बीज या उद्देशिकेत आहे. घटना समितीतील लोकांनी तिची प्रशंसा करताना हे घटनेचे सार, तत्त्वज्ञान, पाया आहे असे म्हटलेले आहे. ही उद्देशिका अर्थासहित लक्षात ठेवली की झाले. आपण भारताचे नागरिक व्हायला पात्रतेचे किमान प्रशिक्षण घेतले असा त्याचा अर्थ होतो. आता शाळेत प्रत्येक पुस्तकात ती छापलेली असते, हे म्हणूनच चांगले पाऊल आहे. पण ती समजून घेतली तरच हे पाऊल पुढे पडले असे होईल.

काय आहे या उद्देशिकेत? आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात पाहिलेत तर तुम्हाला ती दिसेल. आपल्या चर्चेसाठी म्हणून खाली ती देत आहे-

भारताच्या संविधानाची उद्देशिका

आम्ही, भारतीय लोक, भारताचे एक
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा 
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची आणि संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

यात किता वाक्ये आहेत? यात ओळी अनेक आहेत. पण वाक्य फक्त एक आहे. स्वल्पविराम, अर्धविराम अनेक ठिकाणी आहेत. पूर्णविराम मात्र शेवटी एकच आहे. हे एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. भारताचे नागरिक होण्याचे प्रशिक्षण फक्त एका वाक्याचे. किती सोपे आहे नाही! हो. सोपेच आहे. फक्त थोडे काळजीपूर्वक त्यातील शब्द समजून घ्यायला हवेत. आताच्या घडामोडींशी त्यांचा संबंध जुळवता आला पाहिजे.

यात अनेक शब्द आहेत. हे शब्द म्हणजे मूल्य किंवा संकल्पना आहेत. हा प्रत्येक शब्द महत्वाचा अर्थ असलेला जणू मोती आहे. या प्रत्येक मोत्याचा अन्य मोत्यांशी संबंध आहे. प्रत्येकाचा एक अर्थ आहेच. तसाच तो इतर शब्दांशी जोडला की त्याचा अर्थ आणखी सखोल होतो. उद्देशिका अशा प्रकारे अनेक मौल्यवान मोती एका सूत्रात ओवलेला मोत्यांचा हार किंवा माळ आहे.

आपल्या संविधानातील प्रत्येक गोष्ट संविधान सभेत चर्चा करुन मंजूर झालेली आहे. आज आपण टीव्हीला लोकसभेतले कामकाज पाहतो. तसेच कामकाज या संविधान सभेत चालायचे. वर दिलेली उद्देशिकाही या सभेत मंजूर करुन घ्यावी लागली. ती मंजूर होत असताना तिच्यात काही बाबींची भर घालायची सूचना आली. त्यातील एक सूचना सुरुवातीला देवाचे स्मरण करावे, अशी होती. तथापि, बहुमताने ती नामंजूर करण्यात आली. नामंजूर करणाऱ्यांत देवाला मानणारे अनेक होते. पण त्यांनाही वाटत होते, आपल्या घटनेचा कारभार देवाच्या नावाने चालता कामा नये. देव आपल्या मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये किंवा मनामध्ये. त्याला राज्यकारभारात आणायचे नाही. राज्याचा कारभार हा इहवादी असेल.

दुसरी सूचना आली गांधीजींचे नाव घालून त्यांच्याप्रति कृतज्ञता अर्पण करण्याची. देशाला मुक्त करण्यासाठी जे हुतात्मे झाले त्या सर्वांचे प्रतीक म्हणून गांधीजींच्या नावाची सूचना होती. घटनेचे कामकाज चाललेले असतानाच गांधीजींचा खून झाला होता. त्यामुळे या सूचनेला महत्व आले होते. परंतु, गांधीजींच्या जवळच्या अनुयायांनीच तिला नकार दिला. त्या सर्वांच्या मते, घटनेत कोणा व्यक्तीचे नाव असू नये. त्यातून व्यक्तिपूजेला चालना मिळेल. न जाणो अशा व्यक्तिपूजेतून हुकूमशाही उदयाला येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ च्या संविधान सभेतील आपल्या भाषणात विभूतिपूजेचा हा धोका ठळकपणे मांडला आहे. लोक हेच सर्वाधिकारी आहेत, ही आपल्या घटनेची भूमिका आहे.

‘आम्ही भारतीय लोक...’ या उद्देशिकेतील ओळींतून भारतीय जनतेचे सर्वाधिकारीपण सांगितले गेले आहे. उद्देशिकेचा हा पहिला भाग. दुसरा भाग भारताचे स्वरुप काय असेल हे सांगणारा आहे. तो ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य’ या पाच शब्दांतून व्यक्त होतो. तर तिसरा भाग उद्दिष्टांचा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रत्येक भारतीय नागरिकास प्रदान करण्याचे उद्दिष्ट घटनेने जाहीर केले आहे. या उद्दिष्टांचे घटकही त्या त्या उद्दिष्टापूर्वी नोंदवलेले आहेत. उदा. समानता कशाची? – तर दर्जा व संधीची.

एक वाक्याची उद्देशिका पण त्यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थ व व्याप्तीची चर्चा खूप प्रदीर्घ होऊ शकते. या लेखाच्या मर्यादेत ती करणे शक्य नाही. नमुन्यादाखल काही शब्दांची फोड थोडक्यात करुया.

आपल्या देशाचे स्वरुप सांगणारा पहिला शब्द आहे ‘सार्वभौम’. त्याचा अर्थ आहे, बाह्य व अंतर्गत (राजा/हुकूमशहा/गट) अशा दोन्ही नियंत्रणातून आपला देश मुक्त असेल. जनतेने निवडलेल्या सरकारच्या हाती देशाच्या कारभाराचे नियंत्रण राहील. राज्यकर्ते संकुचित हितासाठी कोणत्याही जागतिक शक्तीच्या अंकित जाणार नाहीत, या शक्तींच्या प्रभावाखाली देशांतर्गत निर्णय होणार नाहीत, जागतिक सहकार्य व मित्रत्व आपल्या इतिहासातून मिळालेल्या बोधातून ठरेल, जनतेला विश्वासात घेऊन तिच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहात-संसदेत योग्य त्या चर्चेने असे निर्णय होतील, याविषयी सजग असायला हवे. राष्ट्र म्हणून विकसित होत असताना, अन्य देशांशी परस्पर सहकार्य करत असताना अखेर देशांच्या भिंती गळून सगळे जगच एक झाले पाहिजे, ही आपली मनीषा असली पाहिजे. आपल्या राष्ट्रवादाची घोषणा ‘जय हिंद-जय जगत’ हीच असली पाहिजे.

देशाचे स्वरुप वर्णन करणारा दुसरा शब्द आहे ‘समाजवादी’. ‘समाजवाद’ या संकल्पनेचा मूळ ढोबळ अर्थ आहेः उत्पादन जर सामूहिक तर उत्पादन साधनांची मालकीही सामूहिक हवी. ती खाजगी असू नये. उत्पादन नफ्यासाठी नव्हे, तर गरजेसाठी हवे. संपत्तीचे न्याय्य वाटप व्हायला हवे. कुटुंबात सक्षम माणसे रोजगाराला जातात व त्यांनी कमावून आणलेले कुटुंबातील अन्य सदस्यांना (आई-वडिल, मुले) गरजेप्रमाणे दिले जाते. हीच स्थिती देशात हवी. क्षमतेप्रमाणे काम व गरजेप्रमाणे वाटप.

भारतात या मूळ अर्थाप्रमाणे व्यवहार करणे हितसंबंधीयांमुळे कठीण असल्याने भारताच्या संदर्भात या समाजवादाचा आजचा मर्यादित अर्थ आहे- विकासाचे प्राधान्य व दिशा वंचितांना न्याय मिळण्याची राहील. कामगार-कष्टकऱ्यांना हितकारक व आर्थिक विषमता कमी करणारे कायदे केले जातील. सरकारी मालकीचे उद्योग असलेली मिश्र अर्थव्यवस्था व यात सरकारी टक्का अधिक राहील, याची दक्षता घेतली जाईल. भारत एक कल्याणकारी राज्य असेल.

देशात प्रगती झाली आहे. तरीही खूपसे समाजविभाग अजूनही दुर्बल आहेत. काहींना खूप तर काहींना अत्यल्प मिळते आहे. कामगारांत काही जण एकदम संरक्षित, तर असंख्य कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. काहींना उत्तम शाळा, उत्तम आरोग्य व्यवस्था तर असंख्यांना या सेवा कमी प्रतीच्या. ...अशी कैक उदाहरणे देता येतील. अशी विषमता, अशी वंचितता आपल्याला नामुष्की आणते. या स्थितीविषयी आपल्या मनात खंत, अस्वस्थता असावयास हवी आणि जमेल त्या मार्गाने ती बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वहिताचाच विचार न करता आपल्यापेक्षा कमकुवत असणाऱ्यांच्या प्रति अनुकंपा ठेवायला हवी. समाजवाद हे भारताचे वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला ही भूमिका ठेवावी लागेल.

तिसरा शब्द आहे- धर्मनिरपेक्षता. याची थोडी चर्चा आपण देवाचे नाव उद्देशिकेत घ्यायला विरोध झाला त्याविषयी बोलताना केली आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ या संकल्पनेबद्दल सूत्ररुपाने असे म्हणता येईलः सरकारचा धर्म असणार नाही. सरकारी कामकाजात धर्माचा हस्तक्षेप असणार नाही. सर्व धर्मीयांप्रती समान वागणूक राहील. धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे. तथापि, आरोग्य, सामाजिक नीतिमत्ता, सुव्यवस्था व संविधानातील अन्य मूल्ये यांना बाधा येत असल्यास सरकार, न्यायालय धर्मपालनाच्या अधिकारात हस्तक्षेप करणार. उदा. शनिशिंगणापूर व हाजी अली येथे स्त्रियांना प्रवेश बंदीमुळे दर्जा व संधीची समानता या मूल्याला धोका पोहोचत असल्याने न्यायालयाने ही बंदी रद्द करवली. दही हंडीमुळे अपघात होऊन आरोग्याला धोका पोहोचतो म्हणून तिच्या उंचीवर बंधन घातले.

स्वातंत्र्य, समता, बंधुता या उद्दिष्टांची लेखाच्या मर्यादेमुळे स्वतंत्रपणे अधिक चर्चा न करता घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मूल्यांविषयी काय म्हणतात, ते वाचणे अधिक उद्बोधक ठरेल. वर उल्लेख केलेले २५ नोव्हेंबर १९४९ चे घटना समितीतीलच हे भाषण आहे. बाबासाहेब म्हणतातः

‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्त्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या आस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल.’

या लेखाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांकडे लक्ष वेधणे व भारतीय नागरिक म्हणून त्यांचा अर्थ समजून आपल्या जीवनात त्याची अंमलबजावणी तसेच सरकार त्याचे पालन करते आहे की नाही यावर देखरेख करण्याचे महत्व विशद करणे हा होता. या सर्व मूल्यांविषयी आपल्याला विस्तृत माहिती हवी असल्यास आमची याविषयीची एक पुस्तिका आपण खाली दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड करु शकता. प्रत्यक्ष पुस्तिका हवी असल्यास तिची किंमत १० रु. अधिक टपाल खर्च देऊन मागवू शकता. प्रतींची संख्या अधिक असल्यास बरे. चेंबूरला आमच्या मित्र संघटनेच्या कार्यालयात जाऊनही आपल्याला त्या घेता येतील.

आम्ही संविधान संवर्धन समितीतर्फे शाळा, कॉलेजे, वस्त्या, संघटनांचे कार्यकर्ते अशांसाठी या विषयाची सत्रे घेतो. राष्ट्र सेवा दल, एस. एम. जोशी फाऊंडेशन, केशव गोरे स्मारक ट्रस्ट अशा अनेक संस्था हे काम करत आहेत.  आपण त्यासाठी आम्हाला निमंत्रित करु शकता. या सत्रांनंतर सहभागी मंडळींनी आपल्याला जमेल तिथे, जमेल त्या प्रमाणात संविधानातील मूल्यांचा प्रचार करावा, ही अपेक्षा आहे. भारतीय नागरिकत्वाचा मूलाधार असलेली ही संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये सतत प्रचारली तरच ती लोकांच्या मनात राहणार आहेत. म्हणूनच आपण प्रत्येकाने त्यांचे प्रचारक होणे नितांत गरजेचे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________________________


‘संविधानातील मूल्ये’ ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी लिंकः

https://drive.google.com/file/d/0ByFOj5QtRpAdRHc2X1pKX3ZoVWs/view?usp=sharing 

Monday, October 2, 2017

आंबेडकरी बौद्धांच्या अस्मिता-जाणिवांतले घोळ

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळ आला की आपण काय कमावले-काय गमावले याचा लेखाजोखा मनात सुरु होतो. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांतला प्रामुख्याने महार हा विभाग बाबासाहेब आंबेडकरांच्यासोबत बौद्ध झाला. महारपण सोडणे व बौद्ध होणे या केवळ जाणीवेने त्याच्या चेतनेचा कायापालट झाला. बौद्ध धम्माची विज्ञानाशी सुसंगतता व मानवतेप्रती मैत्री-करुणेचे आवाहन या वैचारिक श्रीमंतीने या समाजातल्या जाणत्या वर्गाला लखलखीत अस्मिता दिली. बाबासाहेबांनी त्यांचे काम केले. धम्मदीक्षेनंतर दीड महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाल्याने यापेक्षा अधिक काही करणे अर्थातच शक्य नव्हते. त्यांनी दिलेली चेतना व अस्मिता सम्यक आशयाने समृद्ध करण्याची व अन्य समाजविभागांत संक्रमित करण्याची जबाबदारी त्यांच्यानंतरच्या आंबेडकरी चळवळीचे मुखंडपण स्वीकारणाऱ्यांची होती. त्यांनी ती पार पाडली नाही असेच म्हणावे लागते.

१९५६ च्या धम्मस्वीकारानंतरचा गेल्या साठ वर्षांतला प्रवास काही बारीक अपवाद वगळता उत्तेजक नाही. काहींच्या बौद्ध होण्याच्या अस्मितेला गर्वाची शिंगे फुटली. तर काहींना समाजातील प्रभुत्वशाली संस्कृतीत सामावताना (खरं म्हणजे शरण जाताना) आपल्या बौद्धपणाचाच अडसर वाटू लागला. भाऊ कदम किंवा अन्य गणपती बसवणाऱ्या प्रस्थापित-शरण बौद्धांना गर्ववाले कसे धोपटून काढतात, बहिष्काराच्या धमक्या देऊन माफी मागायला लावतात हे आपण नुकतेच अनुभवले. याविरोधात बाबासाहेबांनीच संविधानात दिलेल्या व्यक्तीच्या उपासना स्वातंत्र्यावरचा हा घाला आहे असे म्हणून गर्ववाल्यांना ‘तालिबानी’ संबोधणारे बौद्ध तसेच अन्य समाजविभागांतले पुरोगामीही आपण पाहिले. या पुरोगाम्यांना चितपट करण्यासाठी खुद्द बाबासाहेबांनीच ‘पंढरी-आळंदी किंवा जेजुरीला किंवा इतर कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल..’ म्हटल्याचा दाखला काहींनी दिला. असा दाखला देणाऱ्यांत गर्ववाले व पुरोगामी या दोहोंच्याही विरोधात असलेले प्रतिगामी अधिक होते.

या कोलाहलात बौद्ध धम्मस्वीकारावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा व त्यातील ‘मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कुठल्याही देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही’ या प्रतिज्ञेचा वारंवार उल्लेख झाला. तथापि, या प्रतिज्ञांच्या यादीतील महत्वाच्या अन्य काही प्रतिज्ञा दुर्लक्षित राहिल्या. आवाजी वातावरणात तशा त्या नेहमीच राहतात. ११ व्या क्रमांकावरील प्रतिज्ञा ही अशीच नेहमी दुर्लक्षित राहणारी. ‘मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गांचा अवलंब करेन’ असे या प्रतिज्ञेत म्हटले आहे. अष्टांग मार्गात ज्या आठ बाबींचा उल्लेख आहे, त्या प्रत्येक शब्दाआधी ‘सम्यक’ अशी संज्ञा येते. या ‘सम्यक’ संज्ञेला बुद्धाच्या विचारांत कळीचे महत्व आहे. सम्यक म्हणजे सर्व बाजूंनी, सारासार विचार करुन ठरवलेले, योग्य, विवेकाचे अधिष्ठान असलेले.

अस्मिता वा वादांच्या तलवारबाजीत या ‘सम्यका’चा बळी जातो. सम्यकाच्या मापाने या घटना मोजल्या तर काही निराळे पदर, वेगळे आयाम व संदर्भ ध्यानी येतात. समाजाच्या समतोल धारणेस ते उपयुक्त असतात.

हे इतके वाचल्यानंतरही अजून भाऊ कदमांच्या मी बाजूने की विरोधात हे काही कळत नाही, असे काही वाचकांना वाटू शकते. त्यांची अधीरता मी समजू शकतो. थोडे थांबा अशी त्यांना विनंती आहे. त्या मुद्द्याकडे मी येणार आहे. लेखाची सुरुवात करताना धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळ आला की लेखाजोखा मनात सुरु होतो असे जे मी म्हणालो, तो समग्र लेखाजोखाही इथे मी मांडणार नाही. ते एक मोठे व क्रमाक्रमाने करण्याचे कार्य आहे. अलिकडच्या काही घटनांच्या संदर्भाने पुढे येणाऱ्या दोन-तीन मुद्द्यांचीच मी चर्चा करणार आहे. ते मुद्दे या मधल्या वादंगात फार पुढे आले नाहीत किंवा अधोरेखित झाले नाहीत, असे मला वाटते. तेव्हा, ज्यांना धीर असेल त्यांनी थोडे वळण-वळसे माझ्याबरोबर घ्यावेत ही विनंती.

गेल्या आठवड्यात कोकणात गावी गेलो होतो. आमच्या वाडीत एका नातेवाईकाचा पुण्यानुमोदन (मरणोत्तर कार्य) कार्यक्रम होता. आदरांजली वाहताना एका वक्त्याने मृत व्यक्तीच्या चांगल्या गुणांची उजळणी केली तसेच त्याच्या दारुच्या व्यसनाची व त्यामुळे त्याच्या झालेल्या मृत्यूची नोंद घेतली. सध्याची पिढी, तिच्याकडून होणारी आरोग्याची हेळसांड याबद्दल चिंता व्यक्त केली. या वक्त्याच्या भाषणाच्या सुरुवातीच्या स्मरण व अभिवादनात बाबासाहेब, फुले, शिवाजी, शाहू, सावित्रीबाई, माता भीमाई, माता रमाई...अशी महामानवांची बरीच मोठी यादी होती. म्हणजे बौद्धांच्यातला तो सरावलेला वक्ता होता. शेवट मात्र त्याने परमेश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो असा केला.

याबद्दल कोणालाच काही वावगे वाटले नाही. नंतरच्या वक्त्यांनी कोणी ईश्वर, आत्मा याला आक्षेप घेतला नाही. मीही माझ्या त्यानंतरच्या भाषणात या वक्त्यांनी व्यसन, आरोग्य याबद्दल जे सांगितले त्याला अनुमोदन दिले. ईश्वर-आत्मा उल्लेखाकडे दुर्लक्ष केले.

माहेरी आलेल्या आमच्या एका नातेवाईक मुलीला तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह सासरी पोहोचवायला दुसऱ्या दिवशी गेलो. त्यांच्या गावी पोहोचलो. तिच्या या सासरच्या घरात जाताना आम्ही सरळ आत गेलो. पण छोट्या मुलीला घरातल्यांनी बाहेरच थांबवले. भाकरीचा तुकडा किंवा तांदूळ असे काहीतरी व पाणी तिच्यावरुन ओवाळून टाकले व मग तिला आत घेतले. आमच्याकडे याला चाक (म्हणेज दृष्ट) काढणे म्हणतात. लहानपणी मुंबईहून कोकणात गावी गेलो की माझीही अशीच चाक काढली जाई.

या घरात आमचे आदराने आतिथ्य केले गेले. घरात बुद्ध-बाबासाहेब वगळता कुठल्याच देवाचे फोटो नव्हते. आमचा मुलगा याबद्दल कसा दक्ष असतो, असे त्या घरातल्या आमच्या या मुलीच्या सासूबाई सांगत होत्या. त्यांचे पती खूप आजारी आहेत. काहीतरी ‘बाहेरचे’ (देवादिक, भगत) बघावे असे मला वाटते. पण माझा मुलगा कसा त्याला विरोध करतो, हे त्या अभिमानाने सांगत होत्या. मीही कौतुकाने त्यांना प्रतिसाद देऊन ऐकत होतो.

मी माझ्या वयवर्षे १६ ते २० या काळात असतो तर या दोन्ही ठिकाणी गोंधळ घातला असता. श्रद्धांजली वाहणाऱ्या माणसाने ईश्वर, आत्मा यातले आद्याक्षर उच्चारले असते तरी त्याचे भाषण बंद पाडले असते व त्याला बाबासाहेबांनी हेच का शिकवले वगैरेंचा भडिमार करुन अवमानित केले असते. कदाचित आमच्या गावातून ताबडतोब बाहेरही काढले असते. दृष्ट काढण्याच्या प्रसंगात दुसऱ्या गावात असतो तरी त्या चाक काढणाऱ्या बाईंना ‘बौद्ध असूनही तुम्ही अशा अंधश्रद्धा पाळता’ म्हणून फैलावर घेतले असते व त्यांच्या जेवणावर बहिष्कार घालून दारातूनच परतलो असतो. या काळात मी लहान असलो तरी गावोगाव बुद्धधम्मावर प्रवचनेही देत होतो. यात मैत्री, करुणा वगैरे बोलत असे. पण कडवेपणा अधिक होता. असा मी एकटा नव्हतो. आमचा तरुणांचा तसा गटच होता. आमची संघटना होती. तिचे नाव- बौद्ध युवा मंच.

आपला धम्म विज्ञाननिष्ठ आहे, त्यात ईश्वर, आत्मा काही नाही. तेव्हा बौद्धांच्या कार्यक्रमांत त्याबद्दल आपल्या बोलण्यात चुकूनही काही येता कामा नये. बौद्धवाडीत कोणाच्याही घरात देवाचा फोटो असता कामा नये. गळ्यात दोरे-गंडे असता कामा नयेत, घरात मिरच्या-नारळ लटकलेले किंवा मुहूर्तमेढीला दोरे बांधलेले आढळता कामा नयेत. हे गंडे-दोरे, मिरच्या कापायची आम्ही मोहीमच काढली होती. या सगळ्या कापलेल्या वस्तू एका हाऱ्यात (मोठी टोपली) गोळा करुन ताशे वाजवत वाडीच्या बाहेर नेऊन आम्ही त्यांची होळी केली होती. कोणी नवसाला अथवा पिशाच्चाची शांती करण्यासाठी रात्री लपूनछपून वाडीबाहेर जाऊन कोंबडे कापतोय का यावर आम्ही हेरगिरी करत असू. जे सापडतील त्यांना दंड करत असू. ज्याच्या अंगात येईल त्याला पन्नास रुपये दंड ठेवल्याचे मला आठवते. लग्नात हळद, मुंडावळ्या अजिबात असता कामा नयेत. २२ प्रतिज्ञांतल्या १९ व्या प्रतिज्ञेतले ‘मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो’ हे बाबासाहेबांचे शब्द आमच्या मनात जागा फिरवत व ते ‘मनुष्यमात्राला असमान मानणाऱ्या नीच हिंदू धर्माचा’ असे होत. हिंदू धर्माला व देवांना शक्य तेवढ्या ताकदीने आम्ही नीच म्हणत असू. भयंकर घृणा वाटायची हिंदू धर्म व हिंदू देवतांविषयी. गावातले काही झाडांखालचे दगड-देव आम्ही फोडून तोडून टाकले होते. आमच्या आजच्या अवनत अवस्थेला हाच हिंदू धर्म व त्यातील हे देव कारणीभूत आहेत याविषयी मनात राग, चीड, संताप तीव्र होता.

अशा त्या काळात भाऊ कदम यांच्या बौद्ध असतानाही गणपती बसवण्याच्या कृत्याबाबत माझी प्रतिक्रिया काय राहिली असती? ...त्यांचा गणपती इको असो नाहीतर बिनइको असो त्याची त्यांच्या घरात घुसूनच तोडफोड करायची भूमिका घेतली असती. गावी असता तर तोडफोड नक्की. शहरात असल्याने तोडफोड नाही तरी घरी जाऊन प्रत्यक्ष धमकावण्याचा प्रयत्न केला असता. बायकोला वाटले म्हणून, मुलीला वाटले म्हणून, बायको परधर्माची आहे म्हणून तिचे उपासनास्वातंत्र्य राखले पाहिजे वगैरे काहीही माझ्या मनाला शिवले नसते. भाऊ कदम स्वतःला बौद्ध म्हणवत असेल तर हे असेच होणार. त्यांनी स्वतःला महार म्हणून घोषित करावे. मग मला काही प्रश्न नव्हता. बौद्ध असताना असे वागणे मी सहन करु शकलो नसतो. समाजपरिवर्तनाच्या लढ्याला सिद्ध असलेल्या आमच्या बौद्धांच्या फौजेतला एक सैनिक फितूर निघाला, त्यामुळे आमचा लढा कमजोर व्हायची शक्यता आहे, त्यासाठी त्याला धडा शिकवायला हवा, ही भूमिका त्यामागे असती. ‘मजहब खतरे में है’ या भूमिकेशी तिचे साम्य नाही.

(बाबासाहेबांची हिंदू देवतांना भजलात तर वाळीत टाकण्याच्या उद्गारामागे समाजाला त्याच्या दयनीयतेला कारण झालेल्या कर्मकांडातून बाहेर काढून आधुनिक वैज्ञानिक पायावर उभे करावे ही भावना आहे. ते उद्गार पालकत्वाच्या भूमिकेतून आलेले दिसतात. त्यांचा शब्दशः अर्थ घेणे बरोबर होणार नाही. बौद्ध धम्म स्वीकारापूर्वीचे व घटनानिर्मितीनंतरचे ते उद्गार आहेत. घटनेत उपासना स्वातंत्र्य नोंदवलेले बाबासाहेब त्याविरोधात भूमिका घेतील हे संभवत नाही.)

अशावेळी आमचे हे वागणे ‘तालिबानी’ समजायचे का? ...नाही. त्यात कट्टरता आहे. पण त्यामागे हिंदू संस्कृतीने जी हीन वागणूक आम्हाला दिली त्याविषयीची रास्त चीड होती. माणूसपणाचे हक्क शाबित करण्याचा तो एल्गार होता. तालिबानी परधर्म, परमत शत्रू समजतात. सहिष्णू भूमिका घेणारे स्वधर्मीयही त्यांना शत्रूस्थानी असतात. त्यांचे धर्ममत हेच जगात सर्वश्रेष्ठ व तेच टिकले पाहिजे, असे त्यांना वाटते. त्यांचे तत्त्वज्ञानच मूलतत्त्ववादी आहे. आम्हाला हिंदू हा परधर्म असता तर काही प्रश्न नव्हता. आमचे बापजादे तो आपला धर्म मानत होते. या आपला मानलेल्या धर्मानेच त्यांना गुलामीत लोटले होते. उन्नत जीवनासाठी हा नरक संपूर्णतः नष्ट करायला हवा ही आमची भावना होती. ख्रिश्चन व मुस्लिम धर्माबद्दल (त्यांच्यात ईश्वरी शक्तीला मान्यता असली तरी) आम्हाला अडचण नव्हती.

आम्ही पारंपरिक बौद्ध नव्हतो. नाही. बाबासाहेबांनी आम्हाला त्याच्या ओंजळीत घातले. एवढेच नव्हे, तर पारंपरिक बौद्ध धर्मात आलेल्या कर्मकांडापासून वेगळे असे ‘धम्म’ स्वरुप बाबासाहेबांनी आम्हाला दिले. त्यामुळे पारंपरिक बौद्धांचा हिंदू धर्मीयांविषयीचा निरपेक्ष दृष्टिकोण आमचा असणे संभवनीय नाही. सर्वधर्म समभाव हा मुद्दा लक्षात घेता पारंपरिक बौद्ध जसा हिंदू धर्मीयांना प्रतिसाद देतील तसा आम्ही तटस्थपणे देणे कठीण आहे. त्यामुळे दलाई लामा अन्य धर्मीयांशी जसे संबंध ठेवतात तसेच हिंदू धर्माशी ठेवू शकतात. हिंदू देवतांना नमस्कार करु शकतात. त्यांच्या दृष्टीने ती परमत सहिष्णुता किंवा सन्मान आहे. शिवाय एक परदेशी निर्वासित म्हणूनही भारतीय संस्कृतीला मान देण्याचे, तिच्याप्रती कृतज्ञता दर्शवण्याचे ते त्यांचे परराष्ट्र धोरणही आहे.

आम्ही आंबेडकर जयंतीला जातो, मग त्यांनी गणपतीला आले तर काय बिघडले? ...सवर्ण हिंदूंच्या या प्रश्नाला तार्किक उत्तर देता येत नाही. आंबेडकर जयंतीला येणारे हिंदू जरुर आदरास पात्र आहेत. पण त्यांना आंबेडकरांनी किंवा त्यांच्या समुदायाने वाईट वागवलेले नाही. आंबेडकर जयंतीला येणाऱ्यांनी नाही, पण त्यांच्या पूर्वजांनी व त्यांच्या धर्माने आम्हाला नीच मानले आहे. त्यांच्या देवतांच्या दारात आम्हाला कधी उभे केले नाही. त्यामुळे आंबेडकर जयंतीला येणारे हिंदू ज्या सहजतेने येतात, ती सहजतेची भावना आंबेडकरी बौद्धांमध्ये असणे कठीण आहे. जेव्हा हे नीच वागवणुकीचे सगळे संदर्भ पूर्णपणे विस्मरणात जातील त्यावेळी निरपेक्षपणे परस्परांच्या उपासना वा श्रद्धास्थानांना सन्मान देणे घडू शकते.

मी माझ्या जुन्या मनोभूमिकेत असतो तर भाऊ कदमांविषयी कसे वागलो असतो ते वर लिहिले आहे. आज माझ्या त्यावेळच्या भूमिकेतला एक समूह बौद्धांच्यात आहेत. मी त्यातून बाहेर पडलो तरी तो त्यातून निघालेला नाही. त्याची मनःस्थिती मी समजून घेतो. त्याचे समर्थन करत नाही. ते तत्त्वतःच गैर आहे, संविधानविरोधी आहे, असेच आता मला वाटते. असे वागण्याने आपण एकाकी पडतो. कर्मठ, प्रतिगामी आहोत, असाच इतरांचा समज व्हायला कारण ठरतो. आपली भूमिका अन्य समुदायांना पटवू शकत नाही, उलट त्यांच्या मनात आपण अढीच तयार करतो. अशावेळी आपण अधिक जाणतेपणा दाखवून प्रौढपणे वागायला हवे असे मला वाटते. आज जातीयवादाचे-सांप्रदायिकतेचे झोटिंग समाजाला आवळत असताना जे या झोटिंगांच्या विरोधात आहेत, असे सवर्ण हिंदू आपल्यापासून कदापि दूर जाता कामा नयेत, याचीही दक्षता घ्यायला हवी.

आज बौद्ध समाजात अनेक बदल होत आहेत, ते लक्षात घ्यायला हवेत. जातीयता व त्यामुळे होणारे अत्याचार अजून थांबलेले नाहीत. तथापि, शहरात व ग्रामीण भागातही नव्या पिढीत पहिल्यासारखी अस्पृश्यता राहिलेली नाही. सवर्ण हिंदूंच्या तुलनेत बौद्धांचे राहणीमान पहिल्यासारखे सरसकट निम्न पातळीवर आता नाही. त्यात सकारात्मक फरक पडलेला आहे. बौद्धांच्या चळवळींची व प्रबोधनाची अवस्था ढासळलेली आहे. मी ज्या भावनेने जयभीम म्हणेन ती प्रेरणा आमच्या मुलांची नाही. आमच्या आणि त्यांच्या भोगण्यात-पर्यायाने जाणिवांत फरक पडलेला आहे. 

अशावेळी ईश्वर-आत्मा या उल्लेखांविषयी सजग राहण्याची पूर्वीची जाणीव धूसर आहे. एकीकडे बाबासाहेब-बुद्धाच्या प्रतिमांना हार घालायचे व त्याचवेळी अन्य देवांना पूजायचे, हिंदू सण साजरे करायचे हे सहज होते आहे. नवी सरमिसळ एका बाजूला स्वागतशील आहे. पण काहीही गांभीर्य न ठेवता दिशाहिनतेनेही हे होत आहे. असा गांभीर्याचा अभाव वा वैचारिक मुळे विस्मरणात जाणे धोक्याचे आहे. ही मुळे स्मरणात ठेवून त्यांचा विकास करुन प्रगल्भतेने हिंदूंशी साहचर्य-सहयोग करणे हे व्हायला हवे. कोणी गणपतीला बोलावले तर त्याच्याकडे जरुर जावे. अगदी गणपतीला हात जोडणे, सोसायटी-वस्तीतील गणेशोत्सवाच्या आयोजनात सहभागी होणे याचे मी स्वागतच करतो. पण स्वतःच घरात गणपती बसवणे मला मंजूर नाही. एखाद्याची श्रद्धाच असेल तर त्याचा मी आदर करेन. आंतरजातीय लग्नामुळे घरात हिंदू सदस्य असेल व त्याच्या इच्छेखातर गणपती बसवला असेल तर त्याचे मी अभिनंदन करेन. तथापि, आंबेडकरी बौद्धांच्या कार्यक्रमपत्रिकेवरला व्यवस्था बदलाचा लढा पूर्णत्वाला जाऊन एका समान जाणिवेच्या पातळीवर सर्व समाज पोहोचलेला नाही. अशावेळी गंमत म्हणून, पर्यावरणाचा संदेश म्हणून इकोफ्रेंडली गणपती बसवण्यामागे निरागस सहजता असू शकते, असे मला वाटत नाही. प्रतिष्ठित समुदायाने आपल्याला त्यातलेच समजावे म्हणून त्याच्या संस्कृतीचे अनुकरण हा भाग यात मोठा असतो. आपण बौद्ध आहोत हे कोणाला कळू नये, आम्ही पण तुमच्यातलेच आहोत, आपल्या मुलांनाही ती इतरांपेक्षा वेगळी आहेत हे वाटू नये, ती त्या प्रभुत्वशाली संस्कृतीचा भाग व्हावीत हा न्यूनगंड, ही इच्छा यामागे असते. भाऊ कदमांच्या व्यक्तित्वाचा व्यक्तिशः मला परिचय नाही. पण त्या थरातले लोक या न्यूनगंडाची शिकार असतात, याचा मला अनुभव आहे.

भाऊ कदमांसारख्या बौद्धांच्यातील न्यूनगंडाला, त्यांना धमकावून माफी मागायला लावणाऱ्या बौद्धांच्यातल्या जातीय धटिंगणतेला व नव्या पिढीतील आंबेडकरी जाणिवांच्या अभावाला आंबेडकरी चळवळीची आजची अवस्था जबाबदार आहे.

आणि या सगळ्यावरचा इलाज अर्थातच आंबेडकरी चळवळ दुरुस्त करुन तिला सम्यकतेच्या पायावर उभी करणे हाच आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
___________________________
आंदोलन, ऑक्टोबर २०१७