Thursday, October 19, 2017

या वादांवर मार्ग काढण्यासाठी एकत्र बसून चर्चा करुया !

बौद्धांनी दिवाळी करावी की करु नये याबद्दल घमासान चर्चेच्या पोस्ट्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. तथापि, या वादाचे लागते असलेले लोक अगदी नगण्य आहेत. या दोहोंच्या वादाचे काहीही पडलेले नसलेला बौद्ध समाजातील मोठा विभाग आपल्याला हवे तेच करतो आहे. हे वाद त्याच्या गावीही नाहीत.

आजच आम्ही काही सहकारी या विषयावर बोलत होतो. आमचे एक सहकारी हिरामण खंडागळे यांनी एक आठवण सांगितली. त्यांची सांगण्याची ढब न्यारी आहे. शेवटी आम्ही खो खो हसत सुटलो. मी ऐकले ते माझ्या शब्दांत मांडतो.
बौद्ध बहुसंख्येने राहत असलेल्या एका इमारतीत वरच्या माळ्यावरील एका बौद्ध इसमाच्या घरी तुळशीचे लग्न होते. खालच्या मजल्यावरील काही बौद्धांना हे सहन झाले नाही. बौद्ध असताना हा इसम हिंदू रुढी पाळतोच कसा? त्यांनी जाऊन त्याला असे न करण्याबद्दल तंबी दिली. तरीही तो ऐकेना. त्याच इमारतीत रिपब्लिकन पक्षाचे एक ज्येष्ठ नेते राहत होते. तंबी देणारे लोक त्यांच्याकडे गेले. तुम्ही तरी समज द्या त्याला, अशी या लोकांनी नेत्याला विनंती केली. नेत्याने फोन लावला त्या वरच्या मजल्यावरील इसमाला. लोकांची तक्रार सांगितली. नेत्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन तो इसम नेत्यास म्हणाला, “साहेब, मी तुळशीचे लग्न लावतो आहे, हे बरोबर. आणि मी ते लावणार. कारण ते मी हिंदू पद्धतीने लावत नाही. मी ते बौद्ध पद्धतीने लावतो आहे.”

आम्ही खो खो हसलो खरे. पण असे प्रकार गंभीरपणे करणाऱ्यांची अनेक उदाहरणे नंतर इतर सहकाऱ्यांनीही सांगितली. मयतालाही बौद्ध असल्याने नीळ लावणे वगैरे.

२६ नोव्हेंबरला संविधान दिनी मुंबईच्या देवनार पांजरापोळ येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दादर चैत्यभूमीपर्यंत अनेक संघटना मिळून आम्ही संविधान जागर यात्रा काढणार आहोत. तिच्या तयारीसाठी या नवरात्रात अनेक मंडपांतच आमच्या बैठका झाल्या. देवी बसवणारी ही वस्त्यांतील तरुण मुले आमचा आदर करत. दांडियाची सुरुवात व्हायच्या आधी त्यांचा मंच व माईक वापरायला देत. बैठकीला बसत. शेवटी यात्रेत आम्ही येणार आहोत, असे आश्वासन देत. एके ठिकाणी एक आयोजक तरुण म्हणाला, “सर, बिनधास्त बोला. आपलेच लोक आहेत.”

आपलेच म्हणजे बौद्ध. या मुलांना कोणतेही वैषम्य वाटत नव्हते, कोणताही अपराधीभाव त्यांच्यात नव्हता. जशी आंबेडकर जयंती तसा देवीचा उत्सव. तसाच गणपती. बाबासाहेबांबद्दल कणभरही कमी अभिमान नाही. तसेच गणपती-देवीबद्दलही काही वावडे नाही. एकदम समभाव.
मी राहत होतो त्या वस्तीतल्या मंडपातही अशीच बैठक झाली. तोच अनुभव...आपले लोक वगैरे. या वस्तीत आमचे एक पँथरचे नेते बौद्ध असतानाही होळी वगैरे कोणी रचली तर ती उद्धस्त करायचे. गणपती बसवायची तर कुणाची हिंमतच नव्हती. आम्ही मुले त्यांच्यासोबत असू. त्यांचे हे ‘अँग्री यंग मॅन’ असणे आम्हाला विलक्षण भावायचे. आमचे ते आदर्श होते. या जुन्या आठवणी एका बाजूला मनात उसळून येत होत्या अन् माझ्या त्याच वस्तीत देवीच्या मूर्तीच्या साक्षीने मी तरुण मुलांना संविधानातील मूल्ये समजावून सांगत होतो.

आहे हे असे आहे. यावर मार्ग काय?

ज्याला जे बरोबर वाटते तेच खरे व तेच इतरांनी ऐकायला हवे; नाहीतर तो धर्मद्रोह असे करुन कसे चालेल?
दिवाळीबद्दल गेल्या वर्षी एका मोठ्या धम्म परिषदेत मंचावरील भिख्खूंकडूनच दोन मते व्यक्त झाली. एका भन्तेंनी बौद्धांनी दिवाळी करु नये अशी भूमिका मांडली. त्याचे ऐतिहासिक कारण दिले. दुसऱ्या भन्तेंनी दिवाळी हा बौद्धांचा सण आहे, असे जोरदार समर्थन केले. त्यांनीही ऐतिहासिक संदर्भ दिले.

अशावेळी सर्वसामान्य बौद्धांनी (तुळशीचे लग्नवाले किंवा नवरात्रवाले सोडून जे या वादांना थोडी किंमत देतात त्यांनी) काय करावे, असा प्रश्न उभा राहतो. बौद्ध सूत्रांचे नव्या परिस्थितीत अर्थ लावण्यासाठी बुद्धानंतर शंभर वर्षांनी वा अशोकाच्या काळात धम्म संगिती (म्हणजे परिषदा) झाल्याची इतिहासात नोंद आहे. संगिती हा मोठा प्रकार झाला. पण आपण बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेनंतर आता ६१ वर्षांनी जे प्रश्न आपल्याला पडतात, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किमान छोट्या छोट्या परिषदा का घेऊ नयेत?

या परिषदांत बौद्धांमधल्या विविध मतांच्या प्रतिनिधींना बोलवावे. त्यांना आपले म्हणणे सकारण मांडायला सांगावे. त्याची टिपणे आधी वितरित करावी. मांडणी झाल्यावर त्या वक्त्यास प्रश्न विचारावे. दुसऱ्या मताच्या वक्त्यालाही हीच संधी मिळावी. अभिनिवेश, वकिली युक्तिवाद या मांडणींत नसावा. आपल्या मतांच्या लोकांनाच केवळ टाळ्या अशी गटबाजी नसावी. इतरांना आपले म्हणणे समजावून सांगणे, पटविणे ही रीत असावी. ही चर्चा लिहून काढावी. त्यातील विरोधाचे व सहमतीचे मुद्दे नीट नोंदवून त्यांचे इतिवृत्त तयार करावे. ते विचारार्थ विविध माध्यमांतून प्रसारित करावे. शक्य झाल्यास ही चर्चा रेकॉर्ड करुन यू ट्यूबवर अपलोड करावी. परिषद चालू असताना ती फेसबुक लाईव्हही करता येईल. या परिषदेत कोणत्याही निर्णयाला येऊ नये. अशा परिषदा महाराष्ट्रात विविध ठिकाणी व्हाव्यात. पहिल्या फेरीच्या परिषदांनंतर ६ महिन्यांनी दुसरी फेरी करावी. अशा काही फेऱ्यांनंतर एक मध्यवर्ती परिषद करावी. तिच्यातही निर्णयवजा काही जाहीर न करता सहमतीचे मुद्दे विशेष अधोरेखित करुन तुम्ही याचा विचार करा, असे समाजाला आवाहन करावे.

आज तमाम महाराष्ट्रातल्या बौद्धांची एकच एक शिखर संघटना नाही, ही वस्तुस्थिती मान्य करुन आमचेच ऐकायला हवे असा कोणत्याही संघटनेने आग्रह धरु नये. त्याने काहीही हाताशी लागणार नाही. अशा अधिकारी केंद्राकडे वाटचाल हा लांबचा पल्ला आहे. ते धर्मपीठ होता कामा नये ही सुद्धा दक्षता घ्यायला हवी. या परिषदांमुळे आज मनाला वाटेल तसे तलवारी परजणे चालू आहे, ते थांबून गंभीर चर्चेला लोक बसले तरी खूप यश मिळाले असे समजायला हवे.

हे कोणी करायचे?

माझ्याकडे सगळी स्पष्टता व आराखडा आहे असे नव्हे. मी कल्पना मांडतो आहे. आपल्या सगळ्यांच्या सूचनांतून त्यास अधिक आकार येऊ शकेल. क्रमात मलाही अजून काही सुचेल. एक नक्की वाटते. तरुणांनी यात पुढाकार घेतला तर अधिक बरे. याचा अर्थ ज्येष्ठांनी हे करण्यास प्रतिबंध आहे असे नव्हे. कोणत्याही राजकीय गटाच्या, मताच्या व्यक्तीस यातून वगळू नये. कोणालाही अस्पृश्य ठरवू नये. गंभीरपणे म्हणणे मांडणाऱ्या कोणालाही यात प्रवेश असावा.

या परिषदांकडे जाण्यासाठी सुरुवात म्हणून एखादा ‘नवयानी बौद्धः चिकित्सा व उपाय’ या किंवा अधिक उचित नावाने फेसबुक गटही सुरु करता येईल. अट एकच यावर ‘शुभ धम्म सकाळ, कडक जयभीम’ अशा पोस्ट्स न टाकता विषयाला अनुसरुनच चिकित्सा करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या तसेच उपाय सुचविणाऱ्या पोस्ट्स टाकल्या जाव्यात. याच्या admin ची जबाबदारी घेणाऱ्यांनी याबाबत दक्ष राहण्याची गरज असेल.

आपण या दिशेने चर्चा सुरु केली की अशा अनेक कल्पना पुढे येऊ शकतील.

बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे व त्याला मानणाऱ्या समुदायाचे भवितव्य नीट मार्गी लागण्यासाठी असे काहीतरी करण्याची गरज आहे, असे मला तीव्रतेने वाटते.

आपण विचार करावा, विनंती.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_______________________________________________

(आपणास योग्य वाटल्यास हे टिपण आपण ऑनलाईन तसेच प्रिंट माध्यमांद्वारे शेअर करावे ही विनंती.)

No comments: