Sunday, October 8, 2017

संविधानातील मूल्ये का व कशी समजून घ्यायची?

‘संविधान म्हणजे काय?’ हा प्रश्न शाळेतल्या मुलांना विचारला की बहुधा मुले त्यांच्या पाठ्यपुस्तकातली संविधानाची उद्देशिका दाखवतात. त्यांचा तर्क चुकीचा नसतो. कारण त्या उद्देशिकेच्या वर मोठ्या अक्षरात ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले असते व त्याच्या खाली त्याहून लहान आकारात ‘उद्देशिका’ असे लिहिलेले असते. गंमत म्हणजे ही मुले अभिमानाने सांगतात, “आम्हाला संविधान पाठ आहे.” त्यांना पाठ असते ती उद्देशिका. पाहुण्यांसमोर असे न चुकता घडाघड मुले बोलू लागली की शिक्षकांचे चेहरेही उजळतात. पूर्वी राष्ट्रगीतानंतर ‘भारत माझा देश आहे..’ ही प्रतिज्ञा अनेक शाळांतून म्हटली जाई. हल्ली त्यात सरकारी आदेशाने ‘उद्देशिके’ची भर पडली आहे.

मुलांनी ती पाठ म्हटली की त्यांचे आम्ही कौतुक करतो. मग हळूच त्यांचा अवमान किंवा ती खजिल होणार नाहीत अशा बेताने प्रश्न विचारतो, “तुम्ही आता ‘आम्ही, भारतीय लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा...’ असे जे म्हणालात त्यातील ‘सार्वभौम’ म्हणजे काय ते जरा सांगाल का?”

अर्थात, त्यांची गडबड उडते. सांगता येत नाही. उद्देशिकेतील मूल्यांविषयी फक्त शिक्षकांची म्हणून स्वतंत्रपणे सत्रे घेतानाही (काही अपवाद वगळता) यापेक्षा खूप वेगळा अनुभव नसतो. त्यांना संविधान ठाऊक असते. उद्देशिका म्हणजेच संविधान असे ते म्हणत नाहीत. पण सार्वभौम, समाजवाद या संकल्पनांचा अर्थ नीटसा कळला आहे, असे दिसत नाही.

पाठ असल्यास उत्तम. पण पाठ असो अथवा नसो. अर्थ समजणे महत्वाचे असते, याला अजूनही आपण कमी महत्व देतो याचा हा परिणाम आहे.

वस्त्यांमध्ये निरक्षर, अल्पशिक्षित महिला-पुरुषांसमोर बोलताना ‘संविधान’ हा शब्दच त्यापैकी अनेकांनी ऐकलेला नसतो, असे लक्षात येते. ‘घटना’ हा शब्द त्यातील काहींना ठाऊक असतो. तर काहींना तोही ठाऊक नसतो. “घटना म्हणजे काय?” असे विचाल्यावर ‘जी घडते ती घटना म्हणजे प्रसंग’ असा अर्थही काहीजण सांगतात. याला अपवाद बौद्ध समाजाचा असतो. बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत हे त्यांच्या मनात इतके मुरलेले असते की ‘देशाची घटना म्हणजे देशाचा कारभार करण्याच्या नियमांचा ग्रंथ’ हे त्यांतल्या बहुतेकांना ठाऊक असते. तथापि, सार्वभौम वगैरे शब्दांचा अर्थ विचारला की त्यांच्या समजाची अवस्था इतरांहून फारशी वेगळी नसते.

हे अनुभव विस्ताराने नोंदविण्याचे कारण एवढेच की आपला देश ज्या घटनेवर चालतो, त्या घटनेतील आशयाविषयी आपला समाज किती दक्ष आहे, याचे गांभीर्य आपल्याला कळावे. घटनेचे अभिमानी ‘घटनेला हात लावू देणार नाही’ वगैरे ठणकावून सांगतात. पण ‘या घटनेत काय आहे हे सांगता का?’ असे विचारल्यावर त्यांचीही भंबेरी उडते.

पण खरेच घटना समजून घेण्याची गरज आहे का? ती न समजल्याने आजवर काय अडले की जे पुढे अडणार आहे?

हो. अडले आहे. पुढेही अडणार आहे.

आज आपल्या देशात राजा नाही. राजा त्याला वाटेल ते निर्णय घेई, प्रजेला तो विचारत नसे. काही चांगले राजे प्रजेच्या मनाचा अंदाज घेऊन आपला कारभार तिच्या हितासाठी करत असत. पण प्रजेचे म्हणणे विचारात घेणे त्यांना बंधनकारक नसे. तसा काही नियम नसे. राजाला जनता निवडून देत नसे. तो वंशपरंपरागत असे. आता ती स्थिती गेली. आता सरकार प्रत्येक बाबतीत आपले म्हणणे विचारत नाही. पण आपण विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करतो म्हणजेच त्याने आपल्या म्हणण्याचे प्रतिनिधीत्व करावे, असे गृहीत आहे. आपण प्रचंड लोकसंख्येचे लोक सगळे एकत्र येऊन निर्णय घेऊ शकत नाही म्हणून आपले प्रतिनिधी आपण निवडतो. ते आपले प्रतिनिधी आहेत. आपले म्हणणे त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर मांडायचे असते. हे त्यांनी नीट मांडले नाही किंवा आपल्या हिताच्या विरोधात वागले तर पुढच्या वेळी आपण त्यांना निवडून देत नाही. म्हणजेच आपण सर्वसामान्य लोक अप्रत्यक्षपणे कारभार करतो. म्हणजेच आपण जनता आता देशाची सर्वाधिकारी आहोत. जुन्या भाषेत आपण राजा आहोत. जुन्या वंशपरंपरागत राजांची शाही म्हणजे सत्ता आता गेली. आता लोकांची शाही म्हणजेच लोकशाही आली आहे. ही लोकशाही कशी चालवायची याविषयी आपण सगळ्यांनी मिळून (म्हणजे आपल्या प्रतिनिधींनी) राज्यकारभाराच्या नियमांचे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणजे भारताची राज्यघटना. त्यात काय आहे हे आपल्याला ठाऊक नसेल तर आपण देशाचा कारभार करणार कसा? निवडून देऊ तो बघेल, तो घटना वाचेल, असे जर त्याच्यावरच सर्व सोपवले तर तो त्याच्या मनाला वाटेल तसा स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेईल किंवा निर्णयात सहभागी होईल. म्हणजे, तो प्रतिनिधी आपला; पण निर्णय घेणार त्याच्या हिताचे, अशी गडबड होईल. सध्या अशी गडबड होते आहे. म्हणून घटनेत काय आहे, याविषयी आपण जागृत असायला हवे.

एखादा माणूस शिक्षक होतो. त्यासाठी त्याला डीएड किंवा बीएड करावे लागते. म्हणजे कसे शिकवावे त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. विजेची कामे करणाऱ्याला इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण घ्यावे लागते. बिगर माहितीने अंदाजाने त्याने काम केले तर त्यालाही शॉक लागेल व इतरांचाही जीव धोक्यात येईल. असे प्रत्येक कामाचे आपल्याला सांगता येईल. मग देशाचा कारभार चालवणारे जर आपण असू तर तो कसा चालवायचा, किमान तो चालवणारे नीट चालवतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण आपण घ्यायला नको का?

हो. घ्यायला हवे. पण कसे? घटना तर खूप मोठी आहे. शिवाय त्यातील कलमांची भाषा इतकी तांत्रिक व बोजड आहे की ती सगळ्यांनाच समजणार कशी?

हाही प्रश्न बरोबर आहे. पण त्याचीही घटनाकारांनी सोय करुन ठेवली आहे. घटनेच्या सुरुवातीला ‘उद्देशिका’ छापली आहे. या उद्देशिकेला प्रास्ताविका, सरनामा असेही म्हणतात. या उद्देशिकेत अख्खी घटना सामावलेली आहे. म्हणजे जे जे घटनेत आहे, त्याचे बीज या उद्देशिकेत आहे. घटना समितीतील लोकांनी तिची प्रशंसा करताना हे घटनेचे सार, तत्त्वज्ञान, पाया आहे असे म्हटलेले आहे. ही उद्देशिका अर्थासहित लक्षात ठेवली की झाले. आपण भारताचे नागरिक व्हायला पात्रतेचे किमान प्रशिक्षण घेतले असा त्याचा अर्थ होतो. आता शाळेत प्रत्येक पुस्तकात ती छापलेली असते, हे म्हणूनच चांगले पाऊल आहे. पण ती समजून घेतली तरच हे पाऊल पुढे पडले असे होईल.

काय आहे या उद्देशिकेत? आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात पाहिलेत तर तुम्हाला ती दिसेल. आपल्या चर्चेसाठी म्हणून खाली ती देत आहे-

भारताच्या संविधानाची उद्देशिका

आम्ही, भारतीय लोक, भारताचे एक
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा 
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची आणि संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

यात किता वाक्ये आहेत? यात ओळी अनेक आहेत. पण वाक्य फक्त एक आहे. स्वल्पविराम, अर्धविराम अनेक ठिकाणी आहेत. पूर्णविराम मात्र शेवटी एकच आहे. हे एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. भारताचे नागरिक होण्याचे प्रशिक्षण फक्त एका वाक्याचे. किती सोपे आहे नाही! हो. सोपेच आहे. फक्त थोडे काळजीपूर्वक त्यातील शब्द समजून घ्यायला हवेत. आताच्या घडामोडींशी त्यांचा संबंध जुळवता आला पाहिजे.

यात अनेक शब्द आहेत. हे शब्द म्हणजे मूल्य किंवा संकल्पना आहेत. हा प्रत्येक शब्द महत्वाचा अर्थ असलेला जणू मोती आहे. या प्रत्येक मोत्याचा अन्य मोत्यांशी संबंध आहे. प्रत्येकाचा एक अर्थ आहेच. तसाच तो इतर शब्दांशी जोडला की त्याचा अर्थ आणखी सखोल होतो. उद्देशिका अशा प्रकारे अनेक मौल्यवान मोती एका सूत्रात ओवलेला मोत्यांचा हार किंवा माळ आहे.

आपल्या संविधानातील प्रत्येक गोष्ट संविधान सभेत चर्चा करुन मंजूर झालेली आहे. आज आपण टीव्हीला लोकसभेतले कामकाज पाहतो. तसेच कामकाज या संविधान सभेत चालायचे. वर दिलेली उद्देशिकाही या सभेत मंजूर करुन घ्यावी लागली. ती मंजूर होत असताना तिच्यात काही बाबींची भर घालायची सूचना आली. त्यातील एक सूचना सुरुवातीला देवाचे स्मरण करावे, अशी होती. तथापि, बहुमताने ती नामंजूर करण्यात आली. नामंजूर करणाऱ्यांत देवाला मानणारे अनेक होते. पण त्यांनाही वाटत होते, आपल्या घटनेचा कारभार देवाच्या नावाने चालता कामा नये. देव आपल्या मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये किंवा मनामध्ये. त्याला राज्यकारभारात आणायचे नाही. राज्याचा कारभार हा इहवादी असेल.

दुसरी सूचना आली गांधीजींचे नाव घालून त्यांच्याप्रति कृतज्ञता अर्पण करण्याची. देशाला मुक्त करण्यासाठी जे हुतात्मे झाले त्या सर्वांचे प्रतीक म्हणून गांधीजींच्या नावाची सूचना होती. घटनेचे कामकाज चाललेले असतानाच गांधीजींचा खून झाला होता. त्यामुळे या सूचनेला महत्व आले होते. परंतु, गांधीजींच्या जवळच्या अनुयायांनीच तिला नकार दिला. त्या सर्वांच्या मते, घटनेत कोणा व्यक्तीचे नाव असू नये. त्यातून व्यक्तिपूजेला चालना मिळेल. न जाणो अशा व्यक्तिपूजेतून हुकूमशाही उदयाला येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ च्या संविधान सभेतील आपल्या भाषणात विभूतिपूजेचा हा धोका ठळकपणे मांडला आहे. लोक हेच सर्वाधिकारी आहेत, ही आपल्या घटनेची भूमिका आहे.

‘आम्ही भारतीय लोक...’ या उद्देशिकेतील ओळींतून भारतीय जनतेचे सर्वाधिकारीपण सांगितले गेले आहे. उद्देशिकेचा हा पहिला भाग. दुसरा भाग भारताचे स्वरुप काय असेल हे सांगणारा आहे. तो ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य’ या पाच शब्दांतून व्यक्त होतो. तर तिसरा भाग उद्दिष्टांचा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रत्येक भारतीय नागरिकास प्रदान करण्याचे उद्दिष्ट घटनेने जाहीर केले आहे. या उद्दिष्टांचे घटकही त्या त्या उद्दिष्टापूर्वी नोंदवलेले आहेत. उदा. समानता कशाची? – तर दर्जा व संधीची.

एक वाक्याची उद्देशिका पण त्यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थ व व्याप्तीची चर्चा खूप प्रदीर्घ होऊ शकते. या लेखाच्या मर्यादेत ती करणे शक्य नाही. नमुन्यादाखल काही शब्दांची फोड थोडक्यात करुया.

आपल्या देशाचे स्वरुप सांगणारा पहिला शब्द आहे ‘सार्वभौम’. त्याचा अर्थ आहे, बाह्य व अंतर्गत (राजा/हुकूमशहा/गट) अशा दोन्ही नियंत्रणातून आपला देश मुक्त असेल. जनतेने निवडलेल्या सरकारच्या हाती देशाच्या कारभाराचे नियंत्रण राहील. राज्यकर्ते संकुचित हितासाठी कोणत्याही जागतिक शक्तीच्या अंकित जाणार नाहीत, या शक्तींच्या प्रभावाखाली देशांतर्गत निर्णय होणार नाहीत, जागतिक सहकार्य व मित्रत्व आपल्या इतिहासातून मिळालेल्या बोधातून ठरेल, जनतेला विश्वासात घेऊन तिच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहात-संसदेत योग्य त्या चर्चेने असे निर्णय होतील, याविषयी सजग असायला हवे. राष्ट्र म्हणून विकसित होत असताना, अन्य देशांशी परस्पर सहकार्य करत असताना अखेर देशांच्या भिंती गळून सगळे जगच एक झाले पाहिजे, ही आपली मनीषा असली पाहिजे. आपल्या राष्ट्रवादाची घोषणा ‘जय हिंद-जय जगत’ हीच असली पाहिजे.

देशाचे स्वरुप वर्णन करणारा दुसरा शब्द आहे ‘समाजवादी’. ‘समाजवाद’ या संकल्पनेचा मूळ ढोबळ अर्थ आहेः उत्पादन जर सामूहिक तर उत्पादन साधनांची मालकीही सामूहिक हवी. ती खाजगी असू नये. उत्पादन नफ्यासाठी नव्हे, तर गरजेसाठी हवे. संपत्तीचे न्याय्य वाटप व्हायला हवे. कुटुंबात सक्षम माणसे रोजगाराला जातात व त्यांनी कमावून आणलेले कुटुंबातील अन्य सदस्यांना (आई-वडिल, मुले) गरजेप्रमाणे दिले जाते. हीच स्थिती देशात हवी. क्षमतेप्रमाणे काम व गरजेप्रमाणे वाटप.

भारतात या मूळ अर्थाप्रमाणे व्यवहार करणे हितसंबंधीयांमुळे कठीण असल्याने भारताच्या संदर्भात या समाजवादाचा आजचा मर्यादित अर्थ आहे- विकासाचे प्राधान्य व दिशा वंचितांना न्याय मिळण्याची राहील. कामगार-कष्टकऱ्यांना हितकारक व आर्थिक विषमता कमी करणारे कायदे केले जातील. सरकारी मालकीचे उद्योग असलेली मिश्र अर्थव्यवस्था व यात सरकारी टक्का अधिक राहील, याची दक्षता घेतली जाईल. भारत एक कल्याणकारी राज्य असेल.

देशात प्रगती झाली आहे. तरीही खूपसे समाजविभाग अजूनही दुर्बल आहेत. काहींना खूप तर काहींना अत्यल्प मिळते आहे. कामगारांत काही जण एकदम संरक्षित, तर असंख्य कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. काहींना उत्तम शाळा, उत्तम आरोग्य व्यवस्था तर असंख्यांना या सेवा कमी प्रतीच्या. ...अशी कैक उदाहरणे देता येतील. अशी विषमता, अशी वंचितता आपल्याला नामुष्की आणते. या स्थितीविषयी आपल्या मनात खंत, अस्वस्थता असावयास हवी आणि जमेल त्या मार्गाने ती बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वहिताचाच विचार न करता आपल्यापेक्षा कमकुवत असणाऱ्यांच्या प्रति अनुकंपा ठेवायला हवी. समाजवाद हे भारताचे वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला ही भूमिका ठेवावी लागेल.

तिसरा शब्द आहे- धर्मनिरपेक्षता. याची थोडी चर्चा आपण देवाचे नाव उद्देशिकेत घ्यायला विरोध झाला त्याविषयी बोलताना केली आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ या संकल्पनेबद्दल सूत्ररुपाने असे म्हणता येईलः सरकारचा धर्म असणार नाही. सरकारी कामकाजात धर्माचा हस्तक्षेप असणार नाही. सर्व धर्मीयांप्रती समान वागणूक राहील. धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे. तथापि, आरोग्य, सामाजिक नीतिमत्ता, सुव्यवस्था व संविधानातील अन्य मूल्ये यांना बाधा येत असल्यास सरकार, न्यायालय धर्मपालनाच्या अधिकारात हस्तक्षेप करणार. उदा. शनिशिंगणापूर व हाजी अली येथे स्त्रियांना प्रवेश बंदीमुळे दर्जा व संधीची समानता या मूल्याला धोका पोहोचत असल्याने न्यायालयाने ही बंदी रद्द करवली. दही हंडीमुळे अपघात होऊन आरोग्याला धोका पोहोचतो म्हणून तिच्या उंचीवर बंधन घातले.

स्वातंत्र्य, समता, बंधुता या उद्दिष्टांची लेखाच्या मर्यादेमुळे स्वतंत्रपणे अधिक चर्चा न करता घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मूल्यांविषयी काय म्हणतात, ते वाचणे अधिक उद्बोधक ठरेल. वर उल्लेख केलेले २५ नोव्हेंबर १९४९ चे घटना समितीतीलच हे भाषण आहे. बाबासाहेब म्हणतातः

‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्त्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या आस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल.’

या लेखाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांकडे लक्ष वेधणे व भारतीय नागरिक म्हणून त्यांचा अर्थ समजून आपल्या जीवनात त्याची अंमलबजावणी तसेच सरकार त्याचे पालन करते आहे की नाही यावर देखरेख करण्याचे महत्व विशद करणे हा होता. या सर्व मूल्यांविषयी आपल्याला विस्तृत माहिती हवी असल्यास आमची याविषयीची एक पुस्तिका आपण खाली दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड करु शकता. प्रत्यक्ष पुस्तिका हवी असल्यास तिची किंमत १० रु. अधिक टपाल खर्च देऊन मागवू शकता. प्रतींची संख्या अधिक असल्यास बरे. चेंबूरला आमच्या मित्र संघटनेच्या कार्यालयात जाऊनही आपल्याला त्या घेता येतील.

आम्ही संविधान संवर्धन समितीतर्फे शाळा, कॉलेजे, वस्त्या, संघटनांचे कार्यकर्ते अशांसाठी या विषयाची सत्रे घेतो. राष्ट्र सेवा दल, एस. एम. जोशी फाऊंडेशन, केशव गोरे स्मारक ट्रस्ट अशा अनेक संस्था हे काम करत आहेत.  आपण त्यासाठी आम्हाला निमंत्रित करु शकता. या सत्रांनंतर सहभागी मंडळींनी आपल्याला जमेल तिथे, जमेल त्या प्रमाणात संविधानातील मूल्यांचा प्रचार करावा, ही अपेक्षा आहे. भारतीय नागरिकत्वाचा मूलाधार असलेली ही संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये सतत प्रचारली तरच ती लोकांच्या मनात राहणार आहेत. म्हणूनच आपण प्रत्येकाने त्यांचे प्रचारक होणे नितांत गरजेचे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________________________


‘संविधानातील मूल्ये’ ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी लिंकः

https://drive.google.com/file/d/0ByFOj5QtRpAdRHc2X1pKX3ZoVWs/view?usp=sharing 

No comments: