Tuesday, December 3, 2024

अम्मू स्वामिनाथन


मी नवऱ्याला विचारलं, “कोणती साडी नेसू?” तेवढ्यात आजीनं फटकारलं, “अशी कशी माझी नात गं तू?” मुद्दा साडीचा नव्हता. ही कशी दिसेल, असं सहज विचारण्याचाही नव्हता. दुसऱ्याच्या पसंतीचा आदर करण्याचाही नव्हता. निर्णयासाठी दुसऱ्यावर अवलंबून का राहायचं? बायकोनं कोणती साडी नेसायची हे नवऱ्यानं का ठरवावं? आपले निर्णय आपल्याला स्वावलंबीपणे घेता आले पाहिजेत. हा तत्त्वाचा, स्त्रियांच्या निर्णय स्वातंत्र्याचा मुद्दा या आजीच्या फटकारण्यात होता.

ही आठवण सांगितली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुभाषिनी अली यांनी. त्यांना आपल्या तत्त्वकठोर आणि तेजस्वी आजीचा खूप अभिमान आहे. ...ही आजी म्हणजे अम्मू स्वामिनाथन. संविधानसभेतल्या १५ महिला सदस्यांपैकी एक. स्वातंत्र्य चळवळ, स्त्री अधिकार अशा अनेकविध क्षेत्रांत २० व्या शतकाचा अर्ध्याहून अधिक भाग आपल्या कर्तृत्वानं उजळून टाकणाऱ्या या शलाका. सर्वसामान्यांसाठी त्या आता विस्मृतीत गेल्या आहेत. त्यांच्या स्मृती जागवणं, त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करणं आणि त्यातून मिळणाऱ्या बोधाच्या प्रकाशात आपल्या वर्तमानाची वाट प्रशस्त करणं यासाठीच तर आपण हा कार्यक्रम करतो आहोत. या १५ महिलांचा एकेक करुन आपण सविस्तर परिचय करुन घेणार आहोत. आज समजून घ्यायचं आहे अम्मू स्वामिनाथन यांना.

त्यांच्याविषयी औत्सुक्य वाढावं म्हणून आणखी दोघींचा उल्लेख करतो. कॅप्टन लक्ष्मी सहगल. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतल्या अधिकारी, स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारी नेत्या. लक्ष्मी सहगल या सुभाषिनी अलींच्या आई. दुसरं एक नाव म्हणजे मृणालिनी साराभाई. नामांकित भारतीय शास्त्रीय नृत्यांगना. देशाच्या अवकाश संशोधनाचा पाया घालणारे विक्रम साराभाई हे मृणालिनी यांचे पती. कॅप्टन लक्ष्मी सहगल आणि मृणालिनी साराभाई या अम्मू स्वामिनाथन यांच्या कन्या. पटलं नाही तरी मुलांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं तत्त्व अवलंबल्यामुळे त्यांच्या या मुली स्वतंत्र बाण्याच्या आणि लोकहित तसेच प्रगतीशील विचारांच्या कायम पक्षपाती राहिल्या. आज ७६ वर्षांच्या असलेल्या सुभाषिनी अली या त्यांच्या नातीबद्दलही हेच म्हणता येईल.

अम्मू स्वामीनाथन यांचा जन्म २२ एप्रिल १८९४ रोजी केरळमध्ये कोचीच्या जवळ पालघाट (आताचं पलक्कड) येथे झाला. वडिल पी. गोविंदा मेनन. स्थानिक सरकारी खात्यात नोकरी करायचे. त्यांच्या मर्यादित उत्पन्नात मोठं कुटुंब सांभाळणं त्यांना जड जाई. त्यामुळे अम्मूला ते शाळेत शिकायला पाठवू शकले नाहीत. त्यांनी अम्मूला घरच्या घरीच मल्याळम लिहायला आणि वाचायला शिकवलं. लहानपणापासूनच अम्मू त्यांची आई म्हणायची तसं ‘टॉमबॉय’ होत्या. यांचं कुटुंब नायर या क्षत्रियांत मोडणाऱ्या जातीचं. त्यांचे पती सुब्बारामा स्वामिनाथन. तामिळी ब्राम्हण. सुब्बारामांना जातीच्या बाहेर मुलगी शोधण्याचं कारण म्हणजे, त्यांच्या ब्राम्हण समाजाची त्यांच्याबद्दलची नाराजी. समुद्र ओलांडणं हे धर्मसंमत नसताना ते परदेशी जाऊन उच्चशिक्षित झाले. आल्यावर प्रायश्चित्त घ्यायलाही त्यांनी नकार दिला. ब्राम्हण समाजाला त्यांनी या रीतीनं दुखावल्यानं त्यांची आपल्या जातीत सोयरिक होणं कठीण झालं. अम्मूच्या कुटुंबीयांशी सुब्बारामा यांच्या कुटुंबाचे जुने संबंध होतेच. मात्र आता अम्मूचे वडिल नव्हते. आईनं लग्नाला होकार देताना मुलीला केवळ मल्याळम येतं याची नोंद दिली. सुब्बारामा आणि अम्मू यांच्या वयात बरंच अंतर होतं. ते तिशीत तर अम्मू १४ वर्षांच्या. अम्मूनं हे नातं स्वीकारताना काही अटी घातल्या – आपण मद्रासला स्थलांतरित व्हायचं. तिथं मला ब्रिटिश शिक्षिकेकडून इंग्रजी शिकवायचं. तिसरी अट आजही आपल्याला पचवणं कठीण होतं. अम्मू म्हणतात – माझ्या भावांना विचारला न जाणारा प्रश्न मला विचारायचा नाही. तो म्हणजे – “घरी परत कधी येणार?”

पुरोगामी विचारांच्या सुब्बारामांनी या अटी मान्य केल्या. लग्न झालं. लग्नाला सुब्बारामांच्या घरचं कोणी आलं नाही.

सुब्बारामा स्वतः राजकारणात गेले नाहीत. त्यांनी व्यवसाय करुन कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळली. अम्मूंच्या सगळ्या निर्णयांना त्यांनी साथ दिली. मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईतल्या वास्तव्यात त्यांनी बायकोला टेनिस खेळायला, गाडी चालवायला प्रोत्साहन दिलं. २० व्या शतकाच्या सुरुवातीला मद्रासच्या रस्त्यावर बाई गाडी चालवते हे दृश्य अनोखं होतं. मद्रासमध्ये अम्मूनं आपली स्वतंत्र ओळख तयार केली. अनेक प्रतिष्ठित लोक घरी येत. त्यांची कन्या मृणालिनी म्हणते – आई ‘मद्रासची राणी’ होती.

१९१४ ला अम्मू सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी जोडल्या गेल्या. आईचं विधवा असणं त्यांनी पाहिलं होतं. केशवपन, सफेद पातळ आणि अलंकारांचा त्याग हे दृश्य अम्मूंच्या सामाजिक सुधारणांच्या कामाची प्रेरणा होती. यावेळी त्या विशीत होत्या. तीन वर्षांनी १९१७ मध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय, अॅनी बेझंट, मुथुलक्ष्मी रेड्डी आणि इतरांसोबत अड्यार, मद्रास येथे त्यांनी वुमेन्स इंडिया असोसिएशन (WIA) च्या स्थापनेत भाग घेतला. WIA महिला हक्कांसाठी लढणाऱ्या भारतातील संघटनांतली एक सर्वात मोठी संघटना बनली. या संघटनेनं बालविवाह आणि देवदासी प्रथा यांसारख्या सामाजिक समस्यांवर काम केलं. या संघटनेनं १९१७ चं मॉन्टेग्यू चेल्म्सफोर्ड कमिशन आणि १९१८ चं साऊथबरो कमिशन यांना निवेदनं सादर केली. त्यात महिलांसाठी समान मताधिकाराची मागणी केली होती.

१९२० साली महात्मा गांधींनी स्वदेशीची चळवळ सुरु केली. परदेशी कापडाच्या होळ्या केल्या गेल्या. अम्मू या आंदोलनाकडं जोरात खेचल्या गेल्या. त्यांच्या मुलींवरही त्याचा प्रभाव पडला. लक्ष्मीला राजकारणात त्यांच्या आईनं आणलं. लक्ष्मी म्हणतात, त्यांची आई सामाजिक क्रांतीला प्रतिबद्ध होती. ती म्हणत असे - ‘हा समाज आमूलाग्र बदलायला हवा. कारण तो महिला आणि गरिबांच्या प्रति अन्यायकारक आहे.’

सुब्बारामा १९३० साली वारले. त्यावेळी अम्मू ३६ वर्षांच्या होत्या. नवऱ्यानं मृत्युनंतर अम्मूंना त्रास होणार नाही, त्यांना विधवेचं जिणं जगावं लागणार नाही, याची आधीच मृत्युपत्रात सोय केली होती. त्यांनी बायको तसेच मुलींना वारसाहक्कापासून वंचित केलं नाही. अम्मूंच्या नावे त्यांनी राहतं घर केलं. मुलींना मुलांच्या बरोबरीनं संपत्तीत अधिकार दिला. लक्ष्मी म्हणतात – ‘माझ्या वडिलांनी मृत्युपत्रात हे असं नोंदवलं नसतं, तर माझ्या भावांनी सगळंच घेतलं असतं. आम्हाला एक छदामही दिला नसता.’

नवऱ्याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच अम्मूंनी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला पूर्ण झोकून दिलं. चळवळीला वेळ, श्रम त्या देतच होत्या. पण त्यांचे राहते घरही त्यांनी पक्षाच्या कार्यासाठी दिलं. राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक मोठ्या नेत्यांची त्यांच्या या घरी ये-जा होती.

अम्मू १९३४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाल्या. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अम्मू स्वामिनाथन महिलांच्या हक्कांची बाजू ठामपणे लावून धरणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. वारसा आणि विवाहाशी संबंधित कायद्यांतील सुधारणांसाठी त्यांनी पाठपुरावा केला.

१९४६ मध्ये मद्रास मतदारसंघातून त्या संविधान सभेवर निवडून आल्या. २४ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्याच्या दोन दिवस आधीच्या आपल्या भाषणात मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वं हा संविधानाचा गाभा आहे, असं त्यांनी नमूद केलं. संविधानाच्या आकाराबद्दल मात्र त्यांचं वेगळं मत होतं. त्यांना एवढं मोठं संविधान असू नये असं वाटत होतं. सहज खिशात ठेवता येईल एवढ्या आकाराचं ते हवं होतं, असं त्यांना वाटे.

ब्रिटिशांनी मुदतीच्या आधीच स्वातंत्र्य जाहीर केलं. संविधानाचं काम पूर्ण होऊन लोकसभेची निवडणूक व्हायला अवकाश होता. यावर मार्ग म्हणून संविधानसभाच तात्पुरती संसद मानली गेली. संविधानाचं काम करताना ती संविधानसभा असे आणि कायदे करताना ती संसद असे. अशा या तात्पुरत्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं. त्याला तीव्र विरोध झाला. मुलींना मुलांप्रमाणे वारसा हक्क देण्याची या बिलातली तरतूद अनेकांना मंजूर नव्हती. शेवटी संसदीय निवड समितीकडे अधिक चिकित्सेसाठी हे विधेयक पाठवण्यात आलं. या निवड समितीच्या अम्मू स्वामिनाथन एक सदस्य होत्या. या विधेयकाच्या अहवालालाही कठोर विरोधाला तोंड द्यावे लागले. अखेरीस सहमती होत नाही असं दिसल्यावर नेहरुंनी हिंदू कोड बिल नवी लोकसभा प्रत्यक्षात येईपर्यत पुढं ढकललं. डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर होत नाही याच्या निषेधार्थ केंद्रीय कायदे मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाच्या विषयावर तात्पुरत्या संसदेत चर्चा सुरु झाली की काही पुरुष सदस्यांकडून होणारी शेरेबाजी स्त्रियांना दुय्यम लेखणारी असे. अम्मू अशांना धारेवर धरत.

स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेवर आणि त्यानंतर १९५४ मध्ये राज्यसभेवर त्या निवडून गेल्या. चित्रपटांच्या आवडीमुळे त्या पुढे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज आणि सेन्सॉर बोर्डाच्या उपाध्यक्षा झाल्या. १९६० ते १९६५ दरम्यान पाच वर्षं त्यांनी भारत स्काउट्स आणि गाईड्सचं अध्यक्षपद भूषवलं. भारताच्या सदिच्छा दूत म्हणूनही रशिया, इथिओपिया, चीन आणि अमेरिकेत त्यांनी काम केलं.

जातिवादाबद्दल अम्मूंना विलक्षण चीड होती. खुद्द आजोळी आपल्या मुलांना सासरची मंडळी व्हरांड्यात जेवायला बसवत, हे त्यांनी अनुभवलं होतं. तुरुंगात आपल्याच एका सहकारी कार्यकर्तीनं सफाई काम करणाऱ्या महिलेला तिच्या जातीवरुन हाक मारली. अम्मू तडक त्या सहकारी कार्यकर्तीसमोर जाऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, ‘मी त्या जातीची आहे. बोल तुझं काय म्हणणं आहे?’

त्यांनी आपल्याच पक्षाचे सर्वोच्च नेते असलेल्या नेहरुंनाही सोडलं नाही. नेहरुंच्या नावामागची ‘पंडित’ ही उपाधी त्यांच्या जातीचं उच्चत्व अधोरेखित करते, अशी अम्मूंनी टीका केली. ‘मी कधीही माझ्या नावामागे पंडित लावा असं कोणाला म्हटलेलं नाही’ असं उत्तर नेहरुंनी दिलं. अप्रत्यक्षरीत्या जात ही भावना थोरा-मोठ्यांतही विद्यमान असते, अशी अम्मूंची धारणा होती. यातून मुक्त व्हायला खास जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे, असं त्यांना वाटे.

समाजातली विषमता-विरुपता जाऊन तो मुक्त-निरामय व्हावा यासाठी आपलं आयुष्यं वेचणारी अम्मू स्वामिनाथन ही शलाका ४ जुलै १९७८ रोजी ८४ व्या वर्षी या जगातून अंतर्धान पावली.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________________________________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा दुसरा भाग ३ डिसेंबर २०२४ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

No comments: