Wednesday, December 4, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं का म्हणाले होते, 'तर लोकशाहीची इमारत उद्ध्वस्त होईल'



- सुरेश सावंत

| बीबीसी मराठीसाठी |
_________

लाडक्या बहिणींनी आम्हाला भरघोस पाठिंबा दिल्याने आमचा विजय झाल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. महाविकास आघाडीचे बडे नेतेही हे कबूल करत आहेत. याची आणखी खातरजमा करण्यात हशील नाही.
लोकांशी, या बहिणींशी बोलतानाही हे लक्षात येते. महाविकास आघाडीच्या पराभवामागे हा एकमेव मुद्दा नसला तरी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हे स्पष्ट आहे. हा मुद्दा दुसऱ्या एका कारणानं मूलभूत बनतो. ते म्हणजे शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाई या व्यापक प्रश्नांना धूसर करुन, वैयक्तिक आर्थिक लाभ ही मत देण्याची प्रेरणा बनणं योग्य आहे का? आम्ही भारताचे लोक देशाचे मालक आहोत. आमच्या आकांक्षांचे, विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना आम्ही निवडून देतो.
त्यांनी जनतेच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी कायदे, धोरणे तयार करायची असतात. राज्य किंवा केंद्र ज्या पातळीवर हे करायचे असते, त्या पातळीवर काम करणाऱ्या पक्षांची धोरणे लक्षात घेऊन आपलं मत द्यायचे असते, याचे विस्मरण नागरिकाला म्हणजेच देशाच्या मालकाला झाले आणि केवळ तातडीचा आर्थिक लाभ, धर्म, जात, नातेवाईक हे मत देण्याचे मापदंड बनले तर ही मालकीच आपण गमावून बसतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
कळत-नकळत आपण प्रजा बनतो. नागरिक राहत नाही. ज्यांना निवडून देतो ते राजा बनतात. जणू ते आपले मालक होतात. उदार होऊन आपल्याला दान देतात.
इंग्रज येण्यापूर्वी भारतात राजे होते आणि आपण त्यांची प्रजा. या राजांकडून इंग्रजांनी भारत घेतला. मात्र तो परत देताना जनतेला दिला. कारण मधल्या काळात झालेल्या स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणांच्या संगरातून लोकशाही मूल्ये उदयाला आली होती.
जनता सार्वभौम हे तत्त्व मध्यवर्ती बनलं होतं. आपल्या संविधानाचा तोच आधार आहे. आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचा प्रारंभच ‘आम्ही भारताचे लोक’ असा केला गेला आहे. जे काही करणार त्याचा मूळ आधार भारताची जनता असणार आहे.
ही आपली घटनादत्त भूमिकाच जनता विसरते आहे; तीही संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना. हे अधिकच गंभीर आहे. वास्तविक, पाऊणशे वर्षात जनतेनं आपल्या भूमिकेविषयी अधिक प्रगल्भ व्हायला हवं होतं. कोणी कोणालाही मत द्यावे. तो त्यांचा अधिकार आहे.
पण ते देताना समग्र विचार करावा, ही पूर्वअट आपल्या लोकशाहीला अभिप्रेत आहे. ती पूर्ण होत नसेल तर हे लक्षात येणाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचा, जनतेला संविधान साक्षर करण्याचा संकल्प संविधानाच्या पंच्याहत्तरीत करणे निकडीचे बनते.
(संपूर्ण लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करावे ही विनंती.)

https://www.bbc.com/marathi/articles/c36pl82d6xeo?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR2NKaywY_dFyCnjny8oyvjDN2Ab7wAonK0iklXMsTNYk6Q_cMBds40T9Ac_aem_Uf59c0-Ctg_udsrw91lLsQ

No comments: