Tuesday, December 10, 2024

अॅनी मस्कारेन


संविधानसभेतल्या १५ महिलांचा आपण परिचय करुन घेत आहोत. राजकीय स्वातंत्र्य तसेच सामाजिक सुधारणांच्या आंदोलनात कर्तबगारी करणाऱ्या या महिला होत्या. खरं म्हणजे त्यामुळेच त्यांची संविधानसभेवर निवड झाली होती. या १५ जणींतल्या अम्मू स्वामिनाथन यांची माहिती आपण मागच्या भागात घेतली होती. आज आपण समजून घेणार आहोत अॅनी मस्कारेन यांना.

उक्ती परखड, कृती निर्भीड, आक्रमक बाणा हे अॅनी मस्कारेन यांचं व्यक्तित्व. असं व्यक्तित्व घडण्यामागं अन्य कारणं काहीही असोत. पण त्याला ताकद देते ती अन्यायाबद्दलची मनस्वी चीड, सत्यावरची अविचल निष्ठा, व्यावहारिक डावपेचांच्या पलीकडची शाश्वत मूल्यांची आस. संविधानसभेतल्या निवडणुकांविषयीच्या चर्चेत भाग घेताना त्या म्हणतात – ‘आपण इथं लोकशाहीच्या पायाभूत तत्त्वांची रचना करत आहोत. ताबडतोबीनं येणाऱ्या निवडणुकांसाठी नव्हे; तर आगामी काळासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, राष्ट्रासाठी. म्हणूनच सोयीचं काय यापेक्षा नैतिक काय याचा विचार करणं अधिक उपयुक्त होईल. माझ्यासाठी राजकारण नैतिक आज्ञापत्र आहे.’

अॅनी सांगत असलेला राजकारणाचा मूल्यात्मक आधार हा आज आपल्याला स्वप्नवत वाटतो. ते स्वप्न होतं हे खऱं. पण केवळ हवेतलं स्वप्न नव्हतं. त्याच्या आधारेच अॅनी आणि त्यांच्या पिढीनं आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केला. सामाजिक विषमतेच्या बुरुजांना सुरुंग लावला. मुख्य म्हणजे या स्वप्नाची त्यांनी संहिता लिहिली. तेच आपलं संविधान. नुसतंच वरवर संविधान वाचलं तर ती राज्यकारभाराची नियमावली आहे एवढाच अर्थ आपल्याला लागेल. त्यातील मूल्यं, स्वप्न नीट लक्षात यायला ते घडवणाऱ्यांचं जीवनकार्य, विचार त्यांच्या काळाच्या वैशिष्ट्यांसह समजून घेणं गरजेचं आहे.

...आपली आजची नायिका अॅनी मस्कारेन यांचा जन्म झाला ६ जून १९०२ रोजी. त्रिवेंद्रम म्हणजे आताचं तिरुवनंतपुरम येथे. त्रावणकोर संस्थानाची ती राजधानी होती. अॅनी यांचं मच्छिमारांत गणलं जाणारं कुटुंब लॅटिन कॅथलिक ख्रिस्ती समाजाचं. मागास, उपेक्षित मानलेले समुदाय लॅटिन कॅथलिकांत अधिक आहेत. या धर्मांतरामुळे त्यांचं स्थान सरसकट वरचं झालं नाही, तरी कथित उच्चवर्णीयांची सेवा करण्याच्या परंपरागत बंधनांतून त्यांना मुक्ती मिळाली. व्यक्तीविकासावरची बंधनंही सैल झाली. शिक्षण घेणं, उपजीविकेसाठी नोकरीसारखे अन्य मार्ग अवलंबणं शक्य झालं. अॅनींचे वडिल त्रावणकोर संस्थानात खालच्या श्रेणींतले कर्मचारी होते. घरात आर्थिक तंगी असे. अॅनी तल्लख बुद्धीच्या होत्या. त्यांना त्रिवेंद्रममध्ये सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या ‘महाराजा’ज कॉलेज’ मध्ये प्रवेश मिळाला. त्यांची ही शिक्षणातली चमक नोकरीच्या कामी मात्र येणार नव्हती. कारण त्रावणकोर सरकार त्याकाळात महिलांना नोकरी देत नसे. १९२५ साली वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्र या दोन विषयांत स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदव्या मिळवल्या. ...आणि लगोलग त्या सिलोनला म्हणजे आताच्या श्रीलंकेला गेल्या. तेथे त्यांनी प्राध्यापिकेची नोकरी सुरु केली.

या दरम्यान त्रावणकोरमध्ये एक चांगली घटना घडली. त्रावणकोर संस्थानाचं आधिपत्य महाराणी सेतू लक्ष्मीबाईंकडं आलं. राज्याचा वारसदार असलेला त्यांचा पुतण्या लहान असल्यानं त्याच्या वतीनं त्या कारभार पाहू लागल्या. त्या पुरोगामी विचारांच्या होत्या. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं. प्रतिगामी विचारांच्या मंडळींचा तीव्र विरोध असतानाही त्रावणकोरमध्ये त्यांनी मुलींना कायद्याच्या शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ही संधी घेण्यासाठी अॅनी त्रावणकोरला परतल्या. कायद्याच्या पदवीधर झाल्यावर त्याच महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या.

मोठ्या झालेल्या पुतण्यानं १९३१ साली संस्थानाचा कारभार हातात घेतल्यानं महाराणी सेतू लक्ष्मीबाईंचे अधिकार संपुष्टात आले. यानंतर त्रावणकोरमध्ये जोरदार राजकीय उलथापालथी सुरु झाल्या. भोवतालच्या ब्रिटिश अमलाखालील प्रांतांतल्या जनतेच्या स्वातंत्र्याच्या ललकाऱ्या संस्थानांच्या सीमा भेदून तेथील प्रजेपर्यंत पोहोचतच होत्या. संस्थानांतील प्रजेच्या मनातही स्वातंत्र्याच्या आकांक्षा जागू लागल्या. याची वेळीच दखल घेऊन सुधारणा केली नाही, तर आपल्यालाच जनता फेकून देईल, हे जाणत्या संस्थानिकांनी हेरलं. प्रांतांप्रमाणे त्रावणकोरसह काही संस्थानांत अशी विधिमंडळं सुरु झाली. मात्र यांसाठीच्या निवडणुकीत मताचा अधिकार देण्यासाठी संस्थानं असोत वा प्रांत सगळीकडंच शिक्षण आणि संपत्ती यांच्या अटी होत्या. त्या कमी किंवा जास्त असत एवढंच. त्यामुळे सगळी जनता मतदान करु शकत नव्हती. त्रावणकोरमध्ये जमिनीचा वार्षिक कर ५० रु. भरणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न २००० रु. असलेल्यांनाच मतदानाचा अधिकार होता. या शंभर वर्षांपूर्वीच्या रकमा आहेत. त्यामुळे अगदीच मामुली संख्येचा सधन थरच यात येई. नव्या राजानं ५ रु. इतका जमिनीचा वार्षिक कर खाली आणला. त्यामुळे संख्या वाढली. पण किती? तर अडीच टक्के केवळ. जातींच्या भाषेत जे वरचे गणले जायचे त्यांनाच हा अधिकार मिळाला. त्यामुळे खालच्या समजल्या जाणाऱ्या समाजविभागांमध्ये जोरदार असंतोष पसरला. या समाजविभागांनी याविरोधात उभं राहण्यासाठी ऑल त्रावणकोर जॉइंट पोलिटिकल काँग्रेस (संक्षिप्त रुप ATJPC) या पक्षाची स्थापना केली. अॅनी या पक्षाच्या सक्रिय सदस्य बनल्या.

आंदोलनाच्या परिणामी राजानं मताधिकारासाठीची अट आणखी खाली आणून ती जमिनीचा वार्षिक कर १ रु. केली. आता तळचे समजले जाणारे आर्थिक आणि सामाजिक थर लक्षणीय प्रमाणात सामावले गेले. आपल्या लोकसंख्येपेक्षाही अधिक प्रतिनिधीत्व मिळवणाऱ्या मधल्या जातींची मक्तेदारी यामुळे मोडली गेली. स्वातंत्र्याच्या आकांक्षांनी आणखी वेग धरला. नवे-जुने समाजघटक एकवटून आता त्रावणकोर स्टेट काँग्रेसची (संक्षिप्त रुप TCS ची) स्थापना करण्यात आली. अॅनी या पक्षाच्या एक संस्थापक नेत्या होत्या. या नव्या पक्षाचे ध्येय होते – ‘प्रौढ सार्वत्रिक मताधिकारानं जबाबदार सरकार स्थापन करणं.’ याचा अर्थ, राजाचा अधिकार कमी अथवा नष्ट करणं.

याला राजांची तयारी कशी असेल? तथापि जनतेची उसळी मोठी होती. TCS ने विविध आरोप ठेवून राजाचा कारभारी असलेल्या दिवाणाच्या हकालपट्टीची मागणी केली. वैयक्तिकदृष्ट्या दुखावलेल्या दिवाणानं छुपे-उघड मार्ग अवलंबून आंदोलन चेपायला सुरुवात केली. TCS मध्ये कळीचं महत्व प्राप्त झालेल्या अॅनींनी दिवाणाविरोधात सभा, निदर्शनांतून तोफा डागायला सुरुवात केली. अॅनी यांना धमक्या आणि सतावणं सुरु झालं. त्यांच्या घरावर हल्ले झाले. एका हल्ल्यात त्यांना मारहाण करुन त्यांचे सर्व दागिने लुटलेच. पण घरात एक कपडा किंवा भांडंही शिल्लक ठेवलं नाही. एकदा तर पोलीस शिपायानं त्यांच्या अंगावरच मोटारसायकल घातली. याबद्दल कमिशनरपासून राजापर्यंत तक्रारी करुन झाल्या. पण परिणाम शून्य. उलट अॅनीच लोकांना पत्रकं वाटून, भाषणं करुन प्रक्षोभित करतात असा आळ घेऊन राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक केली. यात त्यांना जामीन मिळाला.

यादरम्यान आपल्याच संस्थानापुरतं सीमित न राहता ब्रिटिशविरोधी अखिल भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी संबंध जोडण्याचा निर्णय त्रावणकोर स्टेट काँग्रेसनं घेतला. त्रावणकोरची सबंध जनताच आता राजाच्या सत्तेच्या पूर्ण विरोधात गेली होती. तिला स्वतःची सत्ता स्थापित करायची होती. त्रावणकोरच्या दिवाणानं TCS वर बंदी घातली. अॅनीसहित अनेक नेते देशाच्या विविध भागांत जाऊन आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवू लागले. अॅनींनी म्हैसूर आणि मुंबईत अनेक मोठ्या सभा घेतल्या. माध्यमांना मुलाखती दिल्या. संस्थानात परतल्यावर त्यांना सरकारनं अटक केली. १८ महिन्यांचा तुरुंगवास आणि ५०० रु. दंड बसवला.

महात्मा गांधींनी राजकुमारी अमृत कौर यांना TCS शी बोलणी करायला पाठवलं. गांधीजींचा सल्ला होता- “जबाबदार सरकारच्या मागणीवरच लक्ष केंद्रित करा. दिवाणाच्या हकालपट्टीचा मुद्दा सोडून द्या. त्यामुळे चळवळीच्या मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित होतं.” TCS च्या नेत्यांनी गांधीजींचा सल्ला मानला. पुढे TCS वरील बंदी उठवली गेली. नंतर १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाचे पडसाद संस्थानातही उमटू लागले. अॅनींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. त्रावणकोर संस्थानाचं सरकार या आंदोलनाच्या विरोधात होतं. असणारच. कारण ते ब्रिटिशांचं मांडलिक होतं. त्यांनी अॅनींना तुरुंगात टाकलं. यावेळी १००० रु. दंडासह दोन वर्षांची शिक्षा त्यांना झाली. तुरुंगातून TCS च्या नेत्यांशी सल्लामसलत त्यांची सुरुच होती. TCS ने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची मुख्य वाहक असलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातून बाहेर आल्यावर अॅनी देशात विविध ठिकाणी हिंडल्या. वर्धा तसेच साबरमती येथील गांधीजींच्या आश्रमांत त्यांनी वास्तव्य केलं.

गांधीजींच्या आणि त्यांच्या संबंधात एक-दोन प्रसंगी ताणही तयार झाले. मुंबईतल्या १९४६ सालच्या एका सभेतल्या भाषणाचा वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तांताचा हवाला देऊन गांधीजींनी त्यांना पत्र लिहिलं. “तुमच्या जीभेवर तुमचं नियंत्रण नाही. मनात येईल ते तुम्ही बडबडता. ही भाषा ना तुमच्या ना त्रावणकोरच्या गरीब जनतेच्या हिताची आहे” असं त्यांनी मस्कारेन यांना बजावलं.

संस्थानातली चळवळ चालूच होती. पुन्हा एकदा तिथल्या सरकारनं अॅनींना तुरुंगात डांबलं. दरम्यान ब्रिटिशांनी भारत-पाक फाळणीसह स्वातंत्र्य जाहीर केलं. संस्थानांना स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा मिळाली. दिवाणानं जाहीर केलं – “त्रावणकोर संस्थान स्वतंत्र देश होईल.” या घोषणेनं जनता खवळली. दिवाणावर जीवावर बेतेल असा हल्ला झाला. दिवाण आणि राजा दोघंही घाबरले. त्यांनी त्रावणकोर संस्थान भारतात विलीन व्हायला तयार असल्याची तार व्हाईसरॉयना केली. दिवाणानं राजीनामा दिला आणि राजानं “सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असलेलं जबाबदार सरकार त्रावणकोरमध्ये यापुढं असेल” अशी घोषणा केली. अॅनींसह त्रावणकोरच्या चिकाटीनं लढणाऱ्या जनतेचे श्रम सार्थकी लागले.

त्रावणकोरच्या नव्या विधिमंडळात अॅनी निवडून आल्या. पुढे त्रावणकोरच्या प्रतिनिधी म्हणून भारताच्या संविधानसभेत निवडल्या गेल्या. संविधानसभेत विविध मुद्द्यांवरील चर्चेत त्या सहभागी झाल्या. कायद्याच्या सखोल अभ्यासक असल्यानं जगातील विविध देशांतील घटनांचे संदर्भ त्यांच्या मांडणीत असत. संघराज्याच्या चर्चेवेळी ‘मजबूत केंद्रा’च्या बाजूनं त्यांनी भूमिका मांडली. पुढे त्रावणकोर-कोचिन एकत्रित झाल्यानंतरच्या सरकारमध्ये त्या मंत्री झाल्या. १९५२ साली पहिल्या लोकसभेवर निवडून आल्या. व्यक्तिस्वातंत्र्याच्या कट्टर पुरस्कर्त्या असलेल्या अॅनींनी प्रतिबंधात्मक अटकेबाबतच्या कायद्याच्या प्रस्तावाला संसदेत कडाडून विरोध केला.

अखेरपर्यंत क्रियाशील असलेल्या अॅनींनी १९ जुलै १९६३ ला या जगाचा निरोप घेतला. २०१३ साली उपराष्ट्रपती हमीद हन्सारींच्या हस्ते वझुताकौड इथल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. त्यावेळी केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अॅनी मस्कारेन यांच्या स्मृतीस आदरांजली वाहताना “त्रावणकोरच्या ऐतिहासिक लढ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या धडाडीच्या नेत्या” या शब्दांत त्यांचा गौरव केला. तो रास्तच होता.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

____________________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा तिसरा भाग १० डिसेंबर २०२४ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

No comments: