Tuesday, December 31, 2024

दुर्गाबाई देशमुख


आंध्र प्रदेशातल्या काकीनाडा इथलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. साल १९२३. तिकीट घेतलेल्यांनाचा प्रवेश होता. प्रवेशद्वारावर १४ वर्षांची एक मुलगी स्वयंसेवक होती. तिकीट पाहून लोकांना आत सोडण्याची जबाबदारी तिच्याकडं असते. त्याप्रमाणं ती आपलं काम करत असते. तेवढ्यात राष्ट्रीय काँग्रेसचे एक मोठे नेते येतात. ते आत जाऊ लागतात. ही मुलगी त्यांना रोखते. तिकीट विचारते. त्यांच्याकडे तिकीट नसतं. ती त्यांना सोडत नाही. हे दृश्य संयोजकांपैकी असलेले काही जण पाहतात आणि प्रवेशद्वाराकडे धाव घेतात. त्या मुलीला दरडावून विचारतात – “हे कोण आहेत ठाऊक नाही का तुला?” ती म्हणते – “हो. ठाऊक आहेत. जवाहरलाल नेहरु.” संयोजक आश्चर्यानं विचारतात - “मग सोडलं का नाहीस त्यांना?” ती उत्तर देते – “तिकिटाशिवाय आत कोणाला सोडायचं नाही, असा मला आदेश आहे.” संयोजक अखेर एक तिकीट घेतात आणि रागानेच तिला देतात. नेहरु या मुलीच्या शिस्तप्रियतेचं तसेच बांधिलकीचं कौतुक करतात आणि चिडलेल्या संयोजकांना समजावतात – “आपलं काम धैर्यानं आणि निष्ठेनं करणाऱ्या अशा मुलींची आज देशाला गरज आहे.”

ही कन्या आहे दुर्गा. दुर्गाबाई देशमुख. आपण ज्यांचा परिचय करुन घेत आहोत त्या संविधानसभेतल्या १५ महिलांपैकी एक. १५ जुलै १९०९ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे दुर्गाबाईंचा जन्म झाला. प्रथेप्रमाणं ८ व्या वर्षीच त्यांचं एका जमिनदाराच्या मुलाशी लग्न लावून देण्यात आलं. वयात येईपर्यंत सामाजिक-राजकीय चळवळीचा त्या हिस्सा झाल्या होत्या. नव्या जाणिवांनुसार त्यांनी या नात्याला नकार देऊन लग्न मोडण्याची विनंती घरच्यांना केली. नवऱ्यालाही त्यांनी समजावलं. हे लग्न रद्द झालं. आता त्या मुक्तपणे सामाजिक-राजकीय काम करु शकत होत्या. त्यांच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. पुढे खूप वर्षांनी तो वारल्यावर विधवा झालेल्या या पत्नीला दुर्गाबाईंनी मरेपर्यंत आधार दिला. स्त्रियांच्या आणि एकूणच पीडितांच्या दुःखाबद्दल कणव आणि त्यांच्या उन्नतीचा अहर्निश ध्यास हे दुर्गाबाईंच्या जीवनकार्याचं सूत्र होतं.

अगदी कमी वयात त्यांनी आपल्या भोवतालच्या परिस्थितीला आपल्या कृतीतून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. गांधींजींनी असहकार चळवळीची हाक दिली होती. त्याचा प्रभाव सर्वदूर पसरला होता. स्वदेशीच्या पुरस्कारासाठी दुर्गेनं पाचवीनंतर शाळा सोडली. कारण सहावीपासून पुढे इंग्रजी ही परदेशी भाषा अभ्यासक्रमाचा भाग असणार होती. हातानं कातलेल्या आणि शिवलेल्या खादीचे कपडे वापरायला तिनं सुरुवात केली. तिच्या घरातलं वातावरणही या चळवळीला पूरक होतं. आई आणि भावानंही खादी वापरणं सुरु केलं.

वयाच्या १२ व्या वर्षी दुर्गेनं देवदासींचा प्रश्न हाती घेतला. देवाला सोडलेल्या या महिलांच्या अनेकविध शोषणांतला लैंगिक शोषण हा मुख्य भाग होता. मुस्लिम स्त्रियांतील पडदा पद्धतीही दुर्गेला डाचत असे. महात्मा गांधी तिच्या परिसरात एका कार्यक्रमासाठी येणार आहेत असं तिला कळतं. त्याचा फायदा घेऊन देवदासी आणि मुस्लिम महिलांची गाधीजींशी भेट घडवायच्या खटपटीला ती लागते. या महिलांना ती राजी करते आणि गांधीजींच्या दौऱ्याच्या आयोजकांचंही मन वळवायचा प्रयत्न करते. पुरुषांसोबत जाहीर कार्यक्रमात या महिला बसू शकणार नव्हत्या. त्यामुळे त्यांची गांधीजींशी खाजगी भेटच घडवणं भाग होतं. केवळ १० मिनिटांची गांधीजींची वेळ मिळवून द्या असं आयोजकांना ती विनवत होती. आयोजकांनी अट घातली. गांधीजींना चळवळीसाठी निधी जमवून त्याची थैली अर्पण करायची होती. त्यासाठी पाच हजार रुपये तू जमा कर. मग आम्ही ही भेट घडवतो, ही आयोजकांची अट होती. दुर्गेनं मोठ्या हिमतीनं देवदासींच्या सहाय्यानं निधी जमा केला. भेट ठरली. फक्त दोन मिनिटं. ती शिकली त्या शाळेतच महिलांना तिनं जमा केलं. सुमारे एक हजार महिला गांधीजींच्या दर्शनासाठी जमल्या. गाधींजी आले. त्यांना एका ज्येष्ठ महिलेच्या हातून पैश्यांची थैली दिली गेली. ऐनवेळी प्रेरित होऊन जमलेल्या महिलांनी आपल्या हाता-गळ्यातले दागिने काढून गांधीजींना दिले. हा सर्व ऐवज आणि आधीची थैली मिळून एकूण २५ हजार रुपये होते. दोन मिनिटं ठरली असताना गांधीजी अर्धा तास थांबले. त्यांनी देवदासी प्रथा आणि मुस्लिम महिलांमधल्या सुधारणांवर भाषण केलं. छोटी दुर्गा बनली दुभाषक. तिनं गांधीजींचं हिंदीतलं भाषण तेलगूत अनुवादित केलं.

गांधीजी दुर्गाबाईंवर बेहद्द खुश झाले. त्यांनी तिला आपल्यासोबत गाडीत घेतलं. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी दुर्गाबाईंना आपल्या भाषणाचा अनुवाद करायला सांगितला. तिने अगदी सराईतसारखा तो केला. त्यानंतर जेव्हा जेव्हा गांधीजी दक्षिणेत येत त्यावेळी ते दुर्गाबाईंना अनुवादक म्हणून आपल्या सोबत घेत.

देवदासींच्या मुलींच्या वाट्याला आईचंच शोषण येणं हे त्यांचं भागदेय होतं. गांधीजींच्या भेटीच्या प्रभावानं देवदासींनी आपल्या मुलींची लग्नं समाजसुधारक तरुणांशी लावणं सुरु केलं.

गांधीजींच्या दक्षिणेतील हिंदी भाषा प्रचाराला दुर्गाबाईंनी वाहून घेतलं. मुलींना पद्धतशीर हिंदी शिकण्यासाठी त्यांनी बालिका हिंदी पाठशाळा सुरु केली. काकीनाडला होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनासोबतच हिंदी साहित्य संमेलन होणार होतं. या संमेलनांच्या स्वयंसेवक म्हणून दुर्गाबाईंनी शिकवलेल्या ४०० महिला निवडल्या गेल्या. मात्र त्यांची स्वतःची निवड होऊ शकली नाही. कारण त्यांचं वय केवळ १४ वर्षं होतं. त्या काहीशी नाराज झाल्या. मात्र नंतर त्यांना घेतलं गेलं. त्या दोन्ही संमेलनांच्या स्वयंसेवक झाल्या. नेहरुंना तिकीट नसल्यानं रोखण्याचा प्रसंग सुरुवातीला आपण पाहिला तो इथं घडला.

बालिका हिंदी पाठशाळेला जोरात प्रतिसाद मिळू लागला. या उपक्रमाला जमनालाल बजाज यांनी देणगी देऊ केली. पण दुर्गाबाईंनी नम्रपणे नकार दिला. गरज लागल्यावर मी स्वतः तुम्हाला विनंती करेन, असं त्या जमनालालजींना म्हणाल्या. आणखीही अनेक लोकांनी मदत देऊ केली; पण आर्थिक मदत त्यांनी स्वीकारली नाही. केवळ पुस्तकं घेतली. दुर्गाबाईंनी आयुष्यभर तत्त्व आणि साधेपणा जपला.

असहकार चळवळीत दुर्गाबाईंना अनेकदा तुरुंगवास झाला. तुरुंगातील कैद्यांच्या अ, ब, क या श्रेणी त्यांना खटकत. आपली विशेष सुविधा असलेली अ श्रेणी बदलून क द्यावी अशी त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली. ती फेटाळली गेली. पुढच्या एका अटकेवेळी दुर्गाबाईंनी अति आग्रह केल्यानं काहीसं का कू करत त्यांनी क श्रेणी मंजूर केली. क श्रेणीतला अनुभव किती जाचक होता, याचा अनुभव त्यांनी घेतला. या काळात त्यांची तब्येत अगदीच ढासळली.

१९३३ साली तुरुंगातून बाहेर पडल्या तेव्हा दुर्गाबाई २४ वर्षांच्या होत्या. तुरुंगातल्या वास्तव्यात सहकैदी असलेल्या महिलांची जी अवस्था त्यांनी अनुभवली होती, त्यातून एका संकल्पानं त्यांच्या मनात आकार घेतला होता. या स्त्रियांना कायदेशीर मदत करण्यासाठी आपण वकील व्हायचं. पण त्या तर पाचवीच शिकल्या होत्या. शिवाय इंग्रजी ठाऊक नाही. परभाषेवर बहिष्कार म्हणून त्यांनी शाळा सोडली होती. आता तीच शिकल्याशिवाय त्यांना पुढे जाता येईना. मग त्यांनी खास शिकवणी लावून इंग्रजी पक्कं केली. मदनमोहन मालवीय यांच्या सहाय्यानं बनारस हिंदू विद्यापीठातून त्या मॅट्रिक झाल्या. पुढे त्यांना राज्यशास्त्रात पदवी घ्यायची होती. पण मालवीयांच्या मते तो पुरुषांचा प्रांत असल्यानं त्यांनी दुर्गाबाईंना हा विषय शिकायला परवानगी नाकारली. दुर्गाबाईंनी राज्यशास्त्र शिकण्याचा पणच केला. विशाखापट्टणच्या आंध्र विद्यापीठात त्या राज्यशास्त्र शिकल्या. पुढचं शिक्षण परदेशी करण्यासाठी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. पण दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानं त्यांना बाहेर जाता आलं नाही. अखेर मद्रासमधून त्यांनी एल. एल. बी. पूर्ण केलं. ४ वर्षांतच मद्रासमधल्या नामवंत वकिलांत त्यांची गणना होऊ लागली. इथंच त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी काम करणारी आंध्र महिला सभा स्थापन केली. पुढच्या १० वर्षात ती नावारुपाला आली.

वयाच्या ३७ व्या वर्षी मद्रास प्रांतातून भारताच्या संविधानसभेवर त्या निवडून आल्या. नियमित उपस्थिती आणि सक्रिय सहभाग असलेल्या दुर्गाबाईंनी संविधानसभेत सुमारे ७५० दुरुस्त्या सुचवल्या. भाषा, धर्मस्वातंत्र्य, राज्यसभेतल्या सदस्यत्वासाठीची वयोमर्यादा, न्यायालयांची भूमिका, न्यायाधीशांची निवड आणि न्यायव्यवस्थेची स्वायत्तता अशा अनेक विषयांवर त्यांनी संविधानसभेतल्या चर्चांत हस्तक्षेप केला. मुलींना संपत्तीत अधिकार देणाऱ्या हिंदू कोड बिलाच्या त्या कडव्या समर्थक होत्या. हंगामी संसदेत तीव्र विरोधामुळे ते माघारी घ्यायला लागणं ही त्यांना मोठी दुर्दैवी घटना वाटली. कौटुंबिक खटल्यांसाठी स्वतंत्रपणे कुटुंब न्यायालयं असावीत यासाठी त्यांनी आघाडी उघडली. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर १९८४ मध्ये अशी न्यायालयं सुरु करण्याबाबतचा कायदा संसदेनं संमत केला.

संविधानसभेतल्या तसेच हंगामी संसदेतल्या दुर्गाबाईंच्या कामाचे एक प्रसंशक होते चिंतामण द्वारकानाथ देशमुख. देशमुख महाराष्ट्रातले. रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर. १९५० सालचे भारताचे अर्थमंत्री. त्यांच्या अर्थसंकल्पाचे ‘श्रीमंतांचं बजेट’ म्हणून दुर्गाबाईंनी वाभाडे काढले. आश्चर्य म्हणजे वित्तीय विधेयकाच्या चिकित्सेसाठी नेमलेल्या निवड समितीवर खुद्द दुर्गाबाईंची निवड होते. इथं देशमुख आणि दुर्गाबाईंचा अधिक परिचय होतो. देशमुख दुर्गाबाईंना लग्नासाठी विचारतात. दुर्गाबाईंनी होकार दिल्यावर देशमुखांच्या घरी १९५३ साली उभयतांचा अगदी साध्या पद्धतीनं नोंदणी विवाह होतो. नेहरु, सुचेता कृपलानी आणि दुर्गाबाईंचा भाऊ साक्षीदार म्हणून सह्या करतात.

पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कामाची जबाबदारी पार पाडल्यावर दुर्गाबाईंना राजीनामा देऊन कुटुंबासाठी वेळ देण्याची इच्छा असते. पण नेहरुंच्या आग्रहाखातर केंद्रीय समाज कल्याण मंडळाची जबाबदारी त्या घेतात. जी जबाबदारी त्या घेतात त्यात मूलभूत असं काम करतात, हा त्यांचा लौकिकच होता. इथंही त्यांनी तेच केलं. देशमुखांवरही विविध जबाबादाऱ्या येऊन पडत होत्या. या पति-पत्नींचा आपसात एक करार होता. दोघंही सरकारी पदावर असले तर एकानं पगार घ्यायचा नाही. देशमुख महिना १ रु. नामपात्र पगार घेत. दुर्गाबाईंच्या पगारात घर चाले.

दुर्गाबाई आणि सी. डी. देशमुख यांचं नातं खूप गहिरं होतं. दुर्गाबाईंची मधुमेहामुळं आधी दृष्टी गेली. पुढं त्यांची तब्येत आणखी खालावत गेली. ९ मे १९८१ ला वयाच्या ७१ वर्षी त्यांनी प्राण सोडला. नवऱ्याला आधी सांगितल्याप्रमाणे जसा त्यांना हवा होता तसा – नवऱ्याच्या बाहुंत विसावा घेताना. देशमुख पुढं लिहितात – “ती आणि मी विभाजन होऊ न शकणाऱ्या अशा एका पूर्णात एकात्म झालो होतो.”

अशा या दुर्गाबाईं देशमुखांना पद्भविभूषणसहित अनेक पुरस्कारांनी गौरविलं गेलं आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_________________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा सहावा भाग ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

No comments: