Tuesday, February 4, 2025

पूर्णिमा बॅनर्जी


संविधान सभेतल्या महिला सदस्य स्वतेजानं तळपणाऱ्या तारका असल्याचं आपण पाहत आलो आहोत. पण यातल्या काही दीर्घकाळ तळपल्या. तर काही उल्कापातासारख्या चमकून अकाली नाहीशा झाल्या. काहींच्या तेजाचं सामर्थ्य निर्विवाद असलं तरी त्यांच्या सबंध जीवनाबद्दल फार कमी माहिती मिळते. पूर्णिमा बॅनर्जी अशांमध्ये मोडतात. वास्तविक, त्यांच्या नात्यांचा, संबंधांचा परिसर लकाकत्या नामवंतांचा. तरीही या प्रभावळीत त्यांच्या चरित्राचे अनेक तपशील गुमनाम राहिले. संविधान सभेतली त्यांची भाषणं, त्यांचे चर्चेतले हस्तक्षेप सरकारनेच नोंदवल्यामुळे उपलब्ध आहेत. ही भाषणं, हे हस्तक्षेप किती मौलिक आहेत, त्याचा एखाद-दुसरा नमुना आपण पुढे पाहूच. त्यांच्या चरित्राच्या अभ्यासकांना या भाषणांतून त्यांच्या महतीचे काही दाखले मिळतात. बाकी तपशील त्यांच्या नात्यांतून, संबंधांतून शोधावे लागतात.

पूर्णिमा बॅनर्जींचा जन्म १९११ सालचा, हे खात्रीने कळतं. पण तो कालका (म्हणजे त्यावेळचा पंजाब, आताचा हरयाणा) येथे झाला, हा अंदाज त्यांच्या बहिणीचं जन्मस्थळ ते असल्यानं बांधावा लागतो. त्यांची ही बहीण म्हणजे अरुणा असफ अली. १९४२ च्या उठावातली नायिका. गांधीजींनी ‘करो वा मरो’ संदेश ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईच्या गवालिया टँक मैदानातून दिला आणि सगळ्या प्रमुख नेत्यांना त्या रात्री अटक झाली. सरकारनं दडपशाही अवलंबली. ९ ऑगस्टला लोकांचे उठाव सुरु झाले. त्यावेळी याच गवालिया टँक मैदानात अरुणा असफ अली या तरुण स्वातंत्र्य सैनिक मुलीनं अत्यंत निर्भीडपणे तिरंगा फडकावून ब्रिटिश सरकारला ललकारलं. पूर्णिमा अरुणांपेक्षा दोन वर्षांनी लहान. पूर्णिमा-अरुणा यांची आई अंबालिका देवी आणि वडील उपेंद्रनाथ गांगुली. उपेंद्रनाथांचे बंधू नागेंद्रनाथ हे रवींद्रनाथ टागोरांच्या सर्वात धाकट्या मुलीचे पती. म्हणजे टागोरांची मुलगी पूर्णिमा-अरुणाची चुलती. या नात्यानं टागोर आजोबा. जिचा आपण परिचय करुन घेत आहोत त्या आपल्या नायिकेचं पूर्णिमा हे नाव टागोरांनीच सुचवलं.

इंग्रजांच्या आगमनानं ज्या सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय हालचालींना भारतात गती मिळाली, त्यातनं धार्मिक प्रबोधनाच्या परंपरांनी आकार घेतला. प्राचीनतेची आधुनिकतेशी सांगड घालत ब्राम्हो, प्रार्थना, आर्य असे समाज स्थापन झाले. पूर्णिमाच्या आईचे वडील त्रैलोक्यनाथ सन्याल हे ब्राम्हो समाजाचे प्रचारक. संगीतकार, लोकनाट्यातले कलावंत असलेल्या त्रैलोक्यनाथांनी ब्राम्हो संगीताला जन्म दिला. हा ब्राम्हो संगीताचा आकृतिबंध स्वीकारुन टागोरांनी ज्याला पुढे रवींद्र संगीत म्हटलं गेलं, ते विकसित केलं.

एकीकडे रुढ समाजरचना जैसे थे ठेवण्यात हितसंबंध असलेल्या भद्र म्हणजे कथित उच्चवर्णीयांतल्याच एका विभागानं ही बंडं केली. ती स्वकीयांविरुद्ध होती. नव्या न्याय्य समाजरचनेसाठी ही जुनी व्यवस्था मोडणं, किमान दुरुस्त करणं गरजेचं आहे, हे या लोकांनी ताडलं होतं. या परंपरेतून पूर्णिमा, अरुणा यांना पुढच्या बंडांची ताकद मिळाली. अरुणानं तर आंतरधर्मीय लग्न केलं. तिच्या अभिजन खानदानाला ही रुचणारी बाब खचितच नव्हती. असो. आता आपण पूर्णिमाविषयी जेवढं ठाऊक झालं, त्यातलं काही समजून घेऊ.

अरुणा लाहोरच्या सेक्रेड हार्ट कॅथेड्रल आणि नंतर नैनितालच्या ऑल सेंट्स कॉलेजमधून शिकल्या, त्यामुळे पूर्णिमांचंही शिक्षण तिथूनच झालं असावं, असं बोललं जातं. त्या किती शिकल्या? बी. ए. झाल्या असाव्यात. कारण लखनौच्या तुरुंगात असताना बी. ए. च्या परीक्षेच्या तयारीसाठी शांत जागा मिळावी म्हणून त्या प्रयत्न करत असल्याचं सुचेता कृपलानींनी लिहून ठेवलं आहे. सुचेता कृपलानी त्याच तुरुंगात त्यावेळी होत्या.

संविधानसभेतल्या चर्चांत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून त्यांचा त्यातील अभ्यास लक्षात येतो. नेहरू आणि इंदिरा गांधींना त्यांनी लिहिलेल्या पत्रातल्या पुस्तकांच्या संदर्भांवरुन त्यांच्या व्यासंगाची कल्पना येते.

पूर्णिमांचं लग्न वयाच्या १७ व्या वर्षी प्रणब कुमार बॅनर्जी यांच्याशी झालं. प्रणब यांचे वडील प्यारेलाल अलाहाबादचे नामवंत वकील होते. मोतिलाल नेहरु आणि ते एकाच वेळी अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली करत होते. त्यांचे मैत्रीचे संबंध होते. बहुधा त्यामुळेच पूर्णिमा आणि नेहरु कुटुंबीयांचे बंध जुळले असावेत. जवाहरलाल, त्यांची बहीण विजयालक्ष्मी आणि कन्या इंदिरा या तिघांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अलाहाबादच्या (म्हणजे आताच्या प्रयागराजच्या) नेहरु कुटंबीयांच्या आनंद भवन या घरात पूर्णिमांचा सतत वावर असे. जवाहरलाल नेहरु प्रेमानं त्यांना ‘नोरा’ म्हणून संबोधत. ग्रीक-अरबी मूळ असलेल्या नोराचा अर्थ होतो – प्रकाश, तेज.

देशातल्या अनेक प्रमुख महिला नेत्यांचा संबंध असलेल्या, स्त्रियांच्या प्रश्नावर लढणाऱ्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या पूर्णिमा एक पदाधिकारी होत्या. या संघटनेचं अलाहाबादचं काम त्या पाहत असत. परिषदेच्या त्यावेळच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष बेगम हमीद अली पूर्णिमांविषयी म्हणतात – ‘सर्वत्र संचारणारी ती अप्सरा आहे. पौर्णिमेच्या चंद्रासमान ती तिच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांच्या मनांवर हर्षाची पखरण करते.’

नेहरु घराण्याशी असलेल्या संबंधामुळेच पूर्णिमा बॅनर्जी यांचा संबंध काँग्रेस आणि स्वातंत्र्य चळवळीशी येतो. सबंध आयुष्यभर समाजवादाशी असलेली त्यांची निष्ठा ही नेहरुंच्या वैचारिक संस्कारातूनच आकाराला आली. आर्थिक न्यायाची संकल्पना दादाभाई नौरोजी अध्यक्ष असल्यापासून काँग्रेसमध्ये आली होती. पुढे सोव्हिएट युनियनच्या १९१७ सालच्या क्रांतीचा जगभरच्या स्वातंत्र्य लढ्यांवर प्रभाव पडला आणि स्वातंत्र्यानंतरची देशातली आर्थिक रचना समाजवादी स्वरुपाची असेल, याबाजूनं बहुमत तयार होऊ लागलं. १९२८ च्या प्रति संविधान समजल्या जाणाऱ्या मोतीलाल नेहरु समितीच्या अहवालाच्या लिखाणात समितीचे सचिव असलेल्या जवाहरलालांचा मोठा सहभाग होता. त्यातून समाजवादी विचारांचा प्रभाव व्यक्त होतो. या वातावरणात जयप्रकाश नारायण, लोहिया, आचार्य नरेंद्र देव, आपल्या आजच्या नायिका पूर्णिमा बॅनर्जी, तिच्या भगिनी अरुणा यांचा एक समाजवादी प्रवाह काँग्रेसअंतर्गत तयार होऊ लागला.

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत पूर्णिमा यांना पहिला तुरुंगवास घडला. त्या अलाहाबाद काँग्रेस समितीच्या सचिव झाल्या. कामगार आणि शेतकरी यांना त्यांच्या प्रश्नांवर संघटित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्रियांच्या पडदा पद्धतीच्या त्या विरोधात होत्या. एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या रामराणी नावाच्या पत्नीचा पडदा त्यांनी काढला. हे तिला पटवून केलं असावं. कारण पुन्हा तिनं आयुष्यात तो घेतला नाही.

ब्रिटनने भारतीयांना न विचारता दुसऱ्या महायुद्धात खेचलं होतं. त्याविरोधात सामूहिक आंदोलनांऐवजी अहिंसक वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम १९४० साली काँग्रेसनं सुरु केली. युद्धविरोधी प्रचार वैयक्तिक पातळीवर कार्यकर्ते करत. पूर्णिमा बॅनर्जी आणि सुचेता कृपलानी यांची संयुक्त प्रांतात म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशात वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड झाली. या दोघींनाही ब्रिटिशांनी अटक केलं. १९४२ च्या चले जाव चळवळीत पूर्णिमा बॅनर्जी यांना पुन्हा अटक झाली. अशीच अटक झालेल्या तिघी क्रमानं त्यांना तुरुंगात भेटल्या. आधी विजयालक्ष्मी पंडित, नंतर त्यांची कन्या चंद्रलेखा आणि नंतर इंदिरा गांधी.

नेहरु आणि इंदिरा या पिता-पुत्रीच्या पत्रांतून पूर्णिमांच्या तब्येतीविषयी काळजीनं लिहिलेलं आढळतं. पाठोपाठच्या अटकांनी पूर्णिमांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम केला होता. याआधी त्यांना क्षय होऊन गेला होता. १९४३ साली त्यानं पुन्हा डोकं वर काढलं. त्याकाळात क्षय जीवघेणा आजार मानला जाई. आजच्यासारखे उपाय त्यावेळी नव्हते. उपलब्ध उपचार, पथ्यं, पौष्टिक आहार, स्वच्छ हवेतील निवास आणि जीवनशैलीत अनुकूल बदल यांनी हा आजार आटोक्यात आणला जाई. नेहरु इंदिरा गांधींना लिहितात – ‘नोराच्या तब्येतीविषयी वाचून मला खूप दुःख झालं. ती तब्येतीची अगदीच हेळसांड करते. काहीही नियम, शिस्त पाळत नाही.’

हा पत्रव्यवहार पूर्णिमा बॅनर्जींच्या कौटुंबिक संबंधांवरही थोडा प्रकाश टाकतो. १९४५ च्या एका पत्रात इंदिरा गांधी वडिलांना लिहितात – ‘नोरानं काही वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला आहे. तरीही ती नवऱ्याबरोबर त्याच घरात राहते. हाच माझा नवरा म्हणून सांगते. त्यानं मात्र दिल्लीच्या एका मुलीशी लग्न केलं आहे.’

या कौटुंबिक ताणानं त्यांच्या तब्येतीवर आणखीन परिणाम झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन सर्व बळ एकवटून पूर्णिमा चळवळीचं काम करत राहिल्या. जयप्रकाश नारायणांच्या अटकेविरोधात पूर्णिमा यांनी मानवी अधिकारांचं हनन करणारी बेकायदेशीर अटक म्हणून ब्रिटिश सरकारच्या कृतीला न्यायालयात आव्हान दिलं. नारायण यांनी लिहिलं आहे - ‘नाजूक तब्येत असतानाही मोठ्या धैर्यानं पूर्णिमा यांनी हा धोका पत्करला.’

१९४६ साली त्या संयुक्त प्रांतातून संविधानसभेवर निवडून गेल्या. संविधानसभेत वयानं सगळ्यात लहान महिला होत्या दाक्षायणी वेलायुधन. वय ३४ वर्षं. तर त्यांच्यापेक्षा एक वर्षानं अधिक म्हणजे ३५ वर्षं वयाच्या पूर्णिमा बॅनर्जी. संविधानसभेत उद्देशिका, प्रतिबंधात्मक अटक, संपत्तीचा अधिकार, राज्यसभा सदस्यांची पात्रता अशा अनेक मुद्द्यांच्या चर्चांत त्यांनी गंभीर मांडणी केली. धर्मनिरपेक्षतेविषयीचं त्यांचं मत समजून घेणं अत्यंत उद्बोधक आहे. भारताची धर्मनिरपेक्षता ही वेगळ्या प्रकारची आहे. ती धर्माला नकार देत नाही. तर सर्व धर्मांविषयी आस्था बाळगायला शिकवते. मात्र सरकारचा कोणताही धर्म नसेल. त्या म्हणतात – ‘सरकारी मदत घेणाऱ्या शिक्षणसंस्थांमधलं धार्मिक शिक्षण हे विविध धर्मांच्या तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक प्राथमिक परिचय करुन देणारं असावं. विद्यार्थ्यांच्या मनाची कक्षा रुंदावणं हे त्याचं लक्ष्य हवं. ते आपपरभाव जागवणारं, सांप्रदायिक असता कामा नये.’ त्या पुढं म्हणतात - ‘आपला शैक्षणिक अभ्यासक्रम देशातील वैविध्याचा, विविध मतांचा आदर बाळगणारा, आरोग्यदायी नागरिक घडवणारा असावा.’ फाळणीच्या धार्मिक विद्वेषी रक्तपाताच्या पार्श्वभूमीवर पूर्णिमा बॅनर्जी हे मत मांडत होत्या.

संविधानसभेत एकूण १५ महिला होत्या, हे आपण वारंवार बोलत आलो आहोत. तथापि, त्यातल्या लीला रॉय आणि मालती चौधरी यांनी राजीनामे दिले. विजयालक्ष्मी पंडित सोव्हिएट युनियनच्या राजदूत झाल्या आणि सरोजिनी नायडू यांचं मध्येच निधन झालं. या चार जणी वगळल्यावर महिला सदस्य म्हणून फक्त ११ जणी संविधानसभेत उरल्या. या रिक्त ४ जागांवर महिलांचीच निवड करावी, अशी पूर्णिमा बॅनर्जी यांनी सूचना केली. पण ती मान्य झाली नाही.

२४ जानेवारी १९५० ला ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे स्वीकारलं गेलं. त्यावेळी सभागृहात हे राष्ट्रगीत म्हणणाऱ्या संचाच्या प्रमुख होत्या पूर्णिमा बॅनर्जी.

आधीपासून आजारी असलेल्या पूर्णिमा बॅनर्जी आता आपला आजार अधिक खेचू शकत नव्हत्या. त्यानं गंभीर वळण घेतलं. १९५१ साली वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्या गेल्या.

संविधान आपल्याला काय देतं? या प्रश्नाला पूर्णिमा बॅनर्जी यांचं उत्तर होतं – ‘सामाजिक रचना बदलण्याची साधनं संविधान देतं.’ ही साधनं वापरुन जे काही समाजात नीट नाही असं आपल्याला वाटतं, ते बदलण्यासाठी कटिबद्ध होणं म्हणजेच पूर्णिमा बॅनर्जींसारख्यांचं राहिलेलं काम पूर्ण करणं आहे. तीच त्यांना खरी आदरांजली आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

____________

मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा अकरावा भाग ४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.

No comments: